मिळून साऱ्याजणी मधील सदरांचे परीक्षण: भाग ३

०४ जुलै २०२२

विद्या बाळ अध्यासन प्रकल्पाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या अक्षरवाटा ह्या शिर्षकाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या प्रवासाचा आढावा विवीध लेखांच्या आधारे ह्यात घेण्यात आला आहे. त्यातील हा अजुन एक लेख ज्यात वंदना पालसने साऱ्याजणीच्या सदरांचा आढावा घेतला आहे. वेगवेगळ्या विषयांवर साऱ्याजणी ने सदरांच्या मार्फत चर्चा घडवून आणली अश्या वैविध्य असणाऱ्या सदरांचे आणि त्यामध्ये हाताळल्या गेलेल्या विषयांचे वंदना पालसणे ह्यांनी परिक्षण केले आहे तर सदरांची माहिती देणारा आणि साऱ्याजणी कोणत्या विषय हातळते हे सांगणारा अजुन एक लेख साऱ्याजणी तुमच्या समोर चार भागात आणत आहे.

लेखाच्या तिसऱ्या भागात ‘अनवट जगात डोकावताना’ह्या सदराअंतर्गत चर्चिलेल्या आदिवासी मुलांमध्ये काम करताना राजश्री तिखे ह्यांनी आश्रमशाळांचा अनुभव घेतला त्या अनुभवाबद्दल त्या सांगतात. ह्यातुनच शिक्षणमित्र ह्या प्रकल्पाबद्द्ल समजायला आपल्याला मदत होते. त्याच बरोबर आपल्या कामाने झपाटल्या गेलेल्या माणसांवर त्यांच्या जिद्दीवर हे सदर भाष्य करते.

**

अनवट जगात डोकावताना

‘अनवट जगात डोकावताना’ हे सदर प्रामुख्याने साऱ्याजणीची तरुण मैत्रीण राजश्री तिखे हिने लिहिलेल्या लेखांचे सदर आहे. आदिवासी मुलांमध्ये काम करताना तिने आश्रमशाळांचा अनुभव घेतला. आश्रमशाळांबद्दल आपण फक्त नकारात्मक ऐकतो. पण त्यांचे मुलांच्या जीवनातील योगदान सुद्धा महत्वाचे आहे. अनेक दुर्लक्षित मुद्दे या लेखांमधून पुढे आले आहेत. शिक्षण-मित्र कार्यक्रम सुद्धा एक महत्वाचा दुर्लक्षित कार्यक्रम आहे ज्याच्या बद्दल शहरी शिक्षित समाजाने अधिक जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी हे सदर आणि त्यातील लेख उपयुक्त आहेत. लेखिका म्हणते, ‘शिक्षण-मित्र’ च्या माध्यामतून आदिवासी मुलांच्या क्षमतांचे तिला जे आकलन झाले त्यावर तिने ही लेखमाला लिहिली आहे.

‘तो एक राजहंस’ या आपल्या लेखात राजश्री तिखे आपल्याला शिक्षणमित्र योजनेची झलक दाखवतात. अगदी नियोजनापासून ते कोणत्याही कार्यक्रमांच्या अंमलबजावणीपर्यंत तसेच कार्यक्रमांच्या मुल्यमापनाचेही काम मुलांनी करावे, या सर्व उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग द्यावा, शिक्षण केवळ एकतर्फी असू नये तसेच विविध विद्यार्थी समित्या बनवून सर्व नियोजन करावे आणि कार्यान्वित करावे, हा शिक्षणमित्र कार्यक्रमाचा आत्मा आहे. स्वतंत्र विचार करणारे विद्यार्थी निर्माण व्हावेत, त्यांनी आत्मविश्वासाने निर्णय घ्यावेत ही अपेक्षा या योजनेमागे आहे. परंतु अर्थात हे सोपे नाही. विशेषकरून अशा समाजात जिथे मोठ्यांनी सांगावे आणि लहानांनी ऐकावे असे बाळकडू असते.. मुले मोठी झाली तरी पालक आपले नियंत्रण सोडत नाहीत. अशा समाजात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या बरोबरीने निर्णयप्रक्रियेत भाग घेणे यासाठी पुष्कळ करामती कराव्या लागल्या असे राजश्रीताई नमूद करतात.

