शबरी कवितेची जन्मकथा

१५ सप्टेंबर २०२५

‘शबरी’ या कवितेची जन्मकथा म्हणजे केवळ एका कवितेची निर्मिती नव्हे, तर कवी किरण शिवहर डोंगरदिवे यांच्या स्मृतींचा, संवेदनांचा आणि अनुभवांचा प्रवास आहे. बालपणातील साधेपणा, ग्रामीण जीवनातील माणुसकी आणि नात्यांतल्या सूक्ष्म भाव भावना यांना भिडणारा हा लेख वाचकांच्या मनात घर करून राहतो. साध्या, बोलक्या भाषेतली ही कहाणी कवितेच्या मागचं खरं आयुष्य उलगडते आणि वाचकाला भावनांच्या खोल सागरात घेऊन जाते.

एखाद्या कवितेचा जन्म नेमका कसा होतो? खरोखरच सांगणे कठीण असते नाही का? पण मला नेहमी असे वाटते की कविता कितीही वेळेवर तयार झाली तरी तिचे बीजांकुरण मनात फार पूर्वी झालेले असते, आणि एखादेवेळी उत्स्फूर्तपणे ज्वालामुखी प्रमाणे मनाच्या आतून बाहेर उसळी घेऊन धावते. आता ज्वालामुखीतून प्रसावणार लाव्हा रस हा वेळेवर तयार झालेला नसतो, तर तो पृथ्वीच्या पोटात आतच नांदत असतो. प्रसंगानुरूप संधी मिळाली की तो भूकवच फाडून बाहेर पडतो अगदी तश्याच काही प्रतिमा, प्रतीक, घटना माझ्या काव्यातील व्यक्तिरेखा अगदी बालपणापासून माझ्या अंतरंगात दडून बसलेल्या आहेत. कधी एखादेवेळी त्या शब्दरूप घेऊन काव्यरूपात साकार होऊन मनाला प्रसन्नता बहाल करतात किंवा नकळत खिन्नता बहाल करतात. सागरात उंच झेपावणारी लाट सागराच्या किती खोल आतून आली आहे हे पाहणारा सांगू शकत नाही, तसेच कवितेचे असते. एखादी कविता नेमकी कधी, कशी आणि कोठे रुजली असेल हे कुणीच सांगू शकत नाही.

अशीच माझ्या मनात खूप आधीपासून एक म्हातारी बसलेली होती. वनवासात रामाची वाट पाहत बसणारी आणि त्याने आंबट बोर खाऊ नये म्हणून स्वतः चाखलेली बोर त्याला खाऊ घालणारी एक संस्कार कथा. अगदी लहानपणापासून बोर विकणारी म्हातारी समोर दिसली की मनःपटलावर आठवणींची खिडकी किलकिली करून समोर येते. तश्या मेहकर सारख्या ग्रामीण बाज असलेल्या तालुक्याच्या गावात अगदी ५ वी ते १२ पर्यंत मे ए सो हायस्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय असे नाव असलेल्या शाळेत शिकत असताना शाळेच्या फाटकापाशी बसून बोर विकणाऱ्या लुगडी घालून बसणाऱ्या खेडवळ म्हाताऱ्या आता दिसत नाहीत. पण १९८६-९४ ह्या आमच्या शिक्षण काळात त्या फटकाजवळ ठाण मांडून बसलेल्या असत. त्यामुळे पुढे आजवर शाळा आठवली की त्या चार पाच म्हाताऱ्या आजही आठवतात. त्यांची नावे म्हणाल तर फक्त दोनच.... मावशी आणि आजी...त्यांची खरी नाव आम्हा मित्रांना आजही ठाऊक नाहीत. त्यातही आम्ही चार पाच मित्र एकत्रच राहत होतो. त्यातील एक म्हातारी अतिशय घरंदाज आणि आकर्षक रूप घेऊन जन्माला आली होती. माझ्या आजीप्रमाणे गोरीपान अंगावर सुरकुत्या, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणि जुन्या रुपयांच्या आकाराच कुंकू लावणारी ती म्हातारी आम्हा सर्व मुलांना आपलीशी वाटत असे. "शाळेत जातो पण चार आणे (पंचवीस पैसे) आठ आणे (पन्नास पैसे) दे" असे मागणे आईकडे करत शाळेत जाण्याचा तो काळ होता.

