रेप कल्चर
माध्यमांतर
वैभव छाया यांचा हा लेख सामाजिक वास्तवावर खोलवर भाष्य करणारा आहे. बदलापूर, बंगाल आणि इतर राज्यांतील बलात्कार प्रकरणांचा सविस्तर आढावा घेत त्यांनी फक्त घटनांची मांडणी नाही केली, तर त्यामागील राजकीय हिपोक्रसी, समाजातील पुरुषसत्तात्मक वृत्ती, प्रशासनाची निष्क्रियता आणि आपली नैतिक दुर्बलता यांवरही प्रकाश टाकला आहे. लेखात लोकांच्या प्रतिक्रियांचा, माध्यमांच्या भूमिकांचा आणि शिक्षणव्यवस्थेतून सुरू होणाऱ्या भेदभावात्मक प्रवृत्तींचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. वैभव छाया हे निर्भीड सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे वाचकांना विचार करायला प्रवृत्त करतात. हा लेख आपल्याला आपली मानसिकता, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी तपासायला भाग पाडतो आणि दाखवतो की स्त्रीवाद फक्त समानतेपुरता मर्यादित नाही, तर मानवतावाद आणि समतावाद यांचा गाभा समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. (पुरुष उवाच, दिवाळी 2024 मधून साभार.)
‘महिलाओं के खिलाफ अपराध अक्षम्य पाप है,’ हे विधान आहे माननीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांचं. हे विधान आलं ते बदलापूर आणि बंगालमध्ये घडलेल्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर. फार जुनं नाही हे वक्तव्य. आणि विशेष म्हणजे जळगावातल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे म्हटलं होतं. पण, मोदीजी जे म्हणतायेत त्यावर तुम्हाला थोडा तरी विश्वास ठेवावासा वाटतो का? नाही ना. तुम्हाला कदाचित वाटत असेल पण मला बिलकुलच नाही. आता तो विश्वास का नाही याची कारणमीमांसा करायला बसलो तर शंभर पानं देखील अपुरी पडतील इतकी हिपोक्रेसी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत करून ठेवलेली आहे. मोदीजी महिला सुरक्षेवर बोलतात पण त्यांचा पक्ष भाजप महिला सुरक्षेच्या बाबत किती क्रूर वर्तन करतोय याचा कच्चाचिठा खोलला तर कोणत्याही संवेदनशील माणसाला स्वतःची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी की, यात महिला देखील मागे नाहीत. नुकतंच कंगना रनाऊत या भाजपच्या महिला खासदाराने शेतकरी आंदोलनात महिलांवर रेप केले जात होते असा खोटा आरोप केलाय.
भाजपाने कायम बलात्कारासारख्या क्रूर गोष्टीला एक पॉलिटीकल टूल म्हणून वापरलंय. आणि भारतातील इतर राजकीय पक्ष देखील धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत. आणि त्याहून दुर्दैवी गोष्ट म्हणजे आपण लोकही वृत्तीने स्वच्छ नाही आहोत. बदलापूर असो किंवा बंगाल, नाहीतर कोल्हापूर किंवा कांदिवली. ऑगस्ट महिन्याच्या एकाच आठवड्यात बलात्काराच्या घटना घडल्यात या ठिकाणी. तीन चार दिवस आरडाओरडा केला आपण... आणि आता काय, आपण लागलो त्याच नेत्यांच्या दहीहंडीत नाचायला. दंहीहंडी संपली आणि गणेशोत्सवातही तुफान नाचलो. जर स्थिती अशी असेल तर मग न्याय मागायचा तरी कुणासाठी? स्वतःच्या सुरक्षेपेक्षा राजकीय नेत्यांसाठीची निष्ठा जर आपल्याला अधिक महत्त्वाची वाटत असेल तर आधी कुणालाही जाब विचारण्याआधी आपण स्वतःला जाब विचारला पाहिजे.
भारतातल्या बलात्कारांचं मूळ कशात आहे, का भारत रेप नेशन बनलंय, भारतातल्या या रेप कल्चरमागचं खरं कारण तरी काय, या विषयांवर आज सविस्तर चर्चा करणार आहोत. हा लेख तुमच्यापर्यंत यायला उशीर होईल. तोपर्यंत अनेक घडामोडी घडून गेलेल्या असतील. त्या फक्त कन्सिडर करून घ्याव्यात.
