शिव : मातृकुलातील योद्धा

१३ डिसेंबर २०२२

मी लहान असल्यापासून माझ्या बालसुलभ मनाला हा प्रश्न नेहमी पडायचा, तो म्हणजे सर्व मंदिरांमध्ये देवमूर्ती रूपात असतात, तर फक्त शंकराचीच पिंड का? आणि त्याला ‘शिवलिंग’ असे का म्हणतात? या लिंगाचा पुरुषाच्या लिंगाशी काही संबंध असावा का, असे आणि इतर अनेक प्रश्न पडायचे. काही धार्मिक पुस्तके वाचत असताना, त्यामध्ये शंकर-पार्वतीच्या कथा आणि ज्योतिर्लिंगाच्या उगमकथा वाचूनही याचा उलगडा झाला नाही. मात्र, या काळामध्ये शाळेच्या सहली व कुटुंबासोबत वेगवेगळ्या गावातील मंदिरांमध्ये पर्यटनाच्या निमित्ताने भेट देण्याचा योग आला आणि तेव्हा महाराष्ट्राच्या बऱ्याच या जिल्ह्यांमध्ये आणि गावागावांमध्ये शिवलिंगाची मंदिरं आहेत, हे लक्षात आले. पुढे कॉलेजमध्ये गडकोट पालथे घालत असताना, कुठे डोंगरावर तर कुठे दरी कपारीत, घळीमध्ये एखादे तरी शिवलिंग हमखास सापडायचे. कधी त्याचं नाव रत्नेश्वर, तर कधी केदारेश्वर असायचे. तो देखील शिव म्हणजे शंकर हे गृहीत धरलेले. यातून महाराष्ट्रात इतकी विपुल नावांची; मात्र, फक्त लिंग प्रकारातील शिवाची मंदिरे आणि शिवलिंगे का, असा नवीनच सवाल डोक्यात पिंगा घालू लागला होता. या काळात मी दक्षिणेतील अनेक राज्यांमध्येही फिरलो आणि तिथेही मंदिर प्रकारात हाच शिवाचा प्रभाव प्रामुख्याने दिसून आला. पुढील काळात उत्तरेमधील राज्यांमध्ये फिरताना तो प्रभाव विरळ स्वरूपात का होईना बद्रीनाथ-केदारनाथ-विश्वनाथ अशा नावाने समोर आला. मात्र, लक्षणीय बाब ही की, महाराष्ट्र व दक्षिण भारतातील राज्यांमध्ये उत्तर भारतातील राज्यांपेक्षा शिवाचा प्रभाव हा जास्त ठळक दिसून आला. आता यामागचे कारण काय असावे, याचा उलगडा अजूनपर्यंत होत नव्हता आणि मनातील प्रश्नांची मालिका पुढे चालू होती.

सन २०१६मध्ये सह्याद्रीच्या रांगेमधील एका सुदूर खेड्यामध्ये स्वयंसेवक म्हणून मी शाळेच्या शिबिरात सहभागी झालो होतो. त्या शिबिरामध्ये तेथून जवळच असलेल्या एका गावातून एक प्राध्यापक-संशोधक (सदा पाटील, राहणार खेडे, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) आले होते. त्यांनी गप्पांच्या ओघात माझ्या या ‘शिवलिंगांचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त का?’ या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या संशोधनाच्या आधारे दिले आणि माझ्या मनात या नव्या ज्ञानाची भर पडली. ती म्हणजे मराठी प्रांतात आर्यपूर्व काळात राहत असलेले अनार्य म्हणजेच नाग संस्कृतीचे लोक हे इथले आदिम आणि त्यांचे दैवत शंकर. शंकर हा नाग कुलातील कोणीतरी प्रमुख असावा, हा माहितीचा नवीन धागा मला त्यावेळेस सापडला. या धाग्यावर मी समाधान मनात याबद्दल मिळेल ती माहिती वाचत राहिलो.

पुढे २०२० मध्ये मंगला सामंत यांची पुस्तके वाचण्याचा योग आला. त्यातील ’भारतीय सणांचे पाऊल-ठसे’ या पुस्तकांमध्ये त्यांनी वर्णन केलेल्या मातृकुळांचा, त्यांचे प्राणी, पक्षी वा इतर स्वरूपातील कुलचिन्ह आणि त्याचा शिवाच्या अनार्य, नाग कुळाशी असणारा सहसंबंध लक्षात आला.

