'मिळून सार्‍याजणी'ची ३१ वर्षांची वाटचाल

१२ ऑगस्ट २०२०

९ ऑगस्ट १९८९ रोजी ‘मिळून सार्‍याजणी’ मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. भली भली मासिकं बंद पडण्याच्या मार्गावर असताना ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी हे मासिक सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजाच्या मुख्य प्रवाहात स्त्री उद्गाराला पुरेसं स्थान नाही, तिच्यावर कुटुंबात - समाजात अन्याय होतो आहे, त्या अन्यायाला वाचा ङ्गोडायला हवी, या हेतूनं हे मासिक त्यांनी सुरू केलं. नावातून सहकार, बांधिलकी आणि मैत्रभाव ध्वनित होणारं हे मासिक सामाजिक आहे, तसंच साहित्यिकही. दर्जेदार साहित्याच्या जोडीला ज्वलंत, प्रामाणिक अनुभवांनाही इथे महत्त्वाचं स्थान आहे. स्त्रियांच्या योगदानाला समाजमान्यता मिळायला हवी, तिला तिचा अवकाश मिळायला हवा, ही न्याय्य मागणी मासिकातून केली जाते. पण पुरुषांनी घाबरायचं काही कारण नाही. कारण हा पुरुष विरोधातील संघर्ष नसून पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेशी दोन हात करणं आहे. स्त्री-पुुरुषांनी मानव मुक्तीसाठी प्रसंगी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करत एकत्र वाटचाल करायची आहे, अशी ‘सार्‍याजणी’ची भूमिका आहे.

भाषेचं संस्कृतीशी/परंपरेशी नाळेचं नातं असतं. ‘सारेजण’ म्हटलं तर त्यात ‘सार्‍याजणी’ आल्या हे गृहीत असतं, मात्र उलट ‘सार्‍याजणी’त सारेजण गृहीत नाहीत. शब्दातला हा लिंगविशिष्ट भेदाभेद पार करण्यासाठी मासिकाच्या नावात ‘मिळून सार्‍याजणी’ आणि प्रत्यक्षात ‘सारेजणां’ना निमंत्रण आणि स्वागतही! सार्‍याजणी वाचता वाचता जाग्या होणारच. हे चांगलं आहे आणि त्याचं स्वागत व्हायला हवं हे पुरुषांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. जो पुरुष जाग्या होणार्‍या स्त्रीला तू जागी कशाला झालीस, कशाला शिकलीस असे आडमुठे प्रश्‍न न विचारता तिचा हात हातात घेत तिची साथ स्वीकारेल तोच खरा ‘जागा’ पुरुष म्हणायला हवा, असं ‘सार्‍याजणी’ मानतं. असं पुुरुषांना ‘जागं’ करत त्यांना ‘सार्‍याजणी’त सामावून घेण्याचा मासिकाचा प्रयत्न आहे. घरकामातला पुरुषांचा अनुभव, मी समता आचरणात कशी आणली? मी सासरी जातो, पुरुषभान जागवताना...अशा अनेकानेक विषयांवर पुरुषांची अनुभवकथनं सार्‍याजणीनं प्रकाशित केली आहेत. लेखक, वाचक, हितचिंतक, संपादक म्हणूनही पुरुषांचा सहभाग उल्लेखनीय आहे. बाईपणा आणि पुरुषपणा ओलांडून सर्वांनी हातात हात घेऊन माणूसपणाची वाटचाल सजगपणे करावी अशी ‘सार्‍याजणी’ची भूमिका आहे.

निर्णय प्रक्रियेतील व्यक्तिकेंद्रितता कमी व्हावी म्हणून ऑक्टोबर १९९८ पासून बालभवनच्या प्रणेत्या शोभा भागवत आणि नारी समता मंच, पुरुष उवाच, पालक नीती आदी संस्थांच्या संस्थापक सदस्य डॉ. गीताली वि. मं. यांची मासिकाच्या सल्लागार संपादक म्हणून नेमणूक केली गेली. एका व्यक्तीऐवजी तीन व्यक्ती निर्णय प्रक्रियेत सामावल्यामुळे व्यक्तिकेंद्रितता कमी व्हायला मदत झाली, त्यामुळे पाया रुंदावला गेला. ‘सार्‍याजणी’ मासिक म्हणजे फक्त छापील शब्द नव्हेत. तर त्याच्या मागे अनेक उपक्रमशील संस्था-संघटना भक्कमपणे उभ्या आहेत. 'परिवर्तनासाठी आम्ही एकत्र आमची एकजूट' म्हणत स्त्री प्रश्‍न सोडवण्यात सक्रीय असणारी नारी समता मंच, मैत्रभाव जपणारी सखी सार्‍याजणी, स्त्री-पुरुष सहजीवन सकस-समृद्ध व्हावं म्हणून काम करणारं साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ, वाचन संस्कृती जोपासत ज्ञानाचं भांडार खुलं करणारं अक्षरस्पर्श ग्रंथालय आणि स्त्री-पुुरुष समतेसाठी पूरक काम करणारा - विशेषत: पुरुषांमध्ये जाणीवजागृती करणारा पुरुष उवाच गट! हे सर्व एकदिलानं काम करत आहेत.

