साऱ्याजणींचं 'खबर लहरिया' भाग २
वर्तमानपत्र, मासिकं ह्या ठिकाणी नेहमी एक सदर चालु असत. म्हणजे लेखांची एक मालिकाच चालु असते. अश्या सदरांची गरज काय? असा ही प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल पण ह्या सदरांतुनच एका विषयाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोण आपल्याला समजतात. कोणताही विषय घेतला तर आपल्या लक्षात येतं की ह्या कडे एकाच बाजुने बघणे म्हणजे त्या विषयाला निटसा न्याय न देण्यासारखंच आहे. आणि अश्या विषयांना न्याय देण्याचे आणि त्यांच्या वेगवेगळ्या बाजु आपल्या वाचकांसमोर आणण्याचे काम ह्या मिळून साऱ्याजणींतील सदरांनी केले आहे. अश्या ह्या सदरांची अखंड चालणारी मालिका हे अजुन एक मिळुन साऱ्याजणी चे अजुन एक वैशिष्ट्य आहे. तर ग्रहणांकित चांदणं, मध्ये कामना आणि प्रेरणा,संवाद स्पंदन, ह्या सारख्या सदरांतुन कायदा,लैंगिकता, घरकाम, अपगंत्व, कथा ह्या वर असणाऱ्या सदरांचा त्यांच्या विषयांचा आढावा घेणारा “साऱ्याजणींचं 'खबर लहरिया” हा लेख संध्या गवळी ह्यांनी लिहिला आहे.
**
पुलावरून पाणी जाय...
पुलावरून पाणी जाय या लघु सदरामध्ये २०१३ आणि २०१४ मध्ये एकूण ७ लेख प्रकाशित झालेले असून सर्व लेख हे नीलम माणगावे यांनी लिहिलेले आहेत. माणगावे यांनी अतिशय मोजक्या शब्दात लघु गोष्टींच्या माध्यमातून मानवी जीवनातील आयाम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. देव-सूर्य आणि माणूस या लघु कथेमध्ये मुलगा आणि वडील यांच्या संवादातून विज्ञानवादी दृष्टिकोन समोर येतो. मुलाने विचारलेला प्रश्न देव, सूर्य की माणूस मोठा या प्रश्नाने वडिलांची उडालेली तारांबळ आणि मुलाने दिलेले विज्ञानवादी उत्तर देत माणूस कसा सृजनशील आहे याकडे लक्ष केंद्रित करतो.
सावित्रीचं वेगळेपण या लेखात माणगावे यांनी दैनंदिन कौटुंबिक हिंसेला कंटाळून त्यातून वाटाघाटी करत स्त्रिया कशाप्रकारे जीवन जगतात आणि संसार, मुले यांना सांभाळतात याचे वर्णन केले आहे. अशा कठीण वेळी स्त्रिया कठोर निर्णय घ्यायलाही पुढे मागे बघत नाही हे सावित्रीच्या कथेवरून दिसून येते. नवऱ्याला असलेले दारूचे व्यसन आणि मारहाणी पासून वाचण्यासाठी स्वतः कष्ट जास्त उपसण्याची तयारी दाखवत अर्धांगवायू चा झटका आलेल्या नवऱ्याचा उपचार मध्येच सोडून त्याला स्वतःच्या हिमतीवर घरामध्ये बसून पोटभर खाऊ घालण्याचा 'वेगळा' निर्णय तिनं घेतला. स्त्रीवादी अथवा मानवतावादी दृष्टीकोनातून कदाचित तिने घेतलेला निर्णय न पटणारा असेल मात्र आपण तिने स्वतःचे कर्तेपण दाखवत तिच्यापरीने घेतलेला निर्णय म्हणून बघणे आणि चिकित्सक अंगाने बघणे आवश्यक आहे.
