कुटुंब व्यवस्थेतील समतेचे तत्व अन् महत्त्व
समाजात नातेसंबंधांबाबत अनेक परंपरा, अपेक्षा आणि गृहितकं खोलवर रुजलेली आहेत. विशेषतः स्त्री-पुरुष नात्यांमध्ये ‘स्वीकार’, ‘समजून घेणे’ आणि ‘जबाबदारी’ या संकल्पनांचा अर्थ अनेकदा एकतर्फीपणे ठरवला जातो. प्रस्तुत लेख एका साध्या भेटीतून उलगडणाऱ्या संवादाच्या माध्यमातून या दुहेरी मापदंडांवर प्रकाश टाकतो. कुटुंब, विवाह आणि समतेच्या नात्यांविषयी नव्याने विचार करायला भाग पाडणारा हा अनुभव, वाचकाला स्वतःच्या मूल्यव्यवस्थेकडे प्रामाणिकपणे पाहण्याचं निमंत्रण देतो.
बऱ्याच वर्षांनी एक विद्यार्थी मला भेटला... नुकतंच त्याचे हात पिवळे झाले होते. मी विचारलं, माझ्या आदर्श विद्यार्थ्यासारख वागतोस ना बायकोसोबत, की आपल्याला पिढ्यानपिढ्या बबून्स कडून चालत आलेल्या "अल्फा मेल" सारखं वागतोयस... तो जोरात हसला. थोड वेळ शिक्षणप्रक्रिया, देशविदेश ,तत्वज्ञानसारख्या विषयावर गप्पा मारल्या आणि नंतर ततत्वज्ञानात्मक शैलीत कुटुंब या विषयावर त्याने त्याच्या विचाराचा पैलू मांडायला सुरुवात केली. मी वर्गात माझ्या विद्यार्थ्यांना मनमोकळं बोलण्याची त्यांचे विचार बिनधास्तपणे मांडण्याची मोकळीक दिल्यामुळे तो तेवढ्याच मोकळेपणाने बोलू लागला.
त्याने आपल्या विषयाची मांडणी करण्यासाठी एका गाण्याचे उदाहरण दिले - चाँद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था... something something ना शिकवे है ना नाले है
गाणं ऐकलं असेल ना तुम्हीसुद्धा... फार सुंदर आवजात संगीतबद्ध केलेलं... पण या गाण्यातील एकच गोष्ट काळजात घर नाही तर माझ्या मेंदूत घरघर करत आहे, ती म्हणजे "ना शिकवे है ना नाले है, ना देखे ख्वाब वो गेहनो के मेरे मन मे रेहना चाहे।" डोकं चक्राऊन गेलं ऐकून. आपण आपल्या जोडीदाराकडून काय काय अपेक्षा करतो आणि किती अमर्याद, बिनबुडाच्या अपेक्षा करतो हेच यावरून दिसून येतं नाही का? आता पहा ना शिकवे है ना नाले है म्हणजे असं कसं शक्य आहे, म्हणजे जिला तुम्ही आपली सहचर म्हणून निवडताय तिला कसल्याच भावना नकोत अशीच काहीशी अपेक्षा आहे नाही का? या वरून आपण आपल्या कसल्याच वागण्याची जबाबदारी स्वीकारणार नाही हेच व्यक्त करायचं असेल का?
आपण आपल्या आजूबाजूला असे चित्र पाहतोच की मन मानेल तसं वागायचं आणि मग म्हणायचं माणसाकडून चुका होतंच असतात, बायांनी समजून घ्यायला हवं तरच संसार टिकतो! वाह रे महाभाग!! म्हणजे तुमच्या संसाराचं सोयरसुतक फक्त बायकोच्या माथी मारायचं आणि मोकळं व्हायचं?? काय खरंच हे योग्य आहे? आपण अशी अपेक्षा कशी काय करू शकतो? आजूबाजूला अनेक लोक पाहताना माझ्या हे लक्षात येतं की हे कुटुंबप्रमुख म्हणवणारे आपल्या कुटुंबासाठी तसूभर झिजत नाहीत, एव्हाना घरकामापासून मुलं संभाळण्यापर्यंत आणि घरातील जबाबदाऱ्यांपासून ते नोकरीच्या जबाबदाऱ्यांपर्यंत स्त्रीच खऱ्याखुऱ्या कुटुंबप्रमुखाच्या जबाबदाऱ्या पार पाडते! एवढं सगळं असूनही तिला आपल्या काही भावना नकोत, उदा. जर नवरा, सासरचे लोक तिला काहीही बोलले, तिच्या भावना दुखावल्या, तिचं मानसिक खच्चीकरण केलं तरीही तिला वाईट वाटू नये अशी अपेक्षा ठेवणं योग्य आहे का? दिवसरात्र कष्ट करत आणि " बाईनं कस सहनशील असावं " यासारख्या फडतूस गोष्टींचं नामस्मरण करत आपण आपली गिधाडांसरखी वृत्ती किती दिवस शाबूत ठेवणार आहोत देव जाणे??