आजही दहा पैश्याच्या दोन संत्र्याचा आस्वाद देणाऱ्या दोन गोळ्या घेऊन त्यातील एक मित्राला देत गणिताच्या तासात तोंड गोड करण्याच्या आठवणी आजही जीभेवर पाणी येतं. तर कधी त्या पैशात आंबटगोड बोर घेऊन त्यांची चाखलेली चव आजच्या संकरित फळांना नाही एवढं नक्की. तर त्या घरंदाज आजीची आणि आमची खूप गट्टी जमलेली होती. इतर बोरवाल्या बाया जिथे दहा पैशात मोजून एक कप (तोही छोटा मोठा असे) इतके बोर देत असत तेथे ही आजी आम्हाला ग्लास भरून बोर देत असे. तिच्या जवळचे बोर गोडच असायचे मात्र एखादेवेळी आंबट असले तर ती आधीच म्हणायची, "बाबू आज का नाही म्या दुसऱ्या बोरीचे बोर आणले, जरासेक आंबट आहे तू दुसरी कडून घे" तिने असे म्हटले म्हणजे मग आम्ही त्या दिवशी बोर न घेता गोळ्या किंवा चॉकलेट ह्याकडे वळत असू त्यामुळे तेथील इतर म्हाताऱ्या आमच्याकडे सहज आणि त्या आजीकडे द्वेषाने पाहतात हे कळण्याचे ते वय नव्हते. रविवारी शाळेला सुट्टी असली की मेहकरच्या बाजाराच्या कोपऱ्यावर ती आजी बोर घेऊन बसलेली असायची. बाबांच्या सोबत भाजी बाजारात आम्ही तिला दिसलो की आमच्याकडे पाहून हसायची. आणि तिने बाबांच्या समोर आम्हाला ओळखले तर आपल्याला नेहमी होणाऱ्या सर्दीचे कारण बाबांना समजेल आणि पंचाईत होईल म्हणून आम्ही तिच्याकडे पाहिल्या न पाहिल्या सारखे करून पुढे सरकत असू. मात्र दुसऱ्या दिवशी शाळेच्या फाटकापाशी ती आमचे हसत स्वागत करी आणि पुन्हा आमचा बोराचा व्यवहार सुरू होई. काल आम्ही तिची ओळख नाकारली ह्या बद्दल ना खंत ना खेद... असे पाचवी पासून बारावीच्या वर्षापर्यंत सुरू राहिली. त्या आजीच्या डोक्यावर आधी काळ्या केसातून पांढरे केसांचे झुपके दिसायचे, आता पांढऱ्या केसातून काळ्या केसांचे झुपके दिसायला लागले होते. बारावी विज्ञान म्हणजे भविष्यातील डॉक्टर किंवा इंजिनिअर ह्या एकाच भावनेने शिकणारी आमची पिढी बोर खाताना अभ्यास कसा करावा हे सांगणारी शेवटची पिढी ठरावी असा तो काळ होता. एके दिवशी आम्ही दुपारच्या सुट्टीत बोर घ्यायला शाळेच्या फाटकापाशी गेलो तर आमच्यासाठी शबरी सारखी असणारी ती आजी हजर नव्हती. मग त्या दिवशी बोर घेतलेच नाही. पण दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीही ती आजी दिसेना.