सुरुवातीलाच शिक्षकांचा विरोध सुरु झाला. मुलांना काय कळते इथपासून विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर गोलात बसून चर्चा करायला कमीपणा वाटणे, या सगळ्यातून जात जात हा कार्यक्रमाचे काम सुरु झाले. सर्वांनी जमिनीवर गोलात बसणे याबाबत संयोजक आग्रही राहिले. कोणतेही काम प्रत्यक्षात सुरु झाले की त्याची समिती बनवायची आणि सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनीच पार पाडायच्या. १५ दिवसातून एकदा बैठक घेणे आवश्यक होते. उपक्रमांची आखणी, नियोजन, नोंदी, अडचणी सोडवणे इत्यादी साठी ही बैठक महत्वाची होती. सुरुवातीला मुले बोलायला घाबरायची. आपले नाव, समितीचे नाव, आपले पद सुद्धा अगदी चाचरत सांगायची. पण नियमित बैठकांमुळे, संयोजकांच्या प्रोत्साहनामुळे मुले बोलू लागली. आपले समितीतील पद ही आपली ओळख आहे, त्याचा अभिमान वाटून घेऊ लागली. या उपक्रमातून मुलांना अनेक विविध अनुभव घ्यायची संधी मिळाली. भरपूर माहितीचा साठा मिळाला. जिथे जिथे बायफ-मित्र चे काम चालू असे, तिथे जाऊन पाहणे, चर्चा करणे, निरीक्षणे नोंदवणे यातून मुलांची तयारी होत गेली. स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता विकसित झाली. महत्वाचे निर्णय मुले घेऊ लागली. पहाडातल्या मुलांना, आदिवासी मुलांना कमी समजतं, बुद्धिमत्ता कमी असते असा सर्वसाधारण समज समाजात आहे. शाळा याला मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. ‘शिक्षण-मित्र’ च्या माध्यमातून बायफ टीमने दाखवून दिले की प्रत्येक मूल हे राजहंस असते, त्याचे विकसित रूप बघणाऱ्याला विस्मयचकित करून टाकते.

सदरातील ‘चित्रातून दिसणारी बुद्धिमत्ता आणि फिल्म प्रकल्प’ या लेखात राजश्री तिखे यांनी मुलांच्या चित्रातून व्यक्त होण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमतेचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यांनी या लेखात विविध चित्रे दिली आहेत. ‘शिक्षण-मित्र’च्या साथींनी जेव्हा मुलांच्या आदिवासी भावविश्वाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी त्रैमासिक भित्तीपत्रिकेची कल्पना राबवली. मुलांनी त्याचे नाव ठेवले ‘बालखजिना’. अर्थात, मुलांना व्यक्त होण्यासाठी खूप वेळ आणि प्रयत्न करावा लागला. जवळ जवळ चार वर्षे लागली विद्यार्थी आणि शिक्षक यांना चाकोरीबद्धतेतून बाहेर येण्यासाठी. आदिवासी मुलांना शब्दांपेक्षा चित्रांमधून व्यक्त व्हायला अधिक आवडत होतं. त्यांच्या चित्रांमधून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कितीतरी पैलू उलगडून दाखवले. विशेष म्हणजे ही चित्रे एकेकट्याने काढलेली नाहीत. समूहाने काढली आहेत. चित्रे पाहून मुलांच्या गावांची आणि परिसराची, व्यवसायांची स्पष्ट कल्पना येऊ शकते. चित्रातील तपशील, बारकावे थक्क करणारे आहेत. गावची बाजारपेठ, त्यातील असंख्य कार्यकलाप, गावातील लग्न आणि इतर समारंभ, शहरांचा प्रभाव, यांचे किती बारकाईने मुलांनी निरीक्षण केले आहे तसेच ते त्यांच्या जीवनाचा किती अंतरंग भाग आहेत हे चित्रे पाहून लक्षात येते.

मुलांनी केलेल्या फोटो-डॉक्युमेंटेशन बद्दल लिहिताना राजश्रीताईंनी त्याचे सविस्तर वर्णन या सदरातील आपल्या एका लेखात केले आहे. बायफ कडून प्रकल्पांवर मराठी व आदिवासी अशा दोन भाषांमध्ये लघुपट तयार करण्याच्या योजनेचा भाग म्हणून मुलांनी चित्रपट, लघुपट बनवण्यामध्ये लागणाऱ्या विविध कौशल्यांना आत्मसात केले. संवाद लिहिले, गाणी बनवली, गाणी म्हणली. सिनेमाची प्रक्रिया शिकताना शॉट म्हणजे काय, सीन म्हणजे काय, प्रसंग कस दाखवतात अशा असंख्य गोष्टी मुले उत्साहाने शिकली. आदिवासी मुलांची दृष्य-आकारात्मक प्रज्ञा विशाश चांगली असते असे प्रकल्पकर्त्यांच्या लक्षात आले. दृश्यात्मक आकलन या मुलांचे विशेष चांगले असते. या बाबतीतील त्यांची अभिव्यक्ती पण वेगळी आणि प्रगल्भ असते. ते भाषा, शब्द यापेक्षा चित्र, नृत्य यातून सहज व्यक्त होतात. याशिवाय उत्तम संघभावना, गटाने मिळून काम करणे यामध्ये आदिवासी मुले अतिशय पुढे दिसली. गट-समन्वयाची त्यांची क्षमता अनन्यसाधारण असते असेही राजश्री तिखे नोंदवतात. पण त्यांच्या या क्षमता लक्षात घेऊन त्यांना शिकवणे होत नाही. उलट, विशिष्ट कामांसाठी माणसे तयार करणे हाच शिक्षणाचा हेतू ही व्यवस्था राबवते.एक व्यथित करणारे उदाहरण लेखिका देते. एका आश्रमशाळेत ITI केंद्रात building maintenance चा कोर्स होता, पण त्याला एकही आदिवासी विद्यार्थी नव्हता. कारणे दोन – एक, त्यांना इंग्रजी जमणार नाही आणि दुसरे त्यांनी हे शिकल्यावर बांधकाम मजूर म्हणून कोण काम करणार? जाती-वर्गाच्या उतरंडीत तळाचे स्थान दिले गेलेल्या आदिवासींना ही व्यवस्था वर न येऊन देण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करते.

