नाही उमगत 'ती' अजूनही..!
स्त्रीच्या आयुष्यातील वेदना, संघर्ष, आत्मभान, नात्यांतील गुंतागुंत आणि समतेची आस या सगळ्यांना अत्यंत संवेदनशील शब्दांत व्यक्त करणारा डॉ. सोनिया कस्तुरे यांचा ‘नाही उमगत ‘ती’ अजूनही..!’ हा कवितासंग्रह केवळ स्त्रीवादी कविता म्हणून मर्यादित राहत नाही, तर माणूस म्हणून जगण्याच्या मूलभूत प्रश्नांना भिडतो. मिळून साऱ्याजणीच्या सांगली जिल्हा प्रतिनिधी डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या कवितांवर डॉ. स्वाती पाटील यांनी लिहिलेल्या या परीक्षणात संग्रहातील ‘सुंदर कोण’, ‘शब्दाबाहेर’, ‘माणूस ती’, ‘जोडीदार’ यांसारख्या कवितांमधून स्त्री-पुरुष समानता, आत्मसन्मान, सहजीवनातील समजूतदारपणा आणि समाजव्यवस्थेतील विषमतेवर केलेले नेमके भाष्य उलगडून दाखवले आहे. स्त्रीला देवीच्या चौकटीत बंदिस्त न करता एक स्वतंत्र व्यक्ती, एक माणूस म्हणून स्वीकारण्याचा विचार मांडणारा हा कवितासंग्रह आणि त्यावरील हे परीक्षण वाचकांना नातेसंबंध, समाजरचना आणि स्वतःच्या दृष्टिकोनाचा नव्याने विचार करायला भाग पाडते.
अतिशय संवेदनशीलतेने लिहिलेल्या या संग्रहाला तेवढीच वस्तुनिष्ठ, तरल, अभ्यासपूर्ण आणि डोळस प्रस्तावना प्राध्यापक आर्डे सरांनी लिहिली आहे. मनोगतातच कवयित्री डॉ. सोनिया यांनी या कवितांची जडणघडण कशी झाली, हे सांगितले आहे. अत्यंत उत्कृष्ट सामाजिक मूल्ये असणाऱ्या या कविता लिहिताना त्यांना त्यांच्या वैद्यकीय व्यवसायातील अनुभवांचा, आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचा आणि तात्कालिक घटनांचा खूप उपयोग झाला आहे. तरीही कवयित्रीची मूळ संवेदनशील वृत्ती, समाजाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी आणि केवळ स्त्री म्हणून नव्हे, तर एकूणच माणसांकडे पाहण्याची समदृष्टी जागोजागी ठळकपणे जाणवते. म्हणूनच केवळ स्त्रीवादी लाटेमध्ये आलेले आणखी एक साहित्य असे याचे स्वरूप न राहता, हा अतिशय दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, उच्च सामाजिक मूल्ये आणि अभिरुची जपणारा वेगळा कवितासंग्रह ठरतो.
