काळाचा हिशोब मागणारी कविता

२४ फेब्रुवारी २०२२

कवी जितेंद्र अहिरे यांची कविता आजच्या वर्तमानाची भाषा बोलते. समकाल टिपताना कवी बैचेन होऊन जातो. लोकशाहीची गळचेपी होत असताना, 'आम्ही हिशोब घेऊ', असा आवाज तो उठवतो, तेव्हा तो सर्वसामान्य माणसाला जवळचा वाटत राहतो. आजची बिघडलेली परिस्थिती आणि ती परिस्थिती लादणारे यांच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे; पण भाकरीच्या मागे पळण्याची हतबलता आडवी येते आहे. नैसर्गिक जगण्याच्या चिंधड्या उडवून माणसांना जनावरासारखं शर्यत लावून पळवलं जात आहे. जगणं महाग आणि मरण स्वस्त झालं आहे. कविता लिहिताना लिहित्या हाताने घेतलेली ठाम वैचारिक भूमिका एका नव्या वैचारिक मंथनाची सुरुवात करते. एका नव्या वैचारिक क्रांतीची पेरणी करते. म्हणून या ठिकाणी कवीने घेतलेली भूमिका ही वेगळी ठरते. आज इतका भयावह काळ सुरू आहे की, कुठल्याही परिस्थितीत जगणं अवघड झालं आहे. लोक हताशपणे स्वातंत्र्योत्तर भारताच्या चित्राकडे बघत आहेत. वाढणारी महागाई, वाढलेली बेरोजगारी, या सगळ्या विरोधात कुठूनतरी आवाज उठवला गेला पाहिजे, ते काम या कविता करतात. या होरपळून गेलेल्या भवतालात कवी लिहितो. ते लिहिणं आपल्या भावना आहेत, असं वाटतं राहतं.

पक्षी झेप घेत आहेत
शतकाची मरगळ फेकत आहेत
मुक्तीच्या या लढ्यात
मूकनायकाचा एल्गार होईल .

लढण्याची भाषा बोलणारा माणूस. निव्वळ दगडाच्या काळजाचा असतो असं नाही. त्याचा संवेदनशीलपणा कोणत्या तरी ठिकाणी बाहेर पडत असतो. आपला कवी कधी कधी अत्यंत भावूक होऊन चार ओळी लिहितो तेव्हा ते वाचत असताना लिखाणातील वैविध्यपूर्णता आणि आपल्या प्रत्येक भावना योग्य शब्दात मांडण्याची धडपड यातून कवीचे वेगळेपण लक्षात आल्याशिवाय राहत नाही. सामान्य माणसाच्या मोठ्या समूहाचे प्रतिनिधित्व करणारी ही कविता वाटते. शोषणाच्या हजार पद्धती विकसित करून शोषक आज गोंडस रूप घेऊन बसले आहेत. सशाने गरजेपोटी जंगलाचा राजा सिंहाकडे धडधडत्या हृदयाने कैफियत मांडण्यासाठी जावे आणि सिंहानेच त्याचे दोन घास करून खावेत. तेव्हा न्याय कुणाकडे मागायचा. जंगलात लोकशाही नसते. केवळ लोकशाहीचा भास असतो. असं 'जंगलराज' मानवी वस्तीत अवतरलं आहे. माणसाच्या नरडीचा घोट घेणारी नरभक्षक माणसं वाढली आहेत. अनेक कमजोर सामान्य लोकांना हे लोक पिळून खात आहेत. अशी आज एकूण परिस्थिती निर्माण झाली आहे.

आभाळातून शब्द
पावसासारखे टपकत गेले
आणि
हृदयाची माती ओली झाली

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवून पुढं चालणारी जी चळवळ उभी राहिली, ती चळवळ पुढे नेणारी जी नवी पिढी आहे, कवी त्यातलाच एक वारसदार आहे. 'विचाराचे वारसदार असणं' ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर वरचेवर ही गोष्ट दुर्मीळ होत चालली आहे. पण कायद्याचा आग्रह करून सत्य जपणारी कायदेशीर दुनिया हे त्याचं स्वप्न आहे. 'जात नाही ती जात', असे बोलून कळत नकळत जातिव्यवस्थेचे समर्थन करणारे वाढत चालले आहेत. त्यांना त्यांच्या जातीचे कळप बनवायचे आहेत. त्या कळपाचा प्रमुख होऊन मिरवायचं आहे. जातीय अस्मिता टोकदार करून माणुसकीचे खून पाडून नाचायचं आहे. जातीसाठी माती खावी लागते असं त्यांचं ब्रीदवाक्य ठरलं आहे. अशा परिस्थितीत जो पुरोगामी विचार वारसा चालवण्यासाठी आवश्यक त्या हालचाली झाल्या पाहिजेत. सगळ्या जातीच्या माणसांना एक करणारे महामानव होऊन गेले आता आपापल्या जातीत महामानव वाटून घेण्याचे महान कार्य त्यांचेच पोकळ अनुयायी करत आहेत. महामानवाचा पराभव त्यांचेच अनुयायी करत आहेत. हे ठळकपणे दिसून येते आहे.

