घरापासून लांब राहताना…
घरापासून पहिल्यांदाच लांब राहताना मनात भीती, घरच्यांची आठवण आणि स्वतःला नव्याने शोधण्याचा प्रवास सुरू होतो. नवीन माणसं, नवीन जागा, स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि रोजचे छोटे-मोठे निर्णय आपल्याला नकळत घडवत असतात. भक्ती ज्योती राजेंद्र हिने तिच्या फेलोशिपच्या निमित्ताने घरापासून दूर राहताना आलेले अनुभव, सुरुवातीची हुरहूर आणि हळूहळू वाढत गेलेला आत्मविश्वास या लेखातून मांडला आहे. घरापासून लांब राहणं म्हणजे फक्त घर सोडणं नाही, तर स्वतःशी नव्याने ओळख करून घेत स्वतंत्रपणे जगायला शिकणं, हे तिच्या अनुभवातून समोर येतं.
घरापासून लांब राहणाऱ्या किंवा राहिलेल्या प्रत्येकाला माझा हा अनुभव नक्कीच जवळचा वाटेल. मी काही महिन्यांपूर्वीच एका दोन वर्षाच्या फेलोशिपसाठी घरापासून पहिल्यांदाच लांब राहायला आली आहे. घर सोडण्याआधी मनात प्रचंड भीती होती. अनोळखी जागा, अनोळखी माणसं, सगळंच नवीन असणार होतं. एकटी हे सगळं निभावून नेऊ शकेल का? हा प्रश्न सतत डोक्यात घोळत होता पण आज काही महिने उलटल्यावर मागे वळून बघते तेव्हा जाणवतं की ती भीती हळूहळू विरत गेली आणि तिच्या जागी आता उत्साह आणि आत्मविश्वास भरून गेला आहे.
भीती असली तरीही मी पहिला आठवडा अगदी मजेत होते. नवीन फेलोशिप, नवीन माणसं, सगळं इतकं भरगच्च होतं की घरची आठवण यायला वेळही मिळत नव्हता. मला वाटलं आपण घरापासून लांब राहणं इतकं सोपं आहे तर! पण मग दुसरा आठवडा सुरू झाला. हळूहळू आईच्या हातच्या जेवणाची आठवण यायला लागली. लहानपणापासून मी कधीच घरापासून लांब राहिले नव्हते आणि आता 23 व्या वर्षात घरच्यांपासून लांब राहणं जड चाललं आहे. आईची आठवण एवढी तीव्र झाली की मी अनेकदा तिच्याशी फोनवर बोलणं ही टाळते कारण तिचा आवाज कानावर पडला की कंठ दाटून यायचा. जे अंतर मी शब्दांत मांडू शकत नव्हते, ते तिच्या नुसत्या ‘हॅलो’ म्हणण्यातच जाणवायचं.
त्यामुळे बोलणं सोपं करण्याऐवजी मी ते टाळणंच पत्करलं, जणू आवाज न ऐकला तर अंतर तितकं खरं वाटणार नाही. घर सोडण्यापेक्षाही जास्त कठीण गोष्ट म्हणजे स्वतःला बदलावं लागणं. मी अशी मुलगी आहे जिने कधी फार मित्र - मैत्रिणी जमवले नाहीत, जास्त गर्दीत, जास्त माणसांत राहिली नाही. एकटं राहणं, आपल्याच विश्वात रमणं हेच मला नेहमी सोयीचं वाटत आलं. Gen Z शब्द सांगायचा झाला तर मी introvert आहे पण आता मात्र हळूहळू उलट्या दिशेला चालली आहे. मजा तर येतच आहे पण चुका होणं ही स्वाभाविकच आहे. कधी बोलण्यात, कधी वागण्यात पण त्या कळत नकळत झालेल्या चुका सुधारणं महत्त्वाचं जे मी वेळीच करत आली आहे.
एक निर्णय मी मुद्दामच घेतला होता की इकडे येताना माझी दुचाकी सोबत आणलीच नाही. घरी असताना प्रत्येक प्रवास मी स्वतःच्या गाडीवरच केला होता, सार्वजनिक वाहतुकीने क्वचितच प्रवास केला होता. गाडी सोबत नसणं म्हणजे एक प्रकारे मीच स्वतःला नव्या गोष्टी शिकण्यासाठी भाग पाडलं. आता हळूहळू बसने, मेट्रोने प्रवास करायला शिकतेय.
बाहेर राहायला आल्यापासून माझ्यातले काही वेगळेच पैलू मला नव्याने उमगत आहेत. घरी असताना क्वचितच स्वयंपाक केलेली मी, इथे रूममेट्ससोबत मिळून रोज काहीतरी वेगळा पदार्थ करून बघत आहे. कधी तो पदार्थ फसतो, कधी यशस्वी होतो पण त्यातली मजा वेगळीच असते. वेगवेगळे स्वभाव, वेगळी खाद्यसंस्कृती, वेगळं जन्मगाव, वेगळी शैली असलेल्या माणसांसोबत एकत्र राहताना, काम करताना रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतंय आणि त्यांच्याशी जुळवूनही घ्यावं लागतंय. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पैसे कसे सांभाळायचे, कशाची खरंच गरज आहे आणि कशावर खर्च टाळायचा हेही नव्याने शिकतेय, लहान - मोठे निर्णय घेतेय. आता वाटतं, या दोन वर्षांत रोज घेतलेल्या या छोट्या निर्णयांमधून माझी निर्णयक्षमता आपोआपच घडत जाईल आणि ती फक्त इथल्या आयुष्यापुरती मर्यादित न राहता, पुढेही माझ्यासोबत राहील.
समाजशास्त्राच्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक परस्परावलंबन वाचण्यात आलेलं होतं आणि ते आता प्रत्यक्ष कृतीतही येतंय. परस्परावलंबित्व पुस्तकात वाचणं वेगळं आणि रोज त्याच्यासोबत जगणं वेगळं. घरापासून लांब राहणं म्हणजे फक्त घर सुटणं नाही ते म्हणजे आपण स्वतःशी नव्याने ओळख करून घेणं. जुनं सुरक्षित जग मागे ठेवून नव्याने स्वतःला घडवणं हीच स्वतःची प्रगती नव्हे का!
भक्ती ज्योती राजेंद्र, पुणे bhakti25113@gmail.com