संवाद स्पंदन

०५ जुलै २०२२

विद्याबाळ अध्यासनाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या अक्षरवाटा ह्या उपक्रमा अंतर्गत मासिकाच्या कार्याचा आणि प्रवासावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यातीलच एक लेख म्हणजे निलीमा गावडे ह्यांचा “संवाद स्पंदन” ह्या सदरावरील लेख. संवाद स्पंदनची सुरुवात ही, परिवर्तनाची जी चळवळ आहे. ह्या चळवळचा अखंड चालु असलेला प्रवास सर्वांपर्यंत पोहचवण्याच्या हेतुने सुरु झाली.

ह्या लेखात निलीमा गावडे ह्यांनी जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१९ ह्या दरम्यान संवाद स्पंदन सदरामध्ये काय काय घडामोडी वर भाष्य केले ह्यावर प्रकाश टाकला आहे. ह्या सदरामध्ये साऱ्याजणीच्या उपक्रमांची, वाचक मेळाव्यांची, प्रकाशनांची त्याचबरोबर ’सखी साऱ्याजणी’, ’पुरुष उवाच’, ’नारी समता मंच’ ह्या साऱ्याजणीच्या परिवाराच्या कार्यक्रमांची आणि इतर कार्यक्रमांची झलक बघायला आपल्याला मिळते.

**

जानेवारी २०१३ च्या संवाद स्पंदन मध्ये, २०१२ च्या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा सोहळा भोपाळच्या सखी मंडळाने आयोजित केला होता. त्याचा प्रकाशन वृत्तांत भोपाळच्या मंदा गंधे यांनी दिला आहे. हा सोहळा ९ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईच्या प्रसिद्ध लेखिका नंदिनी आत्मसिद्ध यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकातील विविध विषयांचा आढावा घेत तत्कालीन दिवाळी अंकाच्या विषयाच्या अनुषंगाने ‘राजकारणातील स्त्रियांचे स्थान, यावर त्यांचे विचार व्यक्त केले.

याच स्पंदानामध्ये नोव्हेंबर २०१२ रोजी ‘सखी साऱ्याजणी’ने लेखिका, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका सुषमा देशपांडे यांच्या प्राक्त मुलाखतीचे विवरणही आहे. मुलाखतीच्या माध्यमातून सुषमा ताईंनी नाटकाच्या माध्यमातून हाताळलेले विविध विषय आणि त्यामागील त्यांची अपार मेहनत याचा संवाद स्पंदनसाठी गोषवारा घेऊन शब्दबद्ध करण्याचे काम पुण्याच्या नीना भेडसगावकर यांनी केले आहे.

मे २०१४ च्या संवाद स्पंदन मध्ये, ‘फुले दांपत्याच्या विचारांचा जागर’ या शीर्षकाखाली संवाद साधण्यात आला आहे. २०१३-१४ हे मिळून साऱ्याजणी मासिकाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. त्यानिमित्ताने, मासिकाच्या २४ वर्षांच्या वाटचालीची कृतज्ञता रुजविण्याच्या हेतूने ‘मिळून साऱ्याजणी’ आणि ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’च्या वतीने ९-१० मार्च २०१४ रोजी ‘सावित्रीजोतीबा उत्सव’ साजरा केला गेला. आज घडीला समाजात सार्वत्रिक उत्सवांच्या झालेल्या बाजारीकरणाला पर्याय म्हणून महाराष्ट्राची विचारांची, विवेकाची परंपरा लोकांपर्यंत पोहोचवावी म्हणून असा उत्सव घेण्याचे ठरविले होते. अशा या कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा ‘लेखकाचे नाव?’ यांनी संवाद स्पंदन मध्ये घेतला आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून कॉ. गोविंद पानसरे तर अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत होते. याशिवाय मिळून साऱ्याजणीच्या सदस्यांबरोबरच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आणि ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’चे नितीन पवार उपस्थित होते. सावित्रीबाईंना जोतीबांची सावली म्हणणे बरोबर नाही. त्याचं एक स्वतंत्र अस्तित्व होतं ज्यामुळे जोतिबांच्या सहवासात त्या घडत गेल्या आणि त्यांच्या कामाचा ठसा समाजात उमटवत गेल्या; असे कॉ. गोविंद पानसरे यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले. त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोचवायचे असेल तर कोणाला बक्षीस देताना ‘सावित्रीबाईचे समग्र वांङ्मय’ द्यावे असे ते आवर्जून सांगतात.

जून २०१४ च्या संवाद स्पंदन मध्ये, तालुका भोर येथे मैत्री दिनाच्या अनुषंगाने ‘समजदार जोडीदार’ या प्रकल्पांतर्गत नारी समता मंचने ‘हिंसामुक्ती समाजासाठी रॅली’चे आयोजन केले होते. हिंसामुक्त समाज निर्माण करण्याच्या हेतूने जनजागृती करण्यात आली. त्याचे सविस्तर वृत्तांकन नारी समता मंचचे जगदीश यांनी केले आहे. या कार्यक्रमात नारी समता मंच पुणे, समाज विकास संस्था दिवळे, सामाजिक क्रांती संस्था, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग, रोटरी क्लब भोर, लायन्स क्लब भोर, श्री. शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज भोर यांचा सक्रीय सहभाग होता. यावेळी महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वाचे महत्व स्पष्ट करून सर्वांनी हिंसेच्या विरोधात शपथ घेतली.

ऑगस्ट २०१४ च्या संवाद स्पंदन मध्ये, पुणे, पाचगणी आणि इतर बाहेर गावाहून आलेल्या अनेक मैत्रिणींनी विद्याताई आणि गीताली ताईंबरोबर हळदी-कुंकू, पवित्र-अपवित्र, नवऱ्याचे नाव लावणे अशा विविध विषयांवर चर्चा केली. स्त्री अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवायला हवाच त्यासाठी स्त्रीचं आत्मभान जागृत होणं कसं आवश्यक आहे या विषयांवर चर्चा झाली. त्याचे टिपण महाबळेश्वर, जिल्हा साताऱ्याच्या नीता भिसे यांनी केले आहे.

सप्टेंबर २०१४ च्या संवाद स्पंदन मध्ये, हैदराबाद येथील विद्या मत्कल यांनी ‘साऱ्याजणीची हैदराबाद भेट!’ या शीर्षकाखाली निवेदन केले आहे. मिळून साऱ्याजणीच्या जुलै २०१४ च्या अंकाचे प्रकाशन, अॅड. मुक्ता दाभोळकर यांच्या हस्ते हैदराबादच्या सखी मंडळाने आयोजित केले होते. त्याचवेळी डॉ. गीताली वि.म., वंदना भागवत व अनिल सपकाळ यांनी संपादित केलेल्या ‘संदर्भासहित स्त्रीवाद – स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व’ या ग्रंथाचे प्रकाशन व परिचय लता प्र.म. यांच्या हस्ते झाले. या सर्व कार्यक्रमाचे सविस्तर वृत्त ह्या महिन्यातील संवाद स्पंदनाचा भाग झाले आहे. अॅड. मुक्ता दाभोळकर यांनी यावेळी ‘समाज परिवर्तानातील पहिले पाउल – अंधश्रद्धा निर्मुलन’ या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधला. त्यात त्यांनी स्त्रिया कशा अंधश्रद्धेच्या बळी आणि वाहकही असतात हे सांगितले. वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या माध्यमातून धर्माला जात, वर्ण व अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करून मानवकेंद्री बनवणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. त्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समिती, मिळून साऱ्याजणी इत्यादींच्या माध्यमातून माणसाची विचारशक्ती जागृत करण्याचे काम अखंडपणे चालू आहे तोपर्यंत आपण आशावादी राहू शकतो अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते असलेले हैदराबादचे आय.जी. महेश भागवत यांनी नरेंद्र दाभोळकर यांच्या आठवणी सांगून ‘जादूटोणा विरोधी कायदा व अंमलबजावणी करताना पोलिसांसमोर येणारी आव्हाने’ या विषयावर त्यांचे अनुभव व्यक्त केले. याविषयी कायद्याबरोबरच प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