हरणं जिंकणं ह्या कथेमध्ये माणगावे पारू ह्या अशिक्षित पण स्वतंत्र विचारांच्या स्त्रीचे वर्णन करतात. सासू नातूच हवा असा हट्ट करते त्यावेळी ती सासूला समजावून सांगते मात्र सासू काही ऐकत नाही आणि नातू नाही झाला तर पुन्हा घरी येऊ नको ह्या भाषेत तिला धमकी देते. बाळंतपण झाल्यावर सासूला मुलाचा चेहरा न दाखवता पारू लिंग दाखवते आणि म्हणते कि, तुम्हांला तर हेच बघायचं होतं ना? बघा आणि जा. सासूचा चेहराच खाली पडला. पारू सारख्याच असंख्य स्त्रिया मुलगा व्हावा यासाठी अन्याय, हिंसा सहन करतात मात्र त्या विरोधात फार कमी स्त्रिया बोलतात. सासूने सूनेकडे नातवासाठी लावलेला तगादा हा स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात ह्या मिथकाकडे बहुतांशवेळा आपल्याला घेऊन जातो मात्र स्त्रिया ह्या व्यवस्थेच्या बळी असतात आणि त्यांच्यामध्ये उतरंडीचे सत्तासंबंध असतात जे पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये राहिल्यावर उपभोगायला मिळतात. त्यामुळे लिंगभाव संबंध बघताना ते कोणत्या सत्तासंबंध तयार होतात हे बघणे देखील महत्वाचे आहे.
कचरा या पुढील लघु कथेमध्ये माणगावे मजूर कामगार यांच्या कोंडीविषयी आणि छोट्याशा हव्यासाठी स्वतःकडे त्यांच्या कामासाठी असणारी अवजारे गमावून बसले याविषयी मांडणी केली आहे. रामा, शिवा, तुका, आनंदा आणि इतर मजूर काम शोधण्यासाठी निघाले असताना एका व्यक्तीने त्यांना निवडणूक प्रचारामध्ये काम देऊ केले. त्यावर जादा विचार न करता सर्वांनी कामाचे तयारी दर्शवली आणि दिवसभर उन्हातान्हात फिरत प्रचार करू लागले. दुपारी आणि रात्री पोटभर जेवण आणि दारू मिळू लागली मात्र हे काम केवळ निकालापर्यंतच राहील. त्यांनतर त्यांना कोणी विचारले देखील नाही. त्यांना अलगद बाहेर फेकले गेले. आणि इतक्या दिवसाच्या सुट्टीमुळे त्यांची कामाची सवय गेली आणि काम करावेसे वाटेना झाले. मात्र भूक भागवण्यासाठी त्यांना काम तर करावेच लागणार होते त्यासाठी त्यांनी पूर्वी करत असलेले काम पुन्हा करण्याचे ठरवले मात्र त्यांची अवजारे कचऱ्यामध्ये टाकून दिली होती. आणि ते स्वतःची अवजारे शोधण्यासाठी कचरा उपसत होते. अशा तऱ्हेने कथा संपते. लहानशा लाभासाठी लोक दीर्घकालीन समस्यांचा विचार करत नाही आणि जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा हाती काहीच लागत नाही मग त्यातून निराशा उत्पन्न होते असा निष्कर्ष या कथेतून निघतो.
स्पेशालिस्टचा जमाना या कथेच्या माध्यमातून माणगावे ह्या उच्च आलिशान हॉस्पिटलचं उदाहरण देतात जिथं प्रत्येक काम करायला वेगवेगळी माणसे आहेत. टी माणसे केवळ स्वतःला नेमून दिलेली कामे करतात. अशा हॉस्पिटल मध्ये सुखसुविधा असल्या तरी त्याचे पैसे हे पेशंटवर लादले जाते हे तिथे उपचार करणाऱ्या लोकांना बहुतांशवेळा कळत नाही. तसेच माणगावे या विशिष्ठ प्रकारच्या शैलीत केलेल्या कामाच्या रचनेस आधुनिक बलुतेदारांच्या बारदाना असे संबोधतात. जिथे कामगार काम करतात पण आजूबाजूला काय चालले आहे ह्याकडे लक्ष देत नाहीत.
