मिळून साऱ्याजणीमधील सदरांचे परीक्षण: भाग १

०४ जुलै २०२२

विद्या बाळ अध्यासन प्रकल्पाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या अक्षरवाटा ह्या शिर्षकाच्या अंतर्गत साऱ्याजणीच्या प्रवासाचा आढावा विवीध लेखांच्या आधारे ह्यात घेण्यात आला आहे. त्यातील हा अजुन एक लेख ज्यात वंदना पालसने साऱ्याजणीच्या सदरांचा आढावा घेतला आहे.

विवीध विषयांवर सदरांच्या मदतीने चर्चा घडवून आणण्याचे काम मिळून साऱ्याजणी आजवर करत आले आहे. गेल्या तीसएक वर्षात ज्या वेगवेगळ्या विषयांवर साऱ्याजणी ने सदरांच्या मार्फत चर्चा घडवून आणली अश्या वैविध्य असणाऱ्या सदरांचे आणि त्यामध्ये हाताळल्या गेलेल्या विषयांचे वंदना पालसणे ह्यांनी परिक्षण केले आहे तर सदरांची माहिती देणारा आणि साऱ्याजणी कोणत्या विषय हातळते हे सांगणारा अजुन एक लेख एकूण चार भागात साऱ्याजणी तुमच्या समोर आणत आहे.पहिल्या भागामध्ये स्त्रीयालीट, मुस्लिम मनाचा कानोसा अश्या स्त्री आणि धर्माच्या संर्दभातील चर्चा करणाऱ्या सदरांबद्दलची माहिती आपल्याला मिळते.

**

स्त्रीयालिटी

२००९ ते २०१९ दरम्यान जी विविध सदरे मिळून साऱ्याजणी मध्ये आली, त्यापैकी स्त्रीयालीटी हे एक महत्वाचे आणि रोचक सदर आहे. या काळात घडून गेलेल्या काही महत्वाच्या घटनांना धरून जयदेव डोळे यांनी हे लेख लिहिले आहेत. डोळे स्वत: वार्ताहर, संपादक म्हणून काम करत असल्यामुळे त्यांची लेखणी चांगलीच धारदार आणि चिकित्सक आहे.

स्त्रीयालीटी या सदरामध्ये जयदेव डोळे यांनी जे लेख लिहिले आहेत त्यामध्ये त्यांनी मुख्यत: स्त्रियांच्या राजकारणाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाची चर्चा केली आहे. हे करताना त्यांनी विविध विषय हाताळले आहेत. विविध राजकीय घटनांचा स्त्रियांवर काय परिणाम होतो याची सुद्धा चर्चा ते करताना दिसतात. उदा. ‘४९८ अ आणि खोटारड्या बाया’ या लेखात त्यांनी मांडले की जरी हा कायदा कौटुंबिक हिंसेविरुद्ध स्त्रियांना आवाज उठवण्यासाठी दिले गेलेले हत्यार म्हणून आला तरी स्त्रिया कशा या कायद्याचा गैरवापर करतात आणि नवर्याला आणि सासरच्या लोकांना छळतात, असा कांगावा अनेक पुरुष, अगदी संघटना बांधून करू लागले. या कांगाव्याला सध्याच्या शासनारूढ पक्षाची पाठराखण आहे. ज्या राजकीय विचारधारेचे सरकार आहे ते असेच वागणार हे दाखवणाऱ्या अजून एका घटनेकडे डोळे आपले लक्ष ‘हे राम, हे रहीम’ या लेखातून वेधतात. ही घटना म्हणजे हरियाणातील गुरमीत रामरहीम यांनी केलेला त्यांच्याच डेर्यातील साधवींवरील बलात्कार आणि राज्य सरकार करत असलेली रामरहीमची पाठराखण. डोळ्यांच्या मते धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आल्या की जुलमींना अन्याय, शोषण करण्याची भरपूर संधी मिळते. दोन्ही सत्ता स्वत:च्या स्वार्थात आकंठ बुडालेल्या असताना भरडले जातात ते सामान्य स्त्री-पुरुष, विशेषत: स्त्रिया. त्यामुळे असा राजकीय पक्ष जो धर्मसत्तेबरोबर युती करतो तो स्त्रियांसाठी अतिशय धोकादायक ठरतो. धर्म कशाप्रकारे स्त्रीविरोधी असतो आणि तिच्या उपभोगाचे आणि शोषणाचे समर्थन करतो ते स्पष्टपणे या सदरात मांडताना डोळे यांनी रामरहीमच्या निमित्ताने धर्मगुरूंचा पर्दाफाश केला आहे.

‘लष्करीकरणाशी लगट’ या लेखात डोळ्यांनी मागच्या काही वर्षात स्त्रियांच्या लष्करीकरणाचा जो खटाटोप शासन करत आहे त्याचा लेखाजोखा घेतला आहे. मग त्यात निर्मला सीतारमण यांना संरक्षणमंत्री करणे काय किंवा कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीस फौजेत नोकरी देणे काय, स्त्रिया कशा कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत आणि भाजपाच्या शासनकाळात स्त्रियांना कोणत्याही क्षेत्रात मज्जाव नसेल, हे ठसवून सांगणे जोरात चालू आहे. जयदेव डोळे एक प्रश्न विचारतात की कोणत्याही देशाला लष्करीकरणाची मुळातच गरज का पडते? जगात असेही देश आहेत ज्यांच्याकडे लष्कर नाही किंवा ज्यांच्याकडे सैन्य असूनही ते युद्ध करत नाहीत. पुरुषत्व किंवा मर्दानगी दाखवण्यासाठी या देशांमधील पुरुषांना सैन्यात जाण्याची गरज वाटत नाही. मग आपल्याला का वाटते? लष्करात जाणे म्हणजे मर्दानगी अशी जाहिरात करणार्यांचे सध्या राज्य आहे. कोणताही प्रश्न दादागिरी करूनच सोडवायचा. त्यासाठी यांच्या शाखा शरीर कमावणे, डोके बंद करून फक्त लाठ्या-काठ्या वापर्ण्याचेच प्रशिक्षण देणे आदि उद्योग करतात. या विचारसरणीमध्ये स्त्रियांना अत्यंत हीन स्थान आहे. पण स्त्रियांच्या वेगळ्या समित्या स्थापून त्यांनाही मर्दानगीची हीच मुल्ये गळी उतरवून आपल्या साच्यात घडवणे यांना महत्वाचे वाटते. (स्त्री-पुरुषांचं प्रशिक्षण कडक पद्धतीने वेग-वेगळं ठेवलं जातं, त्यांच्यात एकत्र येण्याची कोणतीही शक्यता ठेवली जात नाही. एकमेकांच्या सान्निध्यात येऊन जवळीक, प्रेम निर्माण झाले तर सगळेच मुसळ केरात!!) डोळे जगातील अनेक देशातील लष्कराचे उदाहरण देऊन स्पष्ट करतात की युद्धात जिथे जिथे लष्करी तळ उभारले गेले तिथे तिथे स्थानिक आणि पराजित समूहाच्या स्त्रियांचा वेश्या म्हणून वापर केला गेला. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, विएतनाम, कोरिया, ही लष्करीकरणाच्या बळी मोठ्या प्रमाणावर स्त्रिया कशा पडतात याची उदाहरणे आहेत. अर्थात स्त्रियांच्या लष्करीकरणाच्या मागची विचारधारा हीच आहे की स्त्रियांनीही पुरुषसत्ताक राजकारण आत्मसात करावे, स्वत:चे दासत्व मान्य करावे, आणि एवढेच नाही तर त्यातूनच कशी राष्ट्रसेवा घडते हा भ्रम बाळगावा, यासाठी हा सगळा खटाटोप. लष्करीकरण हे पुरुषवर्चस्ववादापासून वेगळे काढताच येणार नाही असे नमूद करून डोळे म्हणतात की एखाद्या महिलेला संरक्षणमंत्री करून किंवा सैन्यात स्त्रियांना प्रवेश देऊन स्त्रियांचे सक्षमीकरण होत नसते, उलट पुरुषांच्या पुरुषी मनोवृत्तीला धक्का न लावता स्त्रियांनाही त्यांच्याच सारखे बनवून हिंस्र, बलात्कारी व्यवस्थाच यातून बळकट केली जाते.

