‘मिळून साऱ्याजणी’ : सिद्धान्त आणि अनुभव यांना जोडणारा पूल (पूर्वार्ध)

मिळून साऱ्याजणीची ३१ वर्षांची कारकीर्द म्हणजे समग्र परिवर्तनासाठी चालू असलेल्या वाटचालीतील एक दिशादर्शक पाऊल आहे. घरापासून समाजापर्यंत आणि व्यक्तीपासून ते संघटीत समूहांपर्यंत, स्त्री, पुरुष, LGBTQI+ अशा सर्वांना जाचक, रूढीग्रस्त चाकोऱ्यांमधून सोडवणारं, सच्च्या माणूसपणाकडे नेणारं जे जे काही असेल त्यासाठीचे विचारपीठ ही 'साऱ्याजणी'ची भूमिका आहे.

मानवी समाजात हजारो वर्षांपासून आर्थिक व सामाजिक विषमता रुजलेली आहे. वर्ग, जात, वंश, लिंगाधारित पुरुषसत्ता अशा विषमतेच्या व्यवस्थांमधून दुर्बल घटकांचं शोषण अविरतपणे चालू असतं. समाजातील ह्या प्रमुख धारणामधून व्यक्तिगत जाणिवा घडतात, त्या धारणांनाा अनुसरून माणसं वागत असतात. समाज हा भावभावना असणाऱ्या, त्या व्यक्त करू पाहणाऱ्या, बंधनं झुगारून नवी क्षितिजं निर्माण करू पाहणाऱ्या जिवंत, रसरशीत माणसांनी बनलेला असतो. व्यक्तींच्या विचार आणि कृतीमध्येच या वर्चस्ववादी विषमताधारित धारणांना शह देण्याचं व त्यांना बदलवण्याचं सामर्थ्यही कसं असतं, हे मिसातील लिखाणातून कशा प्रकारे प्रतिबिंबित झालं आहे याचा अभ्यासपूर्ण आढावा या लेखात समाजशास्त्राच्या प्राध्यापक डॉ. वैशाली जोशी यांनी घेतला आहे.

रोजच्या जगण्याच्या अनुभवांना वैचारिक सिद्धान्ताची महत्त्वाची सामग्री म्हणून पाहता येतं ही जाणीव या मासिकानं बळकट केली, असं त्या नोंदवतात. समाजपरिवर्तन ही अतिशय संथ गतीनं चालणारी प्रक्रिया आहे, याचं भान ठेवत छोट्या छोट्या वैचारिक सुधारणांचे हलके धक्के देत समाज परिवर्तनासाठी 'साऱ्याजणी'नं जागल्याची भूमिका घेत केलेलं समाजशास्त्रीय योगदान या लेखात त्यांनी उलगडून दाखवलं आहे.आपले अनुभवही या सिद्धान्तांशी आपण कसे जोडून घेऊ शकतो, याची प्रचिती या लेखातून आपल्याला मिळू शकेल असा विश्वास वाटतो.

पूर्वार्ध:

सिद्धान्त आणि अनुभव या दोन पातळ्यांना सतत जोडून पाहणाऱ्या ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या समाजशास्त्रीय अध्ययनातील योगदानाचा आढावा प्रस्तुत लेखात घेतला आहे. या मासिकाच्या माध्यमातून गेली ३१ वर्ष जे सातत्यपूर्ण दर्जेदार लेखन झाले, ते संदर्भ-साहित्य म्हणून अतिशय मोलाचे आहे. एक व्यापक संरचना म्हणून समाजव्यवस्था कशी चालते व या व्यवस्थेचा भाग म्हणून जगणाऱ्या व्यक्ती आपल्या जगण्याचा संदर्भ कसा लावतात, हे मिसातील लिखाणातून फार चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. ‘जे जे खाजगी व व्यक्तिगत, ते ते राजकीय’ ह्या स्त्रीवादी भूमिकेनुसार व्यक्तिगत पातळींवरील अनुभव पुढे आल्याने, चर्चिले जाण्याने नवी वैचारिक दिशा मिळते. त्यातून सिद्धान्त-निर्मिती होते. दुसरीकडे, व्यक्तिगत अनुभवांची पाळेमुळे व्यवस्थेत रुजलेली असतात व आपले अनुभव, आपले प्रश्न हे फक्त आपल्यापुरते नसून पितृसत्ता, पुरुषप्रधान व्यवस्था, जातिव्यवस्था अशा विषमतेच्या व्यापक समाजव्यवस्थेशी निगडीत आहेत ही जाणीव निर्माण करण्याचे तसेच ज्या संकल्पना व सिद्धान्तातून या उतरंडीचे भान येते, त्यांच्याशी आपल्या वाचकवर्गाला सहजपणे जोडण्याचे काम मिसाने केले आहे.

‘मिळून साऱ्याजणी’ : समग्र परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले भक्कम पाऊल

मानवी समाजात हजारो वर्षांपासून आर्थिक व सामाजिक विषमता रुजलेली आहे. वर्ग, जात, वंश, धर्म, पुरुषसत्ता अशा विषमतेच्या व्यवस्थांमधून दुर्बल घटकांचे शोषण अविरत चालू आहे. शोषणाच्या या व्यवस्थेने बदलत्या काळानुरूप आपल्या चौकटी कमी अधिक प्रमाणात शिथिल केल्या; पण मोडल्या नाहीत. उलट, गरज पडेल तशी एकमेकांबरोबर हातमिळवणी करत शोषणाचे नवे नवे मार्ग निर्माण केले.

समायोजन आणि संघर्षाच्या दुहेरी मार्गाने समाजव्यवस्थेत सातत्याने बदल होत असतो. पण समाज परिवर्तन ही अतिशय संथ गतीने चालणारी प्रक्रिया असते. समाजातील आचार, विचार आणि नियमांच्या चौकटींची पाळेमुळे इतकी घट्ट रुजलेली असतात की, एक घाव दोन तुकडे या न्यायाने हवे तसे बदल आणता येत नाहीत. अगदी आमूलाग्र क्रांतीसुद्धा अविरत सुरू असलेल्या घटनाक्रमातूनच जन्माला येते. त्यामुळे छोट्या छोट्या वैचारिक सुधारणांचे हलके धक्के देत, गुंत्याची उकल करत जाणे हा समाज परिवर्तनाचा एक प्रभावी मार्ग आहे.

समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या समग्र परिवर्तनासाठी विचार आणि कृती यांची सांगड घालणे आणि या दोन्ही पातळ्यांवर सुसंगत बदल घडवून आणणे आवश्यक असते. व्यक्ती आणि समष्टी यांच्यात पारस्पारिकतेचं नातं असतं. समाजातील प्रमुख प्रवाही धारणांमधून व्यक्तिगत जाणिवा घडतात, या धारणांना अनुसरूनच माणसं वागत असतात. पण म्हणून आपण समाजाकडे केवळ पारंपरिक धारणा व नियमांचा पिंजरा म्हणून बघायची गरज नाही. समाज हा भावभावना असणाऱ्या, त्या व्यक्त करू पाहणाऱ्या, बंधने झुगारून नवी क्षितिजे निर्माण करू पाहणाऱ्या जिवंत, रसरशीत माणसांनीच बनलेला असतो. व्यक्तींच्या विचार आणि कृतीमध्येच या वर्चस्ववादी धारणांना शह देण्याचे व त्यांना बदलवण्याचे सामर्थ्यही असते. पण हे तेव्हाच घडते, जेव्हा एका व्यक्तीमध्ये झालेला बदल हा सामूहिक पातळीवर दिसायला लागतो. त्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक अशा दोन्ही पातळ्यांना जोडणारे परस्परपूरक दुवे महत्त्वाचे असतात. या संदर्भात ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचे योगदान अतिशय मोलाचे ठरते. ‘मिळून साऱ्याजणी’ची ३१ वर्षांची कारकीर्द म्हणजे समग्र परिवर्तनासाठी चालू असलेल्या वाटचालीतलं एक भक्कम, दिशादर्शक पाऊल आहे.

