मिळून साऱ्याजणी मधील सदरांचे परीक्षण: भाग ४

०४ जुलै २०२२

विद्या बाळ अध्यासन प्रकल्पाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या अक्षरवाटा ह्या शिर्षकाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या प्रवासाचा आढावा विवीध लेखांच्या आधारे ह्यात घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या विषयांवर साऱ्याजणी ने सदरांच्या मार्फत चर्चा घडवून आणली अश्या वैविध्य असणाऱ्या सदरांचे आणि त्यामध्ये हाताळल्या गेलेल्या विषयांचे वंदना पालसणे ह्यांनी परिक्षण केले आहे तर सदरांची माहिती देणारा आणि साऱ्याजणी कोणत्या विषय हातळते हे सांगणारा अजुन एक लेख साऱ्याजणी तुमच्या समोर चार भागात आणत आहे.

लेखाच्या चौथ्या भागात इतिहासात ज्यांना दडपले गेले, ज्यांच्याबद्दल कोठेही वाच्यता केली गेली नाही अश्या सत्य घटणांवर चर्चा केली आहे. तसेच राजीव तांबे ह्यांच्या कथांचे एक सदर आपल्याला बघायला मिळते. कवितेवर भाष्य करणारे देखील एक सदर आहे. आणि स्त्री मनाबद्दल सांगणारे सदर मिळून साऱ्याजणीने आपल्या समोर आणले आहे. अश्या वेगवेगळ्या सदरांची माहिती देणाऱ्या वंदना पलसाने ह्यांच्या लेखाचा हा शेवटचा भाग आम्ही वाचकांसमोर आणत आहोत.

**

इतिहासातील दडपलेली पाने

त्याला फक्त २५ वर्षाचं आयुष्य मिळालं. तो आदिवासी समाजात जन्मला, मुंडा समाजात. त्याचा शाळेत अपमान झाला. त्याने तिथे प्रतिकार केला. त्याला शाळेतून काढून टाकलं. तो आनित्याचा समाज जंगलात राहायचा. तिथेच त्याचा समाज शेती करून आणि जंगलातल्या साधन सामुग्रीवर गुजराण करून राहायचा. इंग्रजांनी नवीन कायदा आणला आणि त्यांच्या जमिनी बळकावल्या. नवीन कायदे लादले. एवढच नाही तर त्यांच्या जमिनी बळकावून नवीन जमीनदारी पद्धत त्यांच्यावर लादली. त्याला अटक झाली, त्याचा रहस्यमय मृत्यू झाला.

त्याने अपमान सहन केला नाही. तो डगमगला नाही. त्याने जंगलातली वनऔषधी शिकून घेतली. त्याने धर्मांचा अभ्यास केला. ईश्वर एक आहे, भूत प्रेत मानू नका, दारू पिऊ नका, खोटे बोलू नका ह्या गोष्टी त्याने आपल्या समाजाला समजवायला सुरवात केली. त्याचा स्वतःचा असा एक धर्म आणि विचार त्याने निर्माण केला. रोगराई देवीचा प्रकोप नसून औषधे घेतली तर माणूस त्यातून बरा होऊ शकतो हे त्याने पटवून दिले. त्याने अनेक गीते लिहिली. अन्यायकारी इंग्रज सत्तेविरुद्ध त्याने लढा उभारला, अनेक क्रांतिकारी गीते लिहिली. त्याने ब्रिटीश सत्तेविरुद्ध "उलगुलान" म्हणजे विद्रोह पुकारला. त्याने इंग्रजांशी लढाई केली, त्यात विजयी झाला.

अश्या ह्या दोन्ही काहण्या एकाच माणसाच्या आहेत हे पटत नाही. हि कहाणी आहे बिरसा मुंडाची. ऑगस्ट २०१९ च्या 'इतिहासातली दडपलेली पाने' ह्या सदरात निशा शिवूरकर यांनी 'बिरसा मुंडा यांचे उलगुलान' ह्या लेखात बिरासाची कहाणी मांडलेली आहे. ह्या बिरासांच्या स्मरणार्थ 'बिरसा दिन' साजरा केला जातो. २५ वर्षाच्या आयुष्यात १२५ वर्षाचा इतिहास घडवणाऱ्या माणसाबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख वाचलाच पाहिजे.

“अपना कहीं ठिकाना नही जमानेमे, ना आशियानेके बाहर ना आशियानेमे”

एका ग्रामीण मुस्लीम स्त्रीच्या ह्या ओळी खूप काही सांगून जातात. ‘इतिहासातील दडपलेली पाने’ ह्या सदरात लिहिताना " मुस्लीम लेखिकांचा आवाज" ह्या लेखात रझिया पटेल (अनुवाद शर्मिष्ठा खेर) अश्या अनेक ज्ञात, अज्ञात मुस्लीम लेखीकांबद्दल लिहितात. त्यांच्या समाजातल्या, साहित्यातल्या योगदानाबद्दल सांगतात.