स्त्रीयालिटी या सदरातील ‘रचना विरुद्ध पुनर्रचना’ या लेखात डोळे पत्रकारितेच्या क्षेत्रातील स्त्रियांच्या दुय्यमत्वाकडे लक्ष वेधतात. लोकशाहीच्या नावानेच सत्ता काबीज केलेले अनेक राज्यकर्ते पत्रकारांना मोठा अडथळा समजतात. अडचणीच्या ठरणाऱ्या पत्रकारांना संपवून टाकतात. डोळे यांनी जगभरातील अनेक महिला पत्रकारांची उदाहरणे देऊन या मुद्याचा स्त्रीवादी पैलू अधोरेखित केला आहे. पत्रकारांचे मुख्य काम सरकारच्या कमतरता दाखवून सरकारला कायम देशहिताचे ध्येय समोर ठेवून कार्य करायला भाग पाडणे हे होय. परंतु भ्रष्ट कारभार उघडकीला आणणाऱ्या भारतीय किंवा परदेशी असंख्य पत्रकारांना कशा प्रकारे यातनांना तोंड द्यावे लागते याचे सोदाहरण विवेचन डोळे यांनी या लेखात केले आहे. त्यातून पुढे जर ती पत्रकार स्त्री असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित भाजपा सरकार चवताळेल नाही तर काय! डोळ्यांच्याच शब्दात सांगायचे तर “एक पत्रकार आणि त्यातही एक बाई पत्रकार आपल्या नैतिकतेच्या चिंधड्या उडवते म्हणजे काय?” सारख्या सारख्या नकारात्मक बातम्या देऊन हे पत्रकार हिंदू समाजाची नकारात्मक प्रतिमा उभी करतात असा आक्षेप ठेवून संघ परिवार सरसकट साऱ्या पत्रकारांना डाव्या, सेक्युलर विचारधारेचे असल्याचा आरोप करतो. त्यावेळी तो हे विसरतो की राज्यघटनाच जर सेक्युलर असेल तर त्यानुसार काम करणार्यांनी कोणती मुल्ये धरून पत्रकारिता करावी?

जयदेव डोळे आपल्या अनेक लेखांमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चरित्राबद्दल अत्यंत परखडपणे लिहित आले आहेत. स्त्रियालीटी या सदरातील ‘शर्मिष्ठा मुखर्जीचे वडिलांना सुनावणे’ या लेखात त्यांनी शर्मिष्ठाने आपले वडील माजी राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जी जेव्हा संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपाचे प्रमुख वक्ते म्हणून गेले तेव्हाच्या संघाने खेळलेल्या घाणेरड्या राजकारणाचा चांगलाच समाचार घेतला त्याचे वर्णन केले आहे. संघाने प्रणवदांच्या परखड भाषणाकडे दुर्लक्ष करून त्यांची बनावट छायाचित्रे प्रसिद्ध केली ज्यामध्ये त्यांना काळी टोपी घालून संघी पद्धतीने नमस्कार करताना दाखवले आणि सामान्य जनतेच्या स्मरणात शब्दांपेक्षा फोटो राहतात या वस्तुस्थितीचा फायदा घेतला. या प्रकारच्या खालच्या पातळीवरील युक्त्या वापरण्यात संघाचा हात कुणी धरू शकत नाही. डोळे याची अनेक उदाहरणे आपल्या लेखात देतात.

आपल्या अजून एका ‘ना पुछूंगा, ना पुछने दूंगा’ या लेखात डोळे यांनी भारतातील वाढत्या बलात्काराच्या घटनांची चर्चा केली आहे. त्यात त्यांनी या घटनांवर राज्यकर्त्यांनी घेतलेल्या निष्क्रिय आणि कर्तव्यशून्य भूमिकेची चिकित्सा करून राज्यकर्त्या पक्षाची पुरुषी वृत्ती दाखवून दिली आहे. स्त्रीचे स्थान कसे दुय्यम असणेच योग्य आहे आणि तिने कसे कुटुंबासाठीच खपावे हीच संघ परिवाराची शिकवण आहे. डोळे म्हणतात की धर्म कोणताही असो, मुलतत्ववाद्यांचे विचार स्त्री संबंधी असेच असतात. स्त्रीला स्वातंत्र्य, समता इत्यादी मुल्ये लागू होत नाहीत आणि त्यामुळे तिच्यावर जबरदस्ती करणे यात वावगे काही नाही असेच अप्रत्यक्ष रित्या संघ मानतो. पुरुषांचा बळजबरी करण्याचा हक्कच असतो किंबहुना पुरुषांच्या हक्काला बळजबरी म्हणणे हेच त्यांना चुकीचे वाटते. पुरुषी इच्छेला मान देणे, समर्पण करणे एवढेच काय ते स्त्रीने करणे अपेक्षित असते. सद्य शासन हे या प्रकारच्या विचारांचे समर्थन करते, त्याला मान्य करते. हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्राचा विचार आक्रमक आणि पुरुषकेंद्री आहे. याचा प्रत्यय २००२ साली गुजरातेत आलाच आहे.

