शर्मिलानं पेरलेलं आता उगवू लागलं आहे

११ नोव्हेंबर २०२५

माध्यमांतर

एखाद्या शिक्षकाचं कार्य म्हणजे फक्त ज्ञान देणं नव्हे, तर विचारांची बीजं पेरणं. ‘शर्मिलानं पेरलेलं आता उगवू लागलं आहे’ या अनिल जायभाये यांच्या लेखातून आपण एक विलक्षण शिक्षिका डॉ. शर्मिला रेगे यांचा इतरांवरचा प्रभाव अनुभवतो. बुलढाण्याच्या छोट्या गावातून आलेल्या विद्यार्थ्याचा प्रवास विद्यापीठाच्या वर्गापासून समाजाच्या केंद्रापर्यंत कसा पोहोचतो, हे हे लिखाण आपल्याला दाखवतं. आपल्या शिकवणीने समता आणि संवेदना यांचा संगम घातलेल्या शर्मिलानं विद्यार्थ्यांच्या मनात केवळ विचार नाही, तर आत्मविश्वास आणि समाजाशी जोडलेली जाणीव पेरली. तिच्या वर्गात ज्ञान हे केवळ पुस्तकात मर्यादित राहिलं नाही, ते संवाद, संशोधन, आणि जीवनाचा भाग बनलं. अनिल जायभाये यांचा हा लेख म्हणजे त्या शिकवणीचं एक स्मरण आहे, जिथं एका शिक्षकाच्या हातातून पेरलेलं आज नव्या विचारांचं अंकुर फुलवतं आहे. लेखक डॉ. अनिल जायभाये, सामाजिक शास्त्रे संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापिठ, लातूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत. (पुरुष उवाच, दिवाळी 2024 मधून साभार.)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात मी पहिल्यांदा 2000 साली पाऊल ठेवलं. इथला विशाल परिसर, भव्य इमारती, शिक्षणाची परंपरा, उच्चशिक्षित प्राध्यापक मंडळी सगळं भव्य-दिव्य वाटत होतं. त्या वातावरणाचं दडपण येणं स्वाभाविक होतं. कारण मी ग्रामीण भागातून आलो होतो. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात चोरपांग्रा हे माझं गाव. माध्यमिक शिक्षण गावात आणि महाविद्यालयीन शिक्षण जालनासारख्या छोट्या शहरात झालेलं. शिक्षक ज्ञान देणारा तर विद्यार्थी ज्ञान घेणारा अशी चौकट मी अनुभवली होती. अर्थात बांधिलकी मानून शिकवणारे काही प्रेमळ शिक्षक याला अपवाद होते. असे असले तरी शिक्षक शिकविण्यासाठी असतात आणि विद्यार्थी शिकण्यासाठी असतो, अशी एक उतरंड मनात तयार झालेली होतीच. या समजुतीला सर्वप्रथम धक्का दिला शर्मिला रेगे यांनी. त्या पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात प्राध्यापिका होत्या. शर्मिलाचा उल्लेख यापुढे मी एकेरी करणार आहे. ही सवय तिनेच लावली. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील दुरावा यामुळे एका झटक्यात गळून पडला. मैत्रीच्या नात्याने शिक्षक-विद्यार्थी संवाद होऊ लागला. शिकण्या-शिकविण्याची प्रक्रिया अगदी सहज, सुगम आणि बहुआयामी बनली. किती विलक्षण बाब होती ही! शर्मिलाने आमच्यात कसा अंतर्बाह्य बदल घडवला ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे.

शर्मिलाला पहिल्यांदा मी समाजशास्त्र विभागात पाहिलं. मी तेव्हा एम. ए. करत होतो. तिची केबीन मधोमध होती. ती स्त्री अभ्यास केंद्रात कार्यरत होती. पण अधून-मधून केबीनमध्ये येत-जात असे. कॉरीडोरमधून जाताना केबीन दिसे. अतिशय सुबक, नीटनेटकी आणि रंगदार केबीन. महात्मा फुले, चे गवेरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय सुंदर फोटो भिंतीवर होते. साईड टेबलवर बुद्धाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मूर्ती होत्या. खिडक्यांना गडद रंगाचे पडदे होते. त्यावर सूर्यप्रकाश पडून आत सुंदर असा रंगीत उजेड पसरलेला असे. इतर केबीनपेक्षा ती खूप विशेष आणि वेगळी वाटायची.

