सांस्कृतिक राजकारणाची पायाभरणी करणाऱ्या अण्णाभाऊ साठेंवरील माहितीपट: एक अनुभव

अण्णाभाऊंच्या तेजस्वी कार्यकर्तृत्वाला साऱ्याजणींचा सलाम!!

सांस्कृतिक राजकारणाची पायाभरणी करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील माहितीपट तयार करताना आलेल्या अनुभवांवर आधारित हा मिलिंद चंपानेरकर यांचा लेख आहे. अण्णाभाऊंच्या लोकनाट्य परंपरेचा मागोवा घेत जवळपास नऊ वर्षांच्या संशोधन, प्रवास आणि दस्तावेजीकरणातून त्यांनी अण्णाभाऊंच्या समृद्ध सांस्कृतिक वारशासह त्यांनी उभारलेल्या सांस्कृतिक राजकारणाची मांडणी केली आहे. माहितीपटाच्या निर्मितीमागील संघर्ष, हरवत चाललेल्या लोकस्मृतींचा शोध आणि लोककला, इतिहास व राजकारण यांच्यातील परस्परसंबंध उलगडणारा हा अनुभवलेख वाचकांना एका वेगळ्या प्रवासात घेऊन जातो.

२०१७ची गोष्ट. गाव कन्सुर, जिल्हा परभणी. सुप्रसिद्ध समाजसुधारक एकनाथ आवाड यांनी तिथे एक उपक्रम आयोजित केला होता. महार आणि मातंग या दोन समाजातील तेढ कमी करण्यासाठी ‘अण्णाभाऊ साठे विचार संमेलन’ व अन्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. वृत्तपत्रातील त्याबद्दलची छोटीशी बातमी वाचून मी माझा ‘मिनी डिव्ही’ कॅमेरा घेऊन पुण्याहून दोन-तीन लाल एस.टी. बसेसचा प्रवास करून त्या दूरस्थ गावात सकाळी पोहोचलो. कार्यक्रमाची लगबग सुरू होती. गावातल्या लोकांची त्यातील गुंतवणूक पाहून मी अनेकांच्या मुलाखती घेत दिवसभर फिरत होतो. रात्री ‘कबीर कला मंच’तर्फे अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनप्रवासावर आधारित प्रभावी पोवाड्याने सुरुवात करण्यात आली (तोवर मला या कलापथकाबाबत फारशी कल्पना नव्हती.)

लोकांचा आश्चर्यचकित करणारा प्रतिसाद: त्या कार्यक्रमाला विविध वयोगटातील लोकांनी गर्दी केली होती... मंचावर जेमतेम एक-दोन मोठे बल्ब... मंचाच्यालगतच ढोलकी, तुणतुणे आदी मोजकी वाद्यं. त्यानिशी सादर केलेल्या त्या सादरीकरणाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचं पाहून मी चकितच झालो... १९६९मध्ये शाहीर अण्णाभाऊंचं निधन झाल्यानंतर पाच दशकं उलटून गेली तरी त्यांच्या लोकनाट्याचा, गीतांचा प्रभाव त्या छोट्याशा गावात अजून कायम आहे! मी ट्रायपॉड लावला आणि चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीपर्यंत गर्दी कायम होती. त्यांच्या गाण्याचं गारुड अजून कायम आहे आणि त्यांची गाणी अजूनही लोकमानसाला भिडतात हे अनुभवून मी थक्कच झालो होतो. परतीच्या प्रवासाला निघालो आणि या विषयावर संशोधनपर माहितीपट होऊ शकतो ही कल्पना मनात फेर धरू लागली.

संशोधनाला सुरुवात: अनेक वाचनालयं, जुनी वृत्तपत्रं आणि उपलब्ध पुस्तकं धुंडाळल्यावर लक्षात आलं की, अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, लघुकथा आणि इतर साहित्याबद्दल बरंच काही उपलब्ध असलं, तरी त्यांच्या लोकनाट्याबद्दल विश्लेषणपर फारसं काहीच उपलब्ध नाही. दृक-श्राव्य दस्तऐवज तर अगदीच अभावाने–विशेषतः १९५०-६०मधील. कुठून तरी समजलं की, १९६०च्या दशकात ‘ऑल इंडिया रेडियो’वर अण्णाभाऊंच्या दोन मुलाखती प्रसृत झाल्या होत्या. परंतु, मुंबई व पुणे दोन्ही केंद्राकडे चौकशी करून त्याचा चिकाटीने पाठपुरावा केला; त्यांनीही प्रयत्न केला. परंतु, पूर्वीचा रेकॉर्ड जतन केला गेला नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे अत्यंत निराश झालो... माहितीपटाचा प्रकल्प शक्य नसल्याची जवळपास खात्रीच पटली होती.

