संधी न मिळालेल्या समूहाची गोष्ट

या पृथ्वीतलावावर कुठेही आपण जन्मलेलो असलो आणि जर मुख्य धारेतल्या समूहात नसलो, तर आपण जगण्यास लायक नसतो. मुख्य धारेतील सत्ताधारी अशा समूहाला बाहेर फेकत असतात. एकदा का हा समूह बाहेर फेकला की, तो मुख्य धारेतल्या संधींपासून वंचित राहतो. आणि तो वंचित राहिला की मागास बनतो; मागास बनला की, त्याच्या जगण्याची लढाई सुरू होते. मग, तो त्या जगण्याच्या आणि दोन वेळचं पोट भरण्याच्या नादात माणूस म्हणून जगणं विसरून जातो. तो जगतो फक्त पोट भरण्यासाठी. मग, दारू पीत, नशा करत, सिगरेट ओढत, चोरी करत, सत्ताधारी समाजाचं अनुकरण करत पुढे जात राहतो. पण त्याला स्थिर आयुष्य जगण्यासाठी काहीच मिळत नाही. तो सतत अस्थिर असतो. तो सतत बेचैन असतो. घरात, दारात आणि समाजात तो आत्मप्रतिष्ठा हरवून बसलेला असतो. कारण, त्याचं अस्तित्व मुख्य धारेतील समूहानी मान्य केलेलंच नसतं. म्हणून तो आत्मविश्वास नसल्यासारखा जगत राहतो. त्यातून होत राहतात घरादारात भांडणं, मारामारी आणि पोलीस केस. मग, अडकतो तो आयुष्यभरासाठी…

अशा जगण्याच्या गर्तेत अडकलेल्या समूहातील मुलांना कोण तरी येऊन फुटबॉल खेळायला शिकवतो, आणि त्यांच्या आतील ऊर्मी व स्वाभिमान जागा करतो. एकदा का या मुलांना फुटबॉल खेळण्याची कला माहीत झाली की, तो त्यांचा छंद बनतो. सुरुवातीला पाचशे रुपये देऊन विजय सर त्यांना खेळण्यास भाग पाडतात. नंतर पैसे नाहीत म्हणून विजय सर वस्तीत जातच नाहीत. मग, तीच मुलं त्यांच्याकडे येतात. आणि पैसे नको फक्त खेळण्यास बॉल द्या, असं म्हणतात. तिथून त्यांच्या मानसिक बदलाचा प्रवास सुरू होतो. मग, ती मुलं मागं वळून बघत नाहीत. विजय सर म्हणतात, “ही मुलं एका दगडात डुकराला खाली पाडतात. जर यांच्या हातात बॉल दिला, तर ते राष्ट्रीय पातळीवर खेळू शकतील. ही झुंड नाही, तर टीम आहे. फुटबॉल हे त्यांना बदलण्याचं माध्यम आहे.” म्हणजेच कोणताही खेळ असेल, कला असेल किंवा अजून काही असेल ते जर अशा समूहातील मुलांना योग्य वेळी मिळालं, तर त्यांचं जीवन बदलेलल; पण देशाचं ही नाव उंचावेल. यासाठीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत वंचित आणि प्रवाहाबाहेरच्या समूहासाठी आरक्षणाची मागणी केली होती, आणि तत्कालीन घटना समितीतील सदस्यांनी त्याची परिपूर्ती केली. म्हणूनच आज विविध जातीसमूहांना आरक्षण मिळत आहे. पण ते आरक्षण अजूनही तळागाळातील वंचितांपर्यंत पोहचलं नाही, हेच दुर्दैव आहे. पण काहींना मात्र याचा निश्चितच फायदा मिळाला आहे.

