'मिळून साऱ्याजणी' पुरस्कृत विद्या बाळ अध्यासन प्रकल्प - 2

युनोनं 1975 हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं त्याला 2025 मध्ये पन्नास वर्ष पूर्ण होतील, त्यानिमित्त 1975 ते 2025 या 50 वर्षात महिलांसंदर्भात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, कायदे, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण, उद्योग आदी क्षेत्रात विशेषतः महाराष्ट्रात काय काय महत्त्वाच्या ठळक घटना, घडामोडी झाल्या त्याचा सामान्य स्त्री, पुरुष आणि एल.जी.बी.टी.आय.क्यू + या सर्वांवर काय परिणाम झाला याचा सखोल आणि सम्यक वेध घेणारा व्यापक अभ्यास विद्या बाळ अध्यासन प्रकल्प - 2 अंतर्गत मिळून साऱ्याजणी मासिक हाती घेत आहे. या प्रकल्पामध्ये सामान्य माणसं केंद्रस्थानी असणार आहेत. त्यामुळे पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था म्हणजे काय ? तसंच या व्यवस्थेत स्त्री प्रश्न म्हणजे काय, व्यवहारात त्याचं रूप कसं आहे ? स्त्री प्रश्न सोडवण्यात स्त्री चळवळ, स्त्री अभ्यासानं कसा हातभार लावला असं त्यांना वाटतं ? मुळात स्त्री चळवळ, स्त्री अभ्यास त्यांच्या पर्यंत पोहोचला आहे का ? या व्यवस्थेत स्त्री प्रश्नाची दुसरी बाजू म्हणजे पुरुष प्रश्न आहे याविषयी त्यांना काय वाटतं ? इत्यादी इत्यादी अनेक प्रश्न असतील मध्यम, उच्च मध्यम, निम्न मध्यम वर्गातले ग्रामीण आणि शहरी भागातले तसेच ज्येष्ठ, मध्यमवयीन आणि तरुण अशा सर्व स्तरांतले स्त्री , पुरुष आणि एल जी बी टी आय क्यू प्लस यांच्याकडून सविस्तर प्रश्नावली भरून घेणे हा एक फार मोठा महत्त्वाचा भाग हा प्रकल्प व्यापणार आहे. प्रश्नावली भरून झाल्यावर पुढील टप्प्यात प्रश्नावली मधील आशयाचे विश्लेषण अनुभवी कार्यकर्ते, स्त्री चळवळीचे अभ्यासक आणि तज्ञ मंडळीकडून केलं जाईल. ते वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध असेल.

विभाग एक : खुला लोकसंवाद - स्त्री चळवळ आणि मी

स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव आणि सामाजिक न्यायाच्या विचारांच्या बिया दोन्ही हातांनी जमतील तिथं आणि जमतील तशा टाकत रहाणं महत्त्वाचं आहे, असं साऱ्याजणीला वाटतं. कारण स्त्री चळवळीचा डोलारा या मूल्यांवर उभा आहे. सामान्य माणसांच्या शहाणपणावर सद्भावावर साऱ्याजणीचा विश्वास आहे. मात्र सद्य परिस्थितीत सामान्य माणसांच्या सद्भावनेवर जात धर्मांच्या अस्मितेच्या नावाखाली विद्वेषाचा गहिरा झाकोळ पसरला आहे. तो दूर करण्यासाठी मनामनांमध्ये समंजस संवादाची तातडीची गरज निर्माण झाली आहे म्हणून साऱ्याजणी खुला लोकसंवाद करू इच्छिते .स्त्री चळवळीच्या योगदानाविषयी माणसा माणसांमध्ये दिल से संवाद होणं महत्त्वाचं आहे . संवादाचं माध्यम त्यामानानं गौण आहे. स्त्री चळवळ आणि मी या संदर्भात खुला लोकसंवाद करण्यासाठी मुख्य माध्यम विविध स्स्तरांतील लोकांसाठी त्यांना आपले वाटतील असे प्रश्न असणारी प्रश्नावली हे आहे. ही प्रश्नावली विविध स्तरांवरील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम साऱ्याजणीच्या ऑफिसमधून किंवा साऱ्याजणीच्या गावोगावी असणाऱ्या प्रतिनिधींच्या आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहचवली जाईल. नंतर ही प्रश्नावली ते स्वतः त्याची उत्तर लिहून भरून पाठवतील किंवा कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत भरून देतील. छापील माध्यमातून, ऑडिओ क्लिप द्वारा किंवा गुगल फॉर्म च्या माध्यमातूनही या प्रश्नावली साऱ्याजणी पर्यंत पोहोचतील. प्रश्नावली मधून मिळालेल्या आशय आणि माहितीचं विश्लेषण तज्ञ मंडळी, अभ्यासक, स्त्री चळवळीतले अनुभवी कार्यकर्ते आदींच्या सहाय्याने केलं जाईल. अध्यासन प्रकल्प दोन हा त्या अर्थानं शास्त्रोक्त संशोधन प्रकल्प नाही त्यामुळे शास्त्रशुद्धपणे संशोधन पद्धतीशास्त्राचा काटेकोरपणे अवलंब यात केलेला नसेल. हे विश्लेषणात्मक लेख मिळून साऱ्याजणी मासिकाच्या मिसा online या द्विभाषिक (इंग्रजी अधिक मराठी) वर प्रकाशित केले जातील.

