पुरुष उवाच विरुद्ध मिळून साऱ्याजणी: युरोपियन इतिहासातील एक लढाई
.png)
एकोणिसाव्या शतकातील एक ख्यातनाम ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा खंदा समर्थक जॉन स्टुअर्ट मिल यानं त्याच्या ‘द सब्जेक्शन ऑफ वुमन’ या स्त्रीवादी दीर्घ निबंधामध्ये लिहिलं आहे - ‘स्त्री’ ‘खरोखर’ काय आहे हे सहजपणे कळणं शक्य नाही, कारण ज्या समाजात स्त्रियांवर पुरुष वर्चस्वाचा प्रभाव नव्हता असा समाज आजपर्यंत कधीच अस्तित्वात नव्हता. अर्थात या मानवरचित समाजरचनेत स्त्रीचं खरं रूप ज्याप्रमाणे मोडलं, बदललं त्याचप्रमाणे पुरुषाचं रुपही शाबूत राहिलं नाही. त्याच्यावरही या समाज रचनेचा परिणाम होऊन त्याच्या मूळ रूपात विकृती निर्माण झाली. अशा समाजातील मर्यादांमुळे येथली स्त्री ही एखाद्या विशिष्ट आकारात व विशिष्ट पद्धतीने वाढण्यासाठी बनवलेल्या हरितगृहातील वनस्पतीसारखी झाली. (या ग्रीन हाऊसने पुरुषांनाही विकृत केलं.)
पण येथील स्त्रीला व त्या अनुषंगाने स्वतःलाही विकृत करण्याचं काम आपणच केलं आहे हेच ओळखण्यात कित्येक वर्षे पुरुष असमर्थ ठरला आणि वर्षानुवर्षे पुरुष सत्तांधतेच्या अंमलाखाली राहिलेल्या समाजाला ‘जे चाललं आहे तेच योग्य आहे’ असा विश्वास ठेवणं (सोयीचं असल्याने सुद्धा) सोपं झालं. मानवी संस्कृतीचा इतिहास ही मानव या प्राण्याच्या अनेक चढउतारांनी आणि खाचखळग्यांनी भरलेल्या वाटचालीची कहाणी आहे. या वाटचालीत जसे मानवतेला भूषणावह ठरतील असे गौरवशाली कालखंड आहेत तसेच मानवतेला काळिमा फासणारे विसरण्यायोग्य कालखंड देखील आहेत.
इतिहासातील वाईट कालखंडात माणूस माणसाशी माणसासारखा वागला नाही हे उघडच होते पण कित्येक वेळा इतिहासातील गौरवशाली कालखंडात देखील माणूस माणूसपणाच्या कसोटीत शंभर टक्के खरा उतरला नाही हेही सत्य आहे. विशेषत: स्त्रीच्या बाबतीत तो सर्वच काळात अन्यायाने वागला; तिला समान वागणूक देण्यात उणा पडला हे दुर्दैवी वास्तव आहे.
जॉन स्टुअर्ट मिल म्हणतो त्याप्रमाणे अगदी दोन हजार वर्षांपूर्वीच्या पहिल्या प्रगल्भ आणि प्रगत मानवी संस्कृतीच्या काळापासून स्त्रीच्या वाट्याला जीवनाचा मुख्य प्रवाह न येता या प्रवाहापासून फुटलेले छोटे ओहोळच आले. उदाहरणार्थ, पंधराव्या शतकाच्या जवळपास सुरू झालेला- ज्याला नवजागरणाचा काळ म्हटलं गेलं-तो सामाजिक समता, स्वातंत्र्याच्या नवनवीन कल्पना मांडणारा युरोपातील प्रबोधन काळ, स्त्री-स्वातंत्र्य आणि समतेविषयी मात्र बऱ्या च अंशी उदासीन होता. हा काळ व त्याच्या प्रभावामुळे तेव्हा व त्यानंतर उदयास आलेले विचारवंत आणि तत्त्वज्ञ प्रखर मानवतावादी विचार मांडत असताना त्यातून स्त्रीला वगळतात तेव्हा मोठ्या माणसांचे पाय सुद्धा कित्येकदा मातीचे असतात ही सुपरिचित अनुभूती येते.

