No Watery Eyes Challenge

साल २००१.

आजही तिचा थिसिस नाकारला गेला.

तिच्या स्वीडिश प्रोफेसरने सांगितलेल्या सगळ्या करेक्शन्स करूनही. सहा महिन्यांपूर्वीही असाच नाकारला गेला होता.

रूमवर येताना युनिव्हर्सिटीचे बर्फाळ रस्ते आपल्याला गडद काळोख्या बोगद्यात घेऊन जातायत, असं तिला वाटत होतं.

रूमवर पोचली तेव्हा तिची जर्मन रूममेट आपल्या गर्लफ्रेंडबरोबर बाहेर गेली होती.

तिला एकटीला रूमवर राहायची भीती वाटत होती. चार वर्षे झाली तरी ही रूम तिचं घर होऊ शकली नव्हती. शेजारच्या खोलीत एकाची पीएचडी पूर्ण झाल्याची पार्टी चालू होती. त्यांच्या सेलिब्रेशनचा आवाज तिला असह्य होत होता.

ती सोफ्यावर पाय पोटाशी घेऊन आणि डोकं गुडघ्यांवर टेकवून थोडा वेळ बसली. पुण्याच्या उबदार घरातून इथे कधी नाव ही न ऐकलेल्या या देशात येण्यापर्यंतचा सगळा प्रवास तिच्या डोळ्यासमोर चमकू लागला. पुण्याच्या आठवणीने तिच्या एकटेपणावर चहूबाजूने हल्ला केला. आपलं मन बेचिराख होत असल्याची तीव्र जाणीव तिला होत होती.

रडू येत होतं; पण रडता येत नव्हतं. काहीही झालं, तरी रडायचं नाही हे तिचं चार वर्षांपूर्वीच ठरवलेलं होतं.

ती अचानक उठली. कोट चढवून दार लावून बाहेर पडली. सरसर पायऱ्या उतरून मुख्य चौकात घेऊन जाणाऱ्या रस्त्यावर चालत सुटली. मेट्रो स्टेशनवर जाऊन नुकत्याच आलेल्या मेट्रोत बसली. ती मेट्रो तिला कुठे घेऊन जाणार आहे, हे बघायची तसदी तिने घेतली नाही. तिच्या मनाचं गुदमरलेपण बहुदा तिला कुठेतरी लांब अज्ञात स्थळी नेऊन सोडून द्यायचं होतं.

मेट्रो शेवटच्या स्टेशनवर आल्यावर ती उतरली. हात थंडगार पडले होते. अनोळखी दुकानाच्या रांगा आणि त्यांचे अगम्य बोर्ड, पांढऱ्याफटक लोकांच्या तिला दुय्यम लेखणाऱ्या नजरा आणि त्यांचे भलत्याच भाषेतले संवाद, उलट्या दिशेने सुसाट वाहणाऱ्या गाड्या, सगळं सगळं मागे सारत ती नुस्ती चालतच होती. ती यापूर्वी कधीच इथे आलेली नव्हती.

रस्त्यावरच्या एक हॉटेलसमोर प्रमाणाबाहेर गर्दी दिसली, तेव्हा तिला थोडी भुकेची जाणीव झाली. तिने या देशात आल्यावर गर्दी अशी कधी अनुभवलीच नव्हती.

पुढे गेल्यावर कळलं की, त्या हॉटेलमध्ये पहिल्यांदाच देशोदेशीच्या विविध पदार्थांचा महोत्सव भरवण्यात आलाय. ती बराच वेळ काचेतून आत दिसणारं ते दृश्य बघत राहिली. लोकं त्या वेगवेगळ्या चवी मनसोक्त आजमावत होते, काही वेळा अचंबित होत होते तर काही वेळा तोंड वाकडं करून न आवडलेला पदार्थ सरळ टोपलीत टाकून देत होते.

