‘ऐका’ म्हणजे मुलं-मुली बोलतील!
मुलांना घडवायचं असेल, तर आधी त्यांचं मन समजून घ्यायला आणि त्यांचं म्हणणं मनापासून ऐकायला हवं, हे शोभा भागवत यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं. मुलांच्या निरागस प्रश्नांना, हट्टांना, रागाला आणि प्रामाणिक मतांना मोकळेपणाने व्यक्त होता यावं, असा निर्भय अवकाश त्यांनी बालभवनमध्ये निर्माण केला. १९८५ मध्ये बालभवनची जबाबदारी स्वीकारल्यापासून मुलांचं भावविश्व, त्यांचं स्वातंत्र्य, सर्जनशीलता, समता आणि आनंद यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी शिक्षणाची एक वेगळी वाट घडवली. मुलांबरोबरच पालक आणि ताईंचं शिक्षण, खेळ, गोष्टी, गाणी, कला आणि संवाद अशा विविध माध्यमांतून त्यांनी बालशिक्षणाला नवा आयाम दिला. शोभा भागवत यांचा हा समृद्ध जीवनप्रवास, त्यांचे विचार, अनुभव आणि बालभवनच्या जडणघडणीची गोष्ट सांगणारं ‘झऱ्यातलं आकाश’ या पुस्तकाचा वेध घेणारा संवेदनशील अभ्यासू सामाजिक कार्यकर्त्याअरुणा बुरटे यांचा हा लेख!
एकरूप होऊन सातत्याने लहानग्यांचा हळुवार कानोसा घेणारे तरल विचारी मन असणाऱ्या शोभा भागवत यांना बालविश्व कसं उमगलं आणि ते संपन्न होण्यासाठी त्यांनी काय केलं याचा चरित्रात्मक पट म्हणजे ‘झऱ्यातलं आकाश’ हे पुस्तक!
मुलं/मुली शोभा भागवत यांच्याशी काय काय बोलली बरं?
तीन वर्षांच्या मुलीनं आईचं चित्र काढलं. कान काढले नाहीत. विचारल्यावर म्हणाली, ‘कुठे ऐकते ती? तिला काय करायचेत कान!’. एका मुलानं वडिलांचं चित्र काढलं होतं. वरती पाऊस दाखवला होता. म्हणाला, ‘घरी फार त्रास देतात, म्हणून त्यांना पावसात उभं केलं आहे’. एकदा दहीहंडी प्रायोजित केल्याने मुला/मुलींना खापराचे तुकडे नेहमीप्रमाणे घरी नेता आले नाहीत. हे न आवडल्याने ‘अशी चूक करायची नाही’ असं मुला/मुलींनी थेट येऊन सांगितलं.
एका मुलानं शोभा यांच्या पाठीवर हात मारून सांगितलं होतं, ‘आता आईला सांगतो की, ‘शी इज माय बेस्ट फ्रेंड!’ असं अनमोल प्रशस्तिपत्र सहज बहाल केलं होतं. एका मुलीनं डायरीत लिहिल होतं. ‘शोभाताई आम्हाला नेहमी सांगतात पानं, फुलं तोडायची नाहीत आणि आज स्वतःच बारतोंडीचं फळ त्यांनी तोडलं. हे मला अजिबात आवडलं नाही.’ अशी नोंद वाचल्यावर शोभाताई म्हणाल्या, ‘अगं फळ खूप उंच, वर होतं. तुम्हा सर्वांना नीट पाहता यावं म्हणून मी एक तोडलं. पण तुला जे वाटलं ते तू मोकळेपणाने लिहिलंस हे मला छान वाटलं.’
