पाऊस

घरातील मुख्य खोलीच्या आवराआवरीवर तिनं अखेरचा हात फिरवला. एक पाऊल मागे सरकून दाराजवळ उभं राहून तिनं खोलीकडं नजर टाकली. तिनं आदल्या रात्रीच पडदे धुतले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना इस्त्री केली. सर्व पडद्यांना खळ घातल्यामुळे ते नव्यासारखे छान दिसत होते. पडदे फिकट पिवळ्या रंगाचे असून, त्यावर हिरवे ठिपके होते. पडद्यांना खालच्या बाजूला झालर होती. ते दोन भागात विभागले ते पडदे एका हिरव्या रिबिनीनं बांधले होते.

खिडकीखाली एक दिवाण व दोन करड्या रंगाच्या मखमली आरामखुर्च्या होत्या. कॉफी टेबलवर निळ्याफुलदाणीत गुलाबाची फुलं होती. तसंच एक भलं थोरलं कपाट नुकतंच पॉलिश केल्यासारखं दिसत होतं. त्याच्या समोरच्या बाजूला तिचं लेखनाचं टेबल होतं. त्यावरची पुस्तकंही नीटनेटकी ठेवलेली होती. टेबलावर शाईची बाटली व कोरा करकरीत टीपकागद होता. प्रत्येक वस्तू अगदी घासूनपुसून ठेवल्यामुळे अगदी नवीनच दिसत होती.

दरवाजाच्या उजव्या बाजूला असलेल्या पेटीवर बिलोरी काचेची एक दारूची बाटली व दोन चमचमणारे ग्लास होते. पांढऱ्या रंगात चमकणाऱ्या छोट्याशा स्वयंपाकघरात पेस्ट्रीचा घमघमाट सुटला होता. तीन कस्टर्ड व तीन स्ट्रॉबेरी पेस्ट्रीज फ्रिजमध्ये ठेवल्या होत्या. सर्व गोष्टींची तयारी झाली होती.

मार्ता आपल्या बेडरूममध्ये गेली. कोणता पोशाख घालावा? लांब झगाच घातलेला बरा वाटेल का? चुण्या असलेला व अंगावर आणि खिशांवर पांढऱ्या फुलांची नक्षी असलेला घालावा का? आपण खूप ताजेतवाने आहोत ह्या विचारानंच तिला भुरळ घातली होती. "काही घडलंच तर तो लांब झग्याचा दोष असेल." तिच्याकडं अद्याप तिनं न वापरलेला जाळीदार कापडाचा सैलसर अंगरखाही होता. अखेरीस तिनं तपकिरी शर्ट आणि बकरीच्या कातड्याचा जाड सोनेरी ठिपके असलेला पट्टा हा ड्रेस निवडला. तिनं आपला चेहरा धुतला. केस काळजीपूर्वक विंचरले. मात्र, कोणत्याच सौंदर्य प्रसाधनांचा तिनं उपयोग केला नाही. तिनं आपले गुडघ्यापर्यंतचे मोजे चढवले. त्यावर नेहमीचे बूट घातले व अंगावर थोडासा पर्फ्यूम फवारला.

आणि आपलं आरशातलं प्रतिबिंब न्याहाळून ती दिवाणखान्यात येऊन बसली.

