साद
डॉ. मीरा सुंदरराज यांच्या ‘साद’ या कवितासंग्रहाविषयी चिन्मयी चिटणीस यांनी लिहिलेला हा लेख केवळ पुस्तकपरिचय करून थांबत नाही, तर कवितेकडे पाहण्याची एक संवेदनशील दृष्टीही आपल्यासमोर ठेवतो. साध्या शब्दांत मोठं भावविश्व उभं करण्याची ताकद डॉ. मीरा सुंदरराज यांच्या कवितांमध्ये आहे आणि म्हणूनच त्यांच्या कविता वाचताना त्या कुठेतरी आपल्या आयुष्यालाही स्पर्शून जातात. बालपणाच्या आठवणी, नात्यांमधली ऊब, मनाचे गुंतागुंतीचे पदर, भोवतालाकडे पाहण्याची शांत नजर आणि जगण्याच्या साध्या क्षणांमध्ये दडलेली कविता यांचा सुंदर वेध या संग्रहात दिसतो. या लेखातून चिन्मयी चिटणीस यांनी ‘साद’मधील याच भावविश्वाचा अतिशय आत्मीयतेने घेतलेला मागोवा वाचकांना नक्कीच संग्रहाकडे नव्याने पाहायला भाग पाडतो.
‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ हे विधान कितीही आपण सहजरित्या वापरत असलो तरी एखाद्या कवीला अगदी चपखल लागू होतं. कारण इतर सर्व साहित्यप्रकारांप्रमाणे कविताही दिसायला छोट्या स्वरूपात असली तरी तिचा आशयपरिघ इतका मोठा असतो की तो थेट वाचकाच्या काळजाला भिडतो. अनेकदा याचा आपल्याला प्रत्ययही येतो. पण खरंच ‘सोपं लिहिणं अवघड असतं’, हे अगदी खरं आहे. या सगळ्याचा अनुभव मला पुन्हा आला, जेव्हा मी डॉ. मीरा सुंदरराज यांचा ‘साद’ हा कवितासंग्रह वाचला. “More you write personal, it becomes universal” याच उक्तीप्रमाणे या संग्रहातील कवितांमध्ये आपण गुंतत जातो. कवयित्रीचा बालपणीचा काळ, त्या आठवणी, तेव्हाचा भवताल अनेकदा कवितेत डोकावतो.
‘अंगण’ कवितेत त्या म्हणतात, “अंगण असतं हक्काचं, सगळ्या हौशी पुरवतं आणि असावं प्रत्येकाचं मनामनांना जोडतं.” क्या बात है!
इथे सर्वांना जोडत जाण्याचा विचार सहजच कवयित्री करून जाते.
भोवताल, परिसर आणि अर्थात निसर्ग या सगळ्याच्या सानिध्यात असल्यावर एक वेगळी नजर कवीला मिळत जाते. त्यात ‘एक रावा’ कवितेत त्या लिहितात —
“उडुनी गेला एक रावा, व्यथित झाला सारा थवा, कुंठित तयाचे सवंगडी, जाणती त्याची स्वप्ने वेडी!”
एक संवेदनशील मनाने टिपलेली भावना आपल्याला हळवं करते.
प्रत्येकाचे बालपण हे कायम घरातल्या आजी, मावशी आणि इतर नातेवाईकांचा आपल्यावर पगडा असणारं असतं.
इथेही ‘सुग्रास घास’ या कवितेत आपल्या आजीविषयीची भावना खूपच सुंदर व्यक्त झाली आहे. शेवटी या कवितेत त्या म्हणतात, “आजीचे एकच ध्येय, एकच ध्यास, सर्वांच्या मुखी जावा सुग्रास घास.” सर्वांनाच ही कविता वाचून आपलं बालपण न आठवेल तर नवल!
कवीचं मन हे टिपकागदासारखं असतं. सतत आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा काही ना काही परिणाम कवीवर होत असतो. पण त्याच वेळी ते सर्व शब्दबद्ध होईलच असं नाही. त्याला थोडा वेळही लागेल; पण नंतर जे उतरेल ती अस्सल कविता असेल.