आपल्या अजून एका लेखातून राजश्री तिखे आदिवासी मुलांच्या खेळांचा आढावा घेतात. त्या म्हणतात, ही मुले खेळकोडी अपेक्षेपेक्षा खूपच कमी वेळात सोडवतात, यावरून त्यांची पठडीबाहेर विचार करण्याची क्षमता लक्षात येते. कोकणापासून ते विदर्भापर्यंत आदिवासी मुले अनेक मैदानी खेळांमध्ये प्रवीण असलेली दिसली. सहज डोंगरांवर, झाडांवर चढणे, नद्यांमधून सूर मारणे, होड्या वल्हवणे, आदि खेळ त्यांच्या आयुष्याचा भाग असतात. यात मुलीही मागे नसतात. जणू संगीत, नृत्य, विविध कला घेऊनच ही मुले जन्म घेतात. विशेष म्हणजे हे सर्व समूहाने करतात. मिळून, हातात हात घेऊन, एकत्र ताल देत. असं असूनही ही मुले शाळेत का मागे पडतात हा रास्त प्रश्न राजश्रीताई विचारतात. रोजच्या आयुष्यात लीलया विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, कला जगणारी ही मुले शालेय अभ्यासक्रमांत का नापास होत असतील? उत्तर साध आहे. शालेय अभ्यासक्रमांचा त्यांच्या जीवनाशी दूर दूर संबंध नसतो. ही चूक कुणाची? प्रत्येक आदिवासी धोरण हे फक्त त्यांना मुख्यप्रवाहात आणणे एवढेच उद्दिष्ट बाळगते. कुणीही थोडे जरी त्यांच्या काळाने घेऊन प्रायोगिक शिक्षण उपक्रम राबवला तर लगेच किती पटापट ही मुले शिकतात याचा प्रत्यय येतो. पण फक्त धोरणकर्तेच नाही तर संपूर्ण समाज आणि आदिवासी समाजातून आलेले शिक्षक, अधिकारी, पोलीस सगळेच आदिवासींना मुख्यप्रवाहाशी एकरूप करायला धडपडतात. आणि तेही अत्यंत असंवेदनशील पद्धतीने. मुख्यप्रवाही शिक्षण कोणत्याही प्रकारे या मुलांना पुढे आयुष्यात समर्थपणे उभे राहण्यासाठी उपयुक्त नाही. कोणतेही कौशल्य ते देऊ शकत नाही उलट मुलांचा आत्मविश्वास संपवून टाकते. राजश्रीताईंनी खूप कळकळीने आदिवासी मुलांची कैफियत मांडली आहे.

