वंचितांच्या शिक्षणाचे आव्हान पेलणारी ’प्रयोगभूमी’

०९ मार्च २०२३

या घटनेला वीसेक वर्षं झाली असतील. श्रीरामपूर येथील बी.एड्‍ कॉलेजमध्ये प्राध्यापक होतो, आणि त्यावेळच्या ’उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षण’ या पेपर क्रमांक एक मधील दुसरा शैक्षणिक समाजशास्त्राचा विभाग माझ्याकडे अध्यापनासाठी होता. त्यात ’वंचितांचे शिक्षण’ या अंतर्गत आदिवासींचे शिक्षण हा एक घटक होता. एके दिवशी मी तो शिकवला. त्यानंतर दुपारच्या सुट्टीत एक प्रशिक्षणार्थी माझ्या केबिनमध्ये आला आणि म्हणाला, “सर, एक विचारू का?” “विचार की”, मी म्हणालो. त्याने मला विचारलं, “सर, तुम्ही खरा आदिवासी पाहिला आहे का?” यावर मी सटपटलो. “नाही”, म्हणालो. मग, तो शांतपणे म्हणाला, “सर, मी आदिवासी भागातला. आदिवसीच आहे.” पुढे त्याने आदिवासींची माहिती सांगितल्यावर माझे पुस्तकी ज्ञान कुठल्या कुठे उडून गेले आणि मला आदिवासींच्या समस्या समक्ष जाऊन पाहण्याची इच्छा झाली. त्या विद्यार्थ्यानेही मला तिकडे घेऊन जाण्याचे कबूल केले, पण काही कारणाने ते राहून गेले.

मध्यंतरी बराच काळ लोटला. या काळात सह्याद्रीच्या कुशीत श्रमिक सहयोगची आदिवासींच्या शिक्षणासाठी काम करणार्‍या प्रयोगभूमीविषयी वाचले; पण सततच्या बदल्यांमुळे आणि वैयक्तिक समस्यांमुळे प्रत्यक्ष जाणे झाले नाही. पण एके दिवशी माझी ही इच्छा पूर्ण झाली.

दिवस आठवत नाही; पण महिना व साल चांगले आठवते. नोव्हेंबर २०१९. श्रमिक सहयोगशी संबंधित असणारे आमचे मित्र अरूण काकडे यांनी हा योग घडवून आणला. आमच्यासोबत अजून एक मित्र जोशीही यायला तयार झाले. आम्ही सर्व जोशींच्या गाडीतून सकाळी सात वाजताच कराडमधून बाहेर पडलो. काकडेंनी गाडीची डिकी ही केळी व भाज्यांनी भरून टाकली. यातूनच तिथं असणार्‍या मुलांच्याबद्दलचा त्यांचा जिव्हाळा दिसत होता. सगळा प्रवास कोयनामाईच्या काठाकाठानं होता. त्यामुळे, निसर्गसौंदर्याला तोटा नव्हता. दोन्ही बाजूला हिरवीगार शेतं, झाडांच्या सावलीतील काळसर रस्ता आणि त्यातून वाहणारी कोयनामाई. डोंगर पठारावर गुरं आणि गुराखी, काही झाडावर बसलेले आणि काही आकाशात विहार करणारे पक्षी, वाड्यावस्त्यांची डोंगरात दडलेली चिमुकली गावं- नजर हटत नव्हती, प्रवास किती झाला कळत नव्हतं. तांबडी माती दिसू लागली आणि कोकण जवळ आल्याची चाहूल लागली. गाडी घाटमाथ्यावर आली आणि चिपळूणचं खोरं डोळ्यात भरलं. कुंभार्ली घाट सुरू झाला आणि गाडी वळणं घेत घाट उतरू लागली. याच खोर्‍यात अलोरे, त्याच्या जवळच कोळकेवाडी आणि तिथेच प्रयोगभूमी असं ऐकलं होतं. कधी एकदा तिथे जातोय, असं झालं होतं. वळण घेत-घेत गाडीनं घाट उतरला आणि शिरगावात चिपळूणला जाणारा हायवे सोडून उजवीकडे वळली. अलोरे सोडून गाडी चढायला लागली. नि जरा वेळानं कोळकेवाडीचं धरण दिसलं. त्याच्यामागे मोठा जलाशय. त्याच्या काठाकाठानं पुढं गेल्यावर प्रयोगभूमीचा बोर्ड दिसला. त्यावरील बाणाच्या दिशेने गाडी डाव्या बाजूस वळली, आणि छोटासा पूल ओलांडून गाडी थेट प्रयोगभूमीत, माझ्या इच्छित स्थळी!

