चित्रपटांतील स्त्री प्रतिनिधित्व, मानधन आणि प्रेक्षकपसंतीचे मानसशास्त्र

अपवादामुळे नियम आणखीच स्पष्ट होतात असे म्हणतात. अगदी तसेच विद्या बालन आणि नंतर काही प्रमाणात दीपिका पदुकोण व कंगना राणावत यांच्या उठून दिसणार्‍या कारकीर्दीमुळे सध्याचे स्त्री कलाकारांचे चित्रपटक्षेत्रातील एकंदर दुय्यम स्थान अधोरेखित झाले. आवडो किंवा न आवडो, चित्रपटांचा जीवनावर आणि जनमानसावर होणारा परिणाम नाकारता येत नाही. कला ही समाजाचे प्रतिबिंब दाखवते, त्याच वेळी समाजाला पुढे नेण्याचीही कामगिरी करण्याची क्षमता तिच्यात असते, हे तितकेच खरे. त्यामुळे स्त्रीवादाची सद्यस्थिती आणि समकालीन प्रश्न झिरपत झिरपत या क्षेत्रातही उमटलेले दिसतात. जगभरात समान कामाबद्दल दिल्या जाणार्‍या मानधनात स्त्री-पुरुषांमध्ये अजूनही आश्चर्यकारक दरी आहे (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ग्लोबल जेंडर गॅप अहवाल, २०२०). चित्रपटक्षेत्रातील आकडेवारी पाहिली तर स्टॅटिस्टा वेबसाईटवरील माहितीनुसार, २०१९ साली सर्वाधिक मानधन मिळालेल्या दहा कलाकारांच्या यादीमध्ये केवळ एक नाव महिलेचे आहे (आलिया भट). तसेच सर्वाधिक मानधन मिळालेल्या दहा पुरुष व दहा स्त्री कलाकारांची यादी वेगवेगळी पाहिली असता, पहिल्या स्थानावरील पुरुष कलाकाराच्या एक चतुर्थांश मानधन पहिल्या स्थानावरील स्त्री कलाकाराला मिळालेले आहे. सरासरी मानधनांमध्येही (६९.४ कोटी रुपये व २३.५ कोटी रुपये) जवळजवळ तिपटीचा फरक आहे. (हेही पहा) तारकांच्या आणि आता तार्‍यांच्याही मुलाखतींमध्ये याबद्दल नाराजी व्यक्त केली जाते.

याखेरीज प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर बराच अभ्यास झालेला असून चित्रपटांचे विषय, कथा आणि पात्रयोजनेतही महिला प्रतिनिधित्व कमीच असल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे.(हेही पहा) स्त्रीकेंद्री कथांचे प्रमाण अभिनेत्रींच्या मतेही पूर्वीपेक्षा वाढलेले दिसते (संदर्भ: राजीव मासंद, ॲक्ट्रेसेस राउंडटेबल, २०१८). विशेषतः कहानी, पिकू व क्वीनसारख्या चित्रपटांपासून. परंतु पुरुषकेंद्री कथांच्या तुलनेत ते उणेच आहे.