मग एकदा काही कामाने अमरावतीला गेलो. माझा मित्र पंकज आवारे म्हणाला, ‘अरे माझी आई वेणूताई अण्णाभाऊंची गाणी गुणगुणत असते. मग, माझा छोटा ऑडिओ रेकॉर्डर घेऊन त्याच्याबरोबर अमरावतीपासून ५० कि.मी. दूर असलेल्या त्याच्या माधान गावाला गेलो. त्याच्या घरातील सोफ्यावर आम्ही दोघे बसलो होतो आणि याच विषयावर बोलत होतो. वयाची ऐंशी पार केलेल्या वेणूताई आत आल्या आणि खाली जमिनीवरच सोफ्याशी बसल्या. म्हणाल्या, “तू रेकॉर्ड करणार आहेस का? मग कर सुरू. मी अण्णाभाऊ-अमरशेख यांची काही गाणी म्हणून दाखवते.” मग एका पाठोपाठ त्यांनी गाणी म्हणून दाखवण्यास सुरुवात केली... अविरत! मी थक्कच झालो आणि प्रकल्पाबाबतचा उत्साह पुन्हा जागृत झाला.

माझ्या लक्षात आलं की, आपण गावागावात फिरलो तर आणखी बरीच माहिती मिळू शकते... बरेच जिवंत अनुभव जमा होऊ शकतील. पण विविध जिल्ह्यात फिरायचं, तिथे राहायचं तर बराच खर्च होऊ शकतो. कुठून तरी अनुदान मिळाल्याशिवाय ते शक्य नाही, असं वाटलं. अशा वेळी माझा मित्र सुनील शानबाग याने बंगलोरच्या ‘आयएफए’ (इंडिया फाउंडेशन फॉर आर्ट्स) या संस्थेला अशा प्रकल्पात रस असू शकतो असं सुचवलं. संहिता तयार झाल्याशिवाय फिल्मचा प्रोजेक्ट करणं शक्य नसल्याचं स्पष्टच होतं. म्हणून फक्त संशोधन आणि संशोधनावर आधारित संहिता तयार करण्यासाठी अनुदान मंजूर करावा असा प्रस्ताव मी ‘आयएफए’ला पाठवला. बऱ्याच महिन्यांनी म्हणजे २०१९च्या नोव्हेंबर महिन्यात प्रस्ताव मंजूर झाल्याचं समजलं. संशोधनाचा विषय होता – ‘लीगसी ऑफ अण्णाभाऊ साठेज ट्रान्सम्युटेड लोकनाट्य फॉर्म’.

मग मात्र संशोधन, वाचन या प्रक्रियेने वेग घेतला. अमरावती, बीड, परभणी, सांगली अशा अनेक जिल्ह्यातील माझ्या मित्रांशी संपर्क साधून तेथील संबंधित अनेकांच्या भेटी निश्चित केल्या. त्यांना जाऊन भेटलो. बातचीत केली. लोकांनी उत्साहाने माहिती दिली. त्यातील कुणाच्या मुलाखती चित्रित केल्यास बोलक्या ठरतील आणि विविध मुद्दे पुढे येतील त्याचा अभ्यास करून टीपणं तयार केली.

आकृतीबंध आणि राजकीय संदर्भ यांचा अभ्यास: काही झालं, तरी अण्णा भाऊ यांच्या ‘लाल बावटा कलापथका’ची स्थापना डाव्या (सीपीआय) पक्षातर्फे लोकजागृती करण्याच्या दृष्टीनेच केली गेली होती. त्यामुळे, अण्णाभाऊ साठे यांनी ‘तमाशा’ या आकृतीबंधातून प्रेरणा घेऊन, त्याचं स्वरूप बदलून, त्याला परिष्कृत करून लोकनाट्याचा नवा आकृतीबंध विकसित केला होता. आणि अर्थात राजकीय उद्देशांना अनुरूप असा राजकीय लोकनाट्याचा प्रकार प्रचलित केला होता. त्याबद्दल संशोधन आवश्यक होतंच, पण त्याचप्रमाणे त्याला असलेले त्या त्या काळातले राजकीय संदर्भ (कॉन्टेक्स्ट), तत्कालीन राजकीय सामाजिक परिस्थिती, विविध विचारप्रवाह, त्यांचे परस्पर संबंध याचा सखोल अभ्यास करणं आवश्यक होतं. आणि अर्थात, तत्कालीन कलापथकाशी पूर्वी निगडित असलेले वृद्ध कलाकार यांचा शोध घेणं, त्याचप्रमाणे आता अण्णाभाऊंच्या लोकनाट्याचा वारसा पुढे नेऊ पाहणारे आजच्या काळातील कलाकार व कलापथकं यांचाही शोध घेणं अत्यावश्यक होतं. असा बऱ्यापैकी अभ्यास झाल्यावर संहितेची प्राथमिक रूपरेखा आकार घेऊ लागली.