मुस्लीम स्त्रीने बुरख्यात राहावं अशी समाजाची रीत असताना, त्याचं मुस्लीम स्त्रीला मात्र काय वाटत आहे हे मुस्लीम लेखिकांनी वेळोवेळी मांडल असल्याचं त्या उधृत करतात. हे सांगताना त्या प्रामुख्याने उदाहरण देतात ते इस्मत चुगताई यांचं. १९४० च्या सुमारास चुगताई यांनी त्यांच्या लिखाणातून बंडखोर स्त्रिया रंगवल्या आहेत. समलैंगिक संबध यासारखे विषय त्यांनी त्या काळात हाताळले आहेत.

कार्तुल ए हैदर, चंपा अहमद, ह्यांनी भारताची फाळणी, मुस्लीम लीग, हिंदू महासभा अश्या अनेक गोष्टींवर निर्भीड भाष्य केलं आहे. नसीरा शर्मा ह्या भोपाळ वायुगळती बद्दल लिहितात. आपल्याला ह्या लेखिका माहीतही नसाव्यात!

भारतामध्ये "लिपस्टिक अंडर माय बुरखा" हा सिनेमा निव्वळ बुरखा ह्या शब्दामुळे प्रदर्शित होऊ नये अश्या परिस्थितीत मुस्लिमधर्मीय लेखिका पण असतात हीच गोष्ट मुळी आपल्या ध्यानी नसावी. आपल्या ह्या समजुतीला हा लेख सुरुंग लावतो. मुस्लीम लेखिकांच्या आपल्या समाजातल्या योगदानाबद्दल समजून घेण्यासाठी हा लेख आपल्याला वाचायला हवा.

साहित्यालाही इतिहास असतो. भारतातील साहित्याचा इतिहास पार अतिप्राचीन काळात, त्यानंतर वेदांपर्यंत नेता येईल, कालिदास सांगता येईल, संत साहित्य, स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्रोत्तर, आधुनिक असा प्रवास ढोबळ मानाने सांगता येईल. पण मराठीतली पहिली कादंबरीकार कोण? असं विचारलं तर मोठा प्रश्न पडल्यासारखा विचार करत बसावं लागेल. ‘इतिहासात दडपलेली पानं’ ह्या सदरातल्या "प्रथम मराठी स्त्री कादंबरीकार साळूबाई तांबवेकर" ह्या लेखात लतिका जाधव आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर देतात.

तांबवेकर ह्यांची पहिली कादंबरी १७७३ मध्ये प्रकाशित झाली आणि दुसरी तब्बल २१ वर्षांनी ‘हिंदुस्तानातील तारा’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ह्या पहिल्या मराठी महिला कादंबरीकाराची ओळख करून देताना लतिका जाधव ह्यांनी कादंबरी मधील बारकावे, तांबवेकर ह्यांच्या लिखाणावर प्रभाव असलेल्या गोष्टी ह्या बाबींवर देखील प्रकाश टाकला आहे. तांबवेकर ह्या पुण्यातल्या कसबा पेठेतल्या. त्यामुळे लेखात अनुषंगाने त्या काळातील पुण्याबद्दलही संदर्भ येतात. छोटासा असला तरी रोचक असा हा लेख वाचायला हवा.

१८८३ साली भारतात, मुंबईत एक खटला दाखल होतो. एक मुलगी ," माझा विवाह हा बाल विवाह आहे त्यामुळे तो मला नामंजूर आहे." असं म्हणत आपल्या पतीविरुद्ध खटला दाखल करते. ह्या विवाहापासून फारकत घेतल्यास तुरुंगात जावे लागेल हे कळूनही, तुरुंगात जायचा पर्याय ती स्वीकारते. पुढे त्या विवाहातून नाट्यमयरीत्या तिची सुटका होते काय आणि ती इंग्लंडला जाऊन डॉक्टर होते काय. आजच्या काळात सुद्धा हे सगळं अवधड वाटणाऱ्या ह्या प्रकरणाने त्या काळात समाजमनावर किती पडसाद उमटले असतील!!

अश्या ह्या मुलीची आणि तिच्या मागे खंबीरपणे उभ्या रहाणाऱ्या तिची आईची कथा मांडली आहे अलका पावनगडकर ह्यांनी त्यांच्या ' रखमा आणि तिची आई' ह्या लेखात. रखमा ही वैद्यकीय सेवा देणारी किंवा वैद्यकीय व्यवसाय करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर. तिच्या आईचं नाव जयंतीबाई. जयंतीबाईचा जन्म १८४८ सालचा. तिच्या वडिलांचे नाव हरिश्चंद्र यादवजी. हे शिकलेले. त्यांच्यावर सुधारित संस्कृतीचा पगडा होता. त्यांनी लेकीला शिकवले. एवढेच नाही तर जेव्हा तिचा पहिला नवरा वारला आणि तिच्या पदरात तीन वर्षांची लहान मुलगी होती, तेंव्हा त्यांनी तिच्या पुनर्विवाहाचा विचार केला आणि नुसता विचार करून ते थांबले नाहीत तर, त्यांनी आपल्या विधवा लेकीचा पुनर्विवाह केला. त्या काळातलं हे आश्चर्य इथेच थांबत नाही तर ह्या जयंतीबाईने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला पत्र लिहून पुनर्विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तर अश्या ह्या 'माझा बालविवाह मला मान्य नाही' असं म्हणणाऱ्या रखमाची आणि 'मला पुनर्विवाह करायचा आहे' अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या जयंतीबाईची दडपलेली गोष्ट लेखिकेने ह्या लेखात उलगडून सांगितली आहे. ही गोष्ट सांगताना त्या काळातली मुंबई, मुंबईचं एकंदरच समाजातलं स्थान आणि महत्व. अश्या अनेक गोष्टी अलकाताई आपल्याला सांगून जातात. मूळ विषयाचा धागा न सोडता अनेक विषयांना हात घातल्याने हा लेख अतिशय वाचनीय आणि रोचक झाला आहे ह्यात शंकाच नाही.