फक्त तीन वाजले होते. संपूर्ण सकाळ तिनं धूळ, कचरा झाडून स्वच्छ करण्यात घालवली होती. तो चार वाजता येईपर्यंत तिला विश्रांती घेता आली असती. अल्बर्ट प्रथमच तिच्या घरी येणार होता. त्यामुळे ती काहीशी अस्वस्थ होती. ती उठली व टेबलावरचं एखादं पुस्तक कॉफी टेबलवर ठेवण्यासाठी शोधू लागली. कोणतं ठेवावं? शेक्सपिअरचं एखादं ठेवावं का? ऑथेल्लोमध्ये 'ओ माय फेअर वॉरियर' ह्या शब्दांनी ऑथेल्लो डेस्डेमोनाचं सायप्रसमध्ये स्वागत करतो. एखादा सैनिक आपल्या पत्नीचं ह्यापेक्षा कोणत्या अधिक वेदनादायी शब्दांनी स्वागत करू शकेल? मरणापूर्वी इजिप्तची 'क्लिओपात्रा' असं अँटनी तिला संबोधतो, तेव्हा त्या एकाच शब्दातून तो तिच्या राणीपणाच्या वैभवाचं वर्णन करतो. कदाचित असं गंभीर पुस्तक पाहून अल्बर्टला आपण शिष्ट वाटू, असं तिच्या मनात आलं. वास्तविक, ती अशा वाटण्याची पर्वा करणारी नव्हती तरी तिनं ते पुस्तक बाजूला ठेवून गुलाबाच्या फुलदाणीजवळ ‘Du Cote de chez Swann’ हे पुस्तक ठेवलं. ती पाठ टेकून आराम खुर्चीवर बसली. तिला एकाएकी एकाकी आणि रिकामंरिकामं वाटू लागलं. जणू अल्बर्टच्या आगमनाबद्दलची तिची ओढ नाहीशी झाली. त्या ओढीची भावना दुसरी कोणतीच भावना घेऊ शकणार नव्हती.

तिला कोणतीच आर्थिक समस्या नव्हती. आपल्या आईकडून वारसाहक्कानं मिळालेली थोडीशी रक्कम तिला जगायला पुरेशी होती. एका निर्यात कंपनीत तिला सेक्रेटरी म्हणून नोकरी होती. तेथील प्रत्येक कर्मचाऱ्याचं तिच्याबद्दल चांगलं मत होतं. तिला त्रास होणार नाही व थोडीफार चैनही करता येईल अशा विचाराने ते वागत असत. तिच्यावर प्रेम करणाऱ्या दोनतीन मैत्रिणी होत्या. त्यांच्यावर ती विसंबून राहू शकत होती. ह्या मैत्रिणी खरोखरंच चांगल्या व निःस्वार्थी होत्या. इतकं सगळं असूनही अधिक काही हवं असं तिला तीव्रतेनं का वाटत होतं? पूर्वी एकदा ती कोणाच्या तरी प्रेमात पडली होती. अगदी तारुण्यसुलभ असोशी त्यात होती. मात्र आपली ती चूक होती असं तिला आता वाटू लागलं होतं. प्रेमप्रकरणागणिक अधिकाधिक कडवटपणा साठत जातो. त्याखेरीज गरोदरपणही सोसावं लागतं. ऐन विशीत वेळेवर शस्त्रक्रिया झाल्यानं तिचा जीव वाचला होता; पण त्या अनुभवाचा तिनं धसका घेतला होता.

ती उठली. ती स्वस्थ बसू शकत नव्हती. तिनं फुलांची रचना बदलून अधिक सुरेख फुलं खिडकीच्या दिशेनं वळवली. बाहेर पाऊस पडत होता. आकाश दिवसभर ढगाळलेलंच होतं. रिपरिप पडणाऱ्या पावसाने सर्वत्र चिखल झाला होता.

‘मी प्रेमात पडले आहे का?’ तिचं तिलाच आश्चर्य वाटलं. ती स्वयंपाकघरात गेली. पेस्ट्री खाण्याचा मोह तिला टाळता आला नाही. शेगडीवरील कॉफीचं भांडं अद्याप गरम होतं. तिनं स्वतःसाठी कपात कॉफी ओतली. त्यांत अस्पिरिनची गोळी घातली व कॉफी पिण्यासाठी ती खुर्चीत बसली.

