संघर्षरत राहण्याची प्रेरणा देणाऱ्या स्त्रियांच्या कथा : 'भाकरी आणि कर्म'
'भाकरी आणि कर्म' हा उमेश मोहिते यांचा 'निवद' नंतरचा चौथा कथासंग्रह असून पहिलाच दीर्घकथासंग्रह आहे. यात एकूण पाच दीर्घकथा असून या कथा गावपातळीवरील सामान्य कष्टकरी वर्गाच्या संघर्षमय जीवनाचा वेध घेणाऱ्या आहेत आणि त्यांचा हा संघर्ष विविध पातळ्यांवरचा आहे. भाकरी कथेत पारबतीच्या वडिलांच्या घरच्या गरिबीमुळे तिचा सासू-सासऱ्यांकडून जाच होत असतो आणि ती हा जाच निमूटपणे सहन करीत दुसरीकडे नवऱ्याचे मनपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करते. तिच्या या संघर्षात अखेरीस ती यशस्वी होते आणि तिच्या पतीचे मनपरिवर्तन होते. तिचा हा सारा संघर्ष मुळातून वाचण्यासारखा आहे. प्रा. देशमुख कार्यवाह असलेल्या संस्थेत शिक्षकाच्या नोकरीसाठी मुलाखत देणाऱ्या त्यांच्या मानसकन्येचा; सुवर्णाचा घात स्वतः प्रा.देशमुख आपल्या स्वतःच्या मुलीसाठी कसा घडवून आणतात, याचे वेधक आणि भेदक चित्रण 'घात' कथेत असून बीएड उत्तीर्ण सुवर्णा त्यांच्या बटईदाराची (शेती कसणारा) मुलगी असते आणि सिलिंग अॅक्ट आला तेव्हा सुवर्णाच्या आजोबांनी प्रा. देशमुखांची सरकार देत असलेली जमीन नाकारलेली असते. अगदी आजही प्रा. देशमुखांची शेती सुवर्णाचे वडीलच करीत असतात आणि म्हणून सुवर्णाला त्यांच्या संस्थेत नोकरी लागण्याची शाश्वती असते; पण नियती आपला रंग दाखवते आणि तिला टाळले जाते. खरे तर प्रा. देशमुखांचीही इच्छा तिची निवड करण्याची असते; पण परिस्थितीच अशी निर्माण होते की, त्यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी सुवर्णाच्या नोकरीचा बळी द्यावा लागतो. असे व्यामिश्र कथानक असलेली ही कथा अंतर्मुख करते.
'पाऊस' या कथेत विधवा सुमित्राने रोजच्या जगण्यासाठी दिलेला संघर्ष अंतःकरण पिळवटून टाकतो. शेतात रोजगार करून उपजीविका चालवणाऱ्या सुमित्राचा पाऊसझडीमुळे नाईलाज झाला आहे आणि तिची तिन्ही छोटी मुले तिला 'भाकरी ss भाकरी' करत तोडून टाकत राहतात. घरात पसाभर पीठ नाही, असे दारिद्रय आहे. त्यातच तिच्या छोट्या मुलीचे दुखत आहे आणि पाऊस तर दुष्मनासारखा कोसळतोच आहे. यातच चुलत दीर नागूशा तिच्यावर उपकाराचे ओझे करुन तिला जाळ्यात टाकण्यासाठी टपून असतो. अशा विचित्र कोंडीत सापडलेल्या अभागी सुमित्राची जीवघेणी, धडपड, मनःस्थिती ही कथा तपशिलाने टिपते.
