गाळाचे ढिगारे आणि तोडलेली बांधणं परिणीता दांडेकर ०७ मार्च २०२३

सूर्य पश्चिमेला कलला होता. त्याची सोनसळी किरणं आजूबाजूला पसरली होती. आम्ही वाशिष्ठी नदीच्या एका उपनदीच्या पात्रात उभे होतो. अवघ्या ६५ वर्षांचे हरी गणपत निकम हे एखाद्या डॉल्फिनसारखा सूर मारून बांधणाखाली गेले. काहीच वेळात त्यांनी एक टोपली वर आणली. ती सुबकरीत्या विणलेली टोपली इतकी सुंदर होती की, ती बनवणार्‍या हातांना दुवा द्यावीशी वाटली. त्यांचा उजवा हात त्यांनी टोपलीच्या तोंडावर घट्ट दाबून धरला होता…