ऑक्टोबर २०१४ च्या दिवाळी अंकातील संवाद स्पंदन मध्ये, ‘साऱ्याजणीच्या रौप्यमहोत्सवी सांगता’ समारंभाचे मिळून साऱ्याजणीच्या प्रतिनिधींनी केलेले विस्तृत विवेचन आहे. हा समारंभ २ ऑगस्ट २०१४ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झाला. हा कार्यक्रम मराठी साहित्यात वादळी व्यक्तिमत्व ठरलेल्या कवी नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमामध्ये रौप्यमहोत्सवी वर्षात सुरुवातीपासून मिळून साऱ्याजणीने घेतलेल्या विविध कार्यक्रमांचा थोडक्यात आढावा घेण्यात आला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे साहित्य अकादमीचे माजी उपसचिव, दै. नवभारत टाईम्सचे माजी कार्यकारी संपादक आणि प्रथितयश कवी विष्णू खरे हे होते. मिळून साऱ्याजणीच्या वाटचालीत ‘आम्ही एकत्र आमची एकजूट’ असे म्हणत साथी कायम असलेल्या नारी समता मंच, सखी साऱ्याजणी, अक्षरस्पर्श, साथ साथ विवाह अभ्यासमंडळ आणि पुरुष उवाच या सर्व संस्था संघटनांचा उल्लेख केल्याशिवाय कार्यक्रमाची वाटचाल अर्धवट राहिली असती!

रौप्यमहोत्सवाची सांगता असली तरी वर्तमानातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या ज्वलंत प्रश्नाला सामोरे जाण्याची संवेदनशील जबाबदारी मिळून साऱ्याजणी नक्कीच मानते. अवकाळी पाउस, गारपिट आणि कारणांनी शेतीच्या होणाऱ्या नुकसानीमुळे नैराश्यात आत्महत्येचा मार्ग स्विकारलेल्या शेतकऱ्यांच्या दोन कुटुंबाना मदत करण्यासाठी निधी जमविण्याचे काम मिळून साऱ्याजणीच्या प्रतिनिधी नीता भिसे यांनी केले. त्यासाठी त्यांनी महाबळेश्वर येथे सुप्रसिद्ध गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझलांचा कार्यक्रम आयोजित केला. त्यातून जमा झालेला निधी बुलढाण्याच्या संगीता शिंदे आणि यवतमाळच्या व्दारका भवाळ या दोन संघर्षशील शेतकरी महिलांना रौप्य महोत्सवी सांगता समारंभाच्या निमित्ताने विद्याताईंच्या हस्ते देण्यात आला.

याच प्रसंगी स्त्री चळवळीच्या अभ्यासक छाया दातार लिखित ‘स्त्रियांचे नाते – जमिनीशी आणि पाण्याशी’ या पुस्तकाचे प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे विष्णू खरे यांच्या हस्ते झाले. छायाताईनी वेगाने विकसित होणाऱ्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात स्त्री चळवळीचे आपली रणनीती कधी आखावी याचे सखोल विवेचन या पुस्तकात केले आहे. पुण्याच्या लॉ कॉलेजचे प्राचार्य व निरामय ट्रस्टचे विश्वस्त दिवंगत सत्यरंजन साठे याचे वडील मिमांसाभूषण पु.बा. साठे आणि मातोश्री ताराबाई साठे यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले. त्या वर्षीचा हा पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना सरकारी योजनांचा लाभ करून देणाऱ्या तसेच आंतरजातीय विवाहांना मदत करणाऱ्या चार्मोशी तालुक्यातील रेहमुन्निसा शेख यांना देण्यात आला. तसेच या प्रसंगी जानेवारी २०१४ रोजी दिवंगत झालेल्या साहित्यसृष्टीतील नामवंत कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कवयित्री प्रज्ञा पवार आणि कवी सतीश काळसेकर यांनी केले. यावेळी कविता सादरकर्त्यांनी नामदेव ढसाळांच्या आठवणी सांगून त्यांच्या कवितांच्या माध्यमातून नामदेव ढसाळांना पुन्हा सजीव सृष्टीत आणले.

नंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्रोही साहित्यातील नामदेव ढसाळांच्या कवितांचे जागतिक पातळीवरील अनन्यसाधारण महत्व अधोरखित केले. त्यामुळेच सर्वाहारा वर्गाच्या तीव्र संवेदनांचे नेतृत्व करणाऱ्या अशा कवितांचे जगभरातील विविध भाषांमध्ये भाषांतर होण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. नामदेव ढसाळांच्या कविता जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवणे हिच त्यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल असे विष्णू खरे यांनी नमूद केले. शेवटी आपल्या अध्यक्षीय समारोपात विद्याताई बाळ यांनी मिळून साऱ्याजणी च्या प्रवासात मासिकाची वैचारिक कास आणि स्त्रीचं आत्मभान जागृत ठेवण्याच्या धडपडीचा मागोवा घेतला. बदलत्या राजकीय पर्यावरणावर भाष्य करून महानगरपालिकेचे नियम आणि त्यांची अंमलबजावणी यावर परखडपणे टीकात्मक टिपणी केली.

ह्या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मिळून साऱ्याजणीच्या प्रचार-प्रसाराचे विनावेतन काम करणाऱ्या सुमारे पन्नास प्रतिनिधींनी ३ ऑगस्टला एरंडवन्यातील माधुरी शिरगावकर यांच्या घरी बैठक घेतली. आणि मिळून साऱ्याजणीची पुढील वाटचालही जोमाने करण्याचा निर्धार केला. जानेवारी २०१५ च्या संवाद स्पंदन हे ‘मिळून साऱ्याजणी’ च्या दिवाळी अंक प्रकाशन समारंभावर आधारीत होते; आणि शर्मिष्ठा खेर यांनी शब्दांकित केलेले आहे. हा शेती विशेषांक होता. याचे प्रकाशन दौंड तालुक्यातील पारगाव इथे सेंद्रीय शेती करणाऱ्या वसुधा सरदार यांच्या शेतावर झाले. पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात २५ वर्षं अध्यापन करणारे डॉ. धुमाळ हे प्रमख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच सेंद्रीय शेती च्या भेटीस आलेले छोट्या पडद्यावरील कृष्णाची भूमिका साकारलेले सुप्रसिद्ध कलाकार नितीश भारद्वाज अचानक लाभलेले पाहुणे ह्या कार्यक्रमात सहभागी झाले.