पुरेशा स्त्रीकेंद्री कथा पडद्यावर न येण्याला कारणीभूत म्हणून बहुतांशी बॉलिवुडच्या निर्मात्यांकडे बोट दाखवले जाते. पण निर्माते व गुंतवणूकदार हे बाजारपेठेचा भाग आहेत आणि इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणेच चित्रपटांचीही बाजारपेठ चालते. म्हणजे निर्मिती ही मागणीनुसार केली जाते आणि स्त्रीकेंद्री चित्रपटांचा एकूण मागणीतील हिस्साच कमी आहे. याचा अर्थ सामान्य प्रेक्षकही परिस्थितीला जबाबदार आहे. प्रेक्षक स्त्रीकेंद्री चित्रपटांना कमी पसंती देतात, त्यातून मिळणारे उत्पन्न तुलनेने कमी असते, त्यामुळे भविष्यात अशा चित्रपटांकडून मिळणार्‍या उत्पन्नाचे अंदाजही कमीच असतात व परिणामी त्यांमध्ये गुंतवणूक कमी केली जाते. अर्थातच अशा चित्रपटांच्या नायिकांना मानधनही कमी असते. या दुष्टचक्राचा पुढचा भाग म्हणजे पडद्यावर स्त्रीकेंद्री चित्रपट कमी येतात आणि असे चित्रपट पाहण्याची इच्छा/शक्यता असणार्‍या प्रेक्षकांनाही नाइलाजाने असलेल्या पर्यायांमधूनच निवड करावी लागते. याचे पडसाद पुन्हा पुढील बजेट व गुंतवणूक अंदाजांमध्ये उमटतात. कोव्हिडमुळे सध्या चित्रपटगृहे बंद असली तरी चित्रपट व मनोरंजनाच्या इतर माध्यमांमध्येही प्रवाह साधारण असेच आहेत. इथे दोन महत्त्वाचे मुद्दे असे की स्त्रीकेंद्री चित्रपटांची प्रेक्षकसंख्या कमी आहे, तसेच ‘सुपरस्टार’ श्रेणीत मोडणार्‍या व ज्यांच्यावर पैसा लावण्यात कमी जोखीम असते, अशा थिएटरमध्ये गर्दी खेचून आणणार्‍या कलाकारांमध्ये पुरुष अधिक आहेत.

आता प्रेक्षकपसंतीच्या टप्प्यावर मानसशास्त्रीय दृष्टीने या प्रश्नाचा अभ्यास करता येऊ शकतो. अगदी प्राथमिक बाब ही आहेच की थिएटरमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मची वर्गणी भरून फिल्म्स पाहणार्‍यांमध्ये स्त्रियांची संख्या आर्थिक व गमनशीलतेवरील (मोबिलिटी) मर्यादांमुळे कमी असते. पण याशिवाय इथे प्रेक्षकांच्या लिंगभावाशी संबंधित दोन सिद्धांत मला मांडायचे आहेत:

  • पुरुष प्रेक्षक पुरुषपात्रे/ नायक असलेल्या चित्रपटांना अधिक प्राधान्य देतात.
  • स्त्री प्रेक्षक नायिकाप्रधान व नायकप्रधान चित्रपटांना समान प्राधान्य देतात किंवा निदान नायिकाप्रधान चित्रपटांना त्यांचे असलेले प्राधान्य पुरुषांच्या प्राधान्याइतके तीव्र नसते.

हे सिद्धांत तपासून पाहण्यासाठी एक साधा अभ्यास केला. ओळखीतल्या वेगवेगळ्या वयोगटातील दहा पुरुष व दहा स्त्रियांना मागील वीस वर्षांतील त्यांचे सर्वात आवडते/ सर्वात लक्षात राहिलेले पाच चित्रपट विचारले. पाचपेक्षा अधिक सांगण्याची मोकळीकही दिली. या चित्रपटांची नायिकाप्रधान (मुख्य भूमिका स्त्री) व नायकप्रधान (मुख्य भूमिका पुरुष) अशी वर्गवारी केली. त्याचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे :

दोन्ही प्रेक्षकांनी सांगितलेल्या चित्रपटांमध्ये नायकप्रधान चित्रपटांची संख्या अधिक आहे, याचे कारणही मुळातच उपलब्ध चित्रपटांच्या परिस्थितीत रुजलेले आहे. पण टक्केवारी पाहता वरील दोन सिद्धांत खरे असल्याचे पटते. अर्थातच अभ्यास अत्यंत अल्प समूहावर केला आहे, ही उणीव आहे. पण मग या प्रेक्षकपसंतीमागची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला.

