या चैका! (महिला अंतराळयात्रींचा संघर्ष)

“मी सीगल बोलतेय. इकडे सगळं ठीक आहे. मला इथून खुलं क्षितिज दिसतं आहे: निळसर नितळ क्षितिजापलीकडे गडद अवकाशाचा खोल महासागर दिसतो आहे. तो मला खुणावतो आहे. इथून पृथ्वी खूप सुंदर दिसत आहे.” - व्हॅलेंटीना तेरेश्कोव्हा (पहिल्या महिला अंतराळयात्री) यांच्या उद्गाराचा स्वैर अनुवाद

ऑक्टोबर २०१९मध्ये क्रिस्टिना कोच आणि जेसिका मेर या अंतराळयात्रींना एक महत्त्वाचं काम देण्यात आलं. पृथ्वीपासून सरासरी ४०० किलोमीटर्सपेक्षा थोड्या जास्त उंचीवर प्रदक्षिणा घालणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रणेत काहीतरी बिघाड झाला होता. यंत्रणेतील न चालणाऱ्या भागांना काढून त्यांच्याऐवजी दुसरे भाग बसवणे आवश्यक होते. पण त्यासाठी कोणालातरी स्पेस स्टेशनच्या बाहेर, अंतराळात जाऊन हे काम करावं लागणार होतं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे प्रचंड वेगाने प्रवास करतं, अंदाजे प्रत्येक ९० मिनिटाला ते पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करतं. या उंचीवरून पृथ्वी सुंदर दिसत असली, तरी खुल्या अंतराळात बाहेर पडण्यासाठी धाडस लागतं. क्रिस्टिना कोच आणि जेसिका मेर या मात्र खंबीर मनाने बिघडलेल्या यंत्रणेवर काम करण्यासाठी अंतराळात गेल्या. हे जिकिरीचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांना अंतराळात सात तास, सतरा मिनिट थांबावं लागलं. जेव्हा त्या काम करून स्पेस स्टेशनमध्ये परत गेल्या, तेव्हा ह्या घटनेची इतिहासात दखल घेतली गेली. कारण, अंतराळात चालण्याच्या मोहिमेत फक्त महिला सहभागी होण्याची ही पहिली घटना होती. क्रिस्टिना यांच्या नावाचा २०२४ सालच्या अखेरीस आखल्या गेलेल्या आर्टेमिस-२ मोहिमेत समावेश केला आहे. या मोहिमेच्या अंतर्गत त्या चंद्राजवळ जाणाऱ्या पहिल्या महिला बनतील. २०२५ साली आखलेली आर्टेमिस-३ मोहीम चंद्रावर जाणार आहे. त्याअंतर्गत चंद्रावर पाऊल ठेवण्याची संधी क्रिस्टिना यांना मिळू शकते. अंतराळात जाण्यासाठी महिलांनी केलेल्या ऐतिहासिक संघर्षाचा तो सुवर्णक्षण ठरेल. एक काळ असा होता, जेव्हा महिला अंतराळयात्रींना अवकाशात जाण्यासाठीचा सर्वात मोठा अडथळा त्या महिला असण्याचा होता. महिलांना अंतराळात जाऊ देण्यासाठी धडपड केलेल्या बर्निस स्टॅडमन यांनी त्यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक दिले होते – ‘The Right Stuff - But the Wrong Sex’

(क्रीस्टिना कोच)

(जेसिका मेर)