१९८५ साली वसुधाताईंचे वडील आबा करमरकर यांनी ग्रामविकासासाठी नवनिर्माण न्यास ही संस्था सुरु केली. त्याच्या जोडीला शेतीबरोबर सुरु झालेला दुग्धव्यवसाय, वसुधाताईनी केलेले दारूबंदीचे काम, महिला बचत गट, न्यासा मार्फत चालवल्या जाणाऱ्या मुक्त शाळा आणि सेंद्रिय शेतीचे महत्व या संपूर्ण कार्याचा आढावा या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांसमोर मांडला. डॉ. धुमाळ यांनी त्याच्या भाषणात शेतीचे महत्व स्पष्ट करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.चे संशोधन करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेती संबंधित विषय निवडल्याची माहिती त्यांनी सांगितली. मुक्त शाळा प्रकल्पातील संघटिका माया काळे यांनी माणसांच्या एकत्र येण्यात अडसर ठरणाऱ्या भिंती पाडून टाकूया असे आवाहन पर गीत सादर केले. दिवाळी अंकाचे सहसंपादक उत्पल व. बा. यांनी शेतकऱ्याच्या सद्यस्थितीचे वर्णन करणाऱ्या त्यांच्या कवितेचे सादारीकारण यावेळी केले. शहर आणि गावाचे नाते सांगणारे गीत सरिता आवाड यांनी म्हणले. कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी शेतकऱ्यांवर आधारित ‘सात-बारा’ ही कविता सादर केली. वसुधा ताईंच्या हस्ते त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सरकारचा सेंद्रिय कृषिभूषण पुरस्कार मिळालेले शेतकरी नामदेव माळी यांनी त्यांचे सेंद्रिय शेती करतानाचे अनुभव सर्वांसमोर मांडले.

वसुधा ताईंनी सरकारच्या शेतीविषयक धोरणाचे त्यांच्या गोष्टी सांगण्याच्या आणि उदाहरणे देण्याच्या शैलीतून टीकात्मक विवेचन केले. तसेच शेतकरी आणि ग्राहक दोघांनीही वस्तुस्थितीचा विचार करून सेंद्रिय शेतीचे महत्व जाणावे असा विनंतीवजा आग्रह केला. ह्या विविधांगी मुद्द्यांचा साकल्याने परामर्श घेऊन विद्याताईंनी ह्या कार्यक्रमाची सांगता केली.

फेब्रुवारी २०१५ चे संवाद स्पंदन ‘वाचक तितुका मेळवावा’ या शीर्षकांतर्गत डॉ.वंदना बोकील-कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेले आहे. माणसाच्या जगण्याचा परिघ विस्तारण्याच्या दिशेने अनेक प्रयत्न करणाऱ्या अक्षरस्पर्श चा सप्टेंबर २०१४ मध्ये ‘वाचक तितुका मेळवावा’ हा एक प्रयत्न होता. हा कार्यक्रम पुण्यातील निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस चित्रा देशपांडे यांनी आसावरी काकडे यांच्या कवितेचे गायन केले. डॉ.शर्मिष्ठा खेर यांनी श्रोत्यांना अक्षरस्पर्श ग्रंथालयाच्या १४ वर्षांच्या प्रवासाच्या सफरीला नेले.

‘वाचक तितुका मेळवावा’ याअंतर्गत लेखिका आशा साठे यांनी वाचकांशी संवाद साधण्याच्या हेतूने तेथे उपस्थित वाचकांमध्ये गटचर्चा घडवून आणली. ज्यामधून वाचनातून मला काय मिळाले यावर उत्कृष्ट संवाद झाला. नंतर ‘मैत्रीचे दिवस’ विषयावर माहेर मासिकाच्या संपादक, अनुवादक सुजाता देशमुख यांच्या सहाय्याने डॉ. शामला वनारसे आणि विद्याताई यांनी त्यांच्या मैत्रीचे गुज वाचकांसोबत साधले. एका सत्रात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त माधुरी पुरंदरे आणि अवधूत डोंगरे यांचा सत्कार शामला ताईंच्या हस्ते करण्यात आला. त्याच सुमारास साऱ्याजणीचे सहकारी कवी उत्पल यांच्या ‘सायलेंट मोडमधल्या कविता’ या पहिल्या कविता संग्रहाचे प्रकाशन अक्षरस्पर्शचे कोशाध्यक्ष सुश्रुत कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. अक्षरस्पर्श बरोबर अनेक वर्षे जोडलेले आप्पा साने यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी हेमा साने यांच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रंथालयाला वाचककेंद्री उपक्रमासाठी देणगी दिली. याचं माध्यमातून खुली लेखनस्पर्धा घेण्यात आली होती. यातील स्पर्धेच्या विजेत्यांना अभिनेते व लेखक गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी चित्रपट, साहित्य आणि मी या विषयावर गिरीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

फेब्रुवारी २०१५ च्याच अंकात औरंगाबादहून ‘उमंग महोत्सवा’चे संवाद स्पंदन औरंगाबादच्या डॉ. जयश्री गोडसे यांनी दिले आहे. ११ ते १३ डिसेंबर २०१४ दरम्यान उमंग या राष्ट्रीय स्तरावरिल महोत्सवाचे आयोजन साउथ सेन्ट्रल झोनच्या सांस्कृतिक केंद्रातर्फे करण्यात आले होते. यामध्ये, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा इत्यादी राज्यातून आलेल्या २०० विशेष मुलांनी (स्पेशल चाइल्ड) आपल्या कला सादर केल्या. कांचन सोनटक्के यांच्या क्रियेटीव्ह डायरेक्टर होत्या. नृत्य, नाट्य, मुकनाट्य, महाराष्ट्राची लोकधारा, भांगडा, दीपनृत्य, कथ्थक, वादन, गायन अशा विविध कलांचा समावेश या महोत्सवात करण्यात आला. तसेच जादूचे प्रयोग, रोप मल्लखांब, नाटक यांचे सादरीकरण पण इथे झाले. फास्टफूडचा वाढता रेटा, उत्क्रांती, पर्यावरण इत्यादी विषयांना या कलांच्या माध्यमातून स्पर्श केला गेला. सुंदर वेशभूषा, आभूषणे, इतर साहित्य, नेपथ्य, गाणी यांचे विशेष सादरीकरण झाले. व्यावसायिक म्हणून थाळी नृत्याचे प्रयोग करणाऱ्या कमलेश पटेल यांनी उत्तम नृत्याविष्कार यावेळी साकारला.

मार्च २०१५ च्या संवाद स्पंदन मध्ये, लोकशाही संवर्धन संरक्षणासाठी घेत असलेल्या लोकशाही उत्सवाचे वृत्तांकन मिळून साऱ्याजणीच्या पूनम बा.मं. यांनी केले आहे. गुजरात दंगलीनंतर भारतातील लोकशाही टिकवण्याच्या आणि वाढवण्याच्या हेतूने लोकशाही उत्सव पुण्यात दरवर्षी २६ ते ३० जानेवारी दरम्यान आयोजित केला जातो. अभय-अभियान, आलोचना, इकोलॉजिक, एस.एम.जोशी फाउंडेशन, कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, नारी समता मंच, पुरुष उवाच, भारतीय महिला फेडरेशन, मासूम, मिळून साऱ्याजणी, मुस्लीम सत्यशोधक मंडळ, राष्ट्र सेवा दल, लोक स्वतंत्र संघटना, विमेन्स नेटवर्क, शब्दमित्र, सम्यक, सृष्टी, सहेली संघ, स्त्री मुक्ती संघटना, ह्युमन राइट्स अँड लॉ डिफेन्डर्स (सहयोग ट्रस्ट) इत्यादी संस्था संघटना ह्या उत्सवाचा भाग बनल्या होत्या.

