विझलेल्या मेणबत्त्या

१३ मार्च २०२१

समाजामध्ये जेव्हा वाईट घटना घडतात, तेव्हा त्या घटनेभोवती, सामाजिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि काही मर्यादेपर्यंत स्त्री-पुरुषांची जैविक ठेवण यांचे वलय असते. या सर्व विषयांपर्यंत आपल्याला जेव्हा पोहोचता येते, तेव्हाच त्या घटनेमागील कारणे कळतात आणि जेव्हा कारणे कळतात, तेव्हाच या घटनेवरचे उपाय हाती येतात.

इथे विषय आहे तो स्त्रिया व मुला-मुलींवरचे लैंगिक अत्त्याचार आणि बलात्काराचा.

अशा घटना घडल्या की आपल्याकडे अतितातडीची कृती म्हणजे त्यावर टीव्हीवर चर्चा घडतात आणि पुरुषाची मानसिकता बदलली पाहिजे या शेवटावर त्या थांबतात. तर सर्वसामान्य लोक मेणबत्ती मोर्चे काढतात. अलीकडे मोबाइलवरून निराशेचे, टीकेचे मेसेज, व्हिडीओ, ऑडीओ फिरवले जातात, ज्यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते संघटना पर्यंत सर्वजण सहभागी असतात. त्यानंतर ‘जणू काही घडलेच नाही’ अशा समजुतीने संपूर्ण वातावरण जे शांत होऊन जाते, ते पुढील अत्याचार घडेपर्यंत! असे का होते आहे?

सन २०१२ मध्ये निर्भया केसमध्ये जेव्हा मेणबत्त्या पेटवून खूप मोठे आंदोलन झाले होते, तेव्हा आता तरी हे अत्याचार बंद होतील, अशी उगीचच आशा वाटली होती. पण त्यापाठोपाठ तशाच घटना घडत राहिलेल्या आपण पाहिल्या. म्हणजे तुम्ही मेणबत्त्या पेटवा, टीव्हीवर चर्चा चालवा, पोलिसांकडून चकमकी घडवा, फाशीच्या शिक्षेचे कायदे करा किंवा संघटनांनी निषेध मोर्चे काढा, महिला-आयोगाने कठोर शिक्षेची शिफारस करा, एखादा बंद पाळा - कशानेही हे अत्याचार सत्र थांबत नाही हे आता गुन्हेगारासह सर्वांना कळून चुकलेले आहे. किंबहुना ते एक ‘रुटीन’ झालेले दिसते. स्त्री विरोधातील हिंसा हा जसा भारतातील एक ‘नित्यक्रम’ आहे, तसेच हिंसा झाली रे झाली, की अशा विविध मार्गाने निषेध हा देखील एक नित्यक्रम होऊन बसलेला आहे. त्यामुळे एकूणच हिंसा काय आणि तिचा निषेध काय, दोघांबाबत ‘हे चालायचेच’ म्हणून समाजाला एक बधीरता व्यापून राहिलेली दिसते आहे आणि अशा प्रकारचे ‘बधीर समाज-मानस’ तयार होणे, हे या घटना घडत रहाण्यामागील एक कारणसुद्धा मानावे लागते.

दुसरी जी कारणे आहेत, त्यापैकी एक आहे ते गुन्हेगाराला होणारी शिक्षा ही त्याचा एक ‘सूड’ म्हणून पार पाडण्याची आपली मानसिकता. मग त्या गुन्हेगाराला, त्याने जसा त्या स्त्रीचा छळ करून जीव घेतला तसाच छळ करून मारा किंवा सर्वांसमक्ष फाशी किंवा फटके मारा म्हणजे जरब बसेल, अशा चर्चा सुरु होतात. गुन्हेगार गुन्हा करतो, तेव्हा तो त्याच्या दृष्टीने कसलातरी सूडच उगवत असतो आणि मग ‘सूडाचा बदला सूडाने’, या पुरुष-तत्त्वाने, त्याला शिक्षा त्या भावनेने करावी, ही समाजाला या व्यवस्थेत लागलेली सवय आहे. गुन्हेगारापेक्षा गुन्हा कसा नष्ट होईल, याचे प्रयत्न इथे हवेत हे आपल्या लक्षात येईनासे झालेले आहे. सरकारी यंत्रणेचा कसाही वापर करून आपण एक माणूस नक्कीच मारू शकतो. पण तो माणूस इतक्या भयानक विकृत कृत्यास तयार कसा झाला? कोणत्या जीवनपद्धतीतून तो इतका संवेदनाशून्य घडला? यामागील धागेदोरे तपासायला हवेत, असा विचारच दुर्दैवाने आपल्या समाजात गांभीर्याने होत नाही.

