नातेसंबधाच्या रूढ चौकटीपलीकडचं प्रेम : LOVE IS LOVE

१६ मार्च २०२६

LGBTQIA+ या विषयाकडे आजही आपल्या समाजात संकोच, गैरसमज आणि थोड्या अंतरावरून पाहण्याची सवय दिसते. पण अशा विषयांवर संवेदनशीलपणे आणि उघडपणे बोलणारे साहित्य समोर आले की संवादाची नवी दारं उघडतात. परिवर्तन हवं असेल तर निर्णय घ्यावे लागतात ही जाणीव मनात ठेवून लिहिलेल्या एका कादंबरीविषयीचा हा लेख आहे. हा लेख आनंदवन, वरोरा येथे कार्यरत असलेले दीपक शिव यांनी लिहिला असून वाचकांना या विषयाकडे नव्या नजरेने पाहायला लावणारा आहे.

LGBTQIA+ हया विषयावर लेखिकेने लिहिलेलं पुस्तक खरंच खूप काही शिकवून जातं..परिवर्तन हवं असेल तर निर्णय घ्यावे लागतात… हे वाक्य या पुस्तकाची विण घट्ट पकडून ठेवते.

या पुस्तकाचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे ते लेबल्सच्या पलीकडे जातं. कादंबरीत आपल्याला दोन व्यक्तिरेखा भेटतात, या दोघींचे भावविश्व व अंत:करणातली अस्वस्थता साकारताना लेखिकेचा पुरोगामी विचारप्रवाह विषयाशी एकरूप होतो म्हणून परंपरा आणि जुन्या रूढीवादी दृष्टिकोन पुढे ठेऊन लिखाण केले आहे. लेस्बियन, ट्रान्सजेंडर, लैंगिक अत्याचार या विषयी लेखिकेने आपले विचार मांडले आहेत. समाजामध्ये लेसबियन, गे या विषयावर प्रगल्भ चिंतन कुठेच आढळून येत नाही. सोशल मिडीयावर काही ग्रुप्स एक्टिव्ह दिसतात... अशा विषयावर लिहिणे म्हणजे खरंच लेखिकेचे कौतुक वाटतं.

कादंबरी वास्तवदर्शी असली तरी काही वळणावर ती रहस्यमयी वाटते. यात जी वर्णने आलीत ती जशीच्या तशी डोळ्यासमोर दिसायला लागतात हे वैशिष्ट्य लेखनातून लेखिकेने जपले आहे.

कादंबरी २०० पृष्ठावर संपत असली तरी त्यातील विषयाचे गांभीर्य लक्षात घेता मानवी मूल्यजपणारी अभ्यासपूर्ण ग्रंथसंपदा आहे. कादंबरीतील विविध प्रसंगात ललित लेखनाची एक तरल कांती रोमँटिक मुड निर्माण करते. डॉ. सबिहा सेक्स आणि रिलेशनशिप कोच यांचा मिळालेला ब्लर्ब पुस्तकाच्या उंचीची ग्वाही देतो..

ही कादंबरी समाजप्रबोधन करणारी असून, आजच्या विचारसरणीच्या संधिकालाच्या सीमारेषेवर ऊभी असणार आहे. ती वाचकाला कदाचित रहस्यमय वाटेल, ती त्याच्या विचाराचं संक्रमण सक्रिय करण्यास भाग पाडेल असं वाटतं म्हणूनच आवर्जून ती वाचायला हवी.