आज तर कधी नव्हता इतका धोका मानवाच्या अस्तित्वाला निर्माण झाला आहे. या धोक्यावर मात करून मानवाच्या कल्याणाची वाट पुन्हा मोकळी कशी होईल या प्रश्नाचं उत्तर इतिहासाच्या अशा पानांमध्ये सापडू शकेल. अर्थात इतिहासाकडं फक्त आंधळ्या भक्तिभावाने न पाहता त्याचा डोळसपणे अभ्यास करणं हे महत्त्वाचं पथ्य पाळलं तरच यातून पूर्वीच्या चुकांची पुनरावृत्ती टाळता येईल. प्रबोधन काळातील जवळजवळ सर्व मानवतावाद्यांना एक मर्यादा होती. मानवाचं हित आणि कल्याण साधण्यासाठी क्रांतिकारक पावलं उचलणाऱ्या युरोपातील या मंडळींनी स्त्रीच्या बाबतीत मात्र बऱ्या च अंशी पंक्तिप्रपंच करण्याची लबाडीच केली. त्यांनी त्यांच्या ‘आदर्श मानवा’बद्दलच्या कल्पना मांडल्या त्या एक गोरा, सक्षम पुरुष डोळ्यासमोर ठेवून. म्हणजे, त्यांच्या म्हणण्यानुसार जे लोक कमी-अधिक प्रमाणात लिओनार्दो द विंचीच्या परिपूर्ण अशा ‘विट्रुवियन पुरुषा’च्या व्याख्येत बसणारे होते केवळ त्यांचाच समूह ‘आदर्श मानव’ होण्याची आकांक्षा बाळगू शकत होता. इतर सर्व, अर्थात त्यात स्त्रीही आली; ‘आदर्श मानव’ होण्यास पात्र नव्हते. प्रबोधन काळाचे शिल्पकार असलेल्या या शहाण्या आणि विचारवंत माणसांचा दृष्टिकोन स्त्रीविषयी असा उणा आणि कोता असावा ही एक उपरोधाने भरलेली वस्तुस्थिती आहे.
जीन जॅकसब रूसो या फ्रेंच विचारवंताने त्याच्या ‘एमिल’या अभ्यासपूर्ण ग्रंथात लिहिलं आहे की मुलींना तत्त्वज्ञान किंवा विज्ञान शिकण्याची गरज नाही कारण त्यांना फक्त पतीला कसं संतुष्ट करावं हे माहीत असणं आवश्यक आहे! आणखी एक ख्यातनाम फ्रेंच विचारवंत व्होल्टेअर हा एकीकडं स्त्रियांमध्ये चांगले शास्त्रज्ञ होण्याची योग्यता आहे असा विश्वास व्यक्त करत असे. पण न्यूटोनियन भौतिकशास्त्र आणि इतर विषयांचा त्याच्या सोबतीने अभ्यास करणारी त्याची मैत्रीण आणि प्रेयसी, गणितज्ज्ञ आणि भाषांतरकार एमिली द शातले जेंव्हा मरण पावली, तेेव्हा त्याने लिहिले, ‘आज मी पंचवीस वर्षांची घट्ट मैत्री असणारी व्यक्ती गमावली. सर्वच सद्गुणांनी युक्त असलेली व्यक्ती जिचा एकमेव दोष ती स्त्री होती एवढाच होता!’ गंमत म्हणजे इतर बाबतीत अभिनव आणि पुरोगामी विचार करणारे प्रबोधन काळातील युरोपातील हे विचारवंत आणि तत्वज्ञ स्त्रियांच्या बाबतीत मात्र पुरातन ग्रीक तत्वज्ञ आणि विचारवंतांपासून सुरू झालेल्या परंपरेसच पुढं नेताना दिसतात.