१९५७ साली सोव्हियत रशियाने ‘स्पुटनिक-१’ नावाचा कृत्रिम उपग्रह अंतराळात पाठवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ‘एक्सप्लोरर-१’ नावाचा कृत्रिम उपग्रह पाठवला. जगातील दोन महासत्तांमध्ये अंतराळ जिंकण्याची शर्यत (Space Race) सुरू झाली होती. त्यानंतर अनेक वर्षं या दोन महासत्तांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. अवकाशात पहिला माणूस ‘युरी गागारीन’ यांना सोव्हियत रशियाने पाठवले. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘अॅलन शेफर्ड’ यांना अमेरिकेने अवकाशात पाठवले. कोण एकाच वेळी जास्त माणसे अवकाशात पाठवतो, कोण जास्त काळ अवकाशात राहतं, कोण एकाच वेळी दोन अंतराळयान पाठवतं, कोण अवकाशात पहिला चालण्याचा प्रयोग करतं, अशा प्रत्येक गोष्टीसाठी दोन देशांमध्ये स्पर्धा सुरू होती. सुरुवातीच्या स्पर्धेमध्ये सोव्हियत रशियाची कामगिरी अमेरिकेपेक्षा सरस होती. हे वर्चस्व टिकवून ठेवण्याचा रशियावर दबावही होता. याच काळात अमेरिका पहिली महिला अवकाशात पाठवणार अशी बातमी रशियाच्या हेरांनी आणली. आतापर्यंत सोव्हियत रशियाने महिला अंतराळयात्रींचा विचारच केला नव्हता. जेव्हा ही बातमी रशियाच्या अंतराळ मोहिमांच्या मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत पोचली तेव्हा त्याने डायरीत लिहिले - ‘कुठल्याही परिस्थितीत अमेरिकेच्या आधी रशियाने पहिली महिला अवकाशात पाठवणे आवश्यक आहे. जर अमेरिकन लोकांनी पहिली महिला अवकाशात पाठवली, तर ते सोव्हियत रशियातील देशभक्त महिलांच्या भावना दुखावणारे ठरेल.’ ताबडतोब सोव्हियत रशियाने अंतराळात पाठवण्यासाठी योग्य महिलांचा शोध घेणे सुरू केले. दुसऱ्या बाजूला अमेरिकेतही अंतराळात जाऊ शकतील अशा महिलांचा शोध सुरू होता. त्यामागील हेतू मात्र काहीसा वादग्रस्त होता. अमेरिकेच्या बाजूने अंतराळवीर म्हणून जे उमेदवार निवडले जायचे, त्यांची वैद्यकीय चाचणी डॉ. विलियम लव्हलेस करायचे. या उमेदवारांना खूप कडक आणि प्रदीर्घ अशा वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जावे लागायचे. जे शारीरिक आणि मानसिकरीत्या अत्यंत कणखर आहेत, उत्तमातले उत्तम आहेत, अशा मोजक्या लोकांना निवडले जायचे. ज्या अवघड चाचण्यांतून पुरुष अंतराळवीर निवडले जातात, तशा चाचण्यांना स्त्रिया सामोऱ्या जाऊ शकतील का, असा प्रश्न डॉ. लव्हलेस यांना पडला होता. ज्या काळात डॉ. लव्हलेस यांनी हा विचार केला, त्या काळात महिलांना महत्त्वाच्या कामांसाठी दुय्यम स्थान दिले जायचे. अशा परिस्थितीत डॉ. लव्हलेस यांनी अंतराळात महिलांना पाठवायचा विचार करणे काळाच्या पुढे वाटते. पण त्यामागे दुसरा भागही होता. भविष्यात अंतराळप्रवासाचे महत्त्व वाढेल, मोठ्या प्रमाणात लोक अंतराळात पाठवले जातील, मोठी अंतराळकेंद्रे बांधली जातील. अशा ठिकाणी दुय्यम प्रतीची कामं करण्यासाठी महिलांची मदत घेता येईल, असाही विचार डॉ. लव्हलेस यांच्या मनात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे अंतराळात महिला पाठवण्याचा प्रगतिशील विचार; पण त्यांना तिथे देखील मदतनीस म्हणून दुय्यम स्थान देण्याचा पुरुषी वर्चस्ववादी विचार अशा दोन विरोधाभासी बाजू महिलांच्या चाचण्या घेण्यामागे असण्याची शक्यता होती. अशा गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत डॉ. लव्हलेस यांनी महिलांच्या चाचण्या सुरू केल्या. पुरुषांइतक्याच कडक चाचण्यांना महिला सामोऱ्या गेल्या. अशा चाचण्यांतून शेवटी १२ महिला अंतराळात पाठवण्यासाठी निवडल्या गेल्या. या महिला शारीरिक आणि मानसिक क्षमतेमध्ये सर्वोत्तम पुरुष अंतराळवीरांच्या समतुल्य होत्या. नासाने अंतराळात जेव्हा पुरुष अंतराळवीर पाठवणे सुरू केले, तेव्हा या महिलादेखील अंतराळात जाण्यासाठी सर्व दृष्टीने तयार होत्या. मात्र, त्यांना प्रत्यक्ष अंतराळात जाऊ द्यायला नासा तयार नव्हती. त्यामुळेमहिला अंतराळयात्रींवर अन्याय होत होता. या विरुद्ध आवाज उठवण्याचं जेरी कॉब नावाच्या महिला अंतराळयात्रीनं ठरवलं.

