तुम्हांला मूल नको आहे म्हणजे तुम्हांला करिअर हवंच आहे असं नाही

२६ वर्षांची होईपर्यंत ‘आयुष्यात काहीही करायचं नाही’, असा विचार मी कधीही केला नव्हता. माझं वय लहान असल्यापासून आपल्याला मूल नको आहे हे मला माहीत होतं. त्यामुळे मुलांच्या ऐवजी मी एमएची पदवी आणि माझ्या करिअरमागे धावत राहिले. माझ्यासाठी केवळ तेवढेच पर्याय आहेत असं मला वाटत होतं, मात्र एका टप्प्यावर मला ते जगणं फार आवडू लागलं - पोटापुरता पैसा कमवायचा, त्यासाठी काम करायचं, माझ्या जवळच्या माणसांसोबत वेळ घालवायचा आणि अधूनमधून सुटी घेऊन फिरायला जायचं. मला माझं हे जगणं आवडतंय आणि बहुधा पहिल्यांदाच, मला यापेक्षा वेगळं असं दुसरं कुठलंही मोठं उद्दिष्ट साध्य करायचं नाही.

पण मला अर्थातच अपराधीही वाटतं. का? तर माझ्या या वाटण्यातून आठवड्यातले ६० तास बारमध्ये काम करून एमए पूर्ण करणाऱ्या माझ्यातल्याच ध्येयवेड्या किशोरवयीन मुलीला मी नाराज करत नव्हते तर हॅशटॅग हसलिंग, हॅशटॅग गर्लबॉसेस असं म्हणणारी, खोटा स्त्रीवाद कुरवाळणारी माझी एक संपूर्ण पिढी माझ्या वागण्यावर नाराज झाली असती. मानवी मेंदूला आठवणारही नाही इतक्या काळापासून स्त्रियांना स्वतःच्या इच्छा मारून चूल आणि मूल करत बसायचं एवढंच शिकवलं गेलंय. महायुद्धानंतर आलेल्या स्त्रीवादाच्या दुसऱ्या लाटेनं यातले काही गैरसमज दूर लोटले. स्त्रिया घराबाहेर पडून कामं करू शकतात, घरात मुलंही जन्माला घालू शकतात. त्यांना हवं ते सगळं त्या मिळवू शकतात. पण मागील काही वर्षांपासून आपण एका वेगळाच समजुतीत अडकलोय. फक्त करिअरच्याच मागे धावायचं, चांगले डिझायनर कपडे घालून मिरवायचं हेच आपल्या डोक्यात येतंय.

हे बदल काही स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचे आणि सकारात्मक होते हे खरं आहे. पण चूल-मूल किंवा नोकरी यातलं काहीच करायचं नाही हा विचार कदाचित अधिक मूलगामी असेल. सद्यस्थितीत आपण खास असं काही करिअर करत नसू किंवा मूल जन्माला घालून कुटुंबाकडेही लक्ष देत नसू, तर आपणच स्वतःला कमी समजू लागतो. पण या दोघातलं निदान काहीतरी एक मिळवलंच पाहिजे (आणि अलीकडे तर दोन्ही) असा दबाव आपल्यावर टाकला जातोय. ऑफिसचं काम उरकून घरी येणं यात समाधानी असायला आपल्याला जणू परवानगीच नाही की काय असं वाटू लागलंय. 'काम' म्हणजे आपल्या मोकळ्या वेळेचा आनंद घेण्यासाठी केलेली गोष्ट असू शकते. 'काम' म्हणजे आयुष्यभराचं करिअर असलंच पाहिजे असं नाही. मुलीनं 'बॉस' असायलाच हवं असं नाही. 'बायकांना सगळं जमलं पाहिजे' असा आग्रह कशासाठी? त्यांना थोडंच जमलं आणि त्या त्यातच आनंदी असतील तर काय हरकत आहे?