‘सारं अवघं’ या कवितेत —
“सोनं-समुद्र यापेक्षा वेगळं का आहे आपलं मन, मनाचा एक कप्यासुद्धा सारं अवघं मनच असतं.”
इतक्या सहज, सोप्या भाषेत मनाची व्याख्या करणारा कवी विरळाच.
आधी म्हटलं तसं कवयित्रीचा भोवताल अनेक ठिकाणी दिसून येतो. इथे काही कवितांची नावं वानगीदाखल देते. त्या शीर्षकांतूनच आपल्याला कल्पना येईल की किती विषयवैविध्य डॉ. मीरा सुंदरराज यांच्या लिखाणात आहे — ‘कोलाहल’, ‘पुंजी’, ‘ओलावा’, ‘निरभ्र’, ‘नीरव शांत’, ‘माझं स्थान’, ‘जीवन नौका’, ‘सनातन’ इत्यादी. कविताही नक्कीच वाचनीय आहेत.
या संग्रहात ‘अनुत्तरित’ नावाची एक कविता आहे, ज्यामध्ये वाट बघणारं घर त्यांनी शब्दबद्ध केलं आहे. त्यात त्या म्हणतात, “माझं घर माझी वाट बघतंय ही भावना, किती ऊब देणारी, गुरफटून टाकणारी, मन शांतवणारी, मीपण सामावून घेणारी.”
जसं वय वाढत गेलं, अनुभव येत राहिले, तेही हळूहळू शब्दांत उतरत गेलेलं आहे, जे या संग्रहाच्या शेवटाकडे येताना आपण वाचतो.
‘सुखी माणसाचा सदरा’ या छान शीर्षकाची कविता यामध्ये आहे —
“सुखी माणसाचा सदरा, त्यासाठी आटापिटा सारा, धागा धागा व्हायचाय विणून, पोत तलम की भरडा, ठरला नाही अजून...”
किती छान कल्पना आहे बघा!
‘पुस्तकाची आत्मकथा’ ही अजून एक सुंदर कविता. त्यात शेवटच्या ओळी आहेत —
“महान होण्यापेक्षा मला, अक्षरवाङ्मय होण्यात रस आहे!!”
या संग्रहाचे एक वैशिष्ट्य असे की डॉ. मीरा सुंदरराज यांच्या विद्यार्थिनी डॉ. सुजाता शेणई यांनी संग्रहाला प्रस्तावना दिली आहे. गुरु-शिष्य हे नातं इथे छान अधोरेखित झालंय. इथे प्रस्तावनेत डॉ. सुजाता लिहितात, “कविता जेव्हा रसिकांच्या हाती येते तेव्हा ती वस्त्राच्या पोतासारखी असते. पोत चांगला असला की वस्त्रांचं देखणेपण आधी नजरेत व नंतर मनात भरतं.”
या विचाराशी अगदी पूर्णपणे सहमती दर्शवणारा माझाही विचार आहे, असं मी नमूद करते.
आपल्या आई-वडिलांना हा ‘साद’ संग्रह डॉ. मीरा सुंदरराज यांनी अर्पण केला आहे.
त्यांचा परिचय खूप मोठा आहे. साहित्यातील त्यांचं काम उल्लेखनीय आहे. ललित, बालसाहित्य, संपादन, अनुवाद असं चौफेर लिखाण असलेल्या डॉ. मीरा सुंदरराज कवयित्री म्हणून या संग्रहातून आपल्याला सहज भावतात.
संवेदना प्रकाशन यांनी हा देखणा संग्रह प्रकाशित केला आहे. मिलिंद कडणे यांचं साकारलेलं सुंदर मुखपृष्ठ आपलं लक्ष वेधून घेतं. एकूणच चांगला संग्रह वाचनाचा आनंद आपल्याला मिळतो.
--
कवितासंग्रह : साद कवयित्री : डॉ. मीरा सुंदरराज संवेदना प्रकाशन, पुणे किंमत : रु. १२५/-