मिळून साऱ्याजणी मधील सदरांचे परीक्षण: भाग २

०४ जुलै २०२२

विद्या बाळ अध्यासन प्रकल्पाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या अक्षरवाटा ह्या शिर्षकाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या प्रवासाचा आढावा विवीध लेखांच्या आधारे ह्यात घेण्यात आला आहे. त्यातील हा अजुन एक लेख ज्यात वंदना पालसने साऱ्याजणीच्या सदरांचा आढावा घेतला आहे.गेल्या तीसएक वर्षात ज्या वेगवेगळ्या विषयांवर साऱ्याजणी ने सदरांच्या मार्फत चर्चा घडवून आणली अश्या वैविध्य असणाऱ्या सदरांचे आणि त्यामध्ये हाताळल्या गेलेल्या विषयांचे वंदना पालसणे ह्यांनी परिक्षण केले आहे तर सदरांची माहिती देणारा आणि साऱ्याजणी कोणत्या विषय हातळते हे सांगणारा अजुन एक लेख एकूण चार भागात साऱ्याजणी तुमच्या समोर आणत आहे.

सदराच्या दुसऱ्या भागात आपण कथांवरील सदरांची केलेले परिक्षण पाहणार आहोत. त्यासोबतच मुकुंद टाकसाळे हे प्रसिद्ध पत्रकार, संपादक, समीक्षक आहेत. त्यांच्या लेखणीतून भोवताली घडणाऱ्या घटनांवर टिप्पणी करण्याच्या उद्देशाने मिळून साऱ्याजणी साठी त्यांनी एक सदर लिहिले आहे त्यावर ही वंदना ताई भाष्य करतात. हमशक्कल ह्या सदरा अंतर्गत साऱ्याजणीने ग्रामीण भागातील गंभीर विषयावर भाष्य केले आहे. तसेच स्त्रियांनी खेळ का खेळले पाहिजे? असा एक महत्त्वाचा लेख ह्या सदरामध्ये बघायला मिळतो. शेतकरी, त्यांचे प्रश्न आणि पर्यावरणाच्या प्रश्नांना देखील ह्या सदराच्या मदतीने भाष्य केले आहे.

**

‘अ’मूल्य कथा

‘अ’मूल्य कथा या सदराचे लेखक आहेत एक अत्यंत लोकप्रिय, विद्यार्थीप्रिय शास्त्रज्ञ मिलिंद वाटवे. शास्त्रज्ञ असले तरी त्यांचा सामजिक शास्त्रांचाही गाढा अभ्यास आहे. त्यांच्या कथांमधून त्यांचे विविध सामजिक-सांस्कृतिक प्रश्नाबाबतचे विचार व्यक्त होतात. मिळून साऱ्याजणी मध्ये या सदरात त्यांनी उत्क्रांती, विज्ञान, समाज, प्रेम, नितीमूल्य, लैगिकता इत्यादी विषयांवर अतिशय मनोरंजक कथा लिहिल्या आहेत.

आपल्या ‘कला आणि भ्रम’ या कथेत त्यांनी दोन मित्र, एक संगीतकार आणि एक न्यूरोसायंटिस्ट, यांच्या संवादातून कलेवर लोक प्रेम करतात म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा वेध घेतला आहे. न्यूरोसायंटिस्ट आपल्या संगीतकार मित्राच्या मेंदूवर प्रयोग करून एक चिप तयार करतो. ती कुणाच्याही डोक्यात बसवली की ती व्यक्ती संगीताच्या उत्तमोत्तम रचना करू शकेल. आपल्या यशाने खुश झालेल्या मित्राला कलाकार मात्र हा प्रयोग प्रत्यक्षात आणण्यापासून रोखतो. त्याचे कारण सांगताना तो सांगतो की चिप बसवून संगीतकार निर्माण झाले तर लोकांना ही एक भौतिक प्रक्रिया आहे हे लक्षात येईल आणि ते ज्या कलांवर प्रेम करतात, श्रद्धा करतात, ते नाहीसे होईल. कलेवर लोकांचे प्रेम नसते तर त्या भोवती त्यांनी जे दैवी वलय निर्माण केलेले असते, जे भ्रम असतात, त्यांच्यावर लोकांचे प्रेम असते. लोकांना कलेचा आनंद देणं हाच जर या प्रयोगाचा उद्देश असेल तर हा भ्रम तसाच ठेवणं इष्ट. या कथेतून कलेबद्दल प्रेम बाळगणाऱ्या लोकांबद्दल एक अतिशय मार्मिक टिप्पणी वाटवे यांनी केली आहे.

आपल्या दुसऱ्या ‘उत्तरं आणि प्रश्न’ या कथेत वाटवे विद्यापीठांमधून सायन्स आणि ह्युमॅनिटीज या दोन शाखा वेगळ्या का ठेवल्या जातात या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न करताना दिसतात. विद्यार्थी आणि कुलगुरू यांच्या संवादातून ही कथा उमलते. विद्यार्थ्याचा प्रश्न की दोन्ही शाखांचा उद्देश जर सत्याचा शोध हाच असेल तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या इमारती, ग्रंथालये, व्यवस्थापन का आहेत? सगळं एकत्र का नाही? यावर बऱ्याच विचारांती कुलगुरूंनी दिलेले उत्तर हे की सायन्स शाखा नव्या नव्या प्रश्नांची उत्तरे शोधत जाते, आणि हा प्रवास अव्याहत चालू राहतो. मात्र ह्युमॅनिटीज मध्ये प्रश्न तेच आहेत पण उत्तरे बदलत गेली. किंबहुना मानवताशाखेमध्ये कितीही उत्तरे मिळाली तरी प्रश्न तेच आणि तसेच राहतात. अतिशय रंजक पद्धतीने या छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून वाटवे यांनी या दोन महत्वाच्या शाखांमधील साम्य आणि फरक समजावून सांगितला आहे.

‘कुणी घडवलं’ या कथेमध्ये वाटवे सृष्टीतील अपूर्णता, अन्याय, अपुरेपण याबद्दल टिप्पणी करतात. एका महापंडित ज्ञानी माणसाने ठरवलं की परमेश्वराची हे सृष्टी खूपच अपुरी आहे, आपणच एका परिपूर्ण सृष्टीची रचना करू आणि परमेश्वराला त्याच्या चुका दाखवून देऊ. मात्र खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला सृष्टीच्या जवळपास सुद्धा रचना करता येत नाही. त्यावर परमेश्वराने त्याला दिलेलं उत्तर गंमतशीर आहे. तो म्हणतो की सृष्टीची रचना मी केलेलीच नाही. सृष्टी इतकी गुंतागुंत असलेली, जटील आहे की तिची रचना परमेश्वर किंवा माणूस करूच शकत नाही. सृष्टीला आलेला आकार, रूप तिचे तिने मिळवलेले आहे. मी केवळ खूप चुकांची तरतूद केली आहे, आणि बघत बसलो आहे. परमेश्वर सृष्टीचा निर्माता या गृहितकाला खोडून काढत विज्ञानाच्या अपूर्ण पण सतत शोध घेणाऱ्या प्रयत्नांकडे, उत्तरांकडे लेखक आपले लक्ष या कथेद्वारे वेधतात.

‘जनकाचे दु:ख’ या कथेमध्ये लेखक आपल्याला सुख आणि दु:ख यांच्यामध्ये माणसाचे जीवन कसे आंदोलित होत राहते आणि माणूस कसा सुखापेक्षा दु:ख अधिक मागतो हे विदित करतात. राजा जनकाचे आपल्या सर्व जनतेला सुखी करण्याचे स्वप्न असते. संपूर्ण राज्यातील प्रत्येक माणसाला सुखी करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करून सुद्धा राज्यात कुणी ना कुणी दु:खी असायचेच. हे पाहून राजा खूप व्यथित होतो आणि अनेक गहन प्रश्नांची उत्तरे देऊ शकणाऱ्या ऋषींकडे जाऊन त्यांना आपली समस्या सांगतो. ते राजाला समजावतात की आपल्याला वाटते की माणूस सुख मागतो पण हे सत्य नाही. उलट हा भ्रम आहे. सुख मिळवणे सोपे असते. दु:खाची आंतरिक ओढ हे मानवाच्या मनाचे वास्तव आहे. कायम फक्त सुखी राहण्यासाठी माणसाचे मन उत्क्रांतच झालेले नाही. या अतिशय गूढ आणि अगम्य प्रश्नाचा उहापोह छोट्या कथेद्वारे करणे सोपे नाही पण वाटवे यांनी हे आव्हान समर्थपणे पेलले आहे.