भाजी-भाकरी या कथेमध्ये माणगावे श्रमिक जाती / वर्गातील स्त्रियांना लैंगिक वस्तू (कधीही उपभोगासाठी उपलब्ध) म्हणून पाहण्यात येते हे कमल हिच्या कथेमधून सांगतात. कामाच्या ठिकाणी मुकादमची नजर कमलवर असते आणि ही गोष्ट कमलच्या नवऱ्याच्या लक्षात येते मात्र मुकादमाला काही बोललं तर काम गमवावं लागणार यासाठी तो काही बोलत नाही. घरी आल्यावर तो कमलला सर्व प्रकार सांगतो आणि उद्यापासून कामावर यायची गरज नाही हे तिला सांगतो. यावर कमल म्हणते कि, मला सर्व माहित आहे पण बोलू शकत नाही. बरेच पुरुष हे स्त्रियांकडे बघत असतात. काम सोडल्याने प्रश्न सुटणार नाही हे कमलाला समजले होते. कमलाच्या कथेवरून आपणास हे लक्षात येते कि, कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा होणारा लैंगिक छळ हा व्यापक मुद्दा आहे. जात, वर्ग, लिंगभाव यानुसार अनुभवांमध्ये भिन्नता असू शकते पण बऱ्याचदा स्त्रियांना ह्यासाठी दोषी ठरवलं जात. तसेच कलंक, लज्जा, नोकरी गमावण्याची भीती कारणांमुळे स्त्रिया तक्रार करण्यास समोर येत नाही. त्यांना बरेचदा तडजोड करावी लागते जशी कमला करते तशी.
घर प्रत्येकाचं या कथेमध्ये माणगावे नमूद करतात की, देवाचे दर्शन हे सर्व लोकांसाठी सारखे नाही गरीब आणि व्ही. आय. पी. यांच्यासाठी ते वेगवेगळे आहे. कावेरी वैष्णोदेवीला आपलं आणि मुलाचं चांगलं होऊ दे असे साकडे घालण्यासाठी जाते आणि तेथे जाऊन नवीन धडाच शिकते. मानवी स्वभाव हा किती स्वार्थी आणि शॉटकर्ट वापरणारा आहे याचा प्रत्यय तिला तिथे येतो. कोणी घरासाठी नवस करत होते तर कोणी इतर गोष्टींसाठी. घरासाठी नवस करणारे लोक हे प्रतिकात्मकरित्या वाटांचे चार पुंजके ठेवत होते तर दुसरे लोक नवीन घर बांधण्यासाठी लोकांनी वापलेल्या जुन्या विटा पळवून स्वतःचे घर बांधत होते. हे सर्व कावेरीच्या मुलाने देखील केले होते. त्यावेळी कावेरीच्या लक्षात आल्यावर अगदी मार्मिक शब्दात कावेरी तिच्या मुलाला म्हणते आपण दुसऱ्याच्या विटा पळवतोय तसे… उद्या कुणी आपल्याही घराच्या विटा पळवतील... कुणाचं घर मोडून आपलं घर होत नसतं पोरा! अगदी साध्या सरळ कथेच्या माध्यमातून माणगावे यांनी समाजाचे वास्तव आपल्या समोर ठेवले आहे. सर्वच लघु कथांची भाषा अतिशय सोपी आणि दैनंदिन वापरातील असल्याने वाचकांना वाचण्यास (शहरी आणि ग्रामीण) सोयीस्कर आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठे ना कुठे असे प्रसंग अनुभवत, ऐकत असतो त्याच प्रसंगांना माणगावे यांनी एकत्र करून वाचकांसमोर ठेवले आहेत आणि त्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे.