‘गुन्हेगाराला शिक्षा’ हा वेगळा मुद्दा आहे. ते काम कायदा, पोलीस, आणि न्यायालये करतीलच. पण त्या गुन्ह्यामागील सामाजिक, कौटुंबिक, मानसिक वस्तुस्थितीचा माग काढल्याशिवाय, हे असे गुन्हे आपल्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात का होत राहिलेले आहेत, याचा काही अंदाज आपणास येऊ शकणार नाही. म्हणजे वरील विषयांपैकी एक ‘कौटुंबिक / सामाजिक’ बाजू जरी अभ्यासायची म्हटली, तर त्या गुन्हेगाराची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याच्या पालकांचे एकमेकांशी आणि त्याच्याशी असणारे नाते-संबंध, त्या गुन्हेगाराच्या सभोवतालची स्थिती, गुन्हेगाराची सामाजिक पत, त्याला जगण्यासाठी मिळालेल्या अत्यावश्यक सोयी-सुविधा आणि संधी, त्याची रोजगार किंवा बेरोजगार स्थिती, त्याचे शिक्षण, त्याचे मित्र, त्याचे वाचनाचे विषय, चित्रपटाची निवड, तसेच समाजमाध्यमे, पोर्न फिल्म याचा तो करीत असलेला वापर या सर्व बारीकसारीक गोष्टीचा तपशील हाती येण्यातून त्याची आर्थिक-सामाजिक स्थिती आणि त्याची मानसिकता घडविणारे घटक लक्षात येतील. त्याचे वय आणि त्याच्या विवाहित-अविवाहित स्थितीवर बेतलेल्या प्रश्नावरून त्याची लैंगिक धारणा, त्याच्या कामशमनाच्या कल्पना यावरही प्रकाश पडेल. त्याकरिता सरकारकडून तज्ञांच्या समितीचे गठन होऊन, त्याद्वारे याबाबत सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. संघटनांनी त्याची मागणी लावून धरली पाहिजे.

अशा अनेक गुन्हेगारांच्या नोंदी होण्यातून, स्त्रिया व बालके यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचारामागे, या सर्व गुन्हेगारांची मानसिकता एकाच प्रकारची आहे का, मग ती तशी घडण्यामागे एखादी विशिष्ट समान सामाजिक किंवा कौटुंबिक परिस्थिती जबाबदार दिसते आहे का किंवा गुंड टोळ्यांच्या हाती ती व्यक्ती पडलेली आहे का, याचा उलगडा होण्यातून, कोणकोणत्या उपाययोजना सरकारी, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर योजता येतील, ते त्या संबंधित तज्ञांकडून सुचवलं जाईल. इथून व्यवस्थेतील बदलाला सुरवात होऊ शकते. ही चौकशी अर्थातच अंतर्गत आणि गुप्त राहील. गुन्हेगाराच्या शिक्षेशी त्याचा काहीही संबंध नसेल.

एखाद्या गुन्हेगाराला बालपणापासून आई-वडील मिळाले नाहीत आणि घराबाहेर वाढताना त्याचा छळ झालेला आहे. म्हणून तो विमनस्क आणि उद्ध्वस्त मनःस्थितीतून अशा कृत्याकडे वळला असे सत्य चौकशीतून बाहेर आल्यास एकूणच समाजातील प्रत्येक बालकाचे बालपण सुरक्षित असावे हा त्यावरचा उपाय असणार आहे. आपल्या देशात, घरातून पळून गेलेली किंवा पळवलेली किंवा आई-बाप नसलेली अशी लाखो बालके घराबाहेर आहेत. त्यापैकी काहींचा गुन्हेगारी हा तर चारितार्थ झालेला आहे हे चिंताजनक आहे. या परिस्थितीतून असे बालपण मुक्त करणे याकरता एखादी संघटना वा संस्था पुरेशी असू शकत नाही. त्याकरता सरकार व संघटनेच्या बरोबरीने सर्व समाज एकवटला पाहिजे.