उदाहरणार्थ, प्राचीन ग्रीसमध्ये, प्लेटोने स्त्री शिक्षणाला मान्यता दिली, तरी असंही मानलं की गतजन्मीच्या भ्याड किंवा अनैतिक पुरुषांना स्त्री म्हणून पुनर्जन्म प्राप्त होतो! ॲरिस्टॉटलने नैतिकता आणि राजकारण यात व्यापक आणि मूलभूत लेखन केलं. पण ‘मुक्त ग्रीक पुरुष’ हाच या सर्व लेखनाच्या केंद्रस्थानी होता. इतर सर्व न्यून; कनिष्ठ. ज्यांच्यासाठी गुलामगिरी न्याय्य आणि फायदेशीर आहे अशांच्या वर्गात त्यानं स्त्रीचाही समावेश केला होता! पेरिकल्स हा इ. स. पू. 430 मधील ग्रीक संस्कृतीच्या वैभव काळातील एक प्रमुख राजकारणी. आपल्या भाषणात लोकांचं कौतुक करत तो अथेन्समधील जनतेला उद्देशून म्हणतो की राज्याच्या प्रगती आणि भरभराटीमागे नागरिक म्हणून तुमचा सुसंस्कृतपणा, सामाजिक जबाबदारीची तुमची जागृत जाणीव आणि तुमची राजकीय प्रगल्भता ही प्रमुख कारणं आहेत. पण हे कौतुक केवळ अथेनियन पुरुषांसाठी आहे स्त्रियांसाठी हे लागू नाही - अशी पुस्ती जोडून!
जेव्हा जेव्हा स्त्रीच्या समता आणि स्वातंत्र्याच्या दाव्यांचा मुद्दा ख्रिश्चन धर्माच्या ऐरणीवर आला तेव्हा तेव्हा ‘जे काही आहे, ते योग्य आहे’ असा निर्णयच धर्म मार्तंडानी (ज्यावर अर्थातच पुरुषांचं संपूर्ण नियंत्रण होतं) दिला. याचा अर्थ पूर्वीपासून समाजानं स्त्रीला जे काही स्थान दिलं आहे ते तिच्यासाठी ‘फायदेशीर आणि न्याय्य’ आहे असा निर्णय. धर्मसंस्थेनं व समाजानं (म्हणजे पुरुषानं!) स्त्रीस इष्ट ठरवलेल्या सद्गुणांनी स्त्री युक्त असली की झालं. मग अशा स्त्रीस उच्च शैक्षणिक किंवा सांस्कृतिक ‘पढाई’ची कोणतीही आवश्यकता नाही असंही ख्रिश्चन धर्मानं ठरवलं. हे इष्ट सद्गुण कोणते? तर ते होते - विनम्रता, मीतभाष्य, मृदुता, निरागसता आणि पावित्र्य. हे गुण स्त्रीस भूषणावह आहेत असं ठरवून ते तिच्यावर लादले गेले. या तथाकथित सद्गुणांतील प्रत्येक गुणाचं वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येकात असलेला कुठल्यातरी सकारात्मक गुणाचा अभाव - विनम्रतेत आत्मविश्वासाचा, मीतभाषीपणात स्पष्ट आणि मोकळ्या वक्तृत्वाचा, मृदुतेत खंबीरपणाचा, निरागसतेत चतुराईचा आणि पावित्र्यात जीवनाकडं रसिकतेनं पाहण्याचा!
