पहला नशा, पहला खुमार...

३१ जानेवारी २०२६

माध्यमांतर

हा लेख ग्रामीण भागात जन्मलेल्या एका मुलाच्या पोलिस होण्याच्या प्रवासाची गोष्ट सांगतो. दहावीत नापास होणं, कष्ट करून शिक्षण पूर्ण करणं, पोलिस खात्यात नोकरी मिळवणं आणि पुढे अधिकारी होणं हा त्याचा स्वतःचा अनुभव यात मांडलेला आहे. त्याचबरोबर आपल्या भागातल्या मुला मुलींना योग्य माहिती, शारीरिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळावं म्हणून सुरू केलेल्या कामाबद्दलही तो सांगतो. पोलिस भरती आणि स्पर्धा परीक्षांसाठी गावातली मुलं कशी तयारी करतात, त्यांना कोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणींवर तो काय उपाय शोधतो, हे सगळं सरळ आणि सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. स्वतःच्या अनुभवातून उभं केलेलं काम आणि त्यातून झालेला बदल हाच या लेखाचा मुख्य मुद्दा आहे. हा लेख संतोष भूमकर यांच्या जीवनावर आधारित असून त्याचं शब्दांकन ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी केलं आहे.

(पुरुष उवाच दिवाळी 2024 मधून साभार.)

लहानपणापासून मला एकाच गोष्टीचं वेड होतं, अगदी व्यसन म्हटलं तरी चालेल. घरात कोणी पाहुणे आले, की ते विचारत, काय रे बाळा, मोठा झाल्यावर तू कोण होणार? डॉक्टर होणार का इंजिनिअर होणार? त्यावेळी मी ‘जयहिंद’ म्हणत मी पोलीस इन्स्पेक्टर होणार असं सांगायचो. पोलिसांचा तो ऐटबाज गणवेष, हातातलं पिस्तुल, खांद्यावरची पदकं, ती तुमच्या रुबाबात भर टाकणारी कॅप हे सगळं मला खूप आवडायचं. चित्रपटातही मी पोलिस अधिकाऱ्यांकडे जास्त लक्ष द्यायचो. ‘दिवार’ या चित्रपटातला पोलीस अधिकारी शशी कपूर, ‘शक्ती’ चित्रपटातला दिलीपकुमार यांना बघताना कर्तव्यदक्ष अधिकारी कसे असतात, हे त्यांच्याकडे बघून कळायचं. त्यांच्यातल्या प्रामाणिकपणापुढे मन नतमस्तक व्हायचं.

माझा जन्म मुळशी तालुक्यातल्या अंबडवेट या छोट्याशा गावात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. खरं तर माझ्यासाठी शिक्षण घेणंही तितकं सोपं नव्हतंच, पण पिरंगुट इथे मी शालेय शिक्षण घेतलं. पण दहावीमध्ये चक्क नापास झालो. कॉपी करण्यासाठी अनुकूल वातावरण असतानाही मी कॉपी केली नाही. पुन्हा जोमाने अभ्यासाला लागलो. मी शिकलो, तर मला चांगला पोलीस अधिकारी होता येईल असं मला नेहमी वाटायचं. याचवेळी मी जीवन नावाच्या एका सामाजिक संस्थेच्या संपर्कात आलो. सामाजिक काम काय असतं ते मला इथे समजलं. या दरम्यान माझ्याकडे काही गावांतल्या धरणग्रस्त लोकांची यादी करायचं काम सोपवण्यात आलं. या कामाच्या निमित्तानं माझं खूप फिरणं झालं आणि गावागावांतल्या लोकांचे प्रश्न खूप जवळून समजून घेता आले. तसंच या लोकांसाठी झटणाऱ्या अनेक संस्था आणि माणसं यांच्याबद्दलही जाणून घेता आलं.

