विवेकाच्या खुनाची मूक संमती
प्रा. गुलाब वाघमोडे यांच्या या लेखात महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारपरंपरेच्या पार्श्वभूमीवर वाढती अंधश्रद्धा, बुवाबाजी, व्यक्तिपूजा आणि विवेकवादावर होत असलेले हल्ले यांचा परखड वेध घेतला आहे. अशोक खरात प्रकरणाच्या निमित्ताने लेखक समाज, राजकारण आणि व्यवस्थेच्या भूमिकेवर कठोर प्रश्न उपस्थित करतात. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा आधार घेत ते सांगतात की अन्यायाविरुद्ध गप्प राहणे म्हणजे विवेकाच्या खुनाला दिलेली मूक संमती होय.
महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण ही संत तुकाराम, म. फुले,राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब यांच्या पुरोगामी विचारातून झाली आहे. डॉ. आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान केवळ कायदा नसून तो मानवी समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची शिकवण देणारा दस्तऐवज आहे. या संविधानाने जात, धर्म आणि लिंगाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा व समानतेचा अधिकार बहाल केला. महाराष्ट्राने नेहमीच अनिष्ट रूढी-परंपराविरुद्ध आवाज उठवत देशाला सामाजिक सुधारणेची व विवेकवादाची दिशा दाखविली आहे.
असे असतानाही समाजात फोफावलेली भोंदूगिरी आणि अंध:श्रद्धा ही गंभीर चिंतेची बाब ठरत आहे. श्रद्धेच्या नावाखाली चालणाऱ्या या बाजारामुळे सामान्य जनतेची विशेषतः महिलांची मोठी फसवणूक व शारीरिक मानसिक शोषण होऊ लागले आहे.
नुकतेच अशोक खरात या विकृत बाबाचे प्रकरण उघड झाले आहे. आसाराम बापू, रामरहीम अशा अनेक आणि आता खरात सारख्या प्रकरणांपर्यंत, 'दैवी' मुखवटा घालून चालणारे लैंगिक शोषण हे केवळ गुन्हेगारी कृत्य नाही, तर ते समाजाच्या नैतिक अध:पतनाचे लक्षण आहे. याची कारणे काय आहेत तर, श्रद्धेचे बाजारीकरण आणि 'दैवी' गुलामगिरी तसेच भारतीय समाजात चिकित्सक वृत्तीचा अभाव असल्यामुळे सामान्य माणूस संकटात सापडला की तर्काऐवजी चमत्काराकडे धावतो. जेव्हा घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून अशा प्रकरणांत केवळ तात्पुरती मलमपट्टी किंवा राजकीय सोयीची भूमिका घेतली जाते, तेव्हा सामान्यांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. ही गुलामगिरी केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आहे. बाबांच्या पायावर डोके टेकवणारा समाज प्रत्यक्षात स्वतःचे विचारस्वातंत्र्य गहाण ठेवत असतो. आजचा तरुण सोशल मिडियाच्या संस्कृतीत आणि चंगळवादामध्ये अडकला आहे. मूल्यशिक्षण केवळ पुस्तकात राहिले आहे. लोभ आणि मोहाच्या मागे लागलेला तरुण 'यश' म्हणजे फक्त पैसा आणि प्रसिद्धी समजू लागला आहे.
चारित्र्य संवर्धनापेक्षा 'ब्रँडेड' वस्तूंकडे कल वाढल्यामुळे माणुसकी आणि संवेदना हरवत चालल्या आहेत. भ्रष्ट राजकारण्यांना अशा भोंदू बाबांचे मोठे पाठबळ मिळते, कारण या बाबांकडे एक मोठी 'वोट बँक' असते. या बदल्यात राजकारणी या बाबांना कायद्याच्या कचाट्यातून वाचवतात. हे चक्र जोपर्यंत तुटत नाही, तोपर्यंत सामान्यांचे शोषण थांबणार नाही.
