दुर्गाबाई देशमुख : मदर ऑफ सोशल वर्क

२३ फेब्रुवारी २०२१

२ एप्रिल १९२१ रोजी महात्मा गांधी आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील टाऊन हॉलमध्ये भाषणासाठी येणार होते. तिथे एक बारा वर्षांची मुलगी आयोजकांना भेटायला आली.देवदासी व बुरखाधारी मुस्लिम महिलांच्या सभेसाठी महात्मा गांधींचा वेळ मागू लागली.त्या मुलीकडे पाहून तिच्या सर्वसाधारण आर्थिक स्थितीची जाणीव होत होती. म्हणून आयोजकांनी सांगितले की ५००० रु. ची देणगी महात्मा गांधींना देणार असाल तर ते दहा मिनिटे येऊ शकतील.

ही बारा वर्षांची मुलगी म्हणजे दुर्गा राव. काकीनाडात बालविवाह, देवदासी, मुस्लिम महिलांमधील बुरखा पद्धत अशा अनेक अंधश्रद्धा प्रचलित होत्या. दुर्गाला महिलांवरील अन्यायाची चीड होती. ती स्वतही बालविवाहाच्या प्रथेला बळी पडली होती. तिला वाटले महात्मा गांधींच्या उपदेशामुळे या प्रथा नष्ट होण्यास मदत होईल म्हणून ती या सभेसाठी प्रयत्न करत होती. जेव्हा दुर्गाने या महिलांना पैशाच्या मागणीविषयी सांगितले तेव्हा त्यांनी पाच हजार रुपये जमवायचे कबूल केले, पण एका अटीवर.

ती अट अशी होती की रोज दुर्गाने त्या महिलांना महात्मा गांधींविषयी माहिती सांगायची. त्याप्रमाणे रोज दुर्गा तिथे जाऊन महात्मा गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील लढ्यासंबंधी, आत्मसन्मानाच्या लढ्याविषयी माहिती सांगू लागली. त्यासंबंधीची गाणी म्हणू लागली. आठ दिवसांत या महिलांनी ५००० रुपये जमवले. आता प्रश्न जागेचा होता. देवदासी व बुरखाधारी मुस्लिम महिला टाऊन हॉलसारख्या जाहीर सभेत हजर राहू इच्छित नव्हत्या. महात्मा गांधींच्या सभेला परवानगी देणाऱ्या जागेच्या मालकाला ब्रिटिशांनी अटक करण्याची शक्यता होती. त्यामुळे जागा मिळेना. शिवाय या सभेसाठी दोन-चारशे महिला येण्याची शक्यता असल्याने सभा घरीही घेणे शक्य नव्हते. शेवटी दुर्गा तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेली. त्यांना तिने अटकेच्या शक्यतेबद्दलही सांगितले. ते देशभक्त होते. ते म्हणाले, "तुझ्यासारख्या छोट्या मुलीने न घाबरता एवढे ठरवले आहे तर माझ्या सारख्या प्रौढ माणसानं का घाबरावे? मला अटक झाली तरी चालेल."

आयोजकांना सारे सांगितल्यावर त्यांनी महात्मा गांधी फक्त पाच मिनिटे सभेसाठी येतील असे कबूल केले. दुर्गाने दोन मिनिटेही चालतील असे सांगितले. महात्मा गांधी स्टेशनवर उतरल्यावर टाऊन हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावरच ही शाळा होती. महात्मा गांधी तिथे आले तेव्हा एक हजार पेक्षा जास्त महिला तिथे त्यांच्या दर्शनासाठी जमलेल्या होत्या. भाषणाला सुरुवात करण्याआधीच एका वयस्कर महिलेने महात्मा गांधींना पाच हजार रुपयांची थैली दिली. अनेकींनी गळ्यातील हार, हातातील बांगड्या असे सोन्याचे दागिने काढून देशकार्याला अर्पण केले. दुर्गाला नंतर कळले की या साऱ्यांची किंमत पंचवीस हजारांच्या आसपास होती.