हे काम होत असतानाच मी दहावीची परीक्षा पास झालो. बारावीमध्ये 69 टक्के गुण मिळवून पुण्यात विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात राहून ‘कमवा आणि शिका’ या योजनेतर्गत काम करत गरवारे कॉलेजमधून कला शाखेतलं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असतानाच एनसीसी आणि एनएसएस यांचीही गोडी मला लागली. तसंच लहानपणापासून व्यायामाची आवड आणि सवय असल्यानं वसंत वसंत लिमये यांच्या ‘हाय प्लेसेस’ या गरुडमाची इथल्या प्रशिक्षण संस्थेत अर्ध वेळ नोकरी मिळाली. तिथेच माझी ट्रेकिंगची आवडही जोपासली गेली. इथे राहून सगळे कोर्सेसही पूर्ण केले. वसंत वसंत लिमये यांची कामाची पद्धत, कामात दिलेलं स्वातंत्र्य, आपल्या सहकाऱ्यांशी मिळूनमिसळून वागणं या गोष्टी माझ्यावर खूप प्रभाव पाडून गेल्या.

आता मला माझं पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचा ध्यास लागला होता. मी नोकरी करत असतानाच पोलिसभरतीसाठी प्रयत्न सुरू केले. आपले परिश्रम, आपली मेहनत आपल्याला साथ देते याचा अनुभव मला आला. मला यश मिळालं आणि मी पोलीस विभागात काम करण्यासाठी दाखल झालो. मला इथेच थांबायचं नव्हतं. मला पुढच्या वाटा खुणावत होत्या. कारण आत्ता तर मी साधा पोलीस म्हणून काम करत होतो. मला स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी व्हायचं होतं. घरातली आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणासाठीच्या सुविधा यांची हातमिळवणी करताना अनेक कठीण प्रसंग माझ्यासमोर येत, पण माझा निश्चय ठाम होता. सगळ्या अडचणींमधून मार्ग काढत मी स्पर्धा परीक्षाही पास झालो. कधी काळी दहावीत नापास म्हणून शिक्का बसलेला मुलगा पोलिस अधिकारी म्हणून रुजू झाला.

माझं हे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात मला माझ्या शाळेतले शिक्षक, विख्यात साहित्यिक आणि ‘हाय प्लेसेस’चे संचालक वसंत वसंत लिमये, पोलिस अधिकारी लक्ष्मीनारायण अशा अनेक चांगल्या लोकांनी साहाय्य केलं होतं, प्रोत्साहन दिलं होतं. पाठीवर कौतुकाची थाप मारली होती. या लोकांमुळेच आपलं स्वप्न पूर्ण झालं याची जाणीव मला होती आणि आजही आहे. मला ही माणसं भेटली म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो; पण आपल्यासारखे अनेक मुलं-मुली इथपर्यंत पोहोचू शकतीलच असं नाही, या विचारानं मी अस्वस्थ झालो.

माझी कामाची जबाबदारी वाढली. कामाचं स्वरूपही बदललं; मात्र मला सतत आपला सगळा प्रवास आठवत राहायचा. आपल्यासारखी शेकडो मुलं पोलिसांत भरती होण्यासाठी, सैन्यात जाण्यासाठी तयारी करत असतात; पण त्यांना पुरेशी माहिती नसल्यानं आणि योग्य मार्गदर्शन नसल्यानं ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती. अशा मुलांसाठी काहीतरी करायला हवं हे मला कळत होतं; पण नेमकं काय करायचं, याचा मार्ग दिसत नव्हता. अखेर एके दिवशी हे काम आपलंच आहे आणि आपल्यालाच करावं लागणार आहे हे माझ्या मनाला मला सांगितलं आणि आपल्या जवळच्या मित्रांजवळ बोलून दाखवलं. माझा कष्ट करण्याच्या स्वभावाला माझे मित्र जाणून होते. त्यांनी ‘आम्ही तुझ्याबरोबर आहोत’ असं आश्वासन दिलं आणि शून्यापासून सुरूवात करून एका एका गोष्टीची आखणी सुरू केली. यातूनच मी आणि माझ्या सात मित्रांनी सर्वज्ञ विकास प्रबोधिनीची स्थापना केली.