याउलट एखाद्या चांगल्या परिस्थितील मुलगा अशा गुन्ह्याकडे का वळला याबाबत वेगळी माहिती बाहेर येऊ शकते. त्याला लहानपणी मोठ्या वयाचे मित्र मिळालेले असू शकतात. त्यांच्या नादाने, लैंगिकतेबद्दलचे अवास्तव कुतूहल जागे होऊन रहाते. त्यानुसार तशी पाहण्यात येणारी मासिके, चित्रपट आणि मुलींबद्दल समाजात वहात असलेली नकारात्मक भावना या सर्वच्या एकत्रित परिणामांमुळे मुलींची छेडछाड म्हणजे जणू काही पुरुषाचा अधिकारच या विचाराच्या प्रभावाखाली राहून तो या कृत्याकडे वळलेला असू शकतो. या माहितीतून ‘आपल्या मुलाबद्दल पालकांनी घेण्याची दक्षता’, हा कुटुंबातून येणारा उपाय समोर येतो. त्याचबरोबर नातलग, शेजारी, मित्र, शिक्षक वगैरे सामाजिक घटकांच्या त्यासंबंधीच्या जबाबदाऱ्या निश्चित होऊ शकतात. पहिल्या-वहिल्या गुन्ह्यानंतर पोलिसांच्या हाती पडल्यावर, एखादा सुधारू शकणारा तरुण पोलिसांनी त्याच्यासमवेत केलेल्या अपमानस्पद वर्तनातून पेटून उठून, असे गुन्हे वारंवार करू लागला असेल तर पोलिसांची संवेदनशीलता वाढविण्याचे प्रशिक्षण ही त्या खात्याने करायची उपाययोजना असते. गुन्हेगाराच्या चौकशीतूनच हे सर्व सामाजिक वास्तव उघड होऊ शकते. यातून गुन्हा रोखणारे वेगवेगळे उपाय आपल्या समोर येत रहातील.

काही पुरुषांबाबत, त्यांच्या कामशमन-पूर्ततेच्या अडथळ्यातून असे गुन्हे निर्माण झालेले असतात. कित्येक कुटुंबे इतकी गरीब असतात की एका खोलीतच त्यांच्या आई-वडिलांचा संसार असतो. तेव्हा त्या कुटुंबातील तरुण मुलगे स्वतःच्या कुटुंबाचा विचारही करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची लग्ने होत नाहीत आणि लग्न हा कामभावना शमवण्याचा एक समाजमान्य मार्ग आहे. त्याच्या गरीब पालकांना त्यांच्या तरुण वयात एक स्वतंत्र खोली कशीबशी मिळवता आली. पण त्यांच्या मुलाला तेवढीही मिळू शकत नाही. इथे गरीब अधिक गरीब होऊ लागले का असा प्रश्न पडतो. यामागे वाढलेली लोकसंख्या हासुद्धा लैंगिक समस्या वाढवणारा एक घटक म्हणून पुढे येतो. जीवनाला स्पर्श करणारे हे सर्व विषय एकमेकांत असे बेमालूम गुंतलेले आहेत की त्यांचा अशा गुन्ह्यामध्ये वेगवेगळा असणाऱ्या हातभाराचा विचार करण्याची गरज आहे हेदेखील आपल्या लक्षात येईनासे झालेले आहे.

