तुझं डोकं म्हणजे भाजेलेलं मडकं!
खेड्यापाड्यातल्या साध्या आयुष्यातही अनेक मोठ्या कथा दडलेल्या असतात. त्या फारशा कुणाच्या नजरेत येत नाहीत, पण त्या जगण्याच्या ताकदीची जाणीव करून देतात. एका साध्या स्त्रीच्या आयुष्याकडे पाहताना मैत्री, प्रश्न, वेदना आणि माणुसकीचा स्पर्श या सगळ्यांचा एक वेगळाच संवाद घडतो. अशीच एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रातून उलगडणारी ही कथा आहे. हा लेख म्हणजे श्वेताने तिची मैत्रीण अंजलीला लिहिलेलं एक मनापासूनचं पत्र आहे, ज्यातून एका स्त्रीच्या जगण्याची धडपड आणि तिच्या आयुष्यातील न बोलले गेलेले प्रश्न आपल्यासमोर येतात.
सखी अंजली,
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही. ही स्थिति आजही आपल्याला खेड्यापाड्यांत दिसते. भांडवलशाहीच्या विळख्यात अडकलेलं जग एका बाजूला आणि तुझ्यासारख्या बिनभिंतीच्या जगात राहणाऱ्या बायका हे दुसरं जग. त्यात आमचा मालवणी मुलुख! मूळ मातृसत्ताक असलेल्या आपल्या भूमीत पितृसत्ताक व्यवस्थेनं बस्तान मांडलं. आणि बाईचं अख्ख जग बदलून गेलं. पालकत्व नको म्हणून विवाहप्रस्ताव धुडकावून लावणाऱ्या या जगात तुझ्यासारख्या बायका सिंगल पेरेंट्स (एकल पालक असलेलं कुटुंब) बनून कशा काय जगत असतील?याचं कौतुक म्हणून नव्हे बरं का! तर एका स्त्री जाणिवेतून मी हे पत्र तुला लिहीत आहे.
जया माझी मैत्रीण, दरवेळी तिच्या बोलण्यात तुझं नाव येतंच. तेव्हा तुला भेटण्याची मनोमन इच्छा निर्माण झाली. काही भेटी आपसूकच घडतात, काही भेटी घडवून आणाव्या लागतात. काहीतरी विशेष कामगिरी केलेल्या महिलांच्या मुलाखती मिडियावाले स्वत: घरी जाऊन घेतात. जाहिररित्या त्यांचे सत्कारही करतात. पण तुझ्यासारख्या गावकुसात भाड्याच्या घरात राहून चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या बायका क्वचितच कुणाच्या तरी नजरेस येतात. सखी, मी लेखन करते हे तुला कदाचित ठाऊक असेल नसेल, तरीही माझ्याबरोबर झालेल्या भेटीत तू जे काही सांगितलं, ते अगदी प्रांजळपणे सांगितलं असशील याची मला खात्री आहे.
तुझं लग्नं तुला पदर आला, त्याच वयात झालं. तीन मुली एकामागोमाग एक वाढलेल्या असल्या की आई बापाला घोर लागून राहतो. प्रस्थापित समाजव्यवस्थेत आपल्यावर कुणी चिखलफेक करू नये, आपल्या पोरींच्या नावाला बट्टा लागू नये म्हणून, वयात आल्याआल्या पोरींची लग्न लावून दिली जातात. अर्थातच खालच्या सामाजिक स्तरात हे घडतं असं नाही. तर सर्वच समाज गटात काहीएक फरकानं हे असं चित्र दिसतं. तू तर एका सर्वसामान्य न्हावी कुटुंबात जन्मलेली. चौथीशिकलेली मुलगी. तुझ्या मते, बाई म्हणजे स्वयंपाक, धुणी भांडी, केरकचरा या कामासाठी ईश्वराने जन्मास घातलेलं अपत्य. तुझ्याच विचारसरणीची माणसं तुला आसपास दिसत राहतात. कुणाचाही जन्म जर भाजलेल्या मडक्यासारखा झाला असेल, तर त्याला सडण्याची आणि कुजण्याची भीती उरत नाही. तुझ्या विचारांची मशागत अशी भाजलेल्या मडक्यासारखी झाली आहे. त्यामुळे तुला दारुडा नवरा असणं, त्यानं मारणं हे काही गैर वाटलं नाही. त्याच्या सांधा निखळलेल्या रथाला आधार म्हणून लोहाची चाकं बनून तू उभी राहिलीस.
