पन्नास वर्षांनंतर रंगमंचावर पुन्हा एकदा महापूर...

पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेलं आणि रंगभूमीवर गाजलेलं सतीश आळेकरांचं महापूर हे नाटक आजच्या काळात पुन्हा साकारलं जातंय, ही केवळ रंगमंचीय घटना नाही तर पिढ्यांच्या भावविश्वाला जोडणारा एक महत्त्वाचा सेतू आहे. 1975 मधल्या सामाजिक, मानसिक आणि नातेसंबंधांच्या संदर्भातले प्रश्न आजही नव्या रूपानं आपल्याला भिडतात, हे या नाटकाचं वैशिष्ट्य. आळेकर यांनी महानिर्वाण (1973), बेगम बर्वे (1979) यांसारख्या नाटकांमधून मराठी रंगभूमीला वेगळा आयाम दिला असून त्यांच्या या योगदानासाठी त्यांना 2012 मध्ये पद्मश्री सन्मान प्राप्त झाला आहे. दिग्दर्शक ऋषि मनोहर आणि तरुण कलाकारांनी या क्लासिककडे आजच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा केलेला प्रयत्न, नव्या नेपथ्य योजनेपासून संवादशैलीपर्यंत, प्रेक्षकांना केवळ जुनं नाटक आठवायला भाग पाडत नाही तर आजच्या काळातल्या नात्यांचा आणि मानसिकतेचा वेध घेण्यासाठीही प्रवृत्त करतो. बदललेल्या काळाच्या पार्श्वभूमीवर महापूर पुन्हा एकदा रंगमंचावर उतरतंय, ही नाट्यजगतातील एक लक्षवेधी पुनरावृत्ती आहे.

सतीश आळेकर लिखित 1975 साली रंगमंचावर आलेले नाटक महापूर. सतीश आळेकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले नाटककार त्यांच्या खास लेखनशैलीसाठी परिचित आहेत. त्यांचे महापूर नाटक आज पन्नास वर्षांनंतर परत नव्या संचात रंगमंचस्थ होत आहे. हा योग फार कमी नाटकांच्या नशिबात येत असेल. 1975 साली हे नाटक आळेकरांनी लिहिले तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून तीस वर्ष झाली होती. या काळात पडदयावर अमिताभ बच्चन हा जोशीला नायक हिंदी चित्रपटांचा पडदा गाजवत होता. अभिमान, जंजीर सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होते. अशावेळी लिहिलेल्या या नाटकात स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्या लाटेबरोबर वाहात आलेल्या जोडप्याच्या तरूण मुलाची गोष्ट नाटककार सांगत आहे.

आज 2025 चालू आहे. या पन्नास वर्षांमध्ये काळाबरोबर समाज बदलला, संदर्भ बदलले आहेत आणि माणसामाणसातली नातीही बदलली आहेत. तरी हे नाटक लिहून जितका काळ झाला त्याच्या साधारण निम्म्या वयाच्या तरूण ऋषि मनोहर याला हे नाटक करावे असे वाटते, हे विशेष आहे. त्याने हे नाटक संपादितही केले आहे. त्यात नाटकाचा कालावधी अडीच तासावरून दीड तासावर आला आहे. काही पात्रे कमी करून जुन्या पात्रांमधे त्यांचा समावेश केला आहे. आणि अर्थातच काही भाग कमी केला आहे. नवीन संचातील तरूण पिढी या नाटकाकडे आजच्या संदर्भातून बघण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे आता हे नाटक पंचाहत्तर साली कसे केले होते, कोणी कसे काम केले होते या संदर्भाने पाहू नये. मात्र मूळ अडीच तासाच्या नाटकातून आजचे दीड तासाचे नाटक कसे संपादित केले, यामागचा विचार पाहाण्यासारखा आहे. स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवरील प्रेमात पडलेल्या आईवडिलांच्या प्रेमकथेपेक्षा गोविंदाच्या फसलेल्या प्रेमाची ही कथा आहे. त्या विफलतेतून आलेल्या विकारात आता काही हिंसक, बीभत्स रंगमंचावर दाखवले जावे, असे नवीन दिग्दर्शकाला वाटत नसल्यामुळे, तसे काही संदर्भ गाळले आहेत. आपणही आता त्याचा विचार करू नये. आज रंगमंचावर सादर केले जाणारे हे नाटक कसे आहे, याचा हा धांडोळा आहे.