निम्मी कौलं, निम्मा पत्रा आणि मध्येच थोडासा स्लॅब घेऊन वरचा मजला बांधलेली ऐसपैस इमारत. तळमजल्यावर मोठं स्वयंपाकघर. मुलांना आणि मुलींना राहण्यासाठी स्वतंत्र दोन खोल्या. वरती एक मोठा हॉल, शेजारी ग्रंथालय आणि त्याला लागून पाहुण्यांसाठी स्वतंत्र खोली. इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी असे वर्ग मात्र कुठे दिसत नव्हते. तरी इथं दहावीपर्यंतची मुलं कशी? इथं शाळा कुठे आहे? हे प्रश्न मला पडलेच. पण याचं उत्तर मला शेवटी आपोआप मिळालं.

आम्ही आल्याची चाहूल लागताच येथील तीस-पस्तीस मुलांचा सर्वाथानं सांभाळ करणारे मंगेश गुरुजी आणि त्यांच्या पत्नी रेखाताई आले. नमस्कार करून त्यांनी आमचे स्वागत केले. आजूबाजूला मुलं गोळा झाली- आदिवासी, कातकरी आणि धनगर समाजातील. कणखर शरीरावर काळसर तजेला आणि फुललेले चेहरे. सगळ्या वातावरणात ’ताण’ कुठेच दिसत नव्हता. ना मुलं अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेली, ना मंगेश गुरुजींच्या चेहर्‍यावर अभ्यासक्रमाचं अन्‍ परीक्षेचं संकट आणि ना रेखाताईंना स्वयंपाकाची धास्ती. आम्ही तर हे सर्व पाहून तहान-भूक हरवूनच गेलो. अनौपचारिक गप्पांत एकमेकांच्या ओळखी झाल्या आणि आम्ही पाहुण्यांसाठी असणार्‍या खोलीत स्थिरावलो. पंधरा-वीस मिनिटं होताहेत, तेवढ्यात आम्हाला एक मुलगा नाष्टा घेण्यासाठी बोलवायला आला. आम्ही फ्रेश झालो आणि गेलो. मिसळ-पावचा नाष्टा आणि एकेक केळं. मनात विचार आला- हा प्रयोग इथं उभा राहिला नसता, तर या आदिवासी-कातकरी मुलांना मिसळ-पाव म्हणजे काय ते समजलं असतं काय? डॉ. प्रकाश आमटेंच्या ’प्रकाशवाटा’त आदिवासींचं खाद्य वाचलं होतं. त्या आदिवासींचे भाऊबंदच या भागात राहात होते.

नाष्टा आटोपल्यावर मंगेश गुरुजी आम्हाला परिसर दाखवू लागले. बरोबर मुलं होतीच. ’नीट बसा’, ’पाढे म्हणा’, ’स्पेलिंग पाठ करा’... असलं काही नाही. उलट, शाळेचा परिसर दाखवण्यात मुलंही सहभागी झाली. भाजीपाला पिकवताना त्यांनी अख्खी सूर्यमालाच प्रयोगभूमीत आणली होती. “या गोलातली मेथीची भाजी दिसते ना तो सूर्य, शेजारी पोकळ्याची भाजी तो म्हणजे गुरू, तो लाल माठ दिसतो तो म्हणजे शुक्र...” मुलं सांगत होती. नंतर त्यांनी आम्हाला गायीच्या गोठ्यात नेलं. तिथं गाय आणि तिचं वासरू होतं. मुलं म्हणाली, “आम्ही आमच्या गायीला चारा देतो, मग ती आम्हाला दूध देते.” पुस्तकाविना आम्हाला भूगोल समजत होता, शेती समजत होती. पशूपालन समजत होतं. मग मुलांनी आम्हाला त्याचं वीजकेंद्र दाखवलं. ग्रॅव्हिटीनं पाणी येत होतं, त्यावर वीज तयार करणारं एक छोटंसं यंत्र बसवलं होतं, त्याद्वारे वीज तयार केली जात होती. तिथं काही यंत्रसामग्रीही होती. मुलांनी ती हाताळली आणि आम्हाला वीज कशी तयार होते, ते सांगितलं. त्या वीजेवरच येथील बल्ब लागतात, हेही सांगितलं. आम्हाला आता जलविद्युत समजलं होतं. मुलांनी हे सगळं स्वत:च्या मेहनतीनं केलं होतं. मला महात्मा गांधी आठवले. विनोबा आठवले. रवींद्रनाथ आठवले आणि रूसोही आठवले.