या मासिकाचे नाव जरी ‘मिळून साऱ्याजणी’ असे असले तरी पहिल्या अंकापासून या मासिकाच्या वाचक वर्गात समतेचा विचार जोपासणाऱ्या सर्वांचा समावेश आहे. सर्वच स्त्री-पुरुषांना स्वतःशी नव्याने संवाद करावा ह्या हेतूने हे मासिक १९८९ मध्ये विद्या बाळ यांनी सुरू केले. वर्ग, जात, वंश आणि धर्म अशा निरनिराळ्या चौकटींमध्ये वावरणाऱ्या सर्व स्त्रिया पुरुषसत्तेच्या एकसमान सूत्राने बांधलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या मूलभूत प्रश्नांची जात एकच आहे, ती समजून घेण्यासाठी अनुभवांची मनमोकळी देवाणघेवाण व्हावी व त्यांना आपली अशी एक जागा, एक अवकाश प्राप्त व्हावा हा या मासिकाचा हेतू आहे. ग्रामीण-शहरी, श्रीमंत-गरीब, शिक्षित-अशिक्षित; तसेच जाती-धर्माच्या भेदांच्या पलीकडे जाऊन बाईपणाची जाणीव असणाऱ्या; पण या जाणिवेचा उगीच बाऊ न करणाऱ्या या ‘साऱ्याजणी’ आहेत. बाईपणापलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख सांगणाऱ्या आणि याच न्यायाने पुरुषपणाची सामाजिक चौकट ओलांडू पाहणाऱ्या पुरुषांशी मोकळेपणाने संवाद साधणाऱ्या या ‘साऱ्याजणी’ आहेत. म्हणूनच ‘घरापासून समाजापर्यंत आणि व्यक्तिपासून ते संघटित समूहापर्यंत, स्त्री-पुरुषांना आपल्याला जाचक चाकोऱ्यांमधून सोडवणारं, सच्च्या माणूसपणाकडे नेणारं जे जे काही असेल त्यासाठीचं व्यासपीठ’, अशी विद्यताईंनी या मासिकाची जी ओळख करून दिली आहे, ती यथार्थ आहे.

‘साऱ्याजणी’चे समाजशास्त्रीय योगदान

प्रस्तुत लेख मिसाच्या समाजशास्त्रीय योगदानाबद्दल आहे. त्यामुळे आधी समाजशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे काय ते समजून घेऊ. व्यक्ती आणि समाज यांच्यातील परस्पर संबंधांचे शास्त्रीय व चिकित्सक पद्धतीने अध्ययन करणारे शास्त्र अशी समाजशास्त्राची प्राथमिक व्याख्या केली जाते. व्यक्ती आणि समाजव्यवस्थेतील सहसंबंधाकडे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कसे बघितले गेले आहे, ते समजून घेताना समाजशास्त्रातील अगदी मूलभूत अशा तीन परिप्रेक्ष्यांची मांडणी लक्षात घेऊ.

तीन मूलभूत समाजशास्त्रीय दृष्टिकोन

प्रतिक्रियावादी दृष्टिकोनात समाजव्यवस्थेकडे एक संतुलित, स्थिर स्वरूपाची रचना म्हणून बघितले गेले आहे. कुटुंब, विवाह, शिक्षण, कायदा, राज्यसंस्था, प्रसारमाध्यमे अशा सामाजिक संस्था मानवी सामाजिक जीवन सुकर करण्यामध्ये विविध प्रकारची भूमिका पार पाडत असतात व समाजाच्या विशिष्ठ स्वरूपाच्याा गरजा भागवत असतात. या दृष्टिकोनानुसार सामाजिक संस्था म्हणजे दर्जा व भूमिकांचे गुंतागुंतीचे जाळे असते, तसेच समाजाच्या विविधांगी गरजा लक्षात घेऊन निर्माण झालेली मूल्ये, श्रद्धा आणि सामाजिक नियमनांची व्यवस्था असते. या परिप्रेक्ष्यातून बघता, व्यक्तींच्या तुलनेत सामाजिक व्यवस्था अधिक प्रभावशाली आहेत. कारण, एकीकडे त्या व्यक्तींच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी निर्माण होतात व दुसरीकडे स्थिर वर्तन पद्धती आणि नियंत्रणात्मक संरचनेच्या माध्यमातून व्यक्तींच्या वर्तनावर नियंत्रण ठेवत असतात.

आंतरक्रियावादी दृष्टिकोनानुसार व्यक्ती आपल्या दैनंदिन आंतरक्रियांमधून समाज निर्माण करत असतात, असे मानले आहे. समाजमान्य वर्तनव्यवस्थेत व मानकांमध्ये बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य व्यक्तींमध्ये असते. कारण, समाज ही काही निर्जीव वस्तूंची रचना नाही. समाज बनलेला आहे सजीव माणसांनी, ज्यांना भावभावना आहेत, ज्यांच्यात बौद्धिक क्षमता आहे, आणि कृतिशील अभिव्यक्तीची भूक आहे. त्यामुळे समाजाच्या स्थूलदर्शी विश्लेषणाइतकेच प्राधान्याने रोजच्या घटनाक्रमाकडे व दैनंदिन जगण्याकडे बघितले पाहिजे.