पहिला मुद्दा असा की, चित्रपट आवडण्यासाठी मुख्य पात्राशी भावनिक पातळीवर जोडले जाणे किंवा तदनुभूती वाटणे (सहानुभूतीच्या वरील पायरी/एम्पथी) आवश्यक आहे. येथे चित्रपटाच्या भावनांकाबरोबरच प्रेक्षकाची तदनुभूती वाटण्याची क्षमताही कामी येते आणि यात स्त्री-पुरुषांमध्ये फरक असल्याचे संशोधन सांगते. तदनुभूती क्षमतेचे विविध पैलू असून काही मेंदूरचनेशी संबंधित, काही लहानपणापासून झालेल्या वाढीशी आणि शिकवल्या गेलेल्या गोष्टींशी, तर काही स्वतःहून शिकून घेतलेल्या गोष्टींशी संबंधित असतात. सर्वच पैलूंमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची क्षमता अधिक असल्याचे आढळते (संदर्भ: ‘जेंडर डिफरन्सेस इन एम्पथी: द रोल ऑफ द राइट हेमिस्फिअर’; ‘रिकग्नाइझिंग इमोशन्स इन अदर पीपल: सेक्स डिफरन्सेस इन सोशलायझेशन’). मूलसंगोपनात जैविकरीत्याच जास्त सहभाग असल्याने स्त्रियांच्या मेंदूची उत्क्रांतीच उच्च भावनांकास साजेशी झाली असण्याची शक्यता आहे. तसेच बाळपण संपून समाजात वावरू लागल्यावर पुरुषांपेक्षा स्त्रियांना ‘दुसर्‍यांना समजून घेण्याचे महत्त्व अधिक शिकवले जाते आणि समंजस होण्यास जास्त प्रोत्साहनही मिळते. खर्‍या आयुष्यात स्त्रिया इतरांच्या भावना अधिक उत्तम समजू शकत असतील तर त्याप्रमाणे चित्रपटातील पात्र पुरुष असले तरी स्त्रिया त्याला चांगले समजून घेऊ शकतील. याउलट पुरुष प्रेक्षकांना आपल्यापेक्षा वेगळ्या पात्राला, म्हणजे स्त्रीपात्राला समजून घेणे व तिच्याशी ‘कनेक्ट’ होणे अवघड जाईल. यात पुरुषांना नावे ठेवण्याचा किंवा कमी लेखण्याचा उद्देश नाही, तसेच हा कयास सर्वसामान्य पातळीवर बांधलेला असून अपवाद असण्याची शक्यता अगदीच मान्य आहे.