एक तर मुलगा-मुलगी १५ वर्षांपर्यंत वयात आली की पुढे शिक्षण, नोकरी वगैरे धरून त्यांना वयाच्या २५ ते ३० वर्षापर्यंत लग्नाचा विचार करता येत नाही. ही सर्वच वर्गातील स्थिती आहे. कामभावना ज्या वयात उच्च पातळीत असतात, त्या वयातील १५ वर्षे त्यांना त्या भावनेच्या पूर्ततेची गरज मारून जगावे लागते. लिव्ह-इन मध्ये राहून या गरजा भागवणे, हे आपल्या देशातील बहुसंख्य लोकांना शक्य नसते. त्यामध्येदेखील मुलीच्या फसवणुकीचा धोका जास्त असतो. शरीरसंबंधाच्या स्त्रियांच्या निर्णयाबाबत बहुसंख्य भारतीय पुरुषांच्या मनात आदर नसणे हा स्त्रीच्या होणाऱ्या अवहेलनेमागील कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे एकूण स्त्रियांना दडपणे, त्यांनाच बोल लावणे, शिक्षा करणे अशी समाजाची भूमिका राहते. स्त्रीबाबतच्या या नकारात्मक भूमिकेचा गुन्हेगारांना फायदा मिळतो. आपल्या देशातील जातीव्यवस्थेमुळे असे उपाय अधिकच क्रूर बनतात. याखेरीज पतीला कुटुंब सोडून दुसरीकडे नोकरीस राहावे लागणे याचा अर्थ म्हणजे लग्न होऊनही कामशमनाच्या स्त्री-पुरुषांच्या गरजा अपूर्णच रहातात असा होतो. एक तर विवाह योग्य वयात होऊ शकत नाही, त्यानंतर विवाहाशिवाय होऊ पाहणाऱ्या संमतीच्या कामशमनासाठी योग्य वयात अन्य पर्यायाचे प्रशिक्षण व मान्यता समाज देत नाही आणि विवाह वेळेत झाला तरी, नोकरी-धंद्यामुळे कामशमनात अडचणी उभ्या रहातात हे एरव्ही विशेष न वाटणारे मुद्देसुद्धा स्त्रियांवर शारीरिक हल्ले होण्यास कारणीभूत ठरतात. मग या सर्व अपुऱ्या कामपूर्तीविषयक स्थितीचा दोष कुणाला द्यायचा? संबंधित गुन्हेगारांना, सरकारच्या एकूणच गरिबीविषयक दिखाऊ धोरणांना, नोकरीमुळे पती-पत्नीत दूरस्थता येऊ नये या दूरदृष्टीच्या अभावाला, वाढलेल्या लोकसंख्येला की समाजात सेक्सविषयी व्यक्त होण्यास मोकळे वातावरण नसलेल्या व्यवस्थेला ? या वास्तवाने स्त्रीबाबत चोहोबाजूने इतके गंभीर रूप धारण केलेले आहे की लैंगिक गुन्हे हा तपशीलात जाऊन विचार करण्याचा विषय बनलेला आहे.

या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये गुन्हेगारी निर्माण होण्याचे प्रमाण किती टक्के आहे आणि किती कमी-जास्त आहे ते शोधायला लागेल. त्याकरता सर्वेक्षण हाच त्या माहितीचा आधार आहे. पुन्हा या विषयाला कामशमनाची इच्छा किती आणि विकृती किती हाही एक फाटा फुटतो. कारण तीन-चार वर्षांच्या मुलींवरील लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार हे कामशमन म्हणता येणार नाही. तर ते एक भयंकर आक्रीत आहे आणि त्यामागील कारणेसुद्धा तज्ञांना याच सर्वेक्षणाचा आधार घेऊन शोधता येऊ शकतात. निव्वळ गुन्हेगारांना शिक्षा ठोठावून समाजातील विकृतीला संपवता येणार नाही, तर या विकृतीला प्रवृत्त करणाऱ्या परिस्थितीचा ‘ठावठिकाणा’ शोधून काढणे हे प्रथम जरुरीचे आहे.

