माझा स्वयंपाक घरातला प्रवास
माध्यमांतर
प्रत्येकाच्या आयुष्यात काही अनुभव असे असतात जे नकळत आपल्याला घडवत राहतात. मेहेरझाद दुबाश यांचा ‘माझा स्वयंपाकघरातला प्रवास’ हा लेख अगदी असाच रोजच्या साध्या क्षणांतून उलगडत जात आतून आपल्याला हलकेसे जागं करणारा आहे. एका अकरावीच्या मुलाने पैशांची बचत करत स्वयंपाकघरात पाऊल टाकलं आणि त्यातून त्याच्या आयुष्यभराचा चवीचा, नात्यांचा, जबाबदारीचा आणि समानतेचा एक सुंदर संवाद सुरू झाला. आईपासून आजीपर्यंत, मित्रांपासून बायको-मुलांपर्यंत. या स्वयंपाकघराच्या वळणावरून मेहेरझाद ज्या सहजतेने आपला पुरुषी अहं मागे ठेवून माणुसकीच्या चवीने जगण्याची रेसिपी सांगतात, ती मनाला दिलासा देणारी आहे. मेहेरझाद साध्या मराठी भाषेत मन व्यक्त करणार एक पारसी माणूस आहे. (पुरुष उवाच, दिवाळी 2024 मधून साभार.)
1994 साली मी 10 वीची परीक्षा दिली. जुलै महिन्यात निकाल लागला आणि मुंबईहून पुण्याला आलो. 11वीत एका छान (तेव्हा दुसऱ्या कुठल्याही ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही असं वाचावे) ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आईने मुंबईला परत रवाना होण्याआधी पॉकेटमनी म्हणून काही पैसे दिले. त्यावर त्याच पॉकेटमनीवर महिना कसा काढायचा त्याचं भाषण सुद्धा ऐकून घेतलं होतं.
अगदी पंधराच दिवस संपत आले होते, तेव्हा लक्षात आलं की आईने दिलेले पैसे लवकरच उडत चालले आहे (महागाई तेव्हा सुद्धा वाढतच होती). मग ट्यूब पेटली, मी आजीला स्वयंपाक करताना बघितले होते. तयार केलेला चहा परत कसा गरम करायचा त्यात मी विद्यावाचस्पती पद मिळवलं होतं.
मग आजपासून मी स्वत: स्वयंपाक करेन असं ठरवलं आणि डेक्कन जिमखानाच्या पोस्ट ऑफिसच्या मागे असलेल्या बाजारातून 2 किलो बटाटे आणि किराणा दुकानातून 1 किलो तुरीची डाळ विकत घेतली. बाबांच्या मित्राच्या घरी जुनं मीठ आणि काही मसाले होतेच. (जेवढे पैसे वाचले तेवढे वाचवायचे हा प्रण मी घेतला होताच की!) घरी पोहोचलो आणि माझा एकट्याचा स्वयंपाकघरात प्रवेश झाला. डाळ आवडतेच म्हणून आज डाळ करू. काढला कुकर मस्त धुतला आणि तीन मूठ भरून डाळ घातली, तिखट, मीठ आणि जे काही मसाल्यासारखं सापडलं ते सगळं कुकरमध्ये एकत्र घातलं. लोकांना स्वयंपाक करण्यात सुद्धा विद्यावाचस्पती पद मिळतं हे ऐकलं होतं. तर असो, डाळीच्या वरच्या थरापासून कमीत कमीत तीन बोटं एवढं पाणी घालायचं म्हणजे मग एक नंबर काम होतं. मात्र आज एक शंका आली, बोटं आडवी ठेवू की उभी ठेऊन पाणी भरू. मी आज करणारच हा अभिमान घेऊनच मी स्वयंपाकघरात शिरलो होतो.
अर्थात त्यावेळी गुगल विद्यापीठ किंवा मोबाईल फोनचा दूरदूरचा संबंध नव्हता. शेजारच्या काकूंना विचारणं हेही लक्षात आलं नाही. केला हात उभा आणि घातलं पाणी. स्टोव्ह सुरु केला आणि मग वाजू दिल्या शिट्ट्या. तीन शिट्ट्या वाजल्या, आग कमी केली आणि दहा मिनिटांनी झाकण उघडलं. पण बघून वाटलं की अजून दोन शिट्ट्या होऊ देऊ. एकूण पाच शिट्ट्या झाल्यावर कुकर उघडला. खालच्या दुकानातून पाव आणला आणि बसलो डाळ पाव खायला. संध्याकाळी पीसीओचा रेट अर्धा असताना मी डाळ केली हे ऐकून आजी, आजोबा, आई आणि बाबांना किती छान वाटेल ह्याचा विचार करून पहिला घास घेतला. अरे! पुण्यात डाळीची चव अशी का लागते आणि पुढचा घास घेऊ की नको हा प्रश्न पडला. शेवटी मी शप्पथ घेतली होती, पैसे वाचवायचे होते, पण परत परत डाळ अशी बनली तर माझं काही खरं नाही हे सुद्धा लक्षात आलं.
चार पाव आणि दोन वाट्या भरून डाळ गिळल्यावर लक्षात आलं की डाळीची चव अशी का झाली होती. अति उत्साहात डाळ धुणं हे गरजेचं असतं हे मी विसरून गेलो होतो. डाळीला लागलेली बोरिक पावडर आणि केमिकल इत्यादी सकट डाळ शिजवली होती. त्याचे परिणाम पुढचे काही दिवस आणि रात्र भोगावे लागले. त्या भूकंपानंतर कॉलेजच्या कुठल्या मैत्रिणीच्या आईने डब्बा दिला आहे या गोष्टीवर फक्त माझाच नाही तर माझ्या ग्रुपमधल्या सर्व मुलांचा डोळा असायचा. आणि त्यात एखाद्या मैत्रिणीला डाएट करायचे असेल, मग तर आमची दिवाळीच असायची. हॉस्टेलमधल्या मुलांचे आई-वडील कधी येणार? आणि त्यानंतर खाऊचा डब्बा त्या मित्राने रूममध्ये कुठे लपवला आहे? ह्याचे शोध लावण्यात पुढचे काही महिने गेले.
काही महिन्यांनी आमचं पुण्याचं घर आमच्या ताब्यात मिळालं. मुंबईहून सगळे शिफ्ट झाले आणि मी आपटे रोडवरील बाबांच्या मित्राच्या घरातून स्वत:च्या घरात स्थलांतरीत झालो. आई घरी असताना स्वयंपाकघरात शिरायचा चान्स फारसा मिळत नसे. पण आई काही कामानिमित्तानं मुंबईला गेली की स्वयंपाकघरात नुसता राडा असायचा. बहीण लहान होती, बाबा नोकरी करत होते, आजीचे वय झाले होते आणि आजोबांना जुन्या आठवणी काढणे आणि माझ्यावर लक्ष ठेवणे या पलीकडे दुसरे काहीच काम नव्हते.
मग काय घरात राहिला एकच जबाबदार माणूस म्हणजेच ‘मी’. आई गेली की काही दिवस डीप फ्रीझरमध्ये ठेवलेलं जेवण परत गरम करून वाढण्याचं काम माझ्याकडं असायचं. पण मी एकटा असताना केलेली करामत अजूनही कोणाला माहीत नव्हती. आईचं मुंबईला जाणं वाढलं आणि मग हळूहळू आजीला विचारून वरणभात करू लागलो. आधी थोडं कच्चं आणि मग ठीक ठीक वरणभात मिळू लागला. मीठ हे चमच्यानं मोजून नव्हे तर बोटांमध्ये घेऊन वासाप्रमाणं टाकावं हे आजीनं शिकवलं. त्या काळी गुगल विद्यापीठ नसल्याचे फायदे आणि तेवढेच तोटे सुद्धा होते. आपण बटाट्याची भाजी करायचा प्लान केला असला, तरी ती भाजी कशी आणि किती होईल त्याचा अंदाज बांधायला थोडा कालावधी गेला.
धाडस करून एकदा ‘बाबा तू उद्या ऑफिसला डब्बा घेऊन जा’ असे ऐलान केले. पहाटे उठलो, मारली एन्ट्री आणि केली सुरुवात. फक्त बाबांना डब्बा नव्हता द्यायचा, पण बाबांच्या ऑफिसमधल्या एका मुलीवर इम्प्रेशन पण मारायचं होतं. मग खूप काळी मिरी घालून बटाट्याची भाजी केली. ऑफिसमध्ये डब्बा बाकीचे पण खातील म्हणून जरा जास्त घेऊन जा, असं पण बाबांना सांगितलं. दुपारी जेवताना माझ्या लक्षात आलं की काही बटाटे कच्चे राहिले होते. पण बाबा हा बाबा असतो, संध्याकाळी आल्यावर डबा छान होता, असं म्हणून त्यानं कौतुकच केलं आणि उद्या सुद्धा डबा नक्की दे असे सांगून माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्या दिवशी त्या मुलीवर आपलं इम्प्रेशन पडलं की नाही हे विचारायचं मात्र धाडस झालं नाही. मात्र रोज बाबांसाठी आणि थोडक्यात तिच्यासाठी डबा देऊ लागलो. काही दिवसांनी बाबांनी ‘ऑफिसला ये’ असं सांगितलं. मी काय लगेच चकाचक होऊन पोहोचलो. त्या दिवशी ऑफिसमध्ये बाहेरून पार्सल मागवलं होतं. जेवता जेवता हळूच विषय माझ्या दिलेल्या डब्यावर घसरला. त्यावेळी मी दिलेल्या डब्याचं खूप कौतुक झाले. पण डबा गँगमध्ये असलेल्या सर्वांनी चांगले सल्ले सुद्धा दिले. मुख्य टीप म्हणजे ‘डबा फक्त बाबांसाठी पाठव आणि आम्ही त्यामधून थोडी चव नक्की घेऊ’ असं बहुमतांनी व्यक्त केलं गेलं. मला काय काही भरलेली पोटं आणि इम्प्रेशन ह्या दोन गोष्टीच्या पलीकडे काहीच हेतू नव्हता.
पुढची काही वर्षं तशीच गेली. मग 2004 ला दुबईला नोकरी निमित्तानं गेलो. पोहोचल्यावर 1 दिरहम = किती भारतीय रुपये हे समजल्यावर ‘काहीतरी करावं लागेल’ ही घंटी परत वाजली. पण ह्या वेळी आव्हान वेगळं होतं. जे काही खायचा असेल, त्या सगळ्यासाठी सर्व काही आपण स्वत:च्या पैशानं आणि नवीन देशात एक एक गोष्ट शोधून करायचं होतं. आधी कुठं काय मिळेल आणि मग सर्वात स्वस्तात कुठं मिळणार ह्याचा शोध घेता घेता, मी कंपनीने आम्हाला राहण्यासाठी जी सोय केली होती तिथल्या स्वयंपाकघरात माझ्यासाठी आणि माझ्या बरोबरीच्या एका मित्रासाठी स्वयंपाक करू लागलो.
मी स्वयंपाक खूप छान करतो असं ऐकल्यावर मला नीरजचा स्वयंपाकातला अनुभव किती आहे याची जाणीव झाली. मग काय मी स्वयंपाक करणार आणि नीरज भांडी धुणार अशी सेटिंग लागली. पुढचे काही महिने खूप मज्जा आली. त्यानंतर मला दुबईत सामायिक निवास ह्या पद्धतीचा लाभ मिळाला. एका फ्लॅटमध्ये आम्ही भारताच्या तीन वेगवेगळ्या प्रांतांतील लोक राहत होतो. तोपर्यंत स्वयंपाक करणे हा एक आधी टाईमपास आणि मग एक सगळ्यांनी स्वयंपाकघरात काम करता करता गप्पा मारण्याचा विषय झाला. कोणाच्या आयुष्यात काय चाललं आहे, आपल्या देशापासून लांब राहून कोणाला काय वाटतं, परदेशी राहून आपण आपल्या देशासाठी काय करतो, भविष्यकाळाची स्वप्नं हे सर्व काही एकमेकांना सांगितले जात असे. तेवढ्यात माझी बायको (इम्प्रेशनवाली मुलगी) काही महिन्यांसाठी दुबईत आली. मग काय, स्वयंपाकघरापासून एकमेकांच्या रूममध्ये गप्पाटप्पा आणि जेवणाच्या मैफिली जमायच्या. त्यावेळी नीरजची नक्की आठवण येत असे, सगळी भांडी आपल्याला धुवायची आहेत हे लक्षात येत असे.
पुढे 2008 साली भारतात परत आलो. परत इकडे नोकरी लागली. संधी मिळाली की स्वयंपाकघरात जायचा संकोच कधीच करत नाही. सायलीबरोबर (आई नसताना) मुलांसाठी चिकनचे वेगवेगळे पदार्थ शिजवायला खूप मज्जा येते. आजपण स्वयंपाक करताना गुगल विद्यापीठाची गरज लागत नाही, मला माझ्या अवतीभवती असलेल्या लोकांच्या आवडी निवडीही लक्षात आहेत. कोणीतरी इन्फ्लूएन्सर काहीतरी करत आहे म्हणून मला तसं करावेसं वाटत नाही. वयाच्या 46 शीला स्वयंपाक करणं, हा एक सायलीबरोबर घालवण्यासाठीचा वेळ आहे. मुलांना आनंद वाटेल का असे कोडे नेहमीच असते. पण स्वयंपाक माझ्यासाठी एक स्ट्रेस बस्टर आहे.
आज सगळ्या गोष्टी नीट स्वच्छ करून प्रमाणात बनतील ह्याची काळजी मी स्वयंपाकघरात नक्की घेतो. इयत्ता 11वीत असताना ‘गुळ्हाळीचा दृष्टांत’ असा एक धडा होता. त्या धड्यात एक गुळ्हाळी त्याच्या परिश्रमातून, अनुभवातून आणि धगधगत्या आगीत उसाच्या रसातून गूळ कसा बनवतो हे सांगितलं होतं. आयुष्यभर हा गुळ्हाळी स्वयंपाकघर हे फक्त स्त्रियांसाठी आहे आणि मी त्यात जाऊन काम नाही करणार असं म्हणाला असता तर त्यांनी केलेल्या गुळाचा आस्वाद जगात पसरला नसता.
स्वयंपाकघर हे फक्त आजीनं, आईनं, बहिणीनं, आपल्या बायकोनं किंवा आपल्या मुलीनं चालवावं असं जर मी माझ्या मनात आणलं असतं तर, एखाद्यावेळी माझ्या आयुष्यात घडलेला एक मोठा घटक कधीच घडला नसता. मग काय तो मिळालेला रिकामा वेळ तंबाखू चोळत बसलो असतो. स्वयंपाकघरात घडलेल्या गोष्टी, सर्वांच्या मूडप्रमाणे गरजेचा स्वयंपाक, आपला हात भाजला किंवा बोटं कापली गेली तरी ‘द शो मस्ट गो ऑन’ असं समजून घेऊन आपल्या घरात असलेल्या स्त्रिया नक्की काय करतात हा प्रश्न मला पडायचा. पण बहुतेक थोडक्यात का असेना मला त्याची जाणीव झाली आहे आणि त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. आपल्या आईनं किंवा बायकोनं दिवसभर काय केलं आणि तरी पुरुषांचा आत्मा तृप्त का होत नाही हे सुद्धा कळू लागलं आहे. आज मी एका मुलाचा आणि एका मुलीचा बाबा आहे. आज मी जेव्हा माझ्या मुलाला स्वतःसाठी न करपलेलं ऑम्लेट बनवताना व खाताना बघतो तेव्हा एक समाधान असतं की, स्वयंपाकघरात स्वतःच्या बापाला बघून माझ्या मुलाला असं कधीच वाटलं नाही की स्वयंपाकघर हे एका स्त्रीचं कार्यक्षेत्र आहे, खरं तर स्वयंपाकघर म्हणजे एका घराला आनंदी आणि स्वस्थ ठेवण्याचं साधन आहे.