हा कवितासंग्रह जरी पहिला असला तरी तो पहिला वाटत नाही. प्रत्येक कवितेमागे असणारी विचारधारा ही अनेक वर्षे मनात आणि विचारात रुजलेली वाटते. सजगतेचे भान प्रत्येक कवितेला आहे. म्हणूनच त्यामध्ये फार अलंकारिकता नाही, परंतु जिवंतपणा शंभर टक्के आहे. या कविता वाचणाऱ्या सर्व वयोगटातील स्त्रियांना त्या आपल्याच वाटतात. कारण या सर्वच जणी वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आहेत, ठरत आहेत आणि ही विषमता दूर झाली पाहिजे, समाजव्यवस्था बदलली पाहिजे, याचे भान जवळपास प्रत्येक कवितेत आहे. स्त्री आणि पुरुष या पलीकडे जाऊन व्यक्तीकडे ‘माणूस’ म्हणून पाहण्याची किती गरज आहे, हे हा कवितासंग्रह जाणवून देतो. स्त्रीवादी म्हणाव्या अशा या कविता नाहीतच, तर त्या एक उत्तम समाजव्यवस्था कशी असली पाहिजे, हे सांगणाऱ्या कविता आहेत. त्यामध्ये माणूस हा माणसाप्रमाणे वागला पाहिजे; रूढी, परंपरा, लिंगभिन्नता, दुय्यमतेचे ओझे, जातीपाती, धर्म-अधर्म, सुंदर-कुरूपतेच्या स्वनिर्मित चौकटीत अडकून स्वतःचे आणि इतरांचे जीवन असह्य बनवणाऱ्या राक्षसाप्रमाणे नव्हे. ‘सुंदर कोण’ या कवितेत या सगळ्या जीवनमूल्यांचा त्यांनी मागोवा घेतला आहे. अतिशय सोप्या, सुबोध आणि छोट्या शब्दांमध्ये ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ सांगताना सध्या समाजात निर्माण झालेल्या सुंदरतेच्या कल्पनांवर त्यांनी अचूक भाष्य केले आहे आणि ते अगदी तंतोतंत पटतेही.
‘मिरवू लागले’ या कवितेत ‘पुरोगामी’ हे आजकाल प्रत्येकाने स्वतःला लावून घेतलेले बिरूद किती फोल आहे, हे दाखवून दिले आहे. प्रत्येक स्वतःला विसरलेल्या बाईने वाचलाच पाहिजे असा हा संग्रह आहे. ‘ती’च्या उपजत निसर्गदत्त शक्तीचे यथायोग्य वर्णन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्येक कवितेत वाचायला मिळते. उदाहरणार्थ —
एक वाट सुटली तिची तरी दुसरी तिला मिळत राहते तिच्या उपजत कौशल्याने ती वळण घेईल नव्याने जिकडे नवी वाट तयार होते तिकडे....!
समतेचे धडे शिकवण्याची तीव्र गरज या कविता अतिशय सौम्य शब्दांत व्यक्त करतात. स्त्री-पुरुष समानता या विषयावर हल्ली कोणीही उठून सवंग लिहित असतो; परंतु मुळात हा विषय समजून एक उत्तम सहजीवन कसं असावं आणि त्यामध्ये पुरुषांनी कसा पुढाकार घेतला पाहिजे, हे शिकवणारी कविता म्हणजे ‘शब्दाबाहेर’. अर्थात ती तुम्ही स्वतःच वाचली पाहिजे. याबरोबरच तडजोड आणि स्वतःमध्ये बदल या दोन गोष्टींचे महत्त्व ‘प्रपंच’ नावाच्या कवितेत व्यक्त करून कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व त्या निर्विवादपणे स्वीकारतात.
‘तिची आय.क्यू. टेस्ट कराल का?’ ही कविता तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय वाचून पूर्ण होत नाही. कारण आपल्या भारतातील प्रत्येक बाई यातल्या कोणत्या ना कोणत्या ओळीत स्वतःला पाहतेच. यापेक्षा अधिक संवेदनशीलता काय असते? ‘आरसा’ ही कविता तर सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. समान हक्क आणि वागणूक न देता, सन्मानांच्या हाराखाली जखडून ठेवणारी ही समाजव्यवस्था कधी कधी ‘ती’च्याही लक्षात येत नाही आणि हे स्वभान जागवण्याचं काम ही कविता करते. म्हणूनच ‘माणूस ती’ या कवितेत त्या म्हणतात —
लक्ष्मी ना सरस्वती, ना अन्नपूर्णा सावित्रीची लेक माणूस ती दुर्गा, अंबिका, कालिका, चंडिका देव्हारा नको माणूस ती......
सावित्रीचे ऋणही त्यांनी अगदी चपखल शब्दांत फेडले आहे — “जनावरांपेक्षा हीन, दीन, लाचार होतो माणूस आम्ही झालो माई तुझ्यामुळे...”
