महात्म्याची दुसरी बाजू : गांधी का मरत नाही

०७ जून २०२२

कोणत्याही व्यक्तीला कमी लेखायचं असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधकाला जास्त महत्त्व द्या. कुठल्याही व्यक्तीची प्रतिष्ठा कमी करायची असेल तर त्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करा. एखाद्या प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या माणसाच्या दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजूंचा अभ्यास केल्यावर आपण कुठल्यातरी निष्कर्षापर्यंत पोचायला हवं. विरोधकांच्या कुटिल कारस्थानांना बळी पडलेल्या एका महात्म्याची प्रतिमा आज एवढी मलीन करून टाकली आहे की त्याच्या कार्याचा आज विसर पडायला लागला आहे. गांधींना जेवढे बदनाम केलं गेलं आहे, त्यांचा जेवढा अपमान केला गेला आहे तेवढा दुसऱ्या कुठल्याही नेत्याच्या किंवा पुढाऱ्याचा झाला नसेल. गांधींच नाव घेऊन बोलणारे फक्त त्यांच्या नावाचा वापर करून स्वतःची पोळी भाजत आले आहेत, पण त्यांची बाजू समर्थपणे मांडणारी कुणीही व्यक्ती, समाज किंवा पक्ष (काही अपवाद सोडता) समोर आले नाहीत. या महात्म्याची बाजू प्रखरपणे मांडण्याचे काम लेखक चंद्रकांत वानखेडे यांनी त्यांच्या 'गांधी का मरत नाही' या पुस्तकात केलं आहे. 'गांधी का मरत नाही' हे गांधीजींचे चरित्र नाही पण महात्मा गांधींची प्रतिमा ज्या कारणामुळे मलीन केली आहे व त्यांच्यावर जे काही आरोप केले गेले आहेत त्या सर्व आरोपांना पद्धतशीरपणे उत्तर देण्याचं काम लेखकाने केलं आहे. या ग्रंथात एकूण पंधरा प्रकरणं आहेत आणि ही सर्व प्रकरणं गांधीजींची बाजू समर्थपणे मांडण्याचं काम करतात.

चंद्रकांत वानखडेंनी त्यांच्या प्रस्तावनेतच सांगितलं आहे की गांधींना मानणारा जसा एक वर्ग आहे तसाच गांधीद्वेष करणारासुद्धा एक वर्ग आहे. गांधीद्वेष करणारा वर्ग अल्प प्रमाणात असला तरीही हा वर्ग गांधींना मानणाऱ्या वर्गापेक्षा जास्त सक्रिय आणि अधिकच आक्रमक आहे. गांधीजींची टिंगलटवाळी वानखडेंनी लहानपणापासूनच अनुभवली आहे. ते जेव्हा शाळेत शिकायला होते तेव्हा तिथे गांधीजी आदर्शासारखे शिकवले गेले. लेखकांनाही गांधी आदर्शचं वाटले पण जेव्हा शाळा बदलली तेव्हा तिथे त्यांना गांधी खलनायक आहेत असं शिकवलं गेलं. ते वातावरणच तसं होतं. गांधी नेमके कसे होते हा प्रश्न होताच. आई सोडली तर मुलांवर संस्कार घडवण्याचे काम शिक्षक करतात पण शिक्षक जर गांधींना बदनाम करत असतील, त्यांची मस्करी, मानहानी करत असतील तर विद्यार्थी त्यांच्यापासून काय शिकतील? लहान वय असल्याने त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे नव्हती पण आता अभ्यासाअंती आणि संदर्भासहित त्यांनी गांधीजींच्या विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