संघर्षवादी दृष्टिकोनानुसार समाजात सर्व व्यक्ती एकसमान पातळीवर नसतात. संधी आणि सुविधांचे वितरण असमान स्वरूपाचे असते. ते बऱ्याचदा समाजातील प्रभावी गटांच्या सोयीचे असते. या दृष्टिकोनानुसार सामाजिक संस्थाा नेहमीच सामाजिक विभाजन आणि असमानता टिकवून ठेवण्यात योगदान देत असतात. समाजातील वर्चस्ववादी समूहांचे हितसंबंध जोपासण्याचे काम करत असतात. संघर्षवादी मांडणीतून समाजातील उतरंडीची व्यवस्था जाणीवपूर्वक कशी टिकवली जाते याचे विश्लेषण झाले आणि ही विषमता संपवण्याचे बळ संघटित कृतीमध्ये आहे, हेदेखील प्रकर्षाने मांडले गेले. १९६० नंतर स्त्री अभ्यास, विकास अध्ययन, दलित अध्ययन यासारख्या आंतरविद्याशाखीय क्षेत्रांमधून पुढे आलेल्या विचारांमुळे वर्गीय विषमतेबरोबर लिंगभाव, जात, वंश व वांशिकता अशा सामाजिक स्तरीकरणाच्या मूलभूत रचनांचे आकलन आणि सिद्धांकन होऊ लागले.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित झालेल्या समाजशास्त्राची सैद्धान्तिक मांडणी या तीन दृष्टिकोनांच्या खूप पुढे गेली आहे. आधुनिक व उत्तर आधुनिक जगाच्या आणि जगण्याच्या संदर्भांना धरून हा विकास होत गेला आहे. पण अगदी सुरुवातीपासून ते आजपर्यंत समाजशास्त्रीय सिद्धान्तात दोन कळीच्या मुद्द्यांना धरून चर्चा होत आली आहे. एक म्हणजे, संरचना आणि कर्ता, व्यक्ती आणि समष्टी यांच्यातील नात्याचे स्पष्टीकरण. दुसरा, समाजशास्त्राच्या संशोधन पद्धतीशी आणि ज्ञानशास्त्राशी जोडलेला आहे. तो म्हणजे, समाजाकडे एक बाह्य वास्तव म्हणून अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने बघावे की व्यक्तींच्या परस्पर क्रियांमधून घडणारे वास्तव म्हणून आत्मनिष्ठ पद्धतीचा वापर जास्त उचित. संरचना आणि कर्ता व वस्तुनिष्ठता आणि आत्मनिष्ठता या दोन्ही द्विभेदी संकल्पना मानून त्यांच्यात एक ध्रुवीकरण निर्माण करण्याचा कल सामाजिक शास्त्रात दिसतो. अलीकडील काळात मात्र या दोन्ही संकल्पनांकडे बघताना परस्परांशी सांगड घालूनच बघितले पाहिजे, या भूमिकेचा आग्रह धरला जात आहे. सिद्धान्त आणि अनुभव परस्परनिर्मित असतात. एकाला वगळून दुसऱ्याचा विचार करता येणार नाही.

समाजाचा या दृष्टीने अभ्यास करताना सिद्धान्त आणि अनुभव या दोन पातळ्यांना सतत जोडून पाहणाऱ्या ‘मिसा’सारख्या मासिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. या योगदानाची आता सविस्तर चर्चा करू.

दर्जेदार संदर्भ-साहित्याची निर्मिती

व्यक्ती व समूहांमधील सहकार्य, समायोजन, देवाणघेवाण, वाटाघाटी आणि संघर्षातून समाज चालतो, तसेच परिवर्तित होतो. या अखंड सुरू असलेल्या समाजप्रवाहाचे आकलन होण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे साहित्य. समाजशास्त्रात एखाद्या विषयाचे-प्रश्नाचे विश्लेषण करताना प्रत्यक्ष क्षेत्रीय अभ्यासाच्या इतकेच महत्त्व त्या विषयाचे सर्वंकष आकलन होण्यात मदत करणाऱ्या संदर्भ साहित्याचे असते. असे संदर्भ-साहित्य शास्त्रीय व सैद्धान्तिक संशोधनाचे फलित असते. तसेच, ते सामाजिक परिवर्तनाला बांधील असलेल्या ‘साऱ्याजणी’सारख्या मासिकातून प्राप्त होते. ‘साऱ्याजणी’ हे स्त्रीच्या जगण्याच्या अनुभवाशी जोडलेलं, अनुभवांना प्राधान्य देणारं मासिक आहे. त्यामुळे या मासिकाच्या माध्यमातून गेली ३१ वर्ष जे सातत्यपूर्ण दर्जेदार लेखन झाले ते संदर्भ-साहित्य म्हणून अतिशय मोलाचे आहे.

एक व्यापक संरचना म्हणून समाजव्यवस्था कशी चालते व या व्यवस्थेचा भाग म्हणून जगणाऱ्या व्यक्ती आपल्या जगण्याचा संदर्भ कसा लावतात, हे मिसातील लिखाणातून फार चांगल्या प्रकारे स्पष्ट होते. सामाजिक लिंगभेदभावाचा मुद्दा मांडताना मिसाने कथा, कविता, मुलाखती, वैचारिक-ललित लेख अशा वैविध्यपूर्ण साहित्याचा आधार घेतला आहे. परिसंवाद, चर्चा, काही विशिष्ट मुद्द्यांना धरून मुद्दाम मागवलेल्या प्रतिक्रिया अशा विविध प्रकारे मिसामध्ये कुटुंब, नातेसंबंध, विवाह, सहजीवन, लैंगिकता अशा अनेक महत्त्वाच्या सामाजिक संस्था व संरचनांवर प्रकाश टाकला आहे. या सामाजिक संस्था व्यापक संरचना म्हणून त्यांच्या वैशिष्ट्यांसह वर्गात शिकवल्या जातात. पण प्रत्यक्ष ज्या आंतरक्रियांच्या माध्यमातून ही संरचना अस्तित्वात असते त्या सूक्ष्म पातळीचे अवलोकन मिसामधील लेखांच्या माध्यमातून सहज सोप्या पद्धतीने करता येते. मिसामधील वैचारिक लेख, आणि चर्चा अशा माध्यमातून जे अनुभवकथन पुढे येते ते वर्गात शिकवल्या जाणाऱ्या आणि पुस्तकातून सैद्धान्तिक भाषेत मांडल्या जाणाऱ्या विचारांना फार मोलाची जोड देते.

रोजच्या जगण्याच्या अनुभवांकडे वैचारिक सिद्धांताची महत्त्वाची सामग्री म्हणून पाहता येते

म्हणूनच मिसाच्या समाजशास्त्रीय योगदानाची चर्चा करताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा डोळ्यापुढे येतो, तो म्हणजे रोजच्या जगण्याच्या अनुभवांना वैचारिक सिद्धांताची महत्त्वाची सामग्री म्हणून पाहता येते ही या मासिकाने बळकट केलेली जाणीव. आपल्या रोजच्या जगण्यातून आपण समाज घडवत असतो. एकीकडे समाजाचे सदस्य म्हणून आपण असंख्य गोष्टी सहजपणे अंगीकारतो; तसेच, सामाजिक चौकटी सोडवण्यासाठी छोटे छोटे मार्ग निर्माण करत असतो आणि कधी कधी उघडपणे संघर्षाचा मार्ग स्वीकारत असतो. हे तुमचे आमचे अनुभव समाजशास्त्रीय आकलनासाठी खूप बहुमोल असतात. ‘जे जे खाजगी व व्यक्तिगत ते ते राजकीय’ ह्या स्त्रीवादी भूमिकेनुसार व्यक्तिगत पातळींवरील अनुभव पुढे आल्याने, चर्चिले जाण्याने नवी वैचारिक दिशा मिळते. त्यातून सिद्धान्तनिर्मिती होते. दुसरीकडे, आपला प्रश्न केवळ मी, माझं कुटुंब, माझी परिस्थिती यातून जन्मलेला नाही; तपशील वेगळा, रूप वेगळे असले तरी व्यक्तिगत अनुभवांची पाळेमुळे व्यवस्थेत रुजलेली असतात व आपले अनुभव, आपले प्रश्न हे फक्त आपल्यापुरते नसून पितृसत्ता, पुरुषप्रधान व्यवस्था, जातिव्यवस्था अशा विषमतेच्या व्यापक समाजव्यवस्थेशी निगडीत आहेत. ही जाणीव निर्माण करण्याचे; तसेच, ज्या संकल्पना व सिद्धान्तातून या उतरंडीचे भान येते, त्यांच्याशी आपल्या वाचकवर्गाला सहजपणे जोडण्याचे काम मिसाने केले आहे.