"जे लागेल त्याचा उपभोग घ्यायचा पण मालकी भूमातेचीच!" अश्या तत्त्वज्ञानावर उभा असलेला मातृसत्ताक समाज, अश्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारी 'यमी' आणि तिचा मातृसत्ताक समाजाच्या रक्षणासाठी चाललेला लढा. ह्या सगळ्याची थोडक्यात पण मुद्देसूद मांडणी करणारा 'मातृसत्ताक पद्धतीसाठी लढणारी यामी' हा लेख प्रतिमा इंगोले यांनी 'इतिहासात दडपलेली पाने' ह्या सदरात लिहिला आहे.

स्वामित्व, हक्क, मालकी हे शब्द समाजात यायच्या आधी आपला समाज कसा होता ह्याचं रोचक वर्णन करत, लेखिकेने आर्य आल्यावर परिस्थिती कशी बदलत गेली हे उलगडून सांगितले आहे. ही परिस्थिती बदलू नये, समाज आर्यांच्या पुरुषप्रधान व्यवस्थेला बळी पडू नये म्हणून यमी सतत झगडत राहिली. 'स्त्रियांच्या मातृत्वावर पुरुषांचा हक्क कशासाठी?' असा प्रश्न विचारणारी यमी तिला स्वतःला मूल हवं असताना ' इतर कुणी पुरुषाकडे गेल्यास तो लग्नाची अट घालेल या भीतीने ती या मागणीसाठी स्वतःच्या भावाकडे 'यमाकडे' येते पण पितृसत्ताक व्यवस्थेला बळी पडलेला यम तिची ही मागणी पूर्ण करत नाही. तेंव्हाच्या प्राकृत समाजात हव्या त्या पुरुषाकडून मातृत्व मिळविण्याच्या मुक्त लैंगिक काळातला तरीही पितृसत्ताक व्यवस्थेच्या अतिक्रमणाचा हा काळ होता. समाज, त्यातल्या रूढी, परंपरा आणि एकंदरच समाजाची संस्कृती वारंवार कशी बदलत असते आणि मग त्यासाठी कसा संघर्ष होतो हे दाखवताना लेखिका आपल्याला ही यमीची गोष्ट सांगतात.

डेस्टिनेशन गोष्ट

मिळून साऱ्याजणीचे हे एक अफलातून सदर. राजीव तांबे लेखक. प्रवास करताना वाटेत भेटलेली माणसे आणि त्यांच्या गोष्टी. तांबे म्हणतात, मी सर्व प्रकारच्या वाहनांमधून प्रवास केला, हर दिशांना केला. एकट्याने प्रवास केला पण एकट्याने तो कधीच संपला नाही. सोबत राहिले विविध प्रकारचे लोक आणि त्यांच्या गोष्टी. म्हणून सदरचे नाव डेस्टिनेशन गोष्टी.

‘आम्ही चौघं’ या गोष्टीत रेल्वेच्या प्रवासात तांब्यांना भेटले एक आधुनिक आजोबा. मुलगा आणि त्याचे कुटुंब अमेरिकेत स्थायिक. नक्षत्रासारखी सून, नातवंडे हुशार, इत्यादी. पण... आणि सुरु होते आजोबांची कुणालाही कधीही न सांगता आलेली गोष्ट. प्रवासात प्रवासी भेटतात, पुन्हा कधी न भेटण्यासाठी. म्हणुनच की काय मनातलं, अगदी आतलं कुणाशीही बोलता न आलेलं ओठांवर येतं. किती सुंदर पैलू आहे हा प्रवासाचा! प्रवास आपल्याला समृद्ध करून जातो तो या आणि अशा अनेक अनुभवांमुळेच.