एखाद्या कवियत्री प्रमाणे राजश्रीताई आपल्या विविध लेखांमधून आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेतील विविध अनुभवांबद्दल लिहितात. “खडकाळ माळावरच्या एखाद्या रानफुलाने पावसाच्या इवलाशा सरीचा आधार घेऊन तरारून उठावे अशी ही मुले ‘बायफ’ च्या शिक्षण-मित्र कार्यक्रमाच्या संधीने फुलून आली आणि सगळं माळ रंगीबिरंगी फुलांनी फुलून यावा तसं त्यांच्यातल्या विविध क्षमतांच्या आणि गुणांच्या आविष्काराने मी थक्क झाले”. ही मुले केवळ अफलातून आहेत, किती वेगळा विचार करू शकण्याच्या असंख्य क्षमता आपल्यात सामावून आहेत, हे सांगताना त्या थकत नाहीत. आश्रमशाळा नीरस प्रकारे चालवल्या जातात, जरी त्यात काम करणारे अनेक जण अतिशय मन लावून आणि झोकून देऊन काम करतात. अशा वातावरणात संधी मिळाली तर ही मुले काय नाही करु शकणार? मुलांच्यात असलेली निर्व्याजता, हटके दृष्टीकोन, प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता, मजबूत समूह्भावना आणि प्रगल्भ संवेदनशीलता, आणि त्याच वेळी गरज पडली तर रोखठोक प्रतिरोध. इतक्या समृद्ध माणसांना मुख्यप्रवाहात आणून काय देऊ शकतो आपण, हाच विचार या सदरातील हे सर्व लेख वाचून मनात येतो. महाराष्ट्रात अनेक आश्रमशाळा कार्यरत आहेत. आपण त्यांच्याबद्दल खूप नकारात्मक ऐकतो. पण त्यांचे योगदानही आहेच. त्यांच्या समस्या त्यांच्या दृष्टिकोनातून समजून घेता आल्या तर काही चांगले बदल घडू शकतील. शाळा आणि त्यांचे अभ्यासक्रम जर आदिवासी जीवनाशी अधिक जोडले गेले, अधिक चांगल्या प्रकारे सांधले गेले तर मुलांना त्यांच्याबद्दल इतका परकेपणा वाटणार नाही. शहरी म्हणजे आधुनिक, आदिवासी म्हणजे मागास ही समीकरणे मागे टाकून विचार करण्याची गरज आहे. गुन्हा जर केला तरी तो कबूल करतील. कोणताही खोटेपणा न करता जगणारा आदिवासी आता खोटे बोलायला मजबूर का झाला असेल? भुकेले अर्धपोटी राहतील पण कधी भीक मागणार नाहीत, असे हे लोक बाहेरच्या आक्रमणाने आपला स्वाभिमान गमावत आहेत. आपली स्वयंपूर्णता गमावत आहेत. आपली जीवनशैली गमावत आहेत. जोर-जबरदस्तीने त्यांच्या जमिनी, त्यांची जंगले, पर्यावरण उद्ध्वस्त करून त्यांना विस्थापितांचे जीवन जगायला भाग पाडले जात आहे. त्यांच्या समूह-जीवनाचा काहीच विचार न करता एकाच पाड्यावरच्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी भिरकावून देणे यासारखी असंवेदनशीलता दुसरी असू शकत नाही. त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत हिरावून घेऊन, त्यांच्या उपजीविका नष्ट करून त्यांना स्थलांतरिताचे परावलंबी जीवन जगायला भाग पाडले जाते. आदिवासी म्हणजे अंधश्रद्धा, मागासलेपणा, दरिद्री, दारुडे, मुक्त लैंगिक संबंध ठेवणारे अशा प्रतिमा आपल्या शाळांमधून, अभ्यासक्रमांमधून शिकवल्या जातात. उदा. गोतुल ही प्रथा आदिवासी समाजात मुलांना आपला जोडीदार निवडण्याची सुनियोजित व्यवस्था आहे. तिचे वर्णन समाजशास्त्राच्या पुस्तकात तरुण मुलांना मुक्त लैंगिक संबंध ठेवण्याची मुभा असे केले गेले आहे. अशा वातावरणात शहरी संस्कृतीचे आधुनिक म्हणून आंधळे अनुकरण करणारी मानसिकता हळू हळू आदिवासींचीही बनली नाही तर नवल. देवी-देवता, लग्न समारंभ, इतर सांस्कृतिक गोष्टींवर आता बाहेरची छाप पडू लागली आहे. आदिवासी संस्कृतीतील सच्चेपणा, लोभसपणा, सामुहिकता नाहीशी होत चालली आहे. वाईट प्रथा, अंधश्रद्धा संपणे केव्हाही चांगले. पण गाभ्यातली जीवनदृष्टी संपवणे यासारखे वाईट दुसरे काही नाही.

आश्रमशाळांमधील आदिवासी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे हे मांडताना राजश्री तिखे म्हणतात की बायफच्या आरोग्य समित्या प्रत्येक सुट्टी नंतर सर्वेक्षणे आणि तपासण्यांची मोहीम राबवत. मुले घरातून लागण घेऊन येतात. त्वचारोग सहज पसरतात. घरी नीट स्वच्छता राखली जात नाही. आश्रमशाळा सुद्धा स्वच्छता राखण्यात, पुरेसे आणि स्वच्छ पाणी पुरवण्यात, पौष्टिक अन्न, फळे, पालेभाज्या देण्यात कमी पडतात. जंगलात मुबलक रानमेवा खाऊन जगणारी ही मुले आश्रमशाळांमध्ये येऊन कुपोषित का होतात? लहान मुलांची काळजी घेण्यासाठी जबाबदार व्यक्ती नियुक्त असायला हवी. दुषित पाण्यातून संसर्ग रोग मोठ्या प्रमाणावर पसरतात. ही जबाबदारी आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाची आहे. मुलांना थंडी, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळणे, इमारत नीट असणे, संडास व्यवस्थित असणे, पाणी साठवण्याची सोय चांगली असणे या गोष्टी प्रशासनाने पाहण्याच्या आहेत. मुलींना तर याहून अधिक सुरक्षिततेची गरज असते. अशा प्रकारे ‘अनवट जगात डोकावताना’ या सदरातील लेखांनी वाचकांना आदिवासी मुलांच्या आणि आश्रमशाळांच्या अनेक पैलूंचे आतून दर्शन दिले.