उदाहरणादाखल काही लेखांचा आढावा घेऊ.

अमलान दत्त त यांच्या ‘स्त्री स्वातंत्र्य : स्वरूप व समस्या’ या लेखात लिंगभेद निश्चित नैसर्गिक नसून, तो समाजनिर्मित कसा आहे याचा सविस्तर ऊहापोह केला आहे. स्त्रीला मातृत्वाची जबाबदारी असते, अपत्याच्या पालन पोषणाची जबाबदारी असते. त्यामुळे स्त्री-पुरुषांच्या जाणिवांवर व स्वभावावर अपरिहार्यपणे याचा परिणाम जरी झाला, तरी स्त्री-पुरुषांच्या जाणिवा, स्वभाव, गुणधर्म हे निसर्गदत्त म्हणून बघण्यापेक्षा त्याचे सांस्कृतिक संदर्भ समजावून घेणे गरजेचे आहे, हे या लेखात स्पष्ट केले आहे व मानवी इतिहासाच्या चौकटीत लिंगभेदाची मांडणी केली आहे.

‘विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या लैंगिकतेचा प्रश्न’ या लेखात विद्युत भागवत यांनी भारतातील स्त्री विषयक सुधारणांचा आढावा घेताना वसाहतकालीन संदर्भ महत्त्वाचा मानला आहे. त्यांच्या मते स्त्री शिक्षणाचा, सुधारणेचा विचार स्त्रीच्या लैंगिक अस्तित्वाशी अतूटपणे जोडला गेला आहे. ब्रिटिशांमुळे एकीकडे स्त्री प्रश्नाबाबत नवा दृष्टिकोन आणि मूल्यं पुढे आली, तर दुसरीकडे पुनरुज्जीवनवादाच्या नव्या लाटेत स्त्रियांकडे परंपरेच्या पाईक म्हणून बघितले गेले. सुधारणांच्या या कालखंडातही स्त्रियांवरील पुरुषसत्तेच्या वर्चस्वाला मुळातून आव्हान दिले गेले नाही.

‘लैंगिक गुन्ह्यामागील समाजव्यवस्था’ या लेखात मंगला सामंत यांनी लैंगिक हिंसाचाराकडे पुरुषी वर्चस्वाच्या व्यवस्थेचा परिणाम म्हणून बघितले आहे. त्यांच्या मते, ज्या समाजात लैगिक कल्पना ताणलेल्या कोंडलेल्या अथवा जबरदस्तीच्या आहेत, जिथे लैगिक संबंधांबद्दल अज्ञान व सवंग कुतूहल आहे, अशा समाजात व भोगवादी व्यवस्थेत लैंगिक वासना जास्त चेतवली जाते, पण जातीय, धार्मिक आणि वैवाहिक प्रथा परंपरांनी या भूक भागवण्याच्या वाटा सीमित करून ठेवल्या आहेत. एकीकडे पुरुषाला मुक्त लैंगिक आचरण प्रिय आहे; पण त्याच बरोबर वैवाहिक निर्बंधही त्याला हवे आहेत. म्हणजे इथे पुरुष दुटप्पी भूमिका घेतो. अशा दुटप्पी आचरणातून विकृती निर्माण होते. या व्यवस्थेत बलात्कार हे एक शस्त्र म्हणून पुरुष, पुरुषी सत्ता आणि पुरुषप्रधान संस्कृती संगनमताने वापरतात.

‘स्त्री : असलेली, घडवलेली, दाखवलेली’ या लेखात शर्मिला रेगे यांनी भारतीय स्त्रियांच्या विकासाचा विस्तृतपणे आढावा घेतला आहे. हे करत असताना त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे की, भारतीय समाजाच्या जात, वर्ग, समुदाय व लिंगभाव या प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण घटकांनी प्रत्येक कालखंडातील समाज वास्तवाला आकार दिला आहे. तसेच, इतिहासाच्या प्रवाहात जाती, वर्ग आणि समुदायांना वेगळे अर्थ प्राप्त होतात. म्हणूनच स्त्रियांच्या जडणघडणीचा विचार करताना, त्यांना त्या त्या गटाच्या सदस्य म्हणून त्या त्या कालखंडाच्या चौकटीत ठेवून बघावे लागेल.

मंगला सामंत यांनी लिहिलेल्या ‘मनी व्हर्सेस डायमंड : संघर्ष लिंगभावाचा’ या लेखात लिंगभाव आणि लैंगिकतेच्या अनुषंगाने पाश्चात्त्य जगात सुरू असलेल्या सैद्धान्तिक व कायदेशीर अशा दोन्ही चर्चाविश्वांचा आढावा घेतला आहे. जॉन मनी हे मानवी लिंगाधारित वर्तनाला त्याच्यावरील संस्कार, संगोपन जबाबदार आहे, असे मानतात. माईक डायमंड यांच्या मते, लिंगभाव म्हणजे मूल जन्माला आल्यानंतर मुलगा म्हणून किंवा मुलगी म्हणून त्यावर जे संस्कार केले जातात. त्यांचे संगोपन केले जाते त्याचप्रमाणे ते वर्तन करतात. आणि त्यांची बौद्धिक वाढही त्याचप्रमाणे होते. हे बऱ्याच अंशी खरेही असले तरी काही व्यक्तींमध्ये लैंगिक अवयव हे स्त्री आणि पुरुष अशा द्विधा अवस्थेत असतात. अशा व्यक्तींनी स्त्री म्हणून जगायचे की पुरुष म्हणून जगायचे हे त्यांची लिंगभावात्मक जडणघडण कशी होते त्याने निर्धारित होते. अशा व्यक्तीला लिंग निवडीचे स्वातंत्र्य असायला हवे. व त्याला लिंग बदल करून घेता यायला हवा. यासाठी बऱ्याच देशांमध्ये मान्यता आहे व काही देशांमध्ये यासाठी चळवळी सुरू आहेत. या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांचा अंतर्भाव या लेखामध्ये आहे.

आज समाज परिवर्तनाकडे विविध वैचारिक दृष्टिकोनातून पाहणारे गट आपलीच भूमिका योग्य असा आग्रह धरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मग, हे वैचारिक नातेही राजकीय स्वरूपाचे होते. त्यामुळे लैंगिकतेचे राजकारण ही संकल्पना समजावून घेतली पाहिजे असे मत डॉ. विद्युत भागवत ‘लैंगिकतेचे राजकारण : स्त्री प्रश्नाच्या संदर्भात’ या लेखात मांडतात. त्यांच्या मते सध्या लैंगिक क्रांती होण्याची गरज भासते आहे. बाई आणि पुरुष ह्यांचे साधर्म्य आणि वैधर्म्य आपल्या समाजात कशा प्रकारे रचले जाते हे पाहणे आणि त्याला शह देणारी व्यक्तिमत्त्वं घडविणे म्हणजे लैंगिक क्रांती. आणि स्त्री पुरुषांना माणूस म्हणून जगताना, निर्मितीक्षम आणि मोकळे, आनंदी जगता यावे याचा खराखुरा प्रयत्न करणे म्हणजे लैंगिक क्रांती होय. आज जागतिकीकरणाच्या काळात धार्मिक मूलतत्त्ववादसुद्धा वाढताना दिसत आहे. त्यातून स्त्रीत्व आणि पुरुषत्वाच्या संदर्भातील सनातन प्रवृत्ती डोके वर काढत आहेत. स्त्रीवादी मांडणीतून पुढे आलेल्या लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता या संकल्पना मांडताना म्हणूनच खूप संवेदनशील व सजग दृष्टिकोन ठेवला पाहिजे.