मुलाच्या संशयी स्वभावामुळे सून वेगळी राहू लागते. आजोबा सुनेच्या बाजूने पण मुलालाही सांभाळत राहतात. नातवंडे समजून असतात आईचे दु:ख, पण बाबाला घाबरतात. आजोबांच्या मदतीने नातवंडे आई आणि तिचा मित्र यांच्या सोबत थोडा वेळ घालवतात, पण मुलाला कळू न देता. भारतातही चौघे येतात आजोबांच्याच मदतीने. सगळाच चोरीचा मामला. आजोबांचा प्रश्न: मी मुलाला न सांगता हे करतोय, चुकतंय का माझं? मुलगा चुकलाय हे त्यांना स्पष्टपणे माहित आहे, म्हणूनच ते नातवंडे, त्यांची आई आणि तिचा मित्र यांना एकत्र येऊ देण्यासाठी मदत करत आहेत. पण ‘आम्ही चौघे’ जे करत आहोत तीही फसवणूकच ना? तांबे लेखाच्या शेवटी हा प्रश्न वाचकांना विचारतात आणि “कल्चरल जळमटांचे गुच्छ” उत्तर म्हणून पाठवू नका असेही आवाहन करतात. प्रवासातून येते गोष्ट, आणि गोष्टीतून येतो एक अतिशय महत्वाचा प्रश्न. आपण वाचक म्हणून याला उत्तर देणं अपेक्षित आहे.

माझ्यापुरतं मी या खोल आणि गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर ही गुंतागुंत उकलुन देईन. सून वेगळी तर झालीच आहे, मुलगा चुकलाय हे पण स्पष्ट आहे. मग मुलांना आई कडे जाण्यासाठी लपवाछपवी करण्याची गरज नाही, असं मला वाटतं. आजोबांनी मुलाला घाबरण्याची गरज नाही. त्याचा राग, संशय, कांगावा याला घाबरून राहिल्यामुळे तर मुलाचाही प्रश्न सुटत नाही. मुलाला समजावून डॉक्टरांचा, समुपदेशकांचा सल्ला घ्यायला लावणे हे याचे महत्वाचे उत्तर आहे. मुलानेही आयुष्यात कुढत बसण्यापेक्षा पुढे जावे, यासाठी आजोबांनी प्रयत्न केला तर हा प्रश्न सुटेल अशी आशा वाटते.

अशीच एक गोष्ट ‘ब्लॅक इज ब्युटीफुल’ आणि तिच्यातून आलेला एक प्रश्न. तांबे आपल्या पत्नी सोबत प्रवास करत आहेत, आणि त्यांना प्रवासात एक माय लेकींची जोडी भेटते. नुकत्याच आलेल्या एका अनुभवाने बाई अस्वस्थ आहेत. मुलगी प्रश्न विचारते, तुम्ही देव मानता का? हा प्रश्न विचारण्याचे कारण त्यांच्या गोष्टीत दडलेले असते. आईच्या मैत्रिणीने तिला काळी साडी काळाच कशिदा असलेली भेट म्हणून दिलेली आहे, आणि ती सुद्धा सोमवती अमावस्येला. आई प्रचंड अस्वस्थ आणि घाबरलेली. आपल्या सुखात बिब्बा घालायला मैत्रिणीने हा प्रकार केला अशी तिची समजूत झालीय. मुलगी देव मानते पण हे असलं शुभ अशुभ मानत नाही. त्यांच्या समस्येचं उत्तर आईने मैत्रिणीला ‘साडी बदलून देशील का?’ विचारल्या सरशी मिळतं. मैत्रीण आनंदाने तयार होते. तेव्हा तो बिब्बा घालायचा वगैरे प्रकार नव्हता याची आईला खात्री पडते, आणि त्यांचा प्रश्न सुटतो.

तांबे आपल्याला विचारतात की खरच प्रश्न इतका सोपा होता का की तो इतक्या पटकन सुटेल. देवावर विश्वास असणं आणि मांजर आडवं जाणं, शिंक येणं, चुकून उपवास मोडणं, काळ कापड घेणं-देणं इत्यादी अशुभ मानण, याचा काय संबंध आहे? एका चिनी म्हणीने लेखक स्वत:च या प्रश्नाचं उत्तर देतात “जो शुभ-अशुभाच्या पलीकडे जातो, त्याला स्वत:तच देव दिसतो”.

‘पूल अंडर कंस्ट्रक्शन’ या लेखात राजीव तांबे आपल्या शाळेतल्या मैत्रिणीची अचानक झालेली भेट आणि तिच्या आयुष्यातला प्रश्न आपल्यासमोर ठेवतात. अतिशय उत्साही, मोकळ्या वातावरणात वाढलेली ही मैत्रीण लग्नानंतर जणू बदलूनच गेली आहे. नवरा आणि मुलगा दोघेही तिला अनुल्लेखाने मारत आहेत. ती विझते आहे. आपल्या मुलाने आपल्या सारखेच उत्साही राहून खूप काही करावे, ट्रेकिंग, शिबिरे, प्रवास, खेळ. पण मुलगा कशातच रस घेत नाही. त्याच्या वडिलांसारखाच आईला कमी लेखतो. लेखकाशी बोलताना मैत्रीण म्हणते, हताश वाटतं मला अनेकदा. पण मी त्यासाठी मार्ग शोधलाय. दोघांच्या तुच्छतेला मी उत्तर देतेय प्रेमाचा पूल बांधून. अधिक क्षमाशील बनून. म्हणजे कधी कुणाला यावसं वाटलं तर रस्ता असेल. ती अगतिक होऊन लेखकाला विचारते आहे ‘जोडला जाईल का हा पूल? होईल का मुलाला कधी साक्षात्कार?’ लेखक हा प्रश्न आपल्याला, म्हणजे वाचकांना विचारून म्हणत आहेत ‘मला मदत कराल? काय उत्तर देऊ मी तिला?’