दोस्तहो... ऑगस्ट महिन्याची दाहकता सुरू झाली ती कलकत्याच्या आर जी कर हॉस्पिटलमध्ये घडलेल्या महाभयानक बलात्कार आणि खून प्रकरणानं आणि ती मालिका येऊन पोहोचली ती महाराष्ट्रातल्या बदलापूर आणि कोल्हापूरच्या प्रकरणांवर. बंगाल ते बदलापूर असा मोठा प्रवास या निमित्ताने अख्ख्या देशानं पाहिला. आणि पाहिला राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय व्यवस्थेचा दुटप्पी नीचपणा आणि महानालायकपणा. सिस्टीम हरामखोर आहे, ती विश्वास ठेवण्यालायक देखील नाही हे - मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून - अनेकदा अनुभवलेले आहे. पण ती इतकी नीच बनलेली असेल ते आज पुन्हा एकदा अनुभवाला आले. यात अधोरेखित करण्याजोगी गोष्ट म्हणजे, आजवरच्या ज्या ज्या प्रकरणांत आम्ही लढलो त्या प्रकरणांत व्हिक्टीम हे मागासवर्गांचे होते. त्यामुळे सिस्टीमचे असे नीच वागणे काही अनपेक्षित नाही हा अलिखित जातीयवादी नियम डोक्यात फिक्स होता. पण आता बंगालपासून बदलापूरपर्यंतच्या प्रकरणांत ना पीडित मागासजातींचे होते, ना मुसलमान... तरीही सिस्टीम ज्या क्रूरतेने वागलीये ते वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीयेत. ते वागणं प्रतीक आहे की आपण एक समाज म्हणून आपण किती रसातळाला गेलो आहोत ते. ते कसं... हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी महाराष्ट्र आणि बंगाल या दोन्ही प्रकरणांचा थोडा सखोल धांडोळा घ्यावा लागेल.
देशाच्या पूर्व किनारपट्टीला पश्चिम बंगाल आणि पश्चिम किनार पट्टीला महाराष्ट्र. दोघांमध्ये प्रचंड मोठं अंतर. पण ही दोन्ही राज्ये अनेक बाबतीत समान आहेत. ही दोन्ही राज्यं त्यांच्या संस्कृतीच्या अस्मितेसाठी ओळखली जातात. दोन्ही राज्यं त्यांच्या साहित्य परंपरेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. प्रबोधनाची परंपरा देखील याच दोन राज्यांत सर्वात आधी आणि सर्वात जास्त खोलवर रुजलेली आहे. या दोन राज्यांनी कला, नाटकं, सिनेमा, तंत्रज्ञान, आणि भरपूर पैसा फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण भारतीय उपखंडाला दिलेलाय. या दोन राज्यांनी संपूर्ण भारताची खाद्यसंस्कृती श्रीमंत केलेलीये. अशी ही समानता असणारी राज्ये... अशाच काही समानता या दोन्ही राज्यांत घडलेल्या महिला अत्याचारांच्या प्रकरणांतही होत्या.
दोन्ही राज्यांत आज जी सरकारं आहेत, त्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि ममता बॅनर्जी हे दोघेही हिंदू आहेत. सवर्ण हिंदू आहेत. त्यापैकी एकनाथ शिंदे हार्डकोअर हिंदुत्ववादी आहेत. तर ममता बॅनर्जी तापट स्वभावाच्या सॉफ्ट हिंदुत्ववादी आहेत. या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या स्वभाव एका सुपरफिशिअल राजकारण्याचा स्वभाव असतो तसा आहे. ग्राऊंड रिएलिटीपासून कोसो दूर.
या दोन्ही प्रकरणांत पीडित आणि आरोपी दोन्ही हिंदूच आहेत. दोन्ही आरोपींच्या बाबतीत ते पकडले गेल्यानंतर ते गतिमंद आहेत, मतिमंद आहेत असे बचावाचे प्रचार केले गेले. दोन्ही आरोपींची एकापेक्षा अधिक लग्ने झाली असल्याची माहिती समोर येतेय. इतकेच नाही तर दोन्ही आरोपी डोमेस्टीक व्हायोलन्समध्ये अडकले असल्याची माहिती समोर आल्याचं बोललं जातंय.
या दोन्ही आरोपींना त्यांनी ज्या संस्थेत गुन्हा घडवला... म्हणजे बदलापूरला आदर्श शाळा आणि कोलकात्यात आर.जी कर हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणच्या प्रशासनांनी त्या गुन्हेगारांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. नुसत्या त्याच प्रशासनांनी नव्हे तर कोलकाता आणि बदलापूरच्या स्थानिक प्रशासन, स्थानिक राजकारणी, स्थानिक आमदार, स्थानिक पोलिस प्रशासन या सर्वांनी मिळून गुन्हेगार आणि गुन्हा घडलेल्या संस्थेच्या आणि संस्थाचालकांच्या बाजूने उभं राहून... गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नाही तर त्या सर्व प्रयत्नांचे निर्लज्ज प्रदर्शन देखील सहआरोपींनी मीडियासमोर चालवल्याचं आपण पाहिलंय. या सर्व प्रकरणांत आरोपी, गुन्हेगार, पीडीत, सहआरोपी, प्रशासन वगैरे वगैरे सर्वच्या सर्व सवर्ण हिंदूच. कुणीही मागासवर्गीय नाही. आणि कुणीही मुसलमान नाही.