२६ जानेवारीला लवासाविरोधी आंदोलनाच्या नेत्या लीलाबाई मरगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती लोकरंगमंच यांच्या ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ हे रिंगणनाट्याचे सादरीकरण, जीवनोत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन, लोकशाही मुल्यांची रुजवात करणारा संदेश भंडारे दिग्दर्शित ‘म्हादू, एक मिथक’ हा चित्रपट दाखविणे, संगीत मैफिलीचे आयोजन अशा कार्यक्रमांनी उत्सवाचा पहिला दिवस पार पडला. २७ जानेवारी रोजी मासूम आयोजित ‘महाराष्ट्र महिला हिंसाविरोधी परिषद’ पूर्वतयारी घेण्यात आली. याच दिवशी ज्येष्ठ नागरिकांच्या १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणीच्या ‘विमेन्स नेटवर्क’ यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘स्वातंत्र्यपूर्व संध्या’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि साहित्यिक डॉ. रोहिणी गव्हाणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या संस्थेच्या अध्यक्ष मंगला सामंत यांनी मिळून साऱ्याजणीच्या माध्यमातून हा पुस्तक प्रकल्प कसा पार पाडला हे सांगून या पुस्तकामागील हेतू काय होता हे स्पष्ट केले. वयाची ऐंशी-नव्वद वर्षे पार केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी सुद्धा ह्या पुस्तकात आपले योगदान दिले. तसेच याच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात ग्रामीण, दलित, ख्रिश्चन, मुस्लिम जनतेचे असलेले योगदान उजागर होत आहे याचे समाधान मंगला सामंत यांनी व्यक्त केले. या प्रकाशन सोहळ्याच्या समारोपाला सुनील सुकथनकर यांनी खुमासदार भाषण करून रंगत आणली. डॉ. रमेश अवस्थी यांनी अध्यक्षीय भाषण देऊन या प्रकाशन सोहळ्याची सांगता केली.

२८ जानेवारीला ‘विकास, अच्छे दिन आणि वस्तुस्थिती’ या विषयावरील परिसंवादात प्रा. अजित अभ्यंकर आणि सुनीती सु.र. सहभागी झाले. ‘आंदोलन शाश्वत विकासासाठी’ मासिकाचे प्रकाशन कॉ. शांताताई रानडे यांच्या हस्ते झाले. २९ जानेवारीला उर्मिला पवार लिखित व सुषमा देशपांडे दिग्दर्शित ‘आयदान’ नाटकाचे सादरीकरण, आणि ३० जाने. ला मजूर अड्ड्यावर ‘दहशतवाद संपवूया, लोकशाही रुजावूया’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्यात आला. तसेच डॉ. शैलेन्द्र खरात, डॉ. चैत्र रेडकर, श्रुती तांबे यांच्या सहभागाने ‘धर्म निरपेक्षता आणि राज्यसंस्थेची भूमिका’ ह्या परिसंवादाने उत्सवाची सांगता झाली.

एप्रिल २०१५ च्या संवाद स्पंदन मध्ये दिवाळी अंकाच्या शेती विशेषांकावरील चर्चेचे होते. अंकातील विविध लेख, कथा, कविता यांबद्दल काय वाटले, त्यांची संयुक्तिकता कशी होती या चर्चेचे सविस्तर टिपण पुण्याच्या ‘सखी साऱ्याजणी’च्या रेखा डांगे यांनी केले आहे.

जून २०१५ च्या संवाद स्पंदन मध्ये कोलकत्त्यातील महाराष्ट्र मंडळाला मिळून साऱ्याजणीच्या सख्यांनी दिलेल्या भेटीचे थोडक्यात वर्णन कोलकत्त्याच्या रेखा गोडबोले यांनी केले आहे. यावेळी स्त्री प्रश्नाचे बदलते स्वरूप, त्याविषयी स्त्रियांच्या जाणीवा आणि स्त्री-पुरुष नाते यांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच या संवाद स्पंदन मध्येच ‘संवादिनीच्या रौप्य महोत्सवी’ कार्यक्रमाचे सविस्तर वर्णन डॉ. अनघा केसकर यांनी केले आहे.

जुलै २०१५ च्या संवाद स्पंदनात दादर सखी मंडळाच्या रौप्य महोत्सवी समारंभाचे उत्साहपूर्ण वर्णन मंडळाच्या सचिव रंजना शर्मा यांनी केले आहे. याप्रसंगी मंडळाच्या विविध सदस्यांनी समाजातील विविधांगी विषयावर विविध माध्यामातून मांडणी केली. रौप्य महोत्सवानिमित्त मंडळाच्या हस्तलिखिताचे प्रकाशन गीताली ताईच्या हस्ते करण्यात आले.

ऑगस्ट २०१५ विविध स्त्रीवादी संस्था संघटना आणि कार्यकर्ते यांनी मिळून पुण्यात मे २०१५ रोजी पुरुषभान परिषदेचे आयोजन केले होते. त्याचे विवरण म्हणजे ऑगस्ट २०१५ च्या अंकाचे संवाद स्पंदन आहे. पुरुषसत्ताक समाजाने घडवलेले स्त्री आणि पुरुष याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून वाटचाल करणं समताधिष्ठित समाजासाठी आवश्यक आहे. पुरुषांमधले हरवत चाललेले माणूसपण शोधायचे असेल तर त्यांनी स्वतःशी आणि इतरांशी संवाद साधने आवश्यक आहे. आणि त्यातूनच आपल्या वर्तनातून हिंसेच्या मूल्यांना हद्दपार करणे गरजेचे आहे. या संवाद प्रक्रियेचा भाग म्हणूनच या पुरुषभान परिषदेचे औचित्य होते. पुरुषसत्ताक समाजाने घडवलेल्या पुरुषापासून पर्यायी पुरुषभानाचा प्रवास करताना भांडवलशाही समाज,जात,धर्म,लिंग यांच्या संदर्भातील पुरुष समजून घ्यायला हवा. या सर्व संदर्भांसह चित्रपटातील हिरो, हिरोईन आणि मी, पुरुष म्हणून मी कसा घडलो, कुटुंबातील स्त्रिया आणि मी, पुरुषांच्या गप्पा, नातेसंबंधातील माझी गोची, पोर्नोग्राफी आणि मी, प्रेम-जात आणि मी, संशय-हिंसा आणि मर्दानगी, स्पर्धा आणि पुरुष अशा विविध विषयांवरील गटचर्चा यानिमित्ताने झाल्या. सर्वंकष मुद्द्याच्या आधारे व्यापक परिघ असणाऱ्या या परिषदेचे सविस्तर वृत्तांकन शंकर गवळी यांनी आपल्या प्रामाणिक अनुभवातून केले आहे.