माझ्या लग्नानंतरचा छोटासा प्रसंग सांगतो, माझं लग्न झालं आणि त्याच लग्नसराईत आमच्याच शेजारच्या काकूंच्या घरीसुद्धा सून आली. लग्नाअगोदर मी माझ्या आईला घरकामात मदत करायचो, कणिक तयार करून देणे, स्वयंपाक बनवणे, घराची साफसफाई करणे असे काम मला माझ्या आईने शिकवले आणि काही मी स्वतः शिकून घेतले. एके दिवशी शेजारील काकू, म्हणजे नव्या नव्या बनलेल्या एका सुनेच्या सासू आमच्या घरी आल्या. काकूंनी आल्याबरोबर त्यांच्या सुनेच्या ज्या चहाडक्या सुरु केल्या कि बस! 'माझी सून सात वाजता उठते, बाईसाहेबांना आयता चहा लागतो, एक काम व्यवस्थित येत नाही तिला, माझ्या पोराचं वाटोळं झालं ग बाई.'
माझी बायको सर्व घरातून ऐकत होती, माझ्या घरीही असाच काहीसा प्रकार घडत होता, तीही उशिरा उठायची, माझी आई तिला चहा करून द्यायची आणि मीसुद्धा तिच्यासाठी नाश्ता तयार करायचो! तिला प्रत्येक कामात मदत करायचो. मी कौतुकाने ऐकत होते...पण त्याने पुढे बोलणे सुरु ठेवले... पण मॅडम बायकोचा चेहरा खर्रकन उतरला होता आता रडायचं बाकी होतं. पुढील संभाषण सुरु झाले.
शेजारची काकू पुन्हा आईला सांगू लागली, "मी लगेच दुसऱ्याच दिवशी तीला बजावलं आमच्या घरी हे असलं वागणं जमणार नाही, तू सगळ्यांच्या अगोदर उठून सर्व कामं आवरायची, पण कुठ जमतं तिला निटनेटकेपणाने काम करायला, आणि लागली एवढ्याशा गोष्टीला रडायला? एवढी छोटी गोष्ट सहन होत नाही त्या पोरीला, कसा संसार करणार आहे देव जाणे? माझ्या तर मेंदूला ताण झाला आहे बघ, आणि माझा मुलगा सारखा मागेमागे करतो तिच्या, त्याला मी नीट सांगितलं की पायातलं पायताण डोक्यावर घ्यायचं नसतं म्हणून. नवऱ्यानं बायकोला कसं धाकात ठेवलं पाहिजे, नवऱ्याचा दरारा कसा असला पाहिजे? सगळं त्याला सांगितलं. आता बघू काही फरक पडतो का?"
माझी आई: हं, छानच की? बरं तुझ्या मुलीचं गेल्यावर्षी लग्न झालं तिचं कस चाललं आहे? काकू: बरं आहे बघ, खूप त्रास आहे बघ तिला, नवीन लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवसापासून तिची सासू तिला काम नीट येत नाही, उशिराच उठते असल्या छोट्या छोट्या गोष्टी वरून टोमणे मारायला लागली. नवीन नवीन काही दिवस समजून घ्यायला हवं कि नाही तिनं, पहिल्यांदा घर सोडून राहिलेली लेक माझी किती यातना होत असतील तिला, थोडं सामंजस्याने घेऊ नये का तिच्या घरच्यांनी ? माझा जावई पण काडीची मदत करत नाही तिला! बिचारीला अचानक डोंगर पेलावा कसा तेच कळेना? मग मी बोलले तिच्या नवऱ्याला " अरे निदान तू तिचा सहचर आहेस, तुझ्यावर तरी तिच्या भावनिक विश्वाची जबाबदारी आहे, एवढा शिकलेला आहेस, तिला थोडी घरकामात मदत केलीस तर काय बिघडतं? दोघांचा संसार आहे ना रे तुमच्या" ,मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला! सून आली की तिला छळायचंच असंच ठरवलेलं असतं बघ काही लोकांनी? माझी आई: अगदी बरोबर! आता हाच विचार तू तुझ्या सुनेबद्दलही करायला हवा, नाही का? (काकू एकदम शांत) हे बघ, तुझी सूनही कुणाचीतरी मुलगी आहे, तिलाही कुटुंबाची नवीन नवीनच जबाबदारी पडली आहे, मग तू तिला आईप्रमाणे समजून घेतलं तर काय बिघडलं? आणि जसं आपण आपल्या मुलाला आपली मदत करायला सांगतो, तशी आपल्या सुनेचीही त्याने घरकामात मदत केली किंवा तशी मदत कर असं तू तुझ्या मुलाला सांगितलं तर किती छान होईल नाही का! "माझी सून आली आणि माझ्या मुलाचं वाटोळं झालं " असं विष त्याच्या मनात कालवण्यापेक्षा त्याला त्याच्या खऱ्या खुऱ्या जबाबदारीची जाणीव का करून देत नाहीस तू??