इतर दोस्त मंडळी दुसऱ्या म्हाताऱ्याकडून आमच्या पुढे बोर खात होती. मग आम्ही तरी कोठवर दम काढणार नाही का? मग आणखी दोन दिवस गेले तरी ती आजी दिसेना मग आम्ही मित्रांनी आमचा खरेदी मोर्चा दुसऱ्या बोरवाल्याच्याकडे वळवला. अर्थात त्या आम्हाला आणि आम्ही त्यांना चेहऱ्याने ओळखत असलो तरी त्यांच्याशी आम्ही बोराचा सौदा केलेला नव्हता. मग त्यांच्याकडून आम्ही बोर घेतले. तेथून बोर खिशात भरून निघणार तोच ती बोरावली बोलली "अरे, बाबू येत जाय बरं रोज बोर घ्याले." त्यावर आमच्यतला एकजण सहज बोलला, "हो येत जाऊ ना" त्यावर तेथे असलेली आणखी एक बोरावाली मावशी बोलली, "हो रे गुलाम तू कशाचा रोज येतो, ती तुमची आजी आली की आमच्याकडं पाहत भी नाही तुम्ही." त्यावर काय बोलावे ते आम्हाला सुचलं नाही तरीही उसने अवसान आणून मी बोललो, "तसं काही नाही मावशी, पण त्या आजी १० पैशात मोठा ग्लास भरून बोर देतात. तुम्ही मोठ्या ग्लासभर बोराचे २५ पैसे घेता" असा स्पष्ट आणि रोखठोक व्यवहारवाद मला मोठेपणी जमला नाही. म्हणूनच माझे काही नातेवाईक म्हणतात त्याप्रमाणे एक कवी म्हणून जगताना पुस्तक माणसं आणि सन्मानचिन्ह एवढं सोडून गाठीचा सातबारा आजही कोरा आहे. अर्थात मला त्यात समाधान आहेच, पण आजची ही व्यवहारशून्यता लहानपणी माझ्यात नक्कीच नव्हती. माझं ते बोलणं ऐकून माझ्या समोरची बोरावाली बाई चमकली आणि मग समजवाणीच्या सुरात मला म्हणाली. "बाबू, अरे तिनं तुम्हाले फुकट बोर वाटले तरी फरक पडत नाही, तिचा पोरगा नोकरील हाये, बंबईत सायेब हाय त्यो, चार पाच हजार रुपये पगार हाये त्याले".

तिचं बोलणं संपत नाही तोच दुसरी बोरावाली मावशी बोलली, "नाही व माय इतका नसण, लय त लय दोन आडीच हजार असण" त्यांच्या चर्चा आम्ही ऐकत होतो, त्याकाळात SBI मध्ये असणाऱ्या माझ्या वडिलांचा पगार मला माहित नव्हता. ते २०११ मध्ये गेल्यावर त्यांचा शेवटच्या पगाराचा आकडा आकडा तेवढा मला समजला, पण शिक्षिका असलेल्या आईचा पगार १२००रु होता हे आईनेच मला सांगितले होते. म्हणजे ह्या बोरावाल्या म्हातारीचा मुलगा आपल्या शाळेतील सर्व मास्तर लोकांच्या पेक्षा नक्कीच श्रीमंत असावा हे माझ्या मनात पक्के झाले होते. मग इतकी श्रीमंत असलेली ही म्हातारी बोर का विकते? असा प्रश्न मला पडला. त्यानंतर तेथून निघाल्यावर आम्ही मित्रांची याविषयी चर्चा झाली. त्यात कदाचित तो मुलगा आईला पैसे देत नसेल असा निष्कर्ष आम्ही काढला. त्यानंतर तीन चार दिवसांनी ती आजी बोर विकायला शाळेपाशी आली तेव्हा मी मुद्दाम तिच्याजवळ जाऊन उभा राहिलो. सवयी प्रमाणे चार पाच बोर चाखून पाहायला घ्यायचे आणि फुकट बोर खाल्ले हे बालवयीन सुख त्याकाळी आम्ही खूप अनुभवायचो. मात्र आज मी चाखण्यासाठी बोर घेतले नाही, तर मूठभर बोर हातात घेऊन माझ्याकडे लांबवले त्यावर ते न घेता मी त्यांना विचारले, "आजी कुठे गेल्या होत्या?"