आर्यपूर्व मातृकुले त्याकाळी भारतभर विखुरली होती. ज्यावेळी पुरुषसत्ताक आर्य टोळ्या उत्तरेकडून या संपन्न मातृसत्ताक स्थानिक लोकांशी भिडली; तेव्हा उत्तरेकडून काही मातृकुलांचा पराभव करत त्यांनी या कुलांना आपला राजकीय व सांस्कृतिक विजय मान्य करायला लावला. याच काळात आजच्या मराठी व दक्षिण प्रांतांमध्ये नाग चिन्ह असणारे मातृकुल अस्तित्वात होते. हा काळ सुमारे दहा ते पंधरा हजार वर्षांपूर्वीचा होता. आर्य वेगाने आक्रमण करत मातृकुले नष्ट करत होते. नागकुलातील लोक मात्र जात्याच लढवय्ये व चिवट असल्याने त्यांच्यात व आर्यांमध्ये या मराठी प्रातांत त्यावेळी अनेकदा तुंबळ युद्ध झाले. देव-दानव लढाई असा जो उल्लेख पुराणात सापडतो तो या व इतर अनेक आर्य-मातृकुल (अनार्य) संघर्षांचा.

यामध्ये शिव हा मातृकुळातील पराक्रमी पुरुष नेहमीच आघाडीवर असे. उत्तरेकडून पितृसत्ताक टोळ्यांमधून आलेले आर्य व महाराष्ट्र दक्षिण भारतातील मूलनिवासी नागलोक यांचा हा राजकीय संघर्ष प्रचंड प्रमाणात होऊन दोन्ही बाजूंची प्रचंड मनुष्यहानी झाली, तेव्हा हा संघर्ष थांबावा म्हणून आर्य कुलातील काही विवेकी व विचारी ज्येष्ठांनी यावर उपाय म्हणून नागकुळाशी तह केला. यामध्ये खालील गोष्टी अंतर्भूत होत्या :

१. शिव हा मातृकुळातील योद्धा त्याच्या अतुलनीय शौर्यामुळे आणि आपल्या कुलाचे प्राणपणाने रक्षण करण्याच्या क्षमतेमुळे आजपासून सर्व आर्यांसाठी देवासमान असेल आणि आमच्या आर्यलिखित पुराणांमध्ये त्याचा सृष्टीचा कर्ताधर्ता व सर्व शक्तिशाली आणि संहारक म्हणून गौरव केला जाईल. (इथे त्याला संहारक म्हणण्याचे कारणही त्याची लढवय्या वृत्ती व आर्यांचे प्रचंड मनुष्यबळाचा विनाश करण्याच्या क्षमतेचे द्योतक म्हणावे लागेल. त्याचबरोबर याचा संदर्भ म्हणून गणेशपुराणात देव-दानव संघ गणपतीने स्त्री-सैन्य धाडले व त्याच्या मदतीनेच शंकराने मातृसैन्याची योजना केली असा उल्लेख आढळतो.)

२. यापुढे शिव या सरदाराची नाग मातृकुलाने सांगितल्याप्रमाणे पूजा करू व इतर आर्य देव, जसे इंद्र, गणपती, वरुण, ब्रह्म, विष्णू यांच्याप्रमाणेच त्याचेही मंदिर बांधून सन्मान करू. (यामधूनच पुढे शिवलिंग आणि शिवाचे विशिष्ट प्रकारचे पिंड या गोष्टींचा उदय झाला, त्याबद्दल याच लेखात पुढे लिहिले आहे.) शंकराचे पुराणांमधील रूप हे भाळी चंद्र व गळ्यात सर्प म्हणजे नाग असे आहे, त्याचे कारणच हे आहे की, तो मातृकुळातील नागकुळातीलच सरदार असल्याने गळ्यात, दंडावर नागाचे अस्तित्व हे त्या नागकुळाचे प्रतीक म्हणून आहे. मातृकुलातील स्त्रियांनी स्वतःला येणाऱ्या २८ दिवसांच्या मासिक पाळीप्रमाणे अनुभवास येणाऱ्या चंद्राचे पौर्णिमा ते अमावस्या हे २८ दिवसांचे कालक्रम अनुभवले व त्यातूनच मातृकुलास पूजनीय असणारा चंद्र (सूर्य नव्हे) हा शंकराच्या- नागमातृकुल सरदाराच्या- भाळी विराजमान आहे.

