सस्नेह नमस्कार!

ऑगस्ट १९८९ मध्ये मुद्रित अंकाच्या स्वरूपात सुरू झालेला ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचा चा प्रवास विविध वळणवाटांवरून गेला आहे. यातलाच एक टप्पा म्हणजे 'मिसा Online' या डिजिटल पोर्टलचा जन्म. आज डिजिटल माध्यम सर्वव्यापी होत असताना या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या वाचकांपर्यंत, विशेषतः तरूण वाचकांपर्यंत, मिळून साऱ्याजणीचा ठेवा पोचवावा आणि सध्याच्या गतिमान व काहीशा भयचकित करणाऱ्या सामाजिक-राजकीय पर्यावरणाच्या पार्श्वभूमीवर मिळून साऱ्याजणीने जी मानवीय मूल्ये रूजवण्याचा आजवर प्रयत्न केला ती मूल्ये याही माध्यमावरून रूजवण्याचं काम सुरू ठेवावं हा मिसा Online सुरु करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. 

आज विविध अस्मितांचं प्रकटीकरण हिंसकतेच्या वाटेने होऊ लागलेलं दिसतं आहे. माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे. अपूर्ण व एकांगी विश्लेषण, फेक न्यूज, संवादी व वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ अशा चर्चांचा अभाव. बायनरी स्वरूपाच्या मांडणीमुळे होणारं आकलनाचं ध्रुवीकरण या गोष्टी समाजस्वास्थ्यासाठी हानीकारक ठरत आहेत. एकूणच सार्वजनिक चर्चाविश्वामध्ये शांततामय सहअस्तित्वाच्या मूल्याची पुनर्स्थापना करणं गरजेचं झालं आहे. या पार्श्वभूमीवर मिसा Online या 'मिळून साऱ्याजणी'च्या माध्यमांतरातून एक निरोगी चर्चाविश्व घडवायला हातभार लागेल असा आमचा विश्वास आहे. आमच्या संपादकीय धोरणाचा हा एक महत्त्वाचा आयाम आहे. 

मिसा Online हे द्वैभाषिक (मराठी आणि इंग्लिश) पोर्टल असून दोन्ही भाषांमधून केल्या गेलेल्या अभ्यासपूर्ण लेखनाचं स्वागत आहे. याविषयीचा सविस्तर तपशील 'लिहिते व्हा' या विभागात वाचता येईल.  

मिसा Online बाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या अपेक्षा समजून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत!

धन्यवाद, 

गीताली वि. मं.

संपादक, मिसा Online