सप्टेंबर २०१५ चे संवाद स्पंदन ‘कवितेच्या भाषांतराचा अनुभव’ या शीर्षकाखाली मिळून साऱ्याजणी च्या प्रतिनिधींनी दिले आहे. अक्षरस्पर्श आणि पाथेय ट्रस्टच्या वतीने ‘कवितेच्या भाषांतराचा अनुभव’ हि मुक्त चर्चा आयोजित केली होती. ज्यामध्ये डॉ. शामला वनारसे, डॉ. उमा कुलकर्णी, आसावरी काकडे आणि डॉ. अपर्णा झा आणि गणेश विसपुते हे मराठीतील नामवंत भाषांतरकार सहभागी होते. यावेळी कोणत्याही साहित्य कृतीचे विशेषतः कवितेचे भाषांतर करताना येणारी मजा, त्यात येणाऱ्या अडचणी यांबद्दल सर्वांनी आपले अनुभव कथन केले.

याच संवाद स्पंदनामध्ये ‘ऐसपैस गप्पांच्या निमित्ताने’ या शीर्षकांतर्गत दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने सुनील सुकथनकर, स्पृहा जोशी, संदेश कुलकर्णी आणि मुग्धा गोडबोले-रानडे या कलाकारांबरोबर टी.व्ही. वरील मालिकांवर झालेली चर्चा श्यामलाताई वनारसे यांनी सविस्तर मांडली आहे. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सामाजिक बदलांची चित्रे माध्यमात दिसत नाही, पारंपारिक विचारांचे स्तोम, चंगळवादी विचार, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेची पकड यामध्ये अडकलेल्या मालिकांमध्ये काम करत असताना तिथे आपली मते नोंदवून त्यातून काय संदेश समाजात जातोय हे पाहणेही या कलाकारांना महत्वाचे वाटते. माध्यमांमध्ये काम करताना येणाऱ्या मर्यादांसह एक सजग कलाकार म्हणून आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो, याचा विचार केला जातो. स्त्रिया, कष्टकरी वर्ग, आंदोलने ह्या सामाजिक वास्तवाचा अभाव जाणवत असताना जनमताचा रेटा वाढविण्यासाठी माध्यम जागृतीची चळवळ चालविणे आवश्यक असल्याचा मुद्दा पुढे आला. या चर्चेनंतर श्यामलाताईंनी एकूणच दृकश्राव्य माध्यमांच्या संदर्भात सविस्तर असे टीकात्मक विवेचन करून माध्यम शिक्षण या अतिदुर्लक्षित क्षेत्राकडे लक्ष देण्याची त्यात कार्य करण्याची विद्याताईनी सांगितलेली गरज पुन्हा अधोरेखित केली.

डिसेंबर २०१५ च्या संवादस्पंदन मधून कुंदा प्र.नि. यांनी वैचारिक प्रबोधनाचा प्रवाह अधिक सशक्त होण्यासाठी जुलै २०१५ पासून मुंबई येथे चालू असलेला ‘सत्यशोधक स्टडी सर्कल’ सारखा अभ्यासवर्ग गावोगावी सुरु व्हावा या हेतूने त्याचा सविस्तर वृत्तांत दिला आहे. विचारांची लढाई विचाराने लढण्यासाठी आधी समाजात विचार तर रुजायला हवेत. पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधनाचा अभाव आहे. परिस्थितीचे आकलन करून घेण्यासाठी विज्ञानवादी भूमिकेतून जगाकडे पहायला शिकविणारा चिकित्सक विचार रुजविण्याची गरज आजही आपल्याला जाणवते. म्हणूनच ‘सत्यशोधक स्टडी सर्कल’ ची कल्पना डॉ. कुंदा प्रा.नि. यांनी सीपीआयचे कॉमरेड प्रकाश रेड्डी यांच्या समोर मांडली. त्यांनी महिन्यातून एकदा नियमितपणे अभ्यासवर्ग घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. व्यक्तींमध्ये कोणतीही दरी न राहता सर्वांनी आपले मत निःसंकोचपणे मांडावे, त्यावर चर्चा व्हावी असा गट तयार झाला. यामध्ये ग्रीसवरील आर्थिक आरिष्ट पासून ते कुटुंब व्यवस्था, स्त्रीभान-पुरुषभान, सत्तासंबंधांचे वास्तव, उत्पादन व्यवस्थेचे संबंध अशा विविध विषयांवर जाणकार वक्ते बोलावून त्यावर सर्वांगाने चर्चा होत असते. या अभ्यासमंडळाला ७०-७५ लोक उपस्थित असतात.

मार्च २०१६ च्या संवादस्पंदन मध्ये ‘अक्षरस्पर्श’च्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना व नृत्यगुरु पं. शमाताई भाटे यांची जयश्री बोकील यांनी घेतलेल्या मुलाखतीचा सारांश वंदना बोकील-कुलकर्णी यांनी दिला आहे. ज्यामध्ये नृत्याचा देवाश्रायापासून लोकाश्रयापर्यंतचा आणि आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीने नृत्य सादरीकरणात झालेल्या बदलांपर्यंतचा प्रवास उलगडला.

जून २०१६ च्या संवादस्पंदन मध्ये ‘काचेचं छत भेदताना’ या शीर्षकाखाली प्रियदर्शिनी हिंगे यांनी मांडणी केली आहे. ‘द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ ने ज्या प्रमाणात स्त्रिया उच्च शिक्षण घेतात त्या प्रमाणात त्या राष्ट्रीय उत्पन्नात भर घालताना दिसत नाहीत असे तथ्य मांडले. म्हणूनच महिलांच्या आकांक्षा उंचावण्यासाठी ‘break the ceiling, touch the sky’ यावर आधारित जागतिक परिषद सिंगापूर येथे घेण्यात आली. अशा परिषदांची गरज लक्षात घेऊन ‘हौसे ऑफ रोसे’ या कंपनीने मुंबई येथे फेब्रुवारी २०१६ रोजी दुसरी परिषद आयोजित केली. या परिषदेच्या प्रत्यक्ष अनुभवाचा वृत्तांत प्रियदर्शिनी हिंगे यांनी इथे दिला आहे. ह्या परिषदेत प्रामुख्याने नोकरी करणाऱ्या किंवा गृहिणी असलेल्या मध्यमवर्गीय स्त्रियांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्राच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींचा संघर्ष आणि त्यांची रणनीती’ या संशोधनातून पुढे आलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मार्च २०१६ रोजी मुंबई विद्यापीठात एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. हि परिषद महिला राजसत्ता आंदोलन आणि राजीव गांधी समकालीन अध्ययन केंद्र, मुंबई विद्यापीठ यांनी आयोजित केली होती. याचे सविस्तर वृत्तांकन पूनम बा. मं. यांनी ‘महिला सरपंच परिषद’ या शीर्षकाखाली जून २०१६ च्या संवाद स्पंदन मध्ये दिले आहे.

जुलै २०१६ च्या संवादस्पंदन मध्ये दादर सखी साऱ्याजणीचा मे १५ ते एप्रिल १६ चा वार्षिक अहवाल त्या सखी मंडळाच्या उपाध्यक्ष कुंदा पित्रे यांनी दला आहे. त्याचप्रमाणे विलेपार्ले सखी मंडळाचा वार्षिक अहवाल त्या मंडळाच्या सदस्या सुमन शेवडे यांनी प्रस्तुत केला आहे.