आपल्या ‘चित्रगुप्त आणि मानवता’ या कथेतून तर वाटवे यांनी विद्यापीठात चालणाऱ्या संशोधनातील ‘सत्याच्या’ शोधाची आपल्या खुमासदार शैलीत फिरकी घेतली आहे. विद्यापीठाचे मानवशास्त्राचे एक प्राध्यापक मृत्युनंतर चित्रगुप्ताला भेटतात, तेव्हा दोघेही एकमेकाच्या कामाने पुष्कळ प्रभावित होतात. चित्रगुप्त ठरवतात यांच्याकडे आपण पीएचडी करावी. निव्वळ कारकुनी करण्यात जन्म व्यर्थ घालवणे योग्य नाही. प्राध्यापक खुश होतात याचे कारण चित्रगुप्ताकडे असलेला डाटा. तर या इतक्या मानवांची आणि पशूंची माहिती वापरून पशुतेच्या विरुद्ध मानवतेची व्याख्या करावी आणि हाच या संशोधनाचा विषय घ्यावा, असे ठरले. चित्रगुप्ताकडे सर्व प्रकारच्या पशूंच्या आणि माणसाच्या वागणुकीचा आणि त्या मागील मानसिक प्रक्रियांचा डाटा होता. अशी कोणती वागणूक किंवा भावना किंवा क्षमता आहे जी मानवतेला व्याख्यायित करते, हे शोधायचे ठरले. चित्रगुप्ताने खूप मेहनत करून प्रबंध लिहिला. सुरुवातीला खुश झालेले प्राध्यापक महोदय पुढे वाचता-वाचता अस्वस्थ होऊ लागले. कारण सर्व पशु आणि मानव यांच्यातील लहान लहान गोष्टींमधली तुलना करून सुद्धा अशी कोणतीच गोष्ट सापडत नव्हती जी पशूंमध्ये नाही आणि फक्त माणसांमध्ये आहे, जी मानवता या संकल्पनेची व्याख्या करेल. प्राध्यापक विचारात पडले माणसात पशूपेक्षा काहीच वेगळे असू नये? चित्रगुप्त म्हणाले नसतच काही वेगळं दोन्हींमध्ये. मानवता शब्द आम्ही कधीच वापरत नाही कारण आम्ही माणसाला वेगळा मानतच नाही. तर एवढा अभ्यास करून, चिकित्सा करून, सत्य तर बाहेर आलं, पण चित्रगुप्ताला पीएचडी मिळाली नाही. का? तर प्राध्यापक म्हणाले, पीएचडी मिळवण्यासाठी नुसतं सत्य सांगून उपयोग नाही, ते सत्य सर्वांना मानवेल असं असावं लागतं. विद्यापीठीय संशोधनाचा अतिशय गंभीर विषय लेखकाने मांडला आहे मनोरंजक पद्धतीने पण त्यातून अतिशय मर्मभेदक अशी टीका पण केली आहे.

तिरपागडं

मुकुंद टाकसाळे हे प्रसिद्ध पत्रकार, संपादक, समीक्षक आहेत. त्यांच्या खुसखुशीत लेखणीतून भोवताली घडणाऱ्या घटनांवर टिप्पणी करण्याच्या उद्देशाने मिळून साऱ्याजणी साठी हे सदर लिहिले गेले आहे. २००९-१० मध्ये झालेल्या या लिखाणामध्ये त्या काळात घडून गेलेल्या काही मह्त्वाच्या वादग्रस्त घटनांचा समावेश आहे, उदा. रस्ते, चौक, पूल, बागा यांची नावे ठेवण्याबाबत, हिंदू आणि आवरण या कादंबऱ्याविषयीचे वाद, राहुल गांधी यांचा मुंबई दौरा आणि लोकल मधूनचा प्रवास, दुसरा राहुल, राहुल महाजन याचे वादग्रस्त जीवन, महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण, आनंद यादव यांच्या तुकारामावरील लिखाणावरील वाद आणि त्यांची माफी आणि पुणे येथे गाजलेले ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

तिरपागडं सदरातील ‘नावं कशी ठेवावीत’ या लेखात टाकसाळे बांद्रे-वरळी सागरसेतूला कोणाचे नाव द्यावे यावरून जो वाद निर्माण झाला आहे त्यावर टिप्पणी करतात. खरं तर बांधकाम खात्याने स्पष्ट सूचना केली आहे की कोणत्याही नेत्याचं किंवा पुढाऱ्याच किंवा राष्ट्रपुरूषाच नाव देऊ नये, तरीही या सूचनेकडे सतत कानाडोळा केला जातो. तर या सागरसेतूला राजीव गांधी यांचे नाव द्यायचे की सावरकरांचे असा हा वाद. टाकसाळे यांच्या मते सर्व राजकारण बाजूला ठेवून विचार केला तर सोपी नावे नेहमी लोकांच्या लक्षात राहतात आणि अवघड नाव असेल तरी लोक त्याचे सुलभीकरण करून टाकतात, त्यामुळे सोपी, जोडाक्षरे नसलेली, लहान, नावे देण्यात यावीत. आपल्या मुद्याचे स्पष्टीकरण देताना लेखक काही मनोरंजक उदाहरणे देतात. उदा. महात्मा गांधी रोडचे प्रत्येक मोठ्या शहरात अस्तित्व आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याचे एम.जी. रोड हे सुलभीकरण झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चे सीएसटी होण्याचेही तेच कारण आहे. अशी अनेक विद्यापीठे, शाळा, कॉलेजेस यांची उदाहरणे आहेत, नाशिकचे वायसीएमओयू किंवा बारामतीचे टीसी कॉलेज. शिवाजी विद्यापीठ याचा उच्चार शिवाजी विद्यापीठच राहण्याचे कारण ते उच्चारायला सोपे आहे हेच आहे. मागे पुढे छत्रपती न लावल्यामुळे महाराजांबद्दलचा आदर आणि प्रेम कुठेही कमी झाला नाही. उलट एसवि करून त्याचे निरर्थकीकरण करून काय साधले असते? ब्रिटिशांनी फर्ग्युसन कॉलेज हे नाव देताना आधी सर नाही जोडले, त्यामुळे त्या व्यक्तीचा अपमान होतो असेही मानले नाही. टिळक रोड, कुमठेकर रोड, रानडे रोड इत्यादी अशाच सुटसुटीत नावांची उदाहरणे आहेत. चित्रपटगृह पण तशीच प्लाझा, विजय, अलका, राहुल अधिक लक्षात राहता. नुसते सावरकर पूल नाव दिले तरी ठीक, पण जेव्हा लोकांना त्याआधी स्वातंत्र्यवीर लावायचेच असते तेव्हा मात्र ते निरर्थक वाटते. कारण लोक तसेही फक्त सावरकर पूलच म्हणणार असतात.

‘धोंडा: टीव्हीवर की स्वत:च्या पायावर’ या लेखात टाकसाळे यांनी नांदेडच्या एका बातमीचा समाचार घेतला आहे. तिथल्या बागवान समाजातील ५०-५५ कुटुंबांनी आपापल्या घरातील टीव्ही रस्त्यावर आणून एकत्रितपणे फोडून टाकले. का तर म्हणे या जमातीच्या पंच समितीने चर्चा करून टीव्ही मुळे मुलं शिक्षणात मागे पडतात, व्यभिचार वाढतो, कौटुंबिक कलह वाढतो, त्यामुळे निर्णय घेतला की आपले टीव्ही चे संच नष्ट करावेत. आता टीव्ही फोडून अनेक वाईट गोष्टी संपतील या आशेने सर्वांना समाधान आनंद इतडी मिळाला असेल का? टाकसाळे म्हणतात उलट टीव्ही पाहत जेवायची, झोपायची सवय लागलेल्या लोकांना, स्त्रियांना आता झोप कशी लागणार? टीव्ही वरच्या बायकांची चिंता करताना त्या आपली दु:ख विसरून जात, त्याचे काय? चेष्टेचा सूर थोडा बाजूला ठेवत पुढे लेखक विचारतात, वास्तविक कोणतेही माध्यम वाईट असते का? सिनेमा अशाच प्रकारे बदनाम झाला. टीव्हीचेही तेच झाले. चांगले सिनेमे, चांगल्या वाहिन्या सुद्धा असतात. बातम्या, त्यांच्यावरील चर्चा असतात. आपली राजकीय-सामाजिक समज वाढवणाऱ्या असतात. जगभरातील जाऊ दे अगदी देशातील काना-कोपऱ्यातील बातम्या आता कळू लागल्यात. देशातील विविध प्रदेश, त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घरी बसून पाहता येतात. त्यामुळे टीव्हीला माध्यम म्हणून कमी लेखणे योग्य नाही, असे मांडून टाकसाळे म्हणतात की आपण या माध्यमाला कसे स्वीकारतो, त्याचा वापर आपली बुद्धी वापरून कसे करतो हे महत्वाचे. अशा वेळी या बागवान मंडळींनी टीव्हीवर धोंडा मारला असे म्हणायचे की आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला म्हणायचे?