तरी... जेव्हा बंगालमध्ये अत्याचार झाला तेव्हा तिथे होणारा विरोध, आंदोलन हे खरं असल्याचं गोदी मीडिया ओरडून सांगत होती. मात्र जेव्हा महाराष्ट्रात असाच विरोध होऊ लागला तर तो स्टंट ठरवायला ही गोदी मीडियाच पुढे कशी होती. हा महत्त्वाचा प्रश्न मला तुमच्यासमोर उपस्थित करायचा आहे. तो यासाठीच की आजपासून दोन महिन्यांनंतर निवडणूक प्रचारासाठी तुमच्या दारावर टकटक केली जाईल ना तेव्हा प्रचारासाठी आलेल्या प्रत्येकाला तुम्ही हा प्रश्न निक्षून विचारला पाहिजे. कारण, महाराष्ट्राच्या ट्रीपल इंजिन सरकारनं, त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या राज्यभरातल्या सहकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी बदलापूरचं आंदोलन कसं दडपलं जाईल, या आंदोलनाची निंदा-नालस्ती कशी केली जाईल याकडे विशेष लक्ष दिलं आणि वाईट त्याहून मोठं, की राज्य महिला सुरक्षेच्या बाबतीत चिंतेत असताना मुख्यमंत्री महिलांशी संवाद काय करत होते तर पैसे आले का? आले का पैसे? हा व्हिडीओ तुम्हाला आठवतंच असेल ना?
दुसरीकडे पश्चिम बंगालच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केलंय की, डॉक्टर त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणीच सुरक्षित नाहीत. त्यांना सुरक्षा प्रदान करायला हवी. त्यांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करायलाच पाहिजे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला नोटीस धाडलीये. सीबीआयला नोटीस देताना खडे बोल सुनावलेत. केंद्र सरकारलाही दिशानिर्देश दिलेत की लवकर काहीतरी हालचाल करा, उपाययोजना करा. डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणची सुरक्षा वाढवण्यासाठीची रुपरेषा तयार करा असं खडसावून सांगितलंय. आज दोन आठवडे उलटत आलेत.
जेव्हा रोम जळत होता तेव्हा निरो फिडेल वाजवत होता. आज देशातली महत्त्वाची दोन राज्ये जळत आहेत तेव्हा प्रधानमंत्री पोलंडच्या दौऱ्यावर होते. देशभरात ठिकठिकाणी निदर्शने आजही सुरू आहेत. ठिकठिकाणी डॉक्टरांचे संप आजही सुरूच आहेत. अख्खी मेडिकल फॅटर्निटी रस्त्यावर उतरलेलीये. जिथे संप शक्य नव्हता तिथे दंडाला काळ्या फिती लावून कारभार सुरू ठेवण्यात आलेलाय.
ज्या आर जी कर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली तेथे पुकारण्यात आलेल्या आंदोलनावर गुंडांनी हल्ला केला, त्या रूग्णालयाची तोडफोड केली. अनेक डॉक्टर त्यात जखमी झाले. गोदी मीडिया फक्त यात आरोपी मुस्लिमच आहे याचे खोटे इमले रचण्यात बिझी होते, पण कुणी का प्रश्न विचारला नाही की, आंदोलकांवर हल्ले करणारे हे गुंड कोण होते? कुणाला नको होतं हे आंदोलन, पोलिस प्रशासन इतकं गाफील कसंय पश्चिम बंगालचं? पोलिसांनी आतापर्यंत 25 जणांना अटक केली आहे. पण त्या अटकेनंतर काय झालं याची कोणतीही खबरबात कोणत्याच माध्यमांत नाही. यात सगळ्यात आश्चर्याची आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, पश्चिम बंगालला महिला मुख्यमंत्री आहे. त्याच राज्याच्या मुख्यमंत्री असण्यासोबत, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री देखील आहेत. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतःच रस्त्यावर उतरून विरोधाचं ढोंग करत आहेत. इतकी हिपोक्रेसी एक महिला म्हणून तरी ममता बॅनर्जींकडून अपेक्षित नव्हती.