ग्रहणांकित चांदणं
ग्रहणांकित चांदणं हे सदर २०१३ च्या दिवाळी अंकात अपंगत्व आणि इतर पैलूंबाबत चर्चा, अनुभवकथन यातून प्रेरित होऊन फेब्रुवारी २०१४ साली ग्रहणांकित चांदणं या नावाने नवीन सदर मिळून साऱ्याजणीने सुरु केले. यामागचा मूळ उद्देश हा अपंग व्यक्तींच्या समस्यांवर सातत्याने चर्चा आणि लोकांचा दृष्टिकोन अधिक व्यापक होण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे. या सदरांतर्गत एकूण ५ लेख प्रकाशित झालेले असून बहुतांशी लेख हे उच्च मध्यम, शहरी भागातील उच्च शिक्षित स्त्रियांनी लिहिले आहेत. यामध्ये ५ पैकी एक लेख ग्रामीण भागातील दोन लेखकांनी (स्त्री, पुरुष) मिळून लिहिला आहे. या लेखांमध्ये अपंगत्व आणि त्याचे विविध पैलूंवर चर्चा करण्यात आलेली आहे आणि सकारात्मक दृष्टिकोन जगणं समृद्ध करून टाकतो हे या लेखांतून अधोरेखित करण्यात आलेले आहे.
जयप्रदा व योगेशकुमार भांगे हे आपले अनुभव मांडताना नमूद करतात की, कर्णबधिर मुले जन्माला आली म्हणजे ती मुकीच निघणार हा गैरसमज आहे. वेळीच योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळाले तर कर्णबधिर मुले बोलू शकतात हे ते त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या उदाहरणातून दाखवून देतात. भाषा शिकण्याच्या वयामध्ये कर्णबधिर मुलांना जर त्यांच्या कर्णबधिर असण्याचे निदान करून स्पीच थेरपी, श्रवणयंत्र आणि गरज असल्यास इतर शास्त्रक्रिया यांचा वापर करून कर्णबधिर मुलांना बोलण्यास परावृत्त करता येते. भांगे यांचा मुलगा कर्णबधिर जन्माला येऊन योग्य उपचाराने तो आत बोलू शकतो आणि त्यांचे प्रयत्न सार्थकी लागले असे ते म्हणून ते तिथेच थांबत नाही तर 'व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस' या संस्थेची स्थापन करतात आणि कर्णबधिर मुलांचा शोध घेऊन पालकांना योग्य मार्गदर्शन करतात. तसेच शासनाने जर नवजात बालकांच्या कानाची तपासणी केली तर कर्णबधिर बालकांना अगदी कमी वयात श्रवणयंत्र बसवता येईल आणि मुले लवकर बोलायला शिकतील असा व्यापक विचार या लेखातून भांगे यांनी मांडला आहे.
मीनाक्षी सरदेसाई यांनी तीन लघु कथांच्या माध्यमातून समाजामध्ये अपंग व्यक्तींना जर स्वीकृती आणि प्रेम मिळाले तर त्यांचं जगणं सुकर होऊन त्यांच्या कुटुंबियांच्या साथीनं सकारात्मकरित्या त्यांचं जीवन फुलू शकतं याविषयी मांडणी केलेली आहे. जेव्हा कुटूंबातील लोक पाल्याचे अपंगत्व स्वीकारून ती काही वेगळी बाब नसून सामान्य बाब म्हणून स्वीकारतात आणि पाल्याला प्रेम, आदर मिळवून देतात तेव्हा अर्धी लढाई तर तिथेच जिंकलेली असते. यालेखातून सरदेसाई नमूद करतात की, अपंग व्यक्तीला सर्वसामान्यांप्रमाणे वागवणे आवश्यक आहे त्यातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्याच्या शक्यता वाढतात.
मीना परांजपे यांनी लिहिलेल्या लेखामध्ये जन्माने आपले अपंगत्व आणि अपघाताने आलेले अपंगत्व स्विकारताना फरक पडतो. त्यातून पालकांना निराशा येते याविषयी लिहितात. अपघाताने आलेले अपंगत्व स्वीकारताना पालकांचे जीवन ढवळून निघते, दोषारोप सुरु होतात मात्र यामध्ये परिस्थितीची स्वीकृती हाच एक पर्याय असल्याचे दिसून येते.