स्त्रीवाद आणि भांडवलशाहीची सरमिसळ झालेल्या या समाजाचा मला एकटीलाच त्रास होऊ लागलाय असं नाही. आपण सगळीकडे पहिल्या नंबरला आणि परिपूर्ण असलं पाहिजे या अनिर्बंध इच्छेविषयी लेखिका जिया टोलेंटिनो हिने 'ट्रिक मिरर' या आपल्या पुस्तकातील एका निबंधात लिहिलं आहे. ती लिहिते - ‘बाजारपेठेची माझ्याकडून काय मागणी आहे आणि बाजारपेठ त्याबदल्यात मला काय देते याचा जी गांभीर्यानं विचार करते तिलाच आज आदर्श स्त्री मानलं जातं.' स्त्रियांचे व्यायाम करण्याचे क्लासेस आणि ऑफिस या संदर्भानं ती या सगळ्याची चर्चा करते. 'आपण सतत अजून चांगलं झालं पाहिजे' हे आपल्या मनावर कसं बिंबवलं जातं याविषयी ती बोलते. स्वतःची काळजी घेणं ही गोष्टसुद्धा 'आपण त्यात चांगलं परफॉर्म करतोय किंवा कमी पडतोय' अशा प्रकारे आपल्यावर थोपवली जाते. आपल्याला 'फसवलं' गेलंय, 'परफेक्ट, सुयोग्य जीवनशैली'च्या जाळ्यात अडकून जे जीवन खरंच जगायला हवं ते आपण हरवून बसतोय हे बहुधा आता आपल्या लक्षात येतंय. . ‘मी मूल जन्माला न घातल्याने निदान माझ्या नोकरीमधे तरी मी काहीतरी मोठं मिळवावं असं मला वाटत होतं.’ ३० वर्षांची सियोभन सांगत होती. ‘नेहमी प्रॉडक्टिव्ह असावं, आपला प्रॉडक्टिव्हनेस सतत जगासमोर यावा अशी अपेक्षा समाज आपल्याकडून ठेवत असतो' असं मला वाटतं. आणि तुम्ही नवीन जीव निर्माण करत नसाल तर निदान बाजारपेठेतल्या गोष्टींचा उपभोग घेण्याइतपत तरी स्वतःला लायक करावं अशी समाजाची अपेक्षा असते.’ सियोभन पुढे म्हणाली. हा एक प्रकारचा लैंगिक भेदभावच आहे असं तिला वाटतं. ‘एखाद्या अविवाहित, मुलं नसलेल्या पुरूषाला समाजात बॅचलरचा दर्जा सहज मिळतो. पण एक अविवाहीहित, मुलं नसलेली स्त्री असेल तर तिने ‘त्याग केलेला’ असतो किंवा ती आतून फार एकटी असते किंवा मग ती वाया गेलेली बाई असते.’

२८ वर्षांच्या डॅनियेललाही असंच वाटतं. ‘मला करिअरची खास आवड नाही. माझ्यासमोर कुठलीही ध्येयं नसतील तर माझ्यात काही खोट आहे का किंवा मी फारच आळशी आहे का असले विचार माझ्या मनात येतात.’ ती म्हणते. ‘मी करिअरच्या मागे धावणारी मुलगी नाही हे सत्य मी अलिकडेच मान्य करून टाकलं आहे. ऑफिसमधून बाहेर आल्यावर निवांत राहण्यासाठी पैसे पुरवेल आणि ऑफिसमध्येच संपेल अशी एक नोकरी मला हवी आहे. बस!’

आधुनिक काळातल्या स्त्रियांनी आपला 'डाउनटाइम' काहीतरी चांगल्या कामासाठी किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी घालवावा अशी एक अपेक्षा असते. ‘पण एक बाई म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडचा मोकळा वेळसुद्धा मी स्व-विकासासाठी वापरावा. काळजी घालवण्यासाठी थोडं मेडिटेशन करावं, माझ्या मानसिक आरोग्यासाठी डायरी वगैरे लिहावी.’ असं डॅनियेल सांगते. तिच्या या म्हणण्याला मॅडी या २४ वर्षाच्या तरूणीनंही दुजोरा दिलाय. ‘छंद जोपासायचा प्रश्न येतो तेव्हा पुरूषांना स्त्रियांपेक्षा जास्त मोकळीक दिली जाते. छंदातून माझ्या मनाला, शरीराला आराम मिळतो. पण त्याकडे अनेकदा 'वेळ वाया घालवणं' म्हणून पाहिलं जातं. पण एक पुरुष ते करताना 'प्रॉडक्टिव्ह' असतो. निवांतपणे बसलेलं असताना माझ्या मनात अपराधीपणाची भावना मनात दाटून येते. या वेळेचा आनंद घेण्याऐवजी या वेळात काम केलं तर मी किती पैसे कमवू शकले असते याचाच मी विचार करत राहते.’