आम्ही याच वेळी पोलीस भरती, सैन्यभरती, स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी करावयाची पूर्वतयारी लिहून काढली. मुलांचं सामान्यज्ञान वाढावं यासाठी अनेक पुस्तकं विकत घेतली आणि इतरांकडून सुद्धा मिळवली. त्यानंतर गावाजवळच्या घोटावडे फाट्यावरच्या एका टेकडीवर याच मुलांना शारीरिक तंदुरुस्तीसाठीचं प्रशिक्षण मोफत द्यायचं ठरवलं. त्यासाठी येणाऱ्या तरुण-तरुणींकरिता परिश्रम, चारित्र्य, सातत्य, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जाणीव हे निकष आम्ही ठेवले. या गोष्टींचं पालन करणारेच यशस्वी होऊ शकतात, याचा विश्वास आम्ही या मुलामुलींना दिला.

यानंतर पुढला टप्पा होता, नियोजित टेकडीवरचा भाग सपाट करणं, त्यावरचे दगडधोंडे काढणं, तिथे प्रशिक्षणासाठीची साधनसामग्री उपलब्ध करणं, अशा अनेक गोष्टी करायला हव्या होत्या. आम्ही काम सुरू केलं. पाऊल उचललं की आपोआप वाट तयार होते म्हणतात, तसं माझ्या मदतीला माझे अनेक मित्र आले. ज्यांना शिकायचं होतं, परीक्षेची तयारी करायची होती असे अनेक तरुण-तरुणी श्रमदानासाठी सज्ज झाले. या सगळ्यांमधून टेकडीवर छानसं मैदान तयार झालं. एका ओसाड, दगडधोंड्यांनी भरलेल्या टेकडीचं रूप आज पूर्णपणे पालटलं आहे.

आम्ही या मुलामुलींना प्रशिक्षण देऊ लागलो. त्यांची शारीरिक क्षमता चांगली व्हावी यासाठी प्रयत्न करू लागलो. लहान गावातली मुलं शहरी मुलांपेक्षा काकणभर सरसच असतात; मात्र त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागतो ही गोष्ट आमच्या लक्षात आली होती. सुरुवातीला फक्त पाच मुलं दाखल झाली होती. हळूहळू तो आकडा पन्नासवर गेला. खरं तर माझ्या नोकरीमुळे मी आणि माझे मित्र रोजच वेळ देऊ शकत नव्हते. अशा वेळी मी ‘यूथ फॉर यूथ’ असं म्हणत यातल्याच मुलांना प्रशिक्षित करून नव्यानं दाखल होणाऱ्या मुलांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. त्यामुळे प्रशिक्षणात कुठेही खंड पडत नव्हता. आमच्यातला प्रामाणिकपणा, साधा, प्रेमळ स्वभाव यामुळे गावातल्या लोकांचाही आमच्यावर विश्वास होता. आपल्या मुलांसाठी हा धडपड करतोय म्हटल्यावर अनेकांनी आपल्या मुलींनाही शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. यातूनच टेकडीवर अनेक मुलीही सायकलवरून, पायी येऊ लागल्या. त्यांच्या अडचणी त्या माझ्याजवळ व्यक्त करू लागल्या. जणू काही मी त्यांचं पालकत्वच घेतलं आहे, या भावनेतून मीही त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू लागलो. इतकंच नाही, तर काही मुलींची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असल्यानं त्यांना आपल्या घरातच राहायला मी निमंत्रित केलं. माझ्या पत्नीनंही अतिशय आनंदानं होकार दिला.