आज स्त्री-पुरुष अशा ध्रुवीय कोटीक्रमाच्या पलीकडे सैद्धान्तिक मांडणी गेली आहे. लिंगभाव विषमतेचा विचार करताना लैंगिकतेच्या स्त्री-पुरुष अशा दोन प्रस्थापित ध्रुवांच्या मधल्या अस्मिताही लक्षात घेतल्या पाहिजेत, अशी मांडणी होत आहे. अशा व्यक्तींच्या हक्कांसाठी चळवळी उभ्या राहत आहेत. या बदलत्या परिस्थितीप्रमाणे बदलत गेलेले सिद्धांकन मिसाच्या लेखांमधून वाचकांच्या परिचयाचे होते. तसेच, या संकल्पना व सिद्धान्त शिकवताना संकुचित दृष्टिकोन असणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी असा स्पष्ट इशाराही मिळतो.

मिसाच्या सुरुवातीच्या काळात स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी करताना जात आणि समुदायाच्या अस्मितेशी संबंधित मुद्दे फार प्रकर्षाने पुढे आले नाहीत. लेखक देखील बहुतांशी उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय स्तरातून येणारे होते. पण गेल्या ३१ वर्षांच्या मिसाच्या प्रवासावर नजर टाकली, तर मिसाने लेखक आणि लेखन या दोन्ही पातळ्यांवर सर्वसमावेशक धोरण ठेवले आहे, याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मिसातील अनेक अभ्यासपूर्ण लेखांमधून पुरुषी वर्चस्व आणि स्त्रियांचे दुय्यमत्व सामाजिक व्यवस्थेतून कसे टिकवून ठेवले जाते, पुरुषसत्ता इतर वर्चस्ववादी व्यवस्थांबरोबर कशी हातमिळवणी करत असते तसेच स्त्रियांचे एकमेकींबरोबरचे संबंध या समूहांच्या सदस्य म्हणून कसे नियंत्रित होतात ते स्पष्ट होते. भारतातील सामाजिक विषमतेचे मूळ जातीच्या उतरंडीच्या व्यवस्थेत असल्यामुळे स्त्रीमुक्तीची चळवळ जातीअंताच्या चळवळीशी जोडलेली आहे व स्त्रियांच्या मुक्तीसाठीचे लढे विषमतेच्या विरोधात केल्या जाणार्या इतर लढ्यांशी जोडलेले आहेत, अशी स्पष्ट भूमिका मिसातील लेखांमधून मांडली गेली.

‘थेरीगाथेतील माणूसपण आणि संविधानातील मूल्य’ या लेखात प्रा. आशालता कांबळे म्हणतात की, समाजाची मुक्ती होण्यासाठी, जातीअंताच्या चळवळी बरोबरच स्त्रीमुक्ती चळवळही पुढे जायला हवी, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणले होते. बौध्द वाङ्मयातील ‘थेरीगाथा’मध्ये बुद्धकाळातील स्त्रियांनी मिळवलेले माणूसपणाचे हक्क प्रतीत होतात. थेरीगाथांमध्ये व्यक्त होणारा स्त्रीवाद स्वतः कडे ‘माणूस’ म्हणून पाहायला शिकवतो. आंतरिक सामर्थ्याला विकसित करायचा विचार देतो. बुद्ध काळात आणि त्यानंतरही बौध्द भिक्खुणी असणाऱ्या थेरी या सर्व सामाजिक, धार्मिक, आर्थिक स्तरातील असल्या तरी एका समान पातळीवर होत्या. त्यांच्यात असमानता नव्हती. त्या decastआणि degender होऊन स्वतःचं व्यक्तिमत्त्व जोपासत होत्या. तथागतांनी सांगितलेल्या मार्गाने त्या धार्मिक गुलामगिरीतून आणि नंतर मानसिक गुलामगिरीतून मुक्त झाल्या. फक्त ‘माणूस’ म्हणून त्या समान पातळीवर आल्या. असे तत्त्वज्ञान स्वीकारणारी स्त्री स्वतःला बाईपणाच्या मर्यादांमधून मुक्त करते आणि फक्त ‘एक व्यक्ती’ किंवा एक ‘माणूस’ म्हणून स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘हिंदू कोड बिला’ची मांडणी करताना स्त्रीमधील हे माणूसपण हे मूल्य दृष्टीसमोर ठेवले. या हिंदू कोड बिलामुळे पुरुषांच्या बरोबरीने हक्क भारतातील प्रत्येक स्त्रीला मिळाले. याची जाणीव भारतातील प्रत्येक स्त्रीने ठेवून आपल्या हक्कांचे जतन करायला हवं. स्त्री उच्चवर्णीय असो, अगर दलित वर्गातील तिने धार्मिकतेतून बाहेर निघणे प्रथमत: आवश्यक आहे. धार्मिक गुलामी ही सर्व प्रकारच्या गुलामीच मूळ आहे. सर्वच स्त्रियांनी स्वतःला ‘माणूस’ समजून स्त्रीवादाचा विचार करणे आवश्यक आहे आणि तशा चळवळी उभारणे आवश्यक आहे. आज भारतात संविधान संस्कृती विरुद्ध धर्मसंस्कृती असा संघर्ष पेटताना दिसतो आहे. यात सर्वांनीच संविधान संस्कृतीच्या बाजूने आग्रह धरला, तर भारतातील स्त्री सर्वोच्च स्थानी नक्कीच पोहचेल असे परखड विचार प्रा. आशालता कांबळे यांनी मांडले आहेत.

सैद्धान्तिक मांडणी करणाऱ्या लेखांबरोबर अनेक वैशिष्ट्यपूर्ण सदरांतून स्त्रियांच्या दुय्यमत्वाच्या सामाजिक पैलूंची चर्चा झाली आहे.

एकूण ११ लेखात मिळून आरसा या सदरात स्त्रियांचं वागणं-बोलणं, भूमिका, मानसिकता याच्याशी संबंधित पावणे दोनशेच्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. माणसांच्या स्त्रिया आणि पुरुष म्हणून वागण्यात ‘मूलभूत’, ‘निसर्गनिर्मित’ म्हणता येईल असं वागणं तुलनेने फार कमी. समाजनिर्मित किंवा विशिष्ट सामाजीकरणाच्या संस्कारातून घडलेले वागणेच जास्त असते. लिंगनिरपेक्ष विचारसरणी विकसित करण्यासाठी धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन जोपासणे खूप आवश्यक आहे, हे या चर्चेमुळे पुन्हा एकदा जाणवले. Beyond gender झेप घेण्यासाठी beyond religion अशीही झेप घेणे आवश्यक आहे, हे या चर्चेने अधोरेखित केले.

या सदरात घेतले गेलेले काही प्रश्न उदाहरणादाखल दिले आहेत.