तू मला म्हटलंस, ‘घरकामं ही मुलींचीच असतात.’ हो गं अंजली, मी कुठे नाही म्हणते. पण बाई पैसे कामवायला बाहेर पडते तेव्हा, ती कामं पुरुष करू शकत नाहीत का?तुझं उत्तर पाण्याइतकंच स्वच्छ. “बाई, आम्ही कधी असो ईचार करणव नाय. आपणांक जा काम दिला ता करुक होया. ता आपलाच काम आसा.”
अंजली, तुला पटणार नाही कदाचित, पण आपण स्त्रिया अशाच प्रकारच्या स्त्री पुरुष भेदभावास खतपाणी घालतो. हे काम बाईचं आणि ते काम पुरुषांचं असं काही नसतं. ज्याची जशी शारीरिक क्षमता आहे, तशा पद्धतीची कामं त्यांनी करावीत. आता तूच बघ ना, तुझं लग्न अल्प वयात झालं. वयाच्या पंचविशीत तुझा नवरा हे जग सोडून गेला. आणि तू दोन मुलं आणि घरची सगळी जबाबदारी तुझ्या डोक्यावर घेतलीस. तुला वाटलं नसेल का, ‘मी इतर बायकांसारखं जगावं’. चार भिंतीत राहून गृहिणी म्हणून बिनघोर जगावं? तुझा नवरा गेल्यावर पंधरा दिवसांत, थोरल्या मुलाला घरात कुलूपांत ठेवून, सहा महिन्याच्या तुझ्या मुलीला एका फडक्यात गुंडाळून तू घरकाम करायला बाहेर पडलीस. अगं बाईचं काम जर स्वत:चं घर सजवणं आहे, तर हे कामतुला जादा करावं लागलं असं वाटत नाही का? आणि वाटत नसेल तर, तू तुझ्यातील माणूस मारून टाकला आहेस.
अंजली उत्तर द्यायला तुझी जीभ धजली नसली तरी तुझी झुकलेली मान आणि पाणावलेले डोळे खूप काही सांगून गेले बघ. तुला सांगायचं टाळत होतीस मला, तू सोसलेलं बाईपण! कोंबड्याची मान मुरगळल्यागत तुझं कोवळं आयुष्य संपवणारं तुझ्या जीवनातील वैवाहिक वादळ. सखी, तू एक माणूस आहेस, हेही कदाचित तुंला कधी जाणवलं नसेल, म्हणून तू नवरा दारुडा निघाला तेव्हा त्याच्याशी वादावादी न करता लोकांची धुणी भांडी करू लागलीस. व्यवसायानं न्हावी असलेला तुझा नवरा आपलं काम प्रपंच सोडून अखंड दारूच्या नशेत राहू लागला, तेव्हा तू कुठला ईश्वर पूजत होतीस? कुठल्या देवीच्या पायात लोळण घेत होतीस? की नको देव नको धर्म म्हणत स्वत:च्या हाताला घट्टे पडेपर्यंत राबत होतीस? शरीर धर्म हा केवळ बाईला असतो का गं? पुरुषांचं काय? त्यांना शरीरधर्म नाही का? माझ्या प्रश्नांचा अर्थ तुला कळणार नाही. पण सखी तू बाईला शरीरधर्म मोठा असतो असं मानत आलीस. कुणाच्याही घरात त्यांच्या कुठल्याच वस्तूला स्पर्श न करता सांगितलेलं काम मुकाट्यानं करत आलीस. विधवा बाईला ज्या विटाळाला सामोरं जावं लागतं तो विटाळ देखील तू सोसलास.