स्त्रीयालिटीच्या समारोपाच्या लेखात डोळे यांनी ‘भारत विरुद्ध भारतमाता’ हा विषय मांडला आहे. लेखाच्या सुरुवातीलाच स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या देशांच्या यादीत भारताने बरंच वरचा नंबर मिळवला आहे हे नमूद करून लेखक म्हणतात की अगदी अफगाणिस्तान आणि सिरीयाला सुद्धा भारताने मागे टाकले आहे. या सदराचा मूळ हेतू हा स्त्रियांना तुच्छ मानणारी प्रवृत्ती जेव्हा शासनारूढ होते तेव्हा सामान्य पुरुष सुद्धा ही प्रवृत्ती कशी सहज अंगिकारतात, याची मीमांसा करणे हा होता. थोम्सन रॉयटर्स या अतिशय विश्वासार्ह ब्रिटीश वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या निकालांना सुद्धा तुच्छतेने धुडकावून टाकणे, त्यांच्या निष्कर्षांना गंभीरपणे न घेता त्या संस्थेचीच नव्हे तर कोणत्याही गंभीर संशोधनाची, विचाराची, तथ्यांची खिल्ली उडवणे, अशा कृत्यांनी शासनाने आपला पुरुषप्रधान चेहरा दाखवून दिला आहे. लोकशाही मूल्यांना पाश्चात्य ठरवून स्त्रियांना समर्पण, त्याग, अमर संस्कृतीच्या फेर्यात अडकवून ठेवण्याचा आग्रह संघाचे विचारक, प्रचारक करतात. अशा स्थितीत जर भारतात स्त्रियांवरील अत्याचार वाढले तर त्यात नवल ते काय? स्त्रीद्वेशाने ओतप्रोत संस्कृतीमध्ये स्त्रीची टिंगल, टवाळी वाढली आहे. स्त्री केवळ उपभोग्य वस्तू नव्हे तर बिनडोक आणि मनोरंजनाची गोष्ट आहे असे दर्शवणारे लंपट विनोद जेव्हा सर्वसामान्य पुरुष सहज जाताजाता करतात, तेव्हा त्याचा अर्थ ते बलात्काराला आणि हिंसाचारालाही समर्थन देत आहेत असाच होतो.

डोळ्यांचे सदरातील शेवटचे वाक्य डोळ्यात अंजन घालते, “ ‘स्त्रियालिटी’ ही मला अशी दिसली. ती फार प्रखर वाटली असेल तर वाटू दया! कारण मला न दिसलेली त्याहीपेक्षा प्रखर आहे, हो ना भारतमाते?” ‘मिळून साऱ्याजणी’ सारख्या मासिकांचा मूळ हेतूच पुरुषांनीही आत्मचिंतन करावे हा आहे. म्हणूनच बहुतेक पुरुषांना या मासिकातील लेखन आवडत नसावे असे मांडून डोळे म्हणतात की असे असेल तर त्यासाठीच ते लिहिले जावेत.

मुस्लीम मनाचा कानोसा

मिळून साऱ्याजणी हे बहुधा एकमेव मासिक असेल जे मुस्लीम महिलांच्या अभिव्यक्ती साठी नियमित सदर चालवते. खरं तर असे स्वतंत्र सदर असण्याची गरज पडू नये अशीच मानवी समाजाची रचना असायला हवी. परंतु, तसे नाही. जमातवादाचे अतिशय क्रूर रूप आपण सध्या पाहत आहोत. कधी नाही इतकी दुफळी भारताच्या दोन मुख्य धर्मांमध्ये निर्माण झाली आहे. अशा काळात असे सदर नियमित चालू ठेवणे वैशिष्ट्यपूर्णच नाही तर धाडसाचे देखील आहे.

या सदरातील लेखांचा धांडोळा थोडक्यात देण्याचा प्रयत्न या लेखात केला गेला आहे. सदरात वेगवेगळ्या लेखकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या तत्कालीन महत्वाच्या विषयांवर आपापले विचार मांडले आहेत. (सर्वच लेखक मुस्लीम धर्मीय आहेत ही गोष्ट मात्र थोडी खटकणारी वाटली.) त्यांनी आपल्या लेखांमधून मुस्लीम समाजाच्या आणि खासकरून मुस्लीम स्त्रियांच्या प्रश्नांचा मागोवा घेतला आहे. पडदा प्रथा, तोंडी तलाक, मदरसे आणि त्यातील शिक्षण, मुस्लिमांमधील बलुतेदारी, अशा विविध प्रथा-परंपरांचा चिकित्सक आढावा घेतानाच लेखकांनी मुस्लीम स्त्रियांनी तसेच त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संघटनांनी मुस्लीम स्त्रियाच नाही तर मुस्लीम समाजाच्या उन्नतीसाठी, देशासाठी दिलेल्या योगदानाची चर्चा सुद्धा केली आहे.

या सदरात लेखन केलेल्यांमध्ये तमन्ना इनामदार हे महत्वाचे नाव आहे. त्यांचे एकटीचे विविध विषयांवर सात लेख आहेत. त्यांची लेखन शैली अगदी ओघवती, सहज संवाद साधणारी आहे. मराठी-हिंदी भाषेची सुंदर मिसळण त्यांच्या लिखाणात दिसते. त्यांच्या लिखाणाचा भर मुख्यत: स्त्रियांच्या सक्षमीकरणावर आणि सर्वधर्मभावावर आहे. असे असले तरी त्या स्त्रियांना दुय्यम स्थानावर ढकलणाऱ्या धर्माला प्रश्न विचारात नाहीत. त्या स्त्रियांच्या हक्कांविषयी पोटतिडकीने मांडणी करतात पण स्त्रीवादी दृष्टिकोनाचा अभाव त्यांच्या लिखाणात दिसतो. आपल्या ‘इस्लामकी पर्दानशीन दुख्तरे’ या लेखात पडदा प्रथेवर लिहिताना इनामदार म्हणतात की हजरत पैगंबरांच्या काळात स्त्रियांना समाजात महत्वाचे स्थान होते आणि त्या पुरुषांच्या बरोबरीने मशिदीत नमाज पढत. परंतु नंतरच्या काळात ही प्रतिष्ठा खालावली व स्त्री हिजाब मध्ये बंदिस्त झाली. हे लिहिताना लेखिका कोणत्या कारणांमुळे हे बदल झाले त्यावर प्रकाश टाकत नाही. त्यांच्या मते मधल्या मोठ्या काळात मुस्लिम महिलांनी प्रतिकार केला नाही पण आता मुली आपल्या हक्कांविषयी जागरूक होऊ लागल्या आहेत, शिक्षण घेऊन स्वत:ची तरक्की करू पाहत आहेत. इस्लामिक देशांमध्ये त्यांचा राजकीय सहभाग वाढत आहे.

आपल्या ‘एक ये ही नहीं, जालीम गम और भी है’ या लेखात तिहेरी तलाकचा प्रश्न तमन्नादीदी मांडतात. अर्थात ज्या प्रकारे माध्यमांनी तलाकचा प्रश्न हा मुस्लीम समाजाचा एकमेव प्रश्न असल्याप्रमाणे दाखवायला सुरुवात केली आहे त्यावर तीव्र आक्षेप घेऊन त्या लिहितात की “और भी गम है मुसलमानो के तलाक के सिवा” ! तलाकचा मुद्दा घेऊन मुसलमान पुरुषांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून हिंदी-मुस्लिम दरी अजून वाढवण्याचे उद्योग अनेकजण करताना दिसतात. मुस्लिम महिलांचा कैवार घेऊन त्यांना त्यांच्या पुरुषांपासून वाचवण्याचा जो आव आणला जात आहे तो दुषित मानसिकतेचा अविष्कार आहे असे सांगून लेखिका म्हणते की खऱ्या अर्थाने मुस्लिम स्त्रीच्या प्रगतीबद्दल या विचारसरणीत कोणतीही जागा नाही. आजही बहुसंख्य मुसलमान स्त्री-पुरुष केवळ मुसलमान आहेत म्हणून अनेक क्षेत्रांमध्ये अपात्र ठरवले जातात, सर्वसामान्य स्त्री-पुरुषांना उपलब्ध संधी त्यांना नाकारल्या जातात. बहुतेक जण अशिक्षित, अर्धशिक्षित आणि अप्रशिक्षित राहतात आणि असंघटीत क्षेत्रात कामे करतात.