(जेरी कॉब)

नासा महिलांच्या बाबतीत भेदभाव करते आहे, याची जाहीर वाच्यता जेरी कॉब यांनी केली. याबद्दल त्या महत्त्वाच्या स्थानी असलेल्या लोकांबरोबर बोलल्या आणि हा विषय १९६२ साली अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळापुढे मांडल्या गेला. प्रतिनिधी मंडळाने यावर निवाडा करण्यासाठी एक विशेष समिती नेमली. या समितीपुढे जेरी कॉब यांनी महिलांची बाजू मांडली. महिलांचा शारीरिक आकार पुरुषांपेक्षा कमी असणे, हे अंतराळप्रवासाच्या दृष्टीने उपयुक्त होते. सुरुवातीची अंतराळयाने ही आकाराने छोटी असायची. कारण मोठ्या आकाराचे अंतराळयान अवकाशात पाठवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. त्यामुळे सुरुवातीला कमी उंचीचे पुरुष अंतराळवीर निवडले जायचे. अशा परिस्थितीत उंचीच्या बाबतीत महिला अनुकूल होत्या. अनेक शारीरिक, मानसिक चाचण्यांमध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा सरस कामगिरी दाखवली होती. याचे अनेक पुरावे त्यांनी सादर केले आणि महिलांना अंतराळात जाण्याची संधी दिली जावी, असं मांडलं. नासाचे प्रशासकीय प्रमुख जेम्स वेब, अंतराळवीर जॉन ग्लेन, स्कॉट कार्पेंटर हे विशेष समितीत नासाचे प्रतिनिधित्व करत होते. या नासाच्या प्रतिनिधींनी त्यांचे विचार मांडले, जे त्या काळातील लोकांची मानसिकता दर्शवतात.

जॉन ग्लेन म्हणाले की, अंतराळात महिलांनी जाण्याच्या मी विरोधात नाही. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की युद्धात लढण्यात, विमाने बनवण्यात आणि उडवण्यात, बहुतांश जोखमीच्या क्षेत्रांमध्ये मुख्यत्वे पुरुष आहेत. कटू असला तरी हा आपल्या प्रचलित सामाजिक व्यवस्थेचा भाग आहे.

जेम्स वेब असे म्हणाले की, सोव्हियत रशिया आणि अमेरिकेत तीव्र अंतराळ स्पर्धा सुरू असतांना महिलांना अंतराळात पाठवण्याचा ‘प्रयोग करणे’ योग्य ठरणार नाही.

या निवड समितीने महिलांच्या बाजूने निर्णय दिला नाही. दुसरीकडे रशिया पहिल्या महिलेला अंतराळात पाठवण्यासाठी सज्ज होत होते. अत्यंत कडक चाचण्यांमधून ५ सर्वोत्तम महिलांची निवड केली गेली होती. यांपैकी अंतराळात जाण्याचा पहिला मान २६ वर्षीय व्हॅलेंटीना तेरेश्कोव्हा यांना मिळाला.

व्हॅलेंटीनाचे वडील ती दोन वर्षांची असतांना लढाईत मारले गेले होते. तिच्या आईने कॉटन मिलमध्ये काम करून व्हॅलेंटीना आणि तिच्या दोन बहिणींना वाढवले. व्हॅलेंटीना सतरा वर्षांची असतांना तिला कामासाठी शाळा सोडावी लागली; पण तिने स्वतःचे शिक्षण सुरू ठेवले. काम सांभाळत औद्योगिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले. आवड म्हणून स्काय डायव्हिंगचे प्रशिक्षण घेतले, त्यात प्राविण्य मिळवले. त्यांची गुणवत्ता, व्यक्तिमत्त्व लोकांचे लक्ष वेधणारी होती. अंतराळात जाण्यासाठीच्या महिलांच्या यादीत त्यांचे नाव सुचवण्यात आले. अत्यंत कडक चाचण्या त्यांनी उत्तमरीत्या पार केल्या. सोव्हियत अंतराळ मोहिमेचे मुख्य त्यांना कौतुकाने ‘स्कर्ट घातलेली गागारीन’ म्हणायचे. १६ जून १९६३ साली त्या व्होस्टोक-६ अंतराळयानात बसून अवकाशात गेल्या. अंतराळमोहिमेत त्यांनी स्वतःसाठी ‘चैका’ हे टोपणनाव निवडलं होतं. रशियन भाषेत चैका (Chaika) म्हणजे सीगल पक्षी. त्यांचे अंतराळयान जेव्हा प्रचंड वेगाने अवकाशात गेले आणि नेहमीपेक्षा कित्येक पटींनी अधिक गुरुत्वाकर्षणाचा रेटा त्यांना जाणवू लागला, तेव्हा त्या “या चैका, या चैका” म्हणजे “मी सीगल पक्षी आहे” असा जणू मंत्र स्वतःशी पुटपुटत होत्या. व्हॅलेंटीनाह्या अवकाशात तीन दिवस होत्या. या दरम्यान त्यांच्या अवकाशयानाने पृथ्वीला ४८ प्रदक्षिणा मारल्या. व्हॅलेंटीना यांनी अवकाशात घालवलेला वेळ हा अमेरिकेने तोपर्यंत अवकाशात पाठवलेल्या सर्व पुरुष अंतराळवीरांच्या एकत्र वेळेपेक्षा जास्त होता. अंतराळप्रवासाचे धाडस करण्यात महिला मागे नाहीत, हे व्हॅलेंटीना यांनी सिद्ध केलं. परत आल्यावर त्यांचं जगभर कौतुक झालं. त्यांनी महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी आवाज उठवणं सुरू केलं. नासा आणि अमेरिकेच्या राजकारण्यांवर उघड टीका देखील केली. ‘अमेरिकेच्या राजकारण्यांना त्यांच्याकडे लोकशाही आहे, हे सांगायला खूप आवडतं; पण महिलांना अवकाशात पाठवायला मात्र ते तयार नाहीत. हा अन्याय नाही तर दुसरे काय आहे?’ असं त्या म्हणाल्या.