या शब्दांची ओळख करून देणाऱ्या माईला शब्दफुलांच्या ओंजळीने कृतज्ञता वाहिली आहे, आपल्या सर्वांच्याच वतीने.
‘जोडीदार’ या कवितेत तर प्रत्येक स्त्रीला हा माझ्याच मनातला सहचर आहे, असे वाटावे इतपत हे वर्णन जमले आहे आणि शेवटी या कल्पनाविलासातून बाहेर येत “हे सत्यात उतरवण्याचा कायम प्रयत्न करत राहतो तोच खरा जोडीदार” असे सांगून एक आशादायक वास्तव आपल्यापुढे मांडले आहे.
एका लेकीच्या नजरेत बाप कसा असावा, हे ‘बाप माणूस’ ही कविता मुळातूनच वाचण्यासारखी आहे. अशी ही कवयित्री विठ्ठलालासुद्धा जाब विचारायला घाबरत नाही. सर्वजनांचा, भक्तांचा कैवारी; पण त्याला तरी जोडीदाराची खबर आहे का? खरंतर रूपकात्मकच ही कविता. ज्याने त्याने जाणून घ्यावी अशी.
‘मैत्री जोडीदाराशी’ या कवितेतसुद्धा त्या एक खूप आशादायी चित्र निर्माण करतात, जे खूप अशक्य नाही. क्षणांची पत्नी ही अनंतकाळची मैत्रीण आणि क्षणाचा नवरा हा अनंतकाळचा मित्र झाला, तर नाती शोधायला घराबाहेर जाण्याची गरजच पडणार नाही, असं आदर्श सहजीवन त्या उभं करतात.
आणि शेवटी अतिशय समर्पक असा शेवट करताना कवयित्री म्हणते —
“तिचं शिक्षण, बुद्धिमत्ता, शक्ती, युक्तीची चघळ करून चुलीत कोंबलं नसतं.... लग्नानंतर त्याच्या इतकाच तिच्या करिअरचाही विचार झाला असता.... वांझ म्हणून हिणवलं नसतं, विधवा म्हणून हेटाळलं नसतं..... तिच्या योनीपावित्र्याचा बाऊ झाला नसता..... तर कदाचित मी कविता केली नसती.”
हा ‘कदाचित’ खरोखर अस्तित्वात यावा यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाचे योगदान गरजेचे आहे. आपल्या बरोबरीने जगणाऱ्या एका माणसाला केवळ समाजव्यवस्था, रूढी, परंपरा, जातीव्यवस्था आणि विषमतेच्या जोखडाखाली चिरडून टाकून ‘पुरोगामी’ म्हणून शिक्का मारून घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. किमान याचे भान जरी समाजाच्या प्रत्येक घटकात अल्प प्रमाणात का होईना जागे करण्याचे बळ या संग्रहात आहे. त्याबरोबरच जिच्या पंखांना ताकद देण्याची गरज आहे, जिच्या पंखांवरील जड ओझे भिरकावून देण्याची गरज आहे, अशा सर्व ‘ती’ना आणि जगभरातील ‘ती’वर आईपण व बाईपणाचे ओझे लादणाऱ्या व्यवस्थेवर लेखणीने प्रहार करणारा हा कवितासंग्रह निश्चितच समाजमन जागे करणारा आणि मानवतेच्या सर्व मूल्यांची जोपासना करण्याची शिकवण देणारा आहे. बऱ्याच दिवसांनी काही आशयसंपन्न वाचल्याचे समाधान देणारा हा कवितासंग्रह आहे.
मी अभिनंदन करते कवयित्रीच्या शब्दभानाचे, सौम्यवृत्तीचे, माणुसपण जपणाऱ्या भावनेचे आणि विवेकपूर्ण, संयमी विचारांचे.
नाही उमगत 'ती' अजूनही..!
कवयित्री- डॉक्टर सोनिया कस्तुरे, मनोविकास प्रकाशन, पुणे, किंमत - रु.300/-, प्रथम आवृत्ती - 5 मे 2022