आजचे सवलतीचे दर पाहून ती आत जाऊन निरनिराळ्या स्टॉल्सचा अंदाज घेऊ लागली. सर्व पदार्थ हे त्या त्या देशातल्या मूळ चवीसारखेच बनवले असल्याचा त्या हॉटेलचा दावा होता. पण तरीही ते या देशातल्या लोकांसाठी अत्यंत मिळमिळीत आणि सपक केले असणार याची तिला खात्री होती. बरेचसे पदार्थ मांसाहारी होते, ज्याचा तिला उपयोग नव्हता. तिला बाहेरून वाटलं होतं, त्यापेक्षा हे हॉटेल खूपच प्रशस्त होतं आणि स्टॉल्सची संख्या पण जास्त होती.

’No Watery Eyes Challenge’ या पाटीने तिचं लक्ष वेधलं. त्या देशाच्या तोडक्या मोडक्या भाषेत चौकशी केल्यावर तिला कळलं की, या स्टॉलवर एक 'मिस्ट्री पदार्थ' आहे, जो इतका तिखट आहे की, तुमच्या डोळ्यातून पाणी येणारच. पण डोळ्यातून पाणी न येता जर तुम्ही ती पूर्ण प्लेट संपवू शकलात, तर तुम्हाला तिथले सगळे पदार्थ फुकट!

त्या स्टॉलपाशी तो चॅलेंज घेऊन पस्तावलेल्या काही बायका आणि पुरुष लालबुंद होऊन, हा हू करत चॉकलेटचे बार भराभरा तोंडात कोंबताना बघून ती चाचरली. चॅलेंज, परीक्षा, जिंकणे, हारणे, पास, नापास हे सगळे शब्द तिच्याभोवती पिंगा घालू लागले.

तेवढ्यात तो स्टॉल वरचा माणूस तिच्याकडे बघून (खरं तर तिच्या रंगाकडे बघून) तिला चॅलेंज घेण्यासाठी आग्रह करू लागला. आजूबाजूच्या काही बायका पण सरसावल्या. ती कुठल्या देशाची आहे विचारू लागल्या. तिला तिखट खाण्याची सवय असेल, असं गृहीत धरून चॅलेंज घेण्यासाठी भरीस घालू लागल्या. त्यामुळे उत्सुकता निर्माण होऊन अजून काही जण तिच्याकडे चॅलेंज घेण्याच्या अपेक्षेने पाहू लागले. तिच्याभोवती जणू गराडाच पडला.

ती बावरून गेली. सकाळी थिसिसच्या डिफेन्सच्या वेळी ज्युरीचा आपल्याभोवतीचा गराडा तिला आठवला. त्यांच्या प्रश्नांची सरबत्ती आठवली, त्यात आपली झालेली केविलवाणी अवस्था आठवली. ते चेहरे याच चेहऱ्यांसारखे होते. अनोळखी. परके. आपल्याला उपरेपणाची सतत जाणीव करून देणारे. आपल्याला आपलं अस्तित्व सतत सिद्ध करायला लावणारे, आणि तरीही आपल्याला डावलणारे.

ती भानावर आली आणि कसंनुस हसून स्टॉल जवळ जाऊन उभी राहिली. नाइलाज झाल्यासारखं स्टॉलवाल्या माणसाला पदार्थ देण्यासाठी हाताने खूण केली. गर्दीने प्रोत्साहनपर टाळ्या वाजवल्या.

आधी थोडं सोपं करू असं दर्शवत त्या माणसाने तिला एका प्लेटमध्ये इटालियन ब्रेड दिला आणि त्याचा तुकडा तोडून डोळे बंद करायला सांगितले. आणि मग नाट्यमयरीत्या तो 'मिस्ट्री पदार्थ' तिच्या समोर धरला. ब्रेड बरोबर तो खायला सांगितलं. त्या पदार्थाचा लालेलाल रंग पाहून गर्दीच्या काळजात धस्स झालं. लोकांनी त्यांच्या भाषेत उत्तेजनार्थ घोषणा दिल्या. सर्व जण उत्कंठेने तिच्या बंद डोळ्यांकडे आणि हातांकडे बघू लागले.

तिने डोळे बंदच ठेवत, हातात ब्रेडचा तुकडा घेऊन त्यात दुसऱ्या प्लेटमधला तो पदार्थ चमच्याने भरला आणि खायला उचलला. तोंडाजवळ नेताच त्या पदार्थाचा झणझणीत वास थेट तिच्या नाकात घुसला.