बदलापूरच्या घटनेतही पीडित मुलींच्या आयांपैकी एका गरोदर आईला 12 तास पोलिस स्टेशनमध्ये ताटकळत ठेवलं. बदलापूरच्या आदर्श शाळेचे संस्थाचालक, संस्थेचे पदाधिकारी हे सर्व लोक भाजपचेच आहेत. त्याचे सर्व पुरावे आता सर्वांसमोर आलेले आहेत. या संस्थेने आणि पोलिसांनी संगनमत करून एफआयआर दाखल होऊच नये यासाठी जंग जंग पछाडलं. याही प्रकरणातला आरोपी हा संस्थाचालकांच्याच मर्जीतला आहे. तो त्यांच्या फार्म हाऊसवर कामाला होता अशी माहीती मिळतेय. पोलिस अधिकारी शुभदा शितोळे यांनाही निलंबित केल्याचं खोटं खोटं नाटक करण्यात आलं. इथंही बंगालसारखंच आंदोलकांवर तुफान लाठीहल्ला करण्यात आला. इथंही बंगालसारखंच मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांचाच निषेध केला. त्यांना बाहेरचे लोक म्हटलं. त्यांच्यावर केसेस टाकल्या. सर्वात जास्त गुन्हे त्यांच्याच लाडक्या बहिणींवर नोंद झालेत. हिप्पोक्रेसी की भी कोई सीमा होती है यारो... आणि म्हणून आपल्याला या निमित्ताने काही गोष्टींचा पुन्हा एकदा तातडीने विचार करायला पाहिजेय... की हे बलात्कार का होतात, आणि या समस्येची उपाययोजना काय?
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच (न्यू) च्या 21 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार तब्बल 151 विद्यमान खासदार आणि आमदारांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांमध्ये महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे जाहीर केली आहेत. या अहवालानुसार, महिलांविरोधातील अत्याचाराचे फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या 151 लोकप्रतिनिधीपैकी 135 आमदार आणि 16 खासदार आहेत. पैकी 44 आमदार आणि 10 खासदार भाजपाचे आहेत. 22 आमदार आणि 1 खासदार काँग्रेसचे आहेत. एनसीआरबीचा संस्थेकडून दरवर्षी अहवाल प्रसिद्ध होतच असतात. त्यांच्या अहवालातील काही धक्कादायक आकडेवारी पाहूयात.
- 2012 साली एका वर्षात बलात्काराच्या एकूण 25 हजार केसेस नोंदवल्या गेल्या होत्या. दरवर्षी हा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच आहे.
- 2022 साली हाच आकडा वर्षाला 31 हजार प्रकरणांपर्यंत पोहोचला. अगदी कोविड काळातही हा आकडा वाढलेलाच होता.
- 2024 साली 35 हजार प्रकरणं नोंदवली जातील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
- सरासरी रोज 85 अशी क्रूर प्रकरणांची नोंद होतेय. नोंद न झालेली प्रकरणं जर गृहीत धरली तर दिवसाला सरासरी 140 ते 150 प्रकरणं घडत असावीत असा अंदाज व्यक्त केला गेलाय.
एनसीआरबीची दुसरी एक आकडेवारी पाहूयात :
- दररोज घडणाऱ्या या प्रकरणांत 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणांत आरोपी ही पीडित व्यक्तीच्या ओळखीचीच असते.
- यात शेजारी, जवळचे मित्र, नातेवाईक, कामाच्या ठिकाणचे सहकारी, घरातलेच सख्खे नातेवाईक अधिक आढळून आले आहेत.
एनसीआरबीची अजून एक आकडेवारी पाहूयात :
- 2014 ते 2022 या 8 वर्षात मुलांवरील अत्याचारांच्या घटनांत 96 टक्क्यांनी वाढ झालीय.
- 2023ला एनसीआरबीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, ही वाढ 80% होती. लहान मुलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या 2014 मध्ये 89,423 होती, ती 2022मध्ये 1,62,449 इतकी झाली.
- गोवा, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा ही 4 राज्ये सोडली तर भारतातील 29पैकी 25 राज्यांत या गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण आहे.
- महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, ओडिशा या राज्यांत एकूण गुन्ह्यांपैकी 5%हून अधिक गुन्हे लहान मुलांवरील अत्याचारांचे असतात.
- महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात हेच प्रमाण 10% हून जास्त आहे.
- ही आकडेवारी नोंद झालेल्या गुन्ह्यांची आहे. परंतु, विविध कारणांमुळे अशा गुन्ह्यांची नोंद न झालेली संख्याही मोठी आहे.
