कर्मयोगी रसायनशास्त्रज्ञ डॉ. असिमा चॅटर्जी

'श्रम हीच पूजा हे तत्त्व पाळत जिवंत असेपर्यंत माझी काम करण्याची इच्छा आहे' असा निर्धार व्यक्त करणाऱ्या विख्यात रसायनशास्त्रज्ञ डॉ. असिमा चॅटर्जी यांचा परिचय या लेखातून करून घेऊ. डॉ. इंद्र नारायण मुखर्जी आणि कमलादेवी या बंगाली दांपत्याचे हे पहिले अपत्य. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर, १९१७ रोजी कलकत्ता (आता कोलकाता) येथे झाला. पेशाने डॉक्टर असले तरी मुखर्जी यांना वनस्पतीशास्त्रात, विशेषतः औषधी गुणधर्म असणाऱ्या देशी वनस्पतींचा अभ्यास करण्यात विशेष रस होता. हेच बाळकडू असिमा यांना बालपणी मिळाले. पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या संशोधनाचा पाया त्यांच्या बालपणीच घातला गेला. १९३२ मध्ये असिमा बंगाल सरकारची शिष्यवृत्ती मिळवून 'बेथून कॉलेजिएट स्कूल' मधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. १९३६ मध्ये 'स्कॉटिश चर्च कॉलेज' मधून त्यांनी बसंती दास सुवर्णपदकासह पदवी प्राप्त केली. स्कॉटिश चर्च कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागातील त्या एकमेव विद्यार्थिनी. त्या काळी मुलींसाठी विज्ञान संशोधनच काय, महाविद्यालयीन शिक्षणही वर्ज्य मानले जात असे. असिमा एका सनातनी हिंदू परिवारातून आल्या होत्या. त्यांच्या उच्च शिक्षण घेण्यावर घरातील ज्येष्ठांनी हरकत घ्यायला सुरुवात केली. तेंव्हा असिमांच्या आई आपल्या मुलीमागे खंबीरपणे उभ्या राहील्या. त्यांचे वडील डॉ. मुखर्जीही पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी आपल्या मुलीला उच्च शिक्षण घेण्यासाठी नेहमीच प्रेरित केले. असिमांनी १९३८ मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. या परीक्षेतही त्या द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आणि कलकत्ता विद्यापीठाचे रौप्यपदक आणि जोगमाया देवी सुवर्णपदक त्यांनी प्राप्त केले. पदव्युत्तर पदवीसाठी त्यांनी 'कार्बनी रसायनशास्त्र' या विषयाचा विशेष अभ्यास केला. त्यांनी डॉ. प्रफुल्लकुमार बोस यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन सुरु केले.

आचार्य डॉ. प्रफुल्लचंद्र राय आपल्या वेतनातून विद्यापीठाला देणगी देत असत. यातूनच त्यांनी असिमांना पाठ्यवृत्ती मिळण्याची व्यवस्था केली. त्यांचे संशोधन वनस्पतीजन्य नैसर्गिक पदार्थांचे रसायनशास्त्र आणि कृत्रिम सेंद्रिय रसायनशास्त्र या विषयावर होते. त्यांनी प्रामुख्याने अल्कलॉईड (नैसर्गिक नत्रयुक्त कार्बनी संयुग - यामध्ये किमान एक तरी नायट्रोजनचा अणू असतो) आणि कुमारिन (Coumarin - बेन्झोपायरॉन वर्गातील सुगंधी कार्बनी संयुग) या पदार्थांचा अभ्यास केला. त्यांच्या संशोधनासाठी त्यांना १९४० मध्ये कलकत्ता विद्यापीठाचे सुवर्णपदक आणि नागार्जुन पारितोषिक मिळाले. १९४२ मध्ये प्रेमचंद रॉयचंद स्टुडंटशिप आणि अतिशय मानाच्या मुअ‍ॅट सुवर्णपदकाने (Mouat gold medal) त्यांना गौरवण्यात आले. १९४४ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून डॉक्टर ऑफ सायन्स (डी. एससी.) पदवी घेतली. भारतीय विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवणारी ही पहिली महिला. डॉ. प्रफुल्लचंद्र राय, डॉ. एस. एन. बोस, डॉ. मेघनाद सहा यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. सन १९४० ते १९५४ या काळात त्यांनी लेडी ब्रेबॉर्न कॉलेज येथे प्राध्यापक आणि रसायनशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम पहिले. १९४४ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात मानद अधिव्याख्याता म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