विभाग दोन: विविध क्षेत्रातलं स्त्री चळवळीचं योगदान

1975 ते 2025 या पन्नास वर्षात महिलांच्या संदर्भात सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, कायदे, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण ,विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शेती, पर्यावरण इत्यादी क्षेत्रात विशेषतः महाराष्ट्रात काय काय महत्त्वाच्या घटना घडामोडी झाल्या ? काय प्रकारची धोरणं नव्यानं आली आणि ती कशी राबवली गेली ? त्याचा सामान्य स्त्री, पुरुष आणि एल जी बी टी आय क्यू प्लस अशा सर्वांवर काय परिणाम झाला याचा सखोल आणि सम्यक वेध घेणारा व्यापक अभ्यास या विभागात होईल. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये असंख्य संस्था, संघटना, अभ्यासक आणि विषयतज्ञ गेली अनेक वर्ष विविध स्तरांवर काम आणि सखोल अभ्यास करत आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासाविषयी स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून बघणं त्यांच्या अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षाचा धांडोळा इथे अपेक्षित आहे. नव्यानं अभ्यास करणं अपेक्षित नाही. म्हणजे नेटवर्किंगचं मुख्य काम 1975 नंतरच्या स्त्री चळवळीच्या पन्नाशीत साऱ्याजणी करू इच्छिते. मिळून साऱ्याजणी मासिकाच्या ऑगस्ट अंकात विद्या बाळ अध्यासन प्रकल्प - 2 मध्ये सहभागी होण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. ८० -९० व्यक्तींनी उत्साहानं यात सहभागी होण्यासाठी नावं नोंदवली आहेत. अजूनही नव्यानं नावं नोंदवली जात आहेत. महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरचे तसंच भारताबाहेरच्या मंडळींचा यात समावेश आहे. सहभागी मंडळी विविध क्षेत्रातले अभ्यासक, उच्चशिक्षित तज्ञ आहेत, तसेच चळवळीतले कार्यकर्ते, नेते आहेत. नोकरदार व्यावसायिकांबरोबरच गृहिणींचे योगदानही यात असणार आहे. ज्ञाननिर्मितीच्या लोकशाहीकरणावर साऱ्याजणीचा विश्वास आहे. अनुभव आणि सिद्धांत यामध्ये द्वैतभाव नसून ते हातात हात घालून जातात असं साऱ्याजणी मानतं. या अभ्यासाचा भाग म्हणून वर उल्लेख केलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख सामाजिक संस्था, संघटना, विविध आंदोलनं, चळवळी यांची एक व्यापक सूचीही या निमित्तानं तयार केली जाईल. तसंच अनेक पुस्तकं ज्यामध्ये विविध क्षेत्रात स्त्री चळवळीच्या योगदानासंबंधात आशय आहे, स्त्रियांच्या कर्तबगारीची नोंद आहे अशा पुस्तकांची संदर्भसूचीही तयार केली जाईल. विभाग दोन मध्ये त्या त्या क्षेत्रात स्त्रियांच्या यशापयशाचा लेखाजोखा घेणारा आणि त्याची मीमांसा करणारा अभ्यास असेल. यासाठी त्या त्या विषयातल्या तज्ञांचं कार्यकारी मंडळ असेल प्रत्येक विषयासाठी एक समन्वयक असेल तो/ती त्या विभागाचे उपविभाग करून एक समिती स्थापन करेल त्यात अभ्यासक असतील. सर्व समन्वयकांचा समन्वय करण्यासाठी प्रमुख समन्वयक असेल. तसंच विविध विषयातल्या तज्ञांचं एक सल्लागार मंडळ असेल. विविध क्षेत्रात काम करणारे अभ्यासक आणि कार्यकर्तेही या विभागात असतील.

आत्ताच्या बाजारी, पैसा केंद्री युगात आर्थिक साहाय्य नसताना विद्या बाळ अध्यासन प्रकल्प - 2 राबवणं फार जिकिरीचं आहे आणि साऱ्याजणीचा जीव छोटा आहे याची आम्हाला नम्र जाणीव आहे. मात्र साऱ्याजणीच्या संस्थापक संपादक स्मृतीशेष विद्या बाळ म्हणत तसं साऱ्याजणीकडे आर्थिक बळ फार नाही मात्र साऱ्याजणीवर प्रेम करणाऱ्यांचं मोठं भांडवल आमच्या गाठीशी आहे. या संचिताच्या बळावर तुम्हा सर्वांच्या साथीनं हा प्रकल्प सुरू करण्याचं धाडस केलं आहे. ती, ते आणि तो यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी... मासिक नव्हे चळवळ ! या मासिकाच्या ब्रीद वाक्याशी इमान राखून हा प्रकल्प ही एक चळवळ आहे, हे लक्षात घेऊ या. आता हा प्रकल्प शिस्तशीरपणे पुढे नेत राहू या. ही स्मृतीशेष विद्या बाळ यांच्या तेजस्वी कार्याला आदरांजली असेल !

साधारणपणे हा सर्व अभ्यास विद्या बाळ स्मृती दिनी 30 जानेवारी 2025 पर्यंत लिहून पूर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे.त्यानंतर त्यावर फायनल हात फिरून 8 मार्च 2025 रोजी तो लोकांपर्यंत ऑनलाईन पोहोचावा असा प्रयत्न आपण सर्व मिळून करू या. या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य मिळाल्यास छापील माध्यमात ही हा अभ्यास प्रकाशित करण्याची इच्छा आहे. त्यासाठी आर्थिक निधी उभारण्यास मदत करावी असं आवाहन करत आहोत.

स्त्री चळवळ जिंदाबाद ! जिंदाबाद !!

आपली विश्वासू,

गीताली वि.मं.

संपादक, मिळून साऱ्याजणी

saryajani@gmail.com