महात्मा गांधींनी भाषणाला सुरुवात केली. पाच मिनिटे संपली तरी ते बोलत राहिले. अर्धा तास संपला तरी ते बोलतच राहिले. देवदासी रुढी घालवण्याविषयी, पडदा पद्धत नष्ट करण्याविषयी, महिलांच्या उन्नतीविषयी ते हिंदीतून बोलले. दुर्गा त्यांच्या हिंदी भाषणाचे तेलुगूत भाषांतर करत होती. महात्मा गांधी जायला निघाले तेव्हा सर्व जण त्यांना दारापर्यंत पोचवायला गेले. महात्मा गांधींनी दुर्गाला आपल्याबरोबर टाऊन हॉलमधील सभेला नेले व पुढील भाषणाचे तेलुगूत भाषांतर करून घेतले.

या सभेचा परिणाम म्हणजे कोणी मुलगा तयार झाल्यास, देवदासी आपल्या मुलींची लग्ने करू लागल्या. स्वातंत्र्यानंतर दुर्गाने त्यावेळच्या मंत्री डॉ.मुथुलक्ष्मी रेड्डी यांच्या मदतीने आंध्र विधानसभेत देवदासी प्रथा कायद्याने बंद केली.

या दुर्गाचा जन्म १५ जुलै १९०९ रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंद्री जिल्ह्यातील काकीनाडा या गावात झाला. वडील रामाराव सामान्य ब्राह्मण कुटुंबातील होते पण निःस्वार्थी समाजसेवक होते. आईचे नाव कृष्णवेनम्मा. प्लेग व कॉलऱ्याच्या साथीत आपल्या तीन साथीदारांसह रामाराव मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला स्मशान,चर्च, दफनभूमीत जात. कधी दुर्गा, तिचा लहान भाऊ, पत्नीलाही नेत. दुर्गाच्या मनावर निःस्वार्थ समाजसेवेचा ठसा उमटला. पण एक मोठी चूक रामारावांकडून घडली. त्यांनी दुर्गाचे आठव्या वर्षी लग्न लावून दिले. तिचे पती सुब्बाराव हे एका श्रीमंत जमीनदाराचे दत्तक पुत्र होते.

वयात आल्यावर तिने या लग्नसंबंधांना नकार दिला. तिच्या वडिलांनी व भावाने दुर्गाला पाठिंबा दिला. तिने सुब्बारावना दुसऱ्या लग्नाची लेखी संमती दिली. पुढे सुब्बारावांची दुसरी पत्नी तिमयम्मा हिला एक मुलगा झाला. पण त्याचा व नंतर सुब्बारावांचाही मृत्यू झाला. सासरी छळ व्हायला लागल्यावर तिमयम्मा दुर्गाकडे आली. तोपर्यंत दुर्गाचे लग्न भारताचे अर्थमंत्री व रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सी. डी. देशमुख यांच्याशी झाले होते आणि ती दुर्गाबाई देशमुख या नावाने ओळखली जाऊ लागली होती. दुर्गाबाईंनी तिला व्यावसायिक प्रशिक्षण दिले. ती देशमुख कुटुंबासोबत राहून हैदराबाद येथील 'रीजनल हँडीक्राफ्ट्स इन्स्टिट्यूट'मध्ये शिक्षिका म्हणून काम करू लागली.

बाराव्या वर्षी दुर्गाबाईंनी इंग्रजी माध्यमाच्या विरोधात शाळा सोडली होती पण शिक्षणाची आवड असल्याने हिंदी शिकायला सुरुवात केली. त्या काळी हिंदी शिक्षण राष्ट्रीय चळवळीशी जोडले गेले होते. सहा महिन्यात त्यांनी हिंदीत प्राविण्य मिळवले. १९२३ मध्ये दुर्गाबाईंनी मुलींसाठी 'बालिका हिंदी पाठशाला' सुरू केली. आईसहित ५०० महिलांना हिंदी शिकवले आणि कॉंग्रेसच्या स्वयंसेविकाही बनवले. महात्मा गांधी, कस्तुरबा ही शाळा पाहून गेले. जमनालाल बजाज शाळा पहायला आले असता त्यांनी मुख्याध्यापिकेला भेटायची इच्छा व्यक्त केली. चौदा वर्षाच्या फ्रॉकमधील दुर्गाबाईंना पाहून ते चकित झाले. नंतर या शाळेचे काम पाहून महात्मा गांधींनी दुर्गाबाईंना सुवर्णपदक देऊन गौरवले. महात्मा गांधींच्या उपस्थितीत दुर्गाबाईंनी विदेशी कपड्यांची होळी केली आणि खादी वापरायला सुरुवात केली.