गया आणि सटवा या मजूरी करणाऱ्या दांपत्याची कर्मकहाणी म्हणजे 'कर्म' ही कथा असून इथे कथानायिका असलेल्या गयाचा संघर्ष स्वतःच्या प्राक्तनाशीच आहे. पती सटवा हा पूर्णतः दारुच्या आहारी गेलेला असून त्याला दारुशिवाय तासभरही चैन पडत नसते. गया मात्र त्याची दारुची सवय सुटावी म्हणून इलाज करीत राहते. त्यासाठी स्वतःच्या कष्टाचे पैसे घालवत राहते. तो मात्र बाजारात हलकी-फुलकी हमाली कामे करुन व्यसन करीत असतो आणि पैसे नसले की, घरातल्या वस्तूही विकतो. यासाठी त्यांचा कमावता मुलगाही त्याच्यावर चिडत असतो आणि दोघा बापलेकांचे नेहमी भांडणेही होतात. त्या दोघांत गयाची मात्र दमकोंडी होत असते. मुळात ती स्वतः कष्ट करुन सटवाला जगवते आणि त्याच्यासाठी खस्ताही खाते. तिने केलेला हा सारा संघर्ष म्हणजे ही कथा असून या कथेतील गयाची धडपड, वेदना आणि दुःख वाचकमन विदीर्ण करून टाकणारे आहे, तर 'स्थापना' ही वेगळ्या वळणाची कथा असून ती गणेशोत्सवाच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकते. आज राजकारणाचे सार्वत्रिकीकरण झाले असून अगदी गावपातळीवरही त्याचे लक्षणीय अस्तित्व जाणवते आहे. पारंपरिक सरंजामी नेतृत्त्व आणि नव्या पिढीतील उगवते नेतृत्व यांच्यातील वर्चस्वासाठी चाललेला संघर्ष इथे लेखकाने परिणामकारकतेने रेखाटला आहे.
एकूणात 'भाकरी आणि कर्म' या दीर्घकथासंग्रहाचे मध्यवर्ती सूत्र संघर्ष असून हा संघर्ष विभिन्न पातळीवरील आहे. 'भाकरी' कथेत आत्मप्रतिष्ठेसाठी लढणारी पारबती, 'घात'मध्ये स्वअस्तित्वासाठी कार्यरत असलेली सुवर्णा, 'पाऊस' मध्ये जगण्यासाठी अविरत धडपडणारी सुमित्रा, 'कर्म'मध्ये माणूसपणासाठी झगडणारी गया आणि 'स्थापना'तील वर्चस्वासाठी झुंज देणारा सर्जेराव ही पात्रे हारणारी नाहीत, तर खंबीरपणे परिस्थितीला तोंड देणारी आहेत. त्यांचा संघर्ष खरा असून त्यासाठी ही सर्व पात्रे पूर्ण सामर्थ्यानिशी भिडतात. लेखकाने त्यांचा हा संघर्ष भावविवश वगैरे न होता अगर प्रक्षोभक होईल असा न टिपता, अगदी संयमाने टिपला आहे. एका व्यक्तीच्या जीवनचित्रणातून साकार होणारी ही कथा त्या त्या नायक वा नायिकेला त्यांच्या स्वतःच्या सुख, दुःखासह साकार तर करतेच, पण त्याशिवाय ते ज्या जगण्याचा भाग आहेत, त्या जगण्यालाही बारीक-सारीक तपशिलांसह साकार करते. तसेच मराठवाडी बोली भाषेतील नेटके संवाद, चित्रदर्शी भाषा आणि ओघवत्या लेखनशैलीमुळे ही कथा मनाची पकड घेते. तसेच या सर्वच कथांतील पात्रचित्रणही ठसठशीत झाले असून 'भाकरी' कथेतली पारबती, 'घात'मधील सुवर्णा, 'पाऊस'मधील सुमित्रा आणि 'कर्म'मधील गया मनात रेंगाळतात, नव्हे वाचक मन हेलावून सोडतात. हेच लेखकाचे यश असून संघर्षरत राहण्याची प्रेरणा देणाऱ्या स्त्रियांच्या कथा असलेला 'भाकरी आणि कर्म' हा संग्रह लेखकाकडून अपेक्षा निर्माण करतो, हे नक्की!