१. पुरुषांच्या अस्तित्वानुसार स्त्रियांच्या दर्जामध्ये चार स्तर पडले आहेत, असे दिसते. सर्वोच्च वर्ण – सवाष्ण आणि पुत्रवती – या दोन जाणिवांमुळे तिचा आत्मसन्मान खूपच उंचावलेला असतो. दुसरा उच्च वर्ण – सवाष्ण आणि मातृत्वाचा सन्मान प्राप्त – पण पोटी कुलदीपक नाही, म्हणून काही प्रमाणात सन्मान धोक्यात येऊ शकतो. तिसरा जरा कनिष्ठ वर्ण – पत्नी; पण आई नसलेल्या स्त्रिया – अपूर्ण अभागी समजल्या जातात. सर्वात कानिष्ठ वर्ण – विधवा, घटस्फोटित आणि अविवाहित. यांच्यात काही वैगुण्य व्यंग असावं असा समज. पुरुषांसाठी शिक्षण, व्यवसाय, हुद्दा, पैसा हे त्यांच्या सामाजिक दर्जाचे निकष असतात . उलट, स्त्रियांचा दर्जा ठरवणारे मुख्य निकष असतात- पती आणि मुलं असणं. जे दोन्ही त्यांच्या स्वतःच्या नियंत्रणाच्या पलीकडे असते, असे का?

२. स्त्रियांना चातुर्वर्ण्य भेदण्यासाठी काही सवयी, प्रथा बदलाव्या लागतील. मंगळसूत्र, सिंदूर, मेहेंदी अशा ‘सौभाग्य’ चिन्हान्मधून married status अधोरेखित होतं; पण असे नवर्याच्या या अस्तित्वाशी संबंधित विशेषाधिकार मुळात का हवे असतात? केवळ पती मिळाल्यामुळे मिळणारे आणि त्याच्या नसण्यामुळे काढून घेतले जाणारे विशेषाधिकार स्त्रियांनी ठामपणे नाकारले पाहिजेत. हे स्त्री-पुरुष समानतेसाठी अत्यावश्यक पाऊल आहे का?

३. आपली नाव लिहिण्याची पद्धत विशिष्ट धारणांवर आधारित आहे. पितृसत्ताक व्यवस्थेतील सर्व छोट्या चालीरीती बदलल्या पाहिजेत. लग्नानंतर मुलीने सासरी जाणे अशा अगदी गृहीत धरलेल्या पद्धतींपासून बदलाची सुरुवात झाली पाहिजे. आपला जैविक वारसा अखंड चालू राहावा, संक्रमित होत राहावा ही मूलभूत प्रेरणा मानव समूहात असते आणि याच प्रेरणेतून कुटुंब, जात, धर्म अशा समूहांचा विकास होतो. पण मुलांप्रमाणे मुलींमध्येही हा जैविक वारसा उतरतो, हे लक्षात घेतले पाहिजे. जोपर्यंत मुलगे म्हणजे कुलदीपक, घराणं पुढे नेणारे अशा समजुती चालू आहेत, आणि आडनावाला पर्याय सापडत नाही, तोपर्यंत त्यातून गुंतागुंत निर्माण होणारच.

याच सदरात भाषेतील विषमतेचा खूप महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे. आपल्याकडे नातेसंबंध खूप क्लिष्ट आहेत आणि वयानुसार व लिंगानुसार भेदभाव करणारे शब्द व संबोधन आपण वापरतो. व्यक्तीपेक्षा आपण भारतीय माणसं नात्यांना जास्त महत्त्व देतो. स्त्री-पुरुष विषमतेमध्ये या भाषिक संबोधनांचा किती आणि काय संबंध आहे, याची सखोल चिकित्सा करण्याची गरज या लेखात स्पष्ट झाली आहे.

‘स्त्रीच स्त्रीची शत्रू? मला उत्तर हवंय’ या सदरातून पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांची विशिष्ट घडण कशी होते आणि सगळे नातेसंबंध हे शेवटी एक प्रकारचे सत्तासंबंध कसे असतात त्याच चर्चा केली आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेत मुख्य अवकाश पुरुषांनी व्यापलेला असतो व स्त्रियांना तो डावलला गेलेला असतो. त्यामुळे, तात्कालिक छोट्या छोट्या फायद्यांसाठी स्त्रिया एकमेकींच्या विरोधात जातात. पण हा अवकाश तात्पुरता आणि फसवा असतो हे स्त्रियांनी लक्षात घ्यायला हवे. पुरुषसत्ता, जात, वर्ग या सत्तेच्या वेगवेगळ्या व्यवस्था एकमेकींशी जोडलेल्या असतात. त्यामुळे वेगवेगळ्या सामाजिक स्थानांवर असणाऱ्या स्त्रियांचे हितसंबंध त्यांच्या बाई म्हणून असणाऱ्या समान अस्तित्वाला छेद देतात. पुरुषसत्तेचे हे स्वरूप ओळखून स्त्रियांनी एकजूट राखली पाहिजे, अशी आग्रही भूमिका या सदरातून मांडली आहे.

कुटुंब, विवाह, नातेसंबंध अशा प्राथमिक व्यवस्थांची लिंगभावात्मक मांडणी

कुटुंब, विवाह, नातेसंबंध यांचे स्वरूप मुख्यतः पुरुषसत्ताक असल्यामुळे स्त्रियांच्या संधी कशा मर्यादित होतात, हे स्पष्ट करणारे अनेक लेख आहेत. स्त्रीला ज्या पद्धतीने वाढवले जाते, त्यात लग्न म्हणजे तिच्या सुखाचे एकमेव साधन असा विश्वास तिच्या मनात वाढवला जातो. तसेच, त्यासाठी सर्व प्रकारे पडती बाजू तिनेच घ्यायला हवी हेदेखील ठसवले जाते. विवाहसंबंधात परस्पर सामंजस्य कमी दिसते. कारण, उभयपक्षी समांतर विकास होत नाही व स्त्रियांसाठी खूपदा तडजोड करत जगणे हाच मार्ग असतो. हे स्पष्ट करताना अनेक स्त्रिया यातूनही आपला अवकाश कसा शोधतात, हेदेखील अनेक लेख व सदरांमधून पुढे आले आहे.

या लिखाणाचे अवलोकन करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अतिशय सोप्या भाषेतील या लेखांमधून व सामान्य वाचकांच्या संवादातून खूप सहजपणे स्त्रियांचे उत्पादक, पुनरुत्पादक श्रम, कुटुंबातील लिंगाधिष्ठित श्रमविभाजन, असे कळीचे सैद्धान्तिक मुद्दे चर्चेत आले आहेत.

मिळवतीची पोतडी: हे नोकरी आणि घर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या स्त्रियांसाठीचे खास सदर. अर्थार्जन म्हणजे आर्थिक स्वावलंबन आहे का, परस्पर सहकार्यावर आधारित कुटुंब रचनेची गरज असे अनेक मुद्दे या निमित्ताने समोर येतात. गृहिणीपद सांभाळताना आपल्याला केवळ घरच्यांचेच नव्हे, तर नातेवाइकांचेही गृहीत धरणे जाणवते. संसारी झाल्यावर पुरुषांनी फक्त नोकरी केलेली चालते. तशी व्यवस्था स्त्रीसाठी नाही. नोकरी ही खूप जणींसाठी हौस म्हणून नाही, तर गरज झाली आहे. त्यामुळे कुटुंबव्यवस्था बदलणे गरजेच आहे, हे या सदरातून प्रकर्षाने पुढे आले आहे.