दुसरी गोष्ट सामाजिक अभिसंधान किंवा सोशल कंडिशनिंगशी संबंधित आहे. सामाजिक अभिसंधान म्हणजे समाज आणि समाजातील समूहांकडून मान्यता मिळेल अशा पद्धतीनेच वर्तन करण्याचे प्रशिक्षण समाजातील व्यक्तींना मिळण्याची प्रक्रिया. मोठ्याने भोकाड पसरणे वाईट असते, पाहुण्यांना आल्यावर खाण्यापिण्याचा आग्रह करणे चांगले असते इत्यादी गोष्टी मुले याच प्रक्रियेतून शिकतात. कशा वागण्याचा अभिमान वाटायला हवा, कशाची लाज आणि कशाचा आनंद वाटायला हवा हे यातूनच शिकवले जाते आणि लिंगभावानुसार व्यक्तीचे वर्तन कसे असावे, हेही. आता यामध्ये कळीचा मुद्दा असा की आपल्या लिंगभावानुसार अपेक्षित वर्तनापेक्षा वेगळे किंवा उलट असे काही वर्तन केल्यास, उदा. पुरुषाने अश्रू गाळले किंवा बाईने मारामारी केली, तर त्याचे नकारात्मक परिणाम किंवा एका अर्थाने जी शिक्षा मिळते, तिची तीव्रता कितपत असते? साध्या पोशाखाच्या उदाहरणावरून कळते की, पुरुषी कपडे घालणार्‍या स्त्रीला ‘नॉर्मल’ समजले जाते, पण एखाद्या पुरुषाने साडी किंवा स्कर्ट घातला तर त्याला किमान थट्टेला आणि कमाल धिंडीला सामोरे जावे लागेल. किकबॉक्सिंग शिकणार्‍या एखाद्या शाळकरी मुलीला कोणी क्वचितच नावे ठेवतील; किंबहुना तिचे कौतुकच होईल, पण कथक/ बॅले शिकणार्‍या शाळकरी मुलाचा मित्रांकडून अपमान होण्याचीच शक्यता जास्त. (यात मित्रांचाही दोष नाही. वडीलधार्‍यांच्या वर्तनातून व बोलण्यातून काय चांगले, काय वाईट याचे सूक्ष्म नियम ते आत्मसात करतात.) या समाजात वाढल्यावर ‘स्त्रियांसाठी बनवलेले’ असे चित्रपट पाहण्यास पुरुष पसंती देत नाहीत, यात नवल नाही. उलट ‘चिक फ्लिक्स’ (मुलींसाठी बनवलेले चित्रपट) पाहणार्‍या मुलांची होणारी चेष्टा बघून मुलीही असे चित्रपट पाहणे कमीपणाचे समजू लागल्याचे मी पाहिले आहे. पण एकंदरच पुरुषकेंद्री कथा, चित्रपट, मालिका वाचणे व पाहणे याकरिता स्त्रियांना जितक्या नकारात्मक परिणामांना तोंड द्यावे लागते त्याच्या कैक पटींनी लाज व न्यूनत्वाची भावना स्त्रीकेंद्री चित्रपट पाहणार्‍या पुरुषांना अनुभवावी लागते. (येथे एक दूरान्वये संबंधित पण महत्त्वाची नोंद अशी की, पुरुषाला समाजाकडून होणारी ही शिक्षा या हेतूने होते की तो पुरुष असल्यामुळे स्त्रीसारखे वागणे त्याच्यासाठी हीन आहे, तो यापेक्षा अधिक उच्च महत्त्वाकांक्षा बाळगू शकतो. स्त्रीला समाजाकडून होणारी शिक्षा या हेतूने होते की, ती स्त्री असल्यामुळे तिने फार महत्त्वाकांक्षी नसावे व पुरुषी जबाबदार्‍या तिच्या तोंडचा घास नव्हे. मुळात स्त्रीगुणांनाच कमी दर्जा दिला जातो.)

तिसरा मुद्दा हा चित्रपटांमधील आशयाचा कोणता प्रकार लोकप्रिय आहे, हा आहे. याचेही मूळ पुरुषप्रधान समाजातच असले, तरी सखोल अभ्यासाच्या दृष्टीने हा दुसर्‍या मुद्द्यापेक्षा अलग काढायला हवा. समाजात लोकप्रिय कथा, आशय व संकल्पना या नेहमी युद्ध, कलह, दुर्बलांचे रक्षण, सत्याचा विजय, कायद्याविरुद्ध जाऊन केलेले सत्कार्य, सामर्थ्य प्रदर्शन यांचा गौरव करतात. प्रेमकथांना ग्लॅमर आहे, पण त्यातही नायकाने ‘पुरुष’ ही भूमिका परिपूर्णपणे निभावली व नायिकेने ‘परिपूर्ण स्त्री’ होऊन दाखवले, तर प्रेमकथा अधिक लोकप्रिय होते. अन्यथा ‘रॉमकॉम’ (रोमँटिक कॉमेडी म्हणजेच हलकीफुलकी प्रेमकथा) पाहणे म्हणजे इतर प्रकारांच्या तुलनेत बिनमहत्त्वाचे मनोरंजन समजले जाते. आता अशा लोकप्रिय संकल्पना पुरुषपात्रासाठी अधिक अनुरूप असतात, कारण समाजाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने पोलीस, बॉडीगार्ड, राजकारणी, गुंड, डॉन, गुप्तहेर, वकील, शास्त्रज्ञ, उच्चपदस्थ अधिकारी, प्राध्यापक, राजे-सरदार, सुपरहीरो, प्रेरणादायी व्यक्ती अशा या कथांमध्ये वारंवार येणार्‍या भूमिका महिलेपेक्षा पुरुषाने केलेल्या समाजाला (आणि चित्रपट बनवणार्‍यांनाही) अधिक पटतात. क्वार्ट्झ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या एका लेखात उल्लेख आहे की, ४००० बॉलिवुड चित्रपटांच्या विश्लेषणानंतर असे आढळले की एकूण पोलिसांच्या भूमिकांपैकी ९०% पुरुषपात्रे होती, ८९% एक्झिक्युटिव्ह्ज, ७६% वकील, ७५% गँगस्टर, ७४% डॉक्टर, ६९% विद्यार्थी व ६५% गायक भूमिका पुरुष होत्या. विनोदी भूमिकांमध्येही पुरुष कलाकारांची संख्या अधिक असते. साहजिकच नायकप्रधान चित्रपट अधिक लोकप्रिय होतात.