चहूबाजूनं या अरेरावी युक्त ‘पुरुष उवाच‘ने घेरलेली स्त्री या पुरुषी दमदाटीला घाबरून गप्प मात्र बसली नाही. ती लढत राहिली. मानवी संस्कृतीच्या इतिहासात स्त्रीस समानता मिळावी, स्वातंत्र्य मिळावं म्हणून अवहेलना, हेटाळणी अगदी मृत्यूदंडाचीही पर्वा न करता लढणाऱ्या तेजस्वी वीरांगना प्रत्येक काळात दिसतात. क्रिस्टीन द पिझां ही पंधराव्या शतकातील इटालियन-फ्रेंच लेखिका आणि राजदरबारची कवयित्री. तिच्या ‘बुक ऑफ द सिटी ऑफ लेडीज’ मधलं ‘तारतम्य’ या गुणाचं प्रतिनिधित्व करणारं स्त्री पात्र विचारतं, ‘पुरुषांपेक्षा महिलांना कमी ज्ञान का आहे हे तुम्हाला माहीत आहे का?’ आणि स्वतःच उत्तरही देतं, ‘कारण त्यांना विविध प्रकारच्या अनुभवांचा सामना करण्याची संधीच मिळत नाही; कारण त्यांना घराची काळजी घेण्यासाठी दिवसभर घरी राहावं लागतं.’ ओलाम्प् द गूज ही फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातील नाटककार आणि राजकीय कार्यकर्ती होती. ‘महिला हक्क आणि महिला नागरिकत्वाचा पुरस्कार’ या विषयावरील लेखनासाठी ती प्रसिद्ध आहे. तिची नाट्यसंपदा विपुल आहेच पण गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या आद्य फ्रेंच कार्यकर्त्यांपैकी एक धडाडीची स्त्री म्हणूनही ती तितकीच प्रसिद्ध होती.

तिच्या नाटकांमध्ये आणि पत्रकांमध्ये घटस्फोट आणि पुनर्विवाह, मुलांचे हक्क, बेरोजगारी आणि सामाजिक सुरक्षा यासह विविध विषयांचा समावेश होता. द गूजने फ्रेंच क्रांतीचे स्वागत केले, परंतु क्रांतिकारकांकडूनही महिलांना समान अधिकार न मिळाल्याने तिचा क्रांतीविषयी भ्रमनिरास झाला. यानंतर तिने ‘पुरुष हक्क व पुरुष नागरिकत्वाच्या जाहीरनाम्या’ला प्रतिसाद म्हणून, ‘महिला हक्क आणि महिला नागरिकत्वाचे घोषणापत्र’ प्रकाशित केले, ज्यामध्ये तिनं पारंपरिक पुरुषप्रधान व्यवस्थेस आव्हान दिलं आणि महिलांच्या समान हक्कांचा पुरस्कार केला. क्रांतिकारी सरकारच्या दहशतवादी आणि हिंसक कारवायांवर हल्ला करणाऱ्या तिच्या निर्भिड लेखनामुळे तिला 1793 मध्ये अखेर अटक करण्यात आली आणि गिलोटिनद्वारे मृत्यूदंड देण्यात आला.
ओलाम्प् द गूज स्त्री हक्कांसाठी फ्रान्समध्ये लढत असताना तशीच लढाई त्याच काळात इंग्लंडमध्ये क्रांतिकारी स्त्रीवादी विचारवंत लेखिका मेरी वॉलस्टनक्राफ्ट लढत होती. 1792 साली लिहिलेल्या ‘व्हिंडिकेशन ऑफ द राईटस् ऑफ वुमन’ या पुस्तकाची सुरुवात करताना ती लिहिते; ‘स्त्रियांचा विचार प्रथम मानवजातीतील समान गटांतील एक गट म्हणून मी करेन. या पृथ्वीवर त्यांना पुरुषांप्रमाणेच स्वतःच्या सर्व क्षमतांचा कस जोखण्याचा नैसर्गिक हक्क आहे.’ ती पुढे म्हणते, ‘स्त्रीमध्ये पुरुषाप्रमाणेच मानवी गुणांचा संपूर्ण संच निसर्गतः आहे या सत्याचा प्रथम स्त्रीने स्वीकार केला तरच ती आपल्या सर्व क्षमता जोखू शकते. हे खरं आहे की, कधीकधी स्त्रियांवर मातृत्वासारख्या स्त्री-विशिष्ट जबाबदाऱ्या पडतात. पण या जबाबदाऱ्या कितीही वेगळ्या असल्या तरी त्या देखील एकूण ‘मानवी कर्तव्यांचा’च भाग आहेत. चूल, मूल सांभाळणे आणि पतीला आकर्षित करणे एवढंच शिकवलं गेल्यामुळे स्त्रीच्या प्रगतीला कायमच मर्यादा पडली. मग पिंजऱ्या त कैद होऊन राहिलेल्या, आपले छोटे पिसारे स्वच्छ करत आणि फुलवत बसलेल्या नटव्या पक्ष्यांसारखं आयुष्य जगण्यावाचून तिच्याकडे काहीही राहिलं नाही. त्याऐवजी तिला पुरुषाप्रमाणे शिक्षण व इतर जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली असती तर एव्हाना ती देखील नक्कीच सक्षम आणि सबल झाली असती.’