पहिला फॅक्टर आहे पुरुषी वर्चस्ववाद. बलात्काराच्या प्रकरणांत वासनांधता हा शब्द वापरून आपण मोकळे होतो. पण खरं तर बलात्कारासाठी वासनांधताच नव्हे तर पुरुषी वर्चस्ववादही कारणीभूत असतो. याचं मूळ आपल्या मानसिकतेत आणि अर्धवट अज्ञानात आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेत आहे. आपल्या पुरुषी विचारांत आहे, आपल्या पितृसत्ताकवादी मानसिकतेत आहे. म्हणजे पहा, नवरा बायकोच्या भांडणात, बायकोचा बापच, अगदी बायकोची आई जावयाला सुनवायला कमी करत नाही की, मर्दासारखा मर्द तू, स्वतःच्या बायकोला ताब्यात ठेऊ शकत नाहीस. भांडण झालं की आमच्याकडे का येता तुम्ही? ही वाक्यं तुम्ही कधी ना कधी तरी ऐकलीच असतील. किंवा तुम्हीही कधी ना कधी तरी बोललाच असाल. आठवून पहा. बाई ऐकत नाही, बाई आपल्यापेक्षा वरचढ ठरतेय हे जेव्हा पुरुषाला पटत नाही, हे पुरुषाला आवडत नाही तेव्हा तेव्हा त्या बाईचा आत्मसन्मान कसा ठेचला जाईल, तीला आपल्या स्पर्धेतून कसं बाजूला फेकलं जाईल या सूडभावनेतून, या वर्चस्ववादाच्या भावनेतूनच पुरुष बलात्कार करत असतो.
दुसरा फॅक्टर आहे आपल्या भाषेचा. आपली भाषा देखील तशीच आहे. एखाद्यानं वीर्य गाजवलं की त्याला मर्द म्हटलं जातं. पुरुषानं त्याच्या संभोगाला आणि त्याच्या सेमेनच्या म्हणजे शुक्रजंतूंच्या स्खलनाला, इजॅक्युलेशनला वीर्य असं नाव दिलंय. इजॅक्युलेशन झालं की वीर्य बाहेर पडतं. तीच मानसिकता आहे. संभोगातून स्वतःचा पुरुषार्थ दाखवणारी स्वतःची विकृती आणि हीन पुरुषी मानसिकता. ही पुरुषी मानसिकता गाजवण्यासाठीच 100 टक्के बलात्कार घडत असतात. हे तर एक उदाहरण झालं... अजून अशी अनेक उदाहरणे देता येतील. पुरुषांना नपुंसक म्हणणं एखाद्या पुरुषाचा मेल इगो दुखावण्यासाठी सर्वात भयानक शब्द आहे. पुन्हा इथे संबंध वीर्याचाच येतो. एखाद्या पुरुषात वीर्य कमी असणं, म्हणजेच सेमेन कमी असण्याच्या गोष्टीसाठी आपण सहजपणे नपुंसक शब्द वापरून मोकळे होते. हा शब्द प्रचंड हिंसक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यासारखेच अनेक वाक्प्रचार देखील आहेत. चपात्या लाटण्याचं काम करा, हातात बांगड्या भरा, साड्या घाला. आणि किती तरी... यात पुरुषी वर्चस्ववादच असतो.
तिसरा फॅक्टर म्हणजे आपली मनोरंजन इंडस्ट्रीच पहा. कपिल शर्माचा शो घ्या, नाहीतर चला हवा येऊ द्या. पुरुष कलाकारांना साड्या नेसवायच्या आणि स्त्रियांच्या शरीरावर वाट्टेल तसे क्रूर विनोद करायचे, आणि आपण त्यावर खळखळून हसायचे हा आपला आवडता शिरस्ता आहे. यावर कधी ना मीडियाला बोलावंसं वाटलं, ना कधी कोणत्या शहाण्या कलाकाराला. एनिमलसारखा तद्दन हिंसक आणि टुक्कार सिनेमा हजार कोटींचा धंदा करतो, आणि त्या सिनेमाचा दिग्दर्शक उघडपणे त्या सिनेमाच्या नायकाच्या पुरुषी हिंसेचे समर्थन करतो आणि आपण ते आवडीने पाहतो...
