मढी - एक अंतर्मुख करणारा प्रवास

२८ ऑगस्ट २०२५

माध्यमांतर

कलाकाराचा प्रवास हा केवळ कलेचा नाही तर आत्मशोधाचाही असतो. अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन या सर्व माध्यमांतून सुनील सुकथनकर यांनी मानवी भावविश्वाचा सातत्याने शोध घेतला आहे. त्यांच्या कलाकृतींमध्ये सामाजिक वास्तवाशी संवाद साधण्याची ताकद आहे. ‘मढी’ या नाट्यप्रवासातून ते पुन्हा स्वतःकडे, आपल्या अभिनयकलेच्या गाभ्याकडे वळले आहेत. प्रेक्षकांसाठी हा प्रवास म्हणजे केवळ नाट्यप्रयोग नसून जीवनाचं प्रतिबिंब पाहण्याची संधी आहे. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शक द्वयींनी अनेक उत्तम चित्रपट आणि माहितीपट दिग्दर्शित केले आहेत. ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘अस्तु’ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘कासव’ हे त्यातील विशेष उल्लेखनीय चित्रपट आहेत. दिग्दर्शक, लेखक, गीतकार आणि अभिनेता म्हणून त्यांचा हा प्रवास प्रत्येक कलारसिकाला भावणारा आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाच्या विश्वस्त मित्राचा हा लेख नक्कीच वाचावा असा आहे. (पुरुष उवाच, दिवाळी 2024 मधून साभार.)

लहानपणापासून मला अभिनयाची आवड. खरं तर आवड म्हणण्यापेक्षा वेड म्हणायला हरकत नाही. कराडच्या लहानपणापासून ते नंतर पुण्यात मॉडर्न हायस्कूलमधल्या शालेय जीवनात मला नाटक-अभिनय या गोष्टी कायमच खुणावत राहिल्या. सातवी-आठवीच्या वयात अभिनयाची अनेक पारितोषिकं मिळवून झाल्यावर मी ‘मोठं झाल्यावर कोण होणार’ या लोकप्रिय प्रश्नाला ‘अभिनेता’ असं उत्तर देऊ लागलो होतो! पण या बेभरवश्याच्या क्षेत्रात कुणी सहज स्वतःला झोकून कसं देणार? त्यातही एक पुरुष या नात्याने ‘करिअर’चा विचार करायला हवा, असा एक ट्रेंड त्या काळी जोरात होता. त्यामुळे कमावता होण्याची निकडीची आर्थिक गरज नसलेली कौटुंबिक परिस्थिती असली आणि कुटुंबियांचा पाठिंबा असला तरी आपण नीटनेटकी पदवी मिळवणं क्रमप्राप्त आहे, असं माझ्या मनानं घेतलं होतं. शिक्षण चालूच राहिलं. फक्त एरवी उत्तम मार्क्स मिळाले की सायन्सला जायचं हा पायंडा मोडण्याची धिटाई करून कॉमर्स कॉलेजमध्ये दाखल झालो. अर्थात तेही नाटक करायला भरपूर वेळ मिळेल या प्रलोभनामुळेच. मग सुमित्रा भावे आयुष्यात आल्या आणि चित्रपट माध्यमाच्या प्रेमात पडायला झालं. पस्तीस वर्षं सुमित्रा आणि मी चित्रपट-दिग्दर्शन करत राहिलो आणि मनातला अभिनयाचा (त्यातही नाटकाचा) किडा कोपऱ्यात जाऊन बसला. आमच्या एकत्र दिग्दर्शन प्रक्रियेत कलाकारांकडून अभिनय करवून घेणं ही माझी जबाबदारी असे. उत्तम-उत्तम कलाकार त्यांचे कसब पणाला लावताना जवळून पहाणं, त्यांना आपल्याला नेमकं काय हवं ते सांगणं, कधी-कधी त्यांना ‘करून दाखवणं’ मला कायमच आवडत आलं आहे. पण याबरोबर एक अजब गोष्ट झाली. बालपणापासून मला अगदी नैसर्गिक सहजसाध्य असणारी अभिनयकला माझ्यावर रुष्ट झाली. मला अभिनय अवघड वाटू लागला. स्वतः अभिनय करणं मनात येताच मनाभोवती संकोचाचा एक अदृश्य पडदा तयार होऊ लागला. (आमच्या काही चित्रपटात मी छोट्या छोट्या भूमिका केल्या- पण त्या आज पहाताना मला त्यात हा संकोचाचा पडदा ठळकपणे जाणवतो!)

