कमळातल्या गोष्टी

२६ मार्च २०२२

कमळाची रोपं अंगणात लावण्याचं स्वप्न अनेक वर्षांपासून होतं तिचं. मातीविटांनी लिंपलेलं छोटंसं तळं अंगणात असावं. त्यात कमळं फुलावीत. त्यावर फुलपाखरं, मधमाशा गुणगुणाव्यात. छोटे रंगीत पक्षी भिरभिरावेत आणि आपण तासनतास ते पाहत बसावं, असं साधं गोजिरं तिचं स्वप्न.

घरात तर जागेअभावी हे स्वप्न शक्य नव्हतं. मग, तिने तिच्या पॉटरी स्टुडिओच्या अंगणात एक प्लास्टिकचा टब ठेवला. आणि अखेर कुठून तरी कमळाच्या बिया मिळवल्याच. बिया अगदी टणक. नारळाच्या कवचासारख्या भेदायला कठीण. ‘या बियांमधून खरोखर काही अंकुरेल का’, तिला प्रश्न पडला. मग, गूगलला शरण जाऊन तिने कमळाच्या बिया कशा रुजवायच्या ते समजून घेतलं. बिया कठीण होत्या. त्या कठीणपणाला भेदून बाहेर येणं अंकुरांना अवघड जाणार होतं. मग, तिने सॅन्डपेपरवर बियांची टोकं घासली. खूप वेळ घासत राहिली. टोकांची बाजू जरा झिजली. मग, तिने एका सुंदर काचेच्या बाटलीत स्वच्छ पाणी भरलं. त्या बिया त्यात बुडवून ठेवून दिल्या. रोज डोळ्यासमोर त्या दिसत राहतील, अशा जागी ठेवून ती तिच्या कामाला लागली.

माती भिजवणे, माती मळणे, त्याच्या सुबक सुंदर वस्तू बनवणे, आगीत भाजून त्या वस्तू पुढची हजार वर्षं टिकतील इतक्या पक्क्या करणं, हेच तिचं काम होतं. आणि त्यात ती रमून गेली.

थोड्याच दिवसांनी अचानक एक दिवस तिचं लक्ष समोरच्या काचेच्या बाटलीकडे गेलं, आणि तिच्या छातीभर एक आनंद भरून आला. हा अनुभव फार कमी वेळा येत असे.

पोपटी हिरवे सुरेख-सुंदर कोंब त्या बियांच्या पोटातून बाहेर आले होते. बिया दुभंगल्या होत्या. त्यांची आधीची रिजिडीटी नष्ट झाली होती. तो पोपटी हिरवा रंग जणू ती पहिल्यांदाच पाहत होती. किती ताजा. किती नवा. पूर्णत: नव्या जन्मासारखा. ‘जन्म’ या घटनेचा रंग कोणता हे तिला या आधी कुणी विचारलं असतं तर तिला सांगता आलं नसतं. पण त्या अंकुरांना पाहिल्यावर तिला खात्री पटली की, जन्माच्या सोहळ्याचा रंग हा असाच असणार. Lush green... पिवळ्या आणि पोपटी रंगाच्या मधली एक शेड.. फ्रेश हिरवी अशी. मग, रोजच त्या अंकुरांभोवती ती भिरभिरू लागली. सर्जनाची अती घाई झालेल्या चित्रकारासारखे ते अंकुर प्रचंड वेगाने मोठमोठे होऊ लागले. रोज नवं रूप, रोज नवा आकार आणि रोज नवा रंग. मग त्या अंकुरांची छान रेखीव पानं तयार झाली. त्या पानांची रुजवण करण्यासाठी तिने त्यांना काचेच्या बाटलीतून त्या प्लास्टिकच्या टबातल्या चिखल झालेल्या मातीत पेरलं. ती पानं पाण्यावर छान तरंगू लागली.

आपण सगळं छान सुरळीत पार पाडलंय, असं तिला वाटत असतानाच काही दिवसात पानं कोमेजू लागली. पानांकडे बघत तंद्रीत थोडा विचार केला पण कळलं नाही. मग मित्रामैत्रिणींशी याबद्दल बोलल्यावर तिच्या लक्षात आलं की, रोपांना पुरेसं ऊन मिळत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या पाण्यात गप्पी मासे सोडायचे राहून गेले होते. मासे हा कमळाच्या वाढीसाठीचा पोषक घटक. एकमेकांच्या आधाराने कमळं आणि मासे वाढतात. निसर्गाने त्यांची जी एक इकोसिस्टिम तयार केली आहे, त्यातूनच ते दोघं जगतात. एकमेकांना जगवतात.