सप्टेंबर २०१६ च्या संवादस्पंदन मध्ये अलिबागच्या सुजाता पाटील यांनी Active Teachers’ Forum च्या शिक्षक संमेलनाचा वृत्तांत दिला आहे. यात यांनी मानव संसाधन मंत्रालयाचे सल्लागार राहिलेले शिक्षणतज्ञ सुबीर शुक्ल यांनी शैक्षणिक योजना कशा असफल होण्यासाठीच बनवल्या जातात असे शिक्षण व्यवस्थेचे केलेले परखड मूल्यमापन दिले आहे. विविध सामाजिक स्तरातून शाळेत येणारा मूळ आपल्या बरोबर जे अनुभव संचित घेऊन येते त्याच्या शाळेतील अभ्यासक्रमाशी काहीच ताळमेळ नसतो हे कटू सत्य इथे अधिरेखीत केलेले आहे. इतिहास अभ्यासक, लेखक व शिक्षणकर्मी अरुण ठाकूर, किशोर दरक, विवेक मॉन्टेरो, डॉ. मोहन देस यांनी शालेय शिक्षणाबाबत वैज्ञानिक दृष्टीकोन, लिंगभाव, विषमता यांवर चर्चा घडवून आणली. शिक्षण हक्क कायदा आणि महाराष्ट्रातील परिस्थिती यावर गीता महाशब्दे, विठ्ठलराव भुसारे, प्रल्हाद काटोले, राहुल गवारे यांनी मांडणी केली.

त्याचप्रमाणे याचं संवादस्पंदन मध्ये साधना दधीच यांनी लोकायतच्या वार्षिक सभेचे विवरण दिले आहे. या सभेचे निमंत्रण लोकायतचे सदस्य नसलेल्या सर्व समविचारी संस्था, कार्यकर्ते यांनी निमंत्रण होते हे साधनाताई आवर्जून नमूद करतात. या मिटिंगसाठी दिल्ली, राजस्थान, झारखंड इ. ठिकाणांहून पण लोक उपस्थित होते. लोकायत सारख्या गटातून समाजवादी विचार पोचविण्याचे काम आपण करू शकतो असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते जी.जी. पारीख यांनी व्यक्त केले. लोकायतने त्यांच्या कामाचे डिजिटल साहित्याचे माध्यमातून, मराठी-हिंदी-इंग्रजी भाषांचा वापर करून प्रात्यक्षिक दिले. त्यामध्ये वस्त्यांमधील शौचालयाचे सर्वेक्षणापासून बुक स्टॉल लावणे, बजट विश्लेषण सादर करणे, ईदच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, पर्यावरण जागृतीचे कार्यक्रम, तत्कालीन मुद्द्यांवर नाटक सादर करणे, सर्वांनी लिहिते होण्याला महत्व देणे, अभिव्यक्ती आघाडीचे काम, सांस्कृतिक कार्यक्रमाची सातत्याने होणारी तयारी, विविध विषयांवर पोस्टर्स बनविणे अशी कामातली विविधता साधनाताईना भावली.

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१६ च्या संवाद स्पंदन मध्ये औरंगाबादच्या प्रभाताई गणोरकर आणि कविता महाजन यांची मिळून साऱ्याजणीचे उत्पल यांनी घेतलेली मुलाखत सविस्तर दिली आहे. प्रभाताईनी संत कवयित्रींपासून आधुनिक मराठी कवितेचा ‘मराठीतील स्त्रियांची कविता’ या प्रकल्पात त्यांनी घेतलेला मागोवा या मुलाखातीच्या माध्यमातून इथे उलगडला आहे. तर कविता महाजन यांनी आत्मचरित्राचे दोन भाग दाखविले एक आंतरिक आत्मचरित्र आणि दुसरं वैचारिक आत्मचरित्र. हा व्यक्तीचा विचारांचा प्रवास आहे असे त्या म्हणतात. आपल्या स्व चा म्हणजे आंतरिक चरित्राचा जेवढा जास्त विस्तार होईल तेवढा कवितेचा विस्तारही होत जाईल असे त्यांना वाटते. कवितेत भावना असली कि पुरे, त्यात विचार असण्याची गरज नाही असा समज मराठी कविता विश्वात झालेला आहे. म्हणूनच चांगल्या कविता वाचण्यासाठी इतर भाषांतील कवितांकडे जावं लागतं असं त्या नम्रपणे कबुल करतात. शेवटी विद्याताईंनी आपल्या समारोपाच्या भाषणात वर्षारंभ अंकाच्या प्रकाशन कार्यक्रम साध्या स्वरूपात घेण्यामागील भूमिका सांगितली.

जानेवारी २०१७ चे संवाद स्पंदन २०१६ च्या दिवाळीविशेष अंकावर आणि ‘चला यशस्वी करुया लोकप्रतिनिधींचे ५०% आरक्षण’ या राजकीय विषयावरील चर्चेवर आधारित उर्मिला भुर्के यांनी दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था पातळीपर्यंत स्त्रीयांना ५०% आरक्षण मिळाले तरी त्यानिमित्ताने आपली निर्णय क्षमता वाढवून त्याची जबाबदारी घेऊन राजकारणात सहभाग नोंदवण आवश्यक असल्याची गरज इथे व्यक्त करण्यात आली. तसेच मुस्लिम महिलांनी ‘मुस्लिम महिला अधिकार परिषदे’चे आयोजन केले होते; त्याचे शब्दांकन बेनझीर तांबोळी यांनी ‘मुस्लिम महिला अधिकार राष्ट्रीय परिषद’ या शीर्षकाखाली संवाद स्पंदन म्हणून देले आहे. परिषदेचे आयोजन हमीद दलवाई स्टडी सर्कल, मुस्लिम महिला मंच आणि युवा मंच यांनी केले होते. या परिषदेचे उद्घाटन व्यक्तिगत कायद्यातील कालबाह्य व संविधानात्मक हक्कांशी विसंगत असणाऱ्या तरतुदींच्या बळी ठरलेल्या उत्तराखंडच्या शायराबनो यांच्या हस्ते झाले. त्यांनी त्यांचे संपूर्ण अनुभव कथन याप्रसंगी केले. त्यांच्या लढ्यामुळेच सरकारला सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञा पत्र दाखल करून मुलभूत हक्कांशी विसंगत असणाऱ्या व्यक्तिगत कायद्यातील तरतुदी रद्द करण्याची भूमिका जाहीर करावी लागली.

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या स्त्रीवादी लेखिका डॉ. नूर जहीर यांनी आपल्या बीजभाषणात व्यक्तिगत कायद्यातील उणीवा विषद करताना मुस्लिम महिलांवर होणार्या अन्यायाची उदाहरणे सांगितली. नंतर विविध स्तरांमधून आलेल्या मुस्लिम महिलांनी त्यांच्या वेदनेचे अनुभव कथन केले; ज्यामधून त्यांच्या प्रश्नांची व्यापकता लक्षात आली. शमसुद्दीन तांबोळी यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. हमीद दलवाईंची मुलाखत, मुस्लिम महिलांना संविधानात्मक हक्कांपासून कसे वंचित केले यावरील परिसंवाद नाटक असे विविध आयाम या परिषदेचा भाग होते. तसेच, २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यातील शहीदांना, ज्येष्ठ अभ्यासक दिलीप पाडगावकरांना आणि क्युबा चे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कास्ट्रो यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

फेब्रुवारी २०१७ च्या संवाद स्पंदन मध्ये अक्षरस्पर्श च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘लय पाश्चिमा’ या डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या कार्यक्रमाचे सरोज देशचौगुले यांनी केलेले शब्दांकन आहे. या कार्यक्रमात आशुतोष जावडेकर कंट्री म्युझिक पासून मराठी, हिंदी व इंग्रजी रॉक, हिपहॉप पर्यंत सर्व प्रकरच्या संगीत प्रकारांवर भाष्य करतात. उत्तमोत्तम गाण्यांचा सामाजिक परिघ उलगडून सांगणे हे त्यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. तसेच ‘महिला हिंसाचार विरोधी अभियान’ या शीर्षकांतर्गत गौरी सागावकर यांनी पुणे, इंदापूर आणि साताऱ्यात खटाव तालुक्यातील पाच गावांमध्ये महिला हिंसाचाराविषयी जनजागृतीपर झालेल्या कार्यक्रमाचे वृत्तांकन संवाद स्पंदन मध्ये दिले आहे.

