फिरत्या चाकावरची जादूगार - चतुरा कुंभार

“अनंत आमुची ध्येयासक्ती, अन् अनंत आमुच्या आशा, किनारा तुला पामराला...” कधीकाळी भाषणात म्हणलं होतं हे वाक्य... तेव्हा त्याचा अर्थ नीटसा कळला नव्हता. भाषणात वापरल्या जाणाऱ्या बऱ्याच ओवी, उक्त्या, म्हणी, कवितांच्या ओळींपैकी हे एक वाक्य इतकचं; पण आज इतक्या वर्षांनी प्रकर्षाने ते वाक्य पुन्हा आठवावं आणि त्या वाक्याची प्रचिती यावी याला कारण ठरली मला भेटलेली - चतुरा कुंभार!

सातारा शहरात कुरणेश्वर परिसरातून पुढे जाताना सोनगाव फाट्याच्या अलीकडे ‘मंगलमूर्ती आर्ट्स अशी एक पाटी लागते. हे मंगलमूर्ती आर्ट्स म्हणजे एका अपंग व्यक्तीच्या जिद्दीचे ‘मूर्तीमंत’ उदाहरण आहे. सोनगाव या छोट्याशा गावात जन्मलेली- ‘चतुरा’ वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी पोलिओमुळे अपंग झाली. कमरेखालचा संपूर्ण भाग लुळा पडून निकामी झाला. गाव लहान. घरची परिस्थिती तशी बेताचीच. तरीही, आपल्या मुलीचा इलाज करण्यासाठी आईवडलांनी जिवाचं रान केलं, सातारा परिसरातील प्रत्येक डॉक्टरला त्यांनी भेट दिली, प्रत्येक देवाकडे साकडं घातलं; पण चतुराच्या तब्येतीत काहीच बदल झाला नाही. या आपल्या मुलीला आपण सांभाळू; पण आपण गेल्यावर हिची काळजी कोण घेणार? या विचाराने दोघेही चिंतेत राहू लागले. आपल्यामुळे आईवडलांच्या चेहऱ्यावर दिसणारी चतुराला अगदी लहान वयातच जाणवू लागली आणि मग आपण स्वावलंबी होऊन स्वत: हिंमतीवर उभं राहायचं याचा चंग तिने बांधला. लहानपणी सगळी भावडं खेळायची, शाळेत जायची पण चालता येत नसल्यामुळे चतुराला शाळेत जाता आलं नाही, खेळता आलं नाही. चारचौघांसारखा आपल्याला बालपणाचा आनंद घेता येणार नाही, हे तिनं ओळखलं, पण केवळ घरात बसून राहणं हेही तिला मान्य नव्हतं. मग तिने आपला रोख घरच्या गणपतीची मूर्ती बनवण्याच्या कामाकडे वळवला. सुरुवातीला गाडगी, मडकी, सुगडी बनवायला, त्यांना आकार द्यायला तिने सुरवात केली. आपल्याला हे काम करता येतंय आणि आपल्याला ते आवडतंय, या कामातून आपण आपल्या बाबांना मदत करू शकतो, या विचाराने तिला अधिकच हुरूप आला आणि मोठ्या जोमानं ती मातीचं काम शिकू लागली.

अल्पावधीच तिच्या हाताचं कौशल्य आणि त्यातून घडणाऱ्या सुबक कलाकृती तिच्या वडिलांनी पाहिल्या आणि तिला शाडूच्या मातीचे गणपती बनवायला शिकवले. तीस-पस्तीस वर्षांपूर्वीचा तो काळ, तेव्हा शाडूच्या मातीचे गणपतीच जास्त बनवले जायचे. मग माती गाळण्यापासून ती मळणे, तिला साच्यात भरणे, आकार देणे, रंग देणे सगळी कामं चतुरा लहान वयातच झपाट्याने शिकली. गणपतीच्या सिझनमध्ये त्या काळात ती बाबांच्या मदतीने किमान शंभर गणपती मूर्ती विकत असे.