इथे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, सूर्य हे आर्यांचे आद्यदैवत. मात्र, सूर्य हा शिवाच्या भाळी नाहीये. त्याचप्रमाणे आर्यांना पूजनीय असणारे देव म्हणजे विष्णू,विठ्ठल, कृष्ण यांचा चंद्राशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही. कारण, पराभूत मातृकुलाने स्थापन केलेल्या, त्यांना पवित्र असलेल्या चंद्राशी जेत्या आर्यांच्या देवांचा संबंध येणे मुश्कीलच. यावरूनच शिव हा मातृकुलाचा असून त्याने चंद्र धारण करण्याचे कारण या तहातील ठरल्यानुसार त्याचे मातृकुलाला मान्य असणारे रूप आहे.

पुन्हा संघर्षातील तहाकडे येऊया. आता शिवाची, म्हणजेच मातृकुल नागवंशीय सरदाराची पूजा करायची तर ती कोणत्या रूपात करायची, या प्रश्नासाठी आर्य-नागकुल यांच्यातील तहात नाग जमातीने आपल्या संस्कृतीतील ‘समागमा’चे चिन्ह पुढील पिढ्यांसाठी मोठ्या खुबीने आणि हुशारीने सुचवले. यामागचे कारण म्हणजे आपली मातृसंस्कृती व त्यातील योनीशिल्पातील जुनी पूजेची संकल्पना अबाधित राहावी व पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी, हा त्यामागचा उद्देश होता. ही पूजा म्हणजे मातृसंस्कृतीतील योनीशिल्प पूजेची पुढचीच पायरी. इतर मातृकुले आपले अस्तित्व व संस्कृती हरवत असताना नागकुलातील मातृकुलाने या ऱ्हासातून आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी केलेला हा चाणाक्ष प्रयत्न.

योनीपूजा मातृसंस्कृतीसाठी नवीन नाही. आर्य येण्यापूर्वी असलेले भारतातील व महाराष्ट्रातील अनेक मातृकुलांमध्ये असा समज होता की, स्त्री ही मूल जन्माला घालू शकते आणि तिला ही नैसर्गिक देणगी असल्याने मातृकुलातील सर्व स्त्री-पुरुष योनीची पूजा करायचे आणि त्याला पवित्र मानायचे. आजची भारतातील अनेक योनीशिल्पे याची पुराव्यासकट साक्ष देत उभी आहेत.

मग, आजच्या शिवलिंगामधील ‘लिंग’ आलेत ते कुठून? तर हा तह होत असताना नागकुलाच्या शिवाची योनी म्हणून पूजन करण्याच्या मागणीला पुरुषसत्ताक आर्यांनी मान्यता देणं जवळजवळ अशक्यच. तेव्हा यातून संघर्ष पुन्हा वाढू नये म्हणून नागकुल व आर्यांमधील समजूतदार लोकांनी असा मार्ग काढला की, योनी व त्यामधील लिंग ही समागमाची पद्धत शिवाचे रूप म्हणून मान्य करावी. आज आपण ज्या ठिकाणी मंदिरांमध्ये पाहतो ते फक्त लिंग नसून त्याभोवती गोलाकार असणारी व तो गोलाकार भाग पूर्ण न होता समांतर रेषेत बाहेर पडणाऱ्या रेषांची योनीही उपस्थित असताना दिसते. यालाच आज आपण शिवलिंग म्हणतो. यावरून हे सिद्ध होते की, मातृकुलातील नाग कुळाने आपली संस्कृती या लिंगामार्फत पुढे नेण्याचा प्रयत्न केला व तो आज लिंगशिल्परूपाने का होईना, अस्तित्वात आहे. मात्र, याला समागम शिल्प म्हणून मान्यता प्राप्त झालेली. मग याला शिवलिंग हे नाव प्राप्त कसे झाले? यामागेही काही इतिहास घडलेला आहे तो आपण समजून घेऊया.