’झुंड’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय बोराडे या क्रिडाशिक्षकाची भूमिका केली आहे. ज्यामुळे चित्रपटाला एक उंची प्राप्त झाली. कारण, मुख्य प्रवाहातील एका सुपरस्टार अभिनेत्यांनी या चित्रपटात काम करणे आणि तेही प्रवाहाबाहेरच्या मुलांना प्रवाहात येण्यासाठी मदत करत त्यांच्या पाठीशी उभं राहणे, हे माणूसपणाचं द्योतक आहे. किंबहुना हे जर मोठ्या प्रमाणात झालं तर समाजाचा सर्वांगीण विकास होण्याची प्रक्रिया कैकपटीने वाढेल. कारण चित्रपटात ज्या पद्धतीने विजय बोराडे या शिक्षकाने मुलांची ऊर्मी जागृत करण्याचं आणि त्यांना फुटबॉल शिकवण्याचं काम केले आहे, त्याला तोड नाही. खरं तर ही कथा विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे या चित्रपटाला वास्तवतेची जोड आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मानवी जगण्यातील भावभावना आणि झोपडपट्टीतील मुलांच्या मानसिकतेचा जो पट उभा केला आहे, तो आजपर्यंतच्या चित्रपट इतिहासात वेगळ्या प्रकारे उठून दिसतो. कारण व्यसनी मुलांच्या अंतरंगात काय सुरू आहे, हे तपासून पडद्यावर उतरवणे खूप कठीण काम आहे. तो जळजळीत आणि बटबटीत भावनिक गुंता तीन तास खुर्चीला खिळवून टाकतो. असं वाटतं की, ही एका मानशास्त्रज्ञाने सखोल अभ्यास करून मांडलेली गोष्ट आहे. कारण, मनाच्या एका एका कप्प्यावर कोरल्या गेलेल्या गोष्ट सहजासहजी पुसता येत नाहीत. त्या सवयी एवढ्या पटकन बदलत नाहीत. त्याच्यासाठी वेळ लागतो, आणि त्या दरम्यान मनाची प्रचंड घालमेल होते. जसं की, अंकुश मेसरामचं (डॉन) होतं. त्याला बदलण्याची इच्छा निर्माण होते. पण समाज सहजासहजी बदलू देत नाही. कारण त्याचं अगोदरचं वर्तन हे चुकीचं होतं. त्याचे परिणाम त्याला चालू काळात भोगावे लागतात. पण सद्यस्थितीत तो बदलाची भाषा करतोय; पण समाजातील इतर घटकांचा अगोदरच्या घटनेचा परिणाम त्याला भोगावा लागतो. तो एका ठिकाणी म्हणतो, “ मैं सुधारना चाहता हूं, लेकीन मुझे सुधरने क्यूं देते नही है?” त्याची ही प्रतिक्रिया स्वभाविक आहे. पण अगोदर झालेल्या भांडणामुळे त्याच्यावर झालेली पोलीस केस. त्यातून त्याला निर्दोष सिद्ध करणे, हे कायद्यापुढचे आव्हन असते. मग, विजय सर कोर्टात प्रबोधनात्मक भाषण देतात. त्यानंतर त्याला पासपोर्ट मिळतो. म्हणजे मुख्य प्रवाहातील व्यवस्था संधी देते; पण त्याच्यासाठी त्याला सर्व आयुष्य पणाला लावावे लागते. इथल्या व्यवस्थेसारखं व्हावं लागतं. मगच संधी मिळते.