अल्बर्ट तिला आवडतच होता. तो तरुण, चैतन्यानं सळसळणारा आणि साधंसुधं आनंदी जीवन जगणारा होता. तो उत्तम जोडीदार होता. परस्परांशी त्यांचा फारसा परिचय नव्हता. मात्र, त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकणार नाही, असं अनेकदा तिच्या मनात येऊन जात असे. पण प्रीती ही गुंतागुंतीची व व्यामिश्र आणि अफाट असते. अल्बर्टसारख्या चांगल्या माणसात ती मूर्तिमंत रूप धारण करू शकेल का? खरं प्रेम तिच्या मागे होतं. ‘प्रियकरा, एकटा तूच माझ्या राज्यात आहेस.’ शब्द व भावनांचा कल्लोळ. नंतर केवळ अस्तित्वात असते ती निर्जीव राख. तो मरण पावला तेव्हा तो तिच्यापासून खूप दूर होता. त्याचं शेवटचं पत्र हाती पडलं, तेव्हा त्याचा मृतदेहही उरला नव्हता. ते पत्र एखाद्या जालीम विषासारखं होतं. इच्छाशक्तीने व रडण्याने ती त्यातून बाहेर पडली. रात्र वैऱ्याची आहे. आणि आता अल्बर्ट. अतिशय शांत. त्याच्याखेरीज कोणीच आजूबाजूला नव्हतं. तरीही हे नातं इतकं कसं घट्ट झालं? एखाद्या दिवशी तो तिला लग्नाबद्दल विचारील. आणि ती दोघं मोठं अपार्टमेंट भाड्यानं घेतील. तो विश्वासू, आग्रही व कडक शिस्तीचा असता तर तो हळूहळू म्हातारा झाला असता. तसा नसता तर तो दुसऱ्याच्या इच्छेचा मान राखणारा व मोठ्या मनाचा झाला असता. हृदयविकारानं त्रस्त होऊन त्यानं तिला आपल्या जगापासून दूर ठेवलं असतं.

ती टेबलापासून दूर गेली. फेऱ्या मारू लागली. तिच्या एका हातात कप व दुसऱ्या हातात पेस्ट्री होती. तो माझ्यासाठी फुलांचा गुच्छ व चॉकलेट बॉक्स आणील. आम्ही हवामान, राजकारण यावर गप्पा मारू. तो त्याच्या जीवनाचं तत्त्वज्ञान मला सांगेल. मात्र, हे करत असताना आमच्या दोघांच्या मनात वेगळेच विचार चालू असतील. निरोप घेताना त्याचं माझ्यावर प्रेम असल्याचं तो सांगेल व चुंबनाची मागणी करील व मीही आनंदाने त्याला चुंबन देईन. किंवा तो कदाचित थोडासा नाटकी व निश्चयी होईल आणि म्हणेल, “मी तुझ्याखेरीज जगू शकणार नाही.” तो माझा हात दाबील. “तू ऐकते आहेस ना? मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. ते अशक्य आहे. मला तू रात्रंदिवस माझ्याजवळ हवीस.” त्याचे डोळे चमकतील, तो हावरटासारखं माझ्या गालाचं, डोळ्यांचं ओठांचं चुंबन घेईल. तो माझ्या पोशाखाची बटणं काढण्याचा प्रयत्न करून मला उद्युक्त करील. होय माझी वक्षस्थळं सुंदर आहेत आणि त्याकडे कोणी पाहिलं तरी त्यांना इजा होणार नाही. कदाचित, हे सगळं मलाही खूप आवडेल. मला हे सगळं नकोय. मी ढोंगी आहे, असं नाही. अनेक गोष्टींबाबत माझ्या स्वतःच्या काही कल्पना आहेत. तसंच कसं जगायचं ह्याबद्दलही निश्चित कल्पना आहेत. पण...

ती आपल्या बेडरूमात गेली. नंतर बाथरूमात. सिंकमध्ये पडलेला केस तिनं उचलून फेकला. नंतर ओ द कोलोनची बाटलीच्या बाटली सिंकमध्ये रिकामी केली. त्यामुळं तेथील आरसा धुरकट झाला. तो हातानं पुसून तिनं आरशात पाहिलं.