शर्मिलाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल पण असेच. तिची राहणी अगदी वेगळी होती. एक अनामिक आकर्षण होतं तिच्या व्यक्तिमत्त्वात. ती आली की सर्वप्रथम तिच्या ड्रेसकडे लक्ष जात असे. तो विविध रंगसंगतीचा मात्र स्त्री-पुरुष परिधानाच्या ठराविक साच्यात न बसणारा असायचा. केबिन काय किंवा ड्रेस काय, हे सगळं एका विशिष्ट प्रकारच्या चिंतनातून आलेलं होतं, हे पुढे माझ्या लक्षात येत गेलं. दृश्य रूपात अशाप्रकारे एखादी व्यक्ती आपल्यावर प्रभाव टाकते. त्यानंतर ते व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यासाठी आपण उद्युक्त होतो, हे माझ्या बाबतीत घडत होतं.

ज्ञान आणि सामाजिक बांधिलकीचा संगम

शर्मिला स्त्री अभ्यास केंद्रात शिकवत असे. तिच्या क्लासला उपस्थित राहून प्रत्यक्ष तिचे विचार ऐकण्याची ओढ मला निर्माण झाली होती. समाजशास्त्र विभागातील अनेक विद्यार्थी ‘स्त्री अभ्यास केंद्रात’ सर्टिफिकेट कोर्स करत असत. मी प्रवेश घेण्यासाठी गेलो. पण तांत्रिक कारणामुळे प्रवेश मिळाला नाही. पुढे शर्मिलाकडे समाजशास्त्र विभागाची जबाबदारी पूर्णतः आली. मी त्याच विभागात शिक्षक सहायक (Teaching Associate) म्हणून रुजू झालो. त्यानंतर मात्र तिच्याशी रोजचा संपर्क वाढला. तेव्हा तिच्या वर्गात बसण्याची संधी मला मिळाली. तिची अनेक लेक्चर्स मी रेकॉर्डसुद्धा केली. हा क्रम 4-5 वर्ष सातत्याने चालला. शिकण्या-शिकवण्याबाबत तिचे प्रयोग आणि त्यातील बारकावे खूप जवळून टिपता आले. एखाद्या शिक्षकाने वर्गात येताना कसं अभ्यास करून यायला हवं. तास कसा घ्यावा. विद्यार्थ्यांशी संवादी कसं राहावं. वर्गातील चर्चा कशी फुलवावी. चर्चेतून असंख्य गोष्टी कशा निर्माण कराव्यात हे अक्षरशः जवळून अनुभवता आलं. केवळ वर्गातच नाही तर वर्गाबाहेर सुद्धा शर्मिलाची भेट हा एक समृद्ध करणारा अनुभव असे. त्यात अभ्यास करून भेटलात तर ती खूप आंतरदृष्टी (Insights) देत असे. अगदी साधा विचार किंवा एखादा विषय तिच्याकडे घेऊन गेलात तरी ती त्यातून व्यवस्थित ‘सोनं’ काढत असे. विद्यार्थ्यांचं ऐकून घेणं, अतिशय सर्जनशीलपणे नवीन गोष्टी सुचवणं, पुढची दिशा देणं यावर तिचा भर असे. मी तज्ज्ञ (Scholar) आहे, मला काहीतरी जास्त समजलंय हा अविर्भाव अजिबात नसे.

अनेक मुलं ग्रामीण भागातून आलेली होती. उच्च शिक्षणात आलेली ती पहिली पिढी. विद्यापीठीय वातावरणात तग धरेल असे सांस्कृतिक भांडवल (Cultural Capital) या मुलांकडे नाही. तसेच विविध सामाजिक जखमा घेऊन हे विद्यार्थी आलेले आहेत याचं भान शर्मिलाला होतं. तिचा व्यवहार अत्यंत समंजस असायचा. या विद्यार्थ्यांना डोळ्यापुढे ठेवून मराठीत अधिकचे तास घेण्याचा पायंडा पाडणारी ती एक महत्त्वाची प्राध्यापक होती. सकाळी 8 ते 10 मराठीतून शिकवणं आणि पुढे तोच तास 10 ते 12 इंग्रजीतून घेणं असा तिचा दिनक्रम असे. सलग 4 तास ती शिकवत असे. अर्थात दोन्ही तासांची स्वतंत्र तयारी करून. हे प्रचंड श्रम घेण्यामागे तिचा निश्चित विचार होता. त्यामुळे ती मांडत असलेला स्त्रीवाद एकेरी किंवा एकांगी होताना दिसत नाही. ‘मी इतकी वर्षे शिकवले आहे, मला तयारीची काय गरज’ असा तिचा आविर्भाव नसे. उलट प्रत्येक तासाची तयारी ती तितक्याच गांभीर्याने करत असे.