हळूहळू जशी कला वाढली, तंत्रज्ञान वाढलं, प्लॅस्टर ऑफ पॅरीस आलं तसा व्यवसाय मोठा झाला, गणपतींची मागणी वाढली, शंभरावर सुरू झालेला व्यवसाय हजारावर येऊन पोहचला आणि गणपतीचं काम करायला राहतं घर कमी पडायला लागलं. चतुराने धाडसाने गावातून थोडंसं पुढे एका ठिकाणी आपल्या काकांसोबत जागा विकत घेतली आणि आपल्या कारखान्याची स्थापना केली. काकांसोबत जवळ-जवळ अकरा वर्ष काम करत असताना चतुराने गणपती मूर्ती बनवण्यामध्ये चांगलच कसब मिळवलं. एका वर्षी जवळजवळ पाच हजार गणपती बनवण्याचा विक्रम तिने आपल्या कामगारांच्या मदतीने करून दाखवला. गणपतीच्या शरीराला आकार देणे, पेनगनने त्यांना कुशलतेने रंगवणे, गणपतीचे दागिने, धोतराच्या निऱ्या, मुकुटावरचे नक्षिकाम करण्यात तिचा हातखंडा आहे.

काकांसोबत काम करताना, पूर्णपणे स्वावलंबी होऊन आपलं काहीतरी सुरू करावं या विचाराने तिला पछाडलं होतं. मग, आपल्या पंचवीस वर्षांच्या अनुभवाला गाठीशी घेऊन दोन वर्षापूर्वी चतुराने सोनगाव रस्त्यावर एक छोटी जागा भाड्याने घेतली आणि आपल्या गणपती कारखान्याचा ’श्रीगणेशा’ केला. नवीन जागा आणि व्यवसायाची घडी बसत असतानाच कोरोना आला आणि त्याचा थेट परिणाम गणपती विक्रीवर झाला. कोविडच्या काळात लांबून गणपती घ्यायला येणाऱ्या अनेक गिऱ्हाईकांनी पाठ फिरवली. पण, संकटांनी डगमगून जाणं हे चतुराच्या स्वभावातच नाहीये, त्यामुळे कमी ग्राहक असतानाही तिने आपला कारखाना चालू ठेवला. एवढंच नव्हे, तर जेव्हा मोठ्या-मोठ्या कंपन्यादेखील पगार कपात करत होत्या, तेव्हा चतुराने आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांना ३०० रुपये रोजगार दर दिवशी दिला आणि त्यांचे संसार चालू ठेवण्याचे बळ त्यांना दिलं.

चतुरा आपल्या कारखान्यामध्ये केवळ गणपतीच नाही तर, नागपंचमीसाठी नाग, बेंदूरासाठी बैलजोडी, गौरी, हरताळका अशा विविध मूर्त्या बनवत असते. सकाळी आठ ते संध्याकाळी आठ असा कारखाना चालू असतो. “काम असो वा नसो आम्ही कारखाना बंद ठेवत नाही. इथे येऊन काही ना काहीतरी काम करत राहतो, त्यामुळे कामाची सवय जात नाही”, असं चतुरा म्हणते. तिने बनवलेल्या मूर्तींना सातारा, कोरेगाव, वाठार, रहिमतपूरपासून ते मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधूनही मागणी असते. सातारा शहरातील शैलेश बोरडे आणि राजेंद्र बाबर हे दोन दिव्यांग दरवर्षी तिच्याकडून पन्नास गणपती विकत घेऊन जातात आणि सातारा शहर परिसरात त्यांची विक्री करतात. “आपल्याला पाहून जेव्हा इतर दिव्यांगसुद्धा स्वावलंबी होण्यसाठी झटपट करतात ते पाहून मनापासून आनंद होतो”, असं चतुरा सांगते.