तुझं आयुष्य का उगीचच गुंतागुंतीचं करतीयेस? तुला एकटं वाटतं आहे का? जर तो तुला सोडून गेला तर ते तुझ्या दृष्टीनं अधिक वाईट होईल. मला आवडणारा पोशाख माझ्यासाठी बनवला जातो. माझ्या आईची जुनीपुराणी अंगठी मला साथ करत आहे. हे सगळं भरपूर आहे. कदाचित, माझ्यासारख्या तरुणीला हे जरूरीपेक्षा जास्तच असू शकेल. माझ्याकडे हातमोज्यांचे दहा जोड आहेत व अंतर्वस्त्रांचा भरपूर साठा आहे. ह्या वर्षी माझं बँकेतील खातं फुगलं आहे. कोणी माझं चुंबन घेत नाही. परंतु चुंबनं अनेकदा महागात पडतात.

चर्चचा घंटानाद तिच्या कानावर पडला. दुपारचे साडेतीन वाजले होते.

तिला एकदम घरातून पळ काढावा, असं वाटू लागलं. आतापर्यंत लक्षात न आलेल्या धोक्यांपासून पळून जाण्याचा विचार तिच्या डोक्यात घोळू लागला. या विचाराला तिनं आतापर्यंत फारसा थारा दिला नव्हता. पण त्याच्या मनात मोठमोठ्या आशा असतील. ती मात्र त्यात सहभागी होऊ शकणार नाही. काहीतरी निश्चय करून फेल्टहॅट डोक्यावर चढवून, रेनकोट घेऊन ती घराबाहेर पडली. जिन्याजवळ आल्यावर तिला पावसाचा सुगंध जाणवला. एका झटक्यात जिना उतरून ती खाली आली.

रस्ता निर्मनुष्य होता. रस्त्याच्या एका बाजूला रांगेनं एकमजली घरं होती. दुसऱ्या बाजूला उद्यान होतं. जेव्हा झाडाची पानं गळून पडत, तेव्हा घराच्या खिडकीतून झाडांच्या पलीकडे असलेलं टेनिस कोर्ट आणि स्विमिंग पूल दिसत असे. वसंत ऋतूत अकेशिया व हनिसकल फुलांच्या सुगंधानं ती धुंद होत असे. दररोज संध्याकाळी काम आटोपून घरी घरी परतताना संथ गतीनं ह्या रस्त्यावरून चालताना फुलांचा धुंद करणारा सुगंध ती श्वासात भरभरून घेते. हाच सुगंध रात्रीच्या वेळी तिच्या बाल्कनीत हळुवारपणे घुसतो.

पावसाची रिपरिप चालू होती. लगतचा रस्ता, फटीतून डोकावणारं गवत सर्व वस्तू स्वच्छ धुवून निघाल्या होत्या. भिंतीवरून पाण्याचे ओघळ वाहत होते. छपरावरील फरशांवरून पाण्याचे थेंब टपकत होते. आकाश शिशासारखं दिसत होतं. झाडं, घरं यावर ढगांच्या फटीतून उजेड पडल्यानं ती चांदीत बुडवून काढल्यासारखी दिसत होती.

ती चालायला लागली. कुठं जायचं ते तिला ठरवता येईना. तिला रस्त्यावर आणणारा हा पळपुटेपणा कोठून आला? एका खिडकीच्या चौकटीवर एक मांजराचं पिलू गळ्यात दोरी अडकवून उभं होतं. त्याच्या नाकावर पावसाचा थेंब पडला की, ते वर बघत होतं. आतल्या बाजूला मुलांचा आरडाओरडा ऐकू येत होता.