‘वेड्यांची गोष्ट’

अतिशय रंजक अशा या सदरामध्ये अनेक ‘वेड्यांच्या’ गोष्टी आहेत, ज्यांना कोणत्या ना कोणत्या वेडाने झपाटलंय. या वेड्या माणसांनीच हे जग सुंदर बनवून ठेवलंय. या वेड्या लोकांना नावं ठेवून, मानसोपचार देण्याचा विचार करण्यापेक्षा आपणच त्यांच्याकडून चार शहाणपणाच्या गोष्टी शिकाव्या. या हेतूने हे सदर लिहिले गेले. यामध्ये वेगवेगळ्या लेखकांनी अशा वेगवेगळ्या ‘वेड्या’ लोकांचा परिचय करून दिला आहे.

‘झपाटलेला माणूस – श्रीकांत इंगळहळ्ळीकर’ या लेखात डॉ. अनुराधा सोवनी यांनी श्रीकांत इंगळहळिकर यांच्यावर आणि त्यांच्या वेडेपणावर विस्तृत लेख लिहिला आहे. श्रीकांत यांचा प्रवास खरच थक्क करणारा आहे. कारखानदारीच्या व्यवसायासाठी जितकी मेहनत घेतात तेवढीच किंवा त्याहूनही अधिक मेहनत त्यांनी आपल्या छंदासाठी घेतली आहे. छंद केवळ हौस नाही राहिला त्यांच्यासाठी. फुलांमागे फिरता फिरता त्यांचा सखोल अभ्यास सुरु केला आणि त्याचे पर्यवसान झाले दोन भागात लिहिलेल्या ‘flowers of sahyadri’ या पुस्तकात. लेख लिहिताना लेखिका म्हणतात की त्या जरी श्रीकांतना २५ वर्षांपासून ओळखत असल्या तरी त्यांचे हे झपाटलेपण लेखिकेला प्रत्येकवेळी थक्क करून सोडते. श्रीकांत यांनी आपल्या छंद क्षेत्रात प्रचंड प्रगती केली. अनेक लेख लिहिले, शिबिरे घेतली. अगदी अशक्य आणि अवघड फोटो काढले. आपल्या छंदाचा केवळ आपल्यापुरता आवाका न ठेवता त्यांनी जमवलेली सगळी माहिती लोकांपर्यंत पोचवली. प्रत्येक फुलाची सविस्तर आणि काटेकोर माहिती आणि फोटो जमवून त्याची नीटस मांडणी करून पुस्तके लिहिली. प्रत्येक माहिती साठी, फोटो साठी रात्र रात्र मैलोनमैल प्रवास करणे, जागरणं करणे, रानावनात, दऱ्या-खोर्यांमध्ये भटकणे, आणि हे सर्व आपला कारखाना व्यवस्थित सांभाळून. भविष्यात हिमालयातील फुलांवर पुस्तक लिहायचे नियोजन आहे. यासाठी हिमालयात हिंडताना सामाजिक हिताच्या गोष्टींचा श्रीकांत बारीक विचार करतात. उदा. हिमालयातील रस्त्यांवर गाड्या चालवताना असलेले धोके लक्षात आणून देण्यासाठी ते कळकळीने लेख लिहितात. वळणा-वळणाच्या रस्त्यांवर सिग्नल तोडणे, चुकीच्या दिशने गाड्या चालवणे हे पाहून आपण फक्त चिडचिड करू, पण श्रीकांत त्यावर लगेच उपाय शोधतात. लोक-जागृती करण्याचा प्रयत्न करतात. प्रचंड सामाजिक भान असलेले श्रीकांत अतिशय रसिक आहेत. संगीतात त्यांना विशेष गती आहे. स्वत:चे घर बांधताना पर्यावरणाच्या प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करून बांधले आहे. लेखिकेला या सदरासाठी मुलाखत देताना त्यांनी आपल्या भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली. त्यात पुण्यातील सर्व झाडे आणि फुलांचा कोश बनवण्याची योजना आहे. हिमालयातील फुलांचा कोशही लिहायचा बेत आहे. तिसरी योजना तर खूपच महत्वाकांक्षी आहे, ज्यात त्यांचा विचार एक पॅकेज बनवायचा आहे.