ही आपली लायकी आणि मानसिकता आहे. ही सुरुवात कुठून होते... तर जरा थोडंसं भूतकाळात जाऊ यात म्हणजे आपल्याला चौथा महत्त्वाचा फॅक्टर समजून घेता येईल. आपले अंकलिपीचे धडे आठवा. पहिली दुसरीचे धडे आठवा. ज्यात लहानपणापासूनच आपल्या मेंदूवर प्रोग्रॅमिंग केलं जातं. छगन छकडा चालव. शैला कैरी काप, सुमन भाजी चिर, कमल चपाती लाट. या गोष्टी लहानपणापासून बिंबवल्या जातात मेंदूवर आणि तरुणपणी त्यांची विकृती तयार होते. बायकांनी बायकांचीच कामं करायची असतात. त्याचं उदाहरण म्हणून सांगू. सुप्रिया सुळेंवर टीका करताना भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी त्यांना चपात्या लाटायचा सल्ला दिला होता. अशी आपली शिक्षणव्यवस्था काम करते. अशी आपली शिक्षणव्यवस्था नैतिक पातळीवर आपल्याला भ्रष्ट करते. नाहीतर ‘तू अशी रिपोर्टिंग करत आहेस जणू काय तुझ्यावरच बलात्कार झाला’ असा निर्लज्जपणाचा कळस गाठणारी धमकी भाजपा पदाधिकाऱ्याने एका शिकलेल्या महिला पत्रकाराला दिली असती का? नाही ना...
जेव्हा बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना फक्त हिंदू मतांसाठी मोकळं सोडलं होतं तेव्हा आपण टाळ्या वाजवल्या होत्या. आपल्यातल्या धार्मिक अस्मिता चेतवल्या होत्या. बलात्कारींना ओवाळलं होतं, त्यांचा जाहीर सत्कार केला होता. सर्वांना गोडधोड खायला वाटलं होतं. प्रज्वल रेवण्णावर 2500 हून अधिक महिलांचं यौन शोषण केले गेल्याचा आरोप झाला. तसे व्हिडीओ पुरावे समोर आले. काय झालं... त्याच्या वडिलांना आज केंद्रिय मंत्रिमंडळात मोदींनी स्थान दिलं. ते ही घटना उडकीस आल्याच्या आठवडाभरातच. बृजभूषण सिंगने कितीतरी महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण केलं, तेव्हा पीडित महिला खेळाडूंचं चारित्र्यहनन करण्यात आघाडीवर कोण होतं? कोणत्या विचारधारेची लोक होती... तेही ठाऊक आहेच ना. विनेश फोगट ऑलिम्पिकमध्ये जिंकत होती तेव्हा ती जिंकू नये म्हणून तिला शिव्या देणारे, तिच्यावर टिपण्ण्या करणारे लोक आपणच होतो ना. विनेश जेव्हा अपात्र ठरली तेव्हा तिच्याबद्दल जे घाणेरडं बोललं गेलं ते काही बलात्कारापेक्षा कमी नव्हतं. याच बृजभूषणची सत्कार रॅली काढली गेली होती. कठुआमधल्या गँगरेप प्रकरणातल्या गुन्हेगारांची विजयी वरात काढणारे कोण होते, कुलदीप सेंगरचा जाहीर सत्कार करणारे कोण होते... तेव्हा त्या सत्कारात सामील झालेले आणि त्यावर मौन बाळगून राहिलेल्या लोकांनी स्वतःच आपल्या लेकीबाळींच्या असुरक्षित राहण्याची हमी घेतली होती. इतकंच नाही तर त्यांनी त्या असुरक्षित कशा राहतील याचीच ग्यारंटी उचलली होती.
मी तुम्हाला 2013 सालचं एक वादग्रस्त वक्तव्य सांगतो. ते असं होतं की... पोरी कमी कपडे घालतात म्हणून बलात्कार होतात. आणि हे वक्तव्य होतं सिंधूताई सपकाळ यांचं. खूप गदारोळ नाही झाला त्यावर. उलट त्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या झुंडी तेव्हा त्वेषानं अंगावर येत होत्या. आज सिंधूताईंच्या त्या वक्तव्याची एक साधी बातमी इंटरनेटवर उपलब्ध नाही. अगदी मी स्वतः केलेली पोस्ट देखील गायब आहे. तेव्हा सिंधूताई मोदीसमर्थक होत्या. असंच एक नुकतंच घडलेलं प्रकरण, पंजाबमधला राम रहीम बाबा. ज्याच्यावर बलात्काराची कैक प्रकरणं दाखल आहेत. तरी त्याचे भक्त त्याला अजूनही देवच मानतात. दर निवडणुकीआधी त्याला पॅरोलवर बाहेर सोडलं जातं. हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या आधी त्याला बाहेर सोडलंय. भाजपाने पुन्हा एकदा स्वतःचाच फायदा पाहिलाय. एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात असलेले मंत्री संजय राठोड यांच्यावरही आरोप आहेच. त्यावर चित्रा वाघ यांनी काय गजहब केला होता. आज दोघेही शांत आहेत. एकाच पक्षात, एकाच सरकारात सहकारी आहे. आपणच आहोत जे बलात्कार केलेल्यांना, बलात्काराचा आरोप असलेल्यांना प्रतिष्ठा मिळवून देतो. त्यांना ग्लोरीफाय करतो.. आपणच आपल्या मुलींच्या, लेकीबाळींच्या बलात्कार होण्यासाठीचा मार्ग तयार करत असतो आणि ही गोष्ट आपल्या लक्षातच येत नाही हे दुर्दैव आहे. हाच आपल्या लिस्टमधला पाचवा फॅक्टर आहे. आपल्याला नैतिक मूल्य उरलेलं नाहीये.