एप्रिल २०१७ चे संवाद स्पंदन शिंदखेडा येथील महाविद्यालयात गीताली ताईंनी दिलेल्या भेटी दरम्यान त्यांना भेटलेले संदीप गिरासे आणि यांच्या कृतिशील शिक्षक मित्र गटातील व्यक्तींची ओळख करून देणारे स्पंदन आहे. त्याच वेळी महाविद्यालयात महिलांच्या विषयावर आधारित पोस्टर्स प्रदर्शन घेण्यात आले ज्याचे उद्घाटन गीताली ताईंनी केले. तसेच ‘उगवत्या तरुणाईशी संवाद’ या कार्यक्रमात ताईंनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.

एप्रिल २०१८ चे संवाद स्पंदन डिसेंबर २०१७ ला भोपाळच्या सखी मंडळाने आयोजित केलेल्या ‘अखिल भारतीय सखी मंडळाच्या संमेलना’वर आधारित आहे. या संमेलनामध्ये हैदराबाद, सोलापूर, पुणे, दादर, पार्ले, भुसावळ इ. ठिकाणच्या सखी मंडळांनी क्रियाशील सहभाग नोंदवला. देवासच्या प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे विस्तृत वर्णन भोपाळच्या मंदा गंधे यांनी संवाद स्पंदन साठी केले. त्याचप्रमाणे, २०१८ फेब्रुवारी मध्ये सखी मंडळाची खळद येथे गरम गौरव प्रतिष्ठान पाणी पंचायतचे प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या सहलीची माहिती पुण्याच्या सुनीता भागवत यांनी दिली आहे.

जून २०१८ च्या संवाद स्पंदन मध्ये ‘सावित्री जोतीबा समता उत्सव २०१८’ या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्त मिळून साऱ्याजणी च्या प्रतिनिधींनी दिले आहे. ज्येष्ठ नाट्यकर्मी माधव वझे आणि विद्याताई बाल यांनी पुण्यातील महाविद्यालयात जाऊन एकांकिका सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त केले. त्यासाठीचे विषय सुचविले. याचं एकांकिकांचे सादरीकरण हा सावित्री जोतीबा समता उत्सवाचा भाग होता. त्यांच्या परीक्षणासाठी माधव वझे, दीपा श्रीराम, वंदना बोकील-कुलकर्णी होते. समाज अनभिज्ञ असलेल्या रखमाबाई राउत यांसारख्या व्यक्तिरेखा एकांकिकेतून साकारताना विद्यार्थी जाणकार आणि अभ्यासू बनले. त्यांच्या या परिश्रमाचे उत्साहवर्धन म्हणून सहभागी महाविद्यालयांनी ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले. तसेच ‘सावित्री जोतीबा समता सहजीवन सन्मानाने’ यावेळी सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध झालेल्या वैशाली भांडवलकर आणि संतोष जाधव यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे का.स.वाणी प्रतिष्ठान धुळे आणि मिळून साऱ्याजणी घेत असलेल्या रेऊ कथा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रा. रेखा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला.

सप्टेंबर २०१८ च्या संवादस्पंदन मध्ये लंडनमधील देविना देवळेकर यांनी त्यांच्या तिकडच्या मैत्रीणीना मिळून साऱ्याजणीची ओळख करून देण्यासाठी आयोजित केलेल्या मिटिंगचा अहवाल वजा संवाद लिहिला आहे. यावेळी विविध विषयांवरील निवडक लेखांचे वाचन वेगवेगळ्या मैत्रिणीने केले. तेव्हांच स्थापन झालेल्या त्यांच्या गटाला त्यांनी ‘स्पंदन’ नाव दिले.

डिसेंबर २०१८ च्या संवादस्पंदन मध्ये ‘अकोला संवाद घर’चा वृत्तांत अकोल्याच्या दिप्ती जोशी यांनी दिला आहे. अकोल्यातील साने गुरुजी वाचनालय आणि मिळून साऱ्याजणीची अकोला शाखा यांनी ‘संवाद घर’ उपक्रमाची सुरुवात केली. यामध्ये संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ समारंभात ‘मीटू’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. तसेच यामध्येच ‘अक्षर ग्रुप’ची स्थापना झाली. ज्यामध्ये दोन सख्यांनी जबाबदारी घेऊन दोन पुस्तके वाचायची आणि महिन्यातून एकदा सर्व सदस्यांसमोर त्यावर मांडणी करायची असा नित्यक्रम सुरु झाला.

याचप्रमाणे विले पार्ले सखी मंडळाचा वार्षिक अहवाल थोडक्यात ह्या स्पंदन मध्ये राधा पेठे यांनी दिला आहे.

फेब्रुवारी २०१९ च्या संवाद स्पंदन मध्ये ‘सखी साऱ्याजणी कथाकथन स्पर्धा २०१८’ या शीर्षकाअंतर्गत झालेल्या कथाकथन स्पर्धेचा वृत्तांत सखी साऱ्याजणी च्या सुषमा जोगळेकर यांनी दिला आहे.

जून २०१९ च्या संवाद स्पंदनात ‘सावित्री-ज्योतिबा समता नाट्योत्सव’ कणकवली आयोजित कार्यक्रमाचे विवरण कणकवलीच्या प्रसाद घाणेकर यांनी केले आहे. याचे आयोजन वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले. नाट्यस्पर्धेसाठी कोकण हि जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या समाज सुधारकांची व्यक्तिमत्वे निवडून त्यांच्या जीवन प्रवासातील प्रबोधनाचे नाट्यांश रुपात सादरीकरण करावे ठरले. त्यानंतर कोकणातील विविध महाविद्यालयांतून स्पर्धा घेण्यासाठी केलेले विद्याताई, गीताली ताई, माधव वझे आणि प्रसाद घाणेकर यांनी केलेले प्रयत्न, त्याला मिळालेला प्रतिसाद आणि नंतर प्रत्यक्ष झालेल्या स्पर्धा यांचा सविस्तर वृत्तांत इथे वर्णन केला आहे. नाट्य सादारीकारानानंतर माधव वझे यांनी नाटकासंबंधीची दोन दिवसीय कार्यशाळा ते आयोजित करू शकतील असे आवाहन त्यांनी केले. आणि परिक्षक ज्योती सुभाष यांनी संघाचे नवखेपण जाणवत असले तरी विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत अशी भावना व्यक्त केली.