परिवर्तनाचा बहुआयामी, बहुरंगी आविष्कार वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक गेली एकतीस वर्ष करत आहे. समाजात चालू असलेल्या स्त्री चळवळीसहित अंधश्रद्धा निर्मूलन, अण्वस्त्र विरोध, जातिअंत, पर्यावरण रक्षण, एलजीबीटीआयक्यू समूहांचा समतेसाठी लढा आदी चळवळींमागची वैचारिक भूमिका, त्यांच्यापुढे उभ्या असलेल्या अडचणी आणि त्या चळवळींना पाठिंबा देणारा विचार वाचकांपुढे मांडला जातो. वाचकांनी विचारशील, विवेकी आणि सक्रीय व्हावं यासाठीची ‘सार्‍याजणी’ची चाललेली ही धडपड वाचकांच्या मनाला स्पर्शून जाते. यातून काही जण ‘कार्यकर्ता’ होण्याची प्रेरणा घेतात, असा आमचा अनुभव आहे. नुकत्याच झालेल्या सीएए आणि एनआरसी विरोधातल्या आंदोलनाविषयीसुद्धा ‘सार्‍याजणी’त सविस्तर माहिती देणारा लेख प्रकाशित झाला होता. या आंदोलनातल्या कार्यकर्त्यांच्या हस्ते महिलादिन विशेषकांचं प्रकाशन झालं.

स्त्री प्रश्‍न म्हणजे केवळ स्त्रियांचे प्रश्‍न नाही, तर समाजातील लिंगभेदभावाचा प्रश्‍न! ‘जे जे व्यक्तिगत ते ते राजकीय!’ या स्त्री चळवळीतल्या घोषणेचा खरा अर्थ सर्वदूर कुटुंबातल्या स्त्रियांपर्यंत (आणि पुरुषांपर्यंतही) पोहोचवण्यासाठी वैविध्यपूर्ण साहित्याचा आधार ‘सार्‍याजणी’ घेतं. कथा, कविता, मुलाखती, वैचारिक-ललित लेख याबरोबर अनुभवकथनांना मोठं स्थान असतं. चळवळ ही केवळ कार्यकर्त्यांपुरती मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोचायला हवी असेल, तर आधी ज्यावरून सिद्धान्त मांडले जातात, ते घराघरांतले अनुभव समोर यावे लागतात. त्याचा उच्चार आणि लेखनातून उद्गार व्हावा लागतो, अशी ‘सार्‍याजणी’ची भूमिका आहे. स्त्रीमुक्ती चळवळ किंवा स्त्री-पुरुष समतेची चळवळ या शब्दांना अनेकजण बिचकतात. कित्येकदा याचा खरा अर्थही न समजून घेता त्याबाबत एक भीती आणि ‘नकोसेपण’ अनेकांच्या मनात असतं. त्यामुळे धोरण म्हणून हे शब्द किंवा त्यामागची संकल्पना आणि सिद्धान्त यांची भाषा कमीत कमी उच्चारावी पण त्याचा गाभा मात्र जगण्याच्या पातळीवर पोचवावा, असा ‘सार्‍याजणी’चा प्रयत्न राहिला. आपला प्रश्‍न केवळ मी, माझं कुटुंब, माझी परिस्थिती यातून जन्मलेला नाही. समाजात जी एक पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था आहे, त्यामध्ये त्याची मुळं गुंतलेली आहेत. थोड्याफार फरकानं बहुसंख्य घरात ही मुळं रुजलेली आहेत. त्यामुळे तपशील वेगळा, रूप वेगळं असलं तरी अनेकदा कौटुंबिक प्रश्‍नांची ‘जात’ एकच असते. त्यामुळे स्त्रियांनी माझ्यातच काही तरी कमी आहे, हा न्यूनगंड मनातून काढून टाकावा, असं स्त्रियांना आवाहनही ‘सार्‍याजणी’ करत असतं.