तिच्यामुळे केवळ मीच नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांचा बुजरेपणा संपला. आम्ही आत्मविश्वासाने उभे राहू शकलो. ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, यांना फार कळत नाही, भाषा नीट येत नाही, मांडणी करता येत नाही अशी शेरेबाजी बरेचदा ऐकायला मिळते. परंतु शर्मिलाचा व्यवहार अत्यंत प्रगल्भ होता. त्यामुळे आम्ही न्यूनगंडावर मात करू शकलो. जे तुमच्याकडे आहे त्यासह उभे रहा असं सूत्र तिने आमच्यात पेरलं. कोणताही प्रश्न मूर्खपणाचा नसतो असे ती नेहमी म्हणे. कितीही आणि कसेही प्रश्न विचारले तरी त्यावर ती मत नोंदवत असे. एखाद्या उत्तरावर मतभेद असतील तर तो विषय त्या विद्यार्थ्याला संशोधनासाठी किंवा असाइनमेंटसाठी ती सुचवत असे. आपण दोघे मिळून यावर अधिक शोध घेऊ, असं सांगत असे. जर विद्यार्थ्यांकडून काही सूचना किंवा आंतरदृष्टी मिळाली तर खुलेपणाने स्वीकारत असे. शिकवताना विद्यार्थ्यांच्या मुद्यांचा वापर करत असे. तिचं शिकवणं भिडायचं. त्यामुळेच तिचे वर्ग नेहमी गच्च भरलेले असत. अर्थात ती तेवढ्यात समाधान मानत नसे. परिघावरील विद्यार्थ्यांना आपण समजून घ्यायला कमी पडतोय, आपली शिक्षणव्यवस्था अशा विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने सामावून घेत नाही, यामुळे ती अस्वस्थ असे. म्हणून काहीतरी वेगळे प्रयोग विद्यार्थ्यांसोबत करण्याची गरज तिला प्रकर्षाने जाणवली असणार. विविध प्रयोग करण्याचा तिचा नेहमी प्रयत्न असायचा.

शिकणं-शिकविण्याला प्रथम प्राधान्य

शिकवताना तिच्या खास पद्धती होत्या. जे शिकवायचे आहे सर्वप्रथम ती व्यवस्थित अक्षरात बोर्डावर त्याचा आराखडा मांडत असे. त्यामुळे त्या तासाचा संपूर्ण पट विद्यार्थ्यांच्या लक्षात येत असे. तिच्या शिकवण्यातून अनेक संशोधन विषय निघत असत. मी एकदा तिला म्हटलं, तू शिकवताना अनेक वेळा असं म्हणतेस की यावर संशोधन व्हायला हवं. आपण असं करू या का, अशा विषयांची एक यादीच बनवू या. तिने सहर्ष सहमती दिली. आम्ही ते मुद्दे वेळोवेळी नोंदवायला सुरुवात केली. त्यातून एक व्यवस्थित यादी आकाराला आली. ज्यांना संशोधनासाठी विषय सुचत नसत त्यांना आम्ही ती यादी वाचायला देत असू. त्याचा अनेकांना फायदा झाला.