या उदाहरणातून दिसतो तो मुला/मुलींना मिळालेला निर्भय अवकाश. एरवी प्रौढांना अस्वस्थ करू शकणारी लहानग्यांची प्रामाणिकता येथे सहज स्वीकारली जाते. हा अवकाश अपघाताने निर्माण झालेला नाही. संचालक म्हणून १९८५ मध्ये ‘बालभवन’ची जबाबदारी स्वीकारताना शोभा भागवत यांच्याकडे संपन्न अनुभवाची शिदोरी होती. लहानपणी मिळालेलं निर्व्याज प्रेम; इंग्रजी, मराठी, संस्कृत या विषयात पदव्युत्तर शिक्षण; मोठ्या भावाच्या मित्राशी केलेली पत्र-मैत्री, प्रेम आणि एकटीने अमेरिकेत जाऊन नोंदणी पद्धतीने केलेला विवाह; जोडीदाराबरोबर केलेला विविध देशांचा प्रवास; शोनिल आणि आभाचं संगोपन; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेत अनेक नावाजलेल्या शिक्षणकर्मींच्या सोबत काम करताना प्रौढ शिक्षणासाठी साहित्य निर्मिती; आवारातील बांधकामावर असणाऱ्या बायांचं शिक्षण करण्याची ऊर्मी; त्यांच्यासोबत विटा डोक्यावर वाहून नेण्याचा प्रयोग करताना, प्रौढ शिक्षणाचे आपले प्रयोग त्यांच्यासाठी उपयोगाचे नाहीत याची उमज; ब्राझीलच्या प्रशिक्षणात शिक्षणतज्ज्ञ पाओलो फ्रेरे यांनी कामगारांच्या शिक्षणासाठी केलेल्या प्रयोगाची ओळख; व्यापक सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींशी मैत्री; ‘स्त्रीवाणी’ या संस्थेत सहकाऱ्यांवर विश्वास टाकणं आणि अधिकाराचा रुबाब न दाखवणं अशा स्त्रीवादी व्यवस्थापनाचा अनुभव; ‘उदार आणि सोशिक पालकत्व’ या पालकशिक्षण वर्गातील सहभाग हे आणि असे कितीतरी पदर त्यांच्या विचारविश्वाचा भाग झाले होते. त्यांच्या शिक्षण व्यवहाराचा वैचारिक वारसा एका बाजूला युगप्रवर्तक महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि दुसऱ्या बाजूला गिजुभाई बधेका, ताराताई मोडक, जे.पी. नाईक आणि चित्रा नाईक, समरहिलचे नील, अरविंद गुप्ता यांच्यासारख्या शिक्षणकर्मींचा होता.
१९७९ हे आंतराष्ट्रीय बालक वर्ष जाहीर होणं; पुणे महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून देणं; देणगीदार म्हणून उद्योजक आबासाहेब गरवारे यांनी पुढे येणं; संवेदनशील, कल्पक, सर्जनशील, मुला/मुलींवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असतांना डॉ. श्यामला वनारसे यांना ती क्षमता शोभा भागवतमध्ये आहे असा विश्वास वाटणं इत्यादी परिस्थितीजन्य अनुकूल घटकांतून १-९-१९८५ रोजी ‘बालभवन’ आकाराला आलं. या प्रक्रियेत व्यक्ती आणि व्यवस्था परस्परांना घडवत गेल्या आणि एक इतिहास घडला! साध्या वाटणाऱ्या पण गाभ्याच्या गोष्टी सुरुवातीपासूनच ‘बालभवन’मध्ये शोभा भागवत यांनी रुजवल्या. मस्टरवर नावं लिहिताना नावांचा क्रम विचारला असता शोभाताई म्हणाल्या, ‘एका रेघेवर सगळी नावं लिहिता येत नाहीत म्हणून क्रम ठरवावा लागतो. नाहीतर आपण सगळ्या सारख्याच आहोत.’ मुलं/मुली गोलात उभी राहिल्याने ती एकमेकांना दिसतील, एकमेकांकडून शिकतील, मैत्री करतील. ‘स्कूल’ या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ आहे ‘निवांतपणा’. तो साकारण्यासाठी छडी आणि शिट्टी या दोन्ही गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक दूर ठेवल्या. स्पर्धा आणि द्वेषाला जवळ फिरकू दिलं नाही. विशेष क्षमता असणाऱ्यासह, सर्व आर्थिक स्तरातील आणि जाती-धर्मातील मुला/मुलींना सामावून घ्यायचं असल्याने फी कमी ठेवली. बहुधर्मीय प्रार्थनांच्या समावेशातून वैश्विक भान जोपासले. एखाद्या मुलाला राधा आणि मुलीला कृष्ण व्हायचं असलं तरी चालेल, हे सांगितलं. तसं कोणी केलं नाही तरी तो संदेश सर्वांपर्यंत दिला. आपण मुला/मुलींशी प्रेमाने आणि समजुतीने वागलं तर त्यांचं भविष्य ते घडवतील यावर विश्वास ठेवला.
अनेक ‘बालभवनं’ सुरू करण्याची गरज आहे, हे ओळखून तायांसाठी १५ दिवसांचं प्रशिक्षण आखलं आणि अमलात आणलं. प्रशिक्षणात व्यायाम, खेळ, गाणी, गोष्टी, हस्तकला, चित्रकला, नृत्य, अभिनय अशा आठ माध्यमांची निवड विचारपूर्वक केली. त्याच्याच जोडीने पालकांचं शिक्षण सुरू केलं. साधेपणाने कार्यक्रमाची आखणी आणि सादरीकरण करताना ड्रेपरी, सजावट मुलांच्या मदतीने करण्यावर त्यांचा भर असे. संमेलनात चित्रपटांतील तयार गाणी न घेता तायांना नवनिर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं. मुलं/मुली वाढत असताना आपणही आपोआप वाढतो. संचालक पदावरून संवादातून विश्वास दाखवत व्यवस्थापन केलं. ताया आनंदी असणं मुला/मुलींच्या आनंदासाठी अत्यंत अनिवार्य गोष्ट आहे हे ओळखलं. त्यामुळे बालभवनमधील मुला/मुलींच्या बरोबर स्वतःची मुल/मुली समजून तायांना वागता येतं. प्रत्येक मुला/मुलीच्या बाबतीत विशिष्ट असणाऱ्या मैत्रीच्या क्षणाची वाट पाहिली. सर्वांशी प्रेमाने आणि विश्वासाने वागण्याची संस्कृती जोपासली. संस्थारूप काम प्रवाही ठेवलं. उत्तम प्रशिक्षण झाल्यावर एखादीने जर काम सोडलं तर नाराज न होता शोभाताई म्हणायच्या, ‘ती कुठेही गेली तरी चांगलंच काम करेल.’