जात न शोधली जाईल
असं ठिकाण तू दे
धर्म ना ओळखला जाईल
असं नाव तू दे

चळवळीतील मुलींविषयी माझ्यातरी वाचनात जास्त आलेलं नाही. 'चळवळीतील मुली' ही या कवितासंग्रहातील एक महत्त्वाची कविता आहे. ज्यात चळवळीतील मुलींविषयी नेमकेपणाने लिहिलं गेलं आहे. स्त्री-पुरुष समानता, पुरुषप्रधान समाजव्यवस्था, शिकलेल्या मुलीची प्रबोधन क्षेत्रातील वाटचाल या सगळ्या गोष्टी इथं उमटलेल्या दिसतात. मुलीच्या विषयावर मराठीत अजून बरंच लिखाण येईल असा हा काळ आहे. मुली त्यांच्या भावना मांडतील. पण उंबरा ओलांडून, शिक्षण घेऊन, ती प्रबोधन चळवळीत येणं ही मोठी क्रांतीकारक गोष्ट आहे. आणि या चळवळीतील मुलींविषयी चळवळीतील मुलगा लिहीत आहे ही आणखी क्रांतीकारक गोष्ट आहे. पितृसत्ताक कुटुंबपद्धती, मुलीचे शिक्षण, तिचे अधिकार, तिचे प्रबोधन आणि तिच्या हातून प्रबोधन या टप्प्यावर पोचण्यासाठी महाराष्ट्राने मोठी किंमत मोजली आहे. सावित्रीबाईच्या अंगावर आलेले दगड धोंडे आपण विसरू शकत नाही.

चळवळीतील मुली लढाऊ असतात
तत्त्वासाठी भांडत असतात
आपली मत मांडत असतात
हिरमुसत कोपऱ्यात रडत नसतात
त्या सुरुंग असतात
घरापासून रस्त्यापर्यंत संघर्ष करत असतात .

कवी स्वतच्या नाजूक कोवळ्या भावना मांडताना बुद्धाला विसरत नाही. उलट तो त्याच्या आणखी जवळ गेला आहे. त्याला खरं तर तो खुणावतोय.

बुद्ध म्हणजे प्रेम. हे अनुभवता येतं. कवी किती नजाकतीने सुंदर शब्दांत, नेमक्या शब्दात म्हणतो. बुद्धाला प्रेम म्हणणं हे किती सुंदर आहे. बुद्ध म्हणजे मूर्तिमंत प्रेम... हे अगदी खरं आहे. बुद्धाने नेहमीच प्रेमाचा आग्रह धरला होता. बुद्धाने जगाला प्रेमाचा संदेश दिला. नंतरच्या काळात बुद्ध आणि प्रेम हे समानार्थी शब्द होऊन गेले. आज ही वेळ आली आहे की प्रेम करणाऱ्या तिच्यात कवीला बुद्ध दिसत आहे.

हजारो शहरे उद्ध्वस्त करणाऱ्या
अथांग महासागराच्या किनाऱ्यावरील
तू कोरलेला बुद्ध होतीस .

भवताल टिपत असताना तो केवळ नोंद करणारा लेखनिक न ठरता तो स्वत: हे आयुष्य जगतोय. पेटलेले चौक, वाढलेली महागाई, हाताला नसलेलं काम, जे काम करू त्यात होणारी पिळवणूक, सगळं सगळं तो तुम्हाला सांगू इच्छितो. 'बारूदची इवलीशी चिमूट सुद्धा आग पेटवते.' अशा ओळी तो लिहून जातो. मूठभर लोकांनी बहुसंख्य लोकांना हतबल बनवण्यासाठी कटकारस्थान सुरू केले आहे. कमजोरी लादण्याची मोहीम सुरू झाली आहे. लोक यामध्ये भरडले जात आहेत. त्यांच्या समोर कमालीची अपरिहार्यता आहे. पोटापाण्यासाठी रोज हजारो लोक गाव सोडून जातात. पाठीवर घर घेऊन हिंडतात. हातात काम नाही. कामाला योग्य दाम नाही ही अवस्था गेली अनेक वर्षे आ वासून उभी आहे. कित्येक पिढ्या यात होरपळत चालल्या आहेत.