नंतरच्या काळातील स्त्रीवादी लेखिकांनीही स्त्रीला न मिळालेल्या संधींचा उल्लेख करून त्यामुळे तिनं काय गमावलं यावर सतत लिहिलं आहे. व्हर्जिनिया वूल्फने एक कल्पित कथा रचून त्यात विल्यम शेक्सपिअरच्या त्याच्या इतकीच प्रतिभा घेऊन जन्माला आलेल्या बहिणीची व्यथा मांडली. केवळ स्त्री असल्यानं समाजात तिला तिच्या क्षमतेचं सोनं करण्याची संधी मिळालीच नसती आणि फक्त निराशाच वाट्याला आली असती अशी कल्पना वूल्फ या विचार प्रयोगासारख्या कथेत मांडते. ‘द सेकंड सेक्स’ या तिच्या पुस्तकात, सिमन द बोव्हॉने, स्त्रीवर सामाजिक अपेक्षा आणि दबावांमुळे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कसा परिणाम होतो हे दर्शवत, बालवयापासून ते पौगंडावस्था आणि पुढे म्हातारपणापर्यंतच्या तिच्या जीवनाचा मागोवा घेतला. ती म्हणते, ‘एखादी व्यक्ती जन्माला ‘स्त्री’ म्हणून येत नाही, तर समाज तिला‘स्त्री’ बनवून टाकतो.’
सन 1900 मध्ये, ब्रिटिश विदुषी जेन हॅरिसन हिने ‘होमो सम’ या शीर्षकाखाली एक निबंध लिहिला. ते शीर्षकच तत्कालीन पुरुषप्रधान समाजातील विद्वानांना चिथावणी देणारे होते, कारण ‘होमो’चं भाषांतर नेहमीच ‘पुरुष’ असं केलं जात असे. आणि जेन ते स्त्रीसकट सर्वांसाठी वापरत होती! (खरं तर ‘होमो’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘मानव’ असाच आहे.) स्त्रीला तिच्या आयुष्यात पुरुषाइतक्याच संधी मिळाल्या पाहिजेत; आणि तसं झालं तरच तिला तिच्या संपूर्ण क्षमतेला न्याय देता येईल असा जेन हॅरिसनचा ‘होमो सम’ लिहिण्यामागचा हेतू होता. ब्रिटिश कादंबरीकार डोरोथी सेयर्स हिने तिच्या लक्षवेधी शीर्षक असलेल्या 1938 च्या ‘आर वुमन ह्यूमन?’(‘स्त्रियांना माणूस म्हणावं का?’) या भाषणात (नंतर पुस्तक रुपात) हा युक्तिवाद पुन्हा मांडला.