या अंध:कारमय परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग केवळ महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातच आहे. समाजासाठी केवळ जुन्या आठवणी काढून समाज बदलणार नाही. धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाविरुद्ध उघडपणे बोलण्याचे धाडस निर्माण झाले पाहिजे. महिला आयोगासारख्या संस्थांनी राजकारण बाजूला ठेवून पिडितांना तातडीने न्याय मिळवून दिला पाहिजे. बुवाबाजी विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे.
लोभ, मोह आणि मत्सरापेक्षा 'बंधुभाव' या मूल्याची जोपासना केली पाहिजे. माणूस जेव्हा स्वतःच्या बुद्धीचा वापर थांबवतो, तेव्हाच गुलामगिरीचा जन्म होतो. त्यातुन व्यक्तिपूजेला सुरुवात होते. जेव्हा एखादा समाज एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला देवाचा दर्जा देतो आणि चुकीच्या कामाचेही समर्थन करू लागतो, तेव्हा तर्कशास्त्र आणि विवेक बाजूला सरला जातो. विज्ञानात प्रगती करूनही परंपरेच्या नावाखाली अमानवीय प्रथा आपण सतत जपत असतो. "आमच्याकडे असेच चालत आले आहे" असे म्हणून जेव्हा एखाद्या स्त्रीवर किंवा दुर्बलावर अन्याय केला जातो, तेव्हा परंपरा विवेकापेक्षा मोठी ठरविली जाते.
विचारांचा मुकाबला विचारांनी करता येत नाही, तेव्हा रक्ताचा सडा सांडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. अशा घटना घडतात तेव्हा 'मला काय त्याचे?' ही वृत्ती जेव्हा बळावते, तेव्हा समाजाचा सामूहिक विवेक मरतो. अन्यायाविरुद्ध आवाज न उठवणे ही विवेकाच्या खुनाची मूक संमती असते.
जगात अनेक क्रांत्या झाल्या. त्या सर्व क्रांत्या रक्ताने न्हाऊन निघालेल्या आहेत. बुद्धाने हा रक्तपात थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना संन्यास घ्यावा लागला.पण बुद्ध थांबले नाहीत. त्यांनी जगाला माणूस म्हणून माणसाच्या जगण्याची जी संस्कृती आहे, त्याला विकसित करण्याची दृष्टी दिली. बुद्धाने सांगितलेल्या मार्गाने समाज जगला असता तर जगातल्या सर्व लढाया थांबल्या असत्या.
प्रसिद्ध कवी आणि गझलकार सुरेश भट म्हणतात, " यावेळी तू आलास आणि म्हणालास, एकमेकांवर प्रेम करा!". त्यांनी तुला सुळावर खिळले. मग शतकांचा अंधार ओलांडून पुन्हा आलास सुर्यकिरणातून आणि म्हणालास, "सबको सन्मती दे भगवान!". त्यांनी तुझ्यावर गोळ्या झाडल्या. "एकमेकांवर प्रेम करा" म्हणणाऱ्या येशूला क्रुसावर चढवले गेले आणि सबको सन्मती दे भगवान" म्हणणाऱ्या गांधीजींच्या छातीवर गोळ्या झाडल्या गेल्या. हा केवळ दोन व्यक्तींचा अंत नव्हता. तर तो मानवी क्रुरतेचा पराकोटीचा कळस होता.
आज आपण 21 व्या शतकात आहोत. जागतिकीकरण, खाजगीकरण, संगणक यामुळे जग जवळ आले. पण आपली मानसिकता मात्र अजूनही त्याच हिंसेने अंधारात चाचपडत आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, ज्येष्ठ संशोधक कलबुर्गी यांची झालेली निर्घृण हत्या. काय सांगून जाते? डॉ. दाभोळकर एवढंच म्हणत होते की, "माणसाने विवेकाने वागावे." चमत्काराच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवा आणि विज्ञानाची कास धरा. त्यांनी कोणाचे नुकसान केले नाही, पण अंध:श्रद्धेचा व्यापार करणाऱ्याला त्यांचा मोठा अडथळा ठरला.म्हणून एका सकाळी त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला गेला.