तलाक प्रश्नावर या सदरात बेनझीर तांबोळी यांचाही ‘तलाक-ए-बिद्दतवरील बंदी आणि पुढील लढाई’ हा लेख आहे. बेनझीर या मुस्लिम सत्यशोधक मंडळ महिला मंचाच्या प्रमुख आहेत. शायरा बानो, आफरीन रहमान, आलिया साबरी, गुलशन परवीन आणि इशरत जहां या पाच स्त्रियांनी तलाक-ए-बिद्दत (एका दमात दिला जाणारा तोंडी एकतर्फी तलाक) विरुद्ध कायदेशीर लढा दिला आणि त्याला काही प्रमाणात का होईना यश मिळाले. त्यांना मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि इतर पुरोगामी मुस्लिम संघटनांचा पाठिंबा होता. असा तलाक असंवैधानिक असून त्यामुळे मुस्लिम महिलांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन होते असे मत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच पैकी तीन न्यायाधीशांनी नोंदवलं. All India Muslim Personal Law Board चे ही मत या प्रकारच्या तलाकच्या बाजूचे आहे असे बेनझीर यांचे म्हणणे आहे. करण बोर्डाच्याही मते हा तलाकचा प्रकार कुराण किंवा शरियतला मान्य नाही.

अर्थात शरियतला मान्य असलेल्या तलाक-ए-हसन प्रकारात सुद्धा मोठी लिंग-विषमता दिसून येतेच. पुरुषाला तलाक द्यायचा असेल तर तो तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करू शकतो पण स्त्रीला तलाक हवा असेल तर मात्र तिने १९३९ च्या मुस्लिम विवाह-विच्छेद कायद्याची प्रक्रिया कोर्टातून पूर्ण करावी अशी अट आहे. अनेक मुस्लिम महिलांनी, संघटनांनी याविरुद्ध आवाज उठवले आहेत. मुस्लिम सत्यशोधक मंडळ मुस्लिम महिलांना न्याय, हक्क मिळावेत यासाठी विविध उपक्रम राबवते. समान नागरी कायद्याची मागणीही मंडळाने वारंवार मंडळी आहे. बेनझीर तांबोळी केवळ तलाक या एकाच प्रश्नाभोवती मुस्लिम स्त्रियांचे मुद्दे उपस्थित न करता बहुपत्नीत्व, हलाला, पोटगी, दत्तक घेणे, वारसा हक्क हे प्रश्न सुद्धा आपल्या चर्चेत घेतात. या सर्व प्रश्नांवर विचारमंथन होऊन त्यांवर संवैधानिक उपाययोजना करणे गरजेचे आहे असे त्या आग्रहाने मांडतात. शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी, सामाजिक सुरक्षितता, हे प्रश्न केवळ मुस्लिम नाही तर सर्व भारतीय महिलांसाठी अटीतटीचे प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे असे मांडून लेखिका म्हणतात की मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांची सोडवणूक त्या मुस्लिम आहेत म्हणून नव्हे तर त्या भारतीय नागरिक आहेत म्हणून व्हायला हवी. यासाठी त्यांच्या मते, अनिष्ट रूढी, प्रथा-परंपरांचे मळभ दूर होणे आवश्यक आहे. यासाठी त्या मुस्लिम महिलांना आवाहन करतात की त्यांनी १९५४ च्या विशेष कायद्यानुसार विवाह करावेत म्हणजे त्या अनेक जमातवादी दबावांमधून मुक्त होतील.

या सदरातील एका लेखात ‘शौहरला तलाक देणाऱ्या मोह्तरमा ...?’ रजिया सुलताना त्या थोड्या मुस्लिम स्त्रियांविषयी लिहितात ज्यांनी स्वत:च पतीला सोडून बंडखोरी केली आहे. ‘तुम्ही आम्हाला काय सोडता, आम्हीच तुम्हाला सोडतो’ असं म्हणून पतीला स्वतःहून तलाक देणाऱ्या वीस टक्के महिला आहेत असे मांडून रजियाताई म्हणतात की राज्य घटनेतील कायदा न मानणारे आणि वैयक्तिक कायद्यात हस्तक्षेप नको असा ओरडा करणारे सर्व मुसलमान गट-पंथाचे धर्मगुरू स्त्रियांच्या विरुद्ध या मुद्यावर एकत्र येतात. त्यांचे म्हणणे असते की शरियत मध्ये ब्रिटिशांनी सुद्धा हस्तक्षेप केला नाही, तर आताचे शासन कोण? आम्ही स्त्रिया मात्र या धर्मगुरूंशी लढणार नाही. आम्ही आमच्या मागण्या भारतीय नागरिक म्हणून शासनाकडे करणार. आवाज-ए-निस्वा, मुस्लीम महिला हक्क संघटना या संदर्भात लढाई उभी करत आहेत. या वीस टक्के महिला ज्या स्वत:च खुला मागून वेगळ्या होऊ इच्छितात त्यांची परिस्थिती काही फार चांगली नाही. कोर्टात पण न्याय मिळेल, आर्थिक पाठींबा मिळेल याची खात्री नसते. वास्तव जीवघेणे आहे. तलाकच्याच प्रश्नावर लिहिलेल्या रजिया सुलताना यांच्या ‘बेजुबां तलाक’ या पुस्तकाची ओळख उजमा अहमद आपल्या ‘बेजुबा तलाक – नि:शब्द संसाराचे वास्तव’ या लेखात करून देतात. ज्या पाच महिलांनी (शायरा बानो, आफरीन रहमान, आलिया साबरी, गुलशन परवीन आणि इशरत जहां) तीन तलाक, जुबानी तलाक, निकाहे हलाल या प्रथा बंद व्हाव्यात म्हणून सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली त्यांची सविस्तर ओळख आणि म्हणणे पुस्तकात दिले आहे. रजियाताई पत्रकार आणि स्तंभलेखिका आहेत तशाच सामाजिक कार्यकर्त्या आणि कवियत्री पण आहेत. हे पुस्तक स्त्री-पुरुष नातेसंबंधावर आहे. सर्व महिलांच्या या संदर्भात अनेक समस्या आहेत, पण मुस्लिम महिलांच्या समस्येला वेगळी किनार आहे. पुस्तकाची भाषा सोपी, सहज समजणारी आहे.