विजय सरांची वाक्य मनात घर करतात ती म्हणजे, “ थोडा झुंकता, तो क्या मर जाता क्या!” किंवा “हर बार जितना जरूरी नही होता है !” ही वाक्यं जीवन जगताना प्रत्येक वेळी उपयोगी पडतील. काही वेळा आयुष्यात माघार घेतली तरी चालते. कारण प्रत्येक वेळी जिंकणं हे शक्यच नसते. काही वेळा नम्रपणे माघार घेऊन जीवन जगले पाहिजे. स्वभावातील अहंपणा, गर्व, माज, मग्रुरी कमी केली पाहिजे. कारण, अंकुशची आणि आकाशची भांडण फक्त एकमेकांकडे डोळे वटारून बघण्यावरून सुरू झाली होती. त्याच भांडणाचे रूपांतर दुकान फोडण्यापर्यंत आणि कटरने वार करण्यापर्यंत जातात. म्हणजे काय तर माणसांच्या व्यक्तिमत्त्वात चुकीच्या पद्धतीने भरलेला माज हा काही कामाचा नाही. तो माज वेळीच उतरला पाहिजे, तरच माणूस म्हणून जगता येऊ शकते. तो माज कसा तयार होतो. तर निसर्गात: प्रत्येकाकडे काही ना काही शक्ती किंवा ताकत असते. त्या शक्तीचा वापर कला, खेळ, ज्ञान, तंत्रज्ञान यांच्या विकासासाठी केला, तर तो व्यक्तिमत्त्व-विकास होतो. आणि त्याच शक्तीचा वापर व्यसनं, लूटमार, खून, चोरी, भांडणं यासाठी केला, तर त्या व्यक्तीला गुन्हेगार म्हणून तुरुंगात डांबल जातं. म्हणजे त्याला मिळालेल्या शक्तीचा वापर योग्य पद्धतीने झाला नाही. हे असं करण्यास कोण भाग पाडतं? हा विचार करण्याचा प्रश्न आहे.

हीच गोष्ट ओळखून विजय सरांनी फुटबॉलच्या माध्यमातून मुलांना घडवण्याचं ठरवलं आहे, आणि त्यांना त्यात यश ही आलं आहे. कारण ज्यावेळी ह्या मुलांच्या टीमसह ते विमानात बसतात, त्यावेळी अंकुशला त्याचा मूळ स्वभाव बदलावा लागतो. कारण, विमानात जाण्याअगोदर तपासणी करतात, तिथे अंकुशच्या खिशात कटर सापडते आणि ते कटर फेकून द्यायला सांगितले जाते. त्यावेळी त्याची जी मानसिक अवस्था होते, ते म्हणजे वाईट गुण सोडून चांगल्या गुणात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेचा भाग असतो. त्यावेळीच तो विजय सरांना मिठी मारतो आणि तिथून ते विमानात बसतात. आणि विमान आकाशात झेपावते. ’झुंड’ हा चित्रपट फक्त विजय सरांची गोष्ट सांगत नाही, झोपडपट्टीतील फक्त जातीचे वास्तवही सांगत नाही; तर हा चित्रपट म्हणजे प्रवाहाबाहेरील मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला बदलण्यासाठी खेळाच्या माध्यमातून माणसांतील माणूसपण जागं करणारा आहे. मुख्य धारेतील समूहातील व्यवस्थेशी लढत फुटबॉल स्पर्धा भरवणारे विजय बोराडे सर माणूसपणा जिवंत असल्याचं अधोरेखित करतात. आणि नागराज सर संधी न मिळालेल्या माणसांची गोष्ट काळजापर्यंत पोचवतात.

चित्रपटातील कथा, पटकथा, संवाद, अभिनय, संगीत, नेपथ्य, लाईट, कॅमेरा आणि इतर सर्व बाबी उत्तम झाल्या आहेत. काही ठिकाणी काही तांत्रिक बाबी सुटल्यासारख्या वाटतात. पण त्या विषयी प्रत्येकाचं वेगळं मत असेल. मला वाटतं की, अशा आशयाचा चित्रपट बघणं म्हणजे माणूस म्हणून जगायला बळ मिळण्यासारखं आहे.

ज्ञानेश्वर जाधवर
j.dnyan@gmail.com

(लेखक हे पीएचडी स्कॉलर आहेत. माध्यम व संज्ञापन अभ्यास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सध्या कार्यरत आहेत.)
फोटो सौजन्य : इंटरनेट