वानखडे सांगतात की, स्वातंत्र्यलढ्यात मोहनदास करमचंद गांधी हे नाव सामील व्हायच्या आधी महाराष्ट्रात लढ्याची सूत्रे टिळकांकडे होती. ब्रिटिशांनी महाराष्ट्रातून पेशव्यांची सत्ता १८१८ मध्ये हिसकावून घेतली. इतर राज्यातील सत्ता राजपूत, जाट किंवा मुस्लिमांकडून घेतलेली होती. गांधीपूर्व राजकीय स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय? तर महाराष्ट्रातील सत्ता ही पेशव्यांच्या हातातून हिसकावली आहे. पेशवे कोण? तर पेशवे ब्राह्मण. म्हणजे सत्ता ब्राह्मणांच्या हातातून हिसकावली आहे. म्हणूनच ब्राह्मणांच्या हातातून हिसकावलेली सत्ता पुन्हा ब्राह्मणांनीच परत मिळवायची आणि राज्य करायचे. इतर सामाजिक सुधारणा करण्याचा उल्लेखही त्यांच्या मुखी नव्हता. राजकीय स्वातंत्र्याचा अर्थ एवढाच की ब्राह्मणांना सुखी करणे. पण या त्यांच्या मनसुब्यात गांधी खलनायकासारखे आडवे आले. ते शेवटच्या माणसालासुद्धा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटू लागले. म्हणूनच गांधींना संपवण्याचा डाव आखण्यास सुरुवात झाली. फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांना सामाजिक स्वातंत्र्याशी काहीएक देणंघेणं नव्हतं. स्वातंत्र्यलढ्यात राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या टिळकांनी ११ नोव्हेंबर १९७० मध्ये अथणी येथील भाषणात 'शेतकऱ्यांनी विधिमंडळात काय नांगर धरायचा आहे?' असा सवालही केला, तर आगरकर सामाजिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते त्यामुळेच टिळकांनी त्यांना 'गंजीवरील कुत्रे' असे संबोधले होते!

गांधी राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. गांधी आणि टिळक यांची तुलना करताना वानखेडेंनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा दाखला दिला आहे. शिंदे यांनी २४ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे अस्पृश्यता निवारण परिषद भरवली होती. मोठ्या आग्रहाने टिळक तिथे हजर झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले, "अस्पृश्यता देवास मान्य असेल तर मी त्यास देवच मानणार नाही.: त्यावर खूप टाळ्याही पडल्या पण त्याच अस्पृश्यता निवारण्याच्या जाहीरनाम्यावर सही करण्यास टिळकांनी नकार दिला. गांधींनी जातीच्या सीमारेषा कशा ओलांडल्या होत्या याचा वानखेडेंनी आवर्जून उल्लेख केला आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावरून गांधी म्हणाले होते की चांभार वा भंग्याची मुलगी जोपर्यंत सर्वोच्च पदी बसत नाही तोवर मला चैन पडणार नाही व तोच माझ्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे. कोचरब आश्रमात गांधींनी एका अस्पृश्य जोडप्याला प्रवेश दिल्यामुळे आश्रमातील लोक, सहकारी, इतकेच काय खुद्द कस्तुरबा गांधीही नाराज झाल्या होत्या. देणगीदारांनी देणग्या बंद करण्याची धमकी दिली. तरीही गांधींनी त्या अस्पृश्य जोडप्याला आश्रमाच्या बाहेर काढलं नाही. गांधींनी जातीयतेच्या सीमा ओलांडल्या होत्या पण टिळकांना ते जमलं नाही.

वानखेडे पुढे सांगतात की, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण गांधींच्या बाबतीत खरी ठरत नाही; कारण गांधी जे काही बनले ते वयाच्या २७ वर्षानंतर. ते लहान असताना खूपच घाबरट होते. बुद्धिमत्ताही जास्त नव्हती. अगदी सर्वसामान्य मुलगा. घरी खोट बोलणारा. परदेशाहूनही बॅरिस्टर म्हणून परत आल्यानंतरही त्यांची वकिली चालली नाही. परत राजकोटला जाऊनही अपयश आलं. संसार चालवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. मसुदा लेखनाचं दुय्यम कामंही त्यांनी केलं. त्याच दरम्यान वकील कमी आणि दुभाष्या जास्त असं काम त्यांच्याकडे चालून आलं आणि दक्षिण आफ्रिकेचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले.

दक्षिण आफ्रिकेत त्यांना वर्णभेदावरून अपमान सहन करावा लागला. इतरांच्या वाट्यालाही तीच अवहेलना येत होती. दक्षिण आफ्रिकेत भारतातील सर्वच प्रांतातील, जातीतील, भाषेतील लोक होते. यामध्येच गांधींना भारत दिसला असेल का? भारतीयांच्या मतदानाच्या अधिकारासाठी गांधींनी लढा दिला आणि तिथे आयुष्यातील २०/२१ वर्ष घालवली. खरं तर दक्षिण आफ्रिकेतच गांधी 'लार्जर दॅन लाईफ' ठरले. त्यांची जडणघडण तिथेच झाली. दक्षिण आफ्रिका म्हणजे त्यांच्यासाठी एक छोटा भारतच होता.