हा ठावठिकाणा शोधताना, स्त्रीबाबत तिरस्करणीय वातावरण तयार करणाऱ्या काही सांस्कृतिक, धार्मिक परंपरा, आणि त्याचबरोबर चित्रपट, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे या सर्व विषयांवरही काम सुरु व्हायला पाहिजे. चित्रपटात अत्याचार हा काही पुरुषांना मनोरंजनाचा विषय वाटत असतो. याकरता स्त्रियांवरील अत्याचाराला चित्रपटात प्राधान्य मिळत असतं हे फार भयावह असून, १९७० नंतरच्या गेल्या ४०-५० वर्षात वाढलेल्या या ट्रेंडमुळे आज सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत आणि छळात आनंद घेण्याच्या मनोवृत्तीत वाढ झालेली दिसते आहे. या पन्नास वर्षात वाढलेली लोकसंख्यासुद्धा त्यासाठी पूरक भूमिका बजावीत आहे.

तेच टेलिव्हिजनबद्दल म्हणता येईल. स्त्रीबाबतचे गुन्हे रोजचेच झाले असल्याने, टेलिव्हिजनवरील सर्व वृत्तवाहिन्यांवरून स्त्री-अत्याचाराच्या बातम्या सतत अनेक तास दिल्या जातात. स्त्रीवरच्या बलात्काराची बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून ठळकपणे दिवसभर फिरवली जाते. पुन्हा ‘नाट्यरूपांतर’ म्हणूनही त्यात भर टाकली जाते. यामुळे अनेक गैर गोष्टी घडतात. एक तर अशा बातम्या सातत्याने देण्यातून सर्व स्त्रियांची मानहानी होत राहते. आपण स्त्री आहोत, मग आपल्यावर असे प्रसंग केव्हाही येऊ शकतात, अशी तडजोड तिला अशा घटनांबरोबर सतत करीत राहावी लागते. ज्यातून जीवनात एक हतबलता, भय तिला जाणवत राहते आणि एकूणच तिच्या आत्मविश्वासाची यामधून हानी होत असते. त्याहून वाईट म्हणजे या बातम्या वारंवार द्याव्या लागण्याचे काम अनेकदा स्त्री-अँकर करीत असतात. नोकरी सांभाळण्यासाठी ते त्यांना करावे लागते. “याला जीवन ऐसे नाव ” अशी बधीरता धारण करून जर ते काम त्या करीत असतील, तर मग असा प्रसंग त्यांच्यावर ओढवल्यास त्याचा सामना करण्याचे प्रसंगावधान त्यांच्यामध्ये कुठून येणार? दुसरीकडे, गुन्हेगारांना स्वतःची अशी फुकट प्रसिद्धी पाहून त्या कृत्याची लाज वाटण्याऐवजी त्यांना तो पराक्रम वाटतो आणि ऐकणारा एकूण समाज या सततच्या बातम्यांनी बधीर होतो. १३-१४ वर्षे वयाच्या मुलांचे बलात्कारामागील कुतूहल वाढते. तर तेवढ्याच वयाच्या मुलींमध्ये असुरक्षितता निर्माण होते. मग अशा बातम्या देण्याने आपण कोणता भारत घडवीत आहोत, याचे भान त्या वाहिनीच्या चालक-मालकांनी नको का ठेवायला?

तीच परिस्थिती टी.व्ही.मालिकांची. इथे स्त्रीचे असे चित्रण असते की त्यामुळे तिचा कौटुंबिक सन्मान आणि सामाजिक पत यास धक्का लागतो. याचा परिणाम अंतिमतः स्त्रीच्या सार्वजनिक अवहेलनेत, कुचेष्टेत वाढ होण्यात होतो. अंधश्रद्धा हा धर्मश्रद्धेला फुटलेला विकृत फाटा आहे. अंधश्रद्धेतून स्त्रिया / मुलींवर अत्याचार, बलात्कार, हत्या करण्याची मोठी संधी साधली जाते, हे माहीत असूनही अंधश्रद्धा व चमत्कारयुक्त मालिका प्रसारित करण्यास परवानगी कशी मिळते याचे आश्चर्य वाटते. अशा मालिकांवर बंदी आणण्याचा ना सरकार विचार करीत, ना समाज मागणी करीत. पण स्त्री-छळाचे कुठे खुट्ट वाजले की त्याबाबतच्या ‘चिंतेचे दळण’ याच टेलिव्हिजनवर हमखास दळले जाते.