१९४५ मध्ये डॉ. बरदानंद चॅटर्जी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि डॉ. असिमा मुखर्जी, डॉ. असिमा चॅटर्जी झाल्या. डॉ. बरदानंद भौतिकी रसायनशास्त्रज्ञ होते. मृदाविज्ञान व क्षरण या विषयातील ते विशेषज्ञ मानले जात. बंगाल अभियांत्रिकी महाविद्यालयात रसायनशास्त्र व भूगर्भशास्त्र विभागप्रमुख तसेच उपप्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. असिमांवर आपल्या पतींचा खूपच प्रभाव होता. बरदानंद यांनी आपल्या पत्नीला संशोधनासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आणि सहकार्य केले. कलकत्ता विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. ज्यूली बॅनर्जी या असिमा आणि बरदानंद यांच्या कन्या. डॉ. ज्युली, जावई डॉ. अभिजीत बॅनर्जी आणि नातू डॉ. अनिरुद्ध यांनी संशोधनाचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. असिमांना विज्ञानाबरोबरच संगीतामध्येही रुची होती. त्यांनी जवळजवळ १४ वर्षे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. त्यांनी संस्कृतमध्येही प्राविण्य मिळवले होते. प्राचीन भारतीय साहित्याचाही त्यांनी अभ्यास केला होता.

लेडी ब्रेबॉर्न कॉलेज आणि विद्यापीठात अध्यापन आणि संशोधन चालू असताना असिमांना परदेशी जाण्याची संधी मिळाली. १९४९ मध्ये त्या अमेरिकेला रवाना झाल्या. अमेरिकेतील 'विस्कॉन्सीन विद्यापीठातील' प्रा. एल. एम. पार्क्स यांच्या प्रयोगशाळेत, 'कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी' येथे प्रा. एल. झेकमायस्टर यांच्या प्रयोगशाळेत तर, झ्यूरिक विद्यापीठात नोबेल विजेते शास्रज्ञ प्रा. पॉल करीर यांच्या प्रयोगशाळेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तेथे त्यांनी नैसर्गिक ग्लायकोसाइड (Glycosides - शर्करेचा रेणू अन्य रेणू किंवा गटाशी जोडल्याने निर्माण होणारे संयुग. वनस्पतींमध्ये हे संयुग निष्क्रीय अवस्थेत साठवले जाते), कॅरोटीनॉईड्स (Carotenoids- वनस्पतींमध्ये आढळणारे रंगद्रव्य) आणि प्रोव्हिटॅमिन (Provitamin - शरीरात चयापचय क्रियेद्वारे याचे जीवनसत्वात रूपांतर होते) यांचा अभ्यास केला. परदेशी संशोधनाचा हा अभ्यास त्यांना समृद्ध करून गेला.

सन १९५० मध्ये भारतात परत आल्यानंतर त्यांनी लेडी ब्रेबॉर्न कॉलेज आणि कलकत्ता विद्यापीठात पुन्हा आपला पदभार स्वीकारला आणि संशोधनही पुढे चालू ठेवले. त्या काळाचा विचार केला तर, 'नैसर्गिक घटकांचे रसायनशास्त्र अभ्यासणे' म्हणजे एखादा अवघड गड सर करण्यासारखे होते. औषधी वनस्पतींची उपयुक्तता आपल्याला ज्ञात होती आणि त्यांचा वापर अनेक शतकांपासून आपण करत आहोत. पण त्या मागची जैविक प्रक्रिया मात्र माहीत नव्हती. या औषधी घटकांचा अभ्यास करण्यासाठी वनस्पतींमधून हे घटक वेगळे करणे आवश्यक असते. पण वनस्पतींमधील या घटकांचे प्रमाण अतिशय सूक्ष्म असल्याने हे घटक वेगळे करणे हेच मोठे आव्हान होते. त्यानंतर या घटकांची रेण्विय रचना अभ्यासणे हे दुसरे आव्हान. १९४० च्या दशकात, जेव्हा असिमांनी आपले संशोधन सुरु केले, तेंव्हा आजच्यासारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. म्हणूनच असिमांनी केलेल्या कामाचे महत्व शब्दातीत आहे. असिमांनी वनस्पतींमधील अनेक औषधी घटक वेगळे करून त्यांचे रासायनिक गुणधर्म अभ्यासले. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत., तर याहीपुढे जाऊन हे घटक प्रयोगशाळेत निर्माण करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आणि त्यामध्ये त्या यशस्वीही झाल्या.