चित्रपट तोंडी प्रसिद्धीने लोकप्रिय होतो. अशा प्रसिद्धीचे एक उदाहरण म्हणजे आयएमडीबी या लोकप्रिय संकेतस्थळावर प्रदर्शित होणार्‍या सर्व चित्रपटांना प्रेक्षक गुण (रेटिंग) देऊ शकतात. या गुणांकनामधील लिंगभेदाविषयी एक महत्त्वाची बातमी वाचनात आली.ती अशी : २०१८ साली या वेबसाईटवर ४३७७ चित्रपट असे होते ज्यांना २५,०००पेक्षा अधिक प्रेक्षकांनी गुण दिले होते. गुण देणार्‍या प्रेक्षकांपैकी किती महिला व किती पुरुष आहेत याची फोड करून तुलना केली गेली. नव्वद टक्के चित्रपटांमध्ये गुण देणार्‍या पुरुषांची संख्या गुण देणार्‍या स्त्रियांच्या किमान दुप्पट होती, ५१ टक्के चित्रपटांमध्ये पाचपट व १२ टक्के चित्रपटांमध्ये गुण देणारे पुरुष संख्येने स्त्रियांच्या दसपट होते. अर्थातच याचा परिणाम गुणांवर दिसून येतो आणि ‘पुरुषी’ विषय असलेल्या किंवा नायकप्रधान असलेल्या चित्रपटांना सर्वोच्च गुण मिळतात. दृश्य आणखी स्पष्ट करण्यासाठी सर्वोच्च स्थानांवरील काही चित्रपटांची यादी पाहा: शॉशँक रिडेम्प्शन, गॉडफादर, डार्क नाईट, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, शिंडलर्स लिस्ट, फाइट क्लब, ट्वेल्व्ह अँग्री मेन, इन्सेप्शन. सर्वोच्च गुण मिळालेल्या हिंदी चित्रपटयादीतील काही नावे: हँकी पँकी, ब्लॅक फ्रायडे, आनंद, दंगल, थ्री इडियट्स, तारे जमीन पर, जाने भी दो यारों, उरी द सर्जिकल स्ट्राइक, तुंबाड व अंधाधुन. येथे यादीतील चित्रपटांच्या गुणवत्तेबद्दल शंकाच नाही, परंतु नायिकांचे प्रतिनिधित्व यात कमी असल्याचे अधोरेखित होत आहे. मालिकांच्या गुणांवरदेखील गुण देणार्‍यांच्या लिंगभावाचा परिणाम होतो. नायिकाप्रधान मालिकांना पुरुषांनी कमी गुण दिल्यामुळे चांगले कथानक असूनही गुणांच्या यादीत या मालिका खालच्या स्थानांवर आहेत. अशा प्रकारे नायिकाप्रधान चित्रपट आणि स्त्रीकेंद्री विषय यांची उपलब्धता मर्यादितच राहते.