‘अस्तु’ चित्रपट संपता-संपता आमचा सहाय्यक दिग्दर्शक आलोक राजवाडे यानं मला ‘शिवचरित्र-आणि एक’ या नाटकात शिवचरित्र लिहिणाऱ्या एका इतिहासकाराची मुख्य भूमिका देऊ केली. मी ती ताबडतोब स्वीकारली. मी नाटक सोडून जवळ-जवळ तीस वर्षं झालेली. अनेक सहकलाकार तिशीपेक्षा लहान वयाचे. दोन-दोन पानी मोठे संवाद. पण पोहणाऱ्याला जसं पुन्हा पाण्यात पडल्यावर ‘तरंगता’ येतं, तसं मला ते नाटक किमान जमून गेलं. पण माझ्याच वयाच्या प्राध्यापकाची सामोपचारी विचार मांडणारी ती व्यक्तिरेखा माझ्यासाठी सहजसाध्य होत गेली. संकोचाचा पडदा थोडा निवळला. ‘कासव’ चित्रपटानंतर मी पाँडेचरीमधल्या ‘आदिशक्ती’ या अनोख्या नाट्यसंस्थेत दहा दिवसांची कार्यशाळा करण्यासाठी स्वतःला दाखल करून घेतलं. निम्मी राफेल आणि विनयकुमार या तिथल्या संचालकांच्या मी आधीपासून प्रेमात होतोच. दहा दिवसांत शरीर-मन खुलं करत जाणाऱ्या अगणित खेळांमधून माझ्यातला अभिनेता चांगलाच चेकाळला. आता मी वाट पहात होतो चांगल्या संधीची. पण अभिनय ही कलाच तशी परावलंबी! बघता-बघता सहा-सात वर्षं निघून गेली.

दोन वर्षांपूर्वी अभिनेता-दिग्दर्शक मित्र चित्तरंजन गिरी एक प्रकल्प घेऊन भेटायला आला. मढी. बनारसच्या घाटावरच्या एका अनिकेत अश्या भरकटलेल्या माणसाची कहाणी. तीही निःशब्द. त्याचा अव्यक्त इतिहास, त्याचा ‘वेडेपणा’, त्याचं भय, त्याचं आधार शोधणं, एखाद्या वस्तूत, माणसांत ‘देव’ शोधणं- या साऱ्या प्रवासाची ही गोष्ट. हा चित्रपट आम्ही बनारसमध्ये चित्रित करणार होतो. आणि मी त्या दिग्दर्शन-प्रक्रियेत अजिबात न पडता त्या चक्रम माणसाची भूमिका करणार होतो. आम्ही बनारसला गेलो. ते घाट, तिथल्या रिकाम्या खोल्या-मढी- पाहिल्या. गंगेचं बदलतं पात्र, तिथले गल्ली-बोळ, माझ्या व्यक्तिरेखेसारखी भासणारी असंबद्ध माणसं- एक नवं विश्वच बघायला-अनुभवायला मिळालं. दिग्दर्शक म्हणून गिरी प्रकल्पाची जुळवा-जुळव करण्यासाठी अथक परिश्रम घेत होताच. पण माझ्याशी माझ्या व्यक्तिरेखेच्या मानसिक प्रवासाविषयी मलाच अंतर्मुख होऊन विचार करायला लावत होता. एक चित्रपट-दिग्दर्शक या नात्यानं माझं मन अजूनही हा चित्रपट म्हणून कसा उभा रहाणार, दृष्य-ध्वनी यांच्या परिभाषेतून ही निःशब्द कलाकृती कशी तयार होणार- या भलत्या विवंचनेतून बाहेर यायलाच तयार नव्हतं. माझा अभिनेता म्हणून गिरीला अपेक्षित असणारा प्रवास अजून सुरूच होत नव्हता. लांब केस आणि अस्ताव्यस्त दाढी वाढलेलं माझं व्यक्तिमत्त्व हीच काय ती माझी जमेची बाजू होती. आणि माझ्या विचार करण्याच्या क्षमतेवर गिरीचा विश्वास होता. पण व्यक्तिरेखेच्या अंतरंगापर्यंत पोचण्यासाठी मी अजून ‘तयार’ नव्हतो. हा प्रकल्प दुर्दैवाने आर्थिक पाठबळ नसल्याने बंद पडला आणि सारं पुन्हा थंडावलं. मीही माझ्या विश्वात गुरफटलो.