जशा सिंधूताई म्हणाल्या किंवा इतर महत्त्वाच्या पदांवर बसलेले लोक म्हणत असतात की, मुलींच्या छोटे कपडे घालण्यामुळे त्यांच्यावर बलात्कार होतात तर मग 85 वर्षांच्या वृद्धेवर झालेले बलात्कार हे का होत असतात. बुरखा घातलेल्या महिलांवर बलात्कार का होतात? चापून चोपून साड्या नेसलेल्या तरुण महिला, ते अगदी दोन तीन वर्षांच्या मुलींवर बलात्कार का होतात? हे प्रश्न का पडत नाहीत.
अजून एक आरोप होतो की, मुली रात्रीच्या वेळेस घराबाहेर राहिल्यामुळे बलात्कार होतात. तर मग पुरुषही रात्री घराबाहेर राहतात. पुरुषांवर का बरं बायका बलात्कार करत नाहीत. मुलींच्या दारू पिण्यामुळे, मुलींच्या स्मोकिंग करण्यामुळे मुली अवेलेबल आहेत असा समज करून त्यांच्यावर बलात्कार होतात असा समज असणाऱ्यांना एक थेट प्रश्न आहे. भारतात तर सगळ्यात जास्त पुरुष दारू पितात, पुरुष स्मोकर आहेत. मग ते सगळे पुरुष बलात्कार करून घेण्यासाठी अवेलेबल आहेत का? नाही ना... दोस्तहो, मुली रात्रीच्या वेळेस घराबाहेर राहील्यामुळे नाही तर पोटेंशिअल रेपिस्ट पुरुष आणि मुलं रात्री घराबाहेर राहिल्यामुळे बलात्कार घडतात. त्यामुळे मुली बाहेर राहतात असा गोंगाट करणाऱ्या नालायकांनी आधी स्वतःची मुलं सातच्या आत घरात बोलावून घेतली पाहिजेत. या मानसिकतेची सुरूवात आपल्या घरातूनच होते, मुलगी चांगल्या कॅरेक्टरची आहे की नाही हे तिच्या कपड्यांवरून ठरवलं जातं. ती कशी बसते, ती कशी उठते. ती पुरुषासमोर पण खुर्चीवर बसलेली असते का, इथपासून अनेक गोष्टींत तिला घरच्या बायकाच जज करतात. पण भोकं पडलेली अंडरप्यांट घालून टॉवेलवर गावभर चकरा मारणाऱ्या पुरुषाला कुणीच कॅरेक्टरलेस ठरवत नाही. दुकानात अंडरगारमेंट्सची मॅनेक्विन पाहून चेकाळणारे आपण लोक आपल्याला अंतर्वस्त्रांवरून समोरच्याचं कॅरेक्टर ठरवण्याचा प्रचंड हिंसक छंद आहे.
विराट कोहली किंवा महेंद्रसिंग धोनी आधी अनेक घटनांवर मोकळेपणाने व्यक्त व्हायचे, भूमिका घ्यायचे. पण या दोन्ही खेळाडूंना एकदा धमक्या आल्या. धमक्या म्हणजे त्यांच्या तान्ह्या मुलींवर बलात्कार करण्याच्या धमक्या आल्या. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनीच नव्हे तर जवळपास सर्वांनीच बोलणं बंद केलं. भूमिका घेणं बंद केलं. सयाजी शिंदेंचं काय झालं, एक बाप म्हणून त्यांनी माफी मागितली, यामागे त्यांना त्यांच्या मुलीसाठी असलेली भीतीच कारणीभूत होती. त्यांच्या जागी मी असतो तर कदाचित मी ही खचलोच असतो. या लोकांना त्यांच्या भूमिकांसाठी त्यांच्या मुलींचे बलात्कार करण्याची धमकी देणारे कोण लोक होते याचा कधी विचार करून पाहिलाय का? हाथरसमधील घटनेत जेंव्हा आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं. ‘बलात्कारा’चा गुन्हा त्यांच्यावरून काढून टाकण्यात आला. बलात्कार लपविण्यासाठी त्या मुलीचे प्रेत कुटुंबियांच्या हवाली न करता पोलिसांनीच बेवारसपणे त्याची विल्हेवाट लावली . पुण्याच्या पोर्शे प्रकरणात आरोपी हा ज्या राजकारण्यांशी संबंधित होता ते समोर आल्यानंतर कारखाली चिरडली गेलेली मुलगी ही रात्री बाहेर काय करत होती? ती लूज कॅरेक्टरवाली होती अशा पद्धतीचे विकृत युक्तिवाद सोशल मीडियावर आपण पाहिलेच आहेत.