त्यावर हसून "गावाले गेले होते, लेकाच्या सासुरवाडीले, तिथं नातू येणार होता त्याच्या मायच्या संग". "मग आला होता का तुमचा नातू" मी भोळेपणाने विचारले. त्यावर ती आजी गहिवरून बोलली, "नाही न रे बाबू, ती सटवी एकटीच आली तिच्या भवासंग, ना तिच्या लेकाची भेट झाली ना मह्या लेकाच्या..." अस म्हणून ती लुगड्याच्या पदराला अश्रू पुसू लागली. आता अश्यावेळी कसं समजावतात ते त्यावेळी मला नक्कीच कळत नव्हतं पण मी बोललो , "आजी रडू नका, येईल नातू तुमचा पुढच्या वेळी, केवढा आहे तो?" त्यावर अश्रू पुसत चेहऱ्यावर हास्य फुलवत ती बोलली," तो आहे तुझ्यावाणी. जरासा सावळा हाय पण तुह्यापेक्षा चार पाच बोट उंच्चा भरन... म्हणजे जन्मापासून अजून नाही पाहिलं त्याला, पण तिगस्ताच्या दिवाळीत त्याच्या बापानं फोटो दाखवला होता, बरं ते जाऊ दे घे बरं बोर जेवढे पाहिजे तेवढे अन दे पैसे जे असतीन ते, बाकी पोर येऊन राहिले." आता म्हातारीच्या पोराला आपल्या आईपेक्षा आणि मास्तर पेक्षा जास्त पैसे मिळतात हे मला जाणून घ्यायचे होते, म्हणून मी हिम्मत करून तिला विचारले, "किती पगार आहे वो आजी तुमच्या पोराला?"

त्यावर चमकून तिने माझ्याकडे पाहिले, हसली आणि म्हणाली दोन हजार आन चारशे रुपये भेटतात त्याले, त्यातले मले पाठवते तो हर महिन्याले चारशे रुपये, तसा गुणांचा हाये पण येत नाही भेटायले, ह्याबारीन त सहाशे पाठवले पण मले त्याचे पैसे काय करायचे बापा, त्यो आन मपला नातू आला भेटायले का मी गंगा न्हाले म्हण....." हा प्रसंग माझ्या मनावर पक्का कोरला गेला. पुढे मी स्वतः शिक्षक झालो. आणि बोरी गावात दुपारच्या सुट्टीत माझे बोरी गावात स्थायी राहणारे सहकारी शिक्षक मदन डव्हळे सरांनी त्याच्या नात्यातील एक म्हातारी मेली म्हणून बातमी सांगितली. तसेच तिच्या अंत्यविधीसाठी तिचा मुलगा नसल्याने गावकऱ्यांनी सारे केले इत्यादी सांगितले. मुलगा का आला नाही असे विचारल्यावर तो अमेरिकेत राहतो, तिकडेच स्थायी झाला असून दहमहा वीस पंचवीस हजार रुपये पाठवत होता. तसा तो चांगला आहे पण त्याचे येणे होत नाही, मागील चौदा पंधरा वर्षांपासून म्हातारा म्हातारी दोघेच राहत, मुलगा गेला तो आलाच नाही असे सांगितले. त्यारात्री अडीच तीन वाजता मला जाग आली, अस्वस्थता वाढली, मदन सरांनी सांगितलेला किस्सा मला भूतकाळात नेत होता, बोर विकणारी म्हातारी, माझी स्वतःची आजी, अमेरिकेत नोकरी करणाऱ्या साहेबांची अनाथासम जळणारी आई आणि शबरी नावाची रामकथेतील म्हातारी सर्व एकत्र झाल्या. भावभावनाची गुंतावळ वाढली. कागद पेन हातात घेऊन मी लिहायला बसलो आणि माझी शबरी ही काव्य नायिका जन्मास आली ती पुढीलप्रमाणे

