गाळाचे ढिगारे आणि तोडलेली बांधणं

०७ मार्च २०२३

सूर्य पश्चिमेला कलला होता. त्याची सोनसळी किरणं आजूबाजूला पसरली होती. आम्ही वाशिष्ठी नदीच्या एका उपनदीच्या पात्रात उभे होतो. अवघ्या ६५ वर्षांचे हरी गणपत निकम हे एखाद्या डॉल्फिनसारखा सूर मारून बांधणाखाली गेले. काहीच वेळात त्यांनी एक टोपली वर आणली. ती सुबकरीत्या विणलेली टोपली इतकी सुंदर होती की, ती बनवणार्‍या हातांना दुवा द्यावीशी वाटली. त्यांचा उजवा हात त्यांनी टोपलीच्या तोंडावर घट्ट दाबून धरला होता. त्यांनी टोपली जवळ आणली. हळुवार त्यावरचा हात काढला. तेव्हा त्यात दहा-बारा छोटाले मासे आणि काही खेकडे संधिकालाच्या प्रकाशात चमचमत होते. आजच्या रात्रीच्या कालवणाची सोय झाली होती.चिपळूण आणि संपूर्ण पश्चिम घाट क्षेत्रात आदिवासी कातकरी समूह पूर्वापार मच्छिमारी करत आला आहे. नदीतल्या माशांना पकडण्यासाठी त्यांनी शोधलेला मार्ग फारच कल्पक आहे. यालाच बांधण म्हणतात. बांधण हे एखाद्या धरणासारखे तयार केले जाते. मुख्य आणि विशेष म्हणजे ते नदीच्या पात्राखाली असते. नदीकाठच्या झाडांचं लाकूड आणि वेली यांचा यात वापर केलेला असतो. सर्वात आधी ऐनाच्या झाडाचे दणकट वासे प्रवाहात दगडी बुरुज उभारून त्यावर समांतर असे आडवे टाकायचे. त्यांना फांद्या आणि वेलींनी बांधून आधार द्यायचा. मग त्याच्या खाली नदीपात्रात खोदायचं. त्या खोदलेल्या भागात विणलेल्या टोपल्या ठेवायच्या. ज्याला टोके म्हणतात. ह्या टोपल्या शेरणी नावाच्या झुडपापासून विणलेल्या असतात. आता पाणी जिथून वाहतं, त्या पृष्ठभागावर एक जादू होते. पृष्ठभागावर योग्य जागा हेरली जाते. मग छोटी छोटी भोकं खणून त्यात पोकळ बांबू बसवतात. ही भोकं छोट्या दगडांभोवती लपवली जातात. ह्या भोकांमुळे एक जबरदस्त अशी ओढ (suction force) निर्माण होते. माशांना ही भोकं लक्षात येत नाहीत आणि पाण्याच्या दाबाने त्या भोकात ओढले जातात.