मुलांची अंघोळीची वेळ झाली होती. पायवाटेनं मुलांनी आम्हाला नदीकडं नेलं. ती वाशिष्ठी नदी. कोयनेच्या चौथ्या टप्प्यातील पाणी या नदीत सोडलं जातं. मुलांनी कपडे काढले. धडाधड पाण्यात उड्या मारल्या. मलाही कपडे काढावे वाटले, पण मी शहरातून आलेला आणि औपचारिक शिक्षणाातून रिटायर्ड झालेला. पाण्यात उतरून पोहणे कसे शिकणार? काठावर उभा राहूनच पाहात होतो आणि आपण आयुष्यभर फक्त पुस्तकी ज्ञान दिल्याची बोचही मनाला लागत होती. शिकण्यात, खेळण्यात, काम करण्यात, स्वयंपाकात आणि अगदी पोहण्यातही मुलंमुली एकत्र! शिक्षणाचं एक अनोखं जग अनुभवत होतो.

आम्ही परत आलो, तोवर स्वयंपाक झाला होता. तो करण्यात मुलांचा सहभाग होता. पीठ किती, पाणी किती, भाकरी थापायची कशी, भाजायची कशी हे त्यांना कोणी शिकवलं नव्हतं. पण ते शिकले होतेया. मुलांच्या बरोबर पंगतीत जेवायला बसलो. खमंग आमटी, भाजी अन्‍ भाकरीचा आस्वाद घेतला. तिथल्या नियमाप्रमाणे तिथली राख घेऊन स्वत:ची ताटं स्वत: धुतली. मुलंमुलीसुद्धा आपापलं जेवण आटोपून मोठ्या वर्गात आले. मला तो वर्ग पाहायची उत्सुकता होतीच. मंगेश गुरुजी मला वर्गात घेऊन जायला निघाले. जाताना एक पाटी दिसली- “आपणाला जे काय शिकवायचं आहे, ते शिकण्याची आपणाला इथे मुभा आहे. तुम्ही कथा सांगू शकता, गाणं म्हणून दाखवा अगर खेळ घ्या.” सगळं ओपन! ठरावीक वेळापत्रक नाही. मुलंही स्वतंत्र आणि शिक्षकही स्वतंत्र! मंगेश गुरुजी म्हणाले, “इथं मोठे मोठे लोक येतात, आपले अनुभव सांगतात, गोष्टी सांगतात आणि मुलांच्याबरोबर गाणीही म्हणतात.”

आम्ही वर्गात गेलो. मुलंमुली भिंतीलगत आपापल्या ठिकाणी बसली होती. तिथं त्यांची दप्तरं होती. भिंतीला काळ्या रंगाचा पट्टा दिलेला होता. खडूचा बॉक्स ठेवला होता. मुलं वाचत होती. फळ्यावर गणितं सोडवत होती. काही शंका असल्यास मंगेश गुरुजींना विचारत होती. मंगेश गुरुजी त्यांचे शंकानिरसन करत होते. हा स्वाध्याय, हे शिकणं. शिकवणं कुठं दिसतच नव्हतं. हाच रचनावाद. “अहो, पण यांच्या परीक्षेचं काय? याला मान्यता आहे काय?” माझा मंगेश गुरुजींना ’शिक्षकी’ प्रश्न. मग, मला त्यांनी या शाळेबद्दल सांगितलं की, “केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था (National Institute of open schooling - NIOS) अंतर्गत मुक्त मूलभूत शिक्षण (Open Basic Education- OBE) म्हणून या शाळेस मान्यत आहे. वर्षाअखेरी ही संस्था त्या त्या इयत्तेची –ज्याला ते पातळी (Level)- म्हणतात, त्याची प्रश्नपत्रिका पाठवतात. मुलं ती सोडवतात व त्या उत्तरपत्रिका आम्ही त्यांच्या पुण्यातील केंद्राकडे पाठवून देतो. तिथे त्या तपासल्या जातात. त्यानुसार मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश दिला जातो. मुलं नापास होत नाहीत. आठवीपर्यंतचं शिक्षण त्यांना या शाळेत मिळतं. पुढं नववीसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कोणत्याही शाळेत प्रवेश मिळतो. तिथे ती दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. अशी आमची मुलं दहावी पास होऊन पुण्यामुंबईला जाऊन पुढचं शिक्षणही घेतात.”

गुरुजींनी नंतर या मुलांची जी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली ती अतिशय हृदयद्रावक होती. कोणाला आई नव्हती, कोणाला वडील नव्हते. तर कोणाला दोघेही! ज्यांचे आईवडील होते, ते मोलमजुरी करतात आणि रात्री दारु पिऊन झोपतात. आजारी पडले, तर औषधाविना मरतात. मग मुले अनाथ. अशा मुलांचे आश्रयस्थान म्हणजे प्रयोगभूमी!