अल्कलॉइडवरील संशोधनाची सुरुवात १९३८ मध्ये झाली. असिमांनी १९३८ मध्ये इंद्रजव (Apocynaceae) या सपुष्प वनस्पती कुळातील रेवोल्फिया केनेसन्स (Rauwolfia Canescens) या वनस्पतीमधील अल्कलॉइडचा अभ्यास केला. असिमांच्या मते स्फटिकरूपातील रेवोलसीन (Rauwolscine) या अल्कलॉइडमध्ये औषधी गुणधर्म असतात. या अल्कलॉइडच्या त्रिमितीय रचनेचा त्यांनी अभ्यास केला. त्यांचा सप्तपर्णी या प्रजातीचा अभ्यास अत्यंत महत्वाचा समजला जातो. त्यांनी सप्तपर्णी (Alstonia Scholaris), चिरायत (Swertia Chirata), कुटकी (Picrorphiza Kurroa) आणि सागरगोटे (Caesalpinia Crista) या वनस्पतींपासून हिवतापावरील औषध विकसित केले. हिवतापावरील प्रसिद्ध औषध क्विनाईनला पर्याय म्हणून हे औषध वापरले जाते. पुढे त्यांनी चतुष्पत्री आणि जटामान्सीपासून आयुष-५६ हे अपस्मार या आजारावरील प्रभावी औषध विकसित केले. या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. तसेच हे औषध अतिशय कमी किंमतीत उपलब्ध होते. या दोन्ही औषधांसाठी 'सेंट्रल कौन्सिल ऑफ रीसर्च इन आयुर्वेद अँड सिद्ध' या संस्थेकडून त्यांना पेटंट मिळाले. ही औषधे नंतर अनेक औषध कंपन्यांनी बाजारात आणली. या संशोधनामुळे औषधनिर्माणशास्त्राची दिशाच बदलून गेली. दुष्परिणाम विरहीत औषधोपचाराला महत्त्व आले. कर्करोगाच्या उपचारातील केमोथेरपीमध्ये वापरले जाणाऱ्या 'विन्का अल्कलॉइड'चाही त्यांनी अभ्यास केला. हे अल्कलॉइड विशिष्ट प्रकारच्या सदाफुली वनस्पतीपासून मिळवले जाते.

१९४० मध्ये असिमांनी कुमारिनच्या रचनेचा अभ्यास केला. अनेक औषधी वनस्पतीतील कुमारिन वेगळे काढण्यात त्यांना यश मिळाले. कुमारिन असलेल्या नवीन रासायनिक अभिक्रिया त्यांनी शोधल्या आणि यातूनच कृत्रिमरित्या कुमारिन तयार करण्याच्या पद्धतीचा शोध लागला. अनेक औषधी वनस्पतींचा अभ्यास करून त्यामधील टेरपेनोईड्सचा अभ्यास त्यांनी केला. (Terpenoids - अनेक वलयांकित कार्बनी संयुगे जोडून हे संयुग तयार होते.) जवळजवळ ६०% नैसर्गिक पदार्थ टेरपेनोईड्स असतात. वनस्पतींमध्ये आढळणारे टेरपेनोईड्स औषधी गुणधर्म दाखवतात. वेलची, लवंग, आले यांचा गंध तसेच सूर्यफूलाला पिवळा व टोमॅटोला लाल रंग टेरपेनोईड्समुळे प्राप्त होतो. सुपारीची पाने जननक्षमतेवर परिणाम करतात हे सर्वप्रथम असिमांनी दाखवून दिले. तसेच पारंपरिक स्मृतीवर्धक औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्रह्मी वनस्पतीच्या रासायनिक व औषधी गुणधर्मांचा त्यांनी अभ्यास केला.