संध्या देवरुखकर आपल्या लेखामध्ये नमूद करतात की, अपंग व्यक्तींना प्रेम, आपुलकी दाखवली की त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल लवकर घडून येतात. देवरुखकर हेमांगी या हायड्रोसेफेलेस असलेल्या लहान मुलीचे उदाहरण देऊन सांगतात की, मुलांसोबत काम करत असताना नवनवीन प्रयोग करणं आवश्यक आहे. बरेचदा मुलांना प्रेमळ स्पर्शाची भाषा चटकन समजते जशी हेमांगीला कुत्र्याचे लहान पिल्लू जवळ दिल्यावर समजली आणि न हसणारी, भावना व्यक्त ना करणारी हेमांगी खुद्कन हसली.
डॉ. अनघा केसकर या एका शिक्षित, परदेशी निवास करत असलेया भारतीय स्त्रीच्या मनात चाललेल्या भावनांचा कल्लोळ याचा आढावा घेताना अधोरेखित करतात की, बरेचदा पालक हे आपल्यासारख्या सुशिक्षित, हुशार काहीही दोष नसलेल्या जोडप्याला असा मुलं कसं होऊ शकतं? या अपराधी भावनेने ग्रासलेले असतात. आणि त्यातून मग निराशा, चिडचिडेपणा वाढत जातो. केसकर या एकीकडे काही कारणास्तव अपंगत्व असलेल्या बाळाला नाकारणाऱ्या, गर्भपात करणाऱ्या एक दाम्पत्याच्या वास्तवाचे चित्रण करतात तर दुसरीकडे सामान्य लोक देखील विशेष मुलं दत्तक घेऊन त्याला वाढवू शकतात हा एक सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवतात.
या सदर मध्ये प्रसिद्ध झालेले लेख हे स्वीकृती आणि इतर शक्यता यावर जोर देताना दिसून येतात. निश्चितच पालकांना आपले मूल हे विशेष आहे हे मान्य करायला वेळ लागणं साहजिक आहे. मात्र कोणताही न्युनगंड न बाळगता किंवा आमच्याच वाट्याला हे का आलं? असा विचार न करता आहे त्या परिस्थितीला समोर जाण्याची ताकद हे लेख देतात. परिस्थितीने भांबावलेल्या पालकांना एकप्रकारे आधार देण्याचं काम या लेखातून होताना दिसून येते. कुटुंब आणि समाजाने अपंगत्व हे काही दयाभाव दाखवायची गोष्ट नसून अपंग व्यक्तीचे गुण, कौशल्य ओळखून तदनुभूती दाखवण्याची गरज आहे. यातून अनेक अपंग व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल, मुख्यप्रवाहात समाविष्ट होण्यास मदत होईल.
कामना आणि प्रेरणा
डिसेंबर २०१४ मध्ये कामना आणि प्रेरणा हे सदर सुरु करण्यात आले असून त्यामध्ये एकूण ४ लेख प्रसिद्ध झाले असून सर्व लेख हे माधव गवाणकर यांनी लिहिलेले आहेत. दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या, श्रद्धा, अंधश्रद्धा, लैंगिक आकर्षणाची जाणीव यासारखे अनेक प्रश्नांना सदरच्या माध्यमातून हात घालण्यात आलेला आहे. गवाणकर हे या चार लेखामध्ये मुख्यत्वे लैंगिक आकर्षण व त्यामागील मानसशास्त्रीय कारण, नैतिकता, हिंसा, स्वातंत्र्य, लिंगभाव संबंध यावर प्रकाश टाकतात. मनाचे रंगद्रव्य हा लेख समाजामध्ये विशिष्ठ लिंगाला महत्व दिल्यामुळे विविध साचे उतरंडीची साचे निर्माण केले जातात आणि ह्या साच्यांमध्ये इतर अस्मितांना बंदिस्त केले जाते यावर भाष्य करतो. गवाणकर नमूद करतात की, स्त्री-पुरुष संबंधांना नैसर्गिक मानून अवकाश निर्माण केला पाहिजे. अनेकवेळा समलिंगी संबंधांना अनैसर्गिक समजून परिघाबाहेर ढकलले जाते. पुरुष हा पितृसत्ता समाजामध्ये प्रमुख / आदर्श नमुना मानल्यामुळे स्त्रियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. स्त्री पारशी असेल, टॉमबॉय किंवा लेस्बियन असेल तर तिची कोंडी व छळ केला जातो असे गवाणकर अधोरेखित करतात.