प्रत्येक मुलाशी संवाद साधणं, त्याची सुखदुःख जाणून घेणं आणि त्यातून काही मार्ग काढता येतो का हे बघणं हा आज माझ्या जीवनाचा भाग होऊन बसलाय. एक उदाहरण सांगायचं तर, संदीप नावाच्या एका तरुणाला त्याच्याच गावातली मंडळी हा वाया गेलेला, हा गुंड अशा नजरेनं बघत होती; मात्र माझ्या सहवासानं संदीपमध्ये आमूलाग्र बदल झाला. त्यानं टेकडीवर येऊन परिश्रम करायला सुरुवात केली. अभ्यास करायला सुरुवात केली आणि आज या संदीपची गावचा पोलीस पाटील म्हणून निवड झाली आहे. आज गावातले लोक संदीपकडे अभिमानानं आणि आदरानं बघायला लागले आहेत. आमच्या गावाला आज आदर्श गावाचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. आमच्या प्रयत्नांना आता यश येतंय. टेकडीवर शारीरिक प्रशिक्षण घेणारी मुलं कौशल्यं प्राप्त करताहेत. तसंच पुस्तकं आणि अधूनमधून येणारे त्या त्या विषयातले तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्यामुळे शैक्षणिक पातळीवरची कौशल्यंही ही मुलं-मुली आत्मसात करताहेत. यातल्या अनेक मुला-मुलींची पोलीस विभागात निवडही झाली आहे. आपल्या या सगळ्या यशाचं श्रेय ते संतोषदादालाच आहे असं म्हणतात, पण मला वाटतं ते त्यांच्या परिश्रमाचं आणि चिकाटीचं फळ आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे.

माझ्या नोकरीतून मिळणारा वेळ, सुट्टीचा वेळ मी मुलांसाठी देतोय. मी आणि माझ्या पत्नीने आपल्या वैयक्तिक गरजा खूप कमी ठेवल्या आहेत. आम्हाला आता आमचं पुढलं जगणं ग्रामीण भागातल्या मुलांच्या विकासासाठीच खर्च करायचं आहे. आम्हाला कुठलाही गाजावाजा, प्रसिद्धी नको आहे.

आज मुळशी तालुक्यात पोलीस भरतीचं वातावरण तयार झालंय. इथली मुलं जास्त संख्येनं या विभागात दाखल होताहेत. आज आम्ही गावात ग्रंथालय सुरू केलंय. अतिरिक्त वाचनानं गावातली मुलं सुसंस्कृत तर होतीलच, पण त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त होईल, त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढीला लागेल, जात-धर्म या पलीकडे बघण्याची दृष्टी त्यांना प्राप्त होईल, त्यांच्यामधून सुजाण नागरिकांची जडणघडण होईल, अशी खात्री मला वाटते. माझ्या या कार्यानं आनंदित होऊन वसंत वसंत लिमये यांनी स्वतः काही पुस्तकं विकत घेऊन ग्रंथालयाला भेट दिली आहेत. ग्रंथालयामुळे पोलीस भरतीसाठी, स्पर्धापरीक्षेसाठी बसणारीच नव्हे, तर गावातली इतर मुलं-मुली देखील आता वाचायला लागली आहेत. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करायला लागली आहेत. ग्रंथ हा केवळ आपल्या गुरूचंच काम करत नाही, तर आपल्या एका जिवलग मित्राचं काम करतो ही गोष्ट आता सगळ्यांच्या लक्षात आलीय.

खरं तर प्रत्यक्ष वास्तव आणि चित्रपट याच्यात अनेकदा तफावत असते. मी चित्रपटात बघणारी पोलिसांची प्रतिमा आणि खरे पोलीस यांचं जगणं खूप वेगळं आहे. आज एकीकडे सातवा वेतन आयोग वगैरेंमुळे काहींचे पगार भरमसाठ वाढलेले आहेत, तर पोलीस खात्यातल्या मंडळींचे पगार मात्र अगदी तुटपुंजे नाममात्र आहेत. आमच्या कामाच्या अनियमित वेळा, सुविधांचा अभाव, कामाचा ताण, भ्रष्टाचाराची साखळी आणि चहूबाजूंनी येणारा दबाव या सगळ्या वातावरणात काम करणारा पोलीस आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ कसं अबाधित ठेवत असेल, ही गंभीरपणे विचार करण्याचीच गोष्ट आहे. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देतच आम्हाला पोलीस खात्याची शान वाढवायची आहे.

माझं स्वप्न माझं व्यसन बनलं आहे. कारण हे स्वप्न केवळ मी पुरतं न राहता ते आता विस्तारलं आहे आणि ते पूर्ण करणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय बनलं आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं :‘दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए’