धर्म, राजकारण आणि माझे प्रश्न
धर्म, जात आणि राजकारण या विषयांवर प्रश्न विचारणं किंवा वेगळं मत मांडणं आज किती सोपं आहे? एखाद्या विचाराशी असहमत असलं की लगेच त्याला राजकीय पक्षाचा समर्थक किंवा विरोधक ठरवलं जातं. अशा वातावरणात वाढणाऱ्या नव्या पिढीला धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि स्वतःच्या विचारस्वातंत्र्याबद्दल काय वाटतं? धर्माच्या नावावर होणारं राजकारण, समाजात वाढत चाललेली धार्मिक तेढ आणि प्रश्न विचारणाऱ्यांवर लावले जाणारे शिक्के याबद्दल छत्रपती संभाजीनगरच्या अवघ्या १४ वर्षांच्या आर्यन सोनावणे याने या लेखातून आपलं मत मांडलं आहे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड असायला हवी, पण त्याचा वापर राजकारणासाठी होतो तेव्हा सामान्य माणसाच्या विचारस्वातंत्र्याचं काय होतं, असा प्रश्न तो उपस्थित करतो. त्याच्या सगळ्याच मतांशी प्रत्येकजण सहमत असेल असं नाही, पण एका किशोरवयीन मुलाला आपल्या आजूबाजूच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं, हे समजून घेण्यासाठी आर्यनचा हा लेख वाचायला हवा.
“तुझे देशाच्या राजकारणावर विचार काय?” या ऐवजी “तू भाजपावाला की काँग्रेसवाला?”, “तुझे धर्मव्यवस्थेवर विचार काय?” या ऐवजी “तू कोणता धर्म मानतोस?”, “तुला भारताची विकासाची दशा कशी वाटते?” या ऐवजी “तू देशद्रोहीसारखा का बोलतोस?” असल्या प्रश्नांना तोंड देत वाढलेला मी मुलगा आहे. वास्तवात आपल्यापैकी बहुतांशी लोकं अशाच वातावरणात वाढलेत! भारत हा सांस्कृतीकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देश आहे. आणि या सांस्कृतिक वैविध्याचा पाया असलेला धर्म हा या देशाच्या सामाजिक, धार्मिक स्तरांच्या नसानसात भिनलेला आहे. या भारत देशाचा एक नागरीक म्हणून माझं हे कर्तव्य आहे की मी या देशाच्या धार्मिक राजकारणाबदल लोकांना जागृत करावे. आणि या देशाच्या भ्रष्टाचारी सत्तेबद्दल व्यक्त होण्याचा माझा अधिकारही आहे! पण आपले काही so called Nationalist लोक आम्हा जेन-झी लोकांना व्यक्तच होऊ देत नाहीत हो!
असो! मी काही कुठला लेखक नाही, आणि काही थोर अभ्यासक – विचारवंतही नाही. मी एक शालेय विद्यार्थी आहे, जो एक युवकाचे धर्माबद्दलचे विचार एका युवकापर्यंत पोहोचवतोय!
धर्म! धर्म म्हणजे नेमकं आहे तरी काय? नाही! धर्म ते तर मुळीच नाही जे तुम्ही समजता. धर्म काही एका लोकांच्या समूहाला दिलेले नाव नाही, धर्म काही झेंडे घेऊन मिरवायची गोष्ट नाही. धर्म एक विचारधारा आहे. एक नितीमत्तेची विचारधारा! जी समजून उमजून आण विचार करून स्विकारायची असते! आपल्याला ज्या धर्माची विचारधारा पटते, ती स्विकारावी, एवढे साधे हे धर्माचे गणित! पण आपण याला अधिकच क्लिष्ट केले. एक मनुष्य असल्याच्या नात्याने मला माझी विचारधारा निवडायचा अधिकार आहे आणि तो त्याची निवड आपली आपण करायलाही हवी! मला माझे पालक, मित्र आणि नातेवाईक विचारतात, "धर्मानी तुझं काय घोड मारलंय रे!", मी मान्य करतो की धर्माने मला प्रत्यक्षपणे कधी काही त्रास नाही दिला. पण त्याच्यामुळे माझ्या जिवनात खूप बदल घडले त्याचे काय? धर्मामुळे माझी आजी, माझी आई, माझ्या भगिनी अशिक्षित. त्याचे काय? धर्मामुळे देशाच्या नद्या दुषित. त्याचं काय? धर्मामुळे माझ्या बहीणीवर आणि तिच्यासारख्या अनेक मुलींवर बंधनं लादली गेली. त्याचं काय?
तुमचा धर्म भ्रष्ट होतो म्हणून आज माझ्या शाळेत उत्क्रांतीवादाचा सिद्धांत शिकवत नाहीत. त्याचं काय? तुमच्या धर्मामुळं मला व्यक्त होता येत नाही. त्याचं काय? मला मान्य आहे की तुमच्या धर्माचा मला प्रत्यक्ष त्रास नाहीये, पण या विषयी काय? धर्म हा समाजाचा एक भाग आहे, पण समाजात वावरताना धर्म गरजेचा नाही! मी स्वतः मागील एक वर्षापासून धर्म-जात आणि माझ्या जन्मजात ओळखींचा त्याग करून जगतोय. मला तर कधी काही वाटलं नाही! लोक आणखी एक प्रश्न वचारतात जो भल्या-भल्यांना अस्वस्थ करतो. “तुम्ही आमचाच धर्म का टार्गेट करता?", हा प्रश्न मुळातच खरंच महत्त्वाचा आहे. पण आता एक सांगा, ज्या धर्माला माझे पालक मानतात, जो धर्म माझ्या सात पिढ्यांनी मानला, ज्या धर्माबद्दल मी जन्मापासून ऐकले, जो धर्म मस्तकात भिनला, मी त्या धर्माला ट्रोल नाही करायचं मग कुणाला करायचं? हे मलाही मान्य आहे की सर्वच धर्म सारखे असतात. आणि मी जर एकाच धर्माला टार्गेट करत असेल तर ते सर्रास चुकीचे आहे. पण जो धर्म मी जवळून पाहलाय, मी त्याबद्दल जास्त ठामपणे मत मांडू शकतो. (समजा मी एका अमुक धर्माला काहीतरी बोललो तर त्या धर्माचे ठेकेदार मला खोटं घोषित करतील. आणि मी पुरावे नाही देऊ शकणार!)
धार्मिक भावनांचा आणि मान्यतांचा भारताच्या सामाजिक जीवनावर चांगलाच पगडा आहे. कुठलीही गोष्ट असो, ती माझ्या धर्माशी कशी सुसंगतच असायला हवी, माझाच धर्म कसा श्रेष्ठ, मुख्यमंत्री माझ्याच धर्माचा हवा, प्रधानमंत्री माझ्याच धर्माचा असावा, मस्जीद नको, मंदीर हवे, मंदीर नको चर्च हवे, चर्च नको गुरुद्वारा हवा, माझा धर्म-तुझा धर्म ही विचारखरखी आपल्या देशाला आतून पोखरून खातेय! धर्मासोबत श्रद्धा येते, श्रद्धेला जोडून अंधश्रद्धाही येतेच आणि या अंधश्रद्धाही साध्यासुध्या नाही बरं!
परधर्मियांचा जीवच घ्या, बाळाचा बळी द्या, अमुक बाबाला पूजा, तमुक देवाला नवस करा, इ.इ. हे सर्व इथेच थांबत नाही! बरं यांचे धर्मही खूप चटकन भ्रष्ट होतात हो मुलगी शिकली तर धर्म भ्रष्ट, प्रेमविवाह केला तर धर्मभ्रष्ट, आंतरजातीय विवाह केला तर धर्म भ्रष्ट आणि सत्ताधारी सरकार विरुद्ध बोलाल तर काही सांगता खबर नाही! धार्मिक प्रवाहांचा उगमच मुळात लोकजीवन सोईस्कर आणि सुंदर बनवण्यासाठी झाला होता. पण त्या प्रवाहांना आता वेगळे वळण येऊ लागले आहे. आणि हे तथ्य आहे, कुणीही ते नाकारू शकत नाही!
आत्ता या क्षणाला, धर्माचा अर्थ धर्म झालाय आण राजनतीचा अर्थ धर्म झालाय! धर्म हे नेत्यांचे हक्काचे वोटबँक झाले आहे. अरे लोक भाजपा विरोधी म्हणजे सरळ हिंदू विरोधी म्हणतात! मी काँग्रेस सपोर्टर आहे म्हटलं तर सरळ मुस्लिम बोलतात. जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात एका गाण्यात फक्त ‘अल्लाह’चे नाव येते आणि काही लोक म्हणतात, “काँग्रेसचा propaganda आहे हा!” या थराला येऊन पोहोचलेय भारताचे राजकारण आणि जर यांना opposition फंड करतंय तर माग २००० च्या नोटेत चिप लावणाऱ्यांना कोण फेड करतंय? ‘आदीत्य धर’ला कोण फंड करतंय? आजकाल नेते संत बनून धर्म वाचवताहेत आणि संत नेते बनताहेत! सरकारला प्रश्न विचारले तर हिंदूविरोधी, हिंदूंना काही बोललो तर पाकिस्तानी आणि मुस्लिमांना बोलला तर अंधभक्त!
तुम्ही सांगा, सामान्य माणूस कुठे जाईल, कुणाला प्रश्न विचारेल? माझ्या वाचनात असलेले राजकीय आणि सामाजिक अभ्यासक रोहित चोपरा लिहितात हिंदू राष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला तो वि.दा.सावरकरांनी, १९२३ साली. याच धर्तीवर पुढे सन १९२५ साली के.ब.हेगडेवार यांनी आर.एस.एस (RSS)ची स्थापना केली. त्यांचे हेही एक वक्तव्य आहे की आर.एस.एस (RSS) चे द्वितीय अध्यक्ष एम. एस. गोलवलकर हे उघडपणे हिटलरचं समर्थन करीत! आणि आजच्या स्थितीला भाजपा ही RSS ची शाखा आहे असं म्हणायला हरकत नाही. हे सर्व एक जाळे आहे, जे एका सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि यामुळेच हे धमाचे भ्रष्टाचारी राजकारण कधी उघडपणे बाहेर येत नाही. २०२२ साली मंदिर बांधलं, मतं मिळवलेत आणि २०२६ साली त्याच मंदिरात चोरी केली. देव नाराज झाला नाही, अंधभक्त कधी नाराज होत नाही, शिक्षितांच्या नाराजीने होणार काय? किमान ज्या धर्माच्या नावावर तुम्ही राजकारण करता त्या धर्माचे तरी देव सोडा हो!
मुळात मी इथे कोणत्या धर्माबद्दल बोलतच नाहीये, कोणत्या विचारधारेबद्दल बोलत नाहीये, कोणत्याही नेत्याबद्दल बोलत नाहीये! हे आजच्या भारताचे एक सरसकट चित्र आहे. मी इथे एक भारतीयाच्या नात्याने, भारतीय जनतेच्या वतीने, या भारतभूसाठी बोलतो आहे. हे फक्त एका १४ वर्षीय Gen Z युवकाचे भारताच्या स्थितीवर मत होते. हे मलाही माहतीये की बदल एका दिवसात घडणार नाहीये, आणि ती अपेक्षाही नाही. कारण, धर्म एक अजगर आहे आणि भोळी जनता त्याच्या वेटोळ्यातल हरीण. आपण त्यांना जितकं सोडवायचा प्रयत्न करू तितकं ते गुरफटत जातं...
आर्यन सोनावणे, छ. संभाजीनगर aryansonwane4156@gmail.com