वाचक चर्चा: या सदरात परस्पर संवादाच्या माध्यमातून कुटुंबात होणाऱ्या बदलांची दिशा कशी असावी याचे स्त्रियांना अपेक्षित असलेले चित्र पुढे येते. मिळवतीचे अर्थस्वातंत्र्य : हा विषय घेऊन झालेल्या चर्चेत स्त्रीचे अर्थार्जन फक्त कुटुंबाच्या गरजेशी बांधलेलं असलं पाहिजे का? तिने काही मिळवणं ही तिच्या व्यक्तिमत्त्वाची गरज नाही का? कुटुंबात स्त्री जे काम करते, त्यालाही तितकीच प्रतिष्ठा मिळायला हवी. नोकरी करणे आणि पैसा मिळवणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. निर्णय घेण्याच स्वातंत्र्य पाहिजे. साध्या साध्या गोष्टी करताना नवर्याला विचारावे का लागावे? असे मूलभूत प्रश विचारले गेले आहेत.

घर दोघांचं: या विषयांतर्गत झालेल्या चर्चेत घरातील कामांच्या जबाबदाऱ्या दोघांच्या असाव्यात, एकमेकांच्या विकासाच्या वाटा समजून घेऊन तसं पूरक वातावरण दोघांनी राखलं पाहिजे ही अपेक्षा व्यक्त झाली आहे.

आपलं कुटुंब–आपली तरुणाई: या सदरात आपल्या कुटुंबसंस्थेविषयी तरुणांना काय वाटतं हे ‘मिळून साऱ्याजणी’ने समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपली कुटुंबसंस्था ढासळते आहे, असा एक समज सर्वसामान्यपणे प्रचलित आहे. पण मिसाने घेतलेल्या मुलाखतींमधून असे दिसून आले की कुटुंब विभक्त, लहान होत असली, तरीही आपल्या तरुणाईला आजही कुटुंब ही एक सशक्त सामाजिक संस्था वाटते. पण त्याच बरोबर कुटुंबात सामंजस्य आणि परस्पर सहकार्य असावं; तसेच, स्त्री व पुरुष दोघांना समान संधी व अधिकार असावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे.

तरुण डॉट कॉम: हे सदर तरुण पिढी बदलत्या काळात लग्न, सहजीवन आणि अपत्य संगोपन या सगळ्याकडे कसे बघते याबद्दल आहे. नोकरी-व्यवसायातील अनिश्चिततेमुळे आज तरुण पिढीतील असुरक्षितता वाढत आहे. लग्न लांबणं, मनासारखा जोडीदार न मिळणं, जमलेली लग्न मोडणं, विवाहोत्तर प्रश्न निर्माण होणं, अशा साऱ्या तणाव वाढवणाऱ्या गोष्टी असताना आज कालानुरूप जोडीदार निवडीचे निकष बदलत आहेत, असे या चर्चेतून दिसते. इतर कोणत्याही निकषांपेक्षा जोडीदार असा हवा की, जो कठीण प्रसंगी निभावून नेईल, परस्परांचे बळ असेल, पाठिंबा असेल. कोणताही गंड नसलेला चांगला माणूस असेल. लग्नाच्या पारंपरिक धारणा बदलत आहेत, याचे हे द्योतक आहे. या सदरात बदलत्या काळात मूल होण्याबद्दल काय विचार होतोय याची देखील चर्चा झाली आहे. लग्नातील नातं दृढ झाल्याशिवाय मूल नको, करियरचे नियोजन नीट करूनच मूल होऊ दिले पाहिजे, मूल दत्तक घेण्याबद्दल येत असलेली सकारात्मकता तसेच मुलाच्या संगोपनात दोघांचा सहभाग असावा, हा सूर दिसतो. पारंपरिक विचारानुसार लग्न झाल्यानंतर मूल होणे ओघाने आले व मूल होण्यासाठी लग्न हीच चाकोरी होती. सहजीवन, दोघांनी मूल वाढवणं या कल्पना नव्हत्या. वंशाचा दिवा हवा म्हणून दुसरे लग्नही समाजमान्य होते. मूल हे कुटुंबाच्या केंद्रस्थानी होते. आता तरुण पिढी वेगळा विचार करते आहे आणि नवरा-बायकोचे नाते जास्त निकोप व परस्पर सामंजस्याचे असावे, ही अपेक्षा या चर्चेतून व्यक्त झाली आहे.

कुटुंबासारख्या प्राथमिक संस्थेत कालानुरूप होणाऱ्या बदलांचं प्रतिबिंब मिसातील लेखांमधून बघायला मिळतं.

उदा. एकल पालक कुटुंब, सरोगसीचा पर्याय अशा अलीकडील काळातील विषयांवर माहितीपूर्ण लेख आहेत.

‘जानकीला आठवताना’ या विभागामध्ये एकल पालक कुटुंबात राहणाऱ्या पालक व मुलांचे अनुभव अधोरेखित केले आहेत.

पालक किंवा पालकत्व म्हटलं की, आई आणि वडील असे दोघेही समोर येतात. परंतु समाजात किंवा व्यक्तीच्या जीवनात मानवी स्वभावामुळे किंवा अपघाताने अशा काही घटना घडतात की कोणत्यातरी एका पालकाकडे पाल्याची जबाबदारी येऊन पडते. म्हणजेच आईवडलांचा घटस्फोट झाल्याने किंवा अपघाती किंवा आजारपणामुळे यातील एकाचा मृत्यू झाल्यामुळे एकाकडे हे एकेरी पालकत्व येते. अशी अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहतो. अशा पालकांची जी मुले असतात त्यांना बऱ्याचशा नकरात्मक गोष्टींना, रोषाला, नजरेला समाजामध्ये सामोरे जावे लागते. बऱ्याचदा स्त्रीवरच या पालकत्वाची जबाबदारी पडलेली दिसून येते. अशा वेळी बऱ्याच आर्थिक, आर्थिक, कौटुंबिक, मानसिक तणावातून जावे लागते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटावे लागते. अशा वेळी या मातांना किंवा पालकांना आणि मुलांना समाजाची, नातेवाइकांची, मित्रमंडळीची उत्तम साथ लाभली, तर त्यांचे जीवन खूपच सुकर होते. अशा एकेरी पालकत्वाची जबाबदारी सक्षमरीत्या सांभाळणाऱ्या मातांचा गौरव झाला पाहिजे.

‘सरोगसी’ संदर्भातील करुणा गोखले यांनी लिहिलेल्या लेखात या नवीन तंत्राच्या अनेक कायदेशीर व सामाजिक पैलूंवर सविस्तर माहिती दिली आहे.