तोवर केलेल्या संशोधनाच्या आधारे कोणते अभ्यासक, लेखक, संशोधक, डावे राजकीय नेते, कलाकार आणि विविध ठिकाणाचे लोक ज्यांनी त्यांचे प्रयोग पूर्वी पहिलेले आहेत वा ज्यांच्यावर बराच प्रभाव अजूनही बाकी आहे अशांची एक यादी तयार केली.

त्याचप्रमाणे दृक-श्राव्य दस्तऐवज अभावानेच उपलबद्ध असल्याने अण्णाभाऊ-अमरशेख यांची काही अर्थपूर्ण आणि लोकाभिमुख मोजकी गाणी निवडून सांप्रत काळातील काही कलापथकांकडून ती बसवून घेणं आणि चित्रित करणं आवश्यक होतं. त्यांच्याशी संवाद झाल्यावर त्यांना मी स्पष्ट केलं होतं की, अण्णाभाऊंचं कलापथक १९०४०-५०च्या दशकांत ज्या मर्यादित वाद्यांनिशी लोकमानसावर गारुड साधायचे, तितक्याच वाद्यांचा वापर करणं आवश्यक राहील – आधुनिकतेचा स्पर्शही नको – कारण, प्रेक्षकांना त्याचीच तर झलक द्यायची होती! (पुढील काळात अनेक नवी वाद्ये वापरून आणि गाण्यांच्या चाली बदलून काहींनी तत्कालीन गाण्याच्या ‘सीडीज’ तयार केल्या होत्या, त्यामुळेच त्यांचा वापर मला मान्य नव्हता.) मग, कोणते शाहीर आणि कोणती कलापथकं कोणती गाणी सादर करतील त्याचीही निश्चिती करून घेतली. संहिता-लेखनाला सुरुवात आणि रचना: या सर्व प्रक्रियेतून संहिता आकार घेऊ लागली. रचनाही स्पष्ट होऊ लागली – सुरुवातीला मी २०१७मध्ये शूट केलेल्या पोवाड्याचा वापर आणि प्रस्तावना / भूमिका. पहिला भाग असेल – अण्णाभाऊ यांची पार्श्वभूमी आणि घडण दुसरा भाग असेल - ‘लाल बावटा कलापथका’ची स्थापना व वाटचाल तिसरा भाग असेल – लोकनाट्य: आकृतीबंध चौथा भाग असेल – लोकनाट्याची उतरण: त्या मागची कारणं

मूळ संहिता लिहिताना ‘अकलेची गोष्ट’ हे लोकनाट्य नव्याने मंचित करून – म्हणजे त्या काळातील मर्यादित प्रकाश आणि वाद्य यांच्या वापर करून त्याचं चित्रीकरण करावं अशी योजना होती. त्याचप्रमाणे, १९६९ मध्ये अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांचं निधन झाल्यावर पुढील काळात ‘पथनाट्य’ व इतर प्रकारांवर अण्णाभाऊ साठे प्रणीत लोकनाट्याचा परिणाम कितपत राहिला, त्याचाही वेध घेणं अभिप्रेत होतं. त्या दृष्टीने अधिक संशोधनाची गरज होती. अनपेक्षित अरिष्टं आणि प्रकल्प खंडित

ते सर्व कसं साधावं याचा विचार करत असतानाच अचानक ‘करोना’चा प्रादुर्भाव सुरू झाला. मला एक वर्षाच्या आत म्हणजे नोव्हेंबर २०२०मध्ये ‘आयएफए’ला प्रकल्प पूर्ण करून सादर करणं आवश्यक होतं. मी त्यांना खूप आर्जव केल्यावर ‘करोना’ काळातील अडचणी लक्षात घेऊन त्यांनी मला अधिक एक वर्षाचं एक्स्टेन्शन मंजूर केलं. आता भटकण्याचं काम टाळून खूप वाचन करायला संधी लाभली. माझा हा संशोधनपर-संहिता प्रकल्प पूर्ण झाला की, मला ती संस्था निर्मिती करताही अनुदान देईल अशी अपेक्षा होती. परंतु, तसे होणे नव्हते!

त्यात संहिता तयार करता करता हे कानावर आलं की, ज्यांच्या मला मुलाखती घ्यायच्या होत्या त्यातील काही वृद्ध जनांचं ‘करोना’मुळेच अचानक निधन ओढवलं. मग मात्र माझा धीर सुटू लागला.

चित्रीकरणास ‘अवेळी’ सुरुवात: अशा विपरीत गोष्टी घडल्यावर, ती संस्था निर्मितीसाठी उद्या अनुदान देईल न देईल, मी स्वखर्चाने विविध ठिकाणी जाऊन काही वृद्ध जनांच्या मुलाखतींचं चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. ती ‘करोना’ची दुसरी फेज होती. अशा वेळी युवा कॅमेरामन अमनदीप सिंग याने मोठी धीराने साथ दिली. ‘अकलेची गोष्ट’ मंचित करून चित्रीकरण करण्याची योजना बाद करावी लागली. कारण, त्यामुळे बजेट खूप वाढणार होतं आणि मी माझ्या ‘फिक्स्ड डीपॉझिट रीसिट्स’ तोडून मोठी जोखीम उचलत होतो.

बरंचसं चित्रण झाल्यावर मी त्या संस्थेला नोव्हेंबर २०२१मध्ये माहितीपटासाठीची संशोधनपर-संहिता सादर केली. तो प्रकल्प झाल्यावर संस्थेच्या पद्धतीनुसार मी ‘ऑनलाईन’ सादरीकरण केलं; माझी मुलाखत घेतली गेली. त्यामुळे सर्वत्र खूप गाजावाजा झाला आणि त्यावरील आधारित प्रस्तावित माहितीपटाबद्दल वर्षभर अनेक तज्ज्ञांचे उत्सुकतेने फोन येत राहिले; विदेशातूनही! त्यामुळे निर्मिती दर्जेदार कशी होईल, याबद्दल मनावर दबाव येत राहिला.

मुलाखतींची पद्धत: नंतर अनेक अभ्यासकांना, लेखकांना, राजकीय नेत्यांना, कलाकारांना विविध अंगाने प्रश्न सूत्रबद्ध करून प्रश्नावली पाठवणं – त्यांना तयारी करण्यासाठी किमान एक महिना देणं आणि मग पुढील महिन्यात त्यांची वेळ घेऊन मुलाखतींचं चित्रण करणं अशी पद्धत अवलंबली. त्यामुळे ‘बाईट’ नाही तर विचारपूर्वक उत्तरं संकलित झाली आणि त्यामुळे आत्मविश्वास चांगलाच वाढला.

त्याचप्रमाणे, एका पाठोपाठ विविध शाहीर, कलापथकं यांच्या गाण्यांच्या सादरीकरणाच्या चित्रीकरणाचीही प्रक्रिया सुरू केली. सांस्कृतिक राजकारणाच्या पायाभरणीचा महत्त्वपूर्ण मुद्दा: अनेक मुलाखतींमधून हे स्पष्ट होत होतं की, अण्णाभाऊ, अमर शेख, द.ना. गव्हाणकर, वामनदादा कर्डक आदींनी लोकजागृतीसाठी नुसतं नाटकं बसवणं, गाणी रचणं इतकंच नाही केलं, तर डाव्या राजकीय शक्तींसह, त्यांच्या बरोबरीने सांस्कृतिक राजकारणाची पायाभरणी केली. त्यामुळेच, त्यांच्या लोकनाट्याच्या पाउलखुणांचा मागोवा घेताना, त्यांच्या पश्चात राजकारण कसं बदललं, ‘इप्टा’ची चळवळ का थंडावली? आणीबाणीनंतर लोकनाट्याचा प्रभाव असलेला ‘पथनाट्या’चा नवा प्रकार काही काळ फोफावला, तरी तोही दोन दशकांनंतर उतरणीला का लागला.

व्यापक संदर्भ: एकंदरीतच राजकीय लोकनाट्याची चळवळ का दीर्घ काळ टिकू शकत नाही असा माझ्या संशोधनाचा विषय होताच. आपल्याकडे असं का झालं असावं? अगदी, समाजवादी परंपरेतील सेवा दलाची लोकनाट्यं (निळू फुले ते झेलम परांजपे), ‘मुलगी झाले हो’, ‘व्हय मी सावित्री’ आदी प्रयोग गाजले, त्यांना प्रतिसाद लाभला, तरी त्यातून मोठी सांस्कृतिक चळवळ उभी झाली... त्याचा वारसा पुढील पिढीने पुढे नेला... असं का होऊ शकलं नाही? असा सर्व व्यापक संदर्भ या माहितीपटाला प्रदान करणं खूप आवश्यक वाटलं.

त्यामुळेच आम्ही नंतर दिल्ली व अन्यत्र जाऊन ‘जन नाट्य मंच’चे अग्रणी, तेथील अभ्यासक, लेखक यांच्या मुलाखती घेऊन राष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांचाही वेध घेतला. २००० च्या दशकात जे निवडक नवे प्रयोग झाले, त्यांचं आणि अण्णाभाऊ प्रणीत लोकनाट्य यांचा संबंध काय आहे, तो मुद्दाही स्पष्ट करण्यावर माहितीपटात अधिक भर दिला. थोडक्यात, १९४० ते २०१० पर्यंतच्या सांस्कृतिक राजकारणाचा एक सलग पट निर्माण करून त्याच दस्तावेजीकरण व्हावं, हेच त्यामागचं उद्दिष्ट.

संकलन आणि अखेर निर्मिती साध्य: असं सर्व जमा झाल्यावर संकलनाबाबत चर्चा सुरू झाल्या. कॅमेरामन अमनदीप सिंगच त्याची नोकरी सांभाळून दर रविवारी संकलनाचे काम माझ्या घरातील स्टुडियोत करणार होता. त्याने स्वतः चित्रण केलेलं असल्याने संकलनाबाबतच्या चर्चेत त्याचाही उत्साह वाढला आणि त्या चर्चांमधून तो एक प्रकारे दिग्दर्शन-सहाय्याचीही भूमिका वठवू लागला. उपयोगी ‘वाद’ घालू लागला!

संकलन ही जरी तशी क्लिष्ट प्रक्रिया असली, तरी मोठी सर्जनशील आणि आनंददायी प्रक्रिया असते. चित्रीकरण करताना फुटेज नेमकं वाटलं, तरी संकलन करताना आणि गुंफण साधताना, खूप गोष्टींचा मोह टाळावा लागतो... फिल्म जास्तीतजास्त अर्थपूर्ण आणि प्रेक्षकांना बांधून ठेवणारी साधण्याच्या दृष्टीने. फिल्म फार तर १०० मिनिटांची व्हावी अशी अपेक्षा होती. पण ‘रफ कट’ फारच मोठा झाला होता. खूप काटछाट केली, तरी १२० मिनिटे होत होती. मुद्द्यांची ‘रिपीटेशन’ काढूनही फार कमी होणार नाही हे आम्हा दोघांनाही दिसत होतं. म्हणून आम्ही पुण्यात काही जणांसमोर ‘प्रीव्ह्यू’ आयोजित करून त्यांच्या सूचना लक्षात घेतल्या.... आणि पुन्हा संकलनाला बसलो.

नऊ वर्षांच्या परिश्रमांची निष्पत्ती: पुढे पोस्ट-प्रॉडक्शन खर्च होताच आणि माझी पुंजी संपली होती. परंतु, ‘पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)’, ‘आयटक’ या संघटनांनी या माहितीपटाचं महत्त्व जाणलं आणि पोस्ट-प्रॉडक्शनच्या खर्चासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यांचे तर आभार आहेच, पण शेकडो लोकांनी संशोधन आणि निर्मितीसाठी जे सहकार्य केलं, त्याचंही मोल मोठंच. बाकी टीमचे आभार मानणे फारच औपचारिक होईल. माझ्या अनेक मित्र-मैत्रिणींनी अनेक प्रकारे निरपेक्षपणे कमालीच साहाय्य केलं. त्याच निरपेक्षतेने माझे अमरावतीचे मित्र प्रा. नदीम खान यांनी ‘इंग्रजी सबटायटलिंग’साठी महत्त्वाचं योगदान केलं. ‘व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट्स’ विजय लेले, (इंग्रजी) अन्वय बेंद्रे (मराठी), साऊंड इंजिनीअर अविनाश ठोंबरे यांनीही सार्वजनिक हिताचा उद्देश लक्षात घेतला आणि मोठ्या मानधनाची अपेक्षा न ठेवता चोख कामगिरी केली. एकंदरीत, ९ वर्षं (२०१७-२०२६) जे परिश्रम केले त्याची निष्पत्ती हीच की, बरोबर १०० मिनिटांच्या माहितीपटाची निर्मिती सिद्ध झाली – ‘अण्णाभाऊ साठे प्रणीत लोकनाट्याच्या पाऊलखुणा’!

  • मिलिंद चंपानेरकर, पुणे मो.क्र. ९८२३२४८००३/ champanerkar.milind@gmail.com