व्हॅलेंटीना यांना जगभर प्रसिद्धी मिळाली, पदकं मिळाली. पण महिलांना अंतराळात पाठवण्याच्या दिशेनं फार काही बदललं नाही. त्यांना अंतराळात पाठवणं हे रशियासाठी अंतराळ स्पर्धेत अमेरिकेवर विजय मिळवण्याची एक संधी इतकंच त्याचं महत्व होतं. त्यानंतर दुसरी रशियन महिला अंतराळात तब्बल १९ वर्षांनी, १९८२ साली गेली. अमेरिकेत महिलांना अंतराळयात्री म्हणून प्रवेश १९७८ नंतर दिला गेला आणि पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री सॅली राईड या १९८३ मध्ये अवकाशात गेल्या. त्यानंतर मात्र हळूहळू महिला अंतराळयात्रींचे प्रमाण वाढत गेले. महिला अंतराळयात्रींनी अनेक धाडसी, जोखिमेच्या मोहिमा पार पाडल्या. वर्ल्ड स्पेस फ्लाईट यांनी घोषित केलेल्या माहितीनुसार मे २०२३ पर्यंत एकूण ६३४ अंतराळवीर अवकाशात गेले होते, त्यापैकी ७३ महिला होत्या. महिला शास्त्रज्ञांचे प्रमाणही वाढते आहे. भारतीय महिला देखील यात मागे नाहीत. ज्या वर्षी अमेरिकेतील महिला अंतराळात जाण्यासाठी न्याय मागत होत्या, त्याच वर्षी म्हणजे १९६२ साली कल्पना चावला यांचा जन्म झाला. १९९७ साली अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या त्या पहिल्या महिला ठरल्या. इसरोमध्ये महिला शास्त्रज्ञ महत्त्वाच्या स्थानी आहेत. इसरोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सोडलेल्या आदित्य-L१ मोहिमेच्या मुख्य स्थानी निगर शाजी या आहेत. इसरो जेव्हा भविष्यात भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवेल, तेव्हा त्यात महिला अंतराळयात्री देखील सहभागी असतील, अशी आशा आहे.

२०१९ साली महिला अंतराळयात्री एकत्र अंतराळात चालण्याची पहिली घटना म्हणून क्रिस्टिना कोच आणि जेसिका मेर यांचे जगभर कौतुक झाले. जेव्हा अशा घटनांकडे सामान्य घटना म्हणून बघितले जाईल, तेव्हा खऱ्या अर्थाने समानता आली असे म्हणता येईल. क्रिस्टिना कोच या जेव्हा चंद्रावर पाऊल ठेवतील, तेव्हा ती खरंच ऐतिहासिक घटना असेल. अंतराळ मोहिमांच्या सुरुवातीपासून क्षमता सिद्ध केल्यानंतरही ज्यांच्यावर अन्याय झाला त्या महिलांच्या संघर्षांचा तो विजयक्षण ठरेल. १९६९ साली पहिल्या पुरुषाचे पाऊल चंद्रावर पडल्यावर तब्बल ५६ वर्षांनी, २०२५ साली पहिल्या महिलेचे पाऊल चंद्रावर पडण्याची शक्यता आहे. माणूस मंगळावर जाईल, तेव्हा मात्र स्त्री-पुरुष दोघांचेही पावले एकत्र पडतील, अशी आशा आहे.

सुकल्प कारंजेकर

writetosukalp@gmail.com

(सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)