तलाक प्रश्नावर या सदरात अधिक लेख आहेत, त्या तुलनेत पडदा प्रथेवर तमन्ना इनामदार यांचा एकच लेख आहे, ‘इस्लाम की पर्दानशीन दुख्तरे’. लेखिकेच्या मते पैगंबरांच्या काळात स्त्रियांना अधिक मान सन्मान होता. स्त्री अत्याचारावर प्रेषितांनी आपल्या वाणीनेच नाही तर कृतीनेही विरोध केला. पुढे मात्र स्त्रीची प्रतिष्ठा कमी होत जाऊन स्त्री हिजाब मध्ये बंदिस्त झाली. मधला बराच काळ मुस्लिम स्त्रीने विरोध न करता व्यतीत केला, पण आता मुली शिकू लागल्या, बोलू लागल्या आहेत. तारीख करवट बदल रही है, इतिहास बदलत आहे, असे मांडून लेखिका म्हणते की आता इस्लामी जगतात नवी पहाट उगवत आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनात स्त्री प्रवेश करत आहे. उपलब्ध संधींचा लाभ घेत आहेत.

तमन्ना इनामदार सदरातील आपल्या ‘आपले आनंदोत्सव: ईद-दिवाळी’ या लेखात दोन्ही सण कसे एकदिलाने साजरे करणं गरजेचं आहे आणि ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कसे प्रतिक आहेत हे मांडतात. सणांना धार्मिक रंग देणे अमान्य करून त्या म्हणतात की मुस्लिम पण तितक्याच उत्साहाने दिवाळी साजरी करतात. दिवाळी हा सण व्यापाऱ्यांचा आहे आणि अनेक मुस्लिमधर्मीय व्यापारी आहेत. तसेच रमजानला रोजे ठेवणारे कितीतरी मुस्लिमेतर असतात. रमजानच्या महिन्यात शहरांमध्ये लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या ठेल्यांवर सर्व धर्मीय स्त्री-पुरुष गर्दी करतात. लेखिका आपल्या ‘बोलू तर दया, समजून तर घ्या’ या लेखात म्हणतात की विविध जाती-धर्माने नटलेल्या भारतामध्ये विविधता आनंदाने एकत्र नांदते, तिथे जखमा होऊ न देणे आणि झाल्या तर योग्य उपचार वेळेवर करणे गरजेचे आहे. अशा वेळी मुस्लिम समाज विविध प्रकारच्या मागासलेपणाचा बळी आहे. आम मुसलमान व्यक्तीला बोलायला उद्युक्त करण्याची गरज आहे. आपल्या समस्या मोकळेपणाने मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे. विश्वासात घेण्याची गरज आहे. मुस्लिमधर्मीयांविषयी अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत, खोल रुजले आहेत, त्यांच्या बद्दल त्यांच्याशीच बोलायला हवे. मुसलमान समाज सुद्धा बदलत आहे. तमन्नादीदी विश्वासाने सांगतात की मशिदी खुल्या होत आहेत. अनावश्यक बंधनं निखळून पडायची सुरुवात होत आहे. अशावेळी प्रबोधन मुसलमान तरुण-तरुणींपर्यंत पोचायला हवे. महाराष्ट्रातील मुसलमान मराठी बोलू शकत नाहीत अशा सारखे गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. पैगंबरांनी शिक्षणाला खूप महत्व दिले. त्यासाठी भरपूर प्रवास करण्याचा सल्ला दिला. मशिदींमध्ये वाचनालये सुरु करून वाचन संस्कृती वाढवण्यासारखे प्रयत्न मुस्लीम समाजाकडून झाले पाहिजेत असे नमूद करून लेखिका आर्जव करतात की आपल्याच समाजाचा अविभाज्य घटक असलेल्या मुसलमानाला पाठीवर आश्वासक हात ठेवून समजून घेतले तर त्याला/तिला मुख्य प्रवाहात यायला अजिबात वेळ लागणार नाही.

मुस्लीम समाज आणि शिक्षण या विषयावर तमन्ना इनामदार यांनी या सदरात दोन लेख लिहिले आहेत. पहिल्या ‘मदरशातील शिक्षण आणि वास्तव’ या लेखात त्या म्हणतात की शिक्षणाची भूमिका सक्षमीकरणासाठी खूपच आवश्यक आहे. मदरसा म्हणजे काय याचे सविस्तर वर्णन त्यांनी त्यांनी या लेखात केले आहे. मुस्लिमेतर वाचकांसाठी हे अतिशय महत्वाची माहिती आहे. ‘मदरशांमधून दहशतवादाचे शिक्षण दिले जाते’ हा अपप्रचार असून त्याला वेळीच सडेतोड उत्तर दिले गेले पाहिजे असे त्या म्हणतात. कोणतीही दुष्कृत्य, हिंसा किंवा विध्वंस हे काही एका धर्माशी संबंधित गोष्टी नसतात. मदरसे, मठ, आश्रम, स्वामी, साध्वी किंवा मौलाना, लेखिकेच्या मते हेच मानवतेचे शत्रू आहेत. त्यांच्या मते, मदरसे काय किंवा इतर शाळा काय, मुलांचे प्रश्न सगळीकडे सारखेच असतात. त्यांना शिक्षणाच्या चांगल्या सोयी-सुविधा मिळणे, त्यांचे योग्य समुपदेशन होणे गरजेचे असते. त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. मुसलमानांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे असे मांडून त्या म्हणतात की यासाठी मदरशाच्या व्यवस्थापनांनी विशेष प्रयत्न करायला हवेत. मदरशांच्या संदर्भात लिहिलेल्या आपल्या ‘ये उस्ताद, वो शागिर्द’ या दुसऱ्या लेखात तमन्ना म्हणतात की ज्ञान मिळवण्यासाठी गुरूची नितांत आवश्यकता असते पण गुरुचा अर्थ जर आपण अध्यात्मिक गुरु समजत असलो तर आपण मोठी चूक करत आहोत. युगानुयुगे धर्म माणसाला नागवतोय, फसवतोय, तरी आपले डोळे का उघडत नाहीत असा प्रश्न त्या विचारतात. मठ, मदरसे ज्या प्रकारचे गैरवर्तन करतात, अनाथालये, महिलाश्रम काढून समाजाकडून मोठमोठ्या देणग्या मिळवून स्वत: गडगंज होतात, आणि ज्या मुला-मुलींसाठी, महिलांसाठी समाजाने पैसे दिलेले असतात त्यांचेच प्रचंड हाल करतात. असे गैरप्रकार समाजात का होतात हा महत्वाचा प्रश्न विचारून लेखिका म्हणते की मुस्लिम समाज इतका दुरवस्थेत, अभावग्रस्ततेत आणि असुरक्षिततेत जगतो की ढोंगी धर्मगुरुंवर सहज विश्वास टाकतो. या फसव्या धार्मिक संस्थांचे तेव्हाच फावते जेव्हा समाज सामाजिक-आर्थिक पातळीवर हतबल असतो.