'सर्वोत्तमपणा'च्या जाचातून मुक्त होण्यासाठी कुणाची मदत घेणं कॉमन सेन्सच्या विरोधी वाटलं तरी मी यासंदर्भात स्त्री सक्षमीकरणाच्या कोच हुएना सू हिच्याकडे वळते. ती म्हणते, ‘आपण सगळ्यांची काळजी घेणारी असलं पाहिजे असं सतत आपल्या मनावर बिंबवलं गेलं आहे. आपल्याकडून तशीच अपेक्षा केली जाते.’ त्यांच्या पुरूष सहकाऱ्यांप्रमाणे स्त्रियांनीही आपल्या करिअरमधे पुढे जावं असा आग्रह असतो. पण त्याचबरोबर तिने नवऱ्याकडे, मुलांकडे आणि घरातल्या म्हाताऱ्या आई-वडिलांकडे जराही दुर्लक्ष केलेलं चालत नाही. आपण सगळं काही मिळवू शकतो आणि आपण मिळवलंच पाहिजे अशा समजुतीत आपण वाढत असतो. तसं झालं नाही तर तो आपल्याला आपला पराभव वाटतो.’

स्त्रियांना नेहमीच चुकीच्या गोष्टींमागे पळवलं जातं असं सू ला वाटतं. ‘स्त्रिया नेहमी परिपूर्णतेच्या, प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम असण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या का असतात याच्या खोलात गेलं तर असं लक्षात येतं की आपली किंमत दाखवून देण्याच्या गरजेतून हे होतं. आपण आत्ता जसे आहोत तसे चांगले नाही आहोत असं स्त्रियांना वाटत असतं.’ सू म्हणते.

स्त्रियांसमोरचा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आपल्याला किंमत आहे हे मान्य करणं. आपल्याला जगण्याचा, आनंदी राहण्याचा अधिकार आहे - आपण 'काहीही करत नसलो' तरी. हे आपण समजून घेतलं पाहिजे. सू देखील हेच सांगते. 'सर्वोत्तमपणाच्या जाचातून मुक्त व्हायचं असेल तर 'आपल्याला किंमत आहे' यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्यासाठी 'आनंद' आणि 'यश' म्हणजे नक्की काय आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. ‘समाजानं किंवा इतर कुणा माणसानं आपल्या आयुष्याचा ताबा घेण्याऐवजी यश म्हणजे काय याची आपली व्याख्या आपल्यालाच करता यायला हवी.’

आपण सगळ्यांची काळजी करावी अशी आपल्याकडून अपेक्षा ठेवली जाते. त्यामुळेच ही भूमिका आपण पार पाडत नसू तेव्हा आपण काहीही कामाचे नाही अशी भावना मनात येते. जर काळजी वाहणाऱ्या नसाल तर काहीतरी मोठं ध्येय गाठून समाजासाठी योगदान द्यावं अशी आपल्याकडून अपेक्षा असते. हे सगळं आपल्याला स्वतःसाठी वेळ देण्यापासून थांबवतं. 'आपल्याला मनातून काय करावंसं वाटतंय' याऐवजी 'आपण काय करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतंय' याचा विचार केला जातो. 'निव्वळ अस्तित्वात असण्या'बद्दल जो अपराधभाव वाटतो तो कमी होण्यासाठी नेमकं स्पष्ट उत्तर देता येणार नाही. पण आपल्या स्वतःसाठी वेळ काढून निवांत हवं ते करायचं याने चांगली सुरुवात होऊ शकेल. ‘आपल्याला करिअर, कुटुंब हवंय किंवा नकोय हा पुर्णतः आपला निर्णय आहे. आपल्याला सगळ्यात जास्त आनंद आणि समाधान कशातून मिळतं हे निवडायचा अधिकार फक्त आपल्यालाच आहे.' सू म्हणते.

मॅरिएन एलोइस

व्हाइस या संकेतस्थळावर १८ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रकाशित झालेल्या रोचक लेखाचा रेणुका कल्पना यांनी अनुवाद केला आहे.

(Image credit : Designed by Freepik)