दहा हजार वर्षांपूर्वी झालेल्या या संघर्षात राजकीयदृष्ट्या आर्यांचे अस्तित्व प्रबळ असल्याने या लिंगामागच्या कथेला कालांतराने तिलांजली देण्यात आली आणि ज्योतिर्लिंगाच्या व इतर अनेक शिव-पार्वतीच्या कपोलकल्पित मिथक कथा पूर्वापार कर्णोपकर्णी चालत आल्या व त्या आजही प्रचलित आहे.

शिवाच्या म्हणजे या नाग सरदाराच्या मृत्यूनंतर नागकुल ऱ्हास पावत गेले आणि या जातीच्या लोकांनी घनदाट डोंगरांमध्ये आश्रय घेतला आणि त्याचबरोबर त्यांची मातृसंस्कृतीही डोंगरामध्ये बद्ध झाली. मात्र, आजही महाराष्ट्रात आणि विशेषतः माझ्या निरिक्षणात पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी नागशिल्पे, पाच फण्याचा नाग चित्रासह शिल्पांमध्ये आढळून येतात. आपण नागपंचमी साजरी करतो ती याच नागकुलाची आठवण म्हणून. त्याबद्दल कधीतरी नक्कीच बोलू. नागाव, नागोठणे, नागपूर, नागज अशी एक ना अनेक गावे ही नागकुलाचा वारसा अभिमानाने जपताना आजही दिसतात. या व अशा अनेक संदर्भ-पुराव्याने हे सिद्ध होते, की नागकुल व मातृसंस्कृती आजही महाराष्ट्रात आहे व त्याचा वारसा आपण महाशिवरात्र व इतर असे अनेक सण साजरे करत नकळत चालवत आहोत. महाराष्ट्रात आजही शिव मंदिराजवळ बर्‍याचदा तुम्हाला नागांची दगडामध्ये कोरलेली शिल्पे दिसतात आणि ती विपुल प्रमाणात मराठी प्रांतात आढळण्याचे कारण हे येथील स्थानिक अनार्य नाग वंशाचे लोक होत. आजच्या मराठी माणसाकडे चिवट व अभिमानी असण्याचा गुण जो देशभरात गौरवलेला आहे व इतिहासात वेळोवेळी दिसला आहे, त्याची जनुके ही या शिव सरदाराच्या आर्याबरोबरच्या चिवट संघर्षाशी जोडली गेलेली आहेत.

(सांगलीजवळ असणाऱ्या गोटखिंडीच्या संतोषगिरीवरील नाग शिल्पाचे चित्र. मी ऑक्टोबर २०२०मध्ये इथे गेलो असता अशी अनेक शिल्पे आढळली.)

आर्यांच्या पुढच्या पिढीने मात्र या शिवाची खूप वेळा पुराणातील कथालेखनातून विटंबना केली. जसे एखाद्या गावात चांगली व वाईट माणसे असतात त्याचप्रमाणे अर्यांमधील काही कट्टर पुरुषसत्ताक लोकांनी शिव सरदाराच्या मृत्यूनंतर नागर भागामध्ये गावे वसवत असताना शिवाची ‘शिश्न देव’ (शिश्न म्हणजे पुरुषाचे लिंग) व ‘स्मशानातील देव’ म्हणून हेटाळणी केली. (संदर्भ : पुरोहित वर्ग वर्चस्व, डॉक्टर सुमंत). त्याचे कारण हे त्याकाळी आर्य नाग संघर्षातून झालेला प्रचंड नरसंहार व नंतर झालेले नाग लोकांचे डोंगरदऱ्यातील स्थलांतर हे असावे. ‘स्मशानदेव’ म्हणण्यामागे आजचा काही गूढ व अघोरी तंत्राशी या देवाचा असणारा संबंध समजतो. त्यावेळी झालेल्या आर्यांच्या सैन्याचा नरसंहार व त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या शिवाचे नेतृत्व व कर्तृत्व हे या नावे ठेवण्यामागाचे कारण असावे. आर्यांचा आपण एकमेव नागकुल या मातृकुलावर विजय मिळवू न शकल्याचा व त्यांच्याशी तह करून त्यातील एका मातृकुलातील सरदाराला ‘देव’ म्हणून स्वीकारत त्याची पूजा करावी लागल्याचा दुस्वास या व इतर अनेक हेटाळणीयुक्त संदर्भातून दिसून येतो. त्याला ‘पाताळलोकीचा, मृत्युलोकीचा देव’ म्हणण्याचे कारणही यातच सापडते. याचबरोबर शिवाची नटराज तांडवाची, जगाचा संहार करणारी मूर्ती हेही याच कल्पनेचे पुढचे पाऊल. त्यांनी त्याचं नाव कालांतराने ‘शिवलिंग’ असे ठेवले, ज्यात मातृकुलाची समागम शिल्पाची कल्पना धुडकावत शिवाच्या नावावर आर्यांची संस्कृती फैलावत नेण्याचा हेतू होता. आर्यांच्या इतर कोणत्याही देवाला लिंग या नामाभिधानाने जोडले नाहीये आणि राम, कृष्ण, विष्णू, विठ्ठल, गणपती अशा कोणालाच लिंग या प्रतीक स्वरूपात पूजले जात नाही.