जरी हे सगळं सोपं वाटत असलं तरी, हे अद्भुत असं 'फिश इंजिनीरिंग' आहे.मच्छीमार समुदाय जी अशी बांधणं बांधत आहेत ते असे फ़िश इंजिनीअर्स आहेत. त्यांना नदीचा कल माहितीये आणि मासे हे तर त्यांचे कुटुंबीय आहेत. चंद्रकांतदादा जाधव सांगतो की, बांधणं हे नदीपात्राचा एक भाग आहेत. ती काही धरणं नव्हेत. नाहीतर मासे त्यात अडकलेच नसते. यात सुतेरी, खारबा, झिंगे, अहीर, वाम, कोळंबी, आणि खेकडे अशी १४ विविध जातींची नावं सांगितली.मला भेटलेल्या ह्या मच्छीमार समूहातल्या लोकांनी वाशिष्ठी नदीपात्रात माशांच्या अधिवासाचे विविध प्रकार दाखवले. उदा. डोह, छोटी तळी, नदीकाठच्या वनस्पती, झुडपं इ. चिपळूण तालुक्यात साधारण ५००-६०० बांधणं आहेत. हजारो कातकरी आदिवासी या बांधणांवर उपजीविकेसाठी अवलंबून आहेत. तोडलेली बांधणंबर्‍याच बांधणांना भेट दिल्यावर, मला तर ती ऐतिहासिक वारशासारखी वाटली. मग आम्ही केतन निकम आणि त्याच्या भावाला भेटलो. त्यांचं बांधण तोडलं गेलं होतं. कसलीही पूर्वसूचना किंवा नोटीस न बजावता ही कारवाई झाली. त्यांची रिकामी झोपडी नदीकाठावर उभी होती. वाशिष्ठीच्या एका सती नावाच्या उपनदीच्या पात्रातला गाळ उपसा करताना चालू झालेल्या खोदकामात जेसीबीनं त्यांचं बांधण तोडलं. पावसाळ्यात पूर येऊ नये, पाणी आटोक्यात राहावं यावर उपाययोजना म्हणून नदीपात्र खोदून गाळ काढणं, हे काम शासनाच्या जलसंपदा खात्यानं अग्रक्रमानं हाती घेतलं आहे. सतीच्या पुलावरून बघताना नदीकाठाशी साठलेला अमाप कचरा दिसतो. त्यात खोदून काढलेल्या गाळाचे ढिगारेच्या ढिगारे काठावर दिसतात. नदीशी जोडलेल्या इतर गटारांमधून कचर्‍याची भर पडत राहते. त्यामुळे सतीच्या इथं नदी ही एका ठराविक भारतीय शहरी नदीसारखी गलिच्छ वाटते.केतन निकमसोबत पुलावरून फिरत असताना तो म्हणाला, “तुम्हाला हा जो प्लास्टिकचा कचरा दिसतोय ना, तो आम्ही रोज संध्याकाळी साफ करतो. कारण तो आमच्या बांधणात अडकतो. त्यामुळे नदी स्वच्छ राहते.” मग त्यानं विचारलं, “आम्ही तर मच्छी धरतो, आमच्यामुळे पूर येतो, तुम्हाला असं वाटतं?” यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं.

ग्रीनवॉशिंग

भारतीय नद्यांना सर्वात मोठा धोका कसला असेल तर, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, नदीकाठ विकास, आणि नदी खोदकाम अशा प्रकल्पांचा. नदीकाठ विकास अशा गोंडस नावाखाली नदीची रुंदी कमी केली जाते. नदीकाठ आणि अनेकदा नदीपात्राचं ही सिमेंटीकरण होतं. त्यांची उभी-आडवी जोडणी तोडली जाते आणि काठालगतचे भाग ताब्यात घेतले जातात. नदी पुनर्जीवित करण्याच्या नावाखाली नदीचा तळ खरवडला जातो, तिची वळणं सरळ केली जातात आणि नदीकाठ अस्थिर होतो. नदीपात्रातला गाळ उपसा करण्याच्या नावाखाली जेसीबी नदीपात्राच्या नाजूक परिसंस्थेत मोकाट फिरतात, गाळाचे डोंगर नदीकाठावरच किंवा जवळच रिकाम्या भागात रचले जातात. अस्थिर नदीकाठ आणि बेशिस्तपणे रचलेले चिखलाचे डोंगर यामुळे पुराचा धोका अजूनच वाढतो. या बेभरवशी आणि दिशाभूल करणार्‍या प्रकल्पांची नीट तपासणी केली पाहिजे.सुमारे ७०००० लोकसंख्येच्या चिपळूण गावातल्या नदीची ही कथा. चिपळूणजवळचा भाग हा सह्याद्री रांगेत अरबी समुद्रापासून साधारण ५० किमीवर आहे. नदीअभ्यासक मल्हार इंदुलकर आणि श्रमिक सहयोगचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजनभाई इंदुलकर यांनी मला आणि अभय कानविंदे यांना हा सगळा भाग दाखवला व त्यातील अनेक समस्यांची ओळख करून दिली. जुलै २०२१ मध्ये चिपळूणमध्ये महापूर आला होता. पश्चिमवाहिनी वाशिष्ठी नदीनं तिची पातळी ओलांडली होती. मुरादपूर भागात नदीनं आजवरच्या सर्वाधिक धोकादायक पातळीची नोंद केली. २१ जुलैच्या रात्री नदीत पाणी वाढत गेलं, आणि तिनं पातळी ओलांडली. पाणी शहरात पसरत गेलं. चिपळूणचा ८०% भाग हा २२-२३ जुलै असे दोन दिवस पुराच्या पाण्याखाली होता. १२०० हून जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. त्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं होतं. बहुतांश इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले होते. यामुळे एका हॉस्पिटलच्या कोव्हीड वॉर्डातले ८ रुग्ण दगावल्याची भयंकर घटनाही घडली. ज्या बोटींनी नागरिकांना हलवण्यात येत होतं, त्यातली एक बुडाली. त्यात दोघं जण बुडून मरण पावले. वाशिष्ठी आणि तिची प्रमुख उपनदी जगबुडी या दोन्ही नद्या ५ ते ६ मीटर्सच्या धोकादायक पातळीवरून वाहत होत्या. वाशिष्ठीच्या प्रवाहात २ लाखाहून अधिक क्युसेक्सने पाणी सोडलं होतं. या महापुरानंतर चिपळूणातील नागरिकांनी मोठे निषेध मोर्चे काढले. या महापुरात जवळपास १००० कोटी रुपयांचं नुकसान झालं. चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून बरेच लोक एकत्र आले आणि निषेध मोर्चा तयार झाला.