कवितेचे कवडसे

कवितांविषयी, तिच्या विविध घटकांविषयी आणि कवितांचा आपल्या मनावर होणाऱ्या परिणामांविषयी भाष्य करणारे सदर ‘कवितेचे कवडसे’. लेखिका निलिमा गुंडी.

कविता हा आशयघन लेखन प्रकार आहे. कवितेचा विषय हाच कवितेचा आशय असेल असे नाही. अनेकदा, कवी जरी एक विषय पकडून लिहित असला तरीही खूप वेगळ्या आशयाला स्पर्श करत असतो. लेखिका वसंत बापटांच्या ‘बाभूळझाड’ या कवितेचे उदाहरण देऊन म्हणते की कवितेचा विषय जरी बाभूळझाड असले तरी जेव्हा कवी म्हणतो ‘वारा खात, गारा खात, बाभूळझाड उभेच आहे’ तेव्हा तो कवितेचा पट व्यापक करत, जीवनाच्या चिवट संघर्षशील वृत्तीबद्दल बोलत आहे, चिंतन मांडत आहे, हे लक्षात येते. कवीने आपल्या संवेदन सामर्थ्याने विषयाला दिलेला प्रभावी अर्थ म्हणजे आशय अशी आशयाची व्याख्या लेखिका करते.

‘मिळून साऱ्याजणी’ने एप्रिल २०१५ च्या अंकासाठी निवडलेल्या कवितांवर लेखिका या लेखात भाष्य करीत आहेत. आश्लेषा महाजन यांची ‘संस्कृतीच्या गोपुरामध्ये’ ही कविता, निलिमा पालवणकर यांची ‘पुस्तकं’, तसेच रोहिणी हारे यांची ‘मना सज्जना’ ही कविता असो, या कवितांचे विषय जरी अनुक्रमे पौगंडावास्थेतील मुलगा, पुस्तके, किंवा मालिकांमधील स्त्रीप्रतिमा असले तरी या कविता विषयांच्या सीमा ओलांडून व्यापक सामाजिक भाष्य करतात. मोठा होत जाणारा मुलगा जसा बदलत जातो, पुरुष बनत जातो, तेव्हा वाटलेली खंत आणि या प्रक्रियेतली अटळता व्यक्त करताना कवियत्री जनमानसातील संस्कृतीचे स्थान आणि त्यातील चाकोरीबद्धता या व्यापक संदर्भांबद्दल बोलून जाते. तर पुस्तक वाचन हा विषय ओलांडून दुसरी कविता वाचनातून मिळणारी नवी दृष्टि, अंतर्मनाकडे नेणारी वाट, मानवी मनोव्यापाराचे सूक्ष्म भान अश्या अनेक अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींबद्दल भाष्य करते आणि प्रत्यक्ष वाचण्याच्या क्रियेपासून सुरु झालेला प्रवास व्यापक होत जातो. तिसरी कविता मालिकांमधल्या स्त्रीप्रतिमा मुद्दाम तकलादू, निर्बुद्ध ठेवण्याच्या माध्यमांच्या प्रयत्नाकडे उपरोधाने पाहते. मालिकांच्या संमोहनातून स्त्रियांनी बाहेर पडण्याची गरज व्यक्त करते. लेखिकेच्या मते, साध्या साध्या दिसणाऱ्या विषयांमधून व्यापक वास्तवाविषयी भान निर्माण करण्याचे काम करणाऱ्या या कविता खूपच उल्लेखनीय आहेत.

जून २०१५ च्या अंकासाठी निवडलेल्या कवितांबद्दल टिप्पणी करताना निलिमा गुंडी म्हणतात की या छोट्याशा लेखात काव्यप्रकारांचे सविस्तर विवरण करणे हा हेतू नाही, पण वाचकांना कवितांच्या आराखड्यांमधील विविधता लक्षात आणून देणे, एवढेच उद्दिष्ट आहे. वाचकांना हा लेख वाचून अधिक माहिती घ्यायची उत्सुकता वाटावी एवढीच अपेक्षा ठेवून लेखिका विविध काव्यप्रकार आणि त्यांच्या वर्गीकरणाचे निकष आपल्यासमोर मांडतात. काव्य या साहित्यप्रकाराचे वर्गीकरण करताना त्याचे अनेक निकष असू शकतात, जसे, ओळींची संख्या, संरचनातत्व, आशय, घाट, इत्यादी. प्रस्तुत अंकासाठी निवडलेल्या कविता स्फुट कविता आहेत, असे सांगून लेखिका म्हणते की या कविता काव्याच्या निर्मितीप्रक्रियेवर भाष्य करतात, काव्यनिर्मितीच्या अनुभवातील आवेग नेमकेपणाने दाखवतात.