शबरीची बोर शाळेच्या वाटेवर बोरं विकत बसे म्हातारी; चिलीपिली तिच्याभवती गोंगाट करत भारी. टोपलीमधल्या बोरांची चव असे न्यारी; म्हातारीला बघून आठवे रामाची शबरी. जशी जशी भवताली पोरं होत गोळा; तसतसा हरखुन जाई तिचा जीव भोळा. ‘चार आण्याला मूठभर’ भाव होता रास्त; विकत घेण्यापेक्षा पोरं चाखून बघत जास्त! कुणीतरी सांगे ‘तिचा परदेशात असतो लेक; दर महिन्याला पाठवतो दहा हजारांचा चेक!’ गुरुजींनी विचारलं एकदा ठरवून काहीतरी; ‘बोरं का विकता? रग्गड पैसा आहे ना घरी?’ हताश हसून ती म्हणाली ‘काय सांगू लेकरा तुला; गोजिरवाणा एक नातू बी आहे परदेशात मला... ...पण अजून तरी मी त्याला पाह्यलेलं नाही; माझ्या हातचं बोर त्यानं चाखलेलं नाही. ...म्हणुन मी शाळेपुढं बोरं विकते अशी; न पाह्यलेल्या नातवाला शाळेतच शोधते जशी!’ म्हातारीच्या ममतेचा चेक कधी वठेेल ते सांगा...? बोर रानातील वाळली! नातू कधी भेटेल ते सांगा ? (कविता आली सामोरी ह्या आगामी ग्रंथातून.)

या प्रमाणे अगदी रात्री तीन वाजता पासून सकाळी सात साडेसात वाजेपर्यंत सात आठ वेळा बदलत बदलत शबरी जन्मास आली. ग्रेस सारख्या दुर्बोध आणि सौंदर्यवान शब्दांची आरास उभी करून कविता लिहिणारा मी ह्या इतक्या साध्या आणि सहजपणे तयार झालेल्या कवितेवर खुश नव्हतो. मात्र ती कविता सकाळी शाळेत जाण्याआधी बायकोला आणि दुपारी शाळेतील शिक्षकांना दाखवली. राजेंद्र वाघ हे शिक्षक माझ्यापेक्षा मोठे, तर श्रीरंग ठाकरे हे माझ्या वर्गात शिकलेले, असे दोन जण मेहकरच्या मे ए सो हायस्कुलचे विद्यार्थी होते. त्यांनी शाळेच्या फाटकापाशी बसून बोर विकणाऱ्या म्हाताऱ्या पाहिलेल्या होत्या त्यामुळे त्यांना हे काव्य चित्रण फार आवडले. तर परदेशातील मुलांच्या आई वडिलांचे दुःख इतरांना आवडले, मग शाळेतूनच ती कविता मी सप्तरंग सकाळ आणि किशोर मासिकाच्या ई-मेल वर पोस्ट केली. एक काव्याध्याय मार्गी लागला.