प्रेक्षकपसंतीमागची कारणे समजून घेतल्यावर हे लक्षात येते की, इतर समाजक्षेत्रांतील स्त्री-पुरुष समानतेच्या स्थितीचेच प्रतिबिंब चित्रपटक्षेत्रातही पडलेले आहे. जसजसा समाजात बदल घडतो आहे व घडेल, तसतसे लिंगभावावर आधारित अपेक्षित वर्तनाच्या व्याख्या बदलतील. नायिकेचा चित्रपट पाहणे, तिच्यापासून प्रेरित होणे किंवा तिच्या भावना समजून घेणे, याची क्षमताही पुरुषवर्गात विकसित होईल व असे चित्रपट पाहिल्याबद्दल पुरुषांना कुणी कमीही लेखणार नाही. चित्रपट निर्माते, लेखक व दिग्दर्शकांमध्ये स्त्रियांची संख्या वाढत जाईल तशी अधिकाधिक वास्तव स्त्रीपात्रे पडद्यावर येतील आणि प्रेक्षकांमध्येही स्त्रियांची संख्या वाढेल; परिणामी आणखी नायिकाप्रधान किंवा स्त्रीकेंद्री विषयही पडद्यावर येतील, आणि अभिनेत्रींना मिळणारे मानधनही बाजारपेठेच्या नियमानुसार उंचावले जाईल. या परिवर्तनाचे पडसाद सध्या पाहायला मिळणार्‍या चित्रपट व मालिकांमध्ये उमटतच आहेत. सत्तरच्या दशकात एकूण चित्रपटांपैकी ७% नायिकाप्रधान होते, तर २०१५-२०१७ दरम्यान हे प्रमाण ११.९% इतके वाढलेले दिसते. बदलाचा वेग व प्रमाण वाढत जाईल, अशी आशा करूया!

टीप : या विषयावर आणखी खोलात अभ्यास करण्यासाठी काही प्रश्न विचारता येतील –

१. ॲक्शनपट, थरारपटाची नायिका असेल वा मारहाण व इतर ‘हीरोगिरी’ करत असेल तर अशा स्त्री भूमिकेला (उदा. ‘झाशीची राणी’मधील कंगना राणावत, ‘मर्दानी’मधील राणी मुखर्जी) पुरुष प्रेक्षक इतर स्त्रीपात्रांपेक्षा अधिक पसंती देतात का? पसंती पात्राला असते की विषयाला?
२. उघडपणे विचारल्यावर आपण स्त्रीपात्रांना वा पुरुषपात्रांना अधिक पसंती देतो, असे कुणालाही स्वतःविषयी वाटत नसते. समजा अशा सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करून लोकांना त्यांचा कल दाखवून दिला व समान प्रतिनिधित्वाची माहिती थोडक्यात सांगितली, तर पसंतीत फरक पडू शकेल का? जाणीवपूर्वक नायिकाप्रधान चित्रपट पाहण्याची ‘फॅशन’ आणता येईल का?
३. चित्रपटांप्रमाणेच नाटक, मालिका व इतर मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये प्रेक्षकपसंतीची परिस्थिती समानच आहे का? कोणते माध्यम अधिक पुरोगामी आहे व त्यामागची कारणे काय आहेत? हे समजून घेऊन इतर माध्यमांमध्येही अवलंबिता येईल का?
४. दुष्टचक्र मोडण्यासाठी निर्मात्यांकडून किंवा चित्रपटक्षेत्रातील धोरणांमध्ये काय प्रयत्न करता येतील? समान मानधनासाठी काही मार्गदर्शक धोरणे, नियम वा तत्त्वे निर्माण करून अमलात आणता येतील का?

अद्वैता देशमुख
adwaitadesh@gmail.com