नाटकाची सुरूवात केली आहे 'तेरे मेरे मीलन की ये रैना' या 'अभिमान' चित्रपटातल्या गाण्याने. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या खास शैलीतले हे गाणे आपल्याला एकदम त्या पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जाते. महापूर मधल्या गोविंदचा प्रेमभंग झालेला आहे. आई-वडिलांच्या स्वातंत्र्यपूर्व पिढीसारखे कोणतेही मोठे ध्येय समोर नाही. ना नवीन शिक्षणाच्या प्रवाहात चमकण्याची बुद्धी. या नाटकाचा नायक गोविंद अशा पिढीचा प्रतिनिधी आहे. मनोरुग्ण तरुणाचे एका मानसोपचारतज्ज्ञाने केलेल्या विचारपूसवजा चौकशीचेही हे नाटक आहे. स्वतःच निर्मिलेल्या भ्रमात फसलेल्या तरुणाची ही नाटकीय कहाणी चटका लावते. शाळेच्या वर्गात एका बाकावर बसणाऱ्या सुलभामधेच तो अडकून पडलेला आहे. आपल्याला काहीच जमत नाही ही बोचरी बाब आणि त्यातून आलेले विस्कटलेपण घेऊन झगडणारा गोविंद आणि त्याच्या भोवती शेजारचे काका, त्याचे आई-वडील, एक डिटेक्टिव्ह आणि त्याची वर्गमैत्रीण सुलभा यांचा हा पट. महापूर ही प्रेमभंगामुळे, शिक्षणातल्या बेताच्या गतीमुळे, कमी कष्टामुळे, विशिष्ट कौटुंबिक परिस्थितीमुळे मानसिक तोल ढळलेल्या नायकाची हुरहुर लावणारी नाट्यकहाणी आहे. पण आता 2025 मधे स्त्री-पुरुषांमधले नाते तसेच राहिले आहे का? तर नाही, आज हे नाते खूप बदललेले आहे. मित्रमैत्रिणी म्हणून सहजपणे एकमेकांना टाळ्या देणे, खांद्यावर हात ठेवणे, अगदी सहज मैत्रीदाखल कवेत घेणे आजूबाजूला रुळलेले आहे. नाते निर्माण होणे, एकमेकांना समजून घेणे आणि अगदी टोकाला जाऊन नात्याला ब्रेक देणे या गोष्टी आजकाल सरसकट झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्त्री-पुरुषांमधल्या नात्याकडे बघण्याचा त्या काळाचा दृष्टिकोन म्हणून आजच्या पिढीतल्या नाटयकलावंतांना हे नाटक खुणावते आहे.

आळेकरांची भाषा, त्यांचा तिरकस विनोद या नाटकातही आहे. मध्यमवर्गीय मूल्यव्यवस्थेतल्या मूल्यांचे ते वेगळ्याप्रकारे विश्लेषण करतात. त्यातला विरोधाभास दाखवतात. तो सशस्त्रक्रांतिच्या दिशेने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्यांना अतिरेकी म्हणणे, वर्ध्याच्या आश्रमात प्रेमाचे प्रतीक म्हणून शेळीच्या दुधात भिजवलेला खजूर प्रेयसीने प्रियकराला देणे, गोंविदने मानसिक समस्येसाठी त्याच्या समाजवादी, मध्यमवर्गीय, भाबड्या बापाला जबाबदार धरणे, त्याची काहीशी क्रूर थट्टा करणे. ‘हेरेडिटी’वर, ‘जेनेटिक्स’वर विश्वास असल्याने; आपण अभ्यासात माठ आहोत, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, असे बापाला धारेवर धरणे यातून तो डोकावतो. पण कथेचा ओघ प्रामुख्याने नायकाच्या मानसिक द्वंद्वावर भर देतो. स्वातंत्र्य मिळाल्यावर काहीच ध्येय समोर नसलेल्या मध्यमवर्गीय समाजातल्या मुलामुलींच्या प्रेमाच्या कल्पना, त्यातले अपयश आणि भावनांचा त्यातून आलेला महापूर हा या नाटकाचा केंद्रवर्ती विषय आहे. या कल्लोळात नायिका म्हणते की, मला लग्नासाठी मैत्री संपवायची नाही. ही भावना त्यांच्या मानसिक ओढाताणीचा केंद्रबिंदू आहे. या भ्रमात असलेल्या गोविंद या नायकाकडे, त्याच्या प्रेमाच्या आणि नात्यांच्या कल्पनांकडे पुन्हा एकदा नवीन पिढीने वळून पहावे, असा तरूण दिग्दर्शकाचा हेतू असावा.