सर्व समस्यांसाठी एकच उपाय : खोदकाम

जुलै २०२१ मधल्या महापुरामागील कारणं ही विविध आणि गुंतागुंतीची होती. तरीही त्यावर एकच सोपा उपाय जल संपदा विभाग, चिपळूण नगरपरिषद आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी काढला. हा उपाय म्हणजे वाशिष्ठी, वैतरणा आणि शिव नद्यांच्या पात्रात खोदाई करून गाळ उपसा करणे. जेणेकरून त्या नद्यांची वहनक्षमता वाढेल. यासाठी अनेक जेसीबी कामाला लावण्यात आले. ते जेसीबी नदीपात्रातून गाळ काढत फिरू लागले. यात वाशिष्ठीच्या पात्रातून बर्‍यापैकी गाळ काढला गेला. चिपळूणच्या लगतचं गोवळकोट बंदर हे १९९९ साली बंद झालं. त्यामागचं कारण म्हणजे नदीपात्राची वाढलेली पातळी आणि गाळ. पण २०२१ च्या महापुरात रेवसा वाहून आलेला होता. नदी जी अनेक वर्षं सुपीक गाळ जमा करते त्यापेक्षा ही रेताड वाळू वेगळी होती.नदीच्या व्यक्तिमत्त्वाचा कधीच अभ्यास होत नाही. तिच्या प्रवाहातले उभे-आडवे छेद कसे बदलत असतात, पुरानंतर तिची झालेली झीज किंवा तिने वाहून आणलेला गाळ, त्यातले नवीन-जुने पदार्थ, रेवशामुळे बुडालेले महत्त्वाचे अधिवास, कमकुवत झालेल्या नदीकाठाच्या परिसंस्था यांचाही अभ्यास होत नाही. जेसीबी चालक सरळ नदीलाच खरवडून काढतात.नदीकाठाला जो झाडांचा प्रदेश असतो, त्यामुळे नदीकाठ खरं तर सुरक्षित राहतो, तोच या कारवाईत खोदला गेला. ७० वर्षं जुनी करंजाची झाडं जी या नदीकाठाला अर्धा किलोमीटरपर्यंत पसरली होती, ती नाम फाऊंडेशननं केलेल्या खोदकामात तोडली गेली. ऊदांचे अधिवास आणि माशांच्या जागा साफ केल्या गेल्या. फरशीच्या इथल्या पुलाजवळचं सुमारे २.५ एकर क्षेत्रफळाचं एक बेटच संपूर्णपणे नाहीसं झालं. त्या बेटावर स्थानिक लोकांनी माडाची झाडं लावली होती. तसंच, त्यावर करंजेश्वरी देवीचा सांस्कृतिक उत्सव ही साजरा केला जायचा. जर नदीकिनाऱ्याच्या जंगलातली करंजाची झाडं नष्ट केली गेली असतील, तर करंजेश्वरी देवीच्या उत्सवालाही जागा नसणार, हे चपखलपणे लागू होतंय.बहादूरशेख नाक्याजवळच्या पुलाच्या इथल्या एका बेटाचा प्रवाहातला वरचा भाग खोदकामात नाहीसा झाला आहे. सद्यस्थितीत हे काम जोरात चालू आहे. अनेक जेसीबी या खोदकामात सहभागी झालेले आम्ही पाहिले. त्यांना ते काय करत आहेत याबद्दल जाणीव नसावी, असं वाटलं. जेसीबी चालकांना त्यांनी किती खोलवर खणावं, काय काळजी घ्यावी, कुठे थांबाव ह्याबद्दल काहीच कल्पना दिली गेली नाहीये. नदीकाठ ९० डिग्रीच्या अंशात उभे चिरले गेले आहेत. त्यामुळे ते नाजूक स्थितीत आहेत. म्हणजे जर पायाखालच्या भागाची झीज झाली तर ते पहिल्या पावसाच्या पाण्यातच कोसळू शकतात. सगळा गाळ परत नदीपात्रात पसरू शकतो.