‘हिंदू आणि दोन कांदबऱ्या’ या लेखामध्ये स्तंभलेखक मुकुंद टाकसाळे आपल्या मिश्कील शैलीत नेमाड्यांच्या हिंदू आणि भैरप्पा या कन्नड लेखकाच्या आवरण या कादंबऱ्यांचा आढावा घेतात, त्यांची तुलना करतात. हिंदू संबंधित आपले मत मांडताना ते म्हणतात की जरी ही कादंबरी वादग्रस्त ठरली तरी या कादंबरीने मराठी साहित्यातील कादंबरीचे मापदंड बदलले. यात हिंदू संस्कृतीचा विशाल पट आहे, अस्सल व्यक्तीचित्रणे आहेत, गावगाड्याचे, कृषी संस्कृतीचे खोल संदर्भ आहेत. ही ‘समृद्ध अडगळ’ असली तरी तिने मराठी वाचकाला समृद्ध करून टाकले आहे. त्याचवेळी भैरप्पा यांच्या आवरण या कादंबरी बद्दल लिहिताना टाकसाळे म्हणतात की तिच्यात उजव्या विचारांचं खूपच बटबटीत वर्णन आहे. मुस्लिमांनी हिंदूंची देवळे पाडली, पुरोगामी या ‘सत्याकडे’ डोळेझाक करतात हे मांडून जणू काही तेवढे पुरेसे नाही म्हणून त्यांनी कादंबरीच्या शेवटी लांब संदर्भ-सूची जोडली आहे. कादंबरीचा अगदीच हिंदी सिनेमा करून टाकला आहे अशी मिश्कील टिप्पणी करून टाकसाळे म्हणतात कादंबरीची पात्र आणि आशय खूपच तकलादू असल्यामुळे लेखकाने अतिशयोक्तीचा वापर केला आहे की काय अशी शंका येते. हिंदू-मुस्लीम विवाहाचे अपयश, अनेक वर्षांनी मुलीला झालेली उपरती, वडिलांच्या मुस्लीम विरोधाचे उमगलेले सत्य, तिच्या कादंबरीला प्रकाशक न मिळणे, परीक्षक न मिळणे, यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रश्न उभे करणे, सारेच अतिरंजित! अति-उजव्या विचारांच्या अनेक कथा, सिनेमे, नाटके, कादंबर्यांचे भरपूर प्रकाशन, प्रचार होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा कुठून येतो? भैरप्पांच्या आवरणच्याच २२ आवृत्या निघाल्या आहेत हे सांगून टाकसाळे आजच्या कर्नाटकात अश्या कादंबरीचे यशस्वी होणे यात काय नवल हा प्रश्न विचारतात. आपल्याकडे नेमाड्यांसारखे लेखक आहेत म्हणून अभिमान वाटतो, असेही ते जाता जाता सांगतात. ‘एकाच दौऱ्यात पक्षीच पक्षी’ या लेखात आपल्या खुसखुशीत लेखणीने टाकसाळे राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याचे वर्णन आणि चिकित्सा करतात. या एका दौऱ्यामुळे उद्धव ठाकर्यांना इटलीतला मुसोलिनी आठवतो, लोकशाहीचे महत्व आठवते, याची खिल्ली उडवताना टाकसाळे म्हणतात की हिटलर आणि मुसोलीनीचे सतत कौतुक करणाऱ्या बाळासाहेब आणि राज यांच्या पक्षांना लोकशाहीची आठवण करून देणे हेच राहुल यांच्या दौऱ्याचे यश म्हणायला हरकत नाही. समस्त शिवसेना आणि त्यांचे उच्च पदस्थ सैनिक अतिशय प्रक्षोभक भाषा वापरत होते. मनोहर जोशींनी तर संसदेचा अनुभव घेऊन सुद्धा लोकशाहीचा वारा आपल्या जवळपास फिरकू दिला नाही याचे कौतुक करावे तितके थोडे! राहुल यांच्या दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये उत्साह दिसून आला. एरवी सायलेंट असलेल्या या मेजॉरीटीचं दर्शन झालं. लोकलमधून प्रवास करताना एवढ्या गर्दीतून त्यांच्याविरुद्ध एकही घोषणा दिली गेली नाही, उलट त्यांच्या या धैर्याला लोकांनी भरभरून दाद दिली. मराठी माणूस आणि त्याची पाठराखण करण्याचा सतत उद्घोष करणाऱ्या सामनाच्या संपादकांना मालेगावच्या अतिरेक्यांच्या समर्थनार्थ लिहिल्या लेखात हेमंत करकरेंची कोणत्या भाषेत संभावना केली होती हे लक्षात असेलच. मराठी माणूस इतक्या लवकर हे विसरणार नाही असे बजावून टाकसाळेंनी शिवसेनेच्या बनावट हिंदू प्रेमाची चांगलीच पोल खोलली आहे. स्तंभलेखक राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने गृहमंत्रालय आणि पोलीस यांनी ठरवले तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था छानच सांभाळू शकतात याचा प्रत्यय आला असेही जाता जाता मिश्किलपणे नमूद करतात.

तिरपागडं सदराच्या ‘मिठीत गाढव न्हालं!’ या लेखात टाकसाळे राहुल महाजनच्या रियालिटी शो मधील विविध ‘थेरां’बद्दल टीकात्मक टिप्पणी करतात. पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी कुणी किती पातळी सोडून वागू शकतो आणि तरीही केवळ राजकारणी घराणे आणि सहयोगी यांच्या मुळे सर्व पापांचं पुण्यात रुपांतर होतं! रियालिटी शोमध्ये भाग घेऊन तर तुम्ही कुणीही असा, कितीही दुष्कृत्य तुमच्या नावावर असुद्या, तुम्ही सेलिब्रिटी झालाच म्हणून समजा. भाजप आणि संघवाले संस्कृतीविषयी एवढे जागरुक, पण असल्या प्रकरणांमध्ये त्यांची भूमिका ‘आपल्या’ पोरांना सांभाळून घेण्याचीच दिसते. तर अशा या राहुल महाजन नावाच्या राजपुत्राची ही कर्मकथा. त्याचे वर्णन टाकसाळे असे करतात – वय ३५ वर्षे, बायकोने नवरा छळ करतो म्हणून पोलिसात तक्रार करून घटस्फोट घेतलेला, ड्रग्स घेनारा, बेजबाबदार, राजकारणी वडिलांचा आपल्याच भावाकडून खून, बहिण राजकारणात, याचा व्यवसाय टीव्ही वर एन्टरटेनर, इत्यादी. रियालिटी शोमध्ये स्वत:चे स्वयंवर रचून वधू शोधण्याची त्याची ही कथा. अनेक स्त्रियांशी लग्नाची वचने देऊन फसवणूक करणे, व्यवस्थित कार्यक्रमात अफेयर्स करणे, या सगळ्याला भरपूर प्रसिद्धी देत टीव्ही चॅनेलांचे पैसे कमावणे, प्रेक्षकांनी हे सगळं अगदी चव घेत घेत सहकुटुंब पाहणं, सारंच वर्णन कोळसा उगाळावा तितका काळा ही म्हण सार्थ करणारं. अशा स्वयंवरांना भरपूर विवाहेच्छू मुलींच्या रांगा लागणं, हे ही विशेष. इतकंच नाही तर जी मुलगी निवडली गेली आणि तिच्याशी लग्न लागलं, तिलाही त्याच्या रंगेल वर्तनाबद्दल काहीच आक्षेप नाही. आजचा मीडिया या सर्व प्रकाराला प्रतिष्ठा देऊ करत आहे, असे नमूद करून टाकसाळे म्हणतात की मध्यमवर्गीय नीतिमत्तेचा एक विशिष्ट पैलू या निमित्ताने समोर आला आहे.