वाईड विंग्ज मिडियाने हे नाटक उभे केले तेव्हा अर्थातच या नाटकात पन्नास वर्षांपूर्वीचा काळ उभा करणे हे मोठे काम होते. 1975चा काळ उभा करण्यासाठी या संचाने विशेष प्रयत्न केले आहेत. त्या काळातले मध्यमवर्गीय घर उभे करताना पन्नास वर्षांपूर्वीच्या पत्र्याची ट्रंक, खाट, ट्रान्झिस्टर, चौरंग अशा वस्तू नेपथ्यात जाणीवपूर्वक वापरून तो काळ जिवंत केला आहे. या घराला दोन खिडक्या आहेत. त्या खिडक्यांचा वापर घराच्या बाहेरच्या माणसांना डोकावण्यासाठी केला आहे, तसाच गोविंद या नायकाच्या मनात डोकावण्यासाठीही केला आहे. त्यासाठी तशी प्रकाशयोजनाही साधली आहे. त्यामुळे त्या खिडकीत उभे असणारे पात्र हे प्रत्यक्षात उभे आहे की ते गोंविदच्या मनात आहे याचा खेळ प्रेक्षकांच्याही मनात चालू राहतो. यात डोळ्यांना न दिसणारी अशी तिसरी एक खिडकी योजली आहे. ती आहे प्रेक्षक आणि घराच्या भिंतीतली काल्पनिक खिडकी. यातून विशेषतः गोविंद अधूनमधून प्रेक्षकांशी विशेष संवाद साधतो. प्रेक्षक म्हणून आपण ती भिंत ओलांडून आत वाकून पाहात असतोच, पण नट देखील ती भिंत ओलांडून आपल्यापर्यंत येतात, याचा परिणाम फार सुंदर होतो. विशेष परिणामकारता येण्यासाठी वापरलेली आणि खूनाच्या आरोपाला साजेसी म्हणून लाल रंगाची प्रकाशयोजना काही वेळा केली आहे, ती मात्र थोडी जास्त अंगावर आल्यासारखी वाटली.

या नाटकात एक डिटेक्टिव्हवजा पात्र गोंविदला बोलते करते आहे. शेवटी प्रेक्षकांच्या लक्षात येते की मुळात तो डॉक्टर आहे. पंचाहत्तरच्या काळात मानसोपचारतज्ज्ञ हा शब्द मध्यमवर्गीयांच्या आवाक्याच्या आणि इच्छेच्याही बाहेरचा होता, त्यामुळे त्याला मानसोपचारतज्ज्ञ असे न म्हणता केवळ इसम म्हटले आहे. आताच्या काळात मानसिक दुबळेपणा, खचलेपण आणि मानसिक समस्या हा काही टाळायचा विषय राहिलेला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळातली ही पिढी याच्या बरोबरच जगते आहे. त्यामुळे कदाचित आता गोविंद साकार करताना नैसर्गिक सहजतेने दाखवता येतो आणि आरोह वेलणकरने तो तसा दाखवलाही आहे. गोविंदच्या मनावर आलेले मळभ म्हणजे काहीतरी भयानक आणि बाहेर न सांगण्यासारखे लाजिरवाणे नाही, तर “मी हा असा आहे” असा सहजभाव त्याच्या वावरण्यात आहे. रेशम श्रीवर्धनकर ही गुणी कलाकार सुलभा हे पात्र असेच तिच्या मानसिक द्वंद्वासह सहजपणे साकार करते. या दोघांचे एकमेकांबरोबरचे प्रसंग अतिशय उत्कट आणि मानसिक हेलकाव्यांनी भरलेले आहेत. ते हलकावे दोघेही सुंदरपणे साकारतात.