आणि काही महिन्यांपूर्वी गिरी पुन्हा माझ्याकडे आला. ‘मढी’ नाट्यरूपात सादर करू या, असा मनोदय व्यक्त करत. आता मात्र मला दुहेरी आनंद मिळणार होता. नाटक आणि त्यातला अभिनय या दोन्ही माझ्या ‘पहिल्या प्रेमांशी’ माझी पुन्हा भेट होणार होती. मग सुरू झाला नवा प्रवास. पुण्यातल्या ‘द बॉक्स’ या प्रदीप वैद्य या मित्राने तयार केलेल्या नाट्यवेड्या जागेवर आम्ही तालमी करण्यासाठी जमू लागलो. राजू सुतार आणि वैशाली ओक हे मित्र-कलावंत दाम्पत्य त्यांच्या चित्र-संरचनेचं कौशल्य घेऊन आणि प्रदीप स्वतः त्याच्या प्रकाशयोजनेची जादू घेऊन यात सहभागी होणार होते. सहकलाकार म्हणून आमच्या अनेक चित्रपटातला कलावंत आणि आमचा एके काळाचा सहाय्यक दिग्दर्शक असलेला ओंकार गोवर्धन आणि नाटकाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून लेखक-मित्र हर्षवर्धन श्रोत्री.

गिरी हा एक हट्टी, आग्रही आणि वेगळ्याच धाटणीचा दिग्दर्शक आहे. त्याने काम सुरू करताच मला पुढल्या धोक्याची जाणीव झाली. माझी व्यक्तिरेखा सादर करताना मला येणाऱ्या अनंत अडचणी मला समोर दिसू लागल्या. तसं बघायला गेलं तर मी खूप काळ ‘मढी’ च्या संहितेच्या संगतीत घालवला होता. या ‘कथानकात’ घडणाऱ्या घटना मला अवगत झाल्या होत्या. गिरीने तालीम सुरू करण्यापूर्वी माझी बौद्धिक-मानसिक उजळणी करून मला काही दिवसांचा अवधी दिला आणि माझ्या बाजूने मी काय पद्धतीने एकटाच हे प्रसंग ‘करून’ दाखवतोय ते बघून आम्ही सुरुवात करायचं ठरलं. माझ्या समोर मुख्य आव्हान होतं ते स्वतःला पूर्ण किंवा निदान जमेल तेवढं ‘मोकळं’ सोडण्याचं. मी माझ्या माझ्या नोंदी करत ते प्रसंग मला सुचतील तसे माझ्या मते मोकळेपणे सादर केले. (तसा मी स्वतःवर खूषही झालो!) पण दिग्दर्शक शांत होते! त्यांना मी ‘मोकळेपणे’ प्रयत्न केला याचा आनंद वाटला. पण बस्स तेवढंच! आणि मग तालमी सुरू झाल्या.