जुलै २०१५ च्या अंकासाठी निलीमाताई यांनी कवितेतील ‘लय’ हा विषय घेतला आहे. त्यांच्या मते, लय हे कवितेचे प्राणतत्व आहे. त्याचे विविध विभ्रम आपण कविता वाचताना अनुभवतो. लयीचे विविध ढंग, आवेग, प्रवाहीपणा यावर कविता कसा प्रभाव पाडेल हे ठरते. प्रस्तुत अंकात निवडलेल्या सर्व कविता मुक्तशैलीतल्या आहेत आणि स्त्रियांच्या जीवनातील विविध अनुभवांशी निगडीत आहेत. उदा. टाकलेल्या स्त्रीचा भावोद्रेक, ‘कामावर न जाणाऱ्या’ स्त्रीच्या कामाचे मोल, रजोनिवृत्तीनंतरचे स्त्रीचे नव्या सर्जनशील वाटा शोधत जगणे आणि चिवट जीवनेच्छा प्रकट करणारी प्रतिकूल परिस्थितीत बागेची निगराणी करणारी आज्जी, जणू चिरंतन मातृत्वाची प्रतीक.

गतकाळाची गाज

निलिमा गुंडी यांचेच अजून एक सदर ‘गतकाळाची गाज’. बदलत्या काळाला स्त्रीवादी नजरेने समजून घेण्यासाठी आत्मकथन एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या सदरात स्त्रियांनी लिहिलेली मराठी आत्मकथनं विचारात घेतली गेली आहेत. १९१० मध्ये रमाबाई रानडे यांनी लिहिलेल्या आत्मकथनापासून आता पर्यंत लिहिलेल्या एकूण मराठी आत्मकथनाची संख्या साधारण २५० तरी आहे. मराठी स्त्रिया अधिक जागरूक असल्याचं हे निदर्शक आहे. सुरुवातीला केवळ उच्च जात-वर्गातील स्त्रियांपर्यंत मर्यादित लिखाण आता सर्व स्तरांमध्ये झिरपले आहे. १९८० नंतर दलित, वंचित गटांच्या स्त्रिया मोठ्या प्रमाणावर लिहित्या झाल्या. गुंडी यांनी स्त्रियांच्या अनुभवांनी भरपूर या त्यांच्या कहाण्यांचे सखोल वाचन केले आहे. विविध कथनांमधून वैविध्यपूर्ण विषय मांडले गेले आहेत. असंख्य अनुभवांमधून जीवनाच्या अनेक छटा दिसतात. लेखिकेला वाटते की एवढे समृद्ध साहित्य आपल्यासमोर खुले झाल्यावर त्यातून व्यक्त होणाऱ्या व्यापक स्त्रीजाणीवेचा पट शोधणे आवश्यक आहे.

समाज बदलतो म्हणजे काय, हा बदल व्यक्ती, कुटुंब, समाजापर्यंत कस पोचतो? माजघरापर्यंत तो कधी आणि कसा पोचतो? आत्मकथनांमधून या बदलांचे सूचन मिळत जाते. लेखिकेच्या शब्दांत ‘बदलत्या काळाचा पायरव ऐकू येतो’. ऑगस्ट २०१२ अंकातील सदरात त्यांनी आत्मकथनामधून व्यक्त होणारे ‘पारंपरिक ते आधुनिक’ अनुभव घेऊन त्यांचे विश्लेषण केले आहे. काही स्त्रियांनी ज्या जिद्दीने सामाजिक परिवर्तनाची वाट चोखाळली त्याला सलाम करून लेखिका म्हणते की या स्त्रियांनी संघर्ष करून वाट मळून ठेवली ज्यावरून आपण आज चालत आहोत. आपल्या ‘माझी कहाणी’ या पुस्तकात पार्वतीबाई आठवले यांनी विधावांवर होणाऱ्या अन्याय्य रुढींचा प्रतिकार केला, स्वत:च्या कृतींनी. यशोदाबाई जोशी यांनी ‘आमचा जीवनप्रवास’ मध्ये मुलींना शिक्षण दिले, पतींनी परदेश प्रवासानंतर प्रायश्चित्त घेतले नाही म्हणून त्यांचा पदोपदी सार्वजनिक पाणउतारा होत असे. सवर्णांसाठी जर परिवर्तनाची वाट इतकी अवघड होती, तर दलितांसाठी परिस्थिती कशी असेल याची कल्पना आपण करू शकतो. शांताबाई कांबळे यांच्या ‘माझ्या जल्माची चित्तरकथा’ यामध्ये त्यांच्या शिक्षण घेण्यासाठीच्या संघर्षाचे चित्रण केले आहे. उषाताई डांगे यांनी ‘पण ऐकत कोण’ मध्ये नर्सिंग शिकताना मोठे पाप करत असल्यासारखी भावना झाली असल्याचे नमूद केले आहे. वंचितांसाठी भरीव समाजकार्य करणाऱ्यांसाठी सुद्धा मार्ग सोपा नव्हता. गोदावरी परुळेकर यांनी ‘माणूस जेव्हा जागा होतो’ मध्ये मांडले आहे की विचार बदलण्यापेक्षा आचार बदलणे अधिक कठीण आहे. हे त्या स्वत: कोंड्याची ब्भाकारी खाताना आलेल्या स्वानुभवावरून लिहितात. त्यांचा आंतरिक संघर्ष शब्दाशब्दातून पोचतो. तसेच अनुताई वाघ यांनी ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ मध्ये समाजकार्याच्या काटेरी वाटेचे वर्णन केले आहे. नसीमा हुरजूक यांचे ‘चाकाची खुर्ची’ हे आत्मकथन स्वत:च्या अपंगत्वावर मात करून अपंगांचे पुनर्वसन करण्याचे कार्य करताना आलेल्या खडतर अनुभवांची साक्ष आहे. या आणि अशा अनेक आत्मकथनांची दाखल या सदरात लेखिका निलिमा गुंडी घेतात तेव्हा त्यांचा वाचनाचा आणि वाचलेल्या मजकुराचे विश्लेषण करण्याचा आवाका पाहून आपण विस्मयचकित झाल्याशिवाय रहात नाही.