समाजव्यवस्थेत जातीच्या वास्तवात जी गुलामी, दुय्यमता, जे नाकारलेपण - उपेक्षा दलितांच्या वाट्याला येते; तेच कुटुंबव्यवस्थेत स्त्रियांच्या अनुभवाला येतं, याची जाणीव स्त्रियांना करून देण्याचा प्रयत्न ‘सार्‍याजणी’तून होतो. व्यापक विषमतेची समज यायला याचा हातभार लागू शकतो. ‘सार्‍याजणी’चा वाचकवर्ग बहुतांश शहरी मध्यम - उच्च मध्यमवर्ग आहे. त्यामुळे पारंपरिक, सामाजिक-सांस्कृतिक, मध्यमवर्गीय चौकट एकदम मोडून न टाकता हळूहळू ती वाकवत - वळवत, सैल करण्याचं ‘सार्‍याजणी’चं धोरण आहे. या धोरणामुळे मनावरचे पुरुषप्रधान अर्थहीन - पोकळ, आज गैरलागू ठरलेले संस्कार गळून पडायला मदत होते, यातून वाचकांपुढे अनेक प्रश्‍न उभे राहतात. त्यातूनवाचकांना अस्थिरता - अस्वस्थता येते. पण ही अस्वस्थता आत्मतुष्टतेपेक्षा अधिक सर्जनशील आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी महत्त्वाची आहे, असा वैचारिक आधार बनण्याचा प्रयत्न ‘सार्‍याजणी’ करत असतं. मध्यमवर्गीय कुटुंबात स्त्रियांना फारसे प्रश्‍न किंवा समस्या नसतात, हे गृहीतक तपासण्याचं काम ‘सार्‍याजणी’नं केलं आहे - करत आहे. नवा विचार ऐकल्यावर तो प्रत्यक्ष कृतीत आणावासा वाटला, तरी स्त्रियांना त्यात खूप अडथळे / अडचणी असतात, त्यातून वाट काढत पुढे जाण्यासाठी ‘सार्‍याजणी’तल्या मुलाखती, लेख, कथा-कविता आणि मुख्य म्हणजे अनुभवकथनं मदतीचा हात देतात, असं वाचक आवर्जून लिहितात. तेव्हा ‘सार्‍याजणी’ योग्य वाटेनं चाललं आहे, याचा दिलासा मिळतो.

स्त्री जशी स्वत: एक मुलगी, बायको, आई, बहीण म्हणून कुटुंबात जगते, तशी ती एक स्वतंत्र व्यक्ती आणि समाजातील जबाबदार नागरिक म्हणूनही जगायला हवी. त्यासाठी समाजातल्या घटना - घडामोडी, त्यातलं राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि संस्कृतीकारण स्त्रियांना समजलं पाहिजे, अशा कळकळीतून वर्षारंभ विशेषांक, महिला दिन विशेषांक आणि दिवाळी अंकात विस्तारानं या मुद्द्यांवर परिसंवाद घडवले जातात. उदाहरणार्थ - विवाह एक वैचारिक वर्तुळाकार प्रवास, स्त्रीवादी राजकारण, संस्कृती, पाणीप्रश्‍न, पर्यावरण, वस्त्या गरिबांच्या नियोजन धनिकांचे, वेश्या व्यवसाय - आपलीतुपली नैतिक गोची, बाजाराच्या विळख्यात आरोग्य सेवा इ. इ. आता स्त्री ही एक सजग नागरिक झाली पाहिजे, असा ‘सार्‍याजणी’चा आग्रह आहे. इतक्या वर्षांच्या वाटचालीत स्त्रीचं आत्मभान जागं होऊन तिचा आत्मविश्‍वास वाढायला मदत झाली. ती आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर दमदार पावलं टाकत आहे, असं आशादायी चित्र एकीकडे मनाला दिलासा देणारं असलं, तरी दुसरीकडे आजही स्त्रियांवर घरी-दारी अन्याय, अत्याचार होताहेत, दलित आणि भटक्या विमुक्त स्त्रियांची परिस्थिती काही ठिकाणी अतिशय वाईट आहे. मन अस्वस्थ, विषण्ण करणार्‍या अनेक घटना घडत आहेत. पण तरीही आशावादी वृत्तीनं चिवटपणे काम करत राहण्याच्या ‘सार्‍याजणी’च्या वृत्तीला अनुसरून ‘सार्‍याजणी’ची वाटचाल अशीच भविष्यातही चालू राहील, असा विश्‍वास वाटतो.

‘सार्‍याजणी’च्या या वाटचालीत संस्थापक संपादक विद्या बाळ यांचा सिंहाचा वाटा आहे. कार्यकर्ता संपादक याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. तोंडात साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी ही कार्यकर्त्यांची त्रिसूत्री त्या अक्षरश: जगल्या. तसंच बहुश्रुतता, संवेदनशीलता, सर्वसमावेशकता, वैचारिक स्पष्टता आणि कणखर मानसिकता यांचं अनोखं मिश्रण असणार्‍या त्या लोकप्रिय संपादक होत्या. ‘सार्‍याजणी’च्या संपादकीयाचं नाव ‘संवाद’. संपादक कुणी श्रेष्ठ व्यक्ती नाही, तर वाचकांच्याच पातळीवर राहून ‘या हृदयीचे त्या हृदयी’ करण्याचा ‘संवाद’ हा प्रयत्न असतो. त्यामुळे वाचकांकडून ‘दिल से’ प्रतिसाद मिळतो. हे मैत्र जपत प्रसंगी वाचकांना काही वैचारिक कडू डोसही पाजले जातात. वाचकांचा उदंड प्रतिसाद ‘वाचणारे लिहितात’, ‘बोलकं पत्र’ यातून प्रतिबिंबित होतं. ‘सार्‍याजणी’ जिवाभावाची मैत्रीण, कठीण प्रसंगी मार्गदर्शक वाटते असं आवर्जून वाचकांची पत्रं आली, की मन भरून पावतं.