सुरुवातीच्या काळात असिमांना खूपच संघर्ष करावा लागला. संशोधनासाठी आवश्यक त्या सुविधा नव्हत्या. मूलभूत विज्ञानातील संशोधनाला आर्थिक मदत व इतर सोयीसुविधा पुरवून गती देणाऱ्या विज्ञान - तंत्रज्ञान विभागासारख्या (DST) संस्था तेंव्हा अस्तित्वात नव्हत्या. वैज्ञनिक - औद्योगिक अनुसंधान परिषद (CSIR) ही संस्था नुकतेच बाळसे धरु लागली होती. संशोधनाला लागणारे रासायनिक पदार्थ आणि इतर उपकरणे संशोधकांना खरेदी करावी लागत. प्रयोगशाळेत तयार झालेल्या पदार्थांचे पृथःक्करण परदेशी प्रयोगशाळेत करावे लागे आणि त्याचा भार संशोधकांना सोसावा लागे. त्यावेळी असिमांना प्रतिवर्ष रू. ३००/- इतका तुटपुंजा निधी मिळत असे. वनस्पतींमधील घटक वेगळे काढण्यासाठी वनस्पतींचे भाग (जसे मूळ, खोड, पाने इ.) कुटून बारीक करावे लागत. त्यासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांना जादवपूर विद्यापीठात तर या घटकांचे वर्णपटाच्या अतिनील विभागातील गुणधर्म तपासण्यासाठी बोस इन्स्टिट्यूटला भेट द्यावी लागत असे. त्या कठीण काळात प्रा. सत्येंद्रनाथ बोस, प्रा. मेघनाद सहा, प्रा.एस. के. मित्रा, प्रा. बी. सी. गुहा, प्रा. सर जे. सी. घोष यांनी असिमांना नेहमीच उत्तेजन दिले. आपल्या गुरुवर्यांचे हेच बीज त्यांच्यात रुजले. पुढील काळात त्याही आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणास्थान बनल्या. आपल्या संशोधनावर आधारित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमध्ये त्यांनी चारशे शोधनिबंध प्रकाशित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणसाठ विद्यार्थ्यांनी पीएच. डी. आणि तीन विद्यार्थ्यांनी डी. एससी. पदवी संपादन केली. त्याचबरोबर त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली. प्रा. सत्येंद्रनाथ बोस यांच्या आग्रहावरून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी बंगाली भाषेत 'सरल माध्यमिक रसायन' हे पुस्तक लिहिले. भारतीय औषधी वनस्पतींची साद्यन्त माहिती देणाऱ्या 'भारतीय वनौषधी' चे सहा खंड त्यांनी संपादित केले. या ग्रंथासाठी १९८१ मध्ये त्यांना कलकत्ता विद्यापीठाने 'भुबन मोहिनी दास' सुवर्णपदक देऊन गौरवले.

आपल्या संशोधन आणि अध्यापनाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदांवर काम केले आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १९५४ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९६२ मध्ये 'कुमार गुरुप्रसाद सिंग खैरा प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री' हे सन्माननीय पद त्यांना मिळाले. १९८२ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी हे पद भूषवले. १९६९ ते १९७९ या काळात विभागप्रमुख पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली. अपार कष्ट घेण्याची तयारी, सहकाऱ्यांबरोबर समन्वय आणि दूरदृष्टी हे त्यांचे विशेष गुण होते. त्यांच्या कार्यकाळातच रसायनशास्त्र विभाग आंतरराष्ट्रीय पातळीवर अध्यापन आणि संशोधनाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास आला. १९७५ ते १९७८ या काळात रसायनशास्त्र विभागातील 'कार्बनी रसायनशास्त्र' या उपविभागास उपकरण खरेदी आणि अध्यपकांना परदेशी प्रशिक्षण घेण्यासाठी विशेष निधी युनेस्को - यूएनडीपीने मंजूर केला. अशा प्रकारचे आर्थिक सहाय्य मिळवणारा तो देशातील एकमेव विभाग होता. 'शिक्षण म्हणजे केवळ माहिती संप्रेषण नव्हे तर हे ज्ञानार्जन आहे आणि आपल्या ज्ञानाचे महत्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे', असे त्यांचे ठाम मत होते आणि अध्यापक म्हणून त्यांनी नेहमीच त्या दृष्टीने प्रयत्न केले. 'नैसर्गिक उत्पादनांचे रसायनशास्त्र' या विषयावरील अध्यापन आणि संशोधनाला उत्तेजन देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने १९७२ मध्ये काही निवडक विभागांसाठी एक विशेष योजना मंजूर केली. असिमांच्या अध्यापन आणि संशोधनकार्याची दखल घेऊन कलकत्ता विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील 'कार्बनी रसायनशास्त्र' या उपविभागाचे निवड झाली आणि या योजनेच्या मानद समन्वयक म्हणून असिमांची नियुक्ती झाली. हा विभाग पुढे १९८५ मध्ये 'सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज ऑन नॅचरल प्रॉडक्ट्स' म्हणून ओळखला जाऊ लागला आणि २००३ मध्ये त्याचे 'सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज ऑन नॅचरल प्रॉडक्ट्स इन्क्ल्यूडिंग रगॅनिक सिंथेसिस' असे नामकरण झाले. निवृत्तीनंतरही २००३ पर्यंत असिमांनी या विभागाची धुरा सांभाळली.