कचरापट्टी

खोदकामात बाहेर काढलेल्या विविध वस्तू नदीकाठावर टाकून दिलेल्या आम्ही पाहिल्या. जशी काय एखादी कचरापट्टी असावी. या वस्तू पहिल्या पावसात परत पाण्यातच जाणार आहे. त्यापलीकडचा विनोद म्हणजे, या कचरापट्टी चिपळूणमधल्या आणि जवळच्या तलावांमध्येही टाकून दिल्या आहेत. गाळानं भरलेल्या नदीची वहनक्षमता चांगली असू शकते. पण उद्ध्वस्त आणि कचर्‍याने भरलेले शहरी तलाव मात्र पुराला आमंत्रण देतात. हे पाहून चिपळूणच्या तहसीलदारांनी मे २०२२मध्ये पत्र लिहून हे खोदकाम थांबवायला सांगितलं होतं. पण आता ते चिपळूणच्या हद्दीबाहेरही चालू झालंय.

अनियोजित खोदकामाचे दुष्परिणाम

समुद्राजवळच्या नद्यांच्या परिसंस्थेत येणारे पूर रोखण्यासाठी जे खोदकाम करून गाळ उपसला जातो, त्याच्यातील गुंतागुंतीचे मुद्दे दाखवणारे अनेक अभ्यास झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर केलेल्या गाळ उपशानं पुरावर नियंत्रण मिळू शकतं. पण त्यामुळे प्रवाहाची तीव्रता वाढू शकते. अशानं खोदकामाचा फायद्यापेक्षा नुकसान जास्त होतं. दुसर्‍या बाजूला, किरकोळ पद्धतीने केलेल्या गाळ उपशानं पुरावर तात्पुरतं नियंत्रण मिळू शकतं. पण परिणामी खोदकाम केलेल्या भागाची झीज निश्चितपणे होते. नदीपात्राची वाढवलेल्या रुंदीनं खालच्या प्रवाहात उलट पुराचं पाणी वेगात येऊ शकतं. (Rose and Peters 2001). खोदकाम करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी किंवा खोदकामाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा खोदकाम करताना असा कोणताही अभ्यास केला गेला नाही.

निष्कर्ष

१२ डिसेंबर २०२२ रोजी अनेक संस्थांनी एकत्र येऊन बांधणं तोडल्याबद्दल सत्याग्रह केला. वाशिष्ठी नदीतल्या खोदकामाबद्दल विचारविनिमय करावा, अशी त्यांची मागणी होती. त्यांना अजूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाहीये.जरी गाळ काढणं महत्त्वाचं असलं, तरी नदीपात्राची मोडतोड कोणीच करू नये. त्याआधी तिथल्या परिसंस्थेचा आणि त्यावर उपजीविका करणार्‍या कातकरी आदिवासी, गोपाळ यांचा विचार केला जावा. वरच्या आणि खालच्या पात्रात काय परिणाम होतील, याचा विचार न करता नदीकाठ तोडू नयेत. अशास्त्रीय खोदकामामुळे वरच्या पात्रातली झीज पटकन होते. आणि खालच्या पात्रातले काठ अस्थिर बनतात आणि त्यामुळे पुराचा धोका कायम राहतो.