आयुष्य झोकून देऊन विद्याताई ‘मिळून सार्‍याजणी’ गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या वाढावं यासाठी अखेरच्या श्‍वासापर्यंत झटत राहिल्या. त्यांनी महाराष्ट्र जसा पिंजून काढला, तसा महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेरही प्रवास करून ‘सार्‍याजणी’चा प्रचार - प्रसार करत अर्थसाहाय्य मिळवलं. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलियापासून ते बेंगळुरू, हैदराबाद ते जिल्हा - तालुका पातळीवर ५५-६० ‘सार्‍याजणी’चे प्रतिनिधी तयार केले. आज आमचे असे साठच्यावर ‘ब्रँड अ‍ॅम्बॅसॅडर'’ आहेत. ते ‘सार्‍याजणी’चा विचार गावोगावी रुजवण्याचा प्रयत्न करत ‘सार्‍याजणी’चं वर्तुळ विस्तारायला मदत करतात, तेही काहीही मानधन न घेता! गावोगावी वाचकचर्चा, ‘सार्‍याजणी’च्या अंकाचं प्रकाशन इत्यादी कार्यक्रम ते आयोजित करतात. विद्या बाळ यांच्या निधनानंतर गावोगावच्या प्रतिनिधी पुण्यात एकत्र आल्या होत्या. विद्याताईंच्या स्मृतीला समर्पित केलेल्या अंकाचं प्रकाशन सामूहिकपणे सार्‍याजणीच्या या प्रतिधिनींच्या हस्ते झालं.

‘सार्‍याजणी’च्या वर्धापनदिनाचा सोहळा म्हणजे वैचारिक मेजवानीबरोबर मनोरंजन आणि गाठीभेटी असा त्रिवेणी संगम असतो. सामूहिक कृती आणि संकल्प करण्यासाठी आपल्या मनाच्या चैतन्याची आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेची ‘बॅटरी चार्ज’ करण्यासाठी हातभार लागावा, या हेतूनं ‘सार्‍याजणी’चा वार्षिक स्नेहमेळावा आयोजित केला जातो. त्याला उदंड प्रतिसाद मिळतो.

‘सार्‍याजणी’च्या रौप्य महोत्सवी वर्षात सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून प्रबोधनासाठी विशेष योगदान म्हणून ‘सावित्री जोतिबा समता उत्सव’ १० आणि ११ मार्चला साजरा करण्यास सुरुवात केली. सार्वजनिक उत्सवातला झगमगाट, ध्वनी प्रदूषण, करमणुकीच्या नावाखाली चालणारा धांगडधिंगा मन विषण्ण करणारा आहे. महाराष्ट्राच्या विचार-विवेकाच्या परंपरेला झाकोळणार्‍या या उत्सवांना चांगला पर्याय म्हणून ‘सावित्री जोतिबा समता उत्सव’ गेली सहा वर्षे प्रयत्न करत आहे.

या ३१ वर्षांच्या वाटचालीत ‘सार्‍याजणी’ला ३१ पुरस्कार मिळाले आहेत, हे सांगताना आनंद वाटतो. या सर्व चांगल्या सकारात्मक बाजू सांगितल्यानंतर आता आमच्या मर्यादा आणि उणिवांविषयी -