मग तिने त्यात मासे आणून सोडले. आह्हा... आता सगळं सेट झालंय. आता पुढच्या ऋतूत फक्त कमळं फुलण्याचा अवकाश... तोच ती पहिली लाट आली... कोण कुठला तो विषाणू. मनामनात दहशत पेरून गेला. तीन महिने माणसं घराघरांमध्ये बंदिस्त होऊन गेली.

कमळं आणि मासे खूप वाट पाहत राहिले तिची. मात्र, त्यांना पाणी घालण्यासाठी ती येऊ शकली नाही. उन्हाच्या काहिलीत सगळं पाणी आटल्यानंतर तग तरी किती काळ धरणार. पाण्यासोबत मासेही विरून गेले. कमळाची रोपं सुकून मातीत एकजीव झाली. त्या तीन महिन्यांनी खूप काही बदलून टाकलं. माणसांच्या नजरांपासून, मेंदूत, मनात, छातीत सगळीकडे फक्त भीती भरून राहिली. मृत्यूची भीती. आपल्या माणसांपासून दुरावण्याची भीती. सगळं संपून जाण्याची भीती, भीती आणि भीती... तरीही त्या तीन महिन्यांनंतर पुन्हा सकाळ झाली, ती स्टुडियोला पोचली. स्टुडियोचं दार उघडण्याआधी अंगणातल्या कमळांच्या टबापर्यंत तिच्या पायांनी घाईने तिला ओढत नेलं.

पण ती येईपर्यंत पाणी आणि माशांचं विश्व पूर्ण संपलं होतं. तिने बोटाने मातीत दाबून पाहिलं. अजून ओल शिल्लक होती. नीट पाहिल्यावर तिला लक्षात आलं की, एक देठ अजूनही हिरवा होता. तशीच तिने घाईनं नळावरून मोठी बादली पाण्याने भरून, तिच्या सशक्त हातात उचलून आणली आणि त्या टबात ओतली. पुन्हा सगळं नव्याने सेट करावं लागणार. पुन्हा मासे सोडावे लागणार कमळांभोवती. माशांशिवाय कमळं फुलत नाहीत. बहरत नाहीत. दोन विश्वामधले ते दोन जीव. पण कुठल्या प्रेमाच्या धाग्याने एकमेकांना धरून जिवंत ठेवतात.

पुन्हा तिने कुठून तरी गप्पी मासे आणून त्यात सोडले.

हळूहळू माणसं पुन्हा घराबाहेर पडू लागली. भीतीच्या पलीकडेही आशा टिकून आहे, याची प्रचीती प्रत्येकाला येऊ लागली. वर्षानुवर्ष सातत्याने आशावाद जिवंत ठेवत माणसांनी नाती पेरली होती. ती आता रुजली होती. आणि बहरली होती. एका न दिसणाऱ्या विषाणूमुळे वर्षानुवर्ष जपलेली नाती आणि माणसं अशीच अर्धवट सोडून द्यायला सगळ्या माणसांनी ठाम नकार दिला.

आशावाद जिंकताना दिसू लागला. कमळाची रोपं पुन्हा बहरली. जग पुन्हा माणसांनी गजबजू लागलं.

आणि मग दुसरी लाट आली. पहिल्या लाटेपेक्षा खूप मोठी. अनेक जिवांना ओढून घेतलं तिने. आभाळात आक्रोश भरून राहिला. रस्त्यांवर, घराघरात, आयांच्या छातीत, पोरांच्या हाकांमध्ये, प्रेमिकांच्या हृदयात फक्त आणि फक्त आक्रोश भरून राहिला. माणसांच्या फुप्फुसांमधले श्वास संपले. जेव्हा छातीच्या भात्यामधून ओढता येण्यासारखं काहीच शिल्लक राहिलं नाही, तेव्हा माणसांनी जीव सोडले. शरणागत झाले, मृत्यूला.