‘सांस्कृतिक धोरणांचा खेळखंडोबा!’ या लेखात टाकसाळे संस्कृती या शब्दाचे लोक लावत असलेले विविध अर्थ आणि अनर्थ आणि त्यामुळे होणारे गोंधळ याचा छानच समाचार घेतला आहे. निमित्त आहे महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक धोरणाचा मसुदा लोकांसाठी विचारार्थ नेट वर ठेवला आहे. नाटककार, संगीतकार, कवी, चित्रपट बनवणारे, काही विद्वान, काही कार्यकर्ते तर काही राजकारणी अशी मिळून ही धोरण बनवणारऱ्याची समिती, आणि तिचे अध्यक्ष प्रा. आ.ह.साळुंखे. तर समितीतील बहुतेक जण आपापल्या कार्यक्षेत्रात प्रचंड बिझी असल्यामुळे असल्या समिती वगैरे टाईप रिकामटेकड्या उद्योगात फिरकतील अशी फारशी आशा नाही. वास्तविक कला क्षेत्रात भरपूर अनुभव आणि प्रयोग केलेले आणि अधिकारवाणीने त्यावर काही मांडू शकतील असे अनेक कलाकार राज्यात असताना त्यांना वगळून ही समिती महाराष्ट्रच सांस्कृतिक धोरण कस ठरवणार हे कोडं टाकसाळे यांना पडलं आहे. म्हणून मग त्यांना वाटतंय की शासनाला संस्कृती या शब्दाचा दुसराच कोणता तरी अर्थ अभिप्रेत आहे की काय? म्हणजे इथे संस्कृतीचा अर्थ हिंदीत ज्याला सभ्यता म्हणतात, इंग्रजीत सिवीलायझेशन म्हणतात, ते. म्हणजे झुंडशाही करून करून जी संस्कृती वाचवण्याचा अथक प्रयत्न अनेक राजकीय पक्ष करतात ती संस्कृती. संस्कृतीचा हा अर्थ खूपच पसरट असल्यामुळे मग सांस्कृतिक धोरणाच्या या मसुद्यात भाषा, बोलीभाषा, महिलांचे प्रतिनिधित्व, खेळ, खाद्यसंस्कृती, शाळांमधून होणारी कॉपी, आंतरजातीय-धर्मीय सामंजस्य असे अनेक आभाळाखालचे वाट्टेल ते विषय आले आहेत. विशेष मनोरंजक बाब म्हणजे मसुद्याच्या शेवटी परिशिष्ट देऊन त्यात काही ‘अप्रयोगार्ह’ शब्दांची यादी दिली आहे. उदा. ‘चांभार चौकशा’ ला पर्याय दिला आहे ‘नसत्या चौकशा’. ‘च्यायला’ साठी ‘अरेच्च्या’ किंवा ‘खेळखंडोबा’ साठी ‘विचका’ असे पर्याय सुचवून मोठे सांस्कृतिक योगदान देण्याचा समितीचा मानस आहे. संस्कृतीचा असा व्यापक अर्थ लावल्यामुळे आता विविध कलांचा ‘खेळखंडोबा’ (नाही, नाही ‘विचका’) तर झाला नाही ना, अशी एक शंका टाकसाळे व्यक्त करतात.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चालू वादावर आपल्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तिढा’ या लेखात गंभीर चिंतन मांडतानाही टाकसाळे आपली खुसखुशीत भाषा वापरून मजा आणतात. काव्यमहोत्सवातही सर्वदूर कविताच कविता असावी तिथेही एक सत्र फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चर्चेवर ठेवावे लागणे, अशी काय गरज येऊन ठेपली असावी? याचा संबंध तेव्हा वारकऱ्यांनी आनंद यादवांना आपल्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याबद्दल माफी मागायला लावली, याच्याशी असावा. यादवांनी माफी मागितलीही, आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वाचवायचा अयशस्वी प्रयत्न केला. समाजात अनेक प्रकारचं आक्षेपार्ह साहित्य प्रकाशित होतच असत. गांधी, नेहरू यांच्याबद्दल तर गलिच्छ मजकुराची बाजारात वानवाच नाही. टाकसाळे अभिव्यक्ती बद्दल एक महत्वाचे निवेदन करतात, ते म्हणजे, आपण राहतो त्या समाजातील परिस्थितीच योग्य भान असणं आणि त्यानुसार जबाबदारीने लेखन करणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे, असायला हवा. महात्मा फुले किंवा विजय तेंडुलकरांनी वेळोवेळी समकालीन समाजाला न पचणारे लेखन करून प्रस्थापित समाजव्यवस्थेला भरपूर धक्के दिले आणि त्याची तेवढीच किंमत मोजली. जबाबदारीच भान ही कल्पना साचेबद्ध नाही. स्थळ-काळानुसार लिखाणाचे मापदंड बदलतात. कोणत्याही कलेचा वाचक किंवा आस्वादक हा ही तेवढाच प्रगल्भ असणे अपेक्षित आहे. समाजाची साहित्याविषयीची, कलेविषयीची जाण वाढण, त्यासाठी आवश्यक ते प्रबोधन होणं महत्वाच आहे. नाहीतर काय, कोणत्या ना कोणत्या गटाच्या भावना सतत दुखावत राहतातच. अशा वेळी हा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा तिढा सुटावा तरी कसा?

आनंद यादवांच्या लिखाणाच्या निमित्ताने त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित केल्यानंतर मात्र टाकसाळे आपल्या ‘आनंद यादवांचा ‘मॅजीक रिअॅलीझम’’ या लेखात यादवांच्या कादंबरीत प्रचुर प्रमाणात पेरलेल्या मॅजीक रिअॅलीझम (कल्पना वास्तव) च्या घटनांचा समाचार घेतात. ही कादंबरी यादवांनी ‘संशोधनपूर्वक सिद्ध केलेल्या वास्तववादी तथ्यांचा’ वापर करून लिहिली आहे म्हणे. ज्या काळात स्त्रिया घराबाहेर सहज पडूही शकत नव्हत्या त्या काळात त्या तुकारामांना उधारीसाठी हस्तस्पर्श करून जात, किंवा धाकटा भाऊ तुकारामांना ‘तुकादा’ असे ‘सचिनदां’च्या धर्तीवर बंगाली पद्धतीने हाक मारत असे, इत्यादी स्वरूपाच्या ‘वास्तवांचे’ दाखले देऊन यादवांनी बहार आणली आहे हे सांगून टाकसाळे ही कादंबरी तुकारामांवर असूनसुद्धा किती आधुनिक आहे, अशी तिची खिल्ली उडवतात. तर, यादवांच्या कादंबरीवर टिप्पणी करण्याचे निमित्त होते मराठी साहित्यक्षेत्रातील राजकारण. एक वैश्विक मराठी साहित्यसंमेलन दुबई येथे भरवणार अशी घोषणा झाली काय आणि अनेक साहित्यिक तिथे आपली वर्णी लागावी म्हणून फिल्डिंग लावण्यात गुंतून गेले. अर्थात मग या संमेलनाचे अध्यक्ष कोण होणार यावरही भरपूर चर्चा, राजकारण हे सर्व ओघाने आलेच. जाता जाता टाकसाळे अशा संमेलनांना प्रायोजिक करणाऱ्या कंपन्यांनाही टपली मारून घेतात.

पुण्यात होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर टाकसाळे यांनी या सदरात दोन लेख लिहिले आहेत. ‘’प्रतीकात्मक’ अ.भा.म.सा.सं.’ या नावाने लिहिलेल्या लेखामध्ये टाकसाळे संमेलनाच्या अनेक रंगतदार व्यवहारांवर खुसखुशीत टिप्पणी करतात. संमेलनाच्या निमित्ताने राबवण्यात येणारे विविध उपक्रम आणि परिणामी निर्माण झालेले पुण्यनगरीतील मंगलमय वातावरण तसेच आयोजनात सुधारणा करण्यासाठी साहित्यिकांकडून मागवण्यात आलेल्या सूचना यातील नाविन्याचे कौतुक टाकसाळे करतात. पण त्याच वेळी ते साहित्यिकांच्या बसल्याजागी सूचना करण्याच्या या कृतीशून्य कार्यक्रमावर ताशेरे ओढायला कमी करत नाहीत. हारतुर्यांना फाटा देऊन सत्कारासाठी पुस्तके देण्याचाही उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्या निमित्ताने का होईना साहित्यिक मंडळी इतरांची पुस्तके वाचतील अशी आशा टाकसाळे करतात. संक्रांतीला पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे पतंग बनवून उंच हवेत उडवण्याच्या उपक्रमामुळे तर अनेक साहित्यिक हवेत जातील अशी मार्मिक टिप्पणी टाकसाळे करतात. अशाच इतात अनेक उपक्रमांची एकीकडे टवाळी करत करत त्यांचे कौतुकही आपल्या खुमासदार लेखणीतून लेखक करतात. ते करताना संमेलन, त्यातील राजकारण, साहित्यिक, प्रकाशक, राजकारणी यांचे हितसंबंध सर्वांबद्दल वाचकाला भरपूर माहिती होते आणि प्रत्यक्ष संमेलनात सहभागी होण्याची उत्सुकताही निर्माण होते.

पुण्यात होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरील आपल्या दुसऱ्या लेखात ’८३ व्या अ.भा.म.सा.सं. च्या निमित्ताने...’ टाकसाळे पुण्यातील या संमेलनाच्या भव्य दिव्य स्वरूपावर लिहित आहेत. इथे तर समारोपाला अमिताभ बच्चन सुद्धा उपस्थित राहून गेले, आणि जाता जाता नावच वाद उपस्थित झाला. मोदींच्या गुजरातचे ते ब्रान्ड अम्बेसडर झाले. त्यामुळे कॉंग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री समारोपाला हजर राहिले नाहीत. या निमित्ताने इंग्रजी आणि हिंदी वाहिन्यांचे लक्ष संमेलनाकडे वळले हे ही नसे थोडके. खऱ्या अर्थाने संमेलन अखिल भारतीय झाले. अमिताभ वर खुसखुशीत टिप्पणी करताना लेखक म्हणतात, त्या बिचाऱ्या पोटार्थी नटाला राजकीय भूमिका घ्यायला लावणे हा त्याच्यावर अन्याय आहे. तो काय विचारवंत आहे की त्याला असल्या गोष्टींचा विचार पडेल? जो पैसे देईल, तिथे तो जाईल. आणि त्याचं काम त्याने चोख केलं. आणि नाही म्हटलं तरी त्यांचे वडील तर साहित्यिक होते ना. तर महानायकासमोर सारे साहित्यिक खड्यासारखे बाजूला पडले. तरुणांना संमेलनाकडे आकर्षित करण्यासाठी वगैरे अशा गोष्टी कराव्या लागतात. टाकसाळे सूचना करतात की पुढच्या वेळी मंडपाबाहेर रोलर कोस्टर, उंच पाळणे, घसरगुंड्या इत्यादी पण ठेवाव्यात, म्हणजे लहान मुलांनाही लहान वयातच साहित्याची गोडी लागेल.

हमशक्कल

मिळून साऱ्याजणीच्या अंकांच्या विविध सदरांमधून जे अनेकविध विषय हाताळले गेले आहेत त्यातलं एक अत्यंत गंभीर अश्या विषयांची हाताळणी करणारं सदर म्हणून हमशक्कल कडे पाहावे लागेल. २०१९ मधल्या अंकांमधून प्रसिद्ध झालेली ही लेखमाला, गंभीर विषय तरीही सर्वसामान्य वाचकाला समजेल उमजेल अश्या भाषेत आणि शैलीत मांडते. सागर मुक्ता यांनी अभ्यासपूर्ण भाष्य यातील विषयांवर केलं आहे.

हमशक्कल सदरातील ‘ग्रामीण भारताची परीकथा’ ह्या लेखात लेखिका भारतातल्या खेड्यांमधली परिस्थीती, खेड्यातून, अतिदुर्गम भागातून जगणारी माणसं, त्यांची जीवनशैली, त्यांचे दैनंदिन प्रश्न, ह्यांची मंडणी करतात. त्याचवेळी देशतील एकूण ९२ टक्के लोकसंख्येच अस्तित्व कसं पडद्यामागे लपवून ठेवलं जात आहे हे सुद्धा उधृत करतात. पण असं करताना त्यात निव्वळ नैराश्येचा सूर दिसून येत नाही. आशेचा किरण असणाऱ्या "परी" (Peoples Archive of Rural India) ह्या संस्थेबद्दल त्या या लेखात विस्तृत लिखाण करतात. 'परी'ने गोळा केलेल्या ओव्या असोत, आपल्या वृत्तपत्रातून ते जगाला दाखवत असलेला आजतागायत अपरिचित राहिलेला भारत असो, त्यांनी ग्रामीण भागात वाटलेले कॅमेरे असोत वा त्या कॅमेऱ्याच्या निमित्ताने समोर आलेली जयम्माची आणि तिच्यासारख्या अनेकांची थरारक पण विदारक गोष्ट असो की मुलांच्या शाळेच्या वाटेने जाणारा बिबट्या आणि त्याच्या पावलांच्या ठश्यांना तुडवत जाणारी मुलं ह्यातला संघर्ष असो, 'परी'च्या आणि 'पी साईनाथ' यांच्या कामातून हे सगळं जगासमोर येत आहे आणि ते काम सागर मुक्ता यांनी या लेखातून मांडलं आहे.

आज तंत्रज्ञानाने माणसाच्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात बदल घडून आला आहे. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात विविध उपकरणांचा शोध मानवाने लावल्याने त्याच्या आयुष्यमानात आणि आयुष्याच्या दर्ज्यात कितीतरी सुधारणा झाली आहे. परंतु ह्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या एकंदर खर्चाचा आवाका बघता, अगदी शहरी भागातही हे तंत्रज्ञान आर्थिक दृष्ट्या सामान्य जनतेला परवडणारं नाही. अश्या परिस्थितीत ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात काय परिस्थिती असेल ह्याची कल्पना करणेही अवघड आहे. याच परिस्थितीच वास्तव सदरातील मांडताना सागर- मुक्ता ह्यांनी 'जन स्वास्थ्य सहयोग' या लेखात दिल्लीतल्या IIMS ह्या वैद्यकीय क्षेत्रातल्या अग्रणी संस्थेतल्या काही तज्ञांचे कार्य उलगडून दाखवले आहे. छत्तीसगढ मधल्या बिलासपुर मधील गणीयारी या गावामध्ये 'जन स्वास्थ्य सहयोग' हि संस्था निर्माण करून काम सुरु केल्यानंतर आलेल्या अनंत अडचणींवर मात केलेले कार्य किती मोलाचे होते हे या लेखावरून लक्षात येते. उदा. नवनवीन तंत्रज्ञान प्रचंड महाग असताना त्याच तंत्रज्ञानाच्या तोडीची उत्पादने कमीतकमी किमतीमध्ये आपण कशी विकसित करू शकू ह्याचा सतत विचार आणि त्यावर केलेली यशस्वी कृती असो की पाणी शुध्द की अशुध्द कसं ओळखावं हे दाखवून देणारी कागदाची चकती असो आणि त्यानंतर पाणी अशुद्ध असलं तर, पाणी प्यायचं कुठलं ह्या प्रश्नाच उत्तर देणारं तंत्र असो, आणि तरीही कोणी अशुध्द पाण्यामुळे अतिसाराने आजारी पडलाच तर अगदी कमीतकमी किमतीमध्ये तयार झालेलं ओ आर एस संस्थेकडे उपलब्ध असतंच. त्याशिवाय ग्रामीण भागात नेहेमीच उद्भवणारे साप, विंचूंचे आणि इतर प्राण्यांचे दंश ह्या समस्यांवर त्याचं निदान करणारे कीट असो अथवा सिकल सेक अमेनिया ह्या आदिवासी भागात आढळणाऱ्या रोगावर चाचण्या करण्यासाठी लागणारी उपकरण निर्मिती असो, असे अनेक शोध, निर्मित्या ह्या संस्थेने केल्या आहेत. ह्यामुळे ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन काही प्रमाणात सुसह्य झाले आहे. तरीही काहीवेळा ह्या संस्थांना आर्थिक चणचण भासतेच. अश्या वेळी आपण काही करू शकू का? असा प्रश्न साहजिकच वाचकांच्या मनात उभा राहतो.

हमशक्कल या सदरातील हा एक महत्वाचा लेख. स्त्रियांनी खेळ खेळले पाहिजेत का? असा प्रश्न विचारला तर, "हो, फुगडी वैगेरे खेळायला हरकत नाही" असे उत्तर देऊ शकेल असा एक वर्ग नक्कीच आहे. मागास, बुरसटलेल्या पुरुषप्रधान विचारसरणी असलेल्या समाजाचे हे प्रतिनिधी. अश्या परिस्थितीत, स्त्रियांनी मुलींनी खेळ खेळलेच पाहिजेत, त्याचे अनेक शारीरिक, मानसिक, सामाजिक फायदे असतात हे दाखवून देताना सागर- मुक्ता त्यांच्या 'हमारी छोरियां छोरो से कम है क्या' ह्या त्यांच्या लेखात जगभरात ह्या संदर्भात होत असलेल्या कामाचा आढावा घेतात. लहान मुलींना एका विशिष्ट वयापर्यंत खेळू देणारा समाज अचानक मुलीचे वय वाढले की कसा बदलतो, मुलींना मुलांच्या सोबतीला न खेळू देणे, त्यांना मैदानी खेळ खेळू न देणे ह्या गोष्टी किती साहजिक झाल्या आहेत याचं विदारक सत्य मांडताना सागर- मुक्ता 'वुमेन विन' ह्या संस्थेबद्दल लिहितात आणि त्याचबरोबर ह्या प्रश्नावर जगात चाललेल्या कामावरही प्रकाश टाकतात. वुमेन विन ह्या संस्थेने हे काम करताना जगातल्या या प्रश्नावर काम करणाऱ्या अनेक संस्थांना एकत्र जोडून घेतले आहे. ह्या सगळ्या संस्थांना मार्गदर्शन करतानाच दक्षिण सुदान सारख्या देशातही युद्धाच्या अत्याचारामुळे देश सोडून आलेल्या महिला, मुलींसाठी एक कार्यक्रम राबवला आणि त्यांना खेळ खेळावयास लावून त्यांच्या मानसोपचार आणि समुपदेशन याकडे लक्ष दिले. ह्या त्यांच्या प्रयत्नाना यश येऊन अनेक मुली, महिला ह्या संस्थेशी जोडल्या गेल्या. पुरुष आणि महिला यांच्या खेळांकडे पाहताना आजही कसा आर्थिक भेदभाव केला जातो हे दाखवताना, अमेरिकेने उचललेल्या स्तुत्य पावलाबद्दल ह्या लेखात लेखिका लिहिते. 'टायटल ९' ह्या कायद्याने अमेरिकेने हा भेदभाव कसा संपुष्टात आणला, त्यामुळे झालेले परिणाम, स्त्रियांचा अनेक अंगाने झालेला विकास ह्यामुळे एक सकारात्मक बदल घडायला कशी सुरवात झाली आहे हे दाखवताना लेखिका दंगल सिनेमातल्या आमिरच्या संघर्षाचाही दाखला देतात. परंतु हा प्रयत्न जिद्दीने पुढे नेल्यास समाजमन बदलते हे सांगताना त्यांनी मोठी आशा निर्माण केली आहे.

गांधीजींच्या कर्मभूमीत जन्माला आलेली 'रिसायकल ग्रीन' ह्या हार्दिक शहा यांच्या संस्थेबद्दल 'रिसायकल ग्रीन की भविष्यातले पर्यावरणप्रेमी अॅमेझॉन' ह्या त्यांच्या लेखात स्तंभलेखिका सागर- मुक्ता एकंदरच पर्यावरण संबंधी मानवाने केलेली नासाडी, नुकसान आणि ऱ्हास या मुद्द्यांवर प्रकाश टाकतात. मानवी आयुष्यात अविभाज्य असे स्थान निर्माण केलेली अनेकाविध विद्युत व इतर उपकरणं, यांच्या अतिवापराने निसर्गावर काय परिणाम झाला आहे हे अगदी संशोधकांना देखील नीटसे समजलेले आहे का? असा प्रश्न त्या उपस्थित करतात आणि निसर्गाच्या ऱ्हासाला निसर्ग कशी उत्तरे देतो आहे, त्यामुळे मनुष्यप्राणी आणि अन्य जीवमात्र ह्यांचे होणारे अपरिमित नुकसान ह्याबद्दल चिंता व्यक्त करतात. 'रिसायकल ग्रीन' ही संस्था मनुष्यप्राण्याची गरज भागवणारी कोणतीही वस्तू निर्माण करताना त्यामुळे निसर्गाचा कसा कमीतकमी ऱ्हास होईल ह्याचा विचार करते. त्यांनी अशी अनेक आकर्षक उत्पादने त्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. स्टूल, बाटल्या, कपडे, पेन अशी छोटी छोटी उपकरणं बनवताना त्या वस्तू जमिनीत पेरण्यायोग्य बनवल्या आहेत. पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी सगळ्यांचीच आहे परंतु एकंदर त्याकरता लागणाऱ्या संसाधनांचा आवाका, मनुष्यबळ इत्यादींचा विचार करता सामान्य माणसापेक्षा त्याची जबाबदारी उद्योजक आणि नेत्यांची असल्याचे मत शहा याचं असल्याचं ते सांगतात. त्याची योग्य कारणंही ह्या लेखात व्यवस्थित मंडळी गेली आहेत. शहा यांनी रिसायकल ग्रीन च्या माध्यमातून बनवलेल्या वस्तू कश्या कमीत कमी नुकसान करणाऱ्या आहेत हे त्यांच्या वस्तूंच्या खरेदीतून लगेचच सांगितले जाते. एकंदरीतच ह्या संथेचे कार्य पाहता आपण थोडे सगज झालो तर पर्यावरणाचा निश्चितच सांभाळ करू शकू अशी आशा निर्माण होते.

हे सदर देशातील विविध संस्था, संघटनांची माहिती देताना विस्मय वाटावा अशा नव-नव्या शोधांचे, मनुष्याच्या कल्पकतेचे वर्णन करते. संगणक मनुष्याच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. संगणकाने आपल्याला इंटरनेट दिलं आणि आपण जगाशी जोडले गेलो. जगातली कुठलीही माहिती आपल्याला कुठेही मिळण्याची सोय ह्या इंटरनेटने दिली. जे प्रश्न आपल्याला माहित आहेत त्या प्रश्नाची उत्तरं आपण इंटरनेटवर शोधतो, देतो. परंतु अशी अनेक तथ्ये आहेत, पश्न आहेत ज्याची कल्पना सिलिकॉन व्हॅलीमध्ये बसून येत नाही. मग अश्या प्रश्नांची उत्तरं, माहिती आपल्याला इंटरनेटवर कशी मिळणार? ह्या प्रश्नातूनच जन्म झाला रवी कुमार यांच्या 'कोड फॉर नेपाळ' ह्या संस्थेचा. सागर मुक्ता यांनी 'कोड फॉर नेपाळ' या लेखात संगणक, कोडींग आणि सामाजिक प्रश्न सोडवण्याकरिता होऊ शकणारे त्याचे उपयोग सांगताना रवी कुमार यांच्या संस्थेच्या निर्मितीची कहाणी सांगितली आहे. संगणकाचा आत्मा म्हणजे कोडींग. ज्याला कोडींग येतं त्याला संगणकाचा उपयोग कसा केला जाऊ शकतो याचे लाखो पर्याय दिसू शकतात. रवी यांना अमेरिकेत शिकताना, काम करताना त्यांच्या देशातल्या अनेक समस्या आणि त्यावरची संगणकीय उत्तरे दिसू लागली आणि त्यांनी 'कोड फॉर नेपाळ' हि संस्था उभी केली. नेपाळमधला २०१५ चा भूकंप असो, प्रचंड थंडी असो अश्या अनेक प्रश्नांवर त्यांनी 'राहत पायो?' 'ब्लॅंकेट फॉर नेपाळ' अश्या संगणकीय प्रकल्पातून उत्तरं शोधली. हे अवघड कार्य साध्य करताना रवी ह्यांनी स्थानिक तरुणांना कोडींग शिकवलं. याचा उपयोग कसा झाला ह्याची माहिती फार रोचक आहे. संगणकाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग समाजाच्या तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी होऊ शकतो, परंतु गरज आहे ती असे प्रश्न दिसण्याची, समजण्याची आणि ते सोडविण्याच्या इच्छाशक्तीची.

अमेरिकेसारख्या देशासाठी खरंतर राजरोस होणारा गोळीबार नवीन नाही पण अलीकडेच फ्लोरिडामधल्या मार्जोरी स्टोनमन नावाच्या शाळेत एका माथेफिरूने १७ लोकांचा बळी घेतला. त्या घटनेचा धागा पकडून सागर मुक्ता हमशक्कल मधील आपल्या 'निज शैशवि प्रौढत्वास जपणे!' या लेखातून पौगंडावस्थेतील मुलांची, प्रौढांच्या चुकांची आणि त्याच्या परिणामांशी असलेली लढाई ह्यावर भाष्य करतात. मार्जोरी स्टोनमन शाळेतल्या घटनेनंतर अमेरिका ढवळून निघाली. माणसांपेक्षा बंदुका जास्त ह्या समस्येशी झगडायचं तरी कसं? असा प्रश्न असताना उभा राहिला तो पौगंडावस्थेतील मुलांचा वर्ग. ज्यांना अजून मतदानाचा अधिकार नाही अश्या मुलांनी अमेरिकेतल्या ह्या बंदुकांच्या प्रश्नाशी दिलेली झुंज, 'नेव्हर अगेन' ही व्हर्च्युअल मोहीम, त्या मोहिमेला मिळालेला अभूतपूर्व पाठींबा, मिडीयाने उचलून धरलेली ही मोहीम, आणि अखेर ह्या मुलांनी काढलेला प्रचंड मोर्चा, आणि त्यातून त्यांनी राज्यकर्त्यांसमोर ठेवलेला 'पीस प्लॅन'. सगळंच अगदी अविश्वसनीय. ह्याच लढ्याप्रमाणे ग्रेटा थनबर्ग ह्या छोट्याश्या मुलीने उभारलेला पर्यावरण ऱ्हासा विरोधी उभारलेला लढाही अचंबित करणारा आहे. प्रौढांनी केलेल्या चुकांची त्यांना नसली तरी त्यांच्या पुढील पिढीला जाणीव आहे, त्या चुका निस्तरायला हव्यात, दुरुस्त करायला हव्यात ह्यासाठी त्यांचा लढा आहे. हा लढा सागर मुक्ता ह्या लेखात उलगडून दाखवतात.

आज जगात सर्वात मोठी समस्या कोणती असं विचारलं तर खरं तर अनेक समस्यांची मालिका तयार होईल. पण सर्वात मोठी समस्या आहे 'पाण्याच्या दुर्भक्ष्याची'. आणि ही समस्या किती मोठी आहे हे लक्षात येत ते सागर मुक्ता यांच्या ‘आफ्रिकेतील पाण्याचा ड्रम‘ या लेखातून. त्या म्हणतात जगातील ७५ टक्के लोकांना पाण्याची सहज उपलब्धता नाही. एवढ्या एका वाक्यावरून ह्या समस्येची व्याप्ती लक्षात येते. ह्या समस्येमुळे स्त्रियांचे आरोग्यविषयी प्रश्न, मुलांचे शैक्षणिक प्रश्न ह्या लेखातून मांडले आहेत. परंतु फक्त प्रश्न न मांडता त्यांनी ह्यावर लढवलेल्या एका शक्कलेचीसुद्धा माहिती दिली आहे. पेत्झर आणि जोन्कर या अभियंत्यांनी तयार केलेल्या हिप्पो रोलिंग वॉटर ड्रमने हा प्रश्न सोडवला नसला तरी सुसह्य तरी केलेला आहे. ह्या ड्रमबद्दल ह्या लेखात रोचक माहिती दिलेली आहे. ह्या ड्रम मुळे स्त्रिया किमान गाणं म्हणत तरी पाणी आणू शकतात.

आपल्या शहरात, वस्तीत, सोसायटीत, घरात कचरा गोळा करणारे नसतील तर? ह्या प्रश्नाची कल्पनाही करवत नाही इतकी आपल्याला स्वच्छता कामगारांची गरज आहे. पण ह्या स्वच्छता कामगारांचे जीवन कसे असते, त्यांच्या समस्या काय आणि मग त्यातून जन्म झालेला 'हसीरु दला' नावाच्या पर्यायाची माहिती सागर मुक्ता सदरातील ‘हसिरू दला स्वच्छता आणि सौंदर्याचा वारसा’ या लेखातून करून देतात. तुटपुंजा पगार, अस्थैर्य, अनारोग्य, अशिक्षितपणा, अश्या अनेक समस्यांमधून हा सफाई कर्मचारी जात असताना त्याला किमान समाजव्यवस्थेकडून योग्य वागणूक तरी मिळते आहे का? तर ती ही नाही. लैंगिक छळ, मारहाण, चोर म्हणून संबोधणे, नाक मुरडणे, अश्या अनेक समस्यांना सामोरे जात असतानाही ही मंडळी त्यांचं काम बिनबोभाट करत असतात. त्यांच्या संघटना असतीलही पण त्या देखील एका मर्यादेपलीकडे जाऊन ह्या माणसांचा विचार करीत नाहीत.

नेमकी हीच बाब लक्षात घेऊन कर्नाटकातल्या बेंगळूरमधील एका संघटनेने त्यांच्या मर्यादा ओलांडून जाण्याकरिता 'हसीरु दला' म्हणजेच 'हरित सेना' हि संघटना उभी केली. ह्या संघटनेच्या निर्मिती पासून ते अगदी स्वतःची कंत्राटे घेण्यापर्यंतचा प्रवास ह्या लेखात स्तंभ लेखिकेने मांडलेला आहे. सध्या ह्या संघटनेची 'हसीरु दला इनोव्हेशन' नावाची यंत्रे निर्माण करणारीसुद्धा संस्था आहे. लेखात मांडलेला 'हसीरु दला'चा प्रवास वाचनीय आहे, ठाणे शहरात जी समस्या अस्तित्वात नाही, त्या समस्येमुळे ठाण्यापासून काही किलोमीटर अंतरावर लोक मरत होते. विशेषतः तरुण आणि गर्भवती महिला. मिश्किन इंगवले आणि अभिषेक सेन हे दोन मित्र ह्या विदारक सत्याने अस्वस्थ झाले आणि जन्म झाला टच-बी चा. रक्तामधल्या लोहाचं प्रमाण मोजण्यासाठी तयार झालेलं छोटंसं तंत्रज्ञान. ह्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीचा प्रवास सागर मुक्ता यांनी त्यांच्या ‘ग्रामीण महिलांकरिता वरदान ‘टच-बी’ ’ या लेखात मांडला आहे. एका मित्राची आई आदिवासी पाड्यात लोहाचं प्रमाण कमी असल्याने आणि त्याचं निदान वेळेत न झाल्याने माणसं मरत असल्याची गोष्ट सांगते काय आणि त्यामुळे अस्वस्थ होऊन ही दोन मुलं झपाटून कामाला लागतात काय, त्यांना एका शिक्षकाची साथ मिळते काय आणि त्यानंतर अथक प्रयत्नातून तरीही अनेक वेळा अपयशी ठरून एक एका हातात मावणारं तंत्रज्ञात विकसित होतं काय! आणि अशा ह्या संशोधनातून अनेक लोकांचे प्राण वाचतात हे सगळच अचंबित करणारं आहे. जगप्रसिध्द टेड टॉक मध्ये जगाला ही कहाणी सांगून आलेल्या मिश्किन इंगवले आणि त्याचा मित्र अभिषेक सेनची ही कहाणी अत्यंत प्रेरणादायक आहे.

बळीराजा-राणीचं चांगभलं

कृषी जीवनासंबंधी छोट्या छोट्या गोष्टी, माहितीपूर्ण लेख आणि कविता या सदरात आपल्याला वाचायला मिळतात. वेगवेगळ्या कवी, लेखकांचे वैविध्यपूर्ण लेख आपल्याला शेतीशी संबंधित अनेक समस्या, प्रश्न, मुद्दे यांच्यावर विचार करायला भाग पाडतात. शायनिंग इंडियाच्या खडखडाटात ग्रामीण भारताचे अस्तित्वच नाही. ग्रामीण जीवन, तिथे राहणारे लोक, तिथले अनेक शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय, तिथले पर्यावरण, कशालाच शासकीय धोरणांमध्ये जागा नाही. सगळा विकास शहर-केंद्रित. त्यामुळे ग्रामीण भागातील बेकारी, दारिद्र्य, कर्जाचा विळखा याला कंटाळून लोकांनी, विशेषतः तरुणांनी शहरांकडे धाव घेतली नाही तरच नवल. अशा विविध प्रश्नांना संबोधन करणारं हे सदर आहे.

या सदरात नंदकिशोर शुक्ल यांनी ‘शेतीचे अर्थशास्त्र’ या नावाने जो लेख लिहिला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलं आहे की ग्रामीण भागातील दारिद्र्य हे स्वाभाविक नसून हेतुपूर्वक लादलेली गोष्ट आहे. वसाहतवादाचेच तत्वज्ञान अजूनही भारतात राबवले जाते. सरकारची नीतीच मुळी इथून तिथून कुठून तरी शेतकर्याची लूट करणे ही आहे. ज्याप्रकारे उद्योगधंद्यांना सरकारचे संरक्षण आणि प्रोत्साहन मिळते, तसे शेतीला मिळत नाही. शासनाच्या धोरणांमध्येच हा फरक आहे. सबसिडी, आयात-निर्यातीच्या सवलती, कमी वीज दर, अल्प व्याजाने कर्ज इत्यादी प्रकारे उद्यागांना मिळते तसेच संरक्षण शेतीला, मत्स्य-व्यवसायाला, पशुपालनाला मिळाले पाहिजे. पण शेतकऱ्यांना उत्पादनखर्चानुसार भाव द्यायला शासन तयार नाही. किंबहुना, शेतकरी आणि ग्रामीण व्यावसायिक कायमच कर्जात राहील, दरिद्री राहील अशीच आर्थिक व्यवस्था शासनाने करून ठेवली आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे शेतीसंबंधी उपायजाहीर होतात, उदा. कर्जमाफी, पण ते केवळ निवडणुकीपुरते असते. अशा घोषणांनी मूळ प्रश्न सुटत नाही, तो मुळातून सोडवण्यात सरकारला रस नाही असे दिसते. लेखक मांडतात की शहरांचे प्रश्न सुटे नाहीत. ते ग्रामीण प्रश्नांशी जैविक पद्धतीने जोडलेले आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारली तर शहरांच्याकडे जाणारा स्थलांतरितांचा लोंढा थांबेल. ग्रामीण तरुण ग्रामीण व्यवसायाकडे आकृष्ट होईल. बेकारी नक्कीच कमी होईल, कारण शेतीमध्ये उद्योगांपेक्षा माणसे सामावून घेण्याची मोठी क्षमता आहे. शेतीचे योग्य अर्थव्यवस्थापन करण्यात सर्वांचाच फायदा आहे.