विद्यापीठात संस्थात्मक उभारणीची अनेक महत्त्वाची कामं असायची. प्रशासकीय कामांचा बोजा पण असायचा. पण ते करताना शिकविण्याच्या जबाबदारीकडे शर्मिलाने कधी दुर्लक्ष केलं नाही. या बाबतीत कसलीही तडजोड तिला मान्य नसे. विद्यापीठातील अनेक कमिट्यांवर ती होती. त्या व्यापामुळे तिने कधी तास घेतले नाही असं होत नव्हतं. विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी काढलेल्या नोट्ससुद्धा ती बघत असे. विषयाशी संबंधित मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही भाषेतील पाठ्यपुस्तके तयार करण्यात तिने पुढाकार घेतला. ब्रीज कोर्ससारखा कोर्स तयार करून सामाजिक शास्त्रात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अकादमिक कौशल्य, आत्मविश्वास दिला. अनेक कोर्सेसचे पुस्तक आणि नियमपुस्तिका (मॅन्यूयल्स) बनवली. ज्याचा इतरही शिक्षकांना व विद्यार्थ्यांना खूप उपयोग झाला. यामुळे ते वर्गातील चर्चेत भाग घेऊ लागले. मतं नोंदवू लागले. या प्रक्रियेमुळे त्यांची जाण वाढली. आम्ही मित्रांनी मराठी माध्यमाचे अनेक सकस, वैचारिक साहित्य एकत्रित केले. यात यशवंत सुमंत, अनिकेत जावरे, दीप्ती गंगावणे आणि शर्मिला रेगे यांच्या पुस्तकांचा समावेश होता. असंख्य विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. विद्यापीठाच्या पाच नंबर होस्टेलवरील मुलांच्या खोलीत आम्ही अभ्यासवर्ग सुरू केले. परंतु तिथे मुलींना प्रवेश नसल्यामुळे समाजशास्त्र विभागात राम बापट सरांचे अभ्यासवर्ग घ्यावेत अशी कल्पना आम्ही मांडली. बापट सर तेव्हा सेवानिवृत्त झालेले होते. परंतु शर्मिलाने अजिबात आढे-वेढे घेतले नाही. तिने मोकळेपणाने मान्यता दिली. आपले विद्यार्थी इतरांकडून शिकतात यात तिला कमीपणा वाटत नसे. उलट आपल्या विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक वाढली आहे याचा तिला आनंद होत असे.

प्रत्येक विद्यार्थ्याशी ती संवाद करत असे. वरवरचा नव्हे तर अगदी खोलात जाऊन. ती कोणतीही गोष्ट लादत नसे. विभागप्रमुख असल्याचा वरचष्मा तिने कधी मिरवला नाही. संशोधनाचा विषय सुचवताना सुद्धा तिची अनोखी पद्धत होती. विद्यार्थ्याशी चर्चा करत असताना ती त्याच्याकडूनच सहज विषय काढून घेत असे. यात तिची खास हातोटी होती. विद्यार्थ्याला आश्चर्य वाटायचे की हा विषय मला कसा सुचला नाही?

शिक्षक-विद्यार्थी अनोखं नातं

संवादी असणं हा तिचा एक महत्त्वाचा व्यवहार, जो मला खूप प्रभावित करून गेला. ती कोणालाही मोडीत काढत नसे. प्रत्येक गोष्टीकडून शिकणं आणि चिकित्सक प्रश्न उपस्थित करणं, वेगळे मतांचं, नव्या कल्पनांचं स्वागत करणं तिच्या स्वभावात होतं. ती म्हणायची, ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो, वाईट वाटते त्याला संशोधनाचा, अभ्यासाचा विषय बनवा. यामुळे तुम्ही अधिक विमर्षात्मक होता. ती शिकवत असलेला विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर ती विद्यार्थ्यांना वर्षाच्या शेवटी घरी बोलावत असे. तो गेट-टुगेदरचा कार्यक्रम असे. त्यात गप्पा, गाणी होत असत. विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हावे यासाठी तिच्या घराची एक भिंत राखून ठेवलेली असायची. त्यावर विद्यार्थी विविध पद्धतीने व्यक्त होत असत.

वर्गातील विद्यार्थ्यांशी तिचा संवाद होताच. त्याशिवाय सामाजिक चळवळी, वेगवेगळ्या संघटनांमधील कार्यकर्ते यांच्याशी सुद्धा तिचा सतत संवाद असायचा. विविध आंदोलनांचे दस्तवेजीकरण ती सतत करत असे. आम्हाला सुद्धा तसे करण्यास प्रेरित करत असे. अकादमीक क्षेत्राला समाजवास्तवाशी जोडून घेण्याचा तिचा प्रयत्न असे. हा दुहेरी संवाद होता व तो आम्हाला किती सखोल ज्ञान देत होता याची प्रचिती आज येते.