५००० रुपयात एक मेमरी कार्ड, ज्यात पाच विविध गोष्टींची माहिती असेल, जी आपल्या मोबाईल मध्ये ठेवता येईल. कुठेही कोणत्याही फुलाची, पक्ष्याची, झाडाची माहिती हवी असेल तर ती या कार्ड मध्ये मिळू शकेल. अचंबित करणाऱ्या प्रचंड वेळ आणि शक्ती आणि पैसा लागणाऱ्या या गोष्टी श्रीकांत करतात तरी कधी आणि कसे? तर त्यांचे उत्तर हे की ते वेळेचा अत्यंत काटेकोर वापर करतात. इतर अवांतर गोष्टी कधीच करत नाहीत. असे हे श्रीकांत ‘वेडे’च नाहीत तर काय ! पत्नी, रेखाच्या मते श्रीकांतच्या या अश्या असण्याचा त्रास सर्वांना होतो, होऊ शकतो. पण रेखा म्हणतात त्यांनी लग्नाच्या वेळीच हे ओळखलं होतं श्रीकांत इतरांपेक्षा खूप वेगळे आहेत. पण म्हणूनच तर ते इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्ञान निर्मिती करू शकतात आणि आपण त्याचा भरपूर आनंद घेऊ शकतो.

अशाच अजून एक ‘वेड्या’ बाई आहेत वीणा गवाणकर ज्यांच्या जीवनापासून आणि कामापासून आपण वेडेपणाचे धडे घेतले पाहिजेत. त्यांच्या बद्दल लिहिले आहे चित्रा राजेंद्र जोशी यांनी. लेखाचे नाव आहे ‘तर्कशुद्ध कृती, देई जीवनाला गती!’ चित्राताई तर वीणाताईंच्या लिखाणाने इतक्या प्रभावित झाल्या की त्यांची जीवनदृष्टीच बदलून गेली. आपल्या पुस्तकांमधून वीणाताईंनी दिलेले कृतीशीलतेचे संदेश मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोचले आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघतात. ‘एक होता कार्व्हर’ याच्या तर तीस पेक्षा अधिक आवृत्ती निघाल्या. अशा या वीणाताई पहिल्यापासून लिहीतच होत्या का? नाही. त्या तर गृहिणी होत्या. आणि लग्नाआधी ग्रंथपाल. मात्र वाचन त्या अगदी लहानपणापासून करत होत्या. इतक्या की बाकी काहीच सुचत नसे. सहा भावंडे सगळी वाचत. वडील, आई मुलांच्या वाचनाला प्रोत्साहन देत. काळाच्या मानाने त्यांचे वडील पुढे होते. मुलींना सायकल शिकावी. वेगळ्या शहरात शिकायला पाठवले. लग्नानंतर सुद्धा इतर लोक जेव्हा कपड्यांची शॉपिंग करत, तेव्हा त्या लायब्ररी धुंडाळत. संसार करताना किंवा मुलांना वाढवताना सुद्धा त्यांचे मन फक्त चूल-मूल करत राहिले नाही. चरित्र, आत्मचरित्र वाचत वाचत आणि त्या गोष्टी मुलांना सांगत सांगत या छंदाच रुपांतर गंभीर अभ्यासात, लिखाणात झालं. ‘एक होता कार्व्हर’ ने त्यांना व्यक्त होण्याचा आत्मविश्वास दिला. त्यांची आधीचीच तर्कबुद्धी अजूनच टोकदार झाली. त्यानंतर एकामागून एक पुस्तके येत गेली. मुलांशी-तरुणांशी संवाद करताना मराठी लोकांना अनेक महत्वाची व्यक्तिमत्व माहित नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. काल्पनिक लिखाणापेक्षा वीणाताईंचा कल वास्तवपूर्ण लिखाण करण्याकडे अधिक होता. कलेसाठी कला वीणाताईंना मान्य नाही. कला जीवनासाठी असते. जगणं कलेपासून, साहित्यापासून वेगळं असू शकत नाही असे त्या मानतात. साहित्यात जगण्याचं प्रतिबिंब असत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा आपल्या लिखाणावर परिणाम होतोच. पर्यावरणाचा ऱ्हास, समुद्राचं प्रदूषण, जंगलाचा नाश, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शहरांकडे लोटणारे विस्थापितांचे लोंढे, या सर्वांचे प्रतिबिंब लिखाणात उतरत नसेल तर ते साहित्य किंवा कला नाही. आपल्यातील कलागुण आणि आपलं जीवन हातात हात घालून चालायला हवं. नाहीतर पशु-पक्षी आणि माणसामध्ये फरक काय? अशा वीणाताईंना भेटून लेखिका म्हणते नोकरी-व्यवसाय म्हणजेच फक्त करिअर मानणे योग्य नाही, तर स्वत:ला समजून उमजून स्वत:साठी आखलेला कृतीशील जीवनमार्ग म्हणजे करिअर, हा महत्वाचा धडा ती वीणाताईंना भेटून शिकली.