अचानक भयंकर दचकल्यासारखे हावभाव तिच्या चेहऱ्यावर पसरले. तिने दीर्घ श्वास घेतला. आवंढा गिळला. घास धरलेला तिचा हात थरथरायला लागला. तिचे ओठ कोरडे ठक्क पडले. गर्दीच्या खिळलेल्या नजरा अदमास घेऊ लागल्या.

तिने थरथरत्या हातांनीशी तो घास कोरड्या ओठांच्या आत ढकलला, तोच जवळजवळ चार वर्षे ताणून ताणून धरलेल्या धनुष्यातून कचकन सुटलेल्या बाणासारखं तिचं मन सटकन्‍ तिच्या शरीरातून बाहेर फेकलं गेलं. त्या सुटलेल्या मनाने मग क्षणार्धात अनेक देश, खंड, शहरं, गावं, पर्वत, दऱ्या, नद्या, कालवे सगळं सगळं पार करून मग अरबी समुद्र ओलांडून, सह्याद्रीवरून उत्तुंग झेप घेतली आणि मग तिचं मन सूर मारून थेट पुण्यातल्या जुन्या निमुळत्या बोळांमध्ये जाऊन विसावलं.

आणि दिवसेंदिवस वागवलेला एकटेपणा खाडकन भिरकावून देत तिच्या तोंडून बाहेर पडलं- “मिसळ!”

गर्दीची उत्सुकता शिगेला पोचली होती.

तिने स्तब्धतेने डोळे उघडले. ते डोळे वेगळेच होते. त्यातला सकाळपासून व्यापलेला मलूलपणा पार विरघळून नाहीसा झाला होता. त्या जागी कुठल्याश्या असंख्य आठवणींचा अस्ताव्यस्त पसारा तरळत होता. ती धक्क्यातून सावरत स्टॉलवाल्याकडे पराकोटीच्या आत्मीयतेने बघू लागली. आजूबाजूचा गराडा तर त्या नव्या डोळ्यांना दिसतही नव्हता.

तिने तो मिस्ट्री पदार्थ कुठून मागवला अशी विचारणा केली, तेव्हा स्टॉलवाल्याने आपल्याला काही माहिती नाही, शेफला विचारावं लागेल असं सांगितलं.

तिने शेफला भेटायची विनंती केली. तेव्हा आज खूप गर्दी असल्याने शेफ व्यग्र असल्याचं तिला कळवण्यात आलं. तिने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता थेट किचनमध्ये धाव घेतली. स्टाफने अडवायचा प्रयत्न करूनही ती शेफपर्यंत पोचली. तिने भाषेचा गोंधळ घालत त्याला माहिती विचारली. तेव्हा त्याने बाजूच्या पॅकेट्सकडे बोट दाखवलं. ज्यात त्या मिस्ट्री पदार्थाचे रेडी मिक्स जिन्नस होते.

त्या पॅकेट्सकडे बघताच तिची नजर खालच्या उजव्या कोपऱ्यावर स्थिर झाली. तिथे काळ्या मार्करने लिहिलेलं होतं- from Pune, India.

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात एका कोपऱ्यात निमूटपणे वसलेला तो विरळ वस्तीचा दुर्गम देश. त्या देशातलं हे बर्फाच्छादित छोटेखानी टुमदार शहर. इथल्या या स्थानिक हॉटेलच्या पारंपरिक किचनने आजवर कदाचित अनेक गोष्टी बघितल्या असतील, पण अकल्पितपणे तिथल्या अनोळखी गोऱ्या शेफच्या गळ्यात घट्ट पडून हरवलेले आभाळ अचानक गवसल्यागत ओक्सबोक्शी रडणारी परदेशी सावळी तरुणी पहिल्यांदाच पाहिली असावी.

बाकी तिचा आजचा दिवस खरंच अपयशी म्हणायचा. कारण, ’No watery eyes challenge’सुद्धा ती हरलीच होती.

गंधार पारखी, पुणे

gandhar.parkhi@gmail.com