एक भाकर, तीन चुली
मुखपृष्ठापासून अर्पण पत्रिकेचेही कौतुक करावे असे हे पुस्तक. मी वाचनवेडी, मराठी प्राध्यापिका व सत्तर वर्षापूर्वी गारगोटीसारखे खेडेगाव अनुभवणारी म्हणून कादंबरीतील संघर्ष करणारी, परखड झाली, अवहेलना आली तरीही त्याला न हारता, न डगमगता लढत राहिले की 'पारू' आजही खेड्यापाड्यातील वाईट चालीरीती, जाचक रूढी परंपरांनी लाखो लेकी बाळींचं गुरासारखं जीवन जगणं, स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी पारूचा संघर्ष.
वंशाला दिवा म्हणून ७ पोरीला जन्म देणारे कष्टमय जीवन जगत असूनही लेकरांवर माया करणारे आईबाबा. पण वर्चस्व सासऱ्याचं खडूस म्हातारा हे यथार्थ वर्णन-रंग्या खोखरच रंगेल. पारूचं पहिलं लग्न पळसगाव, लंगड्या म्हाताऱ्याशी, दगडूशी - कजाग सासू शेवंता - नवरा लंपट नवरी अजून वयात न आलेली -मुलीला ध्याज मिळतो (दहेज, हुंडा) म्हणून खडूस म्हातारा- वारंवार हे करतो. दुसरं लग्न वडगाव, नवरा शहाजी, पारू १४ शहाजी ४० चा त्याचे चौथे लग्न. त्यांना ४ लेकरं, सासर न छळणारे, या म्होतुराचे वर्णन पण शहाजीचा भाऊबंदकीतून खून, दीर नरपती नादान, आपक हक्काच्या वावरासाठी (शेत) संघर्ष करताना पारुची ससेहोलपट. घर सोडले नंदीवाल्यानी आधार दिला-मानवतेचे दर्शन-तिसरे लग्न- रामाशी, तीन लग्न करूनही मूलबाळ नाही-लग्नात पारूचे वय ४५ रामू साठ- पण पोरगा झाला, 'आनंदाचं झाड' मुलगा हुशार, गावात ४ इयत्तापर्यंत शाळा, मुलगा शिकावा ही इच्छा. पुस्तकाच्या उत्तरार्धात मुलाचा -बबूचा- शिक्षणासाठी संघर्ष. वडील गेल्यावर आईची पोटासाठी एकाकी लढाई सुरु. बाळा हे बी दिवस जातील तू शिकत रहा- मुलगाही त्याला झेपेल ती अनेक काम करत होता.
मी जरी प्राथमिक शाळेत शिकत होतो पण माझी आई जगण्यावर पीडाचडी करत होती. बबूही आईच्या कष्टाचा वसा स्वतःच्या खांद्यावर घेत मोठा होत होता, शिक्षणासाठी काहीही करायची आणि विरह सोसायची तयारी करत होता. बाळा आता मागं हटू नको - जीवाला जप -पोचल्यावर कागूद पाठवून दे न्हाय तं माजा जीव पाकुळीवानी वाट पाहील, लई शीक मोठा हो" आईचे शब्द कानात घुमत होते. म्हणूनच पारूचा संघर्ष वंदनीय, इतरांनी आचरण्याजोगा.
एक भाकर तीन चुली.
देवा झिंजाड.
न्यू एरा पब्लिशिंग हाउस, पुणे.
किं. रु. ४५०. पृष्ठसंख्या ४२४