एकूण सध्या जगातील बहुतांश हिंसा, हत्या धार्मिक प्रभावाखाली होत असलेल्या आपण पाहतो . शिवाय या अनैसर्गिक धार्मिक रिती-रिवाजातून, स्त्रियांना कमी दर्जाच्या समजण्याची मानसिकता जगातील पुरुषांमध्ये (अपवाद वगळता) तयार झालेली दिसते. स्त्रियांना कमी लेखण्यातून पुरुषांचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची उफराटी सवय या परंपरांनी समाजाला लावलेली आहे. त्यामुळे स्त्रीप्रती सभ्यतेचे वर्तन करायला पाहिजे ही बहुसंख्य पुरुषांना त्यांची जबाबदारी वाटतच नाही. स्त्रियांमधील कमतरता दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि अशा संभावित पुरुषांची बाजू घेत राहून बहुसंख्य भारतीय स्त्रिया आपली गेलेली पत उसनी मिळवू पहातात. स्त्रीला अवमानकारक असणारे पुरुषाचे वर्तन-संस्कार, पुरुषाच्या अशा पाठराखणीतून आपणच कसे मजबूत करीत आहोत हे भान स्त्रियांना जितक्या लवकर येईल, तितके आजचे हे स्त्रीवरील अत्याचार कमी होण्यास सुरवात होईल. काही उपाय हे असे स्त्रियांच्याच हाती आहेत.

भारतापुरते बोलायचे तर, स्त्री-अवहेलनेच्या या परंपरा इतक्या प्राचीन आहेत, की अगदी आपल्या रामायण-महाभारत, पुराण कथा यामधूनही त्या वाहताना दिसतात. द्रौपदी, सीता, अहिल्या, शूर्पणखा, रेणुका वगैरे स्त्रियांवरील अन्याय, पुरुषाचा ‘मीपणा’ आणि स्त्रीचा कमीपणा ठसवणारे नाहीत का? ज्यांनी प्राचीन काळात स्त्रियांची मानहानी केली आणि स्वतः पेक्षा त्यांना कमी लेखले त्याच पुरुषांना परमेश्वराचे विविध अवतार ठरवून आजही आपण जर पूजनीय मानीत असू, तर मग स्त्री-छळाच्या देशातील घटना कमी तरी कशा होणार? आज देशात स्त्री विरोधात हेच तर चाललेले आहे.

आज स्त्रियांना विशिष्ट मंदिरात प्रवेशबंदी आहे. त्याकरता तिच्या शरीरधर्माची चिकित्सा करून, तिला अशुभ, अपवित्र ठरविण्याचे काम त्याच निलाजरेपणाने चालू आहे, जे रामायणातील अहिल्येच्याबाबत त्या काळात झाले असेल. आज स्त्रीच्या स्वयंनिर्णयाचा विरोध करतांना तिचा चेहरा अ‍ॅसिड टाकून विद्रूप करण्याची कृती ही शूर्पणखेचा चेहरा विरूप करणाऱ्या आततायीपणाशी साम्य दाखवते. तर चारित्र्यावरून पत्नीचा छळ किंवा हत्या हे सीतेच्या अवहेलनेशी साम्य दाखवते. परस्त्रीसंबंध करून झालेले अपत्य नाकारणारे विश्वामित्री पुरुष आपल्या देशात आजही अवतीभवती आहेत. पुरुषांनी अनेक बायका कराव्यात किंवा विवाहबाह्य संबंध जोडावेत, पण स्त्रीने यापैकी काहीही केले नाही, तरी तीन वेळा तलाक म्हणून किंवा न म्हणून सुद्धा तिला घराबाहेर काढले जाण्याची सोयही या देशात आहे. बाहेरख्याली पुरुष मात्र घर अडवून राहतो आहे. विशेष म्हणजे, आपल्या देशात ‘शुभ’ म्हणून धार्मिक मंत्रोच्चार, देव-देवतांच्या आरत्या-भजन-पूजापाठ, मिरवणुका यांचा सतत गजर चालू असताना, स्त्रीबाबत बलात्कारासारखे प्रकार मंदिरातसुद्धा घडतात हे विशेषच आहे. पुरुष लिखित धर्म-कल्पनेतून सुरु झालेली ही स्त्री-मानहानीची परंपरा म्हणजे पुढील काळात स्त्रीने पुरुषांच्या बरोबरीने कोणत्याही क्षेत्रात पुढे येऊ नये याकरता प्राचीन पुरुषसत्तांनी स्त्रीच्या मनात खोटे भय निर्माण करून तिच्या आत्मविश्वासाचे पंख कापून ठेवण्याची केलेली तरतूद म्हणावी लागेल. स्त्री कायम विझलेलीच रहावी असा प्रयत्न सर्वच धर्मातून केलेला दिसतो. मग असा धर्म सामान्य पुरुषांनी पूज्य मानला तर नवल काय ?