हात खिशात घालून ती चालत होती. तिनं हॅट खाली ओढली. रस्त्यावर शुकशुकाट होता. वाराही वाहत नव्हता. काही वेळानं दुधाच्या बाटल्या घेऊन जाणारी एक स्त्री तिच्या समोरून गेली. त्या बाटल्यांचा किणकिणाट होत होता. चालता चालता तिला एक पूर्व प्राथमिक शाळा लागली. लहान मुलांच्या गाण्यांचे आवाज तिच्या कानावर पडत होते. शहराच्या मध्यभागी पोहोचली, तेव्हा रस्त्यावर बरेच लोक होते. छत्र्या डोक्यावर धरून घाईगर्दीत चालणाऱ्या लोकांच्या मनात आशा व स्वतःबद्दलची काळजी होती. दुकानांच्या खिडक्यात हारीने वस्तू मांडलेल्या होत्या. एका दुकानदारानं रस्त्यावरच्या आपल्या फळांच्या दुकानावर मोठी ताडपत्री लावली होती.

ती एका कॅफेत शिरली. तिथं काहीजण पत्ते तर काही बिलियर्डस खेळत होते. काही बहुधा उद्योगधंद्याविषयी वाद कुजबुजत घालत होते, असं तिला वाटलं.

“एक कॉफी”, तिनं ऑर्डर दिली.
“आमचं कॉफी मशीन आताच बिघडलं आहे.” वेटर
“एक हर्बल चहा द्या.”

पावसाची रिमझिम चालूच होती. मोटारी धावत होत्या. पावसामुळं त्या चमकत होत्या. झोपाळू ड्रायव्हर ओली पिशवी डोक्यावर ठेवून खडखड करीत वॅगन चालवत होता. रस्त्याच्या पलीकडल्या चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी लोक शिरत होते. एका गुत्त्यासमोर एक छोटा मुलगा सिगरेटची थोटकं संथपणं गोळा करीत होता. लॉटरी विक्रेत्यानं तिला नशीब अजमावून पाहायचं आहे का, विचारलं. त्याला नकार देऊन ती पुढे निघाली.

चित्रपटगृहात जाण्याचा विचार तिच्या मनात येऊन गेला; पण तो चित्रपट तिनं पाहिलेला असल्यामुळं तो विचार तिनं झटकून टाकला. राणी एलिझाबेथचा हिरव्या पिसांचा पंखा, तिला राणी जिन्यावरून उतरताना पडलेले राणीच्या सावलीचे दृश्य आठवले. आरशात दिसणारी राणीची प्रतिमा तिच्या मनात ठसलेली होती. पण संपूर्ण चित्रपट तिला आठवत नव्हता. चित्रपटातील व्हॅलरीनं उच्चारलेल्या वाक्यांची तिला पावसानं आठवण करून दिली. ती वाक्यं ज्याच्या त्याच्या तोंडी का होती, याचा ती विचार करू लागली. व्हॅलरीमुळं ती प्रसिद्ध झाली, की त्या वाक्यामुळं व्हॅलरीला प्रसिद्धी मिळाली? तिचा गोंधळ उडाला होता. आता तिला दमल्यासारखं वाटू लागलं.

पाऊस अजूनही पडत होता. सकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला होता. खूप नव्हता; पण रिपरिप चालूच होती. ती झाडांखालून चालू लागली. झाडांच्या फांद्यांनी एकमेकांना बिलगून जणू हिरवा कमानीचा रस्ता केला होता. चर्च मागे टाकून ती पुढे गेली. चर्चच्या घंटा चारचे ठोके देत होत्या. फक्त चारच वाजलेत. घंटेचा प्रत्येक ठोका तिच्या हृदयावर घाव घालीत होता. तिचं भटकणं अगदी मूर्खासारखं होतं. तिच्या स्वभावाला साजेसं नव्हतं. तिनं टॅक्सी थांबवून घरी जायला हवं होतं. पण तिनं तसं केलं नाही. कोणत्यातरी प्रबळ शक्तीनं तिला तसं करण्यापासून परावृत्त केलं.