सप्टेंबर २०१५ च्या अंकात ‘आत्मभाना’ भोवती उलगडणारे स्त्रियांचे आत्मकथन विचारात घेतले आहे. लीलावती भागवत यांच्या ‘वाट वळणावळणाची’ मध्ये त्यांनी त्यांच्या आजीच्या स्वत्वासाठीचा संघर्ष मांडला आहे. पतीने दुसरी बाई ठेवली तर यांनी विचारले की मीही मग बघू का कुणी माझ्यासाठी? तर त्याची शिक्षा त्यांना एका घरात राहून ३५ वर्षे अबोला धरून दिली गेली. ‘स्मृतिचित्रे’ मध्येही लक्ष्मीबाई टिळकांनी १०० वर्षांपूर्वीच्या स्त्रियांचे जीवन स्पष्टपणे मांडले आहे. ‘टिळकांच्या अस्थी पेटीत जाताच माझे अस्तित्व जाणवू लागले’ हे म्हणताना आपल्यातील सुप्त अस्मिता त्या व्यक्त करीत आहेत. हा काळ आधुनिकतेच्या आरंभाचा काळ आहे. बऱ्याच आत्मकथनांमधून पुरुषांनी आपल्या पत्नींना आत्मभान जगवण्यासाठी मदत केली असे दिसते. सुमा करंदीकर, लीलाबाई पटवर्धन अश्या नव्याने आत्मभान जागृत झालेल्या स्त्रियांच्या आत्मकथा त्या त्या काळाबद्दल अतिशय रोचक अशी माहिती देतात. अनेक स्त्रियांनी अर्थार्जन करून परावलंबी जीवन नाकारले. सामाजिक, राजकीय कामांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. शांताबाई कांबळे, पार्वतीबाई भोर, रझिया पटेल यांनी आपली आत्मभानाची जाणीव केवळ स्वत:पुरती नाही तर समाजात भरीव योगदान देण्यासाठी वापरली.

ऑक्टोबर २०१२ च्या अंकामध्ये स्त्री आत्मकथनांची ‘भाषा’ हा विषय निलीमाताई निवडतात. गेल्या दीड शतकात स्त्रीची भाषा कशी बदलत गेली यावर या लेखात भाष्य आहे. समाजाच्या सांस्कृतिक दस्तऐवजीकरणासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे कारण भाषा हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. लेखनातील प्रतिमा, प्रतीके, शैली या त्या त्या काळातील संस्कृतीने प्रभावित असतात. उदा. आनंदीबाई कर्वे यांनी आपल्या कथनाचे ‘माझे पुराण’ हे शीर्षक योजतानाच आपल्या मोकळ्या शैलीचा परिचय दिला आहे. म्हणी आणि वाक्प्रचारांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत सहज शैलीत गोष्ट सांगत आपली कथा सांगितली आहे. भाषांचे प्रादेशिक पदरही स्त्रियांच्या आत्मकथांमधून व्यक्त होतात. काशीबाई कानिटकर लिहितात, “ बायकांनी शुद्ध बोललेले पण लोकांना आवडायचे नाही. मुंबई ला मुमई म्हणायचे”. पुरुष आणि स्त्रीमधील सामाजिक भेदभाव या प्रकारे भाषिक स्तरांमुळे उघडा पडतो. स्त्रिया शारीर अनुभव व्यक्त करताना सहसा कावळा शिवणे, ऋतुप्राप्ती होणे यासारखी रूपके वापरतात. कधी विनोद वापरून, कधी तिखट लिहून, कधी सांकेतिक लिखाण करून तर कधी एखाद्या विषयावर मौन बाळगून स्त्रिया व्यक्त झालेल्या दिसतात. निलिमा गुंडी लिहितात, ‘स्त्रीवादी वाचनपद्धतीने वाचताना ही भाषा उसवून पहावी लागते, तेव्हा त्यात दडलेला कोंडमारा दिसतो.’