एखादी एखादी चिमणी या लेखामध्ये गवाणकर स्त्री ला
चिमणीची उपमा देत समाजामध्ये स्त्री ला कोणत्या कोणत्या
परिस्थितीशी सामना करावा लागतो याविषयी लिहितात. आधार नसलेली चिमणी (स्त्री) सोपं एक सावज असते. पुरुष अशा निराधार स्त्रियांना विविध अडथळे निर्माण करतात, छळतात. तर पितृसत्तेच्या स्वाधीन झालेल्या स्त्रिया ह्या खुशाल पिंजऱ्यात जीवन जगतात. तिचं अस्तित्व दुसऱ्यावर अवलंबून असते. तिला बंधनातून मोकळ केलं तरी टी स्वतंत्र होऊ शकत नाही कारण तिचा आत्मविश्वास पूर्णपणे ठेचुन टाकलेला असतो. तर काही चिमण्या ह्या पितृसत्ताक समाजाला आव्हान उभ्या करतात. त्याचे निर्णय त्या घेतात, जोडीदार निवडतात, सामान कामे वाटून घेतात आणि आनंदाने संसार करत असतात. तर अशाप्रकारे गवाणकर यांनी अलंकारिक भाषा वापरत समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये ते सरसकट स्त्रियांबद्दल बोलताना दिसून येतात मात्र स्त्रिया एकसंध कोटिक्रम नसून त्या विविध जाती, धर्म, वर्ग, प्रदेश यामध्ये विभागल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या सामाजिक स्थानानुसार त्या अत्याचाराला किती बळी पडतात हे ठरते त्यामुळे तर ही सामाजिक स्थानाची फुटपट्टी लावली तर आणखीन स्पष्ट चित्र आपल्या समोर येऊ शकते हे नक्की.
प्रतिमा उरी धरुनी... या लेखामध्ये गवाणकर अतिशय महत्वाच्या मात्र समाजात जास्त चर्चिल्या ना गेलेल्या प्रश्नाविषयी लिहितात. ते म्हणजे लैंगिक आकर्षण आणि नैतिकता. स्त्री-पुरुषांच्या आकर्षणामध्ये वय हा महत्वाचा घटक मनाला जातो आणि पितृसत्ताक समाजात नेहमी पुरुष हा स्त्री पेक्षा वयाने मोठा, उंच असायला हवा याचा आग्रह धरला जातो. मात्र कावळ्या वयात जेव्हा इज्जत अथवा एकंदरीत स्त्रियांची लैंगिकता नियंत्रित करण्यासाठी मुलींचे लग्न मोठ्या पुरुषाशी लावून दिले जाते. आणि मग किशोरवयात मुलींना होणारे आकर्षण हे इथल्या समाज व्यवस्थेमुळे दडपले जाते. आणि मग वयाच्या पस्तीस, चाळीशी मध्ये स्त्रियांना वीस पंचवीस वर्षाची मुले आवडू लागतात असे गवाणकर नमूद करतात. ही त्यांची वैयक्तिक मते, अनुभव ते मांडतात मात्र या लेखामध्ये ते कुठेही शास्त्रीय दृष्ट्या झालेले अभ्यास, प्रायोगिक तत्वाचा आधार घेऊन मांडणी करत नाही. त्यामुळे त्यांनी मांडलेली मते ही वैश्विक करता येत नाहीत.
लेखाच्या शेवटी ते मुलींच्या मर्जीने लग्न लावून देणे, तिची आवड लक्षात घेणे ह्या बाबी मांडताना दिसतात. मात्र एकंदरीत समाजात नातेसंबंधामध्ये जी क्लिष्टता / गुंतागुंत आलेली आहे, बदललेल्या अपेक्षा, राहणीमान ह्या बाबींवर देखील भर देणे आवश्यक आहे असे मला वाटते तसेच लैंगिकतेवर खुली चारचा व्हायला पाहिजे. लज्जा, घाण म्हणून लैंगिक आकर्षण किंवा लैंगिकता याविषयी मोकळेपणाने चर्चा होताना दिसत नाही.