शेवटी मग स्त्रीच्या या अवमानकर्त्या पुरुषांचे देवत्व नाकारणे आणि त्या देवाच्या मंदिरात जाणे बंद करणे ही जबाबदारी कुणाची आहे? त्याकरता सुधारक पुरुषाची वाट पहाता येणार नाही, तर तसा दृढ निश्चय स्त्रियांमध्ये असायला हवा. देशातील अर्ध्या लोकसंख्येने देवळात जाण्यावर जर बहिष्कार घातला आणि घरातच जर भक्ती केली तर असा देवा-धर्माद्वारे स्त्री-तिरस्कार ठसवण्याची हिंमत क्षीण होत जाईल. कारण मंदिरात जाणाऱ्या भाविक स्त्रियांमुळेच तर या धार्मिक ठेकेदारांचा चरितार्थ चालत असतो. स्त्रियांनी विरोध केला तर काही पुरुषसुद्धा या महिलांना या संघर्षामध्ये नक्कीच साथ देतील. मानसिक बदलाचे काही ‘धडे’ हे असे समाजातूनच यावे लागतील.

प्रसारमाध्यमे आणि धार्मिक परंपरा यातून स्त्री-छळाची परिस्थिती आणि तसा समाज कसा निर्माण होतो ते इथे पाहिले. आता त्यासंबंधीचे प्रत्यक्षातील काही उपाय कसे ‘अर्धवट’ सुरु आहेत त्याचे एक उदाहरण पाहू. लैंगिकतेबाबत मन-मोकळे होण्याचा एक भाग म्हणून अलीकडे मुलींना शरीरशास्त्राची काही माहिती देण्याविषयी शाळांमधून बरेच काम चाललेले आहे. ते अत्यावश्यकच आहे. परंतु वयात येणाऱ्या मुलग्यांना मात्र लैंगिकतेबाबत व्यवस्थित मार्गदर्शन मिळण्याची सोय आपल्या समाजात अत्यावश्यक समजली जात नाही. वयाच्या १३-१४ वर्षापासून मुलांमध्ये होत जाणाऱ्या शारीरिक बदलामुळे, मुलांनासुद्धा अस्वस्थता येत असते. परंतु “त्यांना समजतंय आपोआप” असं मानलं जातं. याबाबत सर्वच घरातील वडील, आपल्या मुलांशी समजून संवाद करतात असे नाही. म्हणजे मुलींना फक्त सांगायचे आणि मुलांना काही सांगायचेच नाही असे अर्धवट प्रयत्न सदोष परिस्थिती बदलू शकत नाहीत. अशा वेळेस मुलग्यांसाठी काही विभागीय केंद्रे किंवा ज्याला ‘सेक्स-क्लिनिक’ म्हणता येईल अशी सोय, तशी गरज असणाऱ्या सर्व पुरुषांना मार्गदर्शन करण्यासाठी समाजात उभारण्याची नितांत गरज आहे. यामध्ये समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सेक्सॉलॉजिस्ट, कौटुंबिक समुपदेशक अशा तज्ज्ञांची नेमणूक हवी. सरकारी पातळीवरूनच खरं तर ही पावले उचलली गेली, तर हे होऊ शकते. पण ते होत नसेल तर संघटनांनी त्याबाबत सरकारवर दबाव आणला पाहिजे. लैंगिक अत्याचारच्या घटनांबाबत चिंताग्रस्त असणाऱ्या डॉक्टर्सनीसुद्धा या क्लिनिकसाठी पुढाकार घेतला पाहिजे. अशी ‘सेक्स क्लिनिक’ म्हणजे पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठीची खरी सुरवात ठरेल.