पहिली गोेष्ट म्हणजे आर्थिक अडचण आणि त्यातून उद्भवणार्‍या अनेक मर्यादा आणि उणिवा. ‘सार्‍याजणी’च्या कार्यालयात बिनउतरंडीची, सहकार-बांधिलकी मानणारी कार्यक्षम व्यवस्थापन पद्धत असावी. संपादकीय विभाग आणि व्यवस्थापकीय विभाग भावनिक व व्यावहारिक दृष्ट्या वेगळा-वेगळा न राहता त्यांचं एकदिलानं काम चालावं अशी भूमिका होती. औपचारिक - अनौपचारिक आणि व्यावसायिक कार्यपद्धतीचा मेळ असावा असा आदर्शवाद मनात होता. व्यवहारात त्याचे अनेकदा फायद्यांपेक्षा तोटे जास्त जाणवतात. चळवळीतला भगिनीभाव जपण्यासाठी काही वेळेला ज्यांना घरगुती समस्या आहेत, अशा मैत्रिणींना कार्यालयात सहभागी करून घेतलं गेलं. त्यांच्या कौशल्य विकासावर पुरेसं लक्ष देणं मात्र जमलं नाही. आर्थिक अडचणींमुळे कमी मानधन अथवा अजिबात मानधन न घेणार्‍यांना प्राधान्य द्यावं लागलं. लेखकांना मानधन देण्याची प्रथा पहिल्या अंकापासून  ठेवली आहे. ते मानधन अर्थातच इतर व्यावसायिक मासिकांच्या मानानं कमी पडतंय. चकचकीत झगमगाटी दुनियेत आवश्यक असणारा डामडौल ‘सार्‍याजणी’त नाही. मूल्यांपेक्षा व्यावहारिक उपयोगाच्या गोष्टी मासिकात असाव्यात, चटपटीत, छोटेखानी लेख, डोक्याला ताप न देणारं मनोरंजक साहित्य असावं अशी बहुसंख्य लोकांची गरज आणि आवड झाली आहे. समाजमाध्यमातल्या व्हॉट्सअ‍ॅप, ब्लॉग, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी घटकांमुळे वाचन साहित्य सहजी फुकटात आणि एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळे पैसे देऊन मासिक वाचण्याची तसदी घ्यावीशी वाटत नाही. वृत्तपत्राच्या साप्ताहिक पुरवण्यांमधून स्त्रीप्रश्‍नाचे नवे आयाम, स्त्रियांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाला उपयोगी ठरणारे साहित्य अनेकदा प्रकाशित होतं. ते रोचक पद्धतीनं सादर केलेलं असतं त्यामुळेही ‘सार्‍याजणी’च्या वर्गणीदारांच्या संख्येत गेल्या २-३ वर्षांपासून घट होताना जाणवत आहे. ‘सार्‍याजणी’च्या दिवाळी अंकाला आजवर चांगल्या जाहिराती मिळत आल्या आहेत, पण दर महिन्याच्या अंकांना मात्र सहसा दोन कव्हरच्या जाहिराती सोडल्या तर इतर जाहिराती मिळत नाहीत.

एकीकडे उत्पन्न कमी आणि दुसरीकडे कागद, छपाई, कार्यालयीन भाडं, मानधन अशी सगळीकडे झालेली दरवाढ यामुळे हे आर्थिक तुटीकडे जाणारं वास्तव आहे. अर्थात तरीही या आर्थिक तुटीवर मात करण्यासाठी माणसांचं ‘सार्‍याजणी’वर असणार्‍या प्रेमाचं भांडवल भक्कम आहे, ही दिलासा देणारी बाब आहे.

भारत हा तरुणांचा देश आहे. ‘सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी सबकुछ चलता है’ असं मानणारा चालू जमाना आहे. शांततामय सहजीवनासाठी साधेपणा, समन्वय, परस्पर सामंजस्य, अहिंसा आणि संवाद इत्यादी मूल्यं म्हणजे ‘यडपटपणा’ समजला जाण्याचा हा काळ मोठा कठीण आहे. बहुसंख्याकांच्या राष्ट्रप्रेम, मर्दानगी, शौर्य, बलवान इत्यादी संकल्पना हिंसकतेकडे झुकत आहेत. राष्ट्रभक्तीचा उन्माद तरुणांमध्ये पेरून शस्त्राला शस्त्रानं उत्तर देण्याचा हिंसक अविचार पसरवला जातो आहे. शस्त्राला शस्त्रानं उत्तर देण्यापेक्षा तलवारीचा मुकाबला ढालीनं करत शांतीचं महत्त्व तरुणांच्या मनावर बिंबवण्याचं आणि त्यांना हिंसेपासून दूर ठेवण्याचं काम इथून पुढे ‘सार्‍याजणी’ला करावं लागेल. यासाठी तरुणाईबरोबरचा संवाद वाढावा म्हणून ‘मिळून सार्‍याजणीचं 'यूथ कनेक्ट’ सुरू केलं आहे. ग्रामीण भागातून शिकायला पुण्यात आलेल्या महाविद्यालयीन मुला-मुलींचा यात सक्रीय सहभाग आहे. शंभर-दीडशे मुलांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. चित्रकार, लेखक, कार्यकर्ते, विद्यार्थी यात आहेत. प्रश्‍नांवर भांडण्यापेक्षा उत्तरं शोधू या, ट्रोलिंग कटाक्षानं टाळू या, असा प्रयत्न चालू आहे. या जोडीला महिन्यातून एक बैठक कोरोना महामारीच्या आधीपर्यंत घेतली जात होती, त्याला तरुणाईचा चांगला प्रतिसाद होता. मात्र तरुणांचं शिक्षण, परीक्षा, अनेकानेक स्पर्धा, त्यांच्यासमोर असणार्‍या विविध क्षेत्रातल्या संधी यामुळे बैठकीला येण्याचं सातत्य कमी असलं, तरी दर बैठकीला ५-६ कायमस्वरूपी सदस्य आणि नवे २०-२५ तरुण उत्साहानं उपस्थित राहात होते. या सगळ्याची फलश्रुती म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या ओजस्वी स्मृतीला अर्पण केलेला दोन दिवसांचा ‘सावित्री जोतिबा समता यूथ फेस्टिव्हल’ अर्थात ‘साजोस’ यूथ फेस्टिव्हल!