१८ जानेवारी २०१५, रविवारच्या सकाळी जाग आली ती मोबाईलच्या आवाजनेच.... मोबाईल हातात घेतला तर फोन उचलून बोलण्याआधी तीन चार call एकाच वेळी दिसत होते. रविवारी साहित्याच्या पुरवण्या येणे आणि त्यात आपली कविता आली की वाचकांचे फोन येतात हे मला १९९६ पासून चांगलेच अंगवळणी पडले होते. त्यातही साधारण २००० पर्यंत अनेकदा पत्रही येत, असा खूप मोठा पत्राचा साठा माझ्याकडे अजूनही जपून ठेवला आहे. आता येणाऱ्या फोन कॉलचा साठा करता येत नाही. मात्र प्रत्यक्ष बोलल्यामुळे भावना कळतात. तर त्या वेळी सकाळच्या सप्तरंग ह्या महाराष्ट्र भर जाणाऱ्या पुरवणीत अशी बोलते माझी कविता ह्या सदरात फक्त दोनच कविता प्रकाशित केल्या जात. त्यात माझे आवडते कवी नारायण कुलकर्णी कवठेकर आणि माझी एक अश्या दोन कविता त्यादिवशी प्रकाशित झाल्या होत्या. आणि त्यातील माझी शबरी ही कविता आवडल्याचे लोकांचे फोन सुरू झाले होते. कॉल मागे मागे येणे सुरू झाले होते, त्यात अनेक मान्यवर साहित्यिकही होते. मात्र मला त्यांचा फोन घेतल्यावर दुसरा फोन येत होता. चार पाच कॉल उचले पर्यंत सतरा ते अठरा मिस कॉल जमा झाले होते. अँड्रॉइड फोन असल्यामुळे सहज इंटरनेट सुरू केले तर एकाच वेळी whats app, sms आणि फोन कॉलच्या रिंगटोन वाजणे सुरू झाले. सकाळी सव्वासात वाजता उठलेला मी सकाळी पावणे अकरा वाजले तरी फोनवर बोलत होतो. तेवढ्यात माझा लहान भाऊ जो स्वतः शिक्षक आहे तो मला भेटायला खालून वर आला. (एकाच वाड्यात असलेले आम्ही तीन भाऊ दोघे खालच्या व मी वरच्या मजल्यावर राहतो) त्याला फोनवर पुढून लोक कविता आवडली असे बोलतात त्यांना धन्यवाद, thank you असे उत्तर दे असे सांगून मी अगदी पंधरा मिनिटात ब्रश, अंघोळ इत्यादी प्रांत:विधी उरकला आणि पुन्हा स्वतः फोनवर उत्तरे देऊ लागलो.

नंतर येणाऱ्या फोनची संख्या रोडावत गेली दोन वाजता ते प्रमाण साधारणपणे दहा मिनिटात एक कॉल इतके कमी झाले. मग मी बुलडाणा येथे विद्रोही साहित्य संमेलनात निमंत्रित कवी असल्याने निघालो. गाडी स्वतः चालवत नसल्याने फोन वर बोलणे सुरूच होते. मग विद्रोही साहित्य संमेलनात लोकनाथ यशवंत पासून अनेकांनी आज शबरी वाचली, आवडली अशी प्रतिक्रिया दिली. रात्री काव्यसादरी करण्यासाठी माझे नाव पुकारले गेले मी उभा राहिलो आणि गर्दीतून एकाच वेळी पाच सहा लोकांनी शबरीकार .... शबरी ... असे आवाज दिली. सूत्र संचालक रमेश आराख ह्यांनी शबरी सादर करा असे आवर्जून सांगितले पण मी शबरी सादरीकरणाचा मोह टाळला. कारण विठ्ठल वाघ ह्या काव्यक्षेत्रातील बाप माणसाने कोठे काय सादर करावे आणि कोठे थांबावे ह्याचे भान बाळगले पाहिजे असा मोलाचा सल्ला मला माझ्या घरी आल्यावर दिला होता. त्यामुळे विद्रोहीच्या विचार पीठावर शबरी मला तार्किक दृष्ट्या पटली नाही.