एकूणच समाजामध्ये कृत्रिमपणे घडवली गेलेली, स्त्रीचा सन्मान खच्ची करणारी, सर्व क्षेत्रातील घातक मानसिकता जर आपण बदलू शकलो, तर खरोखर स्त्री-अत्याचाराचे प्रमाण कमी होऊ शकेल. त्याकरता वर सांगितलेले वेगवेगळे विषय व त्याबरोबरीने आपल्या गैर-परंपरा दोन्हीकडे लक्ष घालावे लागेल. शालेय शिक्षणातून स्त्रीचा सन्मान उंचावणारे काही पाठ आणावे लागतील. या सर्वाचे परिणाम दिसू लागेपर्यंत काम सुरु ठेवावे आणि पुढेही चालू ठेवावे लागेल. हे काम सोपे नाही किंवा लगेच होणारे नाही, हे खरेच. गेल्या काही सहस्त्रकात रचलेली समाजव्यवस्था बदलण्यास वेळ तर द्यावा लागणारच आहे. पण हा बदल होण्यास वेळ किती लागतो, हे महत्त्वाचे नसून त्याची सुरुवात होणे जास्त महत्वाचे आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात एकाच वेळी अशा प्रयत्नांना सुरुवात झाली की सर्वांच्या सहभागाने होणारे बदल आपोआप दिसू लागतील. त्याकरता सर्व स्त्री-पुरुष, विविध संस्था, संघटना, मानसोपचारतज्ञ, डॉक्टर्स, वकील, शिक्षक, पालक, लेखक, विनोदी लेखक, नाटककार, चित्रपट निर्माते, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, पोलीस, धार्मिक स्त्री-पुरुष, प्रसारमाध्यमांचे चालक व मालक, वृत्तपत्र-कर्ते, मंदिरांचे व्यवस्थापक, सरकार आणि असे अत्याचार आपल्या देशात घडणे हे आपल्या संस्कृतीला लाज आणणारे आहे असे वाटणाऱ्या प्रत्येकाने हा बदल घडवण्याच्या प्रक्रियेत सहभाग दिला पाहिजे. स्त्रीबरोबरील दुर्व्यवहार थांबवण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ती ‘सरकारची इच्छाशक्ती’! सरकार, संघटना आणि या विषयातील तज्ञ यांच्या पुढाकाराने या प्रयत्नास गती येऊ शकेल.

आपल्या देशातील ‘बेटी बचाव’ ही घोषणाच ‘मुली सुरक्षित नाहीत’, असे सुचवत आहे. आपण महिला दिन, कन्या दिन साजरे करून, उरलेले ३६४ दिवस महिलांचा अपमान करण्यासाठी जणू राखून ठेवतो. खुद्द पुरुषाला जन्म देणाऱ्या स्त्रीची मानहानी पुरुषानेच करीत राहणे आणि अगतिकतेपायी स्त्रीवर्गाने नाईलाजास्तव ते चालवून घेणे, अशा प्रकारचे स्त्री-पुरुषा मधील परस्पर संबंध आणि सामाजिक वातावरण कोणत्याही संस्कृतीला शोभनीय नाही. हे असेच चालू राहण्याने, त्याच्या विरोधात होणाऱ्या निषेध-पर्वात, विकत आणलेल्या मेणबत्त्या हजारोंनी पेटतात, पण मनामनातील आशेच्या नि भरारीच्या मेणबत्त्या मात्र विझलेल्याच रहातात. हे मानसिक विझलेपण संपवायला नको का?

मंगला सामंत

mangalasamant20@gmail.com