‘साजोस’ यूथ फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात यूथ कनेक्टची सर्व टीम - नितीन जाधव, प्रज्ञा जयश्री, सत्यजित, अमोल, अश्‍विनी, मानसी आदींचा उत्साही सहभाग होता, हे आवर्जून नोंदवायला हवं. ‘सार्‍याजणी’ची अश्‍विनी बर्वे त्यांच्याबरोबर तरुण होऊन काम करत होती. प्रसिद्ध नाटककार राजकुमार तांगडे यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचं उद्घाटन झालं. दोन दिवस पथनाट्य स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, कवी संमेलन याबरोबरीनंच विवेक सावंत यांचं व्याख्यान, डॉ. आनंद नाडकर्णी, अभिनेता आलोक राजवाडे यांच्या मुलाखती, ‘तथापि टीम’चा ‘लैंगिकतेवर बोलू काही’ या विषयावर संवाद, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त युवा कवी सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संवाद असा भरगच्च कार्यक्रम होता. तसंच पुरुषांसाठी पोळ्या लाटा, लसूण सोला असा पाककला कट्टा, ब्रेल कट्टा, एलजीबीटीआयक्यू संवाद कट्टा असेही आकर्षक उपक्रम होते. अंध आणि डोळस व्यक्तींचा फॅशन शो हा अभिनव उपक्रम भाव खाऊन गेला.

फेस्टिव्हलची सांगता संवेदनशील लेखक अरविंद जगताप यांच्या दिलखेचक भाषणानं झाली. या वेळी त्यांच्या हस्ते मिसा Online या ‘मिळून सार्‍याजणी’च्या द्वैभाषिक ङ्गेब्रुवारी अंकाचं प्रकाशन झालं. मुद्रित अंकासाठी एक आव्हान म्हणजे वाचकांचा (विशेषत: नव्या तरुण वाचकांचा) इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे वाढता ओढा. हे वास्तव लक्षात घेऊन ‘मिळून सार्‍याजणी’नं माध्यमांतर करण्याचं धोरण अवलंबलं आहे. त्यानुसारwww.miloonsaryajani.inया आपल्या वेबसाईटवर दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिसा Online हा अंक अपलोड केला जातो. या अंकाच्या संपादनात आणि इतर तांत्रिक बाबी पार पाडण्यात आमचा तरुण संपादक मित्र उत्पल व. बा. आघाडीवर आहे. या अंकाला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. कोविड-१९ च्या महामारीच्या भयानक संकटात मुद्रित अंक एप्रिल महिन्यापासून जुलैपर्यंत प्रकाशित होऊच शकला नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या या कठीण काळात मिसा Online चं महत्त्व ‘मिळून सार्‍याजणी’साठी अनन्यसाधारण आहे. ‘मिळून सार्‍याजणी’च्या फेसबुक पेजच्या फॉलोअर्सची संख्या दहा हजारांवर गेली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही चालू आहे. इन्स्टाग्रामवर ‘सार्‍याजणी यूथ कनेक्ट’च्या सदस्यांचा उत्साह सहभागामुळे झळकत आहे. यू-ट्यूब चॅनल सुरू झालं आहे. तसंचbookganga.comवर ‘सार्‍याजणी’चे जुने अंक वाचायला उपलब्ध आहेत.

ऑगस्टमध्ये ‘मिळून सार्‍याजणी’ मासिकाला एकतीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त एकतीस मान्यवर कलाकार, लेखक, सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांच्या मुलाखती फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ‘सार्‍याजणी’ची तरुण मैत्रीण अमृता शेडगे आणि इतर सहकारी घेणार आहेत. जास्तीत जास्त तरुणांबरोबर यात ज्येष्ठ वाचक - लेखक - जाहिरातदार - हितचिंतकही सहभागी होतील, याचा आम्हाला विश्‍वास वाटतो.

कोविडचं संकट किती काळ ठाण मांडून बसणार आहे त्यावर आपल्या मुद्रित अंकाचं भवितव्य अवलंबून आहे. मुद्रित अंक प्रकाशित करण्याच्या दिशेनं आमचे प्रयत्न जोरदार चालू आहेत.