तुझी पोरं श्रीमंतांच्या हवेलीत खेळत होती. तेव्हा तू दुजेपणाही अनुभवलास. ‘न्हाव्याच्या पोरांचे संस्कार घेशील रे, खेळू नको तिच्याशी.’ असले शब्द देखील कानावर पडले तुझ्या. तरी पोटच्या पोरांप्रमाणे मालकिणीच्या पोरांना अंगाखांद्यावर खेळवलंस, भरवलंस, अंगणात फेर धरलेस त्यांच्या बरोबर. तुझी पोरं लवकरच शिकत गेली, आपली मर्यादा सांभाळून बोलणं खेळणं वागणं त्यांच्यात राहणं. शाळेत जाऊ लागल्यावर त्यांना कळू लागलं, आपली आई हेच त्यांचं सर्वस्व. डोक्यावर छप्पर नसताना तू घडवलंस पोरांना. कमी पडू दिलं नाही मातेचं प्रेम. म्हणूनच तुझ्या प्रेमाच्या सावलीत वाढलेल्या तुझ्या लेकरांच्या शाळेत तुझा सत्कार केला गेला. आता तुझा मुलगा मोठा झालाय. त्याला तू आय टी आय पर्यन्त शिकवलंस. तोही काम करू लागलाय. आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवण्याचा त्याचा विचार आहे. मुलगी अत्यंत चुणचुणीत आणि हुशार आहे. आठवीत असली तरी ती समंजस आणि प्रगल्भ आहे. तुझ्या चेहऱ्यावर कितीही खुशी दिसत असली तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीनं कातरलं जातंय. आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडला नाहीस. कित्येक भूल पाडण्याचे क्षण तुझ्या आयुष्यात आले असतील. पण तू मात्र मुलांच्या डोळ्यात तुझी स्वप्नं पेरत राहिलीस.
सखी मला तुझं एक अजब वाटलं. माझ्या प्रश्नांना उत्तर देताना तू नवऱ्याची बाजू सांभाळत होतीस. असं का? नवरा हयात नाही त्यांच्याविषयी आपण वाईट का बोलावं म्हणून? की ‘पती म्हणजे परमेश्वर’ असं मानणाऱ्यातील तू आहेस? तुझ्याविषयी मिळालेल्या माहितीतून मला असं समजलं की तुझा नवरा दारू पिऊन लिव्हर खराब झाल्यानं पस्तीशीत मरण पावला. तू मात्र मला सांगितलं की, ते कधीतरी दारू प्यायचे, कावीळ झाली आणि दारू प्यायले आणि मरण पावले. आरोग्य शास्त्र माहीत असलेल्या माझ्यासारख्या बाईला हे पटणं कठीण! म्हणून मी जयाला विचारलं, तर तिने काय ते सत्य सांगितलं. सखी, बाईनं किती सोशीक असावं असं तुला वाटतं? आणि सोशीक असलं म्हणून काही नुकसान नसतं हे मला मान्य आहे. नवरा जर एक पुरुष म्हणून वागत असेल आणि तो चुकत असेल तर त्यालाही काही गोष्टी सुनावणं हे आपलं काम नाही का? आपली पोरं बिघडू नये म्हणून आपण त्यांना दटावतो. मारतो. आपण असं का वागतो? त्यांच्यावर आपलं प्रेम असतं म्हणून नं? तसंच नवऱ्याचं असतं. तो सहचर म्हणून वागण्यात कमी पडत असेल तर त्याच्या चुकांवर पांघरून का घालायचं? कदाचित माझे विचार तुला पटत नसतील. पण मीही एक स्त्री आहे व्यवस्थेनं घडवलेली तुझ्यासारखी हाडामांसांची बाई. फरक एवढांच की, मी उच्चशिक्षण घेतलं. मी वाचू लागले लिहू लागले त्यामुळे हे अवघड प्रश्न मला आज सतावत आहेत. सखी भेटत राहू असेच जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उकल होत नाही तोपर्यंत.
तुझी सखी, श्वेतल