नाटक या माध्यमाची एक गंमत आहे. चित्रपटात खऱ्या मढी मध्ये खऱ्या नदीकाठी मी उभा रहाणार होतो. इथे एका चौकोनी प्लॅटफॉर्मला मला मढी समजायचं होतं. प्रेक्षकांना ते वाटायला लावायचं होतं. समोरची नदी मलाच तयार करायची होती. चित्रपट माध्यमाची ताकद हुबेहूबपणामध्ये असते. तिथे धूसरता निर्माण करणं कर्मकठीण. तर नाटकात प्रेक्षकाला ‘विश्वासात घेण्याच्या’ खेळात गुंगवणं हीच खरी त्या माध्यमाची क्षमता. त्यामुळे एक प्रकारे मला मढी हे नाटक होतंय याची मजा येऊ लागली. मी म्हणेन तो रस्ता. मी दाखवीन तो सूर्य. मी हात लावेन ते पाणी. म्हटलं तर अवघड पण शक्य झालं तर अत्यंत आनंद देणारं. स्वतः सादर करणाऱ्याला आणि प्रेक्षकालाही. यात खरं आव्हान होतं ते निराळंच. मला ते ‘व्यक्तिमत्त्व’ तयार करायचं होतं. मी त्या ‘मढी’ म्हणून उभ्या केलेल्या चबुतऱ्यावर उभा राहू लागलो, माझ्या ‘आदिशक्ती’ मधल्या कार्यशाळेला स्मरून भीती, संताप, असहायता वगैरे भावना जीव तोडून व्यक्त करू लागलो. दिग्दर्शक गिरी मला शांतपणे माझ्या वावरण्यामधला ‘पोकळपणा’ दाखवू लागला. मी केवळ असं सगळं ‘करायचा’ प्रयत्न करणारा एक नट वाटत होतो, हे त्यानं सांगितल्यावर मलाही पटलं. नेहमीच्या नाटकात संवाद मदतीला असतात. आणि निरनिराळ्या पात्रांना संवादफेक कशी करायची हे पस्तीस वर्षं सांगणारा दिग्दर्शक म्हणून ते मी (कदाचित) सहज केलं असतं. आणि त्या वाक्यांमधून भाव-भावना व्यक्त करून मोकळं होता आलं असतं. इथे एखाद्या क्षणी मला नुसतं उभं राहायचं होतं. मग ते ‘त्या व्यक्तिरेखे’सारखं कसं होणार? ‘त्या’ माणसाची नजर, ‘त्याची’ भीती, ‘त्याची’ असहायता... ती माझ्यामध्ये आणायची तरी कुठून. दिग्दर्शक मलाच विचारू लागला. ‘तुला कशाची भीती वाटतेय?’ माझ्याकडे उत्तरच नाही! ‘तूच संहितेत भीती वाटण्याचा प्रसंग लिहिलास ना? मग तूच कसं विचारतोस?’ असा रागमिश्रित गोंधळ माझ्या मनात येई. मग मला लक्षात आलं- संवाद ‘पाठ’ करून ‘म्हणता’ येतात. पण मनःस्थिती घोकून तयार करता येत नाही. मला प्रत्येक क्षणी तो माणूस ‘असण्या’वाचून पर्याय नव्हता. आणि तो माणूस ‘व्हायचं’ तर माझ्या पाठीवर त्या माणसाच्या जगण्याचं संपूर्ण ओझं असायला हवं. आपण दररोज वावरतो-ते आपण जे जगात आलेले असतो त्या ऐवजावर. ते आपल्याला ‘सांगावं’ लागत नाही. तसं पहायला गेलं तर व्यक्तिरेखा भरीव व्हाव्यात म्हणून आम्ही आमच्या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना त्यांच्या पूर्व इतिहासाच्या कथा बनवून सांगत असू. म्हणजे ‘देवराई’ मधला शेष प्रेक्षकाला एका विशिष्ट वयापासून चित्रपटात दिसतो. पण तो किती साली जन्मला, त्याचं लहानपण, तेव्हा काय-काय घडलं- अशी पूर्वपीठिका आम्ही अभिनेता अतुल कुलकर्णीला पुरवत असू. ते सगळं चित्रपटात येईल असं नाही. पण त्या अभिनेत्याला ते पात्र पूर्णपणे उमगावं म्हणून त्याला हा ऐवज पुरवावा लागतो. ही ‘बॅक-स्टोरी’ खूप मनोरंजक गोष्ट आहे. इथे गिरी हा लेखक-दिग्दर्शक मलाच ‘मी कोण’ हा शोध घ्यायला सांगत होता. संहितेत असणारे प्रसंग ‘माझ्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात’ असे का घडत आहेत, याचं लॉजिक मला शोधायचं होतं. अर्थात तयार संहितेच्या अर्थ-चौकटीत बसेल असं. मी माझ्यातल्या लेखकाला कामाला लावलं. अगदी दहा-बारा पानांची कथाच लिहून काढली- ‘त्या माणसाची’. आता दिग्दर्शकाच्या कुठल्याही प्रश्नाला मी उत्तर देऊ शकत होतो. (त्या माझ्या कथानकाच्या मी इतका प्रेमात पडलो, की पुढे कधी या ‘बॅक-स्टोरी’ वर एक वेगळा चित्रपट किंवा नाटक करायला मजा येईल असंही मला वाटू लागलं.)