एखाद्या कुटुंबासाठीचा सर्वात आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण असतो तो म्हणजे बाळाचे आगमन. जोडप्याचा आनंदाचा क्षण म्हणजे आई-बाबा होणे. परंतु काही जोडपी बऱ्याचदा या आनंदाला मुकलेली आपणास पाहावयास मिळतात. हा आनंद मिळवण्यासाठी मग जोडपी इतर उपायांप्रमाणेच ‘सरोगसी’चा अवलंब करतात. सरोगसी म्हणजे पर्यायी माता. आणि यातूनच स्वतःचे मूल मिळण्याचा आनंद अशा जोडप्यांना मिळतो. याच सरोगसीचा वापर कशा पद्धतीने होत आहे, त्याचा समाजावर कसा परिणाम होतो याची माहिती यात दिली आहे. बऱ्याचदा पर्यायी माता त्या बळावर आपला हक्क सांगते आणि बऱ्याच अडचणी येतात. मग त्यासाठी कायदा, सरोगसीसाठी असणारे विविध कायदे यांची माहिती या लेखात आहे. भारतासारख्या देशात सरोगसी , दत्तक यासाठी असणारे शिथिल कायदे , सरोगसीसाठी येणारा कमी खर्च, इंग्रजीचा असणारा वापर या सगळ्यामुळे परदेशी नागरिकांचे भारतात येऊन सरोगसी करण्याचे वाढलेले प्रमाण याचा उल्लेख त्या करतात. यामध्ये फक्त विवाहित जोडपेच नाही, तर लग्न न करता पालक होण्याची इच्छा असलेले त्याच बरोबर समलैंगिक असूनही मूल हवे असणारे अशी जोडपीसुद्धा सरोगासीचा मार्ग अवलंबत असलेली दिसतात. सरोगसीच्या वेळी दोन्ही स्त्रियांवर होणाऱ्या वैद्यकीय ट्रीटमेंटचा त्यांच्या शरीरावर, मनावर होणारा परिणाम, सरोगेट मातेच्या कुटुंबाची परिस्थिती, अशा सर्व बाजूंचा सविस्तर आढावा या लेखात आला आहे.

समानतेच्या दिशेने अपेक्षित परिवर्तनाचे चित्रण

आज समाजशास्त्रात कुटुंबसंस्थेकडे चिकित्सात्मक दृष्टीने पाहताना कुटुंबाच्या स्वरूप व कार्यात होणाऱ्या बदलांबरोबर सामाजिक विषमता टिकवण्यात या प्राथमिक संस्थांचे कसे योगदान आहे, याचेदेखील परीक्षण केले जाते. समाजात समानतेच्या दिशेने अपेक्षित असणाऱ्या परिवर्तनाची सुरुवात कुटुंबसंस्थेसारख्या मूलभूत संरचनेपासून झाली पाहिजे, असे विचारवंतांचे मत आहे. सर्वसामान्य स्त्री पुरुषांना या व्यवस्थेत काय व कसा बदल अपेक्षित आहे, त्याचे प्रातिनिधिक चित्र मिसातील लेखांमधून पाहायला मिळते.

कुटुंबव्यवस्थेइतकाच महत्त्वाचा बदल विवाह संस्थेत होतोय. १९९० नंतरचा कालखंड आपल्या समाजव्यवस्थेत खूप मोठे बदल दर्शवणारा कालखंड आहे. या काळात जन्मलेल्या पिढीने खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, त्यातून आलेली स्पर्धा, मुक्त विचारांना प्रवृत्त करणारी नवी मूल्यव्यवस्था आणि दुसरीकडे परंपरावादी मूल्यांचे सातत्याने केले जाणारे पुनरुज्जीवन अशा खूप विरोधाभासाने भरलेले आयुष्य अनुभवले आहेत. घरातून झालेले संस्कार आणि घराबाहेरच्या जगातले संस्कार, मूल्यव्यवस्था या सगळ्या तफावतीमुळे आजच्या पिढीच्या मुलामुलींच्या मनात प्रचंड गोंधळ आहे. आणि तो संघर्ष लग्नाच्या बाबतीत प्रकर्षाने समोर येतो. लग्नसंस्थेतील हे संक्रमण, जातिव्यवस्था आणि पितृसत्तेच्या व्यवस्थेशी असलेले घट्ट नाते व त्यातून निर्माण होणारे विरोधाभास अशा मुद्द्यांचे विश्लेषण मिसातील अनेक अभ्यासपूर्ण लेखात झालेले दिसते. केवळ शहरी, मध्यमवर्गीय मुद्द्यांपुरती ही चर्चा सीमित नसून ग्रामीण, आदिवासी भागातील बदलांचेही चित्रण झालेले दिसते.

‘लग्नाची बेडी’ या लेखात मिलिंद बोकील यांनी भारतातील विवाह संस्थेचा व होणाऱ्या संक्रमणाचा सर्वंकष आढावा घेतला आहे. त्यांच्या मते भारतातील विवाहसंस्थेवर सर्वात जास्त जातीसंस्थेचे दडपण येते. जे इतर कोणत्याही देशांमध्ये नाही. जात हा एक ‘कंफर्ट झोन’ वाटतो म्हणून आजही तरुण मुलंमुली जातीत लग्न करण्याला पसंती देतात; पण प्रत्यक्षात तो एक ‘restricted zone’ आहे. त्याने आपले पर्याय मर्यादित होतात. पैसा, सामाजिक स्तर यापेक्षा लैंगिक अनुरूपता व एकमेकांना मोकळे अवकाश देण्याची तयारी या गोष्टी बघितल्या पाहिजेत असं आवर्जून नमूद करून लग्नसंस्था आश्वासक करण्याचे ‘जुळणी सहज असावी, विभाजन अवघड नसावे’ असे अतिशय साधे सूत्र ते सांगतात.

गौरी कानिटकरांच् या लेखात लग्नाच्या बदललेल्या परिमाणांची व अपेक्षांची चर्चा आहे, तर श्यामला वनारसे यांनी आताच्या काळात वैवाहिक नातेसंबंध पारंपरिक मूल्यव्यवस्थेवर आधारित असतील तर प्रश्न उद्भवणारच याचा ऊहापोह केला आहे. मालकी हक्क, टोकाची एकनिष्ठा आणि तीही बाईवर अधिक लादलेली, अशा मूल्यांवर उभ्या असलेल्या लग्नात घुसमट होणारच. निरामय सहजीवन हा लग्नाचा गाभा आहे, असे सांगून त्या म्हणतात की, त्यासाठी थेट संवाद हाच विवाहाचा खरा आधार असला पाहिजे.

प्रियदर्शनी हिंगे यांच्या लेखात ग्रामीण भागात लग्न संस्थेत होणाऱ्या बदलाची चर्चा आहे. मुलींचा घसरता जन्मदर, आजही घट्ट रुजून असलेली पुरुषप्रधानता यामुळे अनेक ग्रामीण, दुष्काळी, आदिवासी भागातील मुलींना लग्नाच्या नावाखाली अक्षरश: पैशांसाठी विकले जाते ही परिस्थिती आहे. अशा वेळी ती स्त्री त्या घरातील सर्व कामे करणारी मशीन बनून जाते व एक माणूस म्हणूनही तिचा विचार केला जात नाही, हे चित्र त्या निदर्शनास आणून देतात. वैशाली भांडवलकर यांनी भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील विवाहपद्धती आणि प्रथांचा आढावा घेताना जातपंचायतीच्या पुरुषसत्ताक नियंत्रणाची चर्चा केली आहे. जात पंचायत या महिलांना पोलीस स्टेशन व कोर्टात जाण्यास मज्जाव करतात. त्यामुळे भारतीय संविधानाने दिलेल्या स्त्रियांच्या हक्क व संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याअंतर्गत भटक्या-विमुक्त महिलांना संरक्षण मिळत नाही, असेही त्या नमूद करतात.

डॉ. वैशाली जोशी
vaishalisjoshi@gmail.com
(लेखिका या सेंट मीरा महाविद्यालयात समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत)