पुरुषभान

०५ जुलै २०२२

आधीच्या लेखांमधुन आपल्या लक्षात आले की मिळुन साऱ्याजणीने वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. पण स्त्री मासिक म्हटंल की सर्वसाधारण समजुतीनुसार असं वाटत की हे केवळ स्त्रीयांच्या प्रश्नांवर भाष्य करते पण तसं नाही, “ती,ते आणि तो यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी… मासिक नव्हे चळवळ!” अशी आपल्या मासिकाची tagline आहे. आणि त्याला अनुसरुनच आपण कोणत्याही एका लिंगाचा नाही तर त्यातील वैविध्यतेवर भाष्य करत आलो आहोत. म्हणुनच पुरुषांना पडणाऱ्या प्रश्नांवर, त्यांना येणाऱ्या अडचणींवर, त्रासावर पण साऱ्याजणी भाष्य करत आले आहे. आणि अश्याच विषयांना वाचा फोडणारे एक सदर म्हणजे “पुरुषभान” जेथे पुरुषांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या घुसमटीवर भाष्य केले आहे. ह्या सदरामध्ये कोणकोणत्या विषयावर बोलले गेले आहे हे सांगणारा निलीमा गावडे ह्यांचा हा लेख.

**

सामाजिक व्यक्ती म्हणून समाजात स्त्री आणि पुरुषांसाठी आदर्शाचे निकष वेगवेगळे लावले जातात. जे आदर्श, पुरुषांच्या हाती असलेली सत्ता गृहीत धरून स्त्रियांच्या दुय्यमत्वात तिची महानता व्यक्त करतात. बाईमाणूस आणि पुरुषमाणूस म्हणून न राहता फक्त ‘माणूस’ बनण्याच्या दिशेने दोघांचाही प्रवास व्हावा यासाठी स्त्री चळवळीचे योगदान राहीले. हा प्रवास करताना पुरुष म्हणून समाजात सहज मिळणाऱ्या फायद्यांना प्रश्न विचारून समतेची वाट चालणं हा पुरुषांना स्वतःशी करावा लागणारा संघर्षच आहे. प्रत्येक पुरुषाचा हा प्रवास वेगवेगळा आहे. या अनुभवातून जागं होणारं पुरुषभान समाजासमोर यावं म्हणूनच मिळून साऱ्याजणीने पुरुषभान हे सदर चालविले. ज्यामध्ये पुरुषभान जागृत होताना कोणी स्वतःचा अनुभव सांगितला, कोणी त्यावर कविता केली, काही स्त्रियांनी पुरुषभान कुठे कुठे यायला हवं असंही सांगितलं. तर काही अनुभवांत काही पुरुष व्यक्ती म्हणून जबाबदारीचा भाग मानून अगदी सहज असे जगले कि, जिथे असमानतेचा विचारच नव्हता. मूल्य म्हणून समतेचा विचार व्यक्तिमत्वाचा भाग बनला तेव्हा त्यांच्यासाठी छोटे छोटे संघर्षाचे मुद्देच संपले होते. हे सारे अनुभव या सदरात आपल्याला वाचायला मिळतात.

‘हाँ मर्द को भी दर्द होता है’ या आकर्षक शीर्षकाखाली लेखक छायाचित्रकार इंद्रजित खांबे त्यांचा खूप बोलका अनुभव आपल्याला सांगतात. त्यांच्या कणकवली गावात चार महिने राहून अतुल पेठे यांच्या नाटक बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वांनी एकत्र येऊन वाचन करणं, गप्पा मारणं, नाटकाची तालीम करणं हा सगळा अनुभव म्हणजे इंद्रजित खांबे यांना काही मंतरलेले दिवस देऊन गेला. स्वतःच्या लग्नामुळे त्यांना नाटकात काम करता आले नाही पण तरी शक्य तेवढा सहभाग त्यांनी नोंदविला. पण लग्नानंतरच्या वैवाहिक जबाबदारीत आयुष्यातले असे मुक्त क्षण अनुभवता येतील का? असंही त्यांना वाटून गेलं. त्यांचा ह्या सगळ्या भावनिक घालमेलीचा बांध नुकतेच लग्न झालेल्या पत्नीजवळ फुटला आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले. रुढार्थाने पुरुष असलेला नवरा असा रडू शकतो हे पचवणं बायकोला अवघड गेलं हे ते आवर्जून सांगतात. तसेच प्रेमात पडल्याच्या आनंदाने आणि प्रेमभंगाच्या दुःखाने आईच्या कुशीत जाऊन रडल्यावर आईची मुलींसारखा काय रडतोस अशी प्रतिक्रिया त्यांच्या लक्षात राहते. यावरून ते म्हणतात समाजाने घडवलेल्या पुरुषांना ‘माणसा’च्या भावना नसतात का? मग त्या भावना व्यक्त करायला पुरुष अपवाद का?

पुरुषाच्या माणूस बनण्यात त्याला मिळालेली वारसा हक्काची सुरक्षितता आणि कुटुंबातून होणारे रूढीवादी पारंपारिक संस्कार हा महत्वाचा अडसर आहे असे इंद्रजित म्हणतात. ज्यांच्यामुळे पुरुषाला सुरक्षित असल्यासारखं वाटतं पण त्याचं स्वातंत्र्य मात्र तिथे हरवलं जातं. त्यांच्यासमोर जेव्हा हि सुरक्षितता कि स्वातंत्र्य असा पर्याय आला तेव्हा त्यांनी स्वातंत्र्याची निवड केली. आणि म्हणूनच ते त्यांना हवं तसं जगू शकले, निर्णय घेऊ शकले हे ते सहज सांगतात. छायाचित्रकारासारखा व्यवसाय निवडल्याने आयुष्याच्या कक्षा रुंदावल्या आणि पुरुषापणाचे पुरुषी गुण गळून पडायला मदत झाली हे ते खास सांगतात.

बायकोला घरकामात मदत करतो असं सांगून आपल्या आधुनिकतेचे गौरवीकरण करणाऱ्या पुरुषांची चिकित्सा करून त्या गौरवीकरणातील स्त्रियांच्या शोषणावर इंद्रजित लक्ष वेधतात. घरातील कोणतंही काम फक्त आईचं किंवा वडिलांचं नसून घर ही घरातील सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या वर्तनातून पारंपारिक संस्कारांचं ओझं नाकारून समतेच्या न्याय्य तत्वाची रुजवात करणारी मूल्य येणाऱ्या पिढीला देण्याची जबाबदारी इंद्रजित मानतात.

‘प्रिय पुरुष’ या लेखात शशी देशपांडे यांनी बलात्कार विषयावर पत्र स्वरूपातून पुरुषांशी संवाद साधला आहे. पुरुषांशी बोलताना त्या म्हणतात बलात्कार ह्या गुन्ह्यातही गुन्हेगार आणि गुन्ह्याचा बळी हे दोन्ही पक्ष असतात. त्यामुळे त्यावर दोन्ही पक्षांच्या सहभागाने चर्चा व्हायला हवी. म्हणूनच दिल्लीतील निर्भया घटनेतील आई आपल्या मुलीची ओळख लपविण्याची गरज नाही म्हणत तिचे नाव जाहिर करते त्यावेळी बलात्कारित स्त्रीच्या वाट्याला येणारी शरम आणि मानहानी ती नाकारते हे लेखिका आवर्जून सांगतात. बलात्कारित स्त्री तर गुन्ह्याची बळी झालीये मग शरम तिला वाटावी अशी अपेक्षा का? गुन्हा करणाऱ्याला शरम वाटायला हवी, त्याची मानहानी व्हायला हवी.

माणसातील क्रौर्याचा वेध घेण्याचा प्रयत्न इथे लेखिका करतात. द्वेषातून क्रौर्य येऊ शकतं; मग द्वेष कुठून येतो? घरात जन्मापासून ते विविध नात्यात येणाऱ्या स्त्रीनेच ममत्वाने पुरुषाचंही पालनपोषण केलेलं असतं; मग तरी घरातील काका, मामा, भाऊ, आजोबा आणि वडीलसुद्धा घरातील मुलीवर असे अत्याचार कसे करू धजतात? बाहेरच्या जगातील स्त्रीकडे पण ‘मालमत्ता’ म्हणून बघण्याचा दृष्टीकोन असतोच. अंबिका आणि अम्बालिकेचे उदाहरण घेऊन लेखिका सांगते बलात्कार देवादिकांमध्ये पण झालेत, ज्याला संस्कृतीच्या नावाखाली आदर्श मानले गेले. परंतु याचं घटनेकडे डोळसपणे पाहिले तर संस्कृती ही स्त्रियांसाठी अजिबात आदर्श नव्हती हे लेखिका स्पष्टपणे सांगतात. हा भूतकाळ बाजूला ठेवून वर्तमानात स्त्रियांनी सुद्धा त्यांच्या मुलग्यांना स्त्री चा आदर करायला शिकवायला हवं. इतरांना न दुखावता स्वतःच्या शारिरीक इच्छांना कसं भिडायचं हे मुलांना शिकवायला हवं.

‘हात तुझा हातातून’ या लेखात अरुणा बुरटे यांनी पती पत्नीमधील नाते आनंददायी कसे करता येईल यावर गावागावातून ‘समजदार जोडीदार’ गटामध्ये चर्चा चालू होती. ‘स्विसएड’ संस्थेचे काम मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रा मध्ये चालते. स्त्री पुरुष समता हा त्यांच्या कामाचा एक महत्वाचा भाग आहे. कुटुंबातील हिंसा, अधिकारशाहीवर आधारित नात्यांमध्ये लोकशाही रुजू करण्याचा प्रयत्न म्हणून लोहारा आणि तुजापूर तालुक्यातील ४० गावांतून गटागटाने २०० जोडपी अणदूर मधील ग्रामीण रुग्णालयासमोर घातलेल्या मंडपात जमली होती. या जोडप्यांमध्ये संयोजकांनी घरातील दैनंदिन व्यवहारांबाबत प्रश्न विचारून त्यांना बोलके केले. नंतर सगळ्या जोडप्यांनी आपले नाते समतेवर आधारित राहावे म्हणून कोणी काय काय प्रयत्न केले या अनुभवांचे कथन केले. ज्यामध्ये परस्पर प्रेम, जिव्हाळा, समता आदर, शिक्षण, काळजी, मुलांचे संगोपन व शिक्षण, मोबाईलचा अतिरेक इत्यादी विषयांवर चर्चा झाली. तसेच काही वक्ते या विषयावर बोलले आणि एका सहभागी कुटुंबाने ‘उठसूट भावना कूट’ नावाचे नाटक सादर केले.

स्वप्नगंधा घांगुर्डे यांनी ‘माझे बाबा आणि स्वयंपाक’ या आपल्या अनुभव कथनामध्ये त्यांचे बाबा डॉ. बाळकृष्ण दिवेकर यांनी किती सहजपणे घरातील स्वयंपाकघर सांभाळले हे सांगितले आहे. स्वयंपाक हे जीवनातील मुलभूत कौशल्य असून तो प्रत्येकाला यायला हवा. केवळ हौस म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून घरचा स्वयंपाक रोज करणे, ते बायकांचे काम म्हणून न पाहता कुटुंबाचा सदस्य म्हणून कोणीही पुरुष घरातील बाई घरात करते ती सर्व कामे सहज करू शकतो याचे उत्तम उदाहरण डॉ. बाळकृष्ण दिवेकर यांच्या निमित्ताने आपल्याला या लेखात पहायला मिळते. बायकोच्या आजारपणात तिला स्वयंपाक करणंच वर्ज्य झालं तेव्हा मुलांच्या शाळा वगैरे साठी लागणारे स्वयंपाक घरातील जिन्नस आईला किचन मध्ये येऊ न देता तिलाही संवेदनशिलतेने सहज त्याचा भाग बनवत वडिलांनी सांभाळले हे स्वप्नगंधा खूप प्रेमाने सांगतात. स्वयंपाक करताना वडिलांचं अभियांत्रिकी शिक्षण, त्यातील कसब, चांगलं जेवण बनवायला आणि वेळ वाचविण्यासाठी कसं उपयोगी पडलं हे पण त्या आवर्जून नमूद करतात आणि त्यातूनच वडिलांनी किचनमधील सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स पण नोंदवतात.

‘वाऱ्यासंगे घुंगुर बाता...’ या लेखात माधव गरड यांनी खूप हळुवारपणे स्त्री-पुरुष नात्याला स्पर्श केला आहे. स्त्री-पुरुष मैत्रीमधील शारिरीक जवळीकीला सेक्सच्या मर्यादेबाहेर जाऊन का बघितलं जात नाही याची वेदना ते मांडतात. स्त्री-पुरुष मैत्रीमध्ये दोघेही आपापले छंद जोपासताना एकमेकांसमोर व्यक्त होताना त्याला सेक्सची किनार नेहमी जोडली जाते. त्यामुळे निखळ मैत्री फुलण्यालाच मर्यादा येतात.

सामान्य माणसात लिंगभाव नेहमीच जागृत असतो. भिन्नलिंगी आकर्षणाचा नैसर्गिकपणा मोकळेपणाने व्यक्त करता येत नाही म्हणून कदाचित सिनेमातील नट-नट्यांचे विशेष आकर्षण आपल्याला वाटत असावं अशी टिप्पणी ते करतात. पण आकर्षणाच्या अलीकडे व्यक्तीचे शरीर आवडले तरी शरीराची आस असूनही लालसा नसणे, वासनेच्या पातळीवर न उतरण्याची कुवत आजमावायला जमली तरच प्रेमाचा धागा विणला जाऊ शकतो. अशा नात्यात मग शरीरापलीकडे जाऊनही त्या माणसासाठी मन झुरू शकतं, प्रेमाची ओढ असू शकते, बरोबर किंवा मिळून गोष्टी करण्यातील आनंद असू शकतो. अशा सखीला कदाचित पुरुष मनातील सर्व सांगू शकतो.

इथे ते स्वतःचं उदाहरण देऊन सांगतात, माझी सखी माझ्या घरी येते, राहते, घरातील सगळ्यांची मोकळेपणाने गप्पा करते, माझ्या बायकोला आमच्यात शारिरीक नातं नाहीये असा विश्वास देते. त्यामुळे बायको निश्चिंत होते. बरेच दिवसांत तिचा फोन नाही आला तर बायको चौकशी करते. साधारणपणे असंच चित्र तिच्याही घरीही आहे. अशी जणू रम्य कल्पना लेखक आपल्यासमोर मांडतात.

स्त्रीवाद – एक चिंतन यामध्ये देवकुमार अहिरे म्हणतात त्यांना ‘स्त्रीवादाने माणूस बनण्याची प्रेरणा दिली.’ स्त्री-पुरुष दोघांनाही माणूस बनविणारी विचारधारा म्हणजे स्त्रीवाद आहे असे ते म्हणतात. काळाच्या ओघात स्त्रीवादात अनेक प्रवाह तयार झाले तरी स्त्रीवादाला संकुचिततेची लेबलं लावावी असे त्यांना वाटत नाही. स्त्रीवाद म्हणजे बाह्य बदल म्हणजे आधुनिक राहणे म्हणजे स्त्रीवादी असणे नव्हे असे लेखक आवर्जून सांगतात. अशा बाह्य बदलानेच स्त्रीमुक्ती होईल असे काही लोकांना वाटते. कारण भांडवलशाहीने जे जे खाजगी ते ते राजकीय म्हणत स्त्रीवाद व्यक्तीची पाळंमुळं शोधतो मग भाष्य करतो. तसेच स्त्रिवादात जात, वर्ग, धर्म, वंश, पर्यावरण अशा सगळ्याच विचारांवर चर्चा झाल्याने तिने त्याला मुळासकट विकसित केले असे लेखक म्हणतात.

‘कृतज्ञतेची नवी वाट’ – मध्ये पुण्यातील एस.पी. कॉलेजमध्ये विद्यार्थिनी वसतिगृहात वीस वर्षे चालविलेल्या एका उपक्रमाची दखल श्रीनिवास पेंडसे यांनी घेतली आहे. याअंतर्गत नीलिमा सरंजामे या एस.पी. कॉलेजमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीचा २६ डिसेम्बर १९९७ रोजी कॅन्सरने मृत्यू झाला. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ वसतिगृहातील एका उत्कृष्ट मुलीला पुरस्कार द्यायचे ठरले. २०१९ साली या उपक्रमाला वीस वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सामाजिक संदर्भांच्या आधारे प्रश्नावली बनवून मुलींनी त्या प्रश्नांवर स्वतः विचार करून उत्तरे द्यावीत असा उपक्रम ठरला. त्यातील काही प्रश्नांच्या बाबतीत मुलीनी व्यक्त केलेले विचार या लेखात दिलेले आहेत.

आपण कोणत्या पाच गोष्टींबाबत समाजाचे देणे लागतो यावर उत्तरे देताना मुली म्हणतात, निसर्ग, विशेष व्यक्ती (Special Person) सार्वजनिक जागी स्वच्छतेच्या जबाबदारीचे भान, ऐतिहासिक वस्तूंचे जतन, स्त्रियांचा आदर, व्यक्तींमधील बंधुभाव, व्यक्तीच्या संवैधानिक अधिकारांचा आदर करणे, नैसर्गिक आणि सार्वजनिक साधनसंपत्तीचा वापर, नवे संशोधन समाजातील व्यक्तींपर्यंत पोचवणे.

शालेय विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण द्यावे का? यावर त्या म्हणाल्या, प्रसार माध्यमे, इन्टरनेट यांच्या माध्यमातून अर्धवट माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यापेक्षा शाळेच्या माध्यमातून योग्य ते ज्ञान देणे शक्य होईल. त्यामुळे लैंगिक समस्यांबद्दलचे अज्ञान दूर होईल. योग्य शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांसमोर जाईल; जेणे करून जबाबदार नागरिक तयार होतील. त्यातून समाजातील लैंगिक अत्याचार कमी होतील.

स्त्रियांच्या असुरक्षिततेबद्दल बोलताना, त्यांनी स्त्रियांकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याकडे लक्ष वेधले. स्त्रियांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याबरोबर सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस स्टेशनचे नंबर दिले जावेत. तसेच राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल कल्याण मंत्रालयाने या प्रयत्नांच्या बरोबरच स्त्रियांवरील अत्याचाराबाबत योग्य ती शिक्षा, कायद्यांचे पालन इ बाबतीत लक्ष घालावे. मुला मुलींमध्ये निखळ मैत्री जपणारा विचार देऊन समभाव जोपासणारी व्यक्तिमत्वे तयार होण्यावर भर द्यावा. रात्रपाळीत काम करताना स्त्रियांच्या सुरक्षेची दाखल घ्यावी. मुलीचे वागणे, चालणे, कपडे नीट असावेत. ज्ञानापासून मुलीना वंचित ठेऊ नये. अशा विचारांची मांडणी मुलीनी केली.

‘आणखी किती काळ’ कवितेत सारिका उवाळे म्हणतात स्त्रियांना पूजनीय, वंदनीय बनवून त्यांना प्रेमाच्या नावाखाली गुलामीत असे ठेवले कि त्याही ती गुलामगिरीची ओझी स्वच्छेने वाहू लागतात. ह्या गुलामितील त्यांचा आवेग, आनंद, दुःख, हसणं-रडणं तुम्हांला कधीच जाणवलं नाही का? आणखी किती काळ त्यांनी आपले आवेग दाबून ठेवायचे असे प्रश कवयित्री इथे विचारतात. ‘माणूस होऊ द्या’ कवितेत कवी गणेश गायकवाड स्त्रियांची जिद्द, जगण्याची आशा प्रतिकांच्या माध्यमातून मांडतात. तसेच स्त्रियांच्या जिद्दीनं जगण्याच्या ह्या उमेदीला तेवत ठेवण्याची जबाबदारी घेऊन माणूस होण्याच्या वाटेवर चालूया असा संदेश देतात. ‘पराभूता मी’ या कवितेत कवयित्री ज्योत्स्ना तानवडे प्रत्येक काळात कितीही संघर्ष केला तरी बाईपणाच्या चौकटीत नेहमीच अडकले म्हणून त्या पराभूता मी स्त्री असे म्हणतात. पण ज्याच्यामुळे हि चौकट मजबूत राहिली तो नर, पुरुष बाईनेच जन्माला घातला, घडविला हा संदेश त्या देतात. याच धरतीवर ‘बाईपणाचं ओझं’ या कवितेत मंगळवेढ्याचे इंद्रजीत घुले म्हणतात घरदार नाती सांभाळत सारा संसार आयुष्यभर केलास. पण त्यातील साऱ्या झळा सोसताना पुरुषार्थाचं बळंही तू पोसलं आयुष्यात. आज कितीही आधुनिक स्त्री झालीस तरी तुझ्या भवतालची परिस्थिती सत्य किती बदललं असा प्रश्न कवी विचारतो. ‘बाईमाणूस’ या कवितेत सोलापूरचे कवी नितीन वैशाली धर्मराज जाधव स्त्री-पुरुष समतेच्या वाटेवर चालताना आपण दोघांनी मिळून संसार कसा करायचा हे सांगतात. मी सैपाक करायला लागलो तर स्त्री असल्याचा सामाजिक आव आणून तू तिथे घुटमळायचं नाही अशी प्रेमळ ताकीद ते आपल्या सहचरणीला देतात. पितृसत्तेच्या साड्या फाडून समतेची गोधडी शिवण्याची आर्जव ते पत्नीला करतात; आणि दोघांनी पण आपलं माणूसपण सिद्ध करण्याची साद ते पत्नीला घालतात.

नीलिमा गावडे
gavadenilima@gmail.com