शिक्षणकर्मी अरविंद गुप्ता यांच्याबरोबर काम करताना ‘दिवास्वप्न’, ‘प्रिय बाई’, ‘बहुरूप गांधी’, ‘मूल सर्व गावाचं’ ही पुस्तकं शोभाताईंनी रूपांतरित केली. त्यांनी बालमनाचा कानोसा घेणारी अनेक पुस्तकं लिहिली. सुरुवातीपासून शोभा भागवत यांनी वर्तमानपत्रं, मासिकं यामध्ये सातत्याने लिखाण केलं. बालभवनमध्ये १५००० पुस्तकांचं वाचनालय सुरू केले. संस्थेचं प्रकाशन ‘कजा कजा मरू’तर्फे ५० महत्त्वाची पुस्तकं मराठीतून प्रकाशित केली.
जेव्हा जेव्हा बालभवनची जागा इतर प्रकल्पासाठी वळवण्याचे प्रयत्न झाले तेव्हा तेव्हा समाजातील सुज्ञ, सुविचारी, मुला/मुलींवर प्रेम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती, पालक बालभवनच्या बाजूने उभी राहिली. लहान मुला/मुलींसाठी असलेलं काम समाजाचं होण्याचं हे एक आगळं उदाहरण आहे. संस्थेला पुढील ३० वर्षाची मुदत वाढवून मिळाली आहे. परदेशी पाहुणे आवर्जून बालभवनला भेट देतात. बालभवनच्या कामाची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.
बालभवनपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या मुला/मुलींसाठी पुण्यातील प्रत्येक वस्तीमध्ये शिबिर घेणे; वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांनी मिळून केलेल्या फेडरेशनतर्फे दरवर्षी बालदिनाचं नियोजन करणे; विविध विचारसरणींच्या व्यक्तींबरोबर संवाद ठेवणे या सगळ्यातून बालभवनचं काम अनेक अंगाने चौकटीबाहेर विस्तारत गेलं. शोभा भागवत यांची व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यातील एकरूपता जवळच्या नातेवाईक आणि सहकारी या दोघांनी व्यक्त केलेल्या आठवणींतून प्रत्ययाला येते. एकदा व्यायाम घेताना एक मुलगा ताईला हसत म्हणाला, ‘चला ताई, आपण विनोदी व्यायाम करू या’. ‘म्हणजे कसा?’ तो म्हणाला, ‘आपले व्यायाम पाहून दुसऱ्यांना हसू आलं पाहिजे’. मग त्याने सांगितले तसे विनोदी व्यायाम सगळ्यांनी केले!
मुला/मुलींचं ऐकण्याने त्यांचं भावविश्व उमलण्याचा सिलसिला ‘बालभवन’मध्ये प्रवाही राहिला. शोभा भागवत यांना गवसलेलं ‘झऱ्यातलं आकाश’ संपादक अंजली मुळे आणि विशेष साहाय्य करणाऱ्या आभा भागवत यांनी पुस्तकातील तीन भागातून कौशल्याने मांडलं आहे. विविध लेखकांचे लेख असूनही पुस्तकाचा संवादी प्रवाह टिकून राहिला आहे. विवेक सावंत यांची नेमकी आणि नेटकी प्रस्तावना विषयाचा आवाका मांडते. स्पर्धा आणि द्वेषाने ग्रासलेल्या वर्तमान काळात, ‘बालभवन’सारखं काम सातत्याने प्रवाही राहण्यासाठी समाजाची सजग साथ आवश्यक आहे. त्यासाठी अर्पण पत्रिकेतील शोभा भागवत यांचे मोलाचे विचार सोबत करतील.
आई बाबांनो मुला/मुलींसाठी हे करू नका:
दुर्लक्ष, धमक्या देणं, तुलना, परस्पर निर्णय घेणं, शिक्के मारणं, रागावणं, मारणं आणि उगाच सांत्वन करणं.
झऱ्यातलं आकाश – मुलांचं भावविश्व जाणणाऱ्या शोभा भागवत संपादक - अंजली मुळे विशेष साहाय्य – आभा भागवत प्रकाशक : अमलताश बुक्स, पुणे पृष्ठसंख्या ३०४ किंमत रु.४००/-
- अरुणा बुरटे, पुणे
aruna.burte@gmail.com