तो माणूस आपल्यावर खरंखुरं प्रेम करतो ह्याची जाणीव तिला नक्कीच होती. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत. तसंच आवाजातूनही प्रेमाची खात्री पटते. मात्र, तिनं भूतकाळात केलेल्या गोष्टी मात्र तिला कधी ना कधी सांगाव्याच लागणार होत्या. त्या दोन वाबी होत्या. एक म्हणजे प्रेम व दुसरे अपत्याला जन्म न देणं. ते मूल असतं तर आज चार वर्षांचं असतं. मग, एकटीला राहावं लागलं नसतं. नाही. ह्यासाठी ती घरातून बाहेर पडली नव्हती. मग का बाहेर पडली? नव्या प्रेमाला ती इतकी का घाबरत होती? दाट पर्णराशी असलेल्या झाडाखाली ती घाईघाईने आली. आपल्याच पावलांचा आणि श्वासोच्छ्वासाचा आवाज तिला ऐकू येत होता. तिच्या कपाळावरच्या शिरा उडत होत्या. ती एका विशिष्ट लयीत चालत होती. ठरावीक अंतरावर बसण्यासाठी बाक ठेवलेले होते. तिथं बसून शांतपणं समुद्राच्या पाण्याखालील उजेडाचा आणि पानावर पडणाऱ्या थेंबांच्या आवाजाचा आस्वाद घ्यावा, असं तिला वाटत होतं. पण तिच्या मर्यादशील स्वभावानं तो विचार दूर सारला. पुढील वाक्ये कशी कोण जाणे तिच्या मनात घोळू लागली. ‘Queen dido called out from Carthage to Fleeing Aenees.. and the lion’स shadow frightened him...’

अशाच एका रात्री राणी डीडोनं कार्थेन शहरातून साद घातली. सिंहाच्या सावलीनं त्यांना घाबरवलं. नाही ते खरं नव्हतं. राणीच्या हातात विलो झुडपाची फांदी होती. आता (स्वतःच्या संदर्भात) डीडोनं पळ काढला. ती स्वतःशीच हसली व पुटपुटली, “मूर्ख!” तो जिना चढून गेला असेल, आता तो हातात फुलांचा गुच्छ घेऊन दारावरची बेल वाजवेल. आपल्या जाकिटाच्या सुरकुत्या नकळत हातानं घालवील. पायऱ्या भराभर चढल्यामुळं त्याला धाप लागली असेल. शांतपणा व रितेपणाखेरीज काहीच नाही. तो परत बेल वाजवेल. अस्वस्थ होईल. पुन्हा एकदा बेल वाजवेल व निराश होऊन हॅट डोक्यावर ठेवून जिना उतरू लागेल.

..आणि ती चालतच राहिली. इतके गल्लीबोळ तिने कधीच एका दिवसात पालथे घातले नव्हते. तिचे पाय गारठले होते. चेहरा घामाने डबडबला होता. जेव्हा चर्चचे सातचे ठोके तिच्या कानावर पडले तेव्हा ती पूर्णपणे गळून गेलेली होती. ती घराच्या रस्त्यापर्यंत आली होती. तो आनंदात आला व निराश होऊन परतला याबद्दल रस्त्यानं तिला काहीच सांगितलं नाही. भिंतीला पडलेल्या तड्यांमुळं दिव्याच्या सावलीचे तुकडे तुकडे झाले होते. रेडिओवरचे वॉल्ट्झ संगीताचे सूर तिच्या कानावर पडत होते.

दिव्याच्या प्रकाशात पावसाच्या रेघा दिसत होत्या. आकाश ढगाळलेलंच होतं. बहुधा रात्रभर व उद्याही पाऊस पडेल. आपल्या घराचा जिना एखाद्या चैनी माणसानं दारूच्या पार्टीला जाऊन आल्यावर चाचपडत पावलं टाकावीत तसा ती जिना चढू लागली. जिन्यानंही तिच्याशी काहीच हितगूज केलं नाही.