समाजाचे व्यवहार आणि ज्ञाननिर्मिती यामध्ये पूल बांधण्याचं काम ती आयुष्यभर करत राहिली. जगभर सुरू असलेली अकादमिक चर्चा तसेच देश व स्थानिक पातळीवरील चर्चाविश्व यांच्याशी तिने आम्हाला जोडले. क्षेत्रकार्य, संशोधन, कार्यशाळा, विविध व्याख्यानमाला, लेखन-वाचन कोर्सेस असे अनेक उपक्रम राबवून ती आम्हाला समृद्ध करत गेली. केवळ पुस्तकं आणि त्यावरील कोरडी चर्चा असं आमच्या क्लासरूमचं स्वरूप नव्हतं. तिने क्लासरूमला अधिक समावेशी बनवलं. शिकण्या-शिकवण्यासाठी व संशोधनासाठी सामाजिक संघटनांच्या हालचाली, चळवळींची पत्रकं, पोस्टर्स पासून जनतेत विद्यमान असलेल्या लोकप्रिय संस्कृतीतून सुद्धा तिने आमचं अभ्यास साहित्य निर्माण केलं. त्यात अगदी लग्नपत्रिका, कॅलेंडर, काडीपेटीचे कव्हर, फटाक्यांचे रॅपर, कॅसेट, गाणी, लघुचित्रपट इत्यादींचा समावेश होता. चित्रपट, गाणी, मालिका बघणं म्हणजे वेळ वाया घालवणं असा आपला समज घरादारापासून ते महाविद्यालयापर्यंत करून दिला गेलेला असतो. मात्र शर्मिला या सर्व गोष्टींनाच अभ्यासाचा विषय बनून टाकत असे. या गोष्टी ती शिकण्या-शिकवण्याचं साधन म्हणून वापरत असे. तिच्या कोर्सची सुरवात लघुपट दाखवून होत असे. अशा सर्व साहित्याचा अभ्यासाचे स्त्रोत म्हणून वापर करण्यास तिने आम्हाला शिकवलं. असे असंख्य स्त्रोत वापरणं आणि त्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र समजून घेण्यास आम्ही शिकलो. तसेच आपल्या विचारप्रक्रियेचा अंतिम टप्पा आला असं जेव्हा वाटेल तेव्हा पद्धतीशास्त्र बदलून बघायला हवं, हे देखील तिने आम्हाला शिकवलं.

तिने आम्हाला केवळ शाब्दिक आधारच दिला नाही तर प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवर सुद्धा सतत पाठीशी राहिली. सोबत काम करणाऱ्या व्यक्तीच्या आवडीनुसार ती पुस्तके, कपडे, भेटवस्तू देत असे. यात खूप विविधता आणि विशिष्ट प्रकारची सौंदर्यदृष्टी असे. मला अनेक शर्ट, टी-शर्ट तिने घेतले. अभ्यासासाठी लागणाऱ्या गोष्टीसुद्धा ती सतत देत असे. त्यामुळे व्यावसायिक नात्यासह भावनिक नाते जुळत जाई. वर्धा येथील आय.डब्लू.एस परिषदेच्या (2011) निमित्ताने संशोधक टीमला एकत्र प्रवास करता येईल अनेकांना पहिल्यांदाच विमान प्रवास करता येईल अशी तिची इच्छा असल्याने, तिने शिताफीने सर्वांचे विमानाचे तिकीट स्वस्त भावात आणि वेळेत करून घेतले. आमच्या गटातील अनेकांचा तो पहिला विमान प्रवास होता. विविध गरजू विद्यार्थ्यांना तिने आर्थिक मदतही केली . चिकित्सकाचे (निंदकाचे) घर असावे शेजारी

दैनंदिन व्यवहारातून ती आमचे दृष्टिकोन विकसित करत असे. एकदा विद्यार्थी 5 सप्टेंबर रोजी नेहमीच्या सवयीने शिक्षकदिनाच्या शुभेच्छा देण्यास गेले. तेव्हा ती म्हणाली, महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन हा आपला शिक्षक दिन. शिक्षक-विद्यार्थी नातं समतेच्या मूल्यावर आधारित असावं. दोघांनी एकमेकांकडून शिकायचं असतं. त्यावेळी आम्ही सगळं समजून घेण्याच्या प्रक्रियेत होतो. त्यामुळे आत्मसात करत जाण्याची आमची वृत्ती होती. क्रमात आमची चिकित्सक दृष्टी देखील विकसित होत गेली. आज जेव्हा तिचं लिखाण वाचतो, तिच्याशी संवाद साधण्याची तीव्र इच्छा होते. प्रश्न विचारून तिला भंडावून सोडणं अन् सहचिंतनातून सत्याचा शोध घेणं आता होणार नाही. आज ती या जगात नाही. ती असताना स्त्री अभ्यासाची पुस्तकं, तिचं लेखन वाचत होतो. ‘शिक्षक दिन: पर्यायी सांस्कृतिक राजकारण’ या पहिल्या पुस्तकाच्या संपादनातून तिच्याशी संवादाचा प्रयत्न सुरू झाला होता. मात्र पुस्तक आले तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. 2013 ला ती गेली. त्यामुळे हा संवाद अपूर्ण राहिला. आज ती असती तर तिच्या लिखाणाबद्दल तिला अनेक प्रश्न विचारता आले असते.