‘पोशिंद्याचे डोळे न्यायाकडे’ या आपल्या लेखात हर्षाली आंबटकर लिहितात की राजकीय आर्थिक धोरणांनी शेतकरी आणि पगारी नोकरदार यांच्यामध्ये प्रचंड दरी निर्माण करून ठेवली आहे. शिक्षणाच्या संधी असोत की व्यवसायाच्या, हा फरक अधिकच तीव्र होत चालला आहे. हर्षली विदर्भातील शेतकरी महिला आहेत. आपल्या साध्या सोप्या लेखणीने या लेखात त्यांनी शेतकऱ्याची व्यथा मंडळी आहे. सदाभाऊ आणि जाईबाई यांचं आठ लोकांचं शेतकरी कुटुंब. या एका शेतकरी कुटुंबाचे प्रातिनिधिक आयुष्य आपल्यासमोर मांडून त्या विचारतात, सगळ्या जगाचा पोशिंदा शेतकरी स्वत: साठी फक्त थोडी हमी, थोडी सुरक्षितता मागतो आहे. व्यापाऱ्यापासून संरक्षण मागतो आहे. शेती ही अधिकतर निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. पीक अगदी हाताला आले असताना पाऊस येणे, कीड पडणे, पक्षी, पशूंपासून पीकाची नासधूस होणे इत्यादी गोष्टींमुळे शेतकरी खूपदा नुकसानीत जातो. कुटुंबाच्या मुलभूत गरजाही भागत नाहीत. मुलांना शिक्षण, वेळी अवेळी लागणारी आरोग्यसेवा, सुरक्षिततेची भावना या गोष्टी सर्वांना हव्यात. अशा वेळी शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळणे आवश्यक असते. नाहीतर मग आपणच तक्रार करतो की शेतकरी कुटुंबातील तरुण मुले शेती करायला तयार नसतात. केवळ कष्ट आणि कष्ट करून चांगले जीवन आणि सुख मिळणारच नसेल तर कुणीही दुसरे पर्याय शोधेलच. ही परिस्थिती बदलायला हवी. शेतकऱ्यालाही सन्मानाने, प्रतिष्ठेने, समाधानाने जगता आले पाहिजे. तरच देशसुद्धा समृद्ध होईल.

जालन्याच्या शिरीष पद्माकर देशमुख यांनी सदरातील ‘रेघा’ या आपल्या लेखामध्ये कर्जमाफीच्या रांगेत अर्ज भरण्यासाठी आलेल्या एका म्हाताऱ्या शेतकरी महिलेच्या जिजीविषा, आत्मविश्वास आणि चिकाटीचा अनुभव सांगितला आहे. या अनुभवामुळे लेखकाला भारत विरुद्ध इंडिया हे विभाजन किती खोल आणि बहुपदरी आहे याची सणसणीत जाणीव झाली. त्यांना पडलेला प्रश्न की ही दरी कशी मिटवायची, आपल्या सर्वांनाही सतत भेडसावत आहे. मित्राच्या ई-सेवा केंद्रात सहज बसलेले असताना या अस्वस्थ आजीचा अनुभव त्यांच्या समोर उभा ठाकला. ती तीन-चार दिवस रोज चकरा मारत होती पण मशीन तिच्या बोटांवरच्या रेघांना अॅक्सेप्ट करत नव्हते. त्यावर ती म्हणली, रेघा कुठून राहतील? त्या तर कधीच मातीत विरघळल्या खुरप्याच्या मुठीभोवती आवळून आवळून! पण अंगभर काट्याकुट्यातून कामे करून करून ओरबाडल्याच्या ठळक खुणा आहेत. त्या चालतील का बघ तुमच्या मशीनला? त्या खुणा पहायची हिम्मत माझ्यात नव्हती असे सांगून लेखक म्हणतात, कर्ज घेण्याचं म्हातारीच कारण पण किती सचोटीने जगतात ही माणसं हेच दर्शवणारं होत. शहरी लोकांना वाटतं ना की शेतकरी दारूसाठी, लग्नातल्या उधळपट्टी सारख्या अनुत्पादक गोष्टींसाठी कर्ज घेतो. पण म्हातारीच्या कर्जाची गोष्टच वेगळी होती. आणि ही गोष्ट तिच्या एकटीची नाही, प्रातिनिधिक आहे. मुलीच्या लग्नासाठी दहा हजाराचं कर्ज काढलं हिच्या नवर्याने. पण त्यात मुलीच्या सासरचे लोक समाधानी होईनात, म्हणून दीड एकराच्या शेतीच्या तुकड्यावर सावकाराकडून अजून कर्ज उचलावं लागलं. आणि फेडता आल नाही म्हणून जमीन गेली सावकाराच्या घशात. म्हाताऱ्याने मारायच्या आधी बाकी सगळी कर्ज फेडली, हे एक दहा हजाराचं सोडून. त्याची जबाबदारी म्हातारीवर दिली आणि सरकारचं कर्ज फेडल्याबिगर मरू नको म्हनला. पण आता सरकारच माफी देतंय म्हणून रोज येऊन रांगेत उभी राहतेय ही आजी.

कर्जाच्या विळख्यात अडकून आत्महत्या कधी एकट्याने, कधी कुटुंबासह करणाऱ्या शेतकऱ्याच्या वेदनेवर या सदर्तील एक कविता आहे ‘दुष्काळ’. आणि कवियत्री आहेत पुण्याच्या मीनल पाठक. कवितेमध्ये दुष्काळाचे चित्र मोठ्या मार्मिकतेने उभे केले आहे. पाण्यासाठी होणारी वणवण, आणि तरी घोटभर पाणी स्वत:ला आणि मुलांना देता येत नाही, त्यामुळे निराश होऊन मुलाबाळांसह गळफास लावून घेणाऱ्या शेतकर्‍याचे मन मीनलताईंनी अतिशय प्रभावीपणे उलगडले आहे. दुष्काळात शेती तर नाहीच, इतरही कामे मिळत नाहीत. आज चोरी करून पाटलाच्या विहिरीतून पोरांसाठी तांब्याभर पाणी घरी आणलं, पण उद्याच काय? कोणताच मार्ग शिल्लक उरत नाही, साथीला-सोबतीला आधाराला कुणीच नसतं तेव्हा आणि तेव्हाच ना शेतकरी मृत्यू जवळ करील? आणि तोही लहानग्या लेकरांना घेऊन? कुणाच हे अपयश? त्याचं, समाजाच, व्यवस्थेच की सरकारचं?

या सदरातील अजून एक कविता ‘वात्सल्य’, कवी आहेत लातूर चे विनय अपसिंगकर. दिवसभर शेतात कामावर गेलेल्या आईची वाट पाहणारी मुलं सांजवेळी ती आल्यावर कशी आनंदून जातात, सुखावतात याचे वर्णन कवीने या कवितेत केले आहे. दिवसभर स्वत:च्या जबाबदारीवर, एकमेकांना सांभाळत राहिलेली मुलं आईच्या येण्याने निश्चिंत होऊन जातात. तिच्या स्पर्शाने उजळून जातात त्यांचे चेहरे. आईच्या वात्सल्याने साऱ्या भयापासून मुक्त होतात. या कवितेत बाबाचा उल्लेख नाही. आपण तो कुठे असेल याचा फक्त अंदाज बांधू शकतो. त्याने आत्महत्या केली आहे? की तो दूर कुठेतरी शहरात काम शोधात गेला आहे? की दारू पिऊन गावातच कुठेतरी पडला आहे? काहीही असो, आजचे ग्रामीण शेतकरी स्त्रीचे आणि तिच्या मुलांचे जीवन कवितेतून व्यक्त होते, हे खरं.

वंदना पलसाने
vpalsane@gmail.com