‘वेड्यांच्या गोष्टी’ या सदरातील अजून एक वेडे गृहस्थ आहेत इंदापूरच्या ‘आकार पॉट आर्ट’ चे शिल्पकार श्री राजेश कुलकर्णी. निलिमा कढे यांनी त्यांची गोष्ट सांगितली आहे ‘मातीचं आणि माणसांचं वेड जपणारे: राजेश कुलकर्णी’ या लेखात. हा माणूस झपाटल्या प्रमाणे सृष्टीतील आकार आणि रंगांमधून व्यक्त होणाऱ्या संवेदना शोधतो. त्यांच्या स्टुडिओला भेट दिली की मातीच्या विविध वस्तू पाहून मन मोहून जाते. साधी मातीची भांडी, त्यांचे साधे आकार, रूप पण त्यांच्यातही किती वैविध्य असावे. लेखिका म्हणते आकार स्टुडीओला आकार देणाऱ्या राजेश याचं व्यक्तिमत्व सुद्धा अशाच विविध पैलूंनी भारलेलं आहे. आकार पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सुद्धा विलक्षण आहे. झपाटलेली वेडी माणसेच असे जगू शकतात. राजेश यांचे वडील इंदापूर आणि पेण येथे एस.टी. चे कॅन्टीन चालवत. समृद्ध वाचन असलेल्या राजेशला मात्र कलात्मकता आणि सामाजिक भान यांनी संपन्न आयुष्य जगायचे होते. त्यासाठी मुंबईमध्ये कला महाविद्यालयात प्रवेश घेतला पण वर्षभरातच घरच्या व्यवसायाची जबाबदारी अंगावर येऊन पडली आणि राजेश मुंबई-गोवा महामार्गावरील प्रतिक नावाचा ढाबा चालवू लागले. पण निराश न होता, तिथेही अतिशय पद्धतशीर संयोजन करून हॉटेलची प्रत्येक टप्प्यावर नीट व्यवस्था लावली. कागदावर वेळेचे, कामांचे योग्य नियोजन केले. ड्युटीवरील लोकांना विश्रांतीची सोय दिली. तिथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचार्याचा विचार करून त्याला अधिकाधिक स्थैर्य मिळेल, त्यांना पुढे शिक्षण, प्रशिक्षण घेता येईल यासाठी प्रयत्न केले. परिणामी व्यवसाय तुफान प्रगती करू लागला. पण त्याचवेळी हळूहळू हॉटेल व्यवसायातून बाहेर पडून काहीतरी कलात्मक व्यवसाय करता येईल का हा विचार राजेशची पाठ सोडत नव्हता. म्हणून मग हॉटेल बरोबर नर्सरी सुरु केली. वेड्याने एखादे काम हाती घेतले की ते झपाटलेले कामच असते. झाडांचे अनेक प्रयोग सुरु झाले. हे काम सुरु असतानासुद्धा मनात अजून कलाविश्वात व्यवसाय करण्याचे स्वप्न राजेश बाळगून होते. असे स्वप्न ज्यात इंदापूरच्या इतर सुप्त-व्यक्त कलाकारांनाही सोबत घेता येईल. शोधत शोधत राजेश संपत चाललेल्या कुंभारकलेपर्यंत येऊन पोचले. आपला कुम्भारकीचा व्यवसाय गुंडाळून ठेवून शहरात स्थलांतरित होणाऱ्या कुंभारांना गावातच व्यवसाय करता यावा हाही हेतू त्यांच्या मनात होता. पॉटरी येत नव्हती. तिचे शिक्षण असेच स्वत:च एकलव्यासारखे झपाटून सुरु केले. अनेक चुका करत, नुकसान सोसत हळूहळू जम बसवला. गावातली मुले हाताशी घेतली. त्यांना उत्पन्नाचा मार्ग दाखवला. विविध उपक्रम सुरु केले, पुस्तक वाचन, अभ्यासवर्ग, ट्रेक, सहली, संगीत, नृत्य, कराटे, ज्यामुळे गावातील तरुण मुलांचे अनुभव खूप वाढले. मुले छान तयार होऊ लागली. काही तिथेच राहिली तर काही शहरात विविध व्यवसाय करू लागली. या मुलांनी आरोग्यसेवेचे प्रशिक्षण घेतले आणि गावातील लोकांना रोगराई, भूकंप, पूर यासारख्या संकटात मदत केली. असे हरफनमौला राजेश आजही आकार मध्ये विविध प्रयोग करण्यात मग्न आहेत. त्यांचा स्टुडीओ आता लोकांच्या आकर्षणाचा बिंदू झाला आहे. तिथे शिकू इच्छिणाऱ्या लोकांना प्रशिक्षणाची सोय आहे. त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली आहे. त्यांचे मोठ मोठे म्युरल्स विविध शहरांमध्ये आहेत. अशा या कलाकाराला वाचकांचा आदरयुक्त सलाम!!