त्यात तिचाही जिवलग होता. तो तिचा सखा, प्रियकर, तिचं अर्धं जग होता. त्या कमळ आणि गप्पी माशांसारखंच त्यांचं नातं होतं. त्यांच्यासारखीच ह्यांचीही इको सिस्टीम होती दोघांची. जखमा झाल्या तिला खोलवर. त्या दिवशी तिला पुन्हा लक्षात आलं की, नव्याने झालेल्या जन्माचा रंग जसा हिरवा असतो; तसा खोलवर झालेल्या जखमांचा रंगही हिरवाच असतो. जखमा या मातीच्या वस्तूसारख्या भाजून जुन्या, अतिजुन्या, पुरातन, प्राचीन, अतिप्राचीन वगैरे झाल्या तरीही त्यांचा रंग मात्र तसाच राहतो..पोपटी हिरवा.. Lush green..

तिच्या जखमेचा हिरवा रंग घेऊन ती कमळांना दाखवायला गेली. पण हाय रे... पुन्हा एकदा ती कमळं आणि मासे पाण्यासोबत विरून गेले होते. यावेळी तिला वेदना झाल्या नाहीत. तिच्या जखमेच्या हिरव्या रंगाने तिच्या भावनांना शुष्क केलंय, ही जाणीव तिला झाली. ती यांत्रिकपणे जमिनीवर कमळाच्या टबाशेजारी बसली. चिखल झाला होता. तो सुकत चालला होता. तिने तो चिखल हाताने चिवडायला सुरुवात केली. ती माती वर खाली करू लागली. हातांची गती वाढली. माती शुष्क झाली नव्हती. बरीच ओल शिल्लक होती आत. त्या चिखलात कमळाची मूळं शोधताना ती अचानक थांबली. खाली तळाशी तिला एक हिरवी रेघ दिसली. छातीतल्या हिरव्या जखमेने डोळ्यात भरलेल्या पाण्याला वाट करून दिली. समोरची हिरवी रेघ क्षणभर धूसर झाली. दोन्ही हातांनी तिने डोळ्यातलं पाणी पुसलं. चिखलातल्या हिरव्या रेघेभोवतीचा चिखल बाजूला करत ती अवाक होऊन पाहत राहिली. पहिल्यांदा जेव्हा बिया रुजवल्या होत्या तेव्हा तिने ऐकलं होतं की, कमळाच्या कठीण कवचाच्या त्या बिया पाण्यात तळाशी, खोल चिखलात जाऊन बसतात. त्या इतक्या कठीण असतात की वर्षानुवर्ष चिखलात राहूनही त्या ना सडतात, ना कुजतात. उलट त्या जास्त सर्जनशीलच होत जातात. आणि मग अनेक वर्षांनी त्यातून छोटे हिरवे अंकुर बाहेर पडतात. त्यांची रोपं होतात. ती बहरतात.. तळी कमळाच्या फुलांनी भरून जातात. वरवर बघणाऱ्यांना तो सुखद नजारा तेवढा दिसतो; पण बीमधनं बाहेर येऊन फुलण्यापर्यंत जो अनंत काळाचा प्रवास त्याने केलेला असतो, तो दिसत नाही. सोपा नसतो कमळाचा जन्म...

हिरवी रेघ बनून राहिलेला तो अंकुर तिने पुन्हा रुजवला. ते करत असताना छातीतल्या खोल जखमांचं हिरवेपणही तिने नाकारलं नाही. जणू छातीतल्या त्या खोल हिरव्या जखमाचं तिनं रुजवल्या. हिरवा रंग हा सर्जनाचा आहे, हे तिने जगाला सांगितलं.

त्या दुसऱ्या लाटेनंतरही तिसरी, चौथी, पाचवी अनेक लाटा येत राहिल्या. कमळाच्या देठातला आणि तिच्या छातीतल्या खोल जखमेतला हिरवा रंग एकच आहे, हे तिनं अख्ख्या जगाला पटवून दिलेलं आहे. एवढंच...

ही गोष्ट होती तिची आणि कमळाच्या बियांची आणि माशांची आणि पाण्याची आणि एका हिरव्या रंगाची...

दीप्ती देवेंद्र
deepti.devendra@gmail.com

(लेखिका माती, रंग आणि शब्दांचा खेळ खेळते.)