गुलजारांच्या कवितेतील स्त्रीभान
.png)
गुलजार म्हणजे केवळ कवी नाहीत, तर चित्रपट, गीतं, कथा, पटकथा यांसारख्या प्रत्येक माध्यमातून मानवी भावविश्वाची खोल जाण ठेवणारे संवेदनशील सर्जक आहेत. भारत अंकुशराव सोळंके आपल्या या लेखात गुलजारांच्या कवितांमधून उलगडलेल्या स्त्रीभानाचं सूक्ष्म विश्लेषण करतात. भामीरीसारख्या कवितेतून फाळणीच्या जखमा सहन केलेल्या स्त्रीचं चित्रण, रेपसारख्या कवितेतून समाजातील विकृतींवर प्रहार, पडोसीमधून घरातील स्त्रीच्या उपस्थितीनं निर्माण होणारं घरपण, तर मीनासारख्या कवितेतून पडद्यामागचं दुःख आणि एकाकीपण अधोरेखित होतं. गुलजार स्त्रीच्या मनाचा ठाव घेऊन तिच्या वेदना, तिच्या संघर्षाला कवितेतून आवाज देतात. त्यांच्या कवितांमधून स्त्री म्हणजे केवळ व्यक्तिरेखा नसून समाजाचं हृदय आहे, हे जाणवतं.
गुलजार हे चित्रपट दिग्दर्शक, गीतकार, पटकथा लेखक म्हणून सर्वपरिचित असले तरी ते मूलत: कवी आहेत. कवी आहेत म्हणून ते चांगले दिग्दर्शक, चांगले गीतकार, चांगले पटकथा लेखक आहेत. याच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यांच्या कवितेला विविध आयाम आहेत. त्यापैकी स्त्रिचित्रण हाही एक त्यांच्या कवितेतील महत्त्वाचा आयाम आहे.
गुलजारांच्या कवितेतून आविष्कृत होणाऱ्या स्त्रिया पीडित, शोषित आणि विविध समाजघटकांतील स्त्रिया आहेत. त्याचबरोबर गुलजारांनी नाते, आप्तेष्टांमधील स्त्रियांचेही चित्रण अधोरेखित केलेले आहे. स्त्री हा समाजघटकातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. अगदी महाभारतापासून आधुनिक साहित्यापर्यंत स्त्रियांचे चित्रण आलेले दिसते. स्त्रीभान प्रकट झालेले आहे. त्याचप्रमाणे गुलजारांच्या कवितेतूनही स्त्रीभान प्रकर्षाने आविष्कृत झालेले पाहावयास मिळते.
गुलजारांच्या पुखराज या कवितासंग्रहातील भामीरी आणि इंधन या दोन कवितांमधून स्त्रीभान आविष्कृत झालेले दिसते. भामीरी या कवितेतून भारत-पाकिस्तान फाळणीच्या झळा अनुभवलेल्या, फाळणीचे दुःख भोगलेल्या स्त्रीचे चित्रण गुलजारांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
'हम सब भाग रहे थे रिफ्यूजी थे माँ ने जितने ज़ेवर थे, सब पहन लिये थे बाँध लिए थे' (पुखराज, पृ. १२)
गुलजारांचा स्त्रियांकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन आहे. गुलजारांचा स्त्रियांकडे बघण्याचा असलेल्या व्यापक दृष्टिकोनाचा प्रत्यय त्यांच्या वरील कवितेवतून येतो.