पश्चिम बंगालमध्ये भारतीय वनौषधींचा अभ्यास करणारे स्वतंत्र आयुर्वेदिक हॉस्पिटल असावे, हे त्यांचे सुरुवातीपासूनच स्वप्न होते. यासाठी बंगाल सरकारकडून त्यांना ‘सॉल्ट लेक सिटी’ येथे साडेतीन एकर जागा मिळाली. त्याचबरोबर संस्थेच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडून चार कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यांच्या अथक प्रयत्नातून 'रीजनल रीसर्च इन्स्टिट्यूट' (आता 'सेंट्रल रीसर्च इन्स्टिट्यूट') ही संस्था उभारली. या संस्थेमध्ये नवनवीन औषधे विकसित करून त्यांची वैद्यकीय चाचणी घेतली जाते.

विज्ञान - संशोधनाच्या प्रसारासाठी त्यांनी जगभर प्रवास केला, अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. 'वनस्पती रसायनशास्त्र' या विषयावर युनेस्कोने क्वालालंपूर (१९५७) आणि हॉंगकॉंग (१९६१) येथे आयोजित केलेल्या परिसंवादाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. तसेच झ्यूरिक (१९५५), ऑस्ट्रेलिया (१९६०), जपान (१९६४) आणि रशिया (१९७०) येथे आयूपीएसीच्या 'नैसर्गिक उत्पादनांचे रसायनशास्त्र' या विषयावरील परिषदेच्याही त्या अध्यक्ष होत्या. भारत आणि रशिया या देशांमधील 'सांस्कृतिक देवाणघेवाण' कार्यक्रमांतर्गत त्यांनी रशियातील अनेक विद्यापीठे व संस्थांना भेट दिली. रशियामध्ये आयोजित केलेल्या 'इंडो - सोवियत' परिषदांमध्ये त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. १९७६ मध्ये श्रीलंका सायन्स काँग्रेस, १९७९ मध्ये पोलंडमधील 'आयसोप्रेनॉइड्स' वरील आंतरराष्ट्रीय परिसंवाद, १९८७ मध्ये बँकॉक येथील 'फर्स्ट प्रिन्सेस काँग्रेस ऑन नॅचरल प्रॉडक्ट्स' या परिषदांमध्ये त्या सहभागी झाल्या. तसेच १९७५ मध्ये 'जर्मन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स' आणि ब्रिटिश कौन्सिलने त्यांना निमंत्रित केले. त्यांनी इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठ, इंपीरियल केमिकल इंडस्ट्रीजला भेट दिली. १९८१ मध्ये 'विमेन इंटरनॅशनल डेमॉक्रॅटिक फेडरेशन' ने प्राग येथे आयोजित केलेल्या 'वर्ल्ड ऑफ विमेन' या परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 'महिला आणि त्यांचे कार्य' या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नांचाही उहापोह केला.

१९६८ मध्ये 'सल्फोनामाईड डेरिव्हेटिव्ह' च्या स्वामित्व हक्काबाबतच्या कायदेशीर लढाईत त्यांनी भाग घेतला. ही लढाई त्यांचे गुरु कै. आचार्य प्रफुल्लचंद्र राय यांनी स्थापन केलेल्या 'बंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स लि. कोलकाता' (आता 'गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज') आणि हक्स्ट कं. लि. (Hoechst Co. Ltd.) यांच्यामध्ये झाली. बंगाल केमिकलच्या वतीने श्री. सोमनाथ चॅटर्जी (पुढे त्यांनी लोकसभा सभापतीपद भूषवले) यांनी वकील म्हणून काम पाहिले, तर हक्स्टची बाजू मांडण्यासाठी स्वामित्व हक्काविषयी तज्ज्ञ मानले जाणारे वकील खास परदेशातून आले होते. असिमांना कलकत्ता उच्च न्यायालयात शेकडो प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली. कार्बनी रसायनशास्त्र विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास त्यांच्या कामी आला. त्यांच्या विद्वत्तेमुळेच बंगाल केमिकल्स कंपनीला हा लढा जिंकता आला. हा लढा बंगाल केमिकल्ससाठी खूप महत्वाचा होता. कारण ही लढाई हरली असती तर, कंपनी दिवाळखोरीत निघाली असती.