ही बॅक-स्टोरी लिहिण्याचीदेखील एक गंमत होती. आम्ही अगदी आधी ‘मढी’ चित्रपट बनवण्याची तयारी म्हणून बनारसला गेलो, तेव्हाही या माझ्या व्यक्तिरेखेविषयी गिरी आणि मी बोलतच होतो. घरोघरी देवळंच देवळं असणाऱ्या त्या काशीमध्ये मी माझं नास्तिक मन आणि बुद्धी घेऊन हिंडत होतो. मला मंदिरांमधली शिल्पकला पहाणं आणि शेकडो वर्षांचा सांस्कृतिक वारसा असणारं ते गाव अनुभवणं आवडत होतं. पण पवित्र अनुभूती वगैरे येत नव्हती. त्याबद्दल माझी तक्रारही नव्हती. उलट तथाकथित श्रद्धाळू म्हणवणारी माणसं नव्या राजकीय सोयीस्करपणे या पुरातन वारश्याची शहरी सुशोभीकरण या नावाखाली चाललेली निर्लज्ज मोडतोड मजेत पहाताना पाहून माझं मन खिन्न होत होतं. अनेक जाणत्या लोकांकडून बनारसबद्दलची अत्यंत व्यामिश्र आणि समृद्ध मिथकं कानावर पडत होती. ती कमालीची गुंगवणारी होती. मानवी इतिहासाविषयी, माणसाच्या आध्यात्मिक ओढीविषयी चिंतन करायला लावणारी होती. ध्यान-धारणा, चिंतन-मनन, आसक्ती-विरक्ती या सगळ्या मनो-व्यापाराबद्दल मला अपार कुतूहल वाटतं. त्याने माझी नास्तिक धारणा डगमगत नाही. या भूमिकेतून मी त्या (मला करायची असलेल्या) व्यक्तिरेखेचा विचार करू लागलो. गिरीच्या मते तो माणूस आस्तिक असावा. पण मी त्याला नास्तिक बनवलं तर त्याची हरकत नव्हती. मी विचारात पडलो. आता त्या माणसाची पूर्वपीठिका तयार करताना तो आस्तिकच बनत गेला. याचं कारण खूप मजेशीर होतं. संहितेमध्ये त्या माणसाला आधुनिक शिक्षण मिळालं आहे. तो संशोधकही आहे. तरी त्याला एक अनामिक भीती आहे आणि त्यातून कोणती तरी अज्ञात शक्ती त्याला वाचवेल असा विश्वास आहे. तशी त्याची धडपड चालू आहे. असा अज्ञात शक्तीवर निरागस विश्वास आस्तिक माणूसच ठेवू शकेल! नास्तिक माणसाला अनामिक भीती वाटत नाहीच असं थोडंच आहे? पण त्यातून त्याला स्वतःच स्वतःला वाचवायचं असतं. त्याचं संकटातून विमोचन करायला कोणीच येणार नसतं. नास्तिक दुःखी होईल, निराश होईल पण ‘कुणीतरी वाचवा’ अशा शरणार्थी परावलंबी मानसिकतेत जाणार नाही. हा एक वेगळाच साक्षात्कार मला झाला. असो. त्यामुळे माझी व्यक्तिरेखा रामानुजम् सारख्या दैवी चमत्कारावर श्रद्धा ठेवणाऱ्या गणितज्ञाला आदर्श मानणारी होत गेली.