.jpg)
गुलजारांच्या रात पश्मिने की या कवितासंग्रहात बोस्की-१, बोस्की-२, पडोसी-१, पडोसी-२, दिना में आणि रेप या सहा कवितांमधून विविध घटकांतील स्त्रियांचे चित्रण आविष्कृत झालेले आहे. रेप या कवितेत गुलजार लिहितात –
'सिर्फ औरत थी, वह कमज़ोर थी वह चार मर्दो ने, कि वो मर्द थे बस, पसेदीवार उसे 'रेप' किया।' (रात पश्मीने की, पृ. १५२)
स्त्रिया हतबल असतात. कमजोर असतात. त्यांच्यातील हतबलतेचा आणि कमजोरीचा गैरफायदा घेऊन समाजातील काही विकृत वृत्तीचे पुरूष हतबल आणि कमजोर स्त्रियांवर बलात्कार करतात असे गुलजारांनी इथे सूचवले आहे. फुटपाथवरील अनाथ, अंध, अपंग, बेघर त्याचप्रमाणे मानसिक संतुलन ढासळलेल्या अनेक स्त्रियांवर सामूहिक बलात्कार होताना दिसून येतात. तशा समाजमाध्यमांवर बातम्याही येतात. समाजातील विकृत वृत्तीवर गुलजारांनी भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
बोस्की-१ आणि बोस्की-२ या कवितांमधून वयात आलेल्या मुलीच्या संदर्भातील भावभावना अधोरेखित केलेल्या आहेत. पुरूषात असलेल्या स्त्रीत्वाचे दर्शन इथे गुलजारांनी घडविलेले आहे. बोस्की-१ या कवितेत गुलजार लिहितात –
'बोस्की ब्याहने का अब वक़्त करीब आने लगा है जिस्म से छूट रहा है कुछ कुछ रूह में डूब रहा है कुछ कुछ' (रात पश्मीने की, पृ. १)
वरील कवितेतून मुलींचे घरात असलेले स्थान गुलजार अधोरेखित करताना दिसतात. मुली लहानाच्या मोठ्या होतात. खेळतात, बागडतात आणि लग्न होऊन आपले घर बसवतात. मुली लग्न होऊन सासरी गेल्यानंतर आई-वडिलांच्या वाट्याला येणाऱ्या एकाकीपणाचे चित्रण गुलजारांनी केलेले आहे.
पड़ोसी-१ आणि पड़ोसी-२ या कवितांमधून समाजजीवनातील स्त्रियांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न गुलजारांनी केलेला आहे. पड़ोसी-१ या कवितेत गुलजार लिहितात –
'कुछ दिन से पड़ोसी के घर में सन्नाटा है ना रेडिओ चलता है, ना रात को आँगन में उड़ते हुये बर्तन हैं।' (रात पश्मीने की, पृ. ३६)
घरातील स्त्री माहेरी गेली अथवा ती घरात नसली की, घरात वर्दळ राहात नाही आणि घरभर एक सुन्न शांतता पसरलेली असते. घरात पसरलेल्या सुन्न शांततेचे आणि घरातील एकाकी पडलेल्या पुरूषांच्या भावनांना गुलजारांनी स्पर्श केलेला आहे.
त्याचप्रमाणे पड़ोसी-२ या कवितेत स्त्री माहेराहून परतल्यानंतर घराला आलेला जिवंतपणा आणि खऱ्या अर्थाने घराला आलेले घरपण त्यांनी अधोरेखित केलेले आहे.
'आँगन के अहाते में रस्सी पे टँगे कपड़े अफसाना सुनाते है।' (रात पश्मीने की, पृ. ३७)
स्त्री घरात असली की, घरात एक प्रकारचे प्रसन्न वातावरण तयार होते. घर गजबजून जाते आणि खऱ्या अर्थाने घराला घरपण येते. पड़ोसी-१ आणि पड़ोसी-२ या कवितांतून समाजातील स्त्रियांचे स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
.jpg)
त्रिवेणी या कवितासंग्रहात पृ. ३६ आणि पृ. ५७ या दोन त्रिवेणीमध्ये दोन वेगवेगळ्या घटकांतील स्त्रियांचे चित्रण केलेले आहे.
पृ. ३६ वरील त्रिवेणीत गुलजार लिहितात –
'चूडी के टुकड़े थे, पैर में चुभते ही खून बह निकला नंगे पाँव खेल रहा था, लड़का अपने आँगन में बाप ने कल फिर दारू पी के माँ की बाह मरोड़ी थी।' (त्रिवेणी, पृ. ३६)
स्त्रियांना अनेक जाचांना, अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. घरातील करता पुरूष व्यसनाधीन झाला की घरातील स्त्रीला तर त्रास होतोच, त्याचबरोबर लहानग्यांच्या जीवनावरही त्याचे परिणाम होतात. एकूणच व्यसनाधीनतेत गुरफटलेल्या पुरूषांच्या घरातील स्त्रियांचे आणि बालकांच्या जीवनाचे विदारक चित्रण गुलजारांनी केलेले आहे.