लेखाच्या मध्यावर असताना मी एक अहवाल सांगितला होता की ज्यात आपण पाहिलं होतं की दररोज घडणाऱ्या या प्रकरणांत 90 टक्क्यांहून अधिक केसेसमध्ये आरोपी ही पीडित व्यक्तीच्या ओळखीचीच असते. कल्याण तालुक्यातलं मैत्रकुलचं प्रकरण या बाबतीतलं सर्वात बोलकं आणि मला व्यक्तिशः प्रचंड दुःख देणारं प्रकरण आहे. ज्या माणसावर इतका प्रचंड विश्वास टाकला, त्यानंच असा काही देखावा उभा करावा ज्या देखाव्यामागे इतकं काही घडत असावं याचा कधीच साधासा अंदाज देखील आला नाही. ही एक प्रकारची चिटींग होती. जी मनाला कधीच एक्सेप्ट होऊ शकणार नाही. मैत्रकुलच्या केसमध्ये खरं खोटं कोर्टात सिद्ध होईलच. मी काही कोणत्याही गोष्टींचा प्रत्यक्षदर्शी नाही. पण पीडिता खोटं तरी का बोलतील. शासन जी शिक्षा करायची असेल ती निश्चितच करेल. पण हे उदाहरण पुरेसं बोलकं आहे हे समजायला की, आपण ज्यांच्यावर विश्वास टाकतो त्याच जवळच्या व्यक्ती 90 टक्के प्रकरणात बलात्कारातले आरोपी असतात. मुली आपल्या घरातच सुरक्षित नाहीत. मग मुली बाहेर राहिल्याने बलात्कार होतात असं बोलताना जर तुम्हाला कधी कुणी आढळलं त्याला आधी काऊन्सिलिंग जरूर करा.
जेव्हा केव्हा अशी प्रकरणं घडतात तेव्हा सरकार स्वतःहून कधीच प्रो एक्टीव भूमिका घेत नाही. ना कोर्ट सुओ मोट अॅक्शन घेत. का म्हणून कोर्ट, पोलीस आणि सरकार इतके नामानिराळे राहतात. सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, माध्यमं जोपर्यंत त्यात काही शॉकिंग वॅल्यू जनरेट होत नाही तोपर्यंत बलात्काराची प्रकरणं एका छोट्या कॉलमपुरत्या किंवा टिकरपुरत्या बातम्या का असतात? जरी प्रकरणं वर आली तरी सरकारी वकिल नेमताना तो सरकारधार्जिणा वकीलच नेमण्याची सिलेक्टीव भूमिका सरकार का घेत असते... बलात्कार झालेल्या पीडिताचा आणि आरोपीचा धर्म आणि जात कोणती आहे यावर जातीय आणि धार्मिक संघटनांच्या भूमिका का वर खाली होत असतात. इतकं सिलेक्टिव वागण्याचं नाव भारतीय असणं आहे का? बलात्काराच्या प्रकरणात आपल्या विचारधारेचा पक्ष अडकला असेल तर आपण गप्प का बसतो? मी हे प्रश्न स्वतःला विचारतोय... तुम्ही कधी तरी हे प्रश्न एकदा स्वतःला विचारून पहा. तुमचा धर्म कोणताही असेलः तुमचा जात वर्ग कोणताही असेल... पण आधी स्वतःला एक स्त्रीवादी व्यक्ती म्हणून घडवण्याचा प्रयत्न सुरू करा. रामधारीसिंह दिनकर यांची एक कविता आहे, ज्यात ते म्हणतात. प्रत्येकजण आधी स्त्रीच असतो. तो जेव्हा त्याच्यातली करुणा त्यागतो तेव्हा तो पुरुष बनतो. करुणा त्यागलेले पुरुष बनणं हेच अपेक्षित होतं का आपल्याला... नाही ना... स्त्रीवाद म्हणजे फक्त स्त्री पुरुष समानता नाही. स्त्री वाद म्हणजे मानवतावाद, आणि समतावाद आहे हे ज्या दिवशी आपल्याला उमजेल, कळेल, आपल्या वागण्यात, आपल्या जगण्यात भिनेल... त्या दिवशी पुन्हा बलात्कार होणार नाहीत.