मी शिक्षणशास्त्राचा विद्यार्थी. तिथल्या परिसराचं, शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं आणि तिथल्या शिक्षणप्रयोगाचं निरीक्षण करून थोडं चिंतन केलं, तेव्हा औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षणातील फरक ठळकपणे माझ्या लक्षात आला. या मुलांना सान्निध्य आहे ते जंगलाचं. झाडाझुडपांचं. पशूपक्ष्यांचं आणि नदीनाल्यांचं. जे फक्त देत राहतात, मागत काहीच नाहीत. महत्त्वाचं म्हणजे इथला निसर्ग त्यांना भरपूर ऑक्सिजन देतो. प्रदूषण नावालासुद्धा नाही. त्यामुळे येथील मुलं कितीही काम केलं तरी थकत नाहीत. ती काटक आहेत. डोंगर सहज चढतात, उतरतात. पशूपक्षी त्यांचे सोबती. ग. दि. माडगुळकरांची ’बिनभिंतीची उघडी शाळा’च जणू. त्यामुळे त्यांची दोस्ती ही झाडं, वेली, आणि पशूपाखरांशी. शिक्षणाचा ताण नाही; पण जगण्याचं ज्ञान आहे. वागण्याबोलण्यात निर्मळता, आडपडदा कुठेच नाही. सगळेच एकमेकांचे मित्र. कोणाची कोणाशी स्पर्धा नाही. कपड्यालत्त्याची चैन नाही, की नटणंमुरडणं नाही. सगळं अगदी साधं.

मला आमचं औपचारिक शिक्षण आठवलं. परीक्षा, अभ्यास, स्पर्धा त्याचा विद्यार्थ्यांवर कमालीचा ताण. यातून मिळणार काय तर नोकरी आणि नोकरीतून मिळणार काय पैसा. मुलं पैशासाठी जगतात आणि जगण्याचं मात्र राहून जातं. शास्त्रज्ञांनी सह्याद्रीच्या ज्या खोर्‍यात विज प्रकल्पाचा चौथा टप्पा उभारला, त्याच खोर्‍यात शिक्षणाच्या प्रयोगभूमीचा हा महत्त्वाचा टप्पा. चौथ्या टप्प्यात वीजनिर्मिती होते आणि अंधार हटवला जातो. आणि प्रयोगभूमीत ज्ञानाचा प्रकाश पडतो आणि अज्ञानाचा अंधार हटवला जातो. एक विलक्षण योगायोग!

आम्ही सगळे जण या वातावरणात भारावून गेलो होतो. इथं कुणालाही आवडीचं काही सांगायची मुभा होतीच. मीही मग एक गोष्ट सांगितली. कृतीतून इंग्रजीची क्रियापदं सांगितली. त्यावरून वाक्यं तयार केली. मुलं खूश झाली. रात्रीच्या जेवणानंतर आम्ही वय विसरून लहानपणीचे झिम्मा, फुगडी, पिंगा यांसारखे खेळ खेळलो. सगळ्यात शेवटी सर्व मुलांनी ढोलक्यावर आदिवासी नृत्य केलं. ते बघताना तिथून हलूच नये असं वाटत होतं.

मला उत्तर मिळालं होतं. ती शाळा नव्हती, ती शैक्षणिक प्रयोगांची भूमी होती. सहशिक्षणासहित सहजीवनाचं केंद्रसुद्धा. म्हणून अनेकांना ही भूमी आकर्षित करते. मेधा पाटकर, हेरंब कुलकर्णी, लीला पाटील, निखिल वागळे, मिलिंद बोकील, कवी सौमित्र, नीरजा या प्रसिद्ध व्यक्ती इथं येऊन गेले आहेत. गेली तेवीस वर्षं अनेक आव्हानांना तोंड देत हा प्रयोग अव्याहतपणे चालू आहे. संस्थापक राजन इंदुलकर आणि त्यांचे सहकारी यासाठी अपार कष्ट घेत आहेत. सरकारी मदत नाही; पण अनेक देणगीदारांचे हात या प्रयोगाला लाभत आहेत. आजतागायत हा ओघ सुरू आहे. तो तसाच राहावा, बहरावा आणि त्यास मधुर फळं यावीत, ही मनापासून इच्छा!

(आर्थिक साहाय्यासाठी संपर्क : राजन इंदुलकर : ९४२३०४७६२०/८६००८९०१६२)

राजाराम कुंभार, कराड.