नात्यांचे अर्थ लावताना, नाती जपताना आणि त्याचवेळी व्यवहार सांभाळताना नायिकेची तारांबळ उडालेली आहे. मैत्री आणि लग्न यातले अंतर या नायिकेला पार करता येत नाहीये. लग्नासारख्या व्यावहारिक नात्यात न अडकवून ठेवता, मैत्रीच्या नात्याचा मोकळेपणा जपावा, ही तिची धडपड आहे. नायिकेच्या मनातला हा संभ्रम सुटत नाही. एक बाकावर बसून बालपण अनुभवलेल्या मुलामधला एक छान मित्र तिला नवरा म्हणून स्वीकारून हरवायचा नाहीये. “लग्न ठरली आहे ती तुझी प्रेयसी आहे आणि मी तुझी वर्गमैत्रिण” असा फरक ती गोविंदाला समजवण्याचा प्रयत्न करते. यात आपण गोविंदवर अन्याय करतोय हे देखील तिला समजते आहे, पण तरीही मैत्रीच्या नात्याचा निरागसपणा राखण्याची तिची धडपड सतत दिसत राहते. एकीकडे आपण त्याच्या मानसिक विकलतेला जबाबदार आहोत याची जाणीव तिला आहे, आणि त्याचवेळी त्याच्याकडे परत ओढून आणणारे मन आहे – या कचाटयात सापडलेली ही सुलभा. हिचे बारकावे रेशम श्रीवर्धनकर हिने फार चांगले आत्मसाद केले आहेत. इकडे नायकाला मात्र लहानपणाची मैत्री म्हणजे लग्नापर्यंत पोहोचणारे प्रेम, असे खात्रीने वाटते आहे. सुलभाचे लग्न दुसऱ्याकोणा बरोबर होणार, आणि मुख्य म्हणजे ती आपली राहणार नाही हे त्याला पेलवताना येत नाहीये, आणि तिला “माझ्याशी लग्न कर” असे ठामपणे सांगताही येत नाहीये. ही त्याची ओढाताण त्याला मानसिकरित्या दुबळे करते. आरोह वेलणकर या गुणी नटाने गोविंद या पात्राची कुचंबणा, शिक्षणातले अपयश, आणि त्यासाठी आई वडिलांना दोष देऊन स्वतःची सुटका करून घेण्याची धडपड, आणि सुलभाचे लग्न वेगळ्या कुणाशीच ठरल्याने आतून दुखावलेला, त्यामुळे “आपण सर्वार्थाने नालायक ठरलो” असा न्यूनगंड आलेला मुलगा – असे अनेक पदर समजून घेत त्याला न्याय दिला आहे. थोडे खांदे पाडून चालण्याची त्याची देहबोली आणि वाचिक अभिनयातला बेफिकीर आवाज बऱ्याच गोष्टी सुचवून जातो. आरोह आणि रेशम हे दोन उत्तम कलावंत ही या नाटकाची जमेची बाजू आहे.