त्यानंतर त्या रात्री शबरी कवितेवर आलेले फोन मोजावे असे माझ्या मुलांनी ठरविले आणि दिवसभरात जवळपास ९६१ फोन कॉल २६० च्या आसपास SMS आणि खूप सारे whats app message त्यांनी मोजले. शबरी महाराष्ट्र भर गाजली. तिच्यावरील प्रतिक्रिया जवळपास तीन साडेतीन महिने येत राहिल्या. कोकणातील एका होमियोपॅथी दवाखान्यात कागदाचे पाकीट करताना हातात रद्दीचा कागद आला त्यावरची शबरी वाचून मुंबईला कामासाठी गेलेल्या मुलांची आठवण आली, म्हणून तेथे काम करणारा वयोवृध्द कंपाउंडर मला फोन करून बोलताना ढसाढसा रडला. तर कधी संध्याकाळी मुलगा सून नातू सिनेमाला गेले ते तिकडून खाऊन येणार म्हणून मंदिरापाशी वडापाव खाण्यासाठी येणाऱ्या काकूंच्या हातात वडापावच्या खाली शबरीची रद्दी आली. मग त्यांनी तो कागद घरी नेऊन दाराच्या आतल्या बाजूने चिटकवून रडून घेतल्याचे मला फोनवर सांगितले. कुणी शबरी म्हणजे काव्यरुप नटसम्राट असे बोलले. पुढे किशोर मध्ये आलेल्या कविता अभ्यासक्रमात येतात म्हणून ही कविता किशोरला पाठव असे सांगणारे बघितले. किशोरच्या दिवाळी अंकात ती कविता आली मग पुन्हा शाळेतील मुले आणि शिक्षक ह्यांचे फोन सुरू झाले. साधारणपणे निवृत्तीला आलेले शिक्षक गहिवरत, रडत.... शेवटी दुःख चेहरा वेगळा असला तरी दुःख एकच असत. शबरी साठी तीस चाळीस फोन परदेशातून आले त्यात अमेरिकेतून जास्त.... अमेरिकेतील अनेक म्हाताऱ्या व्यक्ती फोनवर रडत. पुढे त्या कवितेची गोरमाटी, वडार अश्या बोलीभाषा मध्ये अनुवाद झाले.

नामदेव कांबळे हे बालभारतीचे अध्यक्ष असल्याने आणि ते वाशीमचे असून जवळपास १९९९ पासून परिचित असल्याने एक दिवस त्यांच्याशी फोनवर बोलताना पाठयक्रम आणि शबरी ह्याबाबत चर्चा केली. तेव्हा नावावर तर चिट्ठी होती पण किशोर मधील बोर विकणाऱ्या म्हातारीची कविता समोर आली होती, आम्हा सर्वांना आवडली होती. मात्र धार्मिक संदर्भ असलेले काहीच घ्यायचे नाही त्यामुळे वाद होतात असा आमचा निर्णय होता, म्हणून ती बाजूला राहिले असे त्यांनी सांगितले. त्यावर काय बोलावे ते मला कळले नाही. मग एका भेटीत आदरणीय विठ्ठल वाघ वरील किस्सा ऐकून ह्यांनी जर मी असतो तर शबरीच नाव म्हातारी अस ठेऊन ही कविता घेतली असती असे सांगितले. मग मी स्वतः किशोर मधील पानांची झेरॉक्स, सोबत नाव बदलून पुन्हा ती कविता पाठविली. ती तेथे पोहचल्याचे उत्तर आले. मात्र पुन्हा त्या वर्षी निवडलेल्या अभ्यासक्रमात शबरी बाजूला राहिली. मग मीही पुन्हा त्या गोष्टीचा नाद केला नाही. एकाने मला, "तुझा पत्ता समता नगर आहे, त्यामुळे ह्या व्यवस्थेला तुझ्यापर्यंत यायला अडचण वाटते असे उद्गार काढले. त्यावर मी मनोमन हसलो. पण शबरी हसण्याचा विषय नव्हता. आजच्या संभ्रमित वर्तमानाचा दुखरा आणि भयावह चेहरा उभा करताना माझ्या बालपणीच्या सुखद आठवणींचा तो मागोवा आहे असे म्हणावे लागेल.

  • किरण शिवहर डोंगरदिवे मो: 7588565576