मुस्लीम मनाचा कानोसा या सदरात मुस्लीम समाजाच्या मागासलेपणाची चर्चा करणारे काही महत्वाच्या विषयांवरील लेख आहेत. हे लेख विशेषत: स्त्रीप्रश्नाशी निगडीत आहेत. यामध्ये रजिया सुलताना यांचे ‘मुलगी नापसंत, कारण...’ आणि ‘वधू संशोधकांची प्रश्नावली’ हे दोन लेख मुलींचे विवाह ठरवण्याच्या अन्याय्य रूढींशी संबंधित आहेत. कोणतीही फालतू करणे सांगून मुलगी नापसंत केली जाते तेव्हा आपण करत असलेल्या समानतेच्या गप्पा किती फोल असतात हे लक्षात येते. कधी घर लहान तर कधी शिक्षण जास्त, कधी वडील दारू पितात, तर कधी भाऊ जेल मध्ये आहे, मुलगी उंच किंवा ठेंगणी आहे किंवा तिला चष्मा आहे, नकार द्यायला कोणतेही कारण वर-पक्षाला पुरते. हिंदूंप्रमाणे मुस्लीम समाजात हुंडा प्रथा नाही पण रुढी-परंपरांचे गारुड आहे. लेखिकेच्या मते खरंतर पैगंबरांनी हजारो वर्षांपूर्वी महिलांच्या हक्कांची पायाभरणी केली आहे. धर्मालाच स्त्रियांची बाजू घ्यायला लावली आहे. पण समाजाने चांगल्या विचारांची वाट लावली आणि सोयीप्रमाणे धर्म वापरला. या लेखात समस्या खूपच प्रभावीपणे मांडली गेली आहे पण उपायांची चर्चा न झाल्यामुळे मुद्दा अपूर्ण राहिल्यासारखा वाटतो. दुसऱ्या लेखातही लेखिकेने वधू संशोधन हाच विषय घेतला आहे. त्यात त्यांनी त्यांच्या मुलीला लग्नासाठी बघायला आले तेव्हाचा प्रसंग वर्णन केला आहे. वर-पक्षाकडून जे प्रश्न विचारले गेले त्याची मीमांसा त्या या लेखात करतात. यांच्या घरात सुद्धा अजून काही जुन्या वळणाच्या परंपरा पाळत असावेत असे लेख वाचून वाटले. उदा. त्या म्हणतात आमच्याकडे वधू पक्ष मुलाकडे मागणी घेऊन जात नाही, वर-पक्षाकडूनच मागणी यावी लागते. त्या म्हणतात पुरोगामी महाराष्ट्रात आधुनिकतेसोबत कट्टरता सुद्धा वाढत आहे.

रजिया सुलताना यांचा पुढचा लेख ‘उंबरठ्याच्या आतील ‘मी टू’ या विषयाची चिकित्सा केली आहे. विशाखा समिती वर त्यांनी विविध ठिकाणी सदस्य म्हणून काम पहिले आहे. अनुभव फार चांगले नाहीत असे सांगून त्या म्हणतात की समित्यांमुळे महिलांना न्याय मिळतोच असे नाही. पुरुष मात्र सहानुभूतीला पात्र होतो, त्याला समर्थक भेटतात. उघड पाठिंबा मिळतो. तक्रार करणारी महिलाच बहिष्कृत होते. मी टू चे ही असेच झाले. बाई जाईल तिथे, घरी-दारी, तिला लैंगिक शोषणाला तोंड द्यावे लागते. हे आजचे नाही. पूर्वी पण होतेच. घरातील, उंबरठ्याच्या आतील ‘मी टू’ लेखिकेला अधिक महत्वाचे वाटते. सावत्र बाप, सख्खा बाप, भाऊ, चुलता, मामा, काका, सासरा, दीर, सख्खे शेजारी ज्यांच्या भरवशावर स्त्रीने निर्धास्त असणे अपेक्षित आहे, त्यांनीच शोषण करावे! याचा विशिष्ट धर्माशी काही संबंध नाही. सर्व जाती-धर्मात हीच परिस्थिती आहे. प्रत्येकीला तलाक परवडत नाही. अनेक कारणांमुळे विरोध करता येत नाही. अशा वेळी उंबरठ्याच्या आतील मी टू बद्दल आपण कधी बोलणार हा महत्वाचा प्रश्न लेखिका विचारते. रजियादीदीचा पुढचा लेख मनोरंजक पद्धतीने लिहिलेला असला तरी ‘डोक्याच्या केसांमधील लिंगभेद’ या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतो.

शिक्षण घेतल्यामुळे स्वत:ची काही प्रमाणात प्रगती करता आली, साहित्य निर्मिती करता आली, प्रवास करता आले, असे त्या मानतात. हजच्या निमित्ताने सौदी अरब येथे गेलेल्या असताना त्यांनी अनेक चमत्कारीत अनुभव घेतले. मुख्य धक्का बसला मक्का आणि मदिना ही शहरे ‘ओन्ली फॉर मुस्लीम’ असलेली पहिली तेव्हा. त्यांचा हेतू पर्यटनाचा होता, स्त्रीवादी समीक्षा करण्याचा होता, पण नवरा पूर्ण धार्मिक उद्देशाने आला होता. सौदी अरब हे कट्टर मुस्लीम राष्ट्र आहे. तिथे महिलांच्या साठी खास वेगळे कायदे आहेत. पुरुषाशिवाय एकटीने न फिरणे, ड्राईविंग न करणे, राजकारणात सहभाग न घेणे, बाहेर पडताना नकाब, हिजाब सगळा बंदोबस्त करूनच बाहेर पडणे, डोळ्यावर देखील पातळ जाळी ठेवणे, इत्यादी. त्यांचे केस जड, कुरळे होते आणि नकाब ची सवय नव्हती. बाईचा एक केसही दिसत कामा नये असा कायदा, आणि दिसला तर बोकडाची कुर्बानी दंड म्हणून. माझ्यामुळे नवर्याला भुर्दंड पडला. पण या स्थितीत वर्षानुवर्षे महिला जगतात याचे भान त्यांना आले आणि मनात अनेक प्रश्न उभे राहिले. पुरुषांनी स्त्रियांच्या केसांकडे बघण्याची गरजच काय? जगभरातून कापायला आणलेले बकरे ५-५ हजारांना विकणे, त्यांच्या भोवती एक संपूर्ण मार्केट उभे झाले आहे. बळी दिलेल्या बकऱ्याचे तुकडे आंतरराष्ट्रीय बाजारात विकले जाणार. हीच स्थिती उंटांची पण. आपल्या देशात पण हीच बळी देण्याची प्रथा. कापणारे मुसलमान, विकणारे हिंदू असे चित्र सर्रास दिसते. लेखिका व्यथित होऊन म्हणते या प्रश्नांना तोंड फोडायचे तर फतवे निघतात. मागे त्यांनी लिहिलेल्या एका लेखामुळे त्यांना सहा महिने पोलीस संरक्षणात राहावे लागले.