आपण आपल्या सासुपणाच्या परंपरा अशाच कायम ठेवल्या तर आपल्या मुलीचं भावी आयुष्य आपणच उध्वस्त करत आहोत असं नाही का होणार! अगं, तू तुझ्या मुलाला सांग कि 'तुमचं नवरबायकोच नातं फुलवायचं कि कुस्करून टाकायचं हे तुझ्या हातात आहे. तुझ्या सुखदुःखाच्या आधी तू आता तिचा विचार करायला हवा, तुझा प्रत्येक निर्णय घेताना तू तिचा विचार घ्यावयास हवा, तुझ्या वागण्याने तुमच्या नात्यात कटुता तर येणार नाही ना याचा अगोदर विचार करून तू तुझं प्रत्येक पाऊल टाकावं, तिच्या मनातील भावना तुला तीने न सांगताही समजाव्यात, तिच्या मनातील वेदना सुद्धा जर तुला ओळखून त्यावर फुंकर घालता आली तर खरंच तुमचं नातं खूप प्रगल्भ आहे असं मी समजेन, तिच्यातील बालपण तुला सांभाळायचं आहे आणि तिचा योग्य जोडीदार बनायचं आहे." एवढ जर तू त्याला सांगितलंस तर फार बरं होईल. आणि एवढं प्रेम, विश्वास, सन्मान तुझ्या सुनेला मिळाला तर का बरं तुमचं कुटुंब ती सुखी करणार नाही. आणि विष कालवाल तर विषवल्लीच तयार होईल आणि सुख वाटलं तर नक्कीच सुखाची कमतरता भासणार नाही. आपण एक जबाबदार पालक म्हणून हेच करायला हवं नाही का?
तुझा मुलगा कितीही मोठ्या पदावर काम करत असेल, किंवा किती पगार कमावत असेल पण त्याला स्वतःच्या पत्नीची जबाबदारी स्वीकारली जात नसेल, स्वतःच्या कुटुंबाचं सुखदुःख त्याला ओळखता येत नसेल तर काय फायदा?
आता त्याची पत्नी त्याच कुटुंब, त्याची मुलबाळं त्याची जबाबदारी आहे आणि आपण आता आपल्या जबाबदाऱ्यांमधून स्वतःला मुक्त केले पाहिजे, म्हणजे आता आपण फक्त सुख वाटायचं काम करायचं आणि आपल्या मुलांना योग्य रस्ता दाखवून त्यांच्या बळावर भरारी घेऊ द्यायची. उगाच त्यांच्या जीवनात आपल्या स्वार्थापायी वेदना पेरून वेदनेची पायाभरणी करायची नाही...
मी बघ माझ्या मुलाला त्याच लग्न होण्याअगोदरच सांगितलं की आता तुझ्या कुटुंबाची जबाबदारी तू सांभाळायची, तुझ्या बायकोच्या सुखदुःखाचा विचार सर्वांअगोदर करायचा, तुझ्या वागण्याने तिला तिला त्रास होता कामा नये, आता तुझ्या प्रत्येक निर्णयात ती प्रथम सामील असली पाहिजे, काही मतभेद झाला तरी तो सामंजस्याने मिटवायचा, आपली योग्य अयोग्य बाजू तपासायची आणि तिलाही सांगायची. ती आपल्या आईवडील ,भाऊ बहीण, सर्वांना सोडून तुझी पत्नी बनून येत आहे तर तू सुद्धा तिची आई बनायला हवं, जेवढा तुझ्या पत्नीचा आदर करशील त्यावरूनच तू माझा किती करतोस हे लक्षात येतं!! तिच्या प्रत्येक कामात सुद्धा तू तिची मदत करायची. आपली पत्नी सुखी असेल ना तर आपलं आयुष्य सुखानं भरून जातं .
ती घरातून हे ऐकत होतीच. तीने लगेच माझ्या आईला जी आता तिचीही आई झाली होती लगेच मिठी मारली. आणि खरंचं माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे मी वागतो, आणि माझं आयुष्य खरंच सुखाने भरून गेले आहे. मी माझ्या बायकोला दगड समजत नाही ज्याला काहीच भावना नसतात, मी तिला माझ्या आयुष्याला पूर्णत्व देणारा माझा भाग समजतो. म्हणून या गाण्याच्या फक्त दोन ओळी मला आवडल्या " चाँद सी मेहबूबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था, हां तुम बिलकुल वैसी हो, जशी माझी आई मला शिकवून गेली.....
मी त्याचे शब्द हृदयात साठवून घेतले आणि त्याच्या भावी आयुष्याची सोनेरी पहाट बघून आनंदाने त्याचा निरोप घेतला.
- somegoldenpagesoflife@gmail.com