या पूर्वतयारी नंतर जेव्हा मी त्या ‘मढी’ रूपी प्लॅटफॉर्मवर किंवा रस्ता-रूपी जमिनीवर, कल्पित नदीजवळ नुसतं उभं राहू लागलो, तरी मला ‘त्या माणसा’ सारखं वाटू लागलं. समोरून होणारं अज्ञात आक्रमण, वाटणारी अनाम भीती या गोष्टी आता ‘त्या माणसाच्या’ खऱ्या-खऱ्या होत्या. मी आता काहीतरी हावभाव करून दाखवणार नव्हतो. तर मी ‘त्या माणसाच्या’ अंतरंगातून, त्या माणसाच्या इतिहासासहित ‘वागू’ लागणार होतो. आता माझी कुठलीच भावना ‘पोकळ’ नव्हती. दररोजच्या तालमीत त्यात रंग भरू लागले. गिरी त्याला रंगमंचीय आविष्काराच्या चौकटीत बांधू लागला. कधी सौम्य तर कधी उत्कट अशा सादरीकरणापर्यंत मला नेऊ लागला. अर्थात हे सोपं नव्हतं. आणि अजूनही नाहीच. पण आता मी या ‘खेळात’ भाग घ्यायची पूर्वतयारी पूर्ण करून उभा होतो. एक अभिनेता म्हणून मनात येणारी भावना, तयार होणारा अनुभव उत्तम प्रकट करण्यासाठी अभिनेते स्वतःला- स्वतःच्या शरीर आणि मनाला- अनेक वर्षं एखादं वाद्य ‘ट्यून’ करावं तसं तयार करत असतात. त्यांना ते ‘हुकमी’ जमतं. मी ते अनेक वर्षं केलंच नव्हतं. त्या अर्थाने मी नवखा होतो. पण दिग्दर्शकाच्या मते काही वेळा ‘तयार’ अभिनेत्याकडे ‘मारून नेण्याचा’ आगाऊपणा असू शकतो- तो माझ्याकडे नसल्यामुळे प्रामाणिकपणा हा जो एकमेव मार्ग मी पत्करला होता, तो त्याला आवडत होता. मी अयशस्वी होईन पण खोटा ठरणार नाही- ही खात्री तो मला देत होता! संवाद पाठ करता येतात पण भावना पाठ करता येत नाहीत! क्षणोक्षणी नेमकं वाटत जाण्याची आणि ते अभिनयातून व्यक्त करत जाण्याची तालीम ही प्रक्रिया खूप बिकट आणि किचकट होती. म्हणूनच आव्हान देणारी आणि शोध घेत घेत अंतर्मुख करणारी होती.

या नाटकातली माझी व्यक्तिरेखा एका पुरुषाची होती. त्याच्या संशोधनातून आलेल्या विशेष ज्ञानातून त्याला आलेला एकटेपणा हा त्याला जवळजवळ वेडाच्या पातळीवर घेऊन जातो. बनारसच्या पार्श्वभूमीतून त्याला एक धार्मिक अधिष्ठान मिळत तो गंगेकिनारी एक मढीमध्ये सर्वसंग परित्याग करून राहू लागतो. ही प्रक्रिया समजून घेताना एकीकडे मला मानसिक आजारी आणि दुसरीकडे अध्यात्माची ओढ बाळगत विरक्त होत गेलेले असे दोन्ही प्रकारचे पुरुष आठवू लागले. स्त्री ही जात्याच कुटुंब, संसार, नातेसंबंधांचे पाश यांना मानणारी असते, त्यात मनोभावे अडकणारी असते तर पुरुष सतत त्यातून सुटण्याचा प्रयत्न करणारा, भटकणारा असतो- अशी एक साचेबद्ध सामाजिक धारणा आहे. ती खरंच खरी आहे का? हे मानवजातीने तपासून पाहिलं आहे का? विनोबांनी स्थापन केलेल्या पवनारच्या ब्रह्मविद्या आश्रमात मी सुमित्रासोबत सह-अभ्यासक म्हणून गेलो होतो. ‘स्त्रियांमधून शंकराचार्य निर्माण व्हायला हवेत’ असं विनोबा म्हणत. सर्वसंग परित्याग करून अध्यात्माचा अंतिम शोध घेण्याची प्रेरणा घेऊन बेभानपणे विरक्त होऊन एकच ध्यास घेतलेली स्त्री का नाही निर्माण होत- अशी सल विनोबांना होती. त्याचीही आठवण झाली. खरंच, पुरुष सहजगत्या घरदार त्यागून निघून जातो. स्त्री