आजवर अनेक प्रसारमाध्यमांनी चतुराच्या कामाची दखल घेतली आहे. साताऱ्यात कार्यरत असणाऱ्या दिव्यांग प्रेरणा बहुउद्देशीय संस्था, दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था यांनी तिच्या कार्याचा सन्मान केला आहे. यश, नावलौकिक मिळाला तरी चतुराचा जगण्याच्या संघर्ष कमी झालेला नाही, आजही एका जागेवर जास्त काळ तिला बसता येत नाही, हर्नियाची व्याधी असल्यामुळे योग्य आराम घेणे तिच्यासाठी बंधनकारक आहे, एक हाताची शक्ती कमी असल्यामुळे तो हात केवळ लुळ्या झालेल्या पायांना उचलण्यासाठी मदतीस येतो, त्यामुळे कधीकधी एका हातावर वजन आल्याने तिला काम ठप्प करावे लागते. पण आलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या समस्येला चतुरा तिच्या तोंडभरून आणि खळखळून हसण्याने सामोरे जाते, आपल्या अपंगत्वाबदद्ल बोलताना ती कुठेही लाजत-बुजत नाही उलट अतिशय सहजतेने तिच्याशी बोलणाऱ्याला ती तिच्या सरकणारा पाट दाखवते, तिची बसायची थोडीशी उंच असलली उशी, तिचा विचार करून, तिच्या उंचीला येईल अशा रितीने बनवलेलं तिचं घर दाखवते, ज्यामध्ये मिक्सर, फ्रिज, ओटा, फिल्टर अशा सगळ्या गोष्टी तिच्या सोयीने बांधल्या आहेत. गणपती बघायला आलेल्यांना ती अगत्याने चहा देते, आपल्या हसऱ्या-बोलक्या स्वभावाने ती कधी समोरच्याला आपलं करून टाकते, हे कळतच नाही.

कारखाना, त्यातले हिशोब, कामगारांचा पगार हे सगळं एकहाती सांभाळणारी पंचेचाळीस वर्षांची चतुरा कधीही शाळेत गेली नाही. मोठ्या भावानं तिला अंकलिपी आणि अक्षर ओळख करून दिली. त्या ज्ञानावर आज ती स्वत: आपला व्हॉट्सअपचा फोन हाताळते, नंबर सेव्ह करते, कामगारांचे हिशोब बघते. वेळ मिळेल तेव्हा मराठीमध्ये लिहिलेले मेसेजेस ती परत परत वाचून वाचनाचा सराव करते. पाढे पाठ करायला, गणितं शिकायला तिला अजूनही खूप आवडतात. आपणही कधी एखादी कथा-कादंबरी वाचावी अशी तिची इच्छा आहे. गणपतीचे काम करताना रेडिओवर जुनी-नवी मराठी, हिंदी गाणी ऐकणं तिला खूप आवडतं. हाताला जसं मूर्ती बनवण्याची कला आहे तसाचं उत्तम स्वयंपाक करण्याचं कौशल्यही लाभलं आहे. आपल्या पाहुण्या-रावळ्यांना ती आपल्या लहान घरात आवर्जून जेवायला बोलावते. दिवाळीला घरासाठी पणत्या, राखी पौर्णिमेला स्वत:च्या हातांनी ती आवर्जून राखी बनवते.

“हे गणपती बनवणं सोडून अजून आयुष्यात काय वेगळं करायची तुझी इच्छा आहे?” असं विचारल्यावर, तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, “हा कारखाना चालू राहावा, बसं ही एकच इच्छा आहे.” तिच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा तो कारखाना, तिची कला, तिने एक एक करत जोडलेली माणसं, या कारखाना केवळ तिचा व्यवसाय नाहीये, तो तिची ओळख आहे, तिचा स्वाभिमान, तिचं ते स्वप्न जे पूर्ण करण्यासाठी तिनं जिवाचं रान केलं आहे. या गणपती बाप्पाच्या निर्माण कारखान्याने तिच्या आयुष्यातलं अपंगत्वाचं, परावलंबनाचं मळभ कधीच दूर झालं आहे आणि आता तिच्या हसऱ्या चेहऱ्याने निर्माण होणारा चैतन्याचा झरा आपल्या सारख्या सामान्यांचं आयुष्य प्रकाशमान करतो.

तिच्या सरत्या आयुष्याविषयी मला खूप उत्सुकता वाटत होती. लग्न, संसार, चारचौघींसारखा माहेर-सासरचा गोतावळा, असं आयुष्य आपल्याला मिळणार नाही हे चतुराला माहिती होतं. पण, आपल्या कामाने, लाघवी बोलण्याने आणि जिद्दीने तिने स्वत:ची नवी नाती तयार केली, भेटलेल्या प्रत्येक माणसाला तिने आयुष्याशी जोडून घेतलं. आजही तिला ज्या कारखान्याने ओळख दिली, तो मोठा व्हावा, त्याचे काम मोठं व्हावं आणि त्या माध्यमातून तिच्यासारख्या अपंग लोकांना देखील स्वत:च्या पायावर उभं राहता यावं, हेच तिचं एकमेव स्वप्न आहे.

शब्दांकन : मेघना अभ्यंकर
meghanaabhyankar2698@gmail.com