तमन्ना इनामदार यांनी ‘मुस्लिम बलुतेदार’ या एका वेगळ्याच विषयावर एक लेख या सदरा अंतर्गत लिहिला आहे. इस्लाम मूळचा समानतेवर आधारित धर्म. जन्मावरून विषमता या समाजात नाही. लेखिका मानते की हिंदू समाजातील अनेक उच्च तसेच नीच वर्णीय लोकांनी इस्लाम हा धर्म त्यातील समानतेच्या मुल्यासाठी स्वीकारला. अनेक प्रकारचे व्यावसायिक इस्लाम धर्मात आले, पण व्यवसाय, रिती, परंपरा, संस्कृती तशाच राहिल्या. या कारणाने मूळ इस्लाम मध्ये जाती भेद नसला तरी, भारतीय मुसलमानांमध्ये एकूण ८३ जाती आहेत. रोटी एकत्र खातील, एकत्र नमाज पढतील पण बेटी बंदीचे नियम पाळले जातात. पूर्वीपासूनच्या चालत आलेल्या सवयी, विचार, आचार धर्म बदलला तरी तसेच राहिले. गावगाडा चालण्यासाठी उपयुक्त अशा ८३ मुस्लिम जाती-जमातींचा अभ्यास लेखिकेने केला. या जातींचा धर्मांतराचा इतिहास, त्यांचे व्यवसाय, जमातपंचायती, रिती-रिवाज, शासनाची त्यांच्याप्रती असलेली अनास्था आदि गोष्टी समजून घेतल्यावर तमन्नाताईंनी या विषयावर याच नावाचे पुस्तक लिहिले. विशेष म्हणजे काही जमातींच्या अतिशय उल्लेखनीय प्रथांचा उल्लेख लेखिकेने केला आहे. या प्रथा अतिशय अनुकरणीय आहेत आणि माणुसकीचा झेंडा उंचावणाऱ्या आहेत. यामुळे हे पुस्तक विशेष वाचनीय आहे.

सदरातील मन हेलावून टाकणारा लेख ‘तौसीफ शेख आणि बधीर मानसिकता’ या सुद्धा तमन्नाताई यांनीच लिहिला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये येवला येथील तौसीफ ने आत्मदहन केले. सामाजिक माध्यमांद्वारे ही बातमीच नव्हे तर आत्मदहनाचे संपूर्ण चित्रीकरण सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध झाले. तौसीफ ला वाचवण्याचा प्रयत्न न करता चित्रीकरण करत बसणारे महाभाग आणि त्यांच्या मानसिकतेला लेखिका बधीर मानसिकता म्हणते. तौसीफ ने जाळून घेतले करण तो समाजाचे लक्ष एका अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे वेधू पहात होता. मुस्लिम समाजात वक़्फ़ नावाची एक संकल्पना आहे. सामाजिक कल्याण साधण्यासाठी श्रीमंत लोकांनी आपल्या मालमत्तेतील काही भाग गरीब वंचित लोकांसाठी दान करावा, मग ते दान जमीन, शेती, बांधकाम कोणत्याही स्वरुपात असू शकते. प्रशासनच नाही तर वक़्फ़ बोर्ड, मौलवी, सगळेच वक़्फ़ चा सदुपयोग करण्यात अपयशी ठरले. किंबहुना, धनदांडगे, दादा लोक, राजकारणी यांनी मौलवीसोबत हातमिळवणी करून ही मालमत्ता काबीज केली, हडप केली. तौफिक अशाच एका दर्गा ट्रस्टचे सदस्य होते. त्यांच्या लक्षात हा गैरव्यवहार आल्यावर त्यांनी त्याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. परंतु त्याला लाच देऊन, धमकावून, दुर्लक्ष करून वाटेला लावण्याचे प्रयत्न झाले. तौफिक शेखने आपला निषेध तीव्र करत प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आणि आपला संकल्प अमलात आणला. आता मुस्लिम कार्यकर्ते आणि काही संघटना वक़्फ़चा मुद्दा लावून धरत आहेत आणि जनजागृती करत आहेत. लेखिका तौफिकच्या जाण्याने व्यथित होऊन प्रश्न विचारतात की आत्मदहन करून तौफिक ने योग्य केले नाही. आपला परिवार तर या तरुणाने उघड्यावर टाकलाच पण प्रश्न लावून धरून, एकजुटीवर विश्वास ठेवून संवैधानिक पद्धतीने सोडवता येऊ शकणाऱ्या प्रश्नासाठी नाहक स्वत:ची आहुती दिली. पण इथे हे लक्षात घेतले पाहिजे की एखादा कार्यकर्ता जेव्हा इतक्या टोकाचे पाऊल उचलतो तेव्हा नक्कीच त्याने शर्थीचे प्रयत्न केले असणार आणि निराशा, वैफल्य पदरी आल्यावर ही कृती केली असणार. या घटनेतून समाज, चळवळी, प्रशासन सर्वांचेच अपयश अधोरेखित होते.

सदरातील काही लेखांमध्ये इतिहासातील आणि वर्तमानातील मुस्लीम स्त्रियांनी आणि तरुण मुलींनी कशा प्रकारे नव्या वाटा चोखाळल्या, याचे वर्णन आहे. कोल्हापूरच्या मिनाज लाटकर या तरुण लेखिकेने ‘मोकळा श्वास’ या लेखात कशा प्रकारे मुली बंधनं झुगारत आहेत, एकत्र येत आहेत, सजग होत आहेत हे लिहिले आहे. तिच्या मते, धर्माची स्थापना एका विशिष्ट काळात, काही गरजे पोटी झाली. पैगंबरांनी स्त्रियांना हक्क दिले, मान दिला. पण आजही २१ व्या शतकात स्त्रियांना शिक्षण मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे, जुबानी तलाक विरुद्ध कोर्टात जावे लागत आहे. तरीही आज कितीतरी महिला शिक्षणात, खेळात, राजकारण, समाजकारणात, साहित्य निर्मितीत, सिनेमात, पत्रकारितेत पुढे येत आहेत. मिनाज स्त्रियांच्या प्रगतीबद्दल अतिशय आशावादी आहे आणि समाजाने मुस्लीम स्त्रियांना पाठींबा द्यावा हे आवाहन या लेखातून करते आहे. नागपूरच्या रुबिना पटेल यांनी आपल्या ‘पतंग की तरह उडती जाऊं’ या लेखात आपल्या संस्थेच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींसाठी पतंगबाजी आणि सायकल रॅलीचे आयोजन केले, त्याचे वर्णन केले आहे. मुलींना खेळायला उद्युक्त केलं की त्या मोकळ्या होतात, बोलत्या होतात यावर रुबिनाचा विश्वास आहे. पतंग आणि सायकल यासारखे मुलांचे मानले जाणारे खेळ आणि त्यासोबत येणारी मजा, मस्ती यांचा अनुभव मुस्लीम समाजात मुलींना कमीच मिळतो. त्यांच्या रुबी सोशल वेलफेयर सोसायटी चा मुस्लीम महिला आमचं आहे आणि त्यांचे काम मुस्लीम मोहल्यामधून चालते. शिक्षण, व्यावसायिक कौशल्ये यांचे प्रशिक्षण, समुपदेशन जागृती अशी अनेक पातळींवरील कामे ही संस्था करते. पतंग फेस्टिवल केला त्या दिवशी ५० एक मुली जमल्या हेच खूप विशेष. खूप पतंग उडवले, नारेबाजी केली. जोश, उत्साह तर आवारात नव्हता. अनेक आयांनी सुरुवातीला या उपक्रमाला विरोध केला, पण आपल्या मुलीना नाचताना, खेळताना पाहून खूप आनंदित झाल्या. सायकल फेरीबद्दल पण हेच. लाज, भीती बाजूला ठेवून रस्त्यावर सायकल चालवताना मुलींनी अनेक घोषणांचे फलक बरोबर घेतले होते. हिंसेचा निषेध, भेदभावाचा विरोध करत आत्मविश्वासाने मुलींनी ही फेरी काढली. या उपक्रमात मुलांनीही मदत केली. या दोन्ही उपक्रमांमधून मुलींनी नवी स्वप्न मिळवली असे सांगून रुबिना म्हणते की बेखौफ जगण्याची आस एकदा निर्माण झाली की पतंगाप्रमाणे उंच आकाशात उडण्यापासून तुम्हाला कोण थांबवू शकेल?