असिमांना अनेक मानसन्मान मिळाले. १९६० मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (ता इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडेमी) च्या सभासद म्हणून त्या निवडून आल्या. १९६१ मध्ये अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'शांतीस्वरूप भटनागर' पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला. त्यांच्यानंतर पुन्हा हा पुरस्कार मिळवण्यासाठी महिलांना चौदा वर्षे वाट पहावी लागली. १९७४ मध्ये इंडियन केमिकल सोसायटीतर्फे 'सर पी. सी. राय' पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. १९७५ मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या त्या पहिल्या स्त्री-शास्त्रज्ञ. बंगाल चेंबर ऑफ कॉमर्सने १९७५ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला वर्षाचे औचित्य साधून 'वुमन ऑफ द इयर' म्हणून त्यांची निवड केली. बुर्दवान विद्यापीठ (१९७६), बनारस हिंदू विद्यापीठ (१९८२), विद्यासागर विद्यापीठ (२००६) अशा अनेक विद्यापीठांनी त्यांना मानद 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही पदवी प्रदान केली. १९७५ मध्ये भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' या पुरस्काराने गौरवले. विद्यापीठ अनुदान आयोगाने १९८२ चा सर सी. व्ही. रामन' पुरस्कार बहाल केला. ऑल इंडिया युनिट कॉन्फरन्सचे 'इंदिरा गांधी प्रियदर्शनी अ‍ॅवॉर्ड (१९९४)', सेंट्रल कौन्सिल फॉर रीसर्च इन आयुर्वेद अँड सिद्ध' तर्फे 'सिल्व्हर ज्युबिली अ‍ॅवॉर्ड (१९९५)', कलकत्ता विद्यापीठाचे 'एमिनंट टीचर अ‍ॅवॉर्ड (१९९७)' असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. इंडियन केमिकल सोसायटीने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा सत्कार केला. १९८२ मध्ये राज्यसभेच्या खासदार म्हणून राष्ट्रपतींनी त्यांची नियुक्ती केली. कोलकात्याचे महापौर श्री. विकासरंजन भट्टाचार्य यांनी असिमांना 'ऑनर्ड सिटिझन ऑफ कोलकाता' हा 'किताब बहाल केला. सहकारी, विद्यार्थी या सर्वांच्याच त्या लाडक्या होत्या. विद्यार्थ्यांसाठी आदरणीय गुरु तर सहकाऱ्यांसाठी त्या मोठ्या बहिणीच्या स्थानी होत्या. अखेरपर्यंत अध्यापन आणि संशोधनात कार्यरत राहून त्यांनी २२ नोव्हेंबर २००६ रोजी जगाचा निरोप घेतला.

कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सतत कार्यमग्न राहून आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या खऱ्याखुऱ्या 'कर्मयोगी' म्हणून त्या कायम स्मरणात राहतील.

तेजस्विनी देसाई
tejaswinidesai1970@gmail.com

(लेखिका के. आय. टी. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (स्वायत्त), कोल्हापूर येथे पदार्थविज्ञान विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या महिला वैज्ञानिकांवर अभ्यास करत आहेत.)

संदर्भ -

  1. ‘Women Scientists in India – Lives, Struggles, Achievements’ by Anjana Chattopadhyay, National Book Trust, India.
  2. ‘Lilavati’s Daughters – The women Scientists in India’ Edited by Rohini Godbole, Ram Ramaswamy, The Indian Academy of Sciences, Bangalore, India.
  3. ‘Asima Chatterjee’ Biog. Mem. Fell. INSA, N. Delhi 32 179-215 (2007)
  4. https://en.wikipedia.org/
  5. https://feminisminindia.com/2017/11/02/asima-chatterjee-pioneer-medicinal-chemistry/
  6. ‘Women, Science, Education And Empowerment: Asima Chatterjee, The Genius Lady’ By Swati Basak, : International Journal Of Research In Humanities, Arts And Literature (Impact: Ijrhal) Issn (E): 2321-8878; Issn (P): 2347-4564 Vol. 3, Issue 5, May 2015, 133-138
  7. De, Asish (1 January 2015). "Asima Chatterjee: A unique natural products chemist". Resonance: Journal of Science Education. 20 (1): 6–22
  8. https://m.siliconindia.com/