असं करताना आढळत नाही. ती असं करायला घाबरते की ती अधिक जबाबदार असते? आध्यात्मिक शोधासाठी का होईना पण सर्व पाश सोडून देणं बाईला नको वाटतं- ही तिची कमतरता आहे की तीच तिची ताकद आहे? पुरुषांनी घर-संसार, आयुष्यातली स्त्री हे आपल्या मार्गातले अडथळे आहेत असं मानलं तर त्याला समाज कौतुकाने स्वीकारतो. पण असं एखाद्या स्त्रीने केलं तर तिला तसा सन्मान मिळेल का? साध्वी स्त्रिया किंवा स्त्री-संत विविध धर्मात झाल्याच नाहीत असं नाही. पण ते अगदी तुरळक अपवाद आहेत असंच आजही आपल्याला का वाटतं? का असं आहे की, स्त्री ही संसारात राहून कर्तव्य बजावत बजावत तिची आध्यात्मिक उन्नती साध्य करत असते आणि आपणच समाज म्हणून तिला ते स्थान देत नाही? अनेक प्रश्न! एकटं भटकणारा पुरुष सहज आढळेल पण स्त्री आढळणार नाही - याचं एक कारण एकट्या स्त्रीला असणारी, तिच्यावर होणाऱ्या आक्रमणाची, बलात्काराची भयानक भीती हेच आहे? मग हे समाज म्हणून मानव-जातीचं केवढं मोठं अपयश आहे. रस्त्यावर दिसणारी एक प्रकारे वेडसर स्त्री ही अनेकदा मोठं वाढलेलं पोट घेऊन फिरताना दिसते-हे किती विदारक सत्य आहे! मी माझ्या व्यक्तिरेखेला वाटणाऱ्या अनामिक भीतीचा शोध घेताना ही बलात्काराची, शरीरावर अत्याचार होण्याची भीती माझ्या मनातही न डोकावणं हा माझा किती मोठा पुरुषी प्रिव्हीलेज आहे, हे मला ध्यानातही आलं नाही! इंजिनियरिंगचे प्राध्यापक असणाऱ्या अत्यंत व्यवहारी अशा माझ्या वडलांनी वयाच्या एका टप्प्यावर ध्यान-धारणा आणि आध्यात्मिक शोधाची दिशा पत्करली. आई मात्र शेवटपर्यंत तिच्या भोवतालाशी घट्ट नाळ ठेवून जमिनीवर पाय ठेऊनच होती. या दोघांच्या या आपापल्या अंतःप्रेरणांकडे मी स्त्री-वादी दृष्टिकोनातून आज कसं पाहू? माझ्या या घर सोडून विजनवास स्वीकारलेल्या व्यक्तिरेखेकडे मी त्रयस्थपणे पहाताना मला नेमकं काय गवसतं आहे? एक-ना-दोन हजार प्रश्न. एकाच वेळी ‘मी या विश्वाची चिंता करतो आहे’ हा अहंगंड आणि त्याच वेळी ‘मला कोणीतरी काहीतरी करेल’ याचं अपरिमित भय वाटण्याचा न्यूनगंड या कात्रीत सापडलेला आणि खचलेला हा माणूस देहबोलीतून दाखवताना नेमका कसा दाखवावा? मी नेहमी शरीराने ताठ असतो. पण याचं बिचारं वाकलेपण मला स्वतःत आणण्यासाठी कोणती मोडतोड करावी लागेल? माझ्या डोळ्यांत टचकन पाणी येतं. पण ते छोटे छोटे आनंदी क्षण अनुभवताना किंवा दुसऱ्या कुणाचं दुःख अगदी नाटक-चित्रपटात बघताना. पण स्वतः दुःखी होऊन, असहाय होऊन कधी मला रडू येत नाही. एक पुरुष म्हणून मला माझ्या रडण्याच्या क्षमतेचा अभिमान वाटतो. तरीही माझ्या अश्रूग्रंथी सहज वहायला तयार नसतात. एक पुरुष म्हणून मला या सगळ्यावर काम करायचं होतं. ‘देवराई’च्या वेळी पाहिलेल्या मनोरुग्ण व्यक्तींमध्ये मी असं वाकलेपण पाहिलं होतं. तेही संचित मनात होतं. तो आध्यात्मिक एकटेपणा, ती वेडसर असहायता, ते नाकारलं गेल्याचं दुःख एक सामान्य पुरुष म्हणून माझ्या वाट्याला कधी आलंच नव्हतं. मला ते आत्मसाध्य करायचं होतं.