१९१५ मध्ये भारतात परतलेले गांधी पूर्णतः वेगळे होते. गांधींनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधात लढा दिला, भारतीयांच्या मतदानाच्या हक्कासाठी संघर्ष केला कारण त्यांना इतर माणसांसारखीच समान वागणूक हवी होती. दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद तर भारतात जातीभेद होता. दोन्ही देशांमध्ये एक विशिष्ट समाजाची पिळवणूक होती. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जात होतं. हे सर्व गांधींनी अनुभवलं होतं म्हणूनच त्यांनी राजकीय स्वातंत्र्य सोबत सामाजिक स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. चंपारण येथील शेतकऱ्यांचं दुःख त्यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर मांडलं. त्याचवेळी कोचरब आश्रमातील प्रकरणही गाजत होतं.

गांधीजीवर अनेक आरोप झाले. त्यापैकी एक मोठा आरोप म्हणजे ते मुस्लिमधार्जिणे होते. पण मुस्लीम लीग तर त्यांना नंबर एकचा शत्रू मानत होती. बॅरिस्टर जिना त्यांच्याशी फटकून असत. मग त्यांना मुस्लिमधार्जिणे कसं म्हणावं? खुद्द मुस्लिम त्यांना हिंदूधार्जिणे मानत पण ते हिंदूधार्जिणेही नव्हते. त्यांना एका चौकटीत मांडणं शक्यच नाही कारण ते कुठल्याही चौकटीच्या बाहेरचे होते. त्यामुळे गांधी नेमके कोणाचे, तर गांधी इथल्या सामान्य माणसांचे. खरं तर गांधींचा लढा हा शेवटच्या सामान्य माणसांच्या स्वातंत्र्य हक्कासाठीचा होता. त्यामुळे पूर्ण भारत गांधींच्या मागे सशक्तपणे उभा राहिला. मिठाच्या सत्याग्रहासारख्या आंदोलनाची स्वपक्षीय आणि विपक्षीय नेत्यांनी टिंगल टवाळी करूनही त्यांनी तो लढा यशस्वी करून विरोधकांना तोंडात बोटं घालायला लावली होती.

दुसरा आरोप म्हणजे गांधींच्या अहिंसेबाबत. अहिंसेने स्वातंत्र्य मिळत नाही असे म्हणणाऱ्यांना वानखडेंनी मिठाच्या सत्याग्रहाचं उदाहरण दिलं आहे. या आंदोलनात संपूर्ण भारतवासीयांना एकत्र करण्याचं काम गांधीजीच्या सत्याग्रह नावाच्या अस्त्राने केलं आहे. हेच सर्व भारतवासी स्वातंत्र्यलढ्यातही सहभागी होतेच की. याही पुढे जाऊन ते भारतीयांना पहिल्या महायुद्धासाठी सैन्यामध्ये सहभागी व्हायला सांगत होते, जेणेकरून त्यांना शस्त्र प्रशिक्षण मिळेल आणि त्याचा उपयोग स्वातंत्र्यलढ्यासाठीच होईल. गांधींना भारतीयांना शूर बनवायचं होतं त्यामुळे युद्ध प्रशिक्षण घेणं आवश्यक होतं. त्यामुळेच भारतीयांनी युद्धात सामील व्हावे असा त्यांचा आग्रह होता.  

गांधी जातीयवादी होते असं म्हणणाऱ्यांसाठीही लेखकाकडे प्रत्युत्तर आहे. गांधींनी स्वतः १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला होता. अस्पृश्यता ही सैतानाची करामत आहे असं ते म्हणत. न्हावी आणि वकील या दोन्ही कामांकडे ते सारख्याच दृष्टीने बघत. त्यांनी हरिजन यात्राही काढली होती. मग त्यांना जातीयवादी म्हणणारे आहेत तरी कोण ?

गांधींची बदनामी करण्यात उजव्या विचारसरणीचे लोक आघाडीवर होते आणि आहेत. त्यामुळेच 'गांधींची हत्या झाली नसून वध करण्यात आला' असा प्रचार या मंडळीकडून करण्यात येतो. जी व्यक्ती राष्ट्रपिता आहे, 'महात्मा' या पदवीने सन्मानित आहे, त्या व्यक्तीचा वध करून गांधींना दुर्जनांच्या रांगेत उभे केले आहे. अनेक वेळा गांधीहत्येची संधी हुकली, पण ३० जानेवारी १९४८ रोजी गोडसे आणि अनुयायी यांनी त्यांचा मनसुबा साध्य केला. गांधींची हत्या करण्याची नेमकी काय कारणे होती याचं सविस्तर विवेचन चंद्रकांत वानखडे यांनी केले आहे.