कालांतराने ‘समागम शिल्पा’स शिवलिंग संबोधणे हा मातृकुळातील नागकुलाच्या तहातील वचनास दिलेला मोठा धक्का होता. ज्योतिर्लिंगाच्या आर्यारचित कथांमध्ये सर्व ठिकाणी त्याची उत्पत्ती एखाद्या बनात झालेली दिसते. उदाहरणार्थ, डाकिनी वनातील भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग ! आजही गावांमध्ये स्मशान, नदीकिनारी वा गावाच्या बाहेर हे शिवलिंग म्हणजेच शंकराचे मंदिर दिसते. अनेक गावांमध्ये तो वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. जसे रामेश्वर, विश्वनाथ, रत्नेश्वर, भीमाशंकर, वैद्यनाथ इत्यादी. हे फक्त शिवाबाबत घडते आणि इतर देवांच्या नावांमध्ये अशी स्थलकालानुसार नाव देण्याची पद्धत नाही, हे लगेच लक्षात येते. याचे कारण असे आहे की, भारतामध्ये आजही नकळत नागकुलाला पुजणारे महाराष्ट्र व भारतभरामध्ये प्रांत आहेत व त्यांनी आपल्या प्रांताची आणि आपल्या वस्तीस्थानाची साधर्म्य असणारी नावे आपल्या या शूर,पराक्रमी सरदाराची आठवण म्हणून शिवाला दिली. याबाबत मी पाहिलेले उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये मी रतनगडावर मुक्कामासाठी गेलो असताना पायथ्याशी असलेल्या रतनवाडी या अतिशय दुर्गम जंगलात असणाऱ्या रतनवाडी या गावामध्ये अमृतेश्वराचे असणारे मंदिर आणि तिथे असणारी शिवलिंगे. याचा आणखी एक संदर्भ हा सांगली जिल्ह्यातील ताकारी या गावामध्ये उंच डोंगरावर असणाऱ्या जंगलातील १०८ शिवलिंगामध्येही (सागरेश्वर मंदिर) दिसून येतो. नागकुलातील लोक आर्यांबरोबर झालेल्या संघर्षानंतर डोंगरामध्ये वसायला लागले आणि त्यातूनच ही सुदूर जंगलात सापडणार्‍या आणि तुलनेने मुख्य आर्य देवांच्या मंदिरापासून दूर असणाऱ्या या शिवाची लिंगे तुम्हाला दिसतात.