कामावरून सुटण्याचा सायरनचा आवाजही
खूप सुखद असतो . अगदी तुमच्यासाठी
बाजारात सोन्याचा भाव घसरल्यासारखा

हे सगळं सांगत असताना तो उद्या काय वाढून ठेवलंय, यांच्याविषयी सांगू लागतो. तेव्हा ते भयानक वाटू लागतं. वाचताना अनामिक भीती वाटत राहते. पण जे आहे ते आहे. या भूमिकेतून बघताना हे चित्र दिसते. भयाण वास्तवातून शेवटी आज ना उद्या भयाण अस्वस्थता जन्माला येते, हा जुना इतिहास आहे. साहजिकच, यांचे परिणाम स्फोटक असणार आहेत. सगळ्या व्यवस्था उलथापालथ करून टाकणारी कार्य येत्या काळात होत जातील. नव्याने पुन्हा सुरुवात करावी लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. शतकानुशतके एकच परिस्थिती राहत नसते हे जरी खरे असले तरी, ही परिस्थिती बदलण्यासाठी सामान्य माणसं असामान्य कामगिरी करून परिस्थिती बदलतात. पण मूळ प्रश्न हा आहे की, ही लढाई वारंवार लढावी लागते. या लढाईतून नव्याने उभे राहत असताना नवे शोषक निर्माण होतात व ते जुन्या शोषकाची जागा घेतात, असे शोकांतिका ठरणारे चित्र दिसत आहे. त्यामुळे मूळ लढाई निष्फळ ठरत आहे.

हे महासत्तेच्या देशा
या नजरेतच अणुबॉम्ब
पेरले जात आहेत उद्यासाठी
हे तू विसरलास .

सामान्य माणसाला अस्वस्थ करणारा काळ नेहमीच सुरू असतो. पण सगळं बोलणं जेव्हा गळ्यापर्यंत येऊन थांबतं आणि अन्याय गटागटा गिळून गप्प बसावं लागतं तेव्हा कुणीतरी बोललं पाहिजे. तेव्हा जितेंद्रची कविता एक बंडखोर विद्रोही आवाज म्हणून समोर येते. संविधानाची ताकद सांगते. प्रजा ही राजा आहे. राज्यकर्ते हे सेवक आहेत हे ठळकपणे सांगते. आणि वाईट गोष्टी विरुद्ध लढण्याचे आवाहन ही करते. प्रत्येक पिढीत एक अंगार फुलला की, नवी निर्मिती बाहेर पडते. कधी त्या निर्मितीमुळे घर चालते किंवा गाव चालते पण जेव्हा एखाद्या नव्या पिढीतील तरुण लेखणी उचलून हिशोब मागतो तेव्हा ती मोठी गोष्ट ठरते. बरं, हिशोब मागणारा शोषित जनतेतून येतो, तेव्हा त्याचे बोल पोकळ ठरत नाहीत. राज्यकर्ते रोज एकमेकांना हिशोब मागतील त्यांचे जनतेला कौतुक नसते. कारण ते भामटेच असतात. आळीपाळीने तूप-रोटी खाणारे भामटे असतात. पण जेव्हा शोषित माणूस शोषकांना हिशोब मागतो तेही अत्यंत भयाण काळात, तेव्हा त्याला कमालीचे महत्त्व येते. इतिहासात अशा गोष्टी ठळकपणे नोंदवल्या जात असतात. हिशोबाची भाषा त्यांच्या खुर्चीला तडा देणारी ठरते. आणि शोषकांच्या जगण्यात नवी आशा पेरणारी ठरते.

आम्ही हिशोब घेऊ
आमच्या सांडलेल्या रक्ताचा

योग्य वेळी उठलेला आवाज म्हणून या कवितासंग्रहाची नोंद घ्यावी लागेल.

देविदास सौदागर
devidassaudagar@gmail.com