लाजाळूच रोप ह्या लेखामध्ये गवाणकर एक सकारात्मक विषयाला हात घालतात. गे अथवा समलैंगिक व्यक्तींच्या वाट्याला येणारी अवहेलना मांडतात. समलिंगी व्यक्तींना भावना, वैयक्तिक आयुष्य असते आणि तो अवकाश त्यांना मिळवून देणे देखील गरजेचे आहे. ललिता ही खंबीरपणे आपल्या गे भावाच्या पाठीशी उभी राहिली आणि त्याला आत्मविश्वास, पाठींबा दिला. समाजामध्ये विविध लैंगिक अस्मितानं जर अशीच स्वीकृती आणि पाठींबा मिळाला तर समलिंगी व्यक्ती ह्या अधिक मोकळेपणाने समाजात वावरू शकतील आणि स्वतःचे प्रगती करू शकतील हे निश्चित आहे. त्यासाठी ललिता सारखे प्रेमळ आणि स्वार्थरहित लोक असणे देखील महत्वाचे आहे.
भिंग भाषेचे
भिंग भाषेचे या सदरामध्ये जानेवारी २०१४ पासून एकूण सात लेख प्रकाशित झालेले असून सर्व लेख हे डॉ. नीलिमा गुंडी यांनी लिहिलेले आहेत. भाषा ही दैनंदिन जीवनामध्ये संवादाचे महत्वाचे साधन आहे तर ती अस्मितेचा देखील प्रश्न बनते. गुंडी यांनी या सदरांतर्गत लिहिलेल्या लेखातून भाषेविषयी विशेषतः मराठी भाषेत असणाऱ्या गंमती जमती मांडल्या आहेत. त्याचप्रमाणे भाषेमधील शब्द आणि अर्थ, क्रियापदे, कालांतराने बदलत गेलेले शब्द यावरही प्रकाश टाकला आहे. दैनंदिन जीवनात भाषा वापर असताना विशिष्ठ संदर्भातून लोक तिचा वापर करत असतात. लेखिका जाहिरातीमध्ये कशाप्रकारे भाषेचा वापर केला जातो याविषयी बोलताना नमूद करतात की, बऱ्याच जाहिराती मनात प्रश्न उपस्थित करतात. एखाद्य वस्तूची विक्री वाढवण्यासाठी भाषेच्या सहज सौंदर्याकडे पाठ फिरवतात आणि अधिक रोमांचक, सनसनाटी भाषेचा वापर करून उत्पादन विकतात. गुंडी या भांषातर या महत्वाच्या पैलूकडे लक्ष वेधतात. त्यांच्या मते, बऱ्याचदा जाहिराती मजकूर यांत्रिक पद्धतीने भाषांतरीत करतात त्यामुळे त्यातून मूळ संदर्भ वगळण्याची शक्यता उद्भवते. किंवा काही वेळा पर्यायी भाषिक शब्द ना देता इंग्रजी अथवा हिंदी शब्द लोकांच्या गेली उतरवले जातात. भाषेचे सातवा किंवा निराळेपण राखले पाहिजे ह्यावर गुंडी भर देतात.