पृष्ठक्रमांक ५७ वरील त्रिवेणीत शहीद सैनिकाच्या विधवा पत्नीच्या दुःखांवर प्रकाश टाकून तिच्या वाट्याला आलेल्या एकटेपणाचेही चित्रण केलेले आहे. या त्रिवेणीत गुलजार लिहितात –
'कांटे वाली तर पे किसने गीले कपड़े टाँगे हा खून टपकता रहता है और नाली में बह जाता है क्यों इस फ़ौजी की बेवा, हर रोज़ यह वर्दी धोती है' (त्रिवेणी, पृ. ५७)
शहीद पतीच्या विरहात बुडालेल्या, दुःखाचे आघात झेललेल्या स्त्रीचे दुःख गुलजारांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
पन्द्रह पाँच पचहत्तर या कवितासंग्रहात Genesis-2, Genesis-3, Genesis-4 आणि पीपल या चार कवितांतून स्त्रीचे चित्रण आलेले आहे. मात्र वरील चारही कविता एकाच विषयाला स्पर्श करताना दिसतात.
पीपल या कवितेत गुलजार लिहितात –
'कितना कूड़ा करता है पीपल आँगन में माँ को दिन में दो-दो बार बोहारी फेरनी पडती है' (पन्द्रह पाँच पचहत्तर, पृ. ११८)
रूढी-परंपरा, लोकमानस, मानणाऱ्या स्त्रीचे चित्रण गुलजारांनी वरील कवितेत केलेले आहे.
प्लूटो या कवितासंग्रहात मीना, अमृता... इमरेज, मन्ज़र-३ या तीन कवितांमधून गुलजारांनी स्त्रियांचे चित्रण अधोरेखित केलेले आहे.
मीना या कवितेतून हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री मीना यांच्या जीवनाचा, जीवनातील दुःखाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. गुलजार लिहितात –
'आँखे बन्द करके सो गयी उसके बाद उसने साँस भी न ली। एक लम्बी, हादसात से भरी पेचदार जिन्दगी के बाद और मर गयी कितनी सीधी और सहल-सी मौत थी।' (प्लूटो, पृ. ३४)
सर्वसामान्यांना अभिनेते, अभिनेत्री यांच्या ऐशोआरामी जीवनाचे दर्शन झालेले असते. किंबहुना चित्रपटाच्या आणि जाहिरातींच्या पडद्यावर दिसणाऱ्या चित्रणावर सर्वसामान्यांचा विश्वास बसलेला असतो. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांनी तसा विश्वास ठेवलेला असतो. चित्रपट क्षेत्रात दिग्गज असलेल्या स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या दुःखाचे, संघर्षाचे चित्रण गुलजारांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मन्ज़र-३ या कवितेतून नवविवाहित स्त्रीच्या भावभावना गुलजारांनी आविष्कृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवविवाहित स्त्रीला सासू-सासरे, नणंद-भावजया आणि दीर यासारख्या नातलगांच्या जाचाला, छळाला सामोरे जावे लागते. भरल्या ताटावर सासुच्या शिव्या-शाप मूकपणे ऐकून घेणाऱ्या स्त्रीचे चित्रण गुलजारांनी नेमक्या शब्दांत केले आहे. गुलजार लिहितात –
'चूल्हे में आग भी जलती रही सासू के कोसने और ताने दीवार के पार से भी कानों में पड़ते रहे।' (प्लूटो, पृ. १२१)
खाली मान घालून सासुचा जाच सहन करणाऱ्या, मुखातून ब्रही न काढता सासुरवास भोगणाऱ्या नवविवाहित स्त्रीच्या मनातील भावभावनांचे चित्रण करून भारतीय कुटुंबव्यवस्थेवर बोट ठेवण्याचा प्रयत्न गुलजारांनी केलेला आहे.
अनेक घटकांतील स्त्रियांना गुलजारांनी आपल्या कवितेतून आविष्कृत केलेले आहे. त्यांच्या भावभावना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.