याचं स्पंदन मध्ये बारामतीच्या मिळून साऱ्याजणी च्या प्रतिनिधी सीमा नाईक-गोसावी यांनी मिळून साऱ्याजणी च्या मार्च २०१९ च्या अंकाच्या बारामती येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्याचे वर्णन केले आहे. हा प्रकाशन सोहळा तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती आणि मिळून साऱ्याजणी, पुणे यांनी आयोजित केला होता. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्याताईनी स्वातंत्र्याचा अर्थ संवादाशी जोडून न्याय,समता, बंधुता या मुल्यांचा पाया प्रेम असल्याचे सांगितले. तर वंदना बोकील-कुलकर्णी यांनी आपापसातील हेवेदाव्यांच्या पलीकडे जाऊन नाते, मैत्री व कलेच्या साहाय्याने स्वतःला घडविणे म्हणजे संवाद होय अशी व्याख्या केली. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी जे सांगायाचे आहे ते समोरच्यापर्यंत नेमकेपणाने पोहोचले तरच अर्थपूर्ण संवाद घडू शकतो असे मत व्यक्त केले.

जुलै २०१९ च्या संवाद स्पंदन मध्ये अक्षरस्पर्श आणि सखी साऱ्याजणी चा विशेष कार्यक्रम या दोन संस्थांनी मिळून आयोजित केला होता. या कार्यक्रमात भारतातील एक महत्वाचे संशोधक म्हणून ओळखले जाणारे डॉ.रा.चि. ढेरे यांच्या साहित्याच्या अभिवाचनाचे आयोजन कणकवली येथील रंगकर्मी प्रसाद घाणेकर यांनी केले. डॉ.रा.चि. ढेरे यांचे लेखन सर्वदूर पोचवण्याचे काम प्रसाद घाणेकर करतात. त्यामागील त्यांची भूमिकासादर करत हा अभिवाचनाचा कार्यक्रम पार पडला. याचे संवाद स्पंदन साठी लेखन पुण्याच्या नीना भेडसगावकर यांनी केले.

ऑगस्ट २०१९ चे संवाद स्पंदन ‘सेतू संवादाचा’ या शीर्षकाखाली विद्या कुलकर्णी यांनी लिहिले आहे. LGBTQ समूह आणि विविध पुरोगामी चळवळी यांच्यामध्ये ‘संवाद सेतू’ निर्माण करण्याची गरज काय? यामागील भूमिका सदर स्पंदनात स्पष्ट केली आहे. तसेच या संवाद सेतू अंतर्गत पहिला परिसंवादाचा कार्यक्रम मे २०१९ रोजी पुण्यात घेण्यात आला. यावेळी मनिषा गुप्ते यांनी LGBTQ समूहाला घेऊन समाजात असलेल्या विविध धरणांचा उल्लेख केला. विद्याताई बाळ यांनी त्यांची या समुहाबद्दल असलेली अनभिज्ञता कशी दूर झाली हे सांगितले. हरीश सदानी यांनी परस्परांना लिंग निरपेक्ष दृष्टीतून समजून घेण्याची गरज व्यक्त केली. बिंदू माधव खरे यांनी समलैगिकतेविषयी वैद्यकीय व कायदा क्षेत्रात झालेल्या महत्वाच्या बदलांचा आढावा यावेळी घेतला. तसेच या परिषदेत सेक्स वर्कर, स्त्रिया, भटके विमुक्त समाजाचे अनुभव,मुस्लिम महिलांचे प्रश्न, कलाविश्व आणि सामाजिक चळवळी यातील द्वैत, एच.आय.व्ही.एड्स.इत्यादी विभिन्न विषयांवर चर्चा झाली. यांचा राजकीय आर्थिक सत्ताकारणाशी असलेला संबंध यावर पण मांडणी झाली. थोडक्यात LGBTQ समूह आणि विविध पुरोगामी चळवळी यांच्यामध्ये ‘संवाद सेतू’ निर्माणाच्या उद्देशाकडे बहुआयामी दृष्टीकोनातून चर्चिले गेले. याचा सविस्तर वृत्तांत या स्पंदन मध्ये दिला गेला आहे.

सप्टेंबर २०१९ च्या संवाद स्पंदन मध्ये ‘भोपाळ सखी मंडळ: वार्षिक अहवाल’ भोपाळच्या मंदा गंधे यांनी सादर केला.

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ चे संवाद स्पंदन म्हणजे मिळून साऱ्याजणीचा वर्धापनदिन म्हणजे ‘अविस्मरणीय तिसावा वाढदिवस’ असे म्हणत सरिता आवाड यांनी बोलता केला आहे. सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री नंदिता दास आणि दिग्दर्शनाच्या वेगळ्या वाटा चोखाळणारे सुनील सुकथनकर आणि एलजीबीटी समुदायाच्या प्रवक्त्या सोनाली दळवी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यांच्या हस्ते मिळून साऱ्याजणीच्या २०१९ च्या अंकाचे प्रकाशन झाले. तसेच १९८९ पासून आजपर्यंतची मिळून साऱ्याजणीची वाटचाल, पारंपारिक स्त्रियांची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासिकांपासून फारकत करणारे मासिक ते जागतिकीकरण, बाबरी मशीद विध्वंस पासून ते ‘ती’, ‘तो’ आणि या पलीकडचे सर्व ‘ते’ असे सर्व विषय मिळून साऱ्याजणीच्या परिघात समाविष्ट झाले. मिळून साऱ्याजणी च्या महाराष्ट्राच्या प्रतिनिधी असलेल्या सरिता आवाड यांच्या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित ‘हमरस्ता नाकारताना’ या आत्मचरित्राचे औपचारिक प्रकाशन यावेळी झाले. तसेच अनुभव, बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलता असा तिहेरी गोफ असलेली नंदिता दास यांची मुलाखत ह्या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले.

डिसेंबर २०१९ चे संवाद स्पंदन हे वंदना बोकील-कुलकर्णी यांनी घेतलेल्या ‘सखी साऱ्याजणीची अभिवाचन कार्यशाळे’चा अनुभव कथन करणारे होते. हे अनुभव कथन रेखा डांगे यांनी शब्दांकित केले आहे. त्याचप्रमाणे ‘हमरस्ता नाकारताना’ या आत्मकथनपर पुस्तकाचा राजहंस प्रकाशनाने आयोजित केलेला प्रकाशन सोहळा हा देखील ह्या स्पंदनाचा भाग ठरले.हे पुस्तक आपलेल्से वाटते असे मत विद्याताईनी व्यक्त केले. स्त्रियांच्या लिखाणाच्या मर्यादेच्या पलीकडे जात या पुस्तकाचे लिखाण झाल्याचे मत अंजली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. विनया खडपेकर यांनी १९७५ नंतर प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रांपैकी पहिल्या पाचमध्ये या पुस्तकाची गणना केली.सदा डुंबरे यांनी पुस्तकाची लेखन शैली भावल्याचे सांगितले. आणि पुस्तक वाचून त्यांना पडलेले प्रश्नही उपस्थित केले. विनय हर्डीकर ‘सहृदयविश्लेषक’ म्हणून लेखिकेला संबोधतात. ह्या सर्व प्रकाशन सोहळ्याचे शब्दांकन सुनीता भागवत यांनी केले आहे.

Featured image: via Internet (Art by Siddhesh Gautam)

नीलिमा गावडे
gavadenilima@gmail.com