दुर्गाबाई धीट होत्या. एकदा कॉंग्रेसच्या खादी प्रदर्शनाला पंडित जवाहरलाल नेहरू आले असता त्यांनी तिकिटासाठी पंडित नेहरूंना अडवले. तिकिटाशिवाय कोणालाही न सोडण्याची आज्ञा असल्याचे सांगितले. कोणीतरी तिकीट काढून आणले तेव्हाच पंडित नेहरूंना आत सोडले. पंडित नेहरूंनीही 'आदेश चोख पाळणाऱ्या' म्हणून त्यांचे कौतुक केले.

विसाव्या वर्षी दुर्गाबाईंनी स्वातंत्र्य चळवळीसाठी तुफानी दौरे व भाषणे केली. त्यांची भाषणे,साहस व संघटना बांधण्याचे अद्भुत कौशल्य पाहून लोक त्यांना 'जोन ऑफ आर्क' म्हणू लागले. त्यांनी प्रख्यात नेते टी. प्रकाश यांच्याबरोबर मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. २५ मे १९३० ला त्यांना अटक होऊन एक वर्षांची शिक्षा झाली. बाहेर येताच त्यांनी पुन्हा आंदोलनात भाग घेतला आणि त्यांना ३ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. जेलमध्ये कडक उन्हात उभे राहणे, उपाशी राहणे, मिरची दळणे इ. शिक्षा झाल्या; पण त्यांनी क्षमा मागितली नाही. तुरूंगात त्यांनी इंग्रजी शिकून घेतले. तिथे विविध गुन्हेगार स्त्रियांशी त्यांचा परिचय झाला. अज्ञानी व अशिक्षित असल्याने कित्येकदा गुन्हा नसतानाही स्त्रियांना गुन्हेगार ठरवले जाते म्हणून त्यांनी कायद्याचे शिक्षण घ्यायचे ठरवले. तुरुंगात मृत्युदंडाची शिक्षा मिळालेल्या कैद्यांच्या यातना पाहून आणि खराब अन्नामुळे त्यांच्या तब्येतीवर वाईट परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी राजकारणापासून दूर जायचे ठरवले.

तुरुंगातून सुटका झाल्यावर दुर्गाबाईंनी मॅट्रिकची परीक्षा दिली. यथावकाश त्या एम.ए.झाल्या. महिलांना मोफत कायदेशीर मदत करण्यासाठी त्यांनी एलएलबीची पदवी मिळवली. १९४२ मध्ये त्यांनी मद्रासमध्ये वकिलीला सुरूवात केली. खुनाच्या प्रकरणात युक्तिवाद करणाऱ्या त्या पहिल्या महिला वकील बनल्या.चार वर्षे त्या मद्रासमधील प्रमुख वकिलांमध्ये गणल्या जात होत्या.

बनारस हिंदू विद्यापीठात शिकत असताना त्यांच्यासमोर पंडित मदनमोहन मालवीय यांचे प्रेरक उदाहरण होते तो संस्था उभारणीचा आदर्श समोर ठेवून दुर्गाबाईंनी १९३७ मध्ये आंध्र महिला सभेची स्थापना केली. या संस्थेद्वारे त्यांनी आरोग्य, अपंगत्व, पुनर्वसन, कायदेशीर सल्ला, म्हातारपणीसाठी आधार अशा अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली.महिलांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे यासाठी त्या आग्रही होत्या. महिलांसाठी शिक्षण, विविध व्यावसायिक कौशल्ये शिकण्याची सोय, नर्सिंग शाळा, अंधांसाठी शाळा, वसतिगृहे, तांत्रिक प्रशिक्षण केंद्रे उभारली. रुग्णालये सुरू केली. १९३७ ते १९४६ दरम्यान आंध्र महिला सभेच्या छोट्या रोपट्याचे मोठ्या वृक्षात रुपांतर झाले.

१९४६ मध्ये दुर्गाबाईंची संविधान सभेत नेमणूक झाली. तिथे त्या कमिटी फॉर रूल्स अँड प्रोसीजर्स आणि द स्टीअरिंग कमिटी या समित्यांच्या सदस्य होत्या. दुर्गाबाईंनी अंदाजे ७५० सुधारणा सुचवल्या. त्या संविधान सभेच्या व कॉंग्रेस असेंब्ली पार्टीच्या प्रत्येक सभेला हजर असत.