माझा सहकलाकार ओंकार अभिनेता म्हणून माझ्यापेक्षा अनुभवी. पण तोही याच प्रक्रियेतून जात होता. त्याची व्यक्तिरेखा तो त्याच्या पूर्वपीठिकेचा आधार घेत उभी करत होता. तोही या आगळ्या-वेगळ्या प्रक्रियेला समर्पित होण्याचा प्रयत्न करत होता. आयुष्याच्या दोन वेगळ्या टप्प्यावरच्या पुरुषांची ही कहाणी. त्यांचे एरवी स्वतंत्र असणारे मार्ग एकमेकांना छेद देऊ लागल्यावर काय होत जातं - हे आम्ही समजू पहात होतो. या नाटकात स्त्री पात्र नाही. पण तरीही हे नाटक पुरुषी आहे, असं मला वाटत नाही. उलट या दोन पुरुषांची ती तगमग पहाताना कदाचित त्या (नाटकात अनुपस्थित असणाऱ्या) स्त्री-तत्त्वाची आम्हाला दोघांनाही सतत आठवण येत होती! आम्ही दोघंही स्त्री-वादी जागरूक पुरुष असल्यामुळेही असेल, कदाचित! मग यात संगीत, प्रकाश-योजना, नेपथ्य येत गेलं आणि आम्ही आमच्या स्वतःच्या शोधातून सापडलेल्या व्यक्तिमत्त्वासह त्या साऱ्याला प्रतिसाद देत राहिलो.

‘मढी’ चे ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये पाच प्रयोग झाले. नाटकाच्या निःशब्दपणामुळे अनेक प्रेक्षकांना मुक्त वाटलं, अनेकांना भरकटल्यासारखं वाटलं, काहींना रागही आला, काहींना पुरेसे दिशादर्शक न मिळाल्याचं असमाधान वाटलं, काहींना समोरचे प्रसंग सोडून वेगळीच प्रतीकं शोधाविशी वाटली, काहींना अगदी आमच्या मनात असलेलं कथानक उमगलं तरीही काहीतरी निसटल्यासारखं वाटलं... या संमिश्र प्रतिसादात एक समाधान होतं- बहुसंख्य लोकांना आम्ही दोघंही कलाकार जीव तोडून काहीतरी सांगू बघतोय, ते पकडून ठेवणारं तरी वाटलं. ‘मढी’ चे अजूनही काही प्रयोग होत राहतील. लेखक-दिग्दर्शक म्हणून गिरी आणि आम्ही इतर सारे येणाऱ्या प्रतिसादांचा विचार करत काही बदलही करू.

‘शेवटच्या प्रॉडक्टपेक्षा प्रक्रिया महत्त्वाची’ हे एक वापरून वापरून अती गुळगुळीत झालेलं नाणं आहे. इथे शेवटचं प्रॉडक्टदेखील प्रत्येक प्रयोगात नव्याने उलगडत जात रहाणार आहे. त्या अर्थाने प्रक्रिया कधी संपणारच नाही. जेव्हा प्रक्रिया अत्यंत ‘खऱ्या’ वृत्तीने केली जाते तेव्हा त्याचं प्रतिबिंब शेवटच्या कलाकृतीला ‘खरं’ बनवण्यात होतंच होतं. आणि शिवाय प्रक्रियेचा अपरिमित आनंद. आज ‘मढी’ च्या निमित्ताने मला अभिनेता म्हणून जी अंतर्मुख शोधाची प्रक्रिया अनुभवता आली ती मला माणूस म्हणूनही समृद्ध करणारी वाटते. चित्तरंजन गिरी, धन्यवाद, या अनोख्या प्रक्रियेसाठी. आता मी तयार आहे, अभिनेता म्हणून नवनव्या आव्हानांना सामोरं जायला- आणि उत्सुकही!!