तिनं तिचा हा युक्तिवाद उदाहरणं देऊन स्पष्ट केला - ‘लोक विचारतात... महिलांनी फुलपँट घालावी का? लोक म्हणतात... फुलपँट पुरुषांना शोभून दिसते तशी महिलांना शोभत नाही. महिलांनी महिलांसाठीचे पारंपरिक कपडे घालणंच योग्य. पण लोकांना काही का वाटेना; मला, डोरोथी सेयर्सला, फुलपँट अधिक आरामदायक वाटते; तर ती मी घालणार. एक माणूस म्हणून मला आवडणाऱ्या कपड्यांच्या आनंद घ्यायचा हक्क मला आहे की नाही?’
खरं तर लोकांच्या थट्टेला भीक न घालता अमेलिया ब्लूमर या बेडर महिलेनं या आधीच म्हणजे अठराव्या शतकात एक प्रकारची फुलपँट (जिला तिच्या नावावरून ‘ब्लूमर’ असं नाव पडलं!) घालण्याची ‘आगळीक’ करून दाखवली होती. त्या काळात स्त्रियांना घालावे लागणारे कपडे इतके गैरसोयीचे असत की ते घालून अगदी उठण्या-बसण्यापासून कुठलीही हालचाल मोकळेपणाने करणं अवघड होत असे. अमेलियाने लोकापवादाला न जुमानता सोयीस्कर पँट घालायला सुरुवात केली. सेयर्सनं तिच्या भाषणात आणखी एक प्रश्न उपस्थित केला... ‘महिलांनी विद्यापीठात जावे का?’ ती म्हणते, ‘याला बऱ्या च जणांचं उत्तर नाही असं असतं. कारण सर्वसाधारणपणे स्त्रियांना अभ्यास करायची गरजच नसते असा युक्तिवाद ही मंडळी पुढे करतात. पण मुद्दा असा आहे की सेयर्सला ॲरिस्टॉटलचा अभ्यास करायचा आहे. तशी तिची इच्छा आहे. आणि अशी इच्छा इतर अनेक स्त्रियांची असेल तर शिकण्याचा त्यांना हक्क मिळाला पाहिजे.’
सेयर्सनं हे तिच्या भाषणात मांडलं खरं पण स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी त्यानंतरही भरपूर आणि बराच काळ संघर्ष करावा लागला. विद्यापीठांनी महिला विद्यार्थ्यांना स्वीकारण्याची सुरुवात 1868 मध्ये लंडन विद्यापीठात नऊ विद्यार्थिनींना प्रवेश मिळून झाली. नंतर इतर विद्यापीठांनी याचं अनुसरण केलं, परंतु विद्यार्थिनींना त्यांच्या अभ्यासासाठी पदवी मिळायला हवी हे विद्यापीठांना पटायला स्त्रीवाद्यांना आणखी काही काळ या गोष्टीचा सक्रिय पाठपुरावा करत राहावं लागलं. सेयर्सला स्वतःला सुद्धा तिचा पदवीपूर्व अभ्यास 1915 मध्ये यशस्वीपणे पूर्ण होऊनही ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून पदवी मिळाली नाही. पदवीची तिला तब्बल पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागली. 1920 मध्ये ऑक्सफर्ड बधलं आणि सेयर्सला तिची पदवी तिच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पदवी बरोबरच मिळाली.
केंब्रिज विद्यापीठ तर महिलांना पदवी न देण्याविषयी त्याहीनंतर अनेक वर्षे ठाम होतं. 1938 मधे सेयर्सने केलेल्या प्रसिद्ध भाषणानंतर दहा वर्षांनी केंब्रिजनं महिलांना पदवी देण्यास सुरुवात केली.