ती आज नसली तरी तिचा प्रभाव मात्र कायमचा सोडून गेलीये. हा तिच्याबद्दलचा भक्तिभाव नाहीये तर एका विद्यार्थ्याने स्वतःच्या शिक्षकाचे विविध पैलू समजून घेण्याचा प्रांजळ प्रयत्न आहे. या प्रयत्नात मी तिच्याशी पुन्हा-पुन्हा नव्याने कनेक्ट होतो. ती जशी विद्यार्थ्यांच्या जीवनातील प्रत्येक घडामोडीशी कनेक्ट असायची. एकदा विद्यार्थ्यांनी रिफेक्ट्रीबद्दल आंदोलन केलं. रिफेक्ट्री समितीतील सदस्यांना विद्यार्थ्यांनी लक्ष्य केलं. यात व्यक्तिगत टीका-टिप्पणी पण झाली. समितीतील सदस्यांनी याला आक्षेप घेतला. तेव्हा शर्मिलाने विद्यार्थ्यांचे प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य मान्य केले. एवढेच नव्हे तर भित्ती पत्रकाद्वारे विद्यार्थ्यांशी चिकित्सक खुला संवाद सुद्धा साधला. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे समितीमधील सदस्यांनी अधिक डोळसपणे बघावे यासाठी प्रयत्न केले. टीका झाली म्हणून ती कधीच गडबडून जात नसे. तर्क-वितर्क करत टीका टोलवून लावण्याचा प्रयत्न करत नसे. उलट त्या टीकेला सामोरी जात असे. तिला स्वत:ला Devil's advocate ही भूमिका करण्यास आवडायचं. त्या अर्थाने पाहता तिने आमच्यात शिकवण रुजवली की चिकित्सकाचे घर असावे शेजारी.

वर्गाबाहेरील वर्ग

क्लासरूम समजून घेतल्याने शिक्षकास विद्यार्थ्यांसोबत चांगल्या प्रकारे कनेक्ट होता येतं. पण सर्वसाधारण शिक्षकांमध्ये असा कल असतो की विद्यार्थी व आपल्यात एक अंतर असावे, त्यांना फार जवळ करू नये. त्यामुळे विषय शिकवणे आणि नोट्स देणे यापलीकडे विद्यार्थ्यांशी त्यांचा फारसा संबंध नसतो. अवांतर वाचन, चर्चा, समाजातील दैनंदिन घडणाऱ्या घटना याबद्दल विद्यार्थी काय विचार करतात किंवा काय वाचन करतात, याचा फारसा विचार करताना शिक्षक आढळत नाहीत. दररोज तास घेणं आणि अभ्यासक्रम पूर्ण करणं हे एका कर्मकांडाप्रमाणे चालू असतं. दुहेरी संवादाचा अभाव तर खूप असतो. एखाद्या विद्यार्थ्याने बोलण्याचा प्रयन केलाच तर विविध पद्धतीने त्याला नाउमेद केलं जातं. शर्मिला मात्र याला अपवाद होती. क्लासरूमच्या बदललेल्या स्वरूपाची तिने दखल घेतली होती. दलित बहुजन विद्यार्थ्यांच्या समावेशामुळे हा ‘बदल’ झालेला होता. विद्यापिठांच्या ‘घसरलेल्या दर्जा’ विषयी याच काळात बरंच मांडलं जात होतं. एकीकडे दलित बहुजन विद्यार्थ्यांचं आगमन स्वागतार्ह होतं, तर दुसरीकडे शिक्षणाच्या घसरलेल्या दर्जाबद्दल काळजीयुक्त स्वर उमटत होता. अशा वळणावर वास्तवाला भिडणं हे तिच्या पुढचं मोठं आव्हान होतं. प्रत्यक्ष प्रयोगातून आणि रोजच्या व्यवहारातून ती नवे मार्ग शोधत होतीच. बदललेल्या क्लासरूमला लक्षात घेऊन शिकण्या-शिकवण्याच्या नव्या पद्धती तिने शोधल्या. त्या विकसित करण्यात देखील खूप मौलिक भूमिका निभावली.