ती आपल्या अपार्टमेंटमध्ये शिरली. पर्फ्युमचा दरवळ तिला जाणवला. त्याचा आवडता पर्फ्युम तिनंच घरभर फवारला होता. तिनं दरवाजा बंद केला. दमलेल्या अवस्थेत डोक्यावरची हॅट भिरकावून दिली. आपला रेनकोट स्वयंपाकघरात टाकला. तिचं मस्तक भणभणत होतं. जीभ कोरडी पडली होती. पाय दुखू लागले होते.

सर्व बाबी जशाच्या तशा होत्या. प्राऊस्टच्या पुस्तकातला aubepines नेहमीच सदाबहार होता. त्या संध्याकाळी घडलेल्या प्रत्येक गोष्टीची कोणाला तरी कल्पना करता आली असती का? म्हणजे जे काही त्या संध्याकाळी घडलं नाही आणि प्रत्यक्षात घडण्याच्या बेतात असताना सगळंच मुसळ केरात गेल्याप्रमाणे विरघळून गेलं. ती का निघून गेली? तो का आला होता? मला माहीत नसलेल्या बाबींबद्दल मी विचार करू शकत नाही. जेव्हा मी चीनचा विचार करते, तेव्हा चीन अस्तित्वात असतो. जेव्हा मी म्हणते, 'चेरी वृक्षाला बहर आला आहे, Fire Dragon…' तेव्हा चीन व जपान अस्तित्वात असतो. दलाई लामा मेला आहे, असं जर मला वाटलं तर तो मेलेला असतो. आजच्या संध्याकाळी त्याच्या आगमनाची मी उत्सुकतेने वाट पाहत होते कारण मी त्याला भेटले होते. त्याच्यासाठी मी अस्तित्वात होते. त्याला मी हवी होते. अरे देवा! केवढी ही डोकेदुखी!

ती आपल्या बेडरूमात शिरली. तिला आता फक्त झोप हवी होती. तिनं कपडे उतरवायला सुरुवात केली... तिच्या हातावर, खांद्यावर ओठावर चुंबनाते ठसे उमटलेले दिसले असते. तिने ते तसेच राहू दिले असते व त्यांच्या सोबतीने रात्र काढली असती. आता ते सर्व ती उशीखाली सरकावून देईल. झोपेत कदाचित ते उशीखालून बाहेर येतील व पुन्हा हात, खांदे या आपापल्या जागी स्थानापन्न होतील. तिनं आपला वधूचा रात्रीचा पायघोळ झिरझिरीत गाऊन अंगावर चढवला. पर्फ्युमच्या वासानं तिचं डोकं गरगरू लागलं. तिनं बाल्कनीचे दरवाजे उघडले. रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश तिच्या बेडरूमात घुसला. बाहेर अखंड पावसाची धार लागलेली होती. रात्रीला ओला वास येत होता. हवेत गारवा होता.

अनवाणी पायानं ती वाईनची बाटली आणण्यासाठी गेली. ती थंडीनं थरथरत होती. बाटली तिला गार लागत होती. मी थोडी वाईन घेईन, असा विचार करता करता तिला पुन्हा 'O My Fair Warrior'ची आठवण झाली. काठोकाठ भरलेले तीन ग्लास एकापाठोपाठ तिनं फस्त केले व ती गादीवर आडवी झाली.

(ही कथा द पेंग्विन बुक ऑफ इंटरनॅशनल शॉर्ट स्टोरीज (१९४५-१९८५) या पुस्तकातून साभार. संपादक : डॅनिअल हलपर्न)
मूळ स्पॅनिश लेखक : मेरसे रोदोरेदा (Merce' Rodoreda)
इंग्रजी भाषांतर : डेव्हिड एच. रोझेंथॉल
मराठी भाषांतर : वासंती फडके
(चित्र : स्वेतलाना टेलेट. इंटरनेटवरून साभार!)