बदलत्या भवतालाला समजून घेत मासिकाच्या स्वरूपात, वैचारिक मांडणीत आवश्यक ते बदल करण्याचं धोरण 'मिळून साऱ्याजणी'ने कायमच अवलंबलं आहे. बाईपणाचा स्वीकार करून त्यात अडकून न पडता स्त्रियांनी पुढे जावं यासाठी 'स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक' अशा टॅगलाइनने मासिकाची सुरूवात झाली होती. यानंतर पुरुषांनीही पुरुषपणा ओलांडावा म्हणून त्यांना सामावून घेण्यासाठी विसाव्या वर्षात 'स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वतःशी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी' ही टॅगलाइन मासिकाच्या मुखपृष्ठावर आली. यांनतरच्या टप्प्यावर जेव्हा समलिंगी व इतर लैंगिक जाणिवा असणाऱ्यांचा संघर्ष प्रस्थापित भिन्नलिंगी संबंधांना आव्हान देत आपल्या हक्कांची मागणी करू लागला तेव्हा या माणूसपणाच्या चळवळीला पाठिंबा देत 'मिळून साऱ्याजणी'ची टॅगलाइन ‘ती’ आणि ‘तो’ या पलीकडचे सर्व ‘ते’ यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद व्हावा यासाठी…' अशी बदलण्यात आली.

‘मिळून सार्‍याजणी’चा ३१ वा वर्धापनदिन ‘हाऊसफुल्ल' गर्दीत दर वर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही, याची खंत आहे. आजवर आपल्या कार्यक्रमाला ना. ग. गोरे, भाई वैद्य, बाबा आढाव यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक - राजकीय नेत्यांबरोबरच श्री. पु. भागवत, आ. ह. साळुंखे, कमल देसाई, ना. धों. महानोर, कविता महाजन, सदानंद देशमुख, प्रज्ञा दया पवार, बेबीताई कांबळे, उत्तम बंडू तुपे, शांताबाई किर्लोस्कर, शफाअत खान आदी साहित्यिकांचा मंचावरचा सहभाग मोलाचं मार्गदर्शन करणारा होता. प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक मृणाल पांडे, निखिल वागळे, संजय पवार यांचा राजकीय - सामाजिक दिशादर्शक संवादही महत्त्वपूर्ण होता. साहित्यिक आणि कलाकार गिरीश कार्नाड यांच्या हस्ते ‘सार्‍याजणी’तल्या निवडक लेखांचा संग्रह ‘स्त्रीमिती’ प्रकाशित झाला तो सोहळा अपूर्व होता. संवेदनशील अभिनेत्री सुलभा देशपांडे, शाहीर अनुसूया शिंदे, अमोल पालेकर, लालन सारंग, केतन मेहता, चारूल आणि विनय महाजन यांच्या उपस्थितीनं विविध कार्यक्रमांना चार चॉंद लागले. तसंच प्रशासनात विशेष कर्तबगारी गाजवलेले महेश भागवत, लीना मेहेंदळे, प्रसिद्ध उद्योजक लीला पूनावाला यांच्यासारख्यांचे अनुभव ऐकणं हा विशेष आनंद देणारा कार्यक्रम वाचकांना भावला. याच्या जोडीला तरुण दिग्ददर्शक, अभिनेते, कवी यांचेही नाटक, कविता वाचन, मुलाखती असे बहुरंगी कार्यक्रम झाले. त्यात स्पृहा जोशी, रिमा, मुक्ता बर्वे, अमृता आणि ज्योती सुभाष, मनस्विनी ल. र., आलोक राजवाडे इत्यादी सहभागी झाले. अनुराधा आठवले, नलिनीताई लढके, भँवरी देवी, कमलाबाई पानी, वैशाली भांडवलकर, संतोष जाधव, संजय संगवई यांसारखे लेखक-कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. प्रसिद्ध गायिका कलाकिनी कोमकली यांनी त्यांची गाण्याची मैफल आणि प्रसिद्ध नृत्यांगना मल्लिका साराभाई यांनी त्यांच्या नृत्याचा कार्यक्रम ‘मिळून सार्‍याजणी’च्या फ़ंड रेझिंगसाठी अतिशय प्रेमानं दिला.

शहरी-ग्रामीण वाचकांमध्ये संवाद सेतू उभारण्याचं काम सुरुवातीपासून चालू आहे. त्याचा एक भाग म्हणून भरारी ग्रामीण महिला बचतगट स्पर्धा 'फोरम ऑफ इन्टलेक्चुअल्स'बरोबर आयोजित केली आहे. कोविड-१९ च्या महामारीमुळे बचतगटांबरोबर प्रत्यक्ष संवाद थांबला असला, तरी ऑनलाइन संवाद सुरूच असतो. परिवर्तनाच्या विचारांची देवघेव होण्यासाठी ‘कथा’ हे माध्यम अतिशय परिणामकारक आहे. त्यामुळे ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक का. स. वाणी प्रतिष्ठानबरोबर ‘रेऊ कथा स्पर्धा’ गेली अनेक वर्षे आयोजित करत आहे. या वर्षीसुद्धा ही ‘रेऊ कथा स्पर्धा’ होणार आहे. नवोदित कथाकारांना प्रोत्साहन देणं, हा या कथास्पर्धेमागचा मुख्य हेतू आहे. ग्रामीण - शहरी, तरुण - ज्येष्ठ, स्त्री - पुरुष यात सहभागी होतात. यामुळे ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक सर्वदूर पोहोचायला मदत होते, असा आमचा अनुभव आहे.