सेयर्सचं म्हणणं स्त्रियांनी एखाद्या कारणासाठी एकत्र लढावं असं नव्हतं. तिचं म्हणणं होतं की प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात तिच्या वैयक्तिक आनंदासाठी पुरुषाइतक्याच संधी आणि मार्ग उपलब्ध असले पाहिजेत. पुरुष विचारत राहतात, ‘स्त्रियांना नक्की काय हवं आहे?’ सेयर्स म्हणते त्याचं उत्तर असं आहे... ‘माझ्या पुरुष मित्रांनो, माणूस म्हणून तुम्हाला स्वतःला जे हवं आहे; म्हणजे चांगलं काम करण्याची पुरेशी संधी, पुरेसं स्वातंत्र्य आणि पुरेशी भावनिक मोकळीक - तेच स्त्रीला हवं आहे. स्त्रीला सुद्धा तिच्या डोक्यावर पुरुषांसारखंच शक्यतांचं विशाल खुलं आकाश हवं आहे. छोट्या मर्यादित घुमटाखालचं बंदिस्त आयुष्य तिला नको आहे.’ स्त्रीवादी लेखिका हॅरिएट टेलरने 1851 मध्ये लिहिलेल्या लेखात हाच विचार मांडला होता. ती लिहिते की, ‘लोक लक्ष्मणरेषा आखून स्त्रियांसाठी एक क्षेत्र तयार करतात आणि त्या क्षेत्रात स्त्रियांनी राहणं ‘योग्य’ असल्याचं बोलत राहतात. पण मानवजातीच्या कुठल्याही एका गटाला दुसऱ्या गटाचं ‘योग्य क्षेत्र’ आखण्याचा किंवा ठरवण्याचा अधिकार नाही.
जर ‘योग्य क्षेत्र’ असेल तर ते सर्व मानवांसाठी एकच आहे. ते विशाल आहे. आणि त्यातून हवं ते निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.’ या छोट्या लेखाचा शेवट मात्र एका पुरुषानं लिहिलेल्या पुस्तकातील उतारा आहे. याचं कारण इतकंच की असेही काही पुरुष प्रत्येक काळात होते ज्यांनी समतेचा आणि स्वातंत्र्याचा विचार पुरुषांपुरता मर्यादित न ठेवता अधिक व्यापक करून त्यात संपूर्ण मानवजातीला आणलं. ई एम् फोर्स्टर या प्रसिद्ध इंग्लिश मानवतावादी कादंबरीकाराच्या 1908 मधील ‘अ रूम विथ अ व्ह्यू’ या कादंबरीची नायिका लुसी हनीचर्च मध्ययुगीन प्रणयकथेतील घोड्यावर स्वार असलेल्या शूर प्रियकराची वाट पाहणारी निर्बुद्ध प्रेयसी न होता हॅरियट टेलरला अभिप्रेत असणाऱ्या सर्व मानवजातीला स्वातंत्र्य आणि समता दान करणाऱ्या ‘योग्य अवकाशा’तील जीवन जगण्याची उत्कट इच्छा जपणारी आधुनिक स्त्री होते.
तिच्या या उत्कट भावनेविषयी लिहिताना फोर्स्टर ‘मिळून साऱ्या जणींचं’च मन उघडं करून दाखवतो - तिचं देखील वादळ वारं, विशाल विहंगम दृश्य आणि समुद्राच्या विस्तीर्ण वैभवावर प्रेम आहे;
तिनं देखील तिच्यापासून दडवल्या गेलेल्या या जगाचं विलक्षण सौंदर्य ताडलं आहे; संपत्ती, सुख आणि युद्धांच्या आवरणात झाकलेलं मानवी आयुष्याचं तेजस्वी वर्म तिलाही खुणावत आहे;
तिला बंदिस्त करून, या सगळ्याचा भोग घेणाऱ्या पुरुषाने ‘चिरंतन प्रेरणादायिनी’ अशा उपपदाचं तिला दिलेलं गाजर अव्हेरून, या जीवनाला अल्पजीवी पुरुषाइतकीच उत्कटपणे भिडणारी अल्पजीवी स्त्री म्हणूनच कुठल्याही खोट्या उपपदांशिवाय केवळ जगायला तिला आवडेल... नव्हे तशी तिची एकमेव इच्छा आहे!