आपल्या देशात ‘वेड्यांची’ कमी नाही, म्हणूनच आपण आजही सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक अंगाने इतकं संपन्न आयुष्य जगात आहोत. अशाच एका ध्येयासक्त, झपाटलेल्या व्यक्ती ‘मेधा पाटकर’ यांच्याबद्दल लिहित आहेत सुनीती सु.र. आपल्या ‘ध्यास जग बदलण्याचा’ या लेखात. ‘विकास चाहिये, विनाश नहीं’ हा नारा गुंजला नर्मेदेच्या पहाडांमधून, दऱ्या-खोऱ्यांमधून सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी. हा नारा देणाऱ्या मेधा पाटकर कोण आहेत, कुठून आल्या, कुठे पोचल्या, यासंबंधी तपशीलवार माहिती या लेखात मिळते. लेखिकेला मेधाताईबद्दल वाटणारं प्रेम, आदर लेखात ठायी-ठायी व्यक्त होते. समाजवादी कुटुंब, चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आई-वडील, आणि सेवादलातील संस्कार. अशा वातावरणातून मेधाताई सामाजिक कामात आल्या नसत्या तरच नवल. आधीचं डॉक्टर बनायचं स्वप्न बदलून समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन मेधाताई अनेक सामाजिक प्रकल्पांमध्ये काम करू लागल्या. शिक्षक म्हणून पण काम केले. मुंबईतील झोपडपट्टीत पाच वर्षे काम केलं तिथेही अगदी झोकून देऊन. लोकांच्या प्रश्नांच्या, दु:खाच्या अगदी तळाशी जायची. साधारण १९८४-८५ मध्ये एका संस्थेसोबत काही निमित्ताने त्या गुजराथेत गेल्या. नर्मदेवरील धरणाबद्दल ऐकून माहिती होती. तिथे गेल्यानंतर मात्र समस्येच्या गंभीर आणि व्यापक रूपाची स्पष्ट कल्पना आली, आणि विशेष म्हंजे तिथल्या आदिवासींना याबद्दल काहीच माहित नव्हतं. प्रचंड अभ्यास करून धरणाच्या लाभ-नुकसानाचा हिशेब मांडून मेधाताई लोकांशी बोलायला लागल्या. भय आणि अविश्वासाच्या भिंती दूर व्हायला वेळ लागला. पण मग मात्र मेधाताई तिथल्या लोकांची ‘नर्मदामैय्या’च बनली. आदिवासी ते विश्व बँक, सर्वांशी ती धरणाच्या मुळे होणाऱ्या विनाशाबद्दल बोलत राहिली. आंदोलन उभं केलं, उपोषणे केली. इथेच प्रथम ‘विकासाची’ नेमकी व्याख्या काय हा प्रश्न विचारला गेला? ज्यामध्ये समता, न्याय आहे आणि पर्यावरणाचा विनाश नाही तोच खरा विकास. अशाच विकासाचा आग्रह मेधाताई आणि तिच्या असंख्य साथींनी धरला. गुजराथ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश जिथे जिथे धरणाचा विनाश पोहोचणार होता, तिथे तिथे मेधा गेली. हळू हळू लोकांना तिचे म्हणणे समजू लागले, पटू लागले. साधे सुधे गरीब गावकरी आणि उच्च शिक्षित शहरी लोकांपर्यंत नर्मदा आंदोलनाचा आवाज पोहोचला. अनेक लोक आंदोलनात सामील झाले. मोठी टीम बनली. जीवाला जीव देणारे लोक जमले. प्रश्न सुप्रीम कोर्टापासून ते विविध आंतरराष्ट्रीय मंचांवरून मांडला जाऊ लागला. मेधाताईना ओळख प्राप्त झाली. पुरस्कार मिळू लागले. परदेशी पैसा आंदोलनासाठी वापरायचा नाही, इथपासून ते पुरस्काराच्या रकमा आंदोलनातील असंख्य उपक्रमांमध्ये वापरायचा ही शिस्त पाळली गेली. नर्मदेच्या खोऱ्यातील मुलांसाठी चालणाऱ्या जीवनशाळा हे तर या आंदोलनाच्या जिवंतपणाचे प्रतिक आहे. आजही कार्यकर्त्यांची नवी फळी खोऱ्यात पूर्ण निष्ठेने कार्यरत आहे. देशात कुठेही संकट येऊ दे, सिंगूर-नंदीग्राम असो की मुंबईच्या गरीब वस्त्या, मेधाताई धावून जातात. मोठमोठ्या बिल्डर्सना, राजकारण्यांना सामोरे जात सतत जीवघेण्या संघर्षाला सामोरे जाणारी ‘वेडी’ मेधाताई जर अशी वेडी नसती तर आज ३० वर्षांनी आपण कुठे असतो? लोकशाही, संविधान, न्याय, शाश्वत विकास, अहिंसक लोकआंदोलन, परिवर्तन या शब्दांना अर्थच राहिला नसता.

वंदना पलसाने
vpalsane@gmail.com