तन-मन तिचं

राज्यश्री क्षीरसागर याचं हे सदर स्त्री चळवळीतून पुढे आलेल्या अनेक विषयांवर भाष्य करतं. खास करून, स्त्रीच्या तना-मनाच्या नात्याबद्दल. आपल्या देहावर आपलाच अधिकार ही भूमिका घेऊन स्त्रिया लढल्या. सप्टेंबर २०११ च्या अंकामधील ‘अधिकार आरोग्यदायी सृजनाचा...’ या लेखात लेखिका म्हणतात निसर्गाने सृजनाची जबाबदारी स्र्त्री वर सोपवली आणि स्त्रीने आपल्या तना-मनाचा विचार न करता ती पेलली. आता त्याच तना-मनाच आरोग्य धोक्यात आल्यावर त्याचा विचार करणं स्वाभाविक होतं. यातून पुनरुत्पादानाचे अधिकार मिळण्यासाठीचा लढा सुरु झाला. हे अधिकार स्त्री व पुरुष दोघांना असायला हवेत, आहेत. पण स्त्रिया आपल्या कुटुंब-समाज व्यवस्थेत यातून वंचित राहतात. म्हणून नैराश्याच्या बळी पण स्त्रियाच अधिक पडतात. गर्भारपणात आणि बाळंतपणानंतर येणारे नैराश्य वाढते आहे. विवाहितांच्या आत्महत्या पण या निराशेतून होतात. विकसनशील देशांमधून शारीरिक आरोग्याएवढा मानसिक आरोग्याचा विचार केला जात नाही.

स्त्रीचे मानसिक आरोग्य तिच्या जन्मापासून काहीसे डळमळीत बनते, सामाजिक परिस्थिती मुळे. दुध कमी देणे, खाणे कमी ठेवणे, शिक्षणाची हेळसांड, खेळ, मनोरंजनाचा अभाव, घरकामात, लहान भावंडांना सांभाळण्यात गुंतवणे, अशा अनेक कमी अधिक महत्वाच्या गोष्टींमुळे मुलगी शारीरिक मानसिक दृष्ट्या कुपोषित राहते. मनाने अस्वस्थ राहते. तनांचे व्यवहार सांभाळताना मन लपवू लागते. लेखिका इथे नमूद करते की आपल्या देहावर आपलाच अधिकार हवा असेल तर भेदाच्या सर्व भिंती तोडायला लागतील. यासाठी स्त्री-चळवळ यशस्वी होण्यासाठी सर्व स्त्रियांची एकी व्हावी लागेल.

सदरातील डिसेंबर २०११ मधील ‘आव्हान व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकाचे’ या लेखात लेखिकेने स्त्री चळवळीच्या तिसऱ्या लाटेसंबंधी उहापोह केला आहे. स्वत:ला स्त्रीवादी म्हणवून न घेता व्यक्तीस्वातंत्र्यवादी समजणाऱ्या व आपलं आर्थिक स्वातंत्र्य महत्वाच मानून जाणीवपूर्वक जगणाऱ्या स्त्रियांचा गट आपली वेगळी भूमिका मांडताना दिसतात. स्त्री चळवळीची तिसरी लाट हा शब्दप्रयोग वापरात आल्यानंतर त्याचा विविधांगांनी उपयोग झाला. तिसर्या लाटेने अनेक गट, उपगटांना सामावून घेतले. वंश, संस्कृती, धर्म यांच्या पलीकडे जावून निखळ व्यक्ती म्हणून विचार करण्याचा प्रयत्न सुरु झाला. व्यक्तीचे म्हणून अधिकार मिळण्याला प्राधान्य देण्याचा विचार मांडला जाऊ लागला. एकच एक प्रश्न घेऊन लढण्यापेक्षा, विविध प्रश्नांना भिडण्याची मानसिकता तयार झाली. स्त्री-पुरुष मैत्री, समलैंगिकता, लिव्ह इन नाते असे लैगिकतेसंबंधीचे प्रश्न प्रामुख्याने पुढे आले. हे प्रश्न स्त्रीच्या तन-मनाशी खूप जवळून जोडलेले आहेत. जागतिकीकरणाचा या लाटेवर मोठा प्रभाव दिसतो. समाज माध्यमांचा वापर, आर्थिक स्वातंत्र्य, व्यक्तिमत्व विकासाचे महत्व, सौंदर्याबाबत जागरूकता अशा अनेक पैलूंचा प्रवेश या लाटेचे वैशिष्ट्य आहे. प्रश्नांची उत्तरे सर्वांसाठी समान असतीलच असे नाही असे मानल्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक होऊ शकतो असे लेखिका मानते. तिच्या मते, समता आणि मैत्रभाव यांना महत्व देणाऱ्या स्त्री चळवळीसमोर हे मोठं आव्हान ठरू शकतं.

वंदना पलसाने
vpalsane@gmail.com