कायदेतज्ज्ञ डॉ. सत्यरंजन साठे, शिक्षणतज्ज्ञ जया मोडक, वास्तुविशारद मीरा बापट, बालभवनच्या संस्थापक शोभा भागवत आणि अर्थातच विद्या बाळ या संस्थापक विश्‍वस्तांचा ‘सार्‍याजणी’च्या वाटचालीत मोलाचा वाटा आहे. कॉम्रेड रा. प. नेने यांनीही काही वर्षं विश्‍वस्तपद जबाबदारीनं सांभाळलं. विद्या बाळ यांच्या दु:खद निधनानंतर आताच्या कठीण काळात माझ्याबरोबर मीरा बापट, ज्येष्ठ पत्रकार सदा डुम्बरे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ संदीप सूर्यवंशी आणि आता नव्याने विश्‍वस्त झालेले एम.के.सी.एल.चे मुख्य मेंटॉर (मार्गदर्शक) विवेक सावंत आहेत. सर्वांच्या साथीनं ‘मिळून सार्‍याजणी’ मासिकाच्या वाटचाली बरोबरच मिसा Online मासिकसुद्धा आपली वाटचाल दमदारपणे करत राहील, असा विश्‍वास वाटतो.

‘मिळून सार्‍याजणी’ मासिकाच्या या वाटचालीत असंख्य मित्र-मैत्रिणींचं मोलाचं योगदान आहे. याची कृतज्ञ आठवण मनात जागी आहे. प्रभा हर्डीकर, मंदाकिनी भारद्वाज, उज्ज्वला मेहेंदळे, अंजली मुळे, ज्योती बेडेकर, दिपाली चौधरी, आशा साठे, वर्षा कुलकर्णी, सुजाता देशमुख, सुहासिनी जोशी, सविता, अनुजा, अपर्णा राजवाडे, नयन कुलकर्णी, सुखदा आणि उमा द्रवीड, संगीता जोशी, नीलिमा बोरवणकर, सुषमा विजापूरकर, स्नेहल बनसोडे, विजय आणि कुमार कचरे, मेहबूब शेख आणि किती तरी जणांच्या सहयोगामुळेच मासिक इथंवर अखंडपणे वाटचाल करत आलं आहे.

आणि... सध्याचे सहकारी उत्पल व. बा., मानसी घाणेकर, पूनम बा. मं., अश्‍विनी बर्वे, प्रगती सावंत, आकाश पवार, भारती सुपेकर, ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक आणि मिसा Online मॅगझिन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याबरोबरीनं अक्षरजुळणीचं काम नीला देशपांडे आणि मुद्रित शोधनाचं काम हृषिकेश पाळंदे आपुलकीनं करत आहेत. वाचकांच्या मनापर्यंत विचार पोहाचवण्यासाठी शब्दांबरोबर रेखाटनाचं, सुलेखनाचंही महत्त्व असतं. त्यासाठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे, राजू देशपांडे आणि शेखर गोडबोले यांचं मोलाचं सहकार्य लाभतं. आमचे मित्र रमाकांत धनोकर ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या उक्तीनुसार सदैव गरज पडेल तेव्हा आमच्या पाठीशी असतात.

सध्या मल्टीमीडियाचा जमाना आहे. कोविड-१९ महामारीमुळे छापील माध्यम सध्या ‘व्हेंटिलेटर’वर आहे. त्यामुळे विचार आणि भावना पोहोचवण्यासाठी मिसा Online मासिक, यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ‘मिळून सार्‍याजणी यूथ कनेक्टt’, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, इंस्टाग्राम, मिसा Online गप्पा आणिsaryajani@gmail.comया माध्यमांमधूनच संवाद साधू या.

मिसा Online मासिक दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातwww.miloonsaryajani.inया वेबसाईटवर प्रकाशित होतं. ज्यांना ते हवं असेल त्यांनी आपलं नाव, गावाचं नाव आणिव्हॉट्सअ‍ॅप क्रमांक किंवा आपलं नाव, गावाचं नाव आणि इमेल आयडी saryajani@gmail.comवर पाठवलं तर मिसा Online अंकाची लिंक पाठवता येईल.

समता, स्वातंत्र्य, मैत्रभाव आणि सामाजिक न्यायाचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मिळून सार्‍याजणी’ मासिक गेली एकतीस वर्षे मुद्रित माध्यमातून आणि फेब्रुवारी २०२० पासून ऑनलाइन माध्यमातून अखंडपणे प्रयत्न करत आहे. अशा या मासिकाला बळ देण्यासाठी या संकटकाळात आपल्या आर्थिक मदतीची नितांत गरज आहे, यासाठी आपल्या सर्वांना मनापासून मदतीचं आवाहन.

गीताली वि. मं.

संपादक, मिळून सार्‍याजणी आणि मिसा Online