स्वातंत्र्यसैनिक म्हणून स्वातंत्र्यलढ्यात ओढल्या गेलेल्या गोविंदच्या वडिलांची रघुनाथराव ही भूमिका धीरेश जोशी यांनी केली आहे. एकीकडे आपण स्वातंत्र्यसैनिक म्हणून काही फार कामगिरी केलेली नाही याची जाणीव, आणि तरूणवयात आश्रमात फुललेले प्रेम, यांचे संचित घेऊन ते वाटचाल करत आहेत. वयात आलेल्या मुलाचे ना धड शिक्षण होते आहे, ना लग्नाचे जमते आहे याची त्रासदायक जाणीव – आणि त्यामुळे त्या काळातल्या वडिलांना पटकन मुलाशी बोलता येणार नाहीत असे विषय त्या दोघांच्या बोलण्यात येतात. हे अवघडलेपण धीरेश जोशी यांच्या वावरण्यातून जाणवते. त्यातूनच शेवटच्या एका प्रसंगात ते गोविंदला वकील वाटायला लागत असावेत. (हा मूळ संहितेत केलेला बदल आहे.) या नाटकातले आणखी एक महत्त्वाचे पात्र आहे मानसोपचारतज्ज्ञाचे. पण नाटककाराने त्याला फक्त “इसम” म्हटले आहे. कारण संपूर्ण नाटकभर तो इसम गोविंदाच्या मनातल्या डिटेक्टिव्हच्या रूपात दिसतो. प्रसाद वनारसे यांनी त्या डिटेक्टिव्हचा भेदकपणा, कठोर प्रश्न विचारण्याचे धाडस, आणि मनातले काढून घेण्याची हिकमत छान दाखवली आहे. मात्र, खरे तर तो इसम म्हणजे मुळात डॉक्टर आहे, याची छटा त्यांच्या वागण्यातून सूचित होत नाही. गोविंदावर माया करणारे ब्रह्मचारी काका म्हणून शेजाऱ्याच्या छोट्याश्या भूमिकेत दिलीप जोगळेकर अगदी योग्य वाटतात. रेणुका दफ्तरदार यांनी गोविंदच्या आईची अगदी लहानशी भूमिका साकारली आहे. मूळ नाटकातले या पात्राचे प्रसंग जास्त असले पाहिजेत. आईचे प्रसंग कमी झाले असले तरीही दफ्तरदार यांनी ही भूमिका करायचे मान्य केले, आणि लहानशा प्रसंगातून त्या काळातली आई उभी केली आहे. भाडिपच्या मालिकांमधून आई म्हणून त्यांची जी प्रतिमा तयार झाली आहे, त्यापेक्षा ही आई निश्चितच वेगळी आहे. आणि त्यांनी तो वेगळेपणा त्यांच्या अभिनयातही राखला आहे.

या प्रयोगातली एक गोष्ट मला प्रामुख्याने खटकली. 1975 सालातल्या मध्यमवर्गीय घरात घडणारी ही कथा आहे. अशा घरात कोणत्याही कारणाने आईच्या साड्या पलंगावर अस्ताव्यस्त पसरलेल्या त्या काळात चालल्या नसत्या आणि राहिल्या नसत्या. त्यामुळे त्या विसंगत वाटतात, खटकतात आणि त्याच्याकडे विनाकारण लक्ष जात राहते. नाटकातल्या एका घटनेसाठी आवश्यक असला तरी तो पसारा असलेला पलंग नको वाटतो. आणखी एक खटकणारी गोष्ट म्हणजे गोविंदच्या मनातल्या व्यक्ती आणि खऱ्या जगातल्या व्यक्ती यातला फरक काहीवेळा नीटसा स्पष्ट होत नाही. विशेषतः वडिलांच्या पहिल्या प्रसंगातून ते ज्याप्रकारे रंगमंचावर निघून जातात, ते विचित्र वाटते. पण या गोष्टी फार महत्त्वाच्या नाहीत.

हे नाटक आणि त्यातले कलाकार जे सांगू पाहात आहेत ते जास्त महत्त्वाचे आहे. आजच्या काळातल्या तरूण मुलामुलींना आपल्या आधीच्या पिढीकडे पहावेसे वाटते. त्यांचा दृष्टिकोण, त्यांचे प्रश्न समजून घेत आजच्या काळाचा वेध ते घेतात. आजचे नातेबंध कसे आहेत आणि तेव्हाचे कसे होते याचा त्यांना काहीतरी संबंध जाणवतो, हे फार आश्वासक आहे. त्यासाठी नव्या संचातील महापूर पाहायला हवे.