विद्यार्थी म्हणून आणि नंतर अध्यापनातला सहकारी म्हणून मी बारकाईने तिचे निरीक्षण करत असे. त्यावेळी कळत-नकळत माझ्या व्यक्तिमत्वाची पाया भरणी होत होती. तेव्हा असं वाटलं नाही की तिचा प्रभाव इतका दूरगामी असेल. लातूरला विद्यापीठ उपकेंद्रात मी प्राध्यापक म्हणून दाखल झाल्यावर अनेक गोष्टी जाणवू लागल्या. शर्मिलाच्या विचारांचा धागा पकडून मी जाणीवपूर्वक काही प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. माझ्या क्लासरूममध्ये मराठवाड्याचा ग्रामीण, मागास असलेल्या भूप्रदेशातील 90% विद्यार्थी ‘कनिष्ठ’ जात-वर्गातील होते. आजच्या आव्हानात्मक युगात टिकाव धरू शकतील असे कोणतेही ‘सांकृतिक भाडंवल’ त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे माझ्यासमोरील आव्हान हे केवळ ‘घसरलेल्या दर्जाचं’ नव्हतं तर ‘कायम स्वरूपी दर्जाहीनतेच्या’ वास्तवाचं होतं. ज्याला चिकित्सकपणे भिडणं हे एक शिक्षक म्हणून मला गरजेचं वाटलं. याच प्रयोगाची फलश्रुती म्हणजे विद्यार्थी आणि लातूर शहरातील नागरिक यांनी एकत्र येऊन साकारलेला ‘लातूर : परिघावरील आवाज’ हा ग्रंथ. या पुस्तकात लातूर शहराचा सामाजिक-सांस्कृतिक-वैचारिक इतिहास शब्दबद्ध केला गेला आहे. इथले परिघावरील आवाज त्यात नोंदवले गेले आहेत. त्याचा दुसरा खंड सुद्धा लवकरच प्रकाशित होणार आहे. पेरलेलं आता उगवू लागलं आहे.

मराठवाड्याचा हा दुष्काळी भाग. सर्व प्रकारच्या अभावाने ग्रस्त इथल्या पिढ्या. उच्च शिक्षणात आलेली पहिली पिढी क्लासरूममध्ये माझ्या समोर. त्यात अनेक मुली. त्यांच्यासोबत संवादातून लक्षात आलं, किती विषम सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी झगडत त्या इथपर्यंत पोहोचल्या. त्यांचा प्रवास विलक्षण. तो जर शब्दबद्ध झाला तर एक अनोखा दस्तावेज आकाराला येईल. एकविसाव्या शतकात मराठवाड्यातील मुलींच्या जीवनाची आणि शिक्षणासाठी त्यांच्या संघर्षाची कहाणी. ज्यात त्यांचे प्रश्न, संघर्ष, कर्तृत्व, श्रम, ताण सगळं नोंदवलं जाईल. इथला सामाजिक-सांस्कृतिक इतिहास शब्दबद्ध होईल. परिघावर असणाऱ्या विविध जातधर्माच्या तीस मुलींचा जीवन प्रवास त्यांच्याकडून लिहून घेतला. तो विशाल ग्रंथ आता तयार आहे. लवकरच तो प्रकाशित होईल.

ही सगळी शर्मिलाची देण आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. उलट हे नोंदवलं पाहिजे. तिने आमच्यात बीज पेरलं, आता ते उगवू लागलं आहे. तिने केलेली वैचारिक देवाण-घेवाण माझ्या माध्यमातून इथल्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत जाईल. ते त्यात नवी भर घालतील. सामाजिक प्रश्न आणि शिक्षणातून तयार होणारी जाणीव यात विरोधाभास राहणार नाही. सामान्यजन आणि शिक्षित पिढी दोन वेगळ्या ध्रुवांवर नसतील तर एकमेकांसोबत सामाजिक प्रश्नांना भिडतील. समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणावर संशोधन आणि उपाय शोधणारी नवी पिढी अंकुरित होईल अशी आशा वाटते.