भाषा ही प्रवाही आणि सामाजिक संस्था असल्याचे गुंडी नमूद करतात. एकाच क्रियापद हे विविध संदर्भात वापरले जाते आणि त्यातून विविध अर्थ गुंडी दाखवून देतात. त्यामुळे नव्याने मराठी भाषा शिकणारे लोक भाषेच्या या पैलूमुळे बुचकळ्यात पडतात आणि हे होऊ नये म्हणून गुंडी सुचवतात की, भाषेचे आकलन अधिक भक्कम होण्यास भाषेतला 'बहुरंगी खेळ' नीट समजून घेतला पाहिजे. एखादी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून विकसित होण्यासाठी विविध ज्ञानक्षेत्रांशी संबंधित विषयांचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन करण्यासाठीची सामग्री मराठीत लिखित स्वरूपात असणे आवश्यक आहे. समाजात जसे बदल होत जातात तसे परिभाषेचे क्षेत्रही बदलते असे गुंडी नमूद करतात. काही जुन्या परिभाषा काही काळानंतर वापरल्या जात नाही अथवा काही नवीनच संज्ञाची भर पडते. काही वेळा नव्या संकल्पनांसाठी अर्थपूर्ण पारिभाषिक संज्ञा दुसऱ्या भाषेतून आयात केल्या जातात. यासाठी गुंडी ह्या संस्कृती हा मराठी शब्द बंगाला भाषेमध्ये तर अस्मिता हा गुजराती शब्द मराठी भाषेमध्ये वापरण्यात आला असे नमूद करतात. थोडक्यात गुंडी या लेखातून सांगू इच्छितात की, संज्ञा विविध ठिकाणी वापरली जाऊ शकते त्यांचा संदर्भ बघणे आवश्यक आहे तसेच ज्ञानक्षेत्रात अध्ययन करताना संज्ञांची अधिक अर्थपूर्ण परिभाषा करणे देखील आवश्यक आहे. पुढे गुंडी या भाषेमध्ये शब्द आणि अर्थ यांचा कसा लपंडाव चालतो याविषयी लिहितात. विशिष्ट संदर्भात शब्दांचे अर्थ बदलत जातात आणि निरुपद्रवी वाटणारे शब्द अथवा वाक्य बरेच काही सांगून जातात. त्यामुळे गुंडी नमूद करतात की, भाषेच्या या स्वभावामुळे साहित्यिकांपुघे लेखन करताना आव्हाने निर्माण होतात. त्यामुळे भाषेचा वापर करताना नेहमी सावध पद्धतीने करणे आवश्यक आहे. कारण शब्द ही नाती जोडू शकतात तशीच तोडू ही शकतात. गुंडी नातेसंबंधांचे आणि भाषेचा वापर याचा संबंध दर्शविताना नमूद करतात की, नातेसंबंधात आपण हाक कशी मारतो त्यातून नात्याचा पॉट लक्षात येतो. परक्या व्यक्तीस एकेरी संबोधन हे कधी अपमान वाटू शकते तर जवळच्या व्यक्तीस प्रेम / सलगी वाटू शकते. त्यामुळे एखाद्याला संबोधन हे संवादाची सुरुवात ठरते. त्यामुळे संवाद निकोप राखण्यासाठी संबोधने नेटकेपणाने वापरावी लागतात असे लेखिका अधोरेखित करतात.
भाषा ही प्रवाही असल्याने भाषेला काळानुसार नवनवे शब्द मिळत जातात आणि त्यातून भाषा समृद्ध होत जाते. गुंडी म्हणतात त्याप्रमाणे भाषेत नवशब्द निर्मितीची प्रक्रिया सतत चालू असते. त्यातून काधी जुने शब्द मोडीत निघतात तर नवीन शब्दांची भर पडते. नवे शब्द शब्दकोशामध्ये समाविष्ठ होत असतात. गुंडी म्हणतात तसे कोष आणि व्याकरण हे भाषेचे महत्वाचे घटक आहेत. शब्दकोशातून आपल्याला समाजाचा सांस्कृतिक इतिहास अथवा कोणता शब्द कधी, कोणत्या अर्थाने वापरला गेला हे समजते. अशाप्रकारे गुंडी यांनी गंभीर आणि अतिशय महत्वाचा विषय हा मनोरंजक पद्धतीने वाचकांसमोर अगदी सोप्या शब्दात मांडला आहे. गुंडी यांनी भाषेमध्ये जात, वर्ग आणि लिंगाधारित भाषा यांचे असणारे स्थान अधोरेखित केलेले दिसून येत नाही. जात, प्रदेशानुसार बदलत जाणारी भाषा / शैली हा ही अभ्यासाचा महत्वपूर्ण विषय आहे त्यामुळे त्याकडेही लक्ष देणे महत्वाचे आहे.