रजिया सुलताना यांनी सत्यशोधक मेहरुन्निसा दलवाई यांच्यावर ‘जन्नत की हकदार’ हा लेख लिहून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. त्या जरी समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी होत्या तरी त्या तेवढेच नव्हत्या. त्यांचे कर्तुत्व खूप मोठे होते आणि त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये पायाभूत काम केले. त्या धर्म-चिकित्सक होत्या. पतीच्या हयातीत आणि नंतरही त्यांच्या कामामुळे त्यांना समाज स्वीकार करत नव्हता. तेव्हा अतिशय खंबीरपणे त्यांनी सर्व त्रासाला तोंड दिले. त्यांचे विचार स्पष्ट, निर्भीड आणि समाजहिताचे होते. सरकारी नोकरी करत त्यांनी पतीच्या पूर्ण वेळ सामाजिक कामाला पूर्ण पाठींबा दिला. इतक्या भक्तिभावाने लेखिकेने मेहरुन्निसा दलवाई यांच्या नास्तिक व धर्मनिरपेक्ष विचारांबद्दल लिहिले आहे आणि तरी पुन्हा पुन्हा त्या रमजान च्या महिन्यात गेल्या, त्या दिवशी वटपोर्णिमा पण होती, त्या खऱ्या अर्थाने जन्नत च्या हकदार झाल्या, या लेखिकेच्या वाक्यांचा अर्थ लागत नाही. असाच एक लेख तमन्ना इनामदार यांनी ‘आपले डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा लिहिला आहे. मुस्लिमांसह देशातील सर्व स्त्रियांना राज्यघटनेत विविध हक्क देणाऱ्या बाबासाहेबांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून तमन्ना यांनी सविस्तर बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. स्त्रीला समाजाने, धर्माने कायम मागे ढकलले असताना समाजाविषयी तळमळ, दूरदृष्टी आणि निपक्षपाती धोरण ठेवून बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्रीला समान हक्क दिले. तमन्नादिदींच्या मते, हिंदू कोड बिलाला विरोध करणारे आणि एकतर्फी तलाक विधेयकाला विरोध करणारे घटक समान आहेत. हिंदुंप्रमाणेच भारतातील मुसलमान पण पुराणमतवादीच राहिले ही खंत बाबासाहेब व्यक्त करतात. त्यांनी मुस्लिमांमधील विषमतेचा सखोल अभ्यास केला. मुसलमान समाजामधील अनेक अनिष्ट रूढी, विषमता दूर करण्याचा त्यांचा मार्ग होता – राज्यघटना.

अब्दुल कादर मुकादम हे इस्लामचे अभ्यासक असून त्यांनी मुस्लीम मनाचा कानोसा या सदरातील ‘इस्लाम- सामाजिक न्याय आणि विकास’ या आपल्या लेखात न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी हजरत पैगंबरांनी काय काम केलं याचा वेध घेतला आहे. तसेच नंतर समाजाची जी अधोगती झाली त्याचाही उहापोह केला आहे. पैगंबरांनी सामाजिक समतेबरोबरच आर्थिक न्यायालाही महत्व दिले होते. त्यांच्या क्रांतीचे स्वरूप त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि अध्यात्मिक असे तिहेरी होते. धर्माच्या नावाने जेव्हा दुर्बल घटकांवर कायम अत्याचार होत आले आहेत, अशा वेळी काही धर्म मात्र समाज परिवर्तनाचे साधन बनतात. इस्लाम अशा धर्मांपैकी एक आहे, असे लेखक मानतात. इतिहासात डोकावून ते मांडतात की इस्लामने रेटलेल्या क्रांतीमुळे, जी समता, न्याय आणि बंधुत्व या मूल्यावर बेतलेली होती, अरबस्तान आणि त्याबाहेरच्या अनेक प्रदेशांतील परंपरांवर मोठा परिणाम झाला. इस्लामपूर्व काळात जेव्हा कोणतेही कायदेकानू किंवा आचारसंहिता नवत्या, तेव्हा पैगंबरांनी शरियत (जलस्त्रोताकडे जाणारा मार्ग) ची रचना केली. मात्र नंतर जी प्रतीक्रांतीची लाट आली त्यात इस्लामचे पुरोगामित्व कुंठीत झाले. अर्थाचे अनर्थ करून शरियत मधील कायद्यांचे सोयीप्रमाणे अर्थ बदलून स्त्रियांवर दुय्यमत्व लादले. मुस्लिम धर्माचा उगम आणि पैगंबरांची शिकवण याचा इतिहास तपासून इस्लाम संबंधी अनेक गैरसमज दूर करणे आज गरजेचे आहे. त्यासाठी हा लेख नक्कीच आपली मदत करतो.

अशा प्रकारे मुस्लीम मनाचा कानोसा या सदरातून मिळून साऱ्याजणी या मासिकाने मुस्लीम समाजातील, विशेषत: स्त्रियांच्या जीवनासंबंधी अनेकानेक पैलूंना स्पर्श केला आहे. या सदराचे आजच्या काळातील महत्व अधोरेखित करतानाच एक निरीक्षण मांडावेसे वाटते. लेखकांपैकी कुणीही धर्मचिकित्सा करत नाहीत, उलट कुठेतरी सगळेच इस्लाम पैगंबरांच्या काळात किती उन्नत होता, पण नंतर त्याची अधोगती झाली असेच मांडताना दिसतात. यावर अजून लेखन आणि विचार झाला पाहिजे.

वंदना पलसाने
vpalsane@gmail.com