न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर न्यायाधीशांना आपली नेमणूक एखाद्या पक्षाने किंवा व्यक्तीने केली आहे असे वाटता कामा नये तरच मुक्तपणे न्यायदान होईल असे त्यांना वाटत होते. प्रांतिक न्यायालयात न्यायाधीश नेमण्याबाबत, राज्यपाल नेमण्याच्या पद्धतीबाबत, नवीन न्यायालये सुरू करण्याबाबत त्यांनी अनेक सूचना केल्या. हिंदू कोड बिलात महिलांना मालमत्तेचा हक्क असावा यासाठी त्या आग्रही होत्या. राष्ट्रीय भाषा हिंदुस्तानी म्हणजे हिंदी + उर्दू असावी, विधानसभेतील उमेदवाराचे वय ३५ वरुन ३० वर आणावे अशा सूचना त्यांनी केल्या. संविधान सभेत समिती अध्यक्ष असणाऱ्या त्या एकमेव महिला सदस्य होत्या.

१९५२ मध्ये दुर्गाबाईंची योजना आयोगावर नेमणूक करण्यात आली. त्या ठिकाणी काम करत असताना त्यांचा तत्कालीन अर्थमंत्री व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर सी.डी.देशमुख यांच्याशी परिचय झाला् व लवकरच दोघे विवाहबद्ध झाले. लग्नाला साक्षीदार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, सुचेता कृपलानी व दुर्गाबाईंचा धाकटा भाऊ होते. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्या दुष्काळ निवारणाच्या कामासाठी पुण्याला आल्या आणि सी.डी.देशमुख योजना आयोगाच्या कामावर हजर झाले. लग्नानंतर देशमुख पती-पत्नींनी ठरवले की दोघांपैकी एकाने कमवायचे व दुसऱ्याने सामाजिक कार्यासाठी वाहून घ्यायचे. त्याप्रमाणे दुर्गाबाईंनी सामाजिक कार्य सुरू ठेवले.

त्याच वर्षी 'सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड'ची स्थापना होऊन दुर्गाबाईं त्याच्या पहिल्या अध्यक्ष झाल्या. चीनला भेट देणाऱ्या भारताच्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. तिथे त्यांनी कुटुंब न्यायालयाचा अभ्यास केला. भारतात परतल्यावर त्यांनी कुटुंब न्यायालयाची मागणी केली. त्यामुळे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांच्यावरील ताण कमी होऊन कुटुंब तुटण्यापासून वाचतील असे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी, १९८४ मध्ये 'कौटुंबिक न्यायालय कायदा' अस्तित्वात आला. १९५८ मध्ये केंद्र सरकारने 'द नॅशनल काउन्सिल व विमेन एज्युकेशन'ची स्थापना केली आणि दुर्गाबाईंना अध्यक्ष केले. केंद्र व राज्य सरकारने मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, यूजीसीने त्यासाठी खास आर्थिक तरतूद करावी, अनेक विभागात महिलांना आरक्षण ठेवावे अशा अनेक मूलगामी सूचना त्यांनी केल्या.

दुर्गाबाईंनी केलेल्या अनेकविध सामाजिक कामांमुळे त्यांना 'मदर ऑफ सोशल वर्क' म्हटले जाऊ लागले. १९७१ मध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना नेहरू लिटरसी अवॉर्ड देण्यात आले. १९७५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय कामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील युनेस्को पुरस्कार मिळाला. पॉल जी हॉफमन पुरस्कार व इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.

दुर्गाबाई म्हणत, " Life is uncertain and the life span is limited. Why then wait to do a good thing?" सतत कार्यरत असतानाही त्यांनी The Stone That Speakth हे पुस्तक आणि Chintaman and I हे आत्मचरित्र लिहिले.

श्रीकाकुलम जिल्ह्यातील नरसन्नपेटा येथे ९ मे १९८१ रोजी दुर्गाबाई देशमुख यांचे निधन झाले. आंध्र महिला सभा आणि विविध संस्थांच्या रुपात त्यांचे कार्य अजूनही टिकून आहे.

सुनीता भागवत