नाईटबिच: मातृत्वाच्या आतील स्त्रीत्वाचा टाहो...
‘नाईटबिच: मातृत्वाच्या आतील स्त्रीत्वाचा टाहो...’ हे अजित देशमुख यांचं चित्रपट परीक्षण आधुनिक स्त्रीच्या मनातल्या अस्वस्थतेचा आणि मातृत्वामागच्या गप्प राहिलेल्या थकव्याचा आरसा आहे. मॅरिएल हेलर दिग्दर्शित Nightbitch (2024) या चित्रपटाच्या माध्यमातून देशमुख मातृत्व, स्त्रीत्व आणि पितृसत्ताक अपेक्षांच्या गुंतागुंतीकडे अतिशय संवेदनशील नजरेने पाहतात. एमी ॲडम्सच्या पात्रातून दिसणारी आई आणि स्त्री यांच्यातली दोलायमान झुंज ते इतक्या जवळून अनुभवतात की लेख वाचताना ती आपल्यालाही भिडते. मातृत्वाला देवत्व देणाऱ्या पण त्या मागचा मानवी थकवा न समजणाऱ्या समाजावर ते शांतपणे प्रश्नचिन्ह उभं करतात. पुण्यात राहणारे अजित देशमुख हे सिनेरसिक असून इतिहास आणि मराठी साहित्याचे अध्यापन करतात, आणि त्यांच्या लेखनात नेहमीच संवेदना आणि विचार यांचा सुंदर समतोल जाणवतो.
नुकताच नाईटबिच (Nightbitch, 2024) हा चित्रपट पाहिला. तसा उशीरच झाला. परंतु पाहिल्यापासून या चित्रपटातील काही संवाद, काही फ्रेम्स पाठ सोडत नाहीयेत. त्यांनी जे प्रश्न उभा केलेत त्याची उत्तरे माझ्याकडे नाहीयेत. मॅरिएल हेलर दिग्दर्शित हा चित्रपट आधुनिक मातृत्वाच्या (मदरची भूमिका एमी ॲडम्सने केली आहे.) गुंतागुंतीवर, स्त्रीच्या अस्मितेवर आणि कौटुंबिक तसेच सामाजिक बंधनांवर आधारित एक तीव्र आणि रूपकात्मक कथा मांडतो. सुरुवातीपासूनच हा चित्रपट प्रेक्षकाला मातृत्वाच्या दमवणाऱ्या दैनंदिनतेतील लयीमध्ये घेऊन जातो. रोजचे एकसुरी काम, मुलाचा सांभाळ करताना होणारी धावपळ आणि आपण एकेकाळी कलाकार होतो हे विसरायला लावणारे रूटीन. नायिका, जी एकेकाळी कलाकार होती, आता गृहिणी बनली आहे. तिचे आयुष्य आता दैनंदिन नित्यकर्म, घरकाम आणि मुलाच्या संगोपनात अडकलेले आहे. हे जीवन जितके वास्तव, तितकेच दमछाक करणारे (बघण्याचीसुद्धा) आहे. एमी अॅडम्सच्या अभिनयातून ही स्त्री एकाचवेळी प्रेमळ, अस्वस्थ, कंटाळलेली आणि आपली हरवलेली ओळख शोधणारी दिसते.
लिंगभावाच्या चौकटीतून पाहायचे तर हा एक ठळक स्त्रीवादी चित्रपट आहे. पण म्हणून तो प्रचारकी नाही. नायिकेचे “कुत्री” होणे हे प्रत्यक्ष रूपांतर नसून तिच्या दडपलेल्या प्रवृत्तींचे प्रतीक आहे. प्राण्यांनाही असणारे स्वातंत्र्य स्त्रीला नाही या जाणिवेतून हे रूपांतर घडून येते. ती प्राण्याच्या रूपात आपलं स्वातंत्र्य शोधते. तिच्या पतीची कणाहीन उदासीनता, स्त्रीच्या ' मातृत्वाच्या ' भूमिकेची सामाजिक अपेक्षा आणि तिच्या श्रमांची अदृश्यता हे सर्व पितृसत्ताक रचनेचं प्रतिबिंब आहे. नायिका एकाचवेळी मुलावर जीव लावणारी आई आणि स्वतःच्या हरवलेल्या ओळखीचा शोध घेणारी स्त्री आहे. तिच्यातील आई आणि स्त्री यातला सततचा संघर्ष एमी ॲडम्सने खूप बारकाईने साकारला आहे. ती जेव्हा स्वतःला “मी आता फक्त आई आहे, कलाकार नाही” असं म्हणते, तेव्हा ती आधुनिक स्त्रीच्या अस्तित्वाच्या संकटाचं प्रतिनिधित्व करते. मात्र, चित्रपट शेवटी या संघर्षाला पूर्णविराम न देता बंडखोरीपेक्षा समजुतीकडे झुकतो, जिथे नायिका शेवटी कौटुंबिक व्यवस्थेतच परत येते, फक्त थोडी बदललेली असते. नवरा थोडा अजून समजूतदार झालेला असतो. त्यामुळे चित्रपटाचं स्त्रीवादी रूपक प्रभावी असलं तरी त्याची क्रांतिकारकता अपूर्ण राहते.
हा चित्रपट उपनगरातील मध्यमवर्गीय, सभ्य आणि बंदिस्त जगावरदेखिल भाष्य करतो. इथे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आहे. वाचनालयातील “बुक बेबीज” वर्ग, इतर मातांच्या स्पर्धा आणि परिपूर्ण मातृत्वाचं स्वप्न. पण या सर्व शिस्तीखाली खोल पोकळी आहे. नायिका स्वतःशी झगडते: “मी पुन्हा कधी आनंदी, हुशार किंवा सुंदर होईन का?” हा प्रश्न केवळ तिचा नाही, तर प्रत्येक त्या स्त्रीचा आहे जी स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्री अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफलो यांच्या लिखाणात वेळेचे दारिद्र्य ही संकल्पना वापरली गेली आहे, त्यांच्या मते स्त्रियांवर एवढ्या जबाबदाऱ्या आहेत की त्या स्वतः साठी वेळ काढू शकत नाही. म्हणजेच तिच्याकडे वेळेचे दारिद्र्य आहे. समाज मातृत्वाला देवत्व देतो, पण त्यामागील दमछाक आणि स्त्रीचे व्यक्तिमत्व हरवणे याची दखल घेत नाही. चित्रपट या विरोधाभासाकडे लक्ष वेधतो. काळजी घेणाऱ्या स्त्रीची काळजी कोण घेतं? पती आणि समाज दोघेही तिच्या त्यागावर अवलंबून आहेत, पण तिच्या इच्छांवर, रागावर आणि थकव्यावर कोणीच बोलत नाही. यातील एकच काळीजओल देणारी जागा म्हणजे अशा स्त्रीच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या इतर स्त्रिया. दुःख ही दोन जीवांना जोडणारी सगळ्यात जवळची वाट आहे, याचा प्रत्यय सिस्टरहुड जगणाऱ्या मैत्रिणींशिवाय अधिक चांगले कुणीच समजून घेऊ शकत नाही.
कौटुंबिक नात्यांच्या बाबतीत हा चित्रपट पारंपरिक “सुखी घर” या संकल्पनेला धक्का देतो. पती कामानिमित्त वारंवार प्रवास करत असतो, पत्नी घरात बंदिस्त असते आणि मूल तिच्या जगाचं केंद्र बनतं. या समीकरणात प्रेम आहे, पण समता नाही. नायिकेचं “कुत्री” होणे हे याच असंतुलनाविरुद्धचं बंड आहे. ती आपल्या मूलाशी अतिशय प्रेमाने वागते, पण त्याचवेळी ती जाणवते की तिच्या भावनिक आणि शारीरिक गरजा कोणालाही महत्त्वाच्या नाहीत. जणू मातृत्वाच्या जखमा वारशाने पुढे जात आहेत. कारण नायिकेला सतत आपली आई आठवत असते. मातृत्व स्वीकारणे म्हणजे आपल्या बाजूने अपरिवर्तनीय असणाऱ्या परंतु विरुद्ध बाजूने कधीही बदलू शकणाऱ्या अटींच्या करारावर स्वाक्षरी करण्यासारखे आहे.
नाईटबिच एकाचवेळी अस्वस्थ आणि भावनिक आहे. एमी अॅडम्सचा अभिनय या चित्रपटाचं केंद्र आहे. ती जशी थकलेली आई दाखवते, तशीच ती आतून जळणारी कलाकारही आहे. हा चित्रपट स्त्रीच्या शरीराचा, तिच्या मनाचा आणि समाजाच्या अपेक्षांचे एक जिवंत रूपक आहे. हा चित्रपट ब्लॅक कॉमेडी, भय, व्यंग, वास्तववाद आणि फँटसी यांमध्ये तोल राखण्याची कसरत करतो. रेस्टॉरंटमधील सीनप्रमाणे काही प्रसंग अतिशय गहन आहेत.
हा चित्रपट मातृत्वाच्या वेदनेबद्दल, स्त्रीत्व हरवल्याबद्दल आणि स्त्रीच्या असह्य शांततेबद्दल बोलतो आणि मातृत्वाला देवत्व न देता वास्तव मांडतो. तेच त्याचे बलस्थान आहे. आपले मूल लहान असणाऱ्या स्त्रियांना हा चित्रपट खूप जवळचा वाटू शकतो. मात्र, त्याची मर्यादा म्हणजे शेवटी बंडखोरीपेक्षा समजूत जिंकते. सामाजिकतेच्या आणि लिंगभावाच्या चौकटीतून पाहिलं तर हा चित्रपट मातृत्वाच्या राजकारणाचा आरसा आहे. हा चित्रपट विचारतो - स्त्रीला आई होण्यासाठी काय आणि किती गमवावं लागतं? तिच्या अस्तित्वाची किंमत फक्त काळजी घेण्यातच आहे का? हा चित्रपट म्हणजे केवळ एका स्त्रीचा किंवा आईचा चित्रपट नाही, तर आधुनिक समाजातील स्त्रीच्या आत्म्याचा आरसा आहे. तो पितृसत्तेला नको असलेले प्रश्न विचारतो. या प्रश्नांमध्ये प्रत्येक मातेला, प्रत्येक स्त्रीला स्वतःचा आवाज ऐकू येतो. हे प्रश्न एकाचवेळी वैयक्तिक, सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक आहेत. त्यामुळे हा केवळ एक चित्रपट नाही, तर आधुनिक स्त्रीच्या अंतःकरणातील टाहो आहे. एक असा टाहो जो मातृत्वावर देवत्वाचे लेप चढवून त्यामागील श्रमाची चोरी लपविणाऱ्या समाज आणि पितृसत्तेविरोधात आवाज उठवतो. प्रश्न असा आहे की आजुबाजूचे पुरुष तो ऐकू शकतात का आणि तो कमी करण्यासाठी काही करू इच्छितात का?