ही व्यवस्था तशीच राहावी आणि तो बदलण्याचा प्रयत्न कोणी करू नये ही मानसिकता जेव्हा समोर येते तेव्हा अशोक खरातसारख्या असंख्य बुवा-बाबांचा जन्म होतो. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला माणूस सत्तेच्या आणि पैशाच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा त्यामागे अख्खी व्यवस्था असते. खरातासारखा एक कोंबडीचोर अचानक कोटयावधी संपत्तीचा मालक कसा बनतो? याला कारणीभूत राजकीय आणि प्रशासकीय वर्ग आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सत्ताधारी अशा व्यक्तींचा वापर करतात. त्यात ते पडद्याआडून सहभागी असतात. जमिनींचे व्यवहार करताना अशा लोकांची मदत घेतली जाते. त्या बदल्यात त्यांच्या काळ्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पोलिसांकडून त्यांना अभय मिळते. हप्तेखोरी आणि भ्रष्ट पोलीस अधिकारी अशा लोकांवर कारवाई करत नाहीत, त्यामुळे त्यांचे धाडस वाढत जाते आणि हे बाबा किंवा महाराज लोकांच्या भीतीचा आणि श्रद्धेचा फायदा घेतात. त्यातून हे भयावह वास्तव समोर येते. अशोक खरातला शिक्षा होईलही म्हणून ही कीड संपणार आहे का? राज्यकर्ते सुधारणार आहेत का? जोपर्यंत सामान्य माणूस जागरूक होत नाही तोपर्यंत ही व्यवस्था बदलणार नाही. "तुका म्हणे चुकला धर्म, केला अवघाची अधर्म." हे चिंतनीय आहे.
अत्यंत कळकळीचं आपुलकीचं आवाहन... ऑगस्ट 1989 मध्ये मिळून साऱ्याजणी मासिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. ऑगस्ट 2026 मध्ये या मासिकाला सदतीस वर्षं पूर्ण होऊन मासिक अडतिसाव्या वर्षात पदार्पण करत आहे ही बाब आपल्या सर्वांसाठी खूप आनंद आणि अभिमानाची आहे.या वाटचालीचे आपण साक्षीदार आहात.ही वाटचाल सोपी नव्हती. विशेषतः मासिकाच्या संस्थापक संपादक विद्या बाळ यांच्या निधनानंतर आलेला कोविड काळ अग्निपरीक्षेचा होता. त्यातून मासिक तावून सुलाखून बाहेर पडण्याचं श्रेय आपण सर्वांनी मिळून एक दिलानं केलेल्या प्रयत्नांना आहे. त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार!दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईशी दोन हात करत खर्चाची तोंड मिळवणी करताना अक्षरश: दमछाक होते आहे.अशावेळी आपल्या सारख्या हक्काच्या मित्रमंडळीकडे आर्थिक सहयोगाचं आवाहन करत आहोत.मासिकाची तूट भरून काढण्यासाठी सढळ हातानं मदत करा ही अत्यंत कळकळीची विनंती!
सहयोग धनादेशाने पाठवायचा असल्यास 'निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट'च्या नावे पाठवावा किंवा खालील कोणत्याही खात्यात online पाठवू शकता. A/C Name : Niramaya Public CharitableTrust युनियन बँक, कर्वे रोड, पुणे Saving Ac. No. - 370002010908793 IFSC - UBIN0537004.
बँक ऑफ महाराष्ट्र, कर्वे रोड, पुणे SavingAc. No. - 60029908172 IFSC - MAHB0000116.
सहयोग पाठवल्यानंतर ८००७८१४००५ या क्रमांकावर नाव, पत्ता, सहयोगाची रक्कम कोणत्या बँकेत भरली याची SMS/WhatsApp करून माहिती द्यावी, म्हणजे खात्यात जमा झालेला सहयोग कोणाचा आहे, हे आम्हाला कळू शकेल. -संपादक, मिळून साऱ्याजणी