काही सूचना :

  • EIA च्या अधिसूचना लक्षात घ्याव्यात. पर्यावरणीय मंजुरी हवी. खोदकाम आणि संपूर्ण बेटच नाहीसं होणं याबाबत EIA आणि सार्वजनिकरीत्या सल्लामसलत व्हायला हवी.
  • वाशिष्ठी नदीच्या खोर्‍यात महापुरानंतर झालेल्या बदलाचा अभ्यास व्हायला हवा. २०२१च्या महापुरानंतर कुठे कुठे झीज झालीये आणि कुठे गाळ साठलेला आहे हे जुने सॅटेलाईट फोटो वापरून तपासणं, हे या अभ्यासाने दाखवावं. नदीच्या आडव्या-उभ्या छेदांचा अभ्यास तर सतत करणं गरजेचं आहे.
  • सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाचे भाग जसे की, बांधणं, डोह आणि झीजलेले नदीकाठ नकाशावर नोंदवले जावेत. हा अभ्यास मच्छीमार समूहांसोबत करणे आवश्यक आहे. कारण, त्यांना नदीप्रवाहाची सध्याची आणि आधीची नेमकी स्थिती माहीत असते. त्यांना डोह आणि नदीकाठांबद्दलही ज्ञान असतं.
  • खोदकाम कमी करून, नदीपात्रात महापुरानंतर होणारे बदल याचा अभ्यास करून खोदकामाचा एक सुनियोजित आराखडा बनवावा. जिओमॉर्फोलॉजीमधील तज्ज्ञ लोकांना बोलावून त्यांच्याकडून याबाबत सविस्तर अहवाल घ्यावा.
  • जेसीबींचा नदीपात्रातला वापर कमी असावा. त्याऐवजी हे खोदकाम कातकरी आदिवासी आणि लगतच्या मच्छीमारांकडे सोपवावं.
  • खोदकामासारख्या नदीप्रवाहात करण्यात येणार्‍या हस्तक्षेपांमुळे नदीवर दुष्परिणाम होतात, हे तर आता जगभर स्वीकारलं गेलंय. म्हणूनच वाशिष्ठी नदीच्या महापुराच्या समस्येचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे आणि त्यातून शाश्वत उपाय पुढे आणायला हवा. गाळ उपसा करणं हा उथळ उपाय झाला. हवामान बदलामुळे पुरांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे. ते अधिक धोकादायकही झाले आहेत. म्हणूनच एक शाश्वत आराखडा बनवणे हिताचे आहे. या आराखड्यात नगरपरिषद, पर्यावरण खातं, जलसंपदा खातं, आणि आपत्ती निवारण कक्ष या सर्वांनी सहभाग घेणं महत्त्वाचं आहे.
  • वाशिष्ठी खोर्‍यातील आणि पश्चिम घाट क्षेत्रातील पुरांच्या कारणांना विविध आयाम आहेत. म्हणूनच उपायही बरेच आहेत. मी त्या सगळ्या आयामांची चर्चा करणार नाही. जमल्यास त्यावर स्वतंत्रपणे लिहिता येईल. नगरपरिषदेने घातलेल्या लाल आणि निळ्या रेषा प्रतिबंधाला टाळणे व कोयना धरणातून सोडल्या जाणार्‍या पाण्याने किंवा वरच्या प्रवाहातील इतर बदलांपासून निर्माण होणार्‍या दोषांना दूर करणे, हे नजीकच्या काळातील आव्हान आहे. केवळ सरकारी समिती जर निर्माण केली गेली, तर ती पाणी संसाधन खात्याच्या अखत्यारितल्या कामांची जबाबदारी घेणार नाही. सर्वात सोपा आणि आकर्षक उपाय म्हणजे खोदकाम करून गाळ काढणे हा मानला गेला आहे. आणि तोच राबवताना दिसत आहे.
  • पूर नियंत्रणासाठी जर शास्त्रीय आणि लोकसहभागाचा मार्ग स्वीकारला नाही, तर बेशिस्त पद्धतीने केलेल्या खोदकामामुळे चिपळूणजवळच्या आणि वरच्या-खालच्या नदीप्रवाहाच्या समस्येत भर पडू शकते.

मूळ लेख : परिणीता दांडेकर (parineeta.dandekar@gmail.com)
मराठी भाषांतर : हृषीकेश पाळंदे (hrishpalande@gmail.com)
फोटो : अभय कानविंदे (abhaykanvinde@gmail.com)