महाराष्ट्र व इतर कोणत्याही प्रांतात तुम्ही निरीक्षण केले, तर हेही लक्षात येईल की शिवाचं लिंग हे स्वयंभू असते. म्हणजेच त्याबरोबर विष्णू-लक्ष्मी किंवा विठ्ठल-रुक्मिणी किंवा गणपती-रिद्धीसिद्धी अशा प्रकारची मंदिराची रचना नसते. आर्यांनी रचलेल्या अनेक कथांमध्ये शिवपार्वती हे विवाहित पुरुष-स्त्री व त्यांचा मुलगा गणपती असा उल्लेख आहे. तरीही, भारतामध्ये कोठेही शिव व पार्वती यांचे मंदिर आढळून येत नाही. याचे कारणच शिव हा मातृकुलातील सरदार असल्यामुळे व मातृकुलामध्ये लग्नपद्धती अस्तित्वात नसल्याने पार्वती नामक कोणत्याही देवीचे मंदिर हे शिवलिंगाच्या शेजारी आढळून येत नाही. यावरून शिव हा मातृकुलातील सरदार असल्याचे व मातृकुलातील लग्नसंस्था तो मानत नसल्याचे त्याच्या स्थापन केलेल्या स्वयंभू एकल शिवलिंग यातून दिसते.

आता तुम्ही म्हणाल की, शंकराचे फोटो जे बाजारात उपलब्ध आहेत किंवा मंदिरात दिसतात, ते कुठून आले? तर आर्यांनी रचलेल्या कपोलकल्पित कथांमधून व स्मशान देवाच्या या रूपावरून, त्याचप्रमाणे तहात ठरलेल्या मान्यतेवरून शंकर हा जटा असणारा रानटी असा (नागकुलाचा, वनात राहणारा म्हणून), गळ्यात सर्प (नागकुलाचे चिन्ह), भाळी चंद्र (मातृकुलास वंदनीय व स्त्रीच्या मासिक पाळीच्या २८ दिवसांशी चंद्रकलांचे असणारे साधर्म्य) व स्मशानात राहणारा भोळा सांब (असे म्हणण्याचे कारण आर्यांनी त्याला मान्य असलेल्या तहातील कल्पना नंतर बदलल्या व त्याला मातृकुल किंवा नागकुलाने विरोध केला नाही, म्हणून आर्यांच्या कपटी डावास तू शरण गेला, असे समजून त्याला ‘भोळा’ म्हणणे) आणि नंदीवर बसलेला (नंदी म्हणजे बैल चिन्ह असलेल्या एका मातृकुलावर पूर्वी नागकुलाने विजय मिळाल्याची खूण म्हणून नागकुलातील शिव हा नंदी हे वाहन वापरतो जी मातृकुळातील आपसात विजयाची ओळख आहे) असा चित्रे व कथांमधील कल्पना करत आकारास आलेला शंकर आजच्या लोकांपर्यंत पोहोचला.

रावण हा मातृभक्त, शिवशंकर भक्तही होता. यातूनच त्या काळात आर्यकुलीन पितृभक्त रामाच्या (मातृभक्त रामाच्या नव्हे,) रावणाशी असलेल्या संघर्षाची बीजे रोवली गेली. महाराष्ट्रातील व समस्त भारतात प्रसिद्ध झालेल्या ‘महाशिवरात्री’ला नागमातृकुल-आर्य संघर्षाचे अधिष्ठान आहे व या महान नागकुलीन सरदाराची आठवण म्हणून ज्या रात्री दिवसभराच्या युद्धानंतर हा तह झाला, त्याची आठवण म्हणून हा महाशिवरात्रीचा सण महाराष्ट्र व देशात दरवर्षी साजरा केला जातो. इथेही आपल्या हे लक्षात घ्यावे लागेल की आर्य हे सूर्यपूजक. त्यांचा कोणताही सण हा दिवसा करण्याची कृषीपूजक संस्कृती आहे. मात्र, नागकुल हे रात्री एकत्र जमून आगीच्या भोवताली होळी व असे इतर सण साजरे करत असल्याने महाराष्ट्रामध्ये महाशिवरात्रीचा सण हा नाग कुलातील शिव या सरदाराला आर्यांकडून ‘दैवता’ची मान्यता मिळण्याचा क्षण म्हणून रात्री साजरा केला जातो. त्यामुळे आर्यांनी व्यापलेल्या या भारतीय संस्कृतीतही मराठी लोक तिला ’शिवरात्र’ म्हणतात व मातृसंस्कृतीचे आणि नागकुलाच्या शिव या योद्ध्याचे नकळत हा होईना स्मरण होत राहिले ते आजपर्यंत.

(फोटो सौजन्य : इंटरनेटवरून साभार)

सौरभ कुंभारे
saurabhkumbhare31@gmail.com