गांधींवरील अनेक आरोपांपैकी एक आरोप म्हणजे पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा आग्रह करणे. पण याचेही सविस्तर विश्लेषण लेखकाने केलं आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये शिल्लक असलेल्या ३७५ कोटी रुपयांपैकी ७५ कोटी पाकिस्तानला देण्याचं ठरलं होतं. त्यातले २० कोटी देऊन झाले होते आणि ५५ कोटी बाकी होते. या करारात गांधी कुठेच नव्हते. उरलेले ५५ कोटी देऊ नये हा इतर नेत्यांचा आग्रह होता पण स्वतंत्र भारताचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय करार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी गांधींनी पाकिस्तानच्या वाट्याचे पैसे देऊ करण्याचा आग्रह धरला. 

गांधी हे एक अजब रसायन होतं. इंग्रज त्यांना 'नंगा फकीर' म्हणत, तरी त्यांनाच मोठ्या प्रमाणात घाबरत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकही त्यांना घाबरत आणि मुस्लीम लीगही त्यांच्याशी फटकून असे. गांधींची राहणी साधी, जेवणात शाकाहार आणि स्वच्छता प्रिय. गांधी आपल्याला मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करत आणि त्या पैशाचा सार्वजनिक कामासाठी उपयोग करत. त्यांनी हरिजन फंड स्थापन केला होता. तो फंड अस्पृश्यांसाठी वापरण्यात येत असे. पण याच गांधींनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळत आहे हे समजल्यावर उपोषण सुरु केलं होतं. देशातील एकता धोक्यात येऊन इंग्रजांना त्याचा फायदा होईल हे गांधींचं त्यामागील कारण होतं, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने हा करार मांडण्याचा नीटसा प्रयत्न लेखकाने केलेला नाही. पुस्तकात गांधींच्या सकारात्मक बाजू मांडायचा प्रयत्न केला असला तरी कोणत्याही व्यक्तीच्या सर्वच बाजू सकारात्मकच असतात असं नाही. गांधींनी शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या स्वतंत्र मतदारसंघांबद्दल काहीच आक्षेप घेतला नाही पण अस्पृश्यांबाबत मात्र घेतला कारण ते अस्पृश्यांना हिंदू धर्माचा घटक समजत होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांना माघार घेऊन पुणे करार मान्य करावा लागला. गांधी अस्पृश्यांच्या हक्काकडे भूतदयेच्या दृष्टीने पाहत पण बाबासाहेब राजकीय आणि सामाजिक हक्काच्या दृष्टीने पाहत. लेखकाने पुणे करार हा पूर्णतः गांधींच्या दृष्टीकोनातून मांडला आहे त्यामुळे आंबेडकरवादी लोकांना ते किती पटेल हा प्रश्न आहे. गांधींनी अस्पृश्यता निवारणासाठी बरीच कामे केली पण त्यातून काय साध्य झालं हे सांगण्याचं लेखकाने टाळलं आहे. गांधी जातीयवादी नव्हते पण अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी एखादे यशस्वी आंदोलन किंवा सत्याग्रह केलेला आढळत नाही.  

गांधींची नाळ इथल्या सामान्य माणसासोबत जोडलेली होती म्हणूनच गांधी जागतिक कीर्तीचे नेते बनले. गांधी देशासाठी लढले आणि त्यांनी देशासाठीच प्राण दिला. यासाठी सर्व भारतीयांनी त्यांचे आभार मानलेच पाहिजेत, पण काहींनी गांधींना कायमच शत्रू मानल्यामुळे ते शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधींना निशाणा बनवतात आणि या प्रयत्नात ते यशस्वीसुद्धा होतात. गांधींच्या मागे कुठलीच जात भक्कमपणे उभी नाही त्यामुळे त्यांची एवढी अवहेलना, फरफट झाली आहे आणि होत आहे असं लेखक सांगतात. 

'गांधी का मरत नाही' मधून एक विचार प्रकर्षाने मनात आला तो हा की, गांधी नसतेच किंवा त्यांनी शेवटच्या माणसाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची भाषा केलीच नसती तर इथल्या सामान्य, कष्टकरी समाजाचं काय झालं असत? गांधी नसतेच तर हा समाज समानतेने, स्वाभिमानाने आणि खऱ्या स्वातंत्र्यासह जगू शकला असता का? गांधी समजून घेण्यासाठी हे पुस्तक मोलाची मदत करतं. पुस्तक वाचल्यानंतर गांधी इथल्या प्रत्येक सामान्य माणसांचे 'नायक' होते हे प्रकर्षाने जाणवत राहतं. 

गांधी का मरत नाही
लेखक : चंद्रकांत वानखडे
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन
पृष्ठे : 166